गरम मसाला


सगळ्यात पहिल्यांदा हा माझा प्रयोग नसून माझ्या आईची खासियत आहे. कोणीही मला गरम मसाल्याविषयी विचारले की मी नेहमी आईचे नाव सांगायचे. आता मी पुण्यात असल्यानी शेवटी मला ह्याची कृती बघण्याला मिळाली आणि म्हणूनच मी इथे ती देत आहे. खूप किचकट आणि मोठे काम असलेतरी मसाला एकदम मस्त बनतो.

गरम मसाला
साहित्य
५०० ग्राम धने
५० ग्राम जिरे
५० ग्राम बडीशेप
४० ग्राम खसखस
२० ग्राम तेज पत्ता
१० ग्राम बादल फुल
१० ग्राम मसाला वेलची
१० ग्राम जायपत्री
१० ग्राम नाक केसर
१० ग्राम दालचिनी
१० ग्राम मिरे
१० ग्राम लवंग
५ ग्राम हळद काडी
१/२ जायफळ
१ कम हिंग तुकडा
२० ग्राम दगड फुल
२० ग्राम शाही जीरा
तेल

कृती
  • कढईत १/२ चमचा तेल गरम करणे. त्यात जायपत्री घालुन मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजणे. मिक्सरच्या भांड्यात घालणे.
  • त्याच कढईत तेलाचे २ थेंब आणि नाक केसर घालुन साधारण ३ मिनिट मंद आचे वर फुलेपर्यंत भाजणे. मिक्सरच्या भांड्यात घालणे.
  • त्याच कढईत अजून २ थेंब तेल घालुन त्यात दगडी फुल घालुन मंद आचेवर ३ मिनिट भाजणे व मिक्सरमध्ये घालणे.
  • २ थेंब तेल घालुन लवंग मंद आचेवर ३-४ मिनिट फुलेपर्यंत भाजणे व मिक्सरमध्ये घालणे
  • कढईत २ थेंब तेल घालुन मिरे मंद आचेवर ४ मिनिट भाजणे. मिक्सरमध्ये घालणे
  • तेलाचे २ थेंब घालुन त्यात दालचिनी मन आचेवर गडद होईपर्यंत भाजणे व मिक्सर मध्ये घालणे.
  • कढईत तेलाचे २ थेंब घालुन त्यात बडीशेप मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजणे व मिक्सरमध्ये घालणे.
  • जायफळाचे तुकडे करून मंद आचेवर १ थेंब तेलाबरोबर २ मिनिट भाजणे व मिक्सरमध्ये घालणे.
  • हिंगाचे तुकडे करून ते १ थेंब तेलाबरोबर मंद आचेवर पांढरे होईपर्यंत भाजणे व मिक्सरमध्ये घालणे
  • हळदीच्या तुकड्याचे बारीक तुकडे करून ते १ थेंब तेलाबरोबर मंद आचेवर लाल होईपर्यंत भाजणे व मिक्सरमध्ये घालणे.
  • त्याच कढईत २ थेंब तेल घालुन तेज पत्ता ३ मिनिट मंद आचेवर भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • २ थेंब तेलाबरोबर बादल फुल मंद आचेवर २ मिनिट भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • २ थेंब तेलाबरोबर मसाला वेलची मंद आचेवर २ मिनिट भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • १ थेंब तेलाबरोबर जीरा गडद होईपर्यंत मंद आचेवर भाजून मिक्सरच्या भांड्यात घालणे.
  • शाही जीरा १ थेंब तेलाबरोबर २ मिनिट मंद आचेवर भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • खसखस १ थेंब तेलाबरोबर १ मिनिट मंद आचेवर भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • मिक्सरमधील सगळे मसाले एकत्र बारीक वाटणे व चाळून घेणे. चाळणीत उरलेली मसाल्याची पूड पुन्हा मिक्सरमध्ये घालणे.
  • पुन्हा बारीक वाटून पूड चालणे व वर राहिलेले मसाले पुन्हा मिक्सरमध्ये घालणे.
  • २ चमचा तेल घालुन निम्मे धने मध्यम आचेवर भाजून घेणे. धने फुटायला लागले की आच मंद करून अजून १ मिनिट भाजणे. निम्मे धने मिक्सरमध्ये घालणे व वाटणे.
  • मसाला पुन्हा चाळणे व वर राहिलेला मसाला पुन्हा मिक्सरमध्ये घालणे. उरलेले भाजलेले धने घालुन वाटणे व चाळून घेणे. चाळणीत राहिलेले मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये घालणे.
  • २ चमचा तेल घालुन उरलेले धने मध्यम आचेवर भाजून घेणे. धने फुटायला लागले की आच मंद करून अजून १ मिनिट भाजणे. निम्मे धने मिक्सरमध्ये घालणे व वाटणे.
  • मसाला पुन्हा चाळणे व वर राहिलेला मसाला पुन्हा मिक्सरमध्ये घालणे. उरलेले भाजलेले धने घालुन वाटणे व चाळून घेणे. चाळणीत राहिलेले मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये घालणे.
  • मिक्सरमध्ये वाटून पुन्हा मसाला चाळणे. सगळा मसाला चांगला एकत्र करणे.

टीप
दिलेल्या प्रमाणातच तेल वापरणे नाहीतर मसाले वाटायला फार त्रास होतो.
दिलेल्या क्रमातच मसाले भाजून वाटणे म्हणजे त्याचा वास चांगला राहतो
सगळ्यात शेवटी चाळणीत उरलेले मसाले मांसाहारी कृतीत किंव्हा कुठल्याही वाटणात वापरता येईल
वरील साहित्यात ३/४ किलो मसाला होतो

मेदू वड्यासाठी चटणी


माझ्याकडच्या पुस्तकात वाचून मी हि चटणी केली आणि एकदम मस्त झाली. वड्याबरोबर एकदम उत्तम (अर्थातच मला वडा सांबार जास्त आवडत असल्यानी मी त्याची आठवण काढली).

मेदू वड्यासाठी चटणी
साहित्य
१/२ नारळ
१/४ वाटी फुटाणे डाळ
६ हिरव्या मिरच्या
१ कोथिंबीर
१/२ वाटी दही
१/२ चमचा म्हवरी
१/२ चमचा उडीद डाळ
चिमुटभर हिंग
१ चमचा तेल
मीठ

कृती
  • नारळ खवून घेणे व हिरवी मिरची, कोथिंबीर, फुटाणे डाळ आणि मीठ घालुन मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
  • ह्या मिश्रणात दही घालुन एकत्र करणे.
  • कढईत ते; गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे व त्यात हिंग घालणे.
  • फोडणी चटणीत घालुन एकत्र करणे.

टीप
मी नारळाचे पाणीच नारळ मिश्रण वाटण्यासाठी वापरले त्यामुळे एकदम छान लागले आणि वेगळी साखर घालावी लागली नाही
तेलात लाल मिरची पण घालता येईल पण माझ्याकडे ती नसल्यानी मी नाही वापरली

मेदू वडा


मेदू वडा हा माझा आवडता पदार्थ. घरात संध्याकाळी यायचे पाहुणे दुपारी कळले तर बनवायला एकदम उत्तम.

मेदू वडा
साहित्य
२ वाटी उडीद डाळ
२ हिरव्या मिरच्या
४ खोबऱ्याचे तुकडे
१ कांदा
मीठ

कृती
  • डाळ धुवून ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवणे.
  • जास्तीचे पाणी ओतून डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
  • त्यात मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या, कांदा आणि खोबरे घालुन एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून वडे मंद आचेवर भाजणे.

टीप
डाळ वाटल्याबरोबर लगेच वडे तळणे नाहीतर ते फार तेलकट होतात
वडे तेलात घातल्यावर ते तरंगायला पाहिजेत नाहीतर पिठात थोडे पाणी घालुन हलके करणे.
ह्यात आले पण घालता येते पण मला वाड्यात ते फारसे आवडत नसल्यानी मी वापरले नाही

मटण बिर्याणी


बरेच दिवसांपासून अजॉय ह्याची मागणी करत होता पण मला मटण फारसे आवडत नसल्यानी मी इतके दिवस बनवण्याचे टाळत होते. शेवटी आज मी हि बिर्याणी बनवली आणि एकदम छान पण झालेली

मटण बिर्याणी
साहित्य
३ वाटी तांदूळ
१/२ किलो मटण
७ कांदे
२ टोमाटो
२ बटाटे
१/२ वाटी दही
१/४ वाटी दुध
मुठभर काजू
५ बदाम
१ आले
१०-१५ लसूण पाकळ्या
१ चमचा गरम मसाला
२ चमचा तिखट
चिमुटभर हळद
१ चमचा धने पूड
१ चमचा खसखस
१.५ चमचा मिरे पूड
१/२ चमचा जिरे
१ चमचा बडीशेप
१ चमचा सुके खोबरे
८ लवंग
५ दालचिनी
२ तेजपत्ता
५-६ वेलची
चिमुटभर केशर
१/२ वाटी तूप
मीठ
तेल

कृती
  • आले आणि लसूण एकत्र बारीक वाटून घेणे.
  • मटण धुवून घेणे व त्याला दही, हळद, १ चमचा तिखट, निम्मी आले लसूण पेस्ट लावणे. ८ तास मुरण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • दुसऱ्यादिवशी तांदूळ धुवून घेणे व अर्धा तास कोमट पाण्यात भिजत ठेवणे. जास्तीचे पाणी ओतून देणे व बाजूला ठेवणे.
  • बटाटे उकडून घेणे व चकत्या बनवणे.
  • दुध गरम करणे व त्यात केशर विरघळवणे.
  • ३ कांदे बारीक बारीक चिरणे व बाजूला ठेवणे.
  • कढईत एक चमचा तेल गरम करणे व त्यात कांदा गुलाबी भाजणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात अजून १ चमचा तेल घालुन त्यात जीरा, ३ दालचिनी, ५ लवंग, १ चमचा मिरे, धने, सुके खोबरे, बडीशेप, खसखस आणि उरलेले एक चमचा तिखट घालुन भाजणे.
  • मसाल्यांचा वास सुटला की त्यात भाजलेला कांदा घालणे व गुलाबी रंगावर भाजणे.
  • त्यात उरलेली आले लसूण पेस्ट घालणे व भाजणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
  • बदाम, काजू(८-१०) आणि वर भाजलेला मसाला थोडे पाणी घालुन एकत्र वाटणे.
  • उरलेले ४ कांदे बारीक उभा चिरून तुपात गुलाबी रंगावर तळणे.
  • उरलेले काजू भाजणे व बाजूला ठेवणे.
  • चमचाभर तूप बाजूला ठेवून उरलेले तूप गरम करणे. त्यात मसाला घालुन तूप सुटेपर्यंत भाजणे
  • त्यात मटणाचे तुकडे घालुन तूप सुटेपर्यंत शिजवणे.
  • टोमाटो मिक्सरमध्ये वाटून घेणे व शिजणाऱ्या मटणात घालणे.
  • त्यात १/४ वाटी पाणी आणि मीठ घालुन मिश्रणाला शिट्टी काढणे व नन्तर मंद आचेवर १० मिनिट शिजू देणे.
  • मटण शिजत असताना १० वाटी पाणी उकळवून त्यात मीठ घालणे व तांदूळ घालुन भात शिजवणे.
  • जास्तीचे पाणी ओतून भात थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • कढईत उरलेले तूप गरम करणे व त्यात ३ लवंग, २ दालचिनी, १/२ चमचा मिरे, ताज पत्ता, वेलची भाजणे व भातात मिसळणे.
  • शिजलेले मटण कढईत घालुन सुकेपर्यंत शिजवणे.
  • त्यातील बाजूला सुटलेले तूप वेगळे करणे.
  • कुकरला तुपाचा हात लावणे व खाली बटाट्याच्या चकत्या लावणे.
  • त्यावर भाताचा १/३ भाग पसरवणे. निम्मे मटण पसरवून त्यावर १/३ भाग काजू व कांदा पसरवणे.
  • त्यावर अजून १/३ भाग भात पसरवणे. उरलेले मटण घालुन त्यावर १/३ भाग कांदा व काजू पसरवणे.
  • उरलेला भात वर पसरवून त्यावर उरलेले काजू व कांदा घालणे.
  • परतण्याच्या मागच्या बाजूनी भातात आरपार भोके पाऊन त्यावर वेगळे केलेले तूप व केशराचे दुध घालणे.
  • कुकर बंद करून मंद आचेवर तवा ठेवून त्यावर १५ मिनिट गरम करणे.

टीप
वाढताना अख्खा थर बाहेर काढून वाढणे म्हणजे सगळ्या मसाल्यांची चव चांगली ताटलीत येईल.

पालकाच्या भजीची कढी


आम्ही अगदी लहान होतो तेंव्हापासून बाबा आईला त्यांच्या ऑफिसच्या कढीचे कौतुक सांगत आलेले बघितलंय. आई बिचारी नेहमी तशी (तिनी कधीही न खालेली) कढी बनवण्याचा प्रयत्न करायची पण यश बाबांच्या मते काही आले नाही :) त्यामुळे अर्थातच लहान असताना आम्ही आठवड्यातून दोनदा तरी हि कढी खायाचोच. ताकापेक्षा कढी बरी कारण खोकला नाही होणार त्यामुळे कढी कढी जास्तच वेळा. मी हि कढी बनवताना नेहमीच्या भजीऎवजी पालक वापरायचा ठरवला.

पालकाच्या भजीची कढी
साहित्य
३ वाटी पालक भजी
६ वाटी ताक
चिमुटभर हळद
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
३ चमचा साखर
१ चमचा तूप
मीठ

कृती
  • ताकात साखर आणि मीठ घालुन चांगले विरघळवणे.
  • कढईत तूप गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे
  • त्यात हिंग, हळद टाकून टाकत मिसळणे.
  • वाढताना कढीत भजी घालुन देणे.

टीप
कढीच्या फोडणीत कडीपत्ता पण घालता येईल पण मला तो फारसा आवडत नसल्यानी मी वापरला नाही.

पालकाची भजी


साधारण एक महिना झाला हा पदार्थ बनवून पण हैदराबादमधून निघायच्या घाई गडबडीत पोस्ट करायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे आज जरा वेळ मिळालाय तर इथे ५ नवीन कृती देणार आहे.

पालकाची भजी
साहित्य
१ पालकाची गड्डी
१/२ वाटी बेसन
१/२ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
चिमुटभर जीरा पूड
१/२ चमचा धने पूड
मीठ
तेल

कृती
  • पालक धुवून बाजूला ठेवणे.
  • बेसन, तिखट, हळद, जीरा पूड, धने पूड आणि मीठ एकत्र करून पाणी घालुन भिजवणे
  • कढईत तेल गरम करून त्यातील एक चमचा तेल पिठात घालणे.
  • तेल चांगले गरम झाले की एका वेळी २ पालकाची पाने एकत्र पिठात बुडवून तेलात सोडणे व गुलाबी रंगावर भाजणे

टीप
मी पालकाची छोटी पाने वापरली त्यामुळे एकदम मस्त कुरकुरीत भजी झाली.
पिठात एकावेळी २ पाने भिजवल्यानी त्याची चव भाज्यात चांगली लागत होती.

अंड्याचा रोल


अंड्याचा रोल बंगाली खाण्यात इतका महत्वाचा आहे ह्याची मला बिलकुल कल्पना नव्हती :) इथे पूजेसाठी आम्ही गेले होतो तेंव्हा बऱ्याच लोकांना ह्यासाठी रांगेत उभे राहिलेले बघितले. अजॉय आधी कधी रोल बनवायला सांगितला की मला वाटायचे ह्याला तर पराठा जास्त आवडतो पण असे म्हणता येईल की तेंव्हा मला रोलचे महत्व कळले नव्हते पण इथली पूजा बघितल्यावर पहिल्यांदा मी रोल बनवले. अजॉय एकदम खुश होता :)

अंड्याचा रोल
साहित्य
३ वाटी मैदा
१ चमचा गव्हाचे पीठ
३ अंडी
१ कांदा
२ हिरव्या मिरच्या
हॉट आणि स्वीट टोमाटो सॉस
मीठ
तेल

कृती
  • मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि चमचाभर तेल एकत्र करून पाणी घालुन पीठ मळणे. भिजण्यासाठी अर्धा तास ठेवणे.
  • कढईत थोडेसे तेल घालुन गरम करणे व त्यात उभा चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालुन शिजवणे.
  • भिजलेल्या पीठाचे ३ गोळे करून पातळ चपाती लाटणे,
  • तवा गरम करून त्यावर चपाती टाकणे व तेल घालुन दोन्ही बाजूनी भाजणे
  • दुसरी बाजू हॉट आली की त्यावर अंडे फोडणे व पसरवणे
  • एक दोन मिनिट शिजू देणे व परतणे. तेल सोडून अंडे शिजेपर्यंत भाजणे व टिश्यूवर काढणे.
  • कांद्याचा १/३ भाग व सॉस उभ्या रेषेत चपातीवर घालणे.
  • चपाती टिश्यू सकट खालच्या बाजूनी थोडीशी दुमडून नंतर त्याचा रोल करणे.

टीप
मी पूर्ण गव्हाचे पीठ न वापरता मैदापन वापरला त्यामुळे चपाती कडक होत नाही आणि अगदी चपाती चपाती सारखी लागत नाही
रोल बनवताना एका बाजूनी मिश्रण झाकले जाईल असे दुमडावे आणि नंतर दुसऱ्या बाजूनी घट्ट बांधावे म्हणजे रोल सुटत नाही व मिश्रण बाहेर येणार नाही

कांदा पोहे


बरेच मित्र मैत्रिणी मला पटकन बनणाऱ्या आणि सोप्या नाश्त्याच्या कृती मागत आहेत. म्हणूनच इथे महाराष्ट्रातील अगदी घराघरात हमखास बनवला जाणारा सोप्पा आणि चविष्ठ पदार्थ देत आहे.

कांदा पोहे
साहित्य
२ वाटी पोहे
१/२ वाटी मटार
१ कांदा
चिमुटभर हळद
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचा जीरा
४ हिरव्या मिरच्या
४ चमचे किसलेले खोबरे
४ चमचा कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • पोहे धुवून त्यातील जास्तीचे पाणी ओतून झाकून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात म्हवरी व जीऱ्याची फोडणी करणे.
  • त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालुन भाजणे.
  • कांदा बारीक चिरून घालणे व पारदर्शक होईपर्यंत भाजणे.
  • त्यात हळद घालुन ढवळणे.
  • धुवून व भिजवून मऊ झालेले पोहे त्यात घालुन चांगले एकत्र करणे.
  • झाकणी ठेवून मंद आचेवर २-३ मिनिट वाफ येऊ देणे.
  • झाकणी काढून त्यात मीठ व मटार मिसळणे व पुन्हा ३-४ मिनिट झाकणी ठेवून मंद आचेवर वाफ काढणे.
  • ताटलीत खायला देताना वरून खोबरे व कोथिंबीर घालुन देणे.

टीप
पोहे धुवून झाकून बाजूला ठेवणे फार महत्वाचे आहे त्यामुळे ते चांगले मऊ होतात. जर पोहे थोडे कडकडीत वाटत असतील तर थोडे पाणी शिंपडणे. तसेच जास्तीचे पाणी काढायला पण विसरू नये नाहीतर पोहे जास्तच मऊ होतील व त्याचा लगदा होईल
मटारच्याऎवजी फोडणी बरोबर भाजलेले शेंगदाणेपण वापरता येतील, अजॉयला फार आवडतात
पोह्यात १/२ वाटी बटाट्याचे तुकडेपण फोडणीत घालता येतील व कांदा बटाटा पोहे बनवता येतील

चेरी आणि काजूचा कप केक


मफीन बनवल्यापासून मी बरेच दिवस कप केक बनवण्याचा विचार करत होते. आज शेवटी मुहूर्त लागला :) :)

चेरी आणि काजूचा कप केक
साहित्य
२ वाटी टीन मधली चेरी
१ वाटी चेरीचे सिरप
१ वाटी पिठी साखर
२ अंडी
१/२ वाटी लोणी
२ वाटी मैदा
२.२५ चमचा बेकिंग पूड
१/२ वाटी दुध
१/२ वाटी काजू

कृती
  • लोणी, पीठ साखर आणि अंडी एकत्र फेटणे.
  • मैदा आणि बेकिंग पूड एकत्र चाळून घेणे
  • एकावेळी थोडा थोडा मैदा लोण्यात घालत एकत्र करणे.
  • चेरीच्या बिया काढून त्या, त्यांचे सिरप, काजू आणि दुध पिठात घालुन हलके एकत्र करणे.
  • ओव्हन २००C वर गरम करणे.
  • कप केपच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात २/३ काटापर्यंत मिश्रण भरणे
  • ओव्हनमध्ये २००C वर २० मिनिट केक भाजणे.

टीप
चेरी सिरप आणि थोडेसे वाटले गेलेले चेरी एकत्र मिळून एकदम चांगली चव देतात.
ह्यात बदाम आणि अक्रोडपण वापरता येतील पण माझ्याकडे ते नसल्यामुळे मी नाही वापरले
मी खारट मीठ वापराल्यानी वेगळे मीठ मैद्यात घातले नाही पण जर मीथाविना लोणी वापरले तर मैद्यात मीठ घालायला विसरू नये.

चिली पनीर


मला चायनीज फार आवडते आणि बरेच दिवस झाले मी ते खाऊन. थोड्या दिवसांपूर्वी आम्ही खालेल पण ते इतका छान नव्हता त्यामुळे ते न मोजलेलच बर. त्यामुळे काल मी स्वतःच करून बघायचा ठरवलं. ह्या आधी केलेलं चांगल झालेलं किंतु सगळ्यात चांगला नव्हत. आज एकदम छान झालेलं असल्यानी त्याची कृती देत आहे

चिली पनीर
साहित्य
४०० ग्राम पनीर
१ कांदा
६ मिरच्या
१५ लसूण पाकळ्या
चिमुटभर मिरे पूड
२ चमचा डार्क सोया सॉस
१ चमचा टोमाटो सॉस
१ चमचा कॉर्न फ्लौर
२-३ कांद्याच्या पाती
मीठ
तेल

कृती
  • पनीर चौकोनी कापून त्याला कढईत गरम तेलावर गुलाबी रंगावर भाजून घेणे.
  • त्याच तेलात कांदा भाजणे.
  • त्यात मिरच्या आणि लसूण कापून घालणे व भाजणे.
  • मिरे पूड, सोया सॉस घालुन थोड्यावेळ ढवळणे
  • आता त्यात भाजलेले पनीर आणि टोमाटो सॉस घालुन २-३ मिनिट शिजवणे.
  • कॉर्न फ्लौर एका वाटी पाण्यात एकत्र करून शिजणाऱ्या पनीरमध्ये घालणे
  • लागल्यास अजून थोडे पाणी घालुन झाकणी लावून ३ मिनिट शिजवणे.
  • वरून काड्याची पात चिरून घालणे व वाढणे.

टीप
मी मिरच्या उभ्या चिरून घातल्या त्यामुळे एकदम हॉटेलच्या डीशसारखे दिसते
पनीर भाजताना त्याला हलका गुलाबी रंग आला की लगेच बाहेर काढणे, जास्त भाजल्यानी ते सुकून तडतडीत होण्याची शक्यता असते
स्टारटर सारखे वापरायचे असेल तर थोडे कमी पाणी वापरणे म्हणजे सुके होईल

व्हेज फ्राईड राइस


मला हक्क नूडल्स आवडतात पण मला अजून हॉटेलसारख्या बनवायला जमल नाहीये त्यामुळे मी बऱ्याच वेळा फ्राईड राइस बनवते

व्हेज फ्राईड राइस
साहित्य
२ वाटी तांदूळ
१ कांदा
१ वाटी कोबी
१/२ वाटी गाजर
१/२ वाटी मटार
चिमुटभर मिरे पूड
मीठ
तेल

कृती
  • भात शिजवून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात कांदा, उभे चिरलेले गाजर घालुन परतणे.
  • त्यात चिरलेला कोबी घालुन परतणे.
  • त्यात मटार, मिरे पूड आणि मीठ घालुन अजून एक मिनिट शिजवणे.
  • शिजवलेला भात घालुन परतणे व २-३ मिनिट शिजवणे.

टीप
सगळ्यात पहिल्यांदा गाजर घालणे म्हणजे ते शिजायला वेळ मिळतो.

कोफ्ता करी


जेंव्हा जेंव्हा आम्ही दुधी भोपळा आणतो तेंव्हा अजॉय हा कोफ्ता बनवायला सांगतो. काल मी शेवटी बनवला आणि इथे कृती देत आहे

कोफ्ता करी
साहित्य
४ वाटी किसलेला दुधी भोपळा
१.५ वाटी बेसन
२ टोमाटो
१ कांदा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा जीरा
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा आमचूर पूड
१/४ चमचा धने पूड
कोथिंबीर
मीठ

कृती
  • किसलेल्या दुधी भोपळ्याला मीठ लावणे व बाजूला ठेवणे.
  • पिळून सुटलेले पाणी वेगळे करून त्यात १/२ चमचा जीरा, १/२ चमचा तिखट, गरम मसाला आणि आमचूर पूड घालणे.
  • लिंबाच्या आकाराचे गोळे करून तेलात मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.
  • त्यात बारीक चिरून कांदा, लसूण पेस्ट घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • त्यात हळद, उरलेली तिखट, धने पूड आणि मीठ घालणे.
  • टोमाटो घालुन पूर्णपणे शिजवणे. पाणी घालुन उकळी आणणे.
  • मिश्रण मिक्सरमध्ये मिश्रण घालुन बारीक वाटणे.
  • कढईत वाटण व पाणी घालुन त्यात कोफ्त्याचे गोळे घालुन उकळी आणणे.
  • वरून कोथिंबीर घालुन वाढणे.

टीप
मी कोफ्त्याला मसालेदार बनवले आणि ग्रेव्ही थोडी कमी मसालेदार ठेवली त्यामुळे कोफ्त्याची जास्त मजा येते.

भरलेली भेंडी फ्राय


बरेच दिवसांपासून भेंडी फ्राय करायला सांगत होता. त्यानी कडीपत्त्याऎवजी आज भेंडी आणली. लगेच मला कळले की त्याला भेंडी फ्राय किती जास्त खावास वाटतंय. मी लगेच काहीतरी बनवण्याचे ठरवले.

भरलेली भेंडी फ्राय
साहित्य
१/४ किलो भेंडी
१ टोमाटो
१ कांदा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे
१/४ चमचा धने पूड
मीठ
तेल

कृती
  • भेंडी धुवून पुसून घेणे.
  • देठ कापून प्रत्येक भेंडीला एक चीर देणे व मीठ लावून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.
  • त्यात कांदा घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • त्यात लसूण पेस्ट, हळद, तिखट, धने पूड घालुन एकत्र ढवळणे.
  • त्यात टोमाटो किसून घालणे व ४-५ मिनिट एकत्र भाजणे व बाजूला ठेवणे.
  • थोडे थोडे मिश्रण प्रत्येक भेंडीत भरणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात भेंडी सोडून तळणे.

टीप
प्रत्येक भेंडीला पूर्ण चीर देण्याऎवजी दोन्ही बाजूनी थोडा भाग न चिरता सोडणे म्हणजे तळताना पूर्ण भेंडी उघडणार नाही.
तळताना भेंडी पहिल्यांदा स्टफिंग नसलेल्या बाजूला खाली सोडणे व पूर्णपणे भाजणे, भेंडीला उलटे करून एक मिनिट तळणे व लगेच बाहेर काढणे.

कटाची आमटी


हि आमटी पुरण पोळीच्या डाळीच्या उरलेल्या पाण्यातून बनवतात. एकदम गोड आणि आंबट अशी हि आमटी पुरण पोळी बरोबर एकदम मस्त लागते.

कटाची आमटी
साहित्य
२ वाटी हरबरा डाळ शिजवलेले पाणी
१/२ वाटी पुरण
१/२ वाटी गुळ
२ चमचा चिंच
१ चमचा धने
१ चमचा जिरे
१/२ चमचा म्हवरी
१ चमचा तिखट
४ चमचा खोबरे
१५ कडीपत्याची पाने
मीठ
तेल

कृती
  • चिंच एक वाटी पाण्यात भिजवणे व बाजूला ठेवणे.
  • चमचाभर तेल गरम करून त्यात धने आणि जिरे फोडणी करणे.
  • किसलेले खोबरे घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • मिक्सरमध्ये खोबऱ्याचे मिश्रण घालुन चिंचेबरोबर बारीक वाटणे.
  • अर्धा चमचा तेल गरम करून त्यात म्हवरी घालुन फोडणी करणे.
  • कडीपत्ता घालुन भाजणे
  • त्यात चिंच खोबऱ्याचे वाटण घालणे व एक मिनिट भाजणे.
  • तिखट घालुन अजून एक मिनिट भाजणे.
  • डाळीचे पाणी, पुरण आणि गुळ घालणे. जाड वाटल्यास थोडे पाणी पण घालणे.
  • मीठ घालुन आमटी उकळवणे.

टीप
डाळीचे पाणी नसेल तर साधे पाणी पण वापरता येईल
पुरण बनवण्यासाठी ह्या पुरण पोळीच्या कृतीचा उपयोग करणे

नारळाचा रस


आमच्या ह्या रसाशिवाय पुरण पोळी होऊच शकत नाही. इथे त्याची कृती देत आहे.

नारळाचा रस
साहित्य
४ वाटी खोबरे
१.५ वाटी गुळ
मीठ

कृती
  • मिक्सरमध्ये किसलेले खोबरे आणि पाणी घालुन वाटणे व पिळून दुध काढणे. तोच कीस सारखा पाणी घालुन ३ वेळा रस काढणे.
  • त्यात गुळ आणि मीठ घालुन ढवळणे.

टीप
हा रस ताजा ताजाच चांगला लागतो. वर दिलेल्या प्रमाणात ह्या पुरण पोळीच्या कृतीत दिलेल्या पोळ्यांना पुरेसा होतो.

पुरण पोळी


पुरण पोळी हा असा एक प्रकार आहे जो मला आईनी बनवलेलाच आवडतो. बरेच लोक त्याला पराठ्यासारखा बनवतात पण पोळी आणि पराठा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पोळी हि एकदम मऊसुत असणे एकदम महत्वाचे आहे. आईकाढून आधी मी ह्याची कृती घेतलेली पण मला काही आई सारखी मऊ पोळी बनवायला जमली नाही. आता पुण्यात असताना मी आई कडून चांगली शिकून आले आणि इथे दसर्याच्या निमित्तानी देत आहे. सगळ्यांना दसर्याच्या शुभेच्छा.

पुरण पोळी
साहित्य
४ वाटी हरबरा डाळ
३ वाटी गुळ
२ वाटी पीठ
१ चमचा मैदा
१ वाटी तांदुळाचे पीठ
१/२ वाटी तेल

कृती
  • मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून एकदम मऊ पीठ भिजवणे.
  • पीठ स्टीलच्या भांड्यात टाकून बोटे दाबून खड्डे करणे.
  • सगळी भोके बुडतील इतके तेल ओतणे आणि कमीत कमी २ तास भिजायला ठेवणे.
  • हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घेणे.
  • डाळीतील जास्तीचे पाणी बाजूला काढणे. (जास्तीच्या पाण्याची कटाची आमटी बनवता येईल)
  • त्यात गुळ घालुन कढईत सुकेपर्यंत शिजवणे.
  • पुरण पुरण यंत्रातून फिरवणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • पुरण पोळी करण्यासाठी तवा एकदम मंद आचेवर गरम करणे.
  • पुरणाचा लिंबाच्या दुप्पट आकाराचा गोळा बनवणे.
  • पिठाचा लिंबाच्या आकाराचा गोळा बनवणे व त्याची वाटी बनवणे. त्यात पुरणाचा गोळा घालुन पीठ बंद करणे.
  • गोळे तळव्यावर ठेवून अलगद दाबणे. पीठाचे कव्हर बाजूला गेले तर ओढून पुन्हा आत मध्ये घेणे
  • भरपूर तांदुळाचे पीठ पोलपाटाला लावणे. पुरण पोळीचा गोळा तांदुळाच्या पिठात बुडवून लाटणे.
  • मध्ये मध्ये पोळी हातावर घेवून खाली चिकट नाही ह्याची खात्री करणे व मधून मधून तांदुळाचे पीठ लावत राहणे.
  • एकदम अलगद आणि बाहेरच्या दिशेनी लाटणे महत्वाचे आहे.
  • पोळी गरम तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूनी भाजणे. दुमडून वाढणे.

टीप
पोळीच्या पिठाचा इलॅस्टिकपणा पोळीला पातळ लाटण्यासाठी आणि त्याचा थर पातळ ठेवण्यासाठी उपयोगी पडतो.
पुरण पोळी बनवताना पहिल्यांदा छोटी लाटून बघणे व जसे जमेल तसे मोठे मोठे करणे. भरपूर तांदुळाचे पीठ वापरणे व नंतर पाहिजे तर स्वतःच्या सोयीप्रमाणे कमी करणे.
पोळी पोलपाटाला चिकट नाही हे बघण्यासाठी तळवा पोळीवर ठेवून पोलपाट उलटे करणे.तव्यावर पोळी टाकताना पण तसेच करणे. कधीही बोटांनी पोळी उचलू नये.
पोळीच्या कडांना जास्त पीठ असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की पुरणापेक्षा पीठ जास्त वापरलाय. त्या नंतरच्या पोळीला थोडे कमी पीठ वापरून बघणे
पोळी लाटताना बाहेरच्या बाजूला लाटल्यानी पोळी सगळीकडून चांगली पसरते आणि बाहेरच कव्हर पण तुटत नाही.
शेवटची टीप म्हणजे हि एकदम किचकट कृती आहे त्यामुळे पहिल्यांदा यश नाही आलेतरी दुखी होऊ नये, थोड्या प्रयत्नानंतर यश नक्की येईल. मी आईनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी सांगायचा प्रयत्न केलाय. आशा आहे त्याचा उपयोग होईल

शेंगण्याचे चॉकोचीप मफीन


ह्या वेळी अजॉयनी युस वरून मफीनचे भांडे आंडले आहे. घरात पीनट बटर असल्यानी त्याचा वापर करण्याचे मी ठरवले आणि हे मफीन बनवले.

शेंगण्याचे चॉकोचीप मफीन
साहित्य
१ वाटी पीनट बटर
१ वाटी चॉकोचीप
२ वाटी मैदा
१ चमचा व्हॅनिला इसेन्स
१.५ वाटी साखर
२ अंडी
१.५ चमचा बेकिंग पूड
१/२ चमचा खाण्याचा सोडा
१/२ वाटी दुध

कृती
  • पीनट बटर, अंडी, साखर आणि व्हॅनिला इसेन्स एका भांड्यात एकत्र फेटणे.
  • मैदा, बेकिंग पूड, खाण्याचा सोडा एकत्र ३-४ वेळा चाळून घेणे.
  • एका वेळी थोडा थोडा मैदा लोण्यात घालुन फेटणे.
  • त्यात चॉकोचिप्स घालुन हलकेच ढवळणे.
  • ओव्हन २००C वर गरम करणे.
  • मफीनच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात प्रत्येक भांड्यात २/३ काटापर्यंत मिश्रण घालणे.
  • ओव्हनमध्ये २००C वर १५ मिनिट मफीन भाजणे.

टीप
इथे चॉकोचिप्स मिळत नसल्यानी मी कॅडबरीचे तुकडे करून वापरले.
तसेच मला असे लक्षात आले की मी जर अर्धे साधे लोणी आणि अर्धे पीनट बटर वापरले असते तर जास्त चांगली चव आली असती.

भरलेले पनीर


पनीर बनवण्यासाठी मी थोड्या वेगवेगळ्या कृती शोधत होते आणि हि पनीर पसंदाची कृती मिळाली. मला हि कशी बनवतात हे फार आवडले आणि त्यावर प्रभावित होऊन मी हे बनवलेय.

भरलेले पनीर
साहित्य
४०० ग्राम पनीर
२ चमचे मनुके
१/४ चमचा कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा मैदा
१/२ चमचा कॉर्न फ्लौर
२ टोमाटो
१/२ चमचा जीरा
१/४ चमचा म्हवरी
१/२ चमचा हळद
१ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
१/४ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/२ चमचा कसुरी मेथी
१ चमचा क्रीम
मीठ
तेल

कृती
  • पनीर त्रिकोणी मध्य्रम आकारात कापणे
  • ३ तुकडे किसणे व त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मनुका घालुन एकत्र करणे.
  • बाकीच्या तुकड्यांना चिरा देणे.
  • त्यात आधी बनवलेलं मिश्रण घालुन बाजूला ठेवणे.
  • मैदा, कॉर्न फ्लौर आणि पाणी एका भांड्यात एकत्र करून पातळ पीठ भिजवणे.
  • त्यात पनीरचे भरलेले तुकडे घालुन तेल गरम करून त्यात गुलाबी रंग येईपर्यंत हे तुकडे तळणे.
  • त्याच तेलात म्हवरी आणि जिरे टाकून फोडणी करणे.
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन शिजवणे.
  • तिखट, जिरे पूड, धने पूड, हळद, गरम मसाला घालुन परतणे.
  • मिश्रण थंड करून त्यात कसुरी मेथी घालुन बारीक वाटणे.
  • त्याच कढईत हे वाटण आणि पाणी घालुन उकळवणे. तळलेले पनीरचे तुकडे घालुन उकळी आणणे.
  • त्यात मीठ आणि क्रीम घालुन अजून एक मिनिट उकळवणे.

टीप
कसुरी मेथी मी वाटण भाजायच्या आधी न घालता वाटली त्यामुळे एक विशिष्ठ चव आली.

ब्रेड सॅन्डविच फ्राय


ह्या सारखाच अजून एक पदार्थ: ब्रेड रोल बनवलेला पण ह्यात थोडे वेगळे मिश्रण घातल्यानी इथे देत आहे.

ब्रेड सॅन्डविच फ्राय
साहित्य
८ ब्रेड स्लाईस
१ बटाटे
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/२ चमचा आमचूर पूड
मीठ
तेल

कृती
  • बटाटे किसून पाण्यात घालणे
  • पाणी निथळून त्यात तिखट, जिरे पूड, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ घालणे.
  • ब्रेडच्या कडा कापून टाकणे.
  • प्रत्येक ब्रेडचा तुकडा एक-दोन सेकंद पाण्यात भिजवणे व लगेच ओं तळव्यांमध्ये दाबून पाणी काढणे.
  • मध्ये बटाट्याचे मिश्रण घालुन कडा दुमडून त्रिकोणी आकारात बंद करणे.
  • कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर ब्रेड तळणे.

टीप
ब्रेड खूप जास्तवेळ पाण्यात बुडवला तर त्याचा लगदा होईल व नीट आकार देता नाही येणार त्यामुळे पटकन पाण्यातून बाहेर काढणे महत्वाचे आहे

झेरी झेरी आलू भाजा


आम्ही मागच्या आठवड्यात आम्ही ओहरीस मध्ये बंगाली फूड फेस्टिवलसाठी गेलेलो आणि तिथे आम्ही हा पदार्थ खाल्ला आणि तेंव्हा असे वाटलेले की त्यानी हा एकदम फ्रेंच फ्राईजसारखा बनवलेला असे वाटत होते. ह्या आठवड्यात मी स्वत: बनवण्याचे ठरवले.

झेरी झेरी आलू भाजा
साहित्य
२ बटाटे
मीठ
तेल

कृती
  • बटाटे किसणे व पाण्यात धुवून टिश्यूवर काढणे.
  • तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर हा कीस गुलाबी रंग येईपर्यंत तळणे.
  • त्यावर मीठ टाकून खायला देणे.

टीप
कुरकुरीत भाजा बनवण्यासाठी एकदम मंद आचेवर भरपूर वेळ तळणे महत्वाचे आहे
तेलातून बाहेर काढल्यावर अजून थोडेसे गडद होते त्यामुळे तेलात कीस काला होऊ देऊ नये
बटाटे किसून लगेच पाण्यात टाकल्यानी ते काळे होत नाही

पालक पनीर


हा अजून एका अजॉयला पालक खाऊ घालण्याचा पालक पुरीशिवाय अजून एक प्रयत्न.

पालक पनीर
साहित्य
२ पालक
२०० ग्राम पनीर
२ टोमाटो
५ चमचा क्रीम
१/४ चमचा कॉर्न फ्लौर
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा जिरे
१/४ चमचा हळद
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा कसुरी मेथी
मीठ
तेल

कृती
  • ४-५ वाटी पाणी उकळवून त्यात पालकाची पाने दोन मिनिट बुडवणे.
  • पाणी ओतून पाने बारीक वाटणे.
  • तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.
  • त्यात लसूण पेस्ट, आले पेस्ट, हळद व बारीक चिरलेला टोमाटो घालणे.
  • थोडा वेळ परतून त्यात तिखट, धने पूड, जिरे पूड आणि कसुरी मेथी घालणे.
  • मंद आचेवर टोमाटो शिजेपर्यंत परतणे.
  • मिक्सरमध्ये पालकाच्या पेस्ट बरोबर घालुन बारीक वाटणे.
  • कढईत पनीरच्या तुकड्यांबरोबर एकत्र उकळवणे.
  • त्यात क्रीम घालणे.
  • कॉर्न फ्लौर ४ चमचा पाण्याबरोबर एकत्र करून उकळत्या भाजीत घालुन वाढणे.

टीप
क्रीम आणि कॉर्न फ्लौरनी ग्रेव्ही जरा जाड होते. फक्त क्रीम वापरल्यानी ग्रेव्हीतून पालकाची चव जाऊ शकते आणि कॉर्न फ्लौरनी एकदम पाणचट होऊ शकते त्यामुळे मी दोन्ही एकत्र वापरले

बटर चिकन


हॉटेलमधील एक अतिशय आवडती डीश. साधारण महिन्यापूर्वी केलेला पण फोटो काढून पोस्ट करण्याची ताकद उरली नव्हती त्यामुळे आज पुन्हा हि डीश केल्यावर इथे देत आहे

बटर चिकन
साहित्य
३०० ग्राम बोनलेस चिकन
२ टोमाटो
१ कांदा
१.५ चमचा तिखट
२ चमचा धने पूड
१ चमचा कसुरी मेथी
१ चमचा जीरा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
चिमुटभर लाल रंग
१/२ चमचा साखर
१/४ चमचा टोमाटो सॉस
१ वाटी क्रीम
४ चमचा लोणी
मीठ
तेल

कृती
  • चिकनचे तुकडे करणे व त्यांना मीठ, तिखट, धने पूड, १/४ चमचा लसूण पेस्ट आणि १/४ चमचा आले पेस्ट लावणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात चिकनचे तुकडे ४-५ मिनिट परतणे.
  • त्याच तेलात जीऱ्याची फोडणी करणे व त्यात बारीक चिरलेला कांदा, कसुरी मेथी, उरलेली लसूण पेस्ट, आले पेस्ट, तिखट, धने पूड घालणे.
  • त्यात तेल घालुन उकळवणे.
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन ते पूर्ण शिजेपर्यंत उकळवणे व नंतर बारीक वाटणे.
  • कढईत लोणी वितळवणे व त्यात वाटण व मीठ घालणे.
  • त्यात १/२ वाटी पाणी, लाल रंग घालुन उकळवणे.
  • त्यात साखर, सॉस आणि परतलेले चिकनचे तुकडे घालुन उकळवणे.
  • आच मंद करून त्यात क्रीम घालुन अजून ४-५ मिनिट शिजवणे.

टीप
क्रीम घालताना आच धीमी करायला विसरू नये नाही तर मिश्रण व्यवस्थित एकत्र होणार नाही

कोळंबीचा पुलाव


हा एकदम सोप्पा आणि चविष्ठ पुलाव मी शनिवारी भाज्या संपल्यानी हा पुलाव बनवला.

कोळंबीचा पुलाव
साहित्य
२ वाटी कोळंबी
२ वाटी तांदूळ
२ कांदे
२ चमचा काजू
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा गरम मसाला
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा दालचिनी पूड
१/४ चमचा लवंग पूड
१/२ चमचा लसूण पेस्ट
मीठ
तूप
तेल

कृती
  • कोळंबीला तिखट आणि मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवणे.
  • भात शिजवून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात कोळंबी परतणे.
  • त्याच तेलात कांदा आणि काजू परतून घेणे.
  • लसूण पेस्ट आणि परतलेली कोळंबी घालुन परतणे.
  • त्यात हळद, गरम मसाला, धने पूड, दालचिनी पूड, लवंग पूड आणि मीठ खालून परतणे. कोळंबी शिजेपर्यंत परतणे.
  • त्यात शिजलेला भात आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • वरून तूप सोडून एकत्र करणे व अजून २ मिनिट शिजवणे.

टीप
मी कांदा आणि कोळंबी भाजण्यासाठी चमचाभर तेलाचा वापर आणि वरून २ चमचा तूप सोडले त्यामुळे एकदम चांगली चव आलेली

पनीर पुदिना टिक्का


हा अजून एक सोप्पा आणि चावैस्था पदार्थ मी शुक्रवारच्या जेवणात बनवला.

पनीर पुदिना टिक्का
साहित्य
२०० ग्राम पनीर
१/४ वाटी दही
१/२ वाटी पुदिना
१/४ वाटी कोथिंबीर
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा लसूण पेस्ट
४ हिरव्या मिरच्या
लोणी
मीठ

कृती
  • पनीरचे चौकोनी तुकडे करणे.
  • पुदिना, कोथिंबीर, आले, लसूण आणि मिरच्या एकत्र मीठाबरोबर वाटणे.
  • त्यात दही घालणे व ते पनीरच्या तुकड्यांना लावणे. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणे
  • ओव्हन २५०C वर गरम करणे.
  • बेकिंग ट्रेला लोणी लावणे व त्यावर पनीरचे तुकडे पसरणे.
  • पनीर २००C वर ५ मिनिट भाजणे.
  • पनीर उलटे करून अजून ५ मिनिट भाजणे.

टीप
पनीरचे तुकडे रात्रीच्या जेवणात एकदम छान लागत होते पण नाश्त्याला इतके नाही त्यामुळे जर जास्तीचे तुकडे असतील तर ते तसेच फ्रीजमध्ये ठेवून आयत्यावेळी भाजणे.

कॉर्न आप्पे


अजॉय परत आल्यामुळे काहीतरी विशेष बनवण्यासाठी हा आईचा पदार्थ बनवला.

कॉर्न आप्पे
साहित्य
३ वाटी कॉर्न
१.५ वाटी रवा
४ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा आले पेस्ट
१/२ वाटी कोथिंबीर
१/४ वाटी खाण्याचा सोडा
मीठ
तेल

कृती
  • कॉर्न आणि हिरव्या मिरच्या एकत्र बारीक वाटणे.
  • त्यात रवा, आले पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घालुन ढवळणे.
  • खाण्याचा सोडा आणि थोडे पाणी घालुन पेस्ट बनवणे.
  • आप्पे पात्र गरम करून त्याला तेल लावणे.
  • कॉर्नचे मिश्रण घालुन मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी गुलाबी रंगावर भाजणे.

टीप
पेस्ट इडलीच्या पिठासारखी असली पाहिजे म्हणजे आप्पे चांगले होतील

खजुराचे लाडू


काल असेच इंटरनेटवर हि पाककृती दिसली आणि घरात असलेल्या सगळ्या साहित्यातून हि डीश बनत असल्यानी लगेच बनवली

खजुराचे लाडू
साहित्य
२ वाटी बियाविना खजूर
१ वाटी काजू
१ वाटी बदाम
१ वाटी सुके खोबरे
१ वाटी खसखस
१ चमचा तूप

कृती
  • कढईट तूप गरम करून त्यात खजूर घालणे.
  • खजूर शिजेपर्यंत परतणे व नंतर थंड करण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • काजू आणि बदाम वेगवेगळे बारीक वाटणे.
  • शिजवलेले बारीक खजूर बारीक वाटणे
  • खजुराची पेस्ट, बदाम पूड, काजू पूड, सुके खोबरे आणि खसखस एकत्र करणे.
  • लिंबाच्या आकाराचे लाडू वळणे.

टीप
एकदम सोप्पी आणि पटकन बनणारी हि कृती एकदम छान आहे आणि प्रसादासाठी एकदम चांगला आहे

पनीर सॅन्डविच


आज मला थोड्या वेगळ्या लोकांवर प्रयोग करायची संधी मिळाली. वेगळे लोक म्हणजे आई बाबा आणि वेगळी जागा म्हणजे पुण्याचे त्यांचे घर. मी इथे थोडे दिवस राहण्यासाठी आलीये आणि सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी वेगळे आणि लवकर होणारा पदार्थ म्हणून मी हे सॅन्डविच बनवले.

पनीर सॅन्डविच
साहित्य
१२ ब्रेड स्लाईसेस
२ वाटी किसलेले पनीर
४ हिरव्या मिरच्या
मुठभर कोथिंबीर
१ चमचा तिखट
१/२ चमचा जीरा पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा आमचूर पूड
मीठ
लोणी

कृती
  • पनीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे पूड, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ एकत्र करणे.
  • ब्रेडच्या एका स्लाईसला एका बाजूनी लोणी लावणे व ती बाजू खाली ठेवून ताटलीत ठेवणे.
  • ब्रेड वर पनीरचे मिश्रण पसरवून त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवणे. त्याच्या वरच्या बाजूलासुद्धा लोणी लावणे.
  • सॅन्डविच भाजून गरम गरम वाढणे.

टीप
ब्रेडच्या तुकड्यांना आधीच लोणी लावून घेतले तर भाजायला ठेवताना मिश्रण बाहेर पडत नाही.

अंड्याची बिर्याणी


बरेच दिवसांपासून घरात अंडी होती आणि मी काहीतरी बनवण्याचा विचार करत होते आणि शेवटी आज हि बिर्याणी बनवली

अंड्याची बिर्याणी
साहित्य
६ अंडी
१.५ वाटी तांदूळ
१ कांदा
२ चमचे काजू
२ टोमाटो
१/४ वाटी पुदिना
१/२ वाटी कोथिंबीर
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा लसूण पेस्ट
२-३ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा दालचिनी पूड
२ चिमुट वेलची पूड
२ चिमुट जायफळ पूड
२ चिमुट लवंग पूड
चिमुटभर हळद
१ चमचा तिखट
५-६ लवंग
५-६ वेलची
१ दालचिनी
मीठ
तेल
तूप

कृती
  • तांदूळ पाण्यात भिजवून ठेवणे.
  • ३ अंडी उकडून त्यांना अर्धे करणे.
  • तेल गरम करून त्यात उभे चिरलेले कांदे घालुन कुरकुरीत भाजणे.
  • त्याच तेला काजू तळून बाजूला ठेवणे.
  • तेलात अर्धे केलेले अंडी तळून बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात उरलेले ३ अंडी फोडून घालणे व तेल सुटेपर्यंत परतणे.
  • त्यात हळद, चिमुटभर वेलची पूड, लवंग पूड, जायफळ पूड, तिखट आणि मीठ घालुन परतणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन शिजवणे.
  • त्यात पुदिना, कोथिंबीर, गरम मसाला, बारीक चिरलेल्या मिरच्या, जिरे पूड, धने पूड, आले पेस्ट, लसूण पेस्ट, चिमुटभर वेलची पूड, चिमुट भर लवंग पूड आणि उरलेली दालचिनी पूड घालुन परतणे.
  • भात शिजवणे व बाजूला ठेवणे
  • तूप गरम करून त्यात दालचिनी, लवंग, वेलची घालुन परतणे व भातात घालणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून अर्धा भात घालणे. त्यावर टोमाटो-मसाला आणि अंड्याचा मसाला पसरवणे व वर उरलेल्या अर्ध्या भाताचा थर देणे.
  • वर कांदा आणि काजू पसरवून भात होई पर्यंत शिजवणे.
  • वाढताना तळलेले अंडी वर पसरवून वाढणे.

टीप
मी भांड्यात बिर्याणी लावून त्याला कुकरमध्ये थोडेसे पाणी घालुन शिट्टीशिवाय शिजवली त्यामुळे बिर्याणी चिकटत नाही.
जर कुकरमध्येच थर लावायचे असतील तर त्याला खाली उकडलेल्या बटाट्याचे थर लावता येतील. त्याची माहिती ह्या चिकन बिर्याणीच्या कृतीत आहे.

अननसाचा शिरा


हा पदार्थ मी पहिल्यांदा बँगलोरमध्ये खालेला. तिथे हा एकदम सगळीकडे मिळतो. पण मी तेंव्हा फार जास्त वेळा खाल्ला नाही कारण तो अतिशय गोड असायचा आणि अननसाची चव फार काही यायची नाही. ह्यावेळी मी घरी बनवताना त्या गोष्टी ठीक करून बनवला आणि तो एकदम मस्त झालेला

अननसाचा शिरा
साहित्य
१.५ वाटी अननस
१ वाटी रवा
८ चमचे साखर
२ चमचे तूप
२ चमचे काजू
२ चमचे मनुका
२ चिमुट केशर
२ चमचे दुध

कृती
  • दुध गरम करून त्यात केशर घालणे व बाजूला ठेवणे.
  • ४ वाटी पाणी भांड्यात गरम करून त्यात अननस कापून घालणे. मध्यम आचेवर पूर्णपणे शिजवणे.
  • अननस शिजत असताना कढईत तूप गरम करून त्यात काजू भाजणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच तुपात रवा घालुन सारखा परतत गुलाबी होईपर्यंत भाजणे.
  • अननस शिजला की फक्त अननसाच्या फोडी रव्यात घालुन पुन्हा परतणे.
  • अननसाच्या उरलेल्या पाण्यात २ चमचा साखर घालुन उकळवणे.
  • त्यात रवा आणि अननसाचे मिश्रण घालुन सारखे ढवळत शिजवणे.
  • शिरा सुकायला लागला की त्यात साखर, केशर दुध, मनुका आणि काजू घालणे व पूर्णपणे शिजवणे

टीप
रवा आणि काजू एकदम मंद आचेवर भाजायचे म्हणजे ते करपणार नाहीत
साखर तुमच्या चवीप्रमाणे वापरता येईल मला हे प्रमाण एकदम छान वाटले

खारे शेंगदाणे


अगदी लहान असल्यापासून आम्ही हे घरी बनवायचो आणि शनिवार, रविवारचे पिचर बघताना खायचो. तेंव्हा स्वयंपाकातील फार माहिती नसल्यानी बऱ्याच वेळा शेंगदाणे मऊ व्हायचे. हळू हळू हे बनवण्याचे कमी झाले, पण मागच्या आठवड्यात मी माझ्या नवीन स्वयंपाकाच्या माहितीवरून प्रयत्न करायचा ठरवला आणि ते एकदम मस्त झालेले.

खारे शेंगदाणे
साहित्य
२ वाटी शेंगदाणे
२ चमचा मीठ

कृती
  • शेंगदाणे पूर्ण होईपर्यंत भाजून घेणे.
  • शेंगदाणे शेंगदाणे घालुन त्यावर वाटीभर पाण्यात मीठ घालुन ते ओतावे.
  • जास्तीचे पाणी काढून टाकणे.
  • लगेच शेंगदाणे कढईत घालुन जोरात आचेवर सारखे हलवत पूर्ण सुकेपर्यंत भाजणे.

टीप
खारट पाणी शेंगदाण्यावर पटकन ओतणे महत्वाचे आहे म्हणजे शेंगदाणे पाणी शोषून घेणार नाहीत.

खजूर आणि अक्रोडचा केक


ह्या वीकेंडला सीमा इथे होती आणि तिच्या आणि तिच्या सासरच्यासाठी मी हा केक बनवला. इतका सुंदर झालेला की तो लगेचच संपूनपण गेला

खजूर आणि अक्रोडचा केक
साहित्य
२ वाटी बिन बियांचे खजूर
१ वाटी अक्रोड
१.५ वाटी मैदा
१ वाटी लोणी
१ वाटी साखर
२ अंडी
१/४ चमचा लिंबाचा रस
१/२ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा खाण्याचा सोडा

कृती
  • खजूर धुवून त्यांचे छोटे तुकडे करणे व त्यात अक्रोडचे तुकडे, १/४ चमचा बेकिंग पूड, खाण्याचा सोडा आणि ४ चमचे पाणी घालुन एकत्र करणे व रात्रभर भिजत ठेवणे.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी लोणी आणि साखर एकत्र फेटणे.
  • दुसऱ्या भांड्यात अंडे फेटणे.
  • लोणी साखरेच्या मिश्रणात थोडे थोडे अंडे, थोडा मैदा आणि थोडे खजूर-अक्रोड मिश्रण एकत्र करत एकत्र करणे.
  • उरलेली १/४ चमचा बेकिंग पूड आणि लिंबाचा रस चमच्यात एकत्र करणे व केकच्या मिश्रणात घालणे.
  • ओव्हन २००C वर गरम करणे.
  • केक भाजायच्या भाण्याला लोण्याचा हात लावून त्यावर बटर पेपर लावणे. त्यात केकचे मिश्रण ओतणे.
  • केक मायक्रोवेव्ह आणि कनव्हेक्शन मोडमध्ये १८०W आणि १८०C वर ३० मिनिट भाजणे.

टीप
जर केकचे मिश्रण घट्ट वाटत असेल तर त्यात ३-४ चमचे कोमट पाणी घालणे.

मिश्र थरांची जेली


अजॉय आणि मला दोघांनाही जेली फार आवडते. कधी कधी आम्ही दररोजपण बनवायचो. गरमीच्या दिवसात थंडगार मस्त वाटायचे. मागच्या आठवड्यात मला थर देण्याची इच्छा झाली. तेंव्हा मी एका मोठ्या भांड्यात जेली बनवलेली आणि फोटो पण काढला नव्हता. काल मी पुन्हा तशी जेली बनवली आणि आईस्क्रीमच्या भांड्यात लावली. एकदम सुंदर दिसणारी आणि चविष्ठ डीश

मिश्र थरांची जेली
साहित्य
१ चेरी फ्लेवरचे जेली मिक्स
१ अननस फ्लेवरचे जेली मिक्स
१ लिटर पाणी

कृती
  • अर्धा लिटर पाणी गरम करून त्यात चेरी फ्लेवरचे मिक्स एकत्र करणे.
  • आईसक्रीमच्या भांड्यात अर्ध्या लेव्हलचे भांड्यात चेरीचे मिश्रण घालणे व सेट होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • उरलेले पाणी उकळवणे व त्यात अननसाच्या जेलीचे मिश्रण घालणे.
  • आधी चेरीचे मिश्रण घातलेल्या भांड्यात अननसाच्या जेलीचे मिश्रण ओतणे व पूर्ण भरणे.
  • जेली सेट झाली की फ्रीजमध्ये थंड करणे व भांड्यातच खायला देणे किंवा बाहेर काढून कापून देणे.

टीप
चेरीची जेली पूर्ण सेट झाल्यावरच अननसाची जेली ओतणे.
तसेच अननसाची जेली मिश्रण ओतताना चेरीची जेली निघून येण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी सावकाश आणि अलगद ओतणे.
आधी मी स्ट्रोबेरी आणि संत्र्याची जेली एकत्र केलेली पण माझ्या मते चेरी आणि अननस एकत्र जास्त चांगले दिसतात व लागतात.
मी विकीफिल्ड जेली मिश्रण वापरून जेली बनवलेली. दुसऱ्या कंपनीचे मिश्रण वापरल्यास त्यांच्या सुचनेप्रमाणे जेली बनवणे.

खोबऱ्याची गोड चटणी


हैदराबादमध्ये चटणीज नावाचे एक हॉटेल आहे. तिथे खूप वेगवेगळ्या चटण्या मुख्य खाण्याबरोबर देतात. तिथल्याच एका चटणीला बघून मी हि चटणी बनवली

खोबऱ्याची गोड चटणी
साहित्य
१/२ नारळ
१.५ चमचा साखर
मीठ

कृती
  • खोबरे किसणे
  • त्यात साखर, मीठ आणि थोडे पाणी घालुन बारीक चटणी वाटणे.

टीप
नारळ पूर्ण न किसता त्याची खालची बाजू तशीच ठेवणे नाहीतर चटणी काळी होऊ शकते.

साधा डोसा


मला नेहमीच कुरकुरीत पातळ साधा डोसा बनवण्याची इच्छा होती. बऱ्याच ठिकाणी वाचल्यावर मी हा डोसा बनवला तो इतका छान झालेला की मी ५ डोसे खाले

साधा डोसा
साहित्य
३ वाटी इडली रवा
१ वाटी उडीद डाळ
१/२ वाटी मुंग डाळ
१/२ वाटी तूर डाळ
१ चाचा मेथी बिया
१/४ वाटी तेल
मीठ
तूप

कृती
  • इडली रवा, उडीद डाळ, मुंग डाळ, तूर डाळ आणि मिठी बिया वेगवेगळ्या ८ तास भिजवणे.
  • मेथो सोडून सगळ्यातले पाणी काढणे.
  • मेथी बिया आणि उडीद डाळ एकत्र बारीक वाटणे.
  • इडली रवा, मुंग डाळ आणि तूर डाळ वेग वेगळे वाटणे.
  • सगळे वाटण एकत्र करणे व गरम जागी रात्रभर भिजण्यासाठी ठेवणे.
  • सकाळी पिठात मीठ आणि तेल एकत्र करणे.
  • तवा गरम करून मंद आचेवर मिठाचे पाणी आणि तेल शिंपडून कपड्यांनी तवा पुसून घेणे.
  • त्यावर १/४ वाटी डोस्याचे मिश्रण तव्यावर ओतणे.
  • पटकन वाटी मिठाच्या पाण्यात भिजवून त्यानी डोसा गोल गोल फिरवत बाहेर पसरवून पातळ करणे.
  • सर्व बाजूनी तूप सोडून मंद आचेवर भाजणे व चटणी किंवा/आणि सांबारबरोबर खायला देणे.

टीप
डोसा कुरकुरीत आणि पातळ होण्यासाठी पीठ बारीक वाटणे व चांगले आंबवणे महत्वाचे आहे. पीठ नीट आंबवण्यासाठीची टीप इथे: आप्पे कृतीबरोबर दिलेय.
डोसा पातळ करताना वाटी पिठात थोडी दाबून फिरवायची.

पनीर टिक्का


ह्या आठवयात मी अन्घेठीमध्ये गेलेले तेंव्हा तिथे कबाब बनवताना पहिले. ते बघून मला पण कबाब बनवण्याची फार इच्छा झाली त्यामुळे बाजारात जाऊन पनीर घेऊन आले आणि कबाब बनवले.

पनीर टिक्का
साहित्य
२०० ग्राम पनीर
२ टोमाटो
१ ढोबळी मिरची
१/२ वाटी दही
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा तिखट
१ चमचा जीरा पूड
१ चमचा चाट मसाला
२ चमचा तंदुरी मसाला
मीठ
लोणी

कृती
  • पनीर चौकोनी चिरणे.
  • दही, आले पेस्ट, लसूण पेस्ट, तिखट, जीरा पूड, चाट मसाला, तंदुरी मसाला आणि मीठ एकत्र करून पनीर बरोबर एकत्र करणे व २ तास फ्रीजमध्ये ठेवणे.
  • टोमाटो आणि ढोबळी मिरचीचे चकत्या करणे त्यावर मीठ आणि थोडा चाट मसाला एकत्र करणे.
  • टिक्का बनवण्याच्या दांडीवर टोमाटो, ढोबळी मिरची आणि पनीर लावणे.
  • लोणी वितळवून टिक्यावर ओतणे व त्याला ३० मिनिट गुलाबी रंगावर ग्रील करणे.

टीप
ग्रील केलेले पनीर चांगले लागते पण मी कुठेतरी पनीर तळून काठीला लावलेले वाचणे. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल त्यांना हा पर्याय आहे.
आमच्या खालच्या काकू मातीच्या भांड्यात कोळसा घालुन त्यावर कबाब भाजतात.

चेरी केक


अजॉयला हा केक मी बनवून पाठवला. जवळ जवळ २ महिने त्यावर प्रयोग करायला न मिळाल्यानी हा केक बनवताना एक वेगळीच उत्सुकता होती :)

चेरी केक
साहित्य
१/२ वाटी लोणी
१ वाटी साखर
१ वाटी मैदा
१/२ बेकिंग पूड
१/२ वाटी गोड चेरी
१/२ चमचा आईसिंग शुगर
१ अंडे

कृती
  • चेरी धुवून त्याचे शुगर पाक निघेपर्यंत धुणे व कपड्यांनी पुसून घेणे. त्यावर १/२ चमचा मैदा शिंपडून बाजूला ठेवणे.
  • लोणी आणि साखर एकत्र फेटणे.
  • मैदा आणि बेकिंग पूड ४-५ वेळा चाळणे
  • अंडे फेटणे.
  • लोणी साखरेच्या मिश्रणात मैदा आणि अंडे थोडे थोडे करत एकत्र करणे.
  • त्यात चेरी अलगद एकत्र करणे.
  • केकचे भांडे लोणी लावून त्यावर बटर पेपर लावून तयार करणे. त्यात केकचे मिश्रण ओतणे.
  • ओव्हन २००C वर गरम करणे.
  • मायक्रोवेव्ह आणि कनव्हेक्शन मोड मध्ये १८०W आणि १८०C वर १५ मिनिट केक भाजणे.
  • केक १० मिनिट थंड झाल्यावर त्यावर आईसिंग शुगर शिंपडणे व पूर्ण थंड झाल्यावर तुकडे करणे.

टीप
केकचे मिश्रण घट्ट असल्यास त्यात कोमट पाणी घालुन पातळ करणे.

कांद्याची खेकडा भजी


आज खूप जोरात पाऊस पडत होता आणि गरम गरम भजी खाण्याची इच्चा मी आवरू नाही शकले. पण जो पर्यंत भजी तयार झाली तोपर्यंत पाउस बंद झालेला :(

कांद्याची खेकडा भजी
साहित्य
२ कांदे
४ चमचे बेसन
५ चमचे कोथिंबीर
१ चमचा तिखट
१/४ चमचा धने पूड
मीठ
तेल

कृती
  • कांदा बारीक उभा चिरणे व त्याला मीठ लावून थोडा वेळ बाजूला ठेवणे.
  • ५-१० मिनिटांनी त्याला पाणी सुटेल, त्यात बेसन, तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने पूड आणि चमचाभर गरम तेल घालुन एकत्र करणे व भजीचे पीठ भिजवणे. लागल्यास पाणी वापरणे.
  • तेल गरम करून त्यात छोटे छोटे भजी गुलाबी होईपर्यंत तळणे.

टीप
ह्यांना खेकडा भजी म्हणतात ते त्यांच्या आकारामुळे.
मीठ आधी लावून ठेवल्यानी नंतर त्याचे पाणी सुटून पीठ पातळ होत नाही

केळफुलाची भाजी


मी पहिल्यांदा हि भाजी गुरुकाकांच्या घरी खालेली आणि मला ती एकदमच आवडलेली. त्यानंतर मी आईला खूप वेळा सांगायचे बनवायला पण तिला ती जमायची नाही. मी बँगलोरमध्ये राहायला लागल्यानंतर संगीताताई कडे असताना त्यानी एका बनवलेली हि भाजी. तेंव्हाच मी केळफूल साफ कसे करायचे शिकून घेतलेले.

केळफुलाची भाजी
साहित्य
१ केळफुल
१ चमचा तिखट
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा गुळ
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचे धने पूड
१/४ चमचा जिरे पूड
चिमुटभर हिंग
मीठ
तेल

कृती
  • केळफुल साफ करणे व बारीक चिरणे.
  • कुकरमध्ये २-३ शिट्ट्या काढून शिजवणे. पाणी काढून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे.
  • त्यात हिंग घालुन नंतर शिजलेले केळफुल घालुन ढवळणे.
  • त्यात तिखट, गरम मसाला, धने पूड, जिरे पूड, गुळ आणि मीठ घालुन अजून २ मिनिट शिजवणे.

टीप
ह्या भाजीचा सगळ्यात महत्वाचे म्हणजे केळफुल साफ करणे. प्रत्येक फुल उघडून त्यातले काही भाग काढून टाकावे लागतात. मी ह्या फोटोमध्ये कुठला भाग काढायचा आणि कुठला भाग ठेवायचा ते दाखवलय. जेंव्हा फुल उघडण्यासाठी खूप छोटे असेल तेंव्हा ते तसेच वापरणे. पाण्यामध्ये असे साफ केलेले फुल भिजवून ठेवणे म्हणजे काळे पडत नाही

वांग्याचे मसालेदार भरीत


ह्या आधी मी झटपट भरीतची कृती दिलेली आहे. हे त्यापेक्षा एकदम वेगळे लागते आणि ह्याला साधारण हॉटेलच्या भरीताची चव आहे

वांग्याचे मसालेदार भरीत
साहित्य
२ मोठी वांगी
२ टोमाटो
१ कांदा
३-४ लसूण पाकळ्या
१/४ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा हळद
१ चमचा तिखट
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा धने पूड
चिमुटभर जिरे पूड
मीठ
तेल

कृती
  • वांगी भाजून थंड करणे. त्यांची साले काढून कुस्करून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात कांदा भाजणे.
  • त्यात लसुणाच्या पाकळ्या, लसूण पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला, धने पूड आणि जिरे पूड घालुन एकत्र करणे.
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन शिजेपर्यंत ढवळणे.
  • त्यात कुस्करलेले वांगे आणि मीठ घालुन एक-दोन मिनिट शिजवणे.

टीप
हे भरीत आंबट मसालेदार आहे, लसूण आणि त्याच्या पेस्ट मुळे एकदम वेगळी चव येते.

कॉर्न भजी


थोडी वेगळी भजी करण्याचा हा प्रयत्न. छान झालेली भजी एकदम

कॉर्न भजी
साहित्य
३ वाटी कॉर्न
१/४ चमचा आले पेस्ट
२ हिरव्या मिरच्या
१ चमचा तिखट
४ चमचे बेसन
१/४ चमचा धने पूड
१ चमचा आमचूर पूड
मीठ
तेल

कृती
  • २.५ वाटी कॉर्न, आले पेस्ट आणि हिरव्या मिरच्या जाडसर वाटणे.
  • त्यात उरलेले कॉर्न, तिखट, धने पूड, आमचूर पूड, बेसन आणि मीठ एकत्र करणे.
  • १ चमचा गरम तेल घालुन जाडसर पीठ बनवणे
  • मिश्रणाचे गोळे बनवून तेलात गुलाबी रंगावर तळणे.

टीप
कॉर्न गोड असल्यानी त्याला आले, हिरव्या मिरच्या आणी तिखट चांगली साथ देतात
ह्यात ३-४ चमचे कोथिंबीर पण घालता येईल

काकडीचे ऑमलेट


बरेच दिवसांनी मी इथे पोस्ट करत आहे. मागच्या आठवड्यात बनवलेले पदार्थ मला फोटो काढून पोस्ट करण्याची ताकद नसल्यानी राहून गेले पण आज उठायला उशीर झाल्यानी काहीतरी पटकन बनणारे बनवण्यासाठी म्हणून हा प्रयोग केलाय

काकडीचे ऑमलेट
साहित्य
१ काकडी
१ वाटी तांदुळाचे पीठ
३-४ हिरव्या मिरच्या
१ चमचा जिरे
मीठ
तेल

कृती
  • काकडी किसून घेणे.
  • त्यात तांदुळाचे पीठ, हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • पाणी घालुन पातळ पीठ बनवणे.
  • तवा गरम करून त्यावर तेल लावणे. पीठ ओतून मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी शिजेपर्यंत शिजवणे.

टीप
ह्यासाठी नॉनस्टिक तवा वापरल्यानी तव्याला चिकटत नाही
मी कधी कधी ह्यात एक-दोन चमचा रवा घालते त्यामुळे थोडे कमी चिकट होते.
हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर जास्त चांगले लागते पण वेळ नसल्यानी मी लोणच्याबरोबर खायला दिले

पियुष


अगदी लहान असल्यापासून बाबा मला एफ सी रोडवरच्या बँकपासून लक्ष्मी रोडपर्यंत चालत घेऊन जायचे. मला ते चालणे फार आवडायचे ते एकमेव कारणाकरता. सगळ्यात शेवटी जनता दुग्ध मंदिरात पियुष प्यायला मिळायचा. जेंव्हा जेव्हा मी पुण्याला जाते तेंव्हा न चुकता खूप सारा पियुष पिऊन येते. २-३ वर्षांपूर्वी आईनी तो घरी बनवायला चालू केला. काल मी स्वतः करून बघितला आणि प्रयोग एकदम यशस्वी होता.

पियुष
साहित्य
५ वाटी दही
१ लिंबू
८ चमचा साखर
चिमुटभर जायफळ पूड
चिमुटभर पिवळा रंग
मीठ

कृती
  • दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करणे.
  • त्यात साधारण २-३ वाटी पाणी घालुन पातळ करणे.
  • मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.

टीप
मी एकदम जाड दुध वापरून दही बनवले व दह्याला आंबट होऊ दिले नाही. लिंबाची एकदम चांगली चव देते
बऱ्याचवेळा लिंबाच्या कडव्यामुळे हे कडू होते म्हणून आज मी १/२ चमचा व्हिनेगर वापरले आणि त्याचा एकदम खूप चांगला उपयोग झाला. कडूपणा नाही आणि चव पण एकदम बरोबर

कुरकुरीत मुंगडाळ


मला हि डाळ आवडते आणि आज दुकानात त्याचे पाकीट बघितल्यावर घरी करून बघायचे ठरवले. एकदम सोप्पे आणि पटकन होणारा हा पदार्थ तुम्हीसुद्धा करून बघा.

कुरकुरीत मुंगडाळ
साहित्य
१ वाटी मुंग डाळ
चिमुटभर खाण्याचा सोडा
मीठ
तेल

कृती
  • मुंग डाळ ४-५ वाटी पाण्यात सोडा घालुन रात्रभर भिजवणे.
  • सकाळी मुंग डाळ धुवून कापडावर पसरवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर डाळ तळणे व टिश्यूवर तेल निथळण्यासाठी ठेवणे.
  • मीठ शिंपडून थंड झाल्यावर खायला देणे.

टीप
मी मुंगडाळ तळताना त्यात एक मोठी स्टीलची चाळणी ठेवून त्यात तळली त्यामुळे डाळ तेलातून बाहेर काढणे सोप्पे होते
मुंग डाळ तेलात टाकल्यावर खूप बुडबुडे आले पाहिजेत. हळू हळू ते कमी होऊन एकदम नाहीशे झाले की डाळ तयार असेल.

मसाले भात


हा मराठी पदार्थ लग्नात किंवा कुठल्याही कार्यक्रमात एकदम असायलाच हवा. साधा, सोप्पा आणि चाविस्थ भाताचा प्रकार.

मसाले भात
साहित्य
१ वाटी बासमती तांदूळ
१/४ वाटी दही
१/२ वाटी तोंडली
१/२ बटाटा
१/४ वाटी मटार
१/२ वाटी कोथिंबीर
१/२ वाटी किसलेले खोबरे
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
८-९ काजू
चिमुटभर वेलची पूड
२ लवंग
१ दालचिनी
१ तेजपत्ता
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
१ चमचा तूप
मीठ

कृती
  • तांदूळ धुवून पाणी निथळवणे.
  • त्यात तिखट, गरम मसाला, वेलची पूड, दही घालुन १० मिनिट ठेवणे.
  • कुकरमध्ये तूप घालुन त्यात म्हवरीची फोडणी करणे.
  • त्यात हिंग, तेजपत्ता, दालचिनी आणि काजू घालुन एक दोन मिनिट परतणे.
  • त्यात उभी चिरलेली तोंडली, चौकोनी चुरून बटाटा घालुन अजून दोन मिनिट परतणे.
  • त्यात तांदूळ, मटार आणि मीठ घालुन दोन मिनिट परतणे.
  • भातात २ वाटी पानिओ घालुन कुकरचे झाकण लावून ४ शिट्ट्या काढणे.
  • वाढताना ताटात भातावर खोबरे, कोथिंबीर आणि तूप सोडून देणे.

टीप
ह्यात फ्लावर किंवा वांगेपण वापरता येईल
खोबरे आणि कोथिंबीर घातल्यानी एकदम मस्त आणि वेगळी चव ह्या भाताला येते

रसगुल्ला


पहिल्यांदा जेव्हा मी रसगुल्ले बनवले तेंव्हा ते फार काही चांगले झाले नव्हते. थोडी माहिती गोळा केल्यावर मला काय चुकीचे होत होते ते कळले आणि ह्यावेळी मस्त झालेले.

रसगुल्ला
साहित्य
१ लिटर दुध
२ चमचे व्हिनेगर
२.५ वाटी साखर
२ थेंब गुलाबाचा इसेन्स

कृती
  • दुध उकळवून त्यात चमचाभर पाण्यात व्हिनेगर एकत्र करून ढवळत घालणे.
  • पनीरच गोळा वेगळा झाला असेल, लगेच ते चाळणीत पंचा घालुन त्यावर ओतणे.
  • त्यात थंड पाणी घालुन स्वत्च धुणे.
  • पंचा घट्ट बांधून पनीरमधले पाणी काढून टाकणे.
  • कुकरमध्ये साखर आणि ६ वाटी पाणी घालुन उकळवत ठेवणे.
  • पाणी उकळत असताना बाजूला पानेर २-३ मिनिट चांगले मळून मऊसर मळणे व त्याचे १० छोटे गोळे बनवणे
  • पाणी उकळल्यावर त्यात गोळे टाकून ५ मिनिट उकळवणे.
  • कुकरला बंद करून शिट्टीशिवाय अजून ५ मिनिट उकळवणे.
  • कुकरचे झाकण उघडून त्यात १/४ वाटी पाणी घालणे व झाकानाशिवाय ५ मिनिट उकळवणे.
  • मिश्रण थंड करून त्यात गुलाबाचा इसेन्स घालणे व थंड करून मग खायला देणे.

टीप
पनीर व्यवस्थित मळले गेले असेल तर ते साखरेच्या पाण्यात घालताच तरंगायला लागतील.
पनीर गरम असतानाच मळणे म्हणजे गोळे एकदम मऊसर होतील

चिकन लॉलीपॉप


मी हे खूप दिवसांआधी बनवलेले पण कामामध्ये विसरून गेले पोस्ट करायला. एकदम सोप्पी आणि चविष्ठ चिकनची डीश

चिकन लॉलीपॉप
साहित्य
८ चिकनचे लॉलीपॉप
१/२ वाटी मैदा
१/४ वाटी कॉर्न फ्लौर
१/२ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ वाटी कोथिंबीर
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/४ चमचा गरम मसाला
१ अंडे
चिमुटभर खाण्याचा लाल रंग
मीठ
तेल

कृती
  • लॉलीपॉपला मीठ, लसूण पेस्ट, आले पेस्ट लावून ५ मिनिट बाजूला ठेवणे.
  • त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, हळद, गरम मसाला, लाल रंग, मैदा आणि कॉर्न फ्लौर घालुन चांगले एकत्र करणे
  • त्यात अंडे घालुन एकत्र करणे व १ तास मुरण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर लॉलीपॉप तळणे

टीप
ह्यात कडीपत्तापण घालुन वेगळी चव आणता येईल
हाडाची बाजू अल्युमिनियमच्या फॉइल लावून देता येईल पण माझ्याकडची फॉइल संपल्यामुळे मी वापरली नाही

खोबऱ्याची लस्सी


मी जेंव्हा हि कृती वाचलेली तेंव्हा मला बिलकुल वाटले नव्हते की ती इतकी सुंदर होईल.

खोबऱ्याची लस्सी
साहित्य
१/२ खोबरे
१ वाटी चक्का
८ चमचे साखर
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर केशर
मीठ

कृती
  • खोबरे किसून त्यात पाणी घालुन मिक्सरमध्ये वाटून खोबऱ्याचे दुध काढणे.
  • चक्का, केशर, वेलची पूड, साखर आणि मीठ मिक्सरमध्ये एकत्र वाटणे.
  • त्यात खोबऱ्याचे दुध घालुन पुन्हा वाटणे
  • मिश्रणात बर्फ घालुन पुन्हा थोडे वाटणे
  • प्यायला देताना त्यात केशर घालुन देणे.

टीप
चक्का दुकानातून खरेदी करता येईल किंवा घरी बनवता येईल. मी जेंव्हा श्रीखंड बनवले तेंव्हा त्यातील एक वाटी चक्क बाजूला ठेवून हि लस्सी बनवली. चक्का बनवण्याची कृती श्रीखंडआम्रखंड ह्या दोन्हींच्या कृतीत दिलेली आहे.
मी नेहमी घरी बनवलेले नारळाचे दुध वापरते जे एकदम जाड नसते त्यामुळे मी बर्फ न वापरता लस्सी बनवून मग थंड केली. जर विकतचे खोबऱ्याचे दुध वापरायचे असेल तर त्यात बर्फ किंवा पाणी वापरणे महत्वाचे आहे. १ वाटी चक्क्यात १ वाटी पाणी किंवा बर्फ आणि ३ वाटी नारळाचे दुध बरोबर होईल

हिरवी पाचक लस्सी


थोड्या दिवसांपूर्वी मी पेपरमध्ये एक लेख वाचला तेंव्हा मला ह्या कृतीची आयडिया आली.

हिरवी पाचक लस्सी
साहित्य
१.५ वाटी दही
१/२ वाटी पुदिना
१ वाटी कोथिंबीर
१ काकडी
१/४ वाटी कोबी
चिमुटभर काळे मीठ
२ चमचा साखर

कृती
  • काकडी आणि कोबी एकत्र किसणे.
  • दही, पुदिना, कोथिंबीर, काकडी, कोबी, काळे मीठ, साखर आणि ५-६ बर्फ एकत्र ५ मिनिट मिक्सरमध्ये वाटणे.
  • थंड करून प्यायला देणे.

टीप
मी जाड दुध वापरून दही बनवले पण जर साध्या दुधाचे दही वापरले तर बर्फ थोडा कमी घालणे.

श्रीखंड


हा आम्रखंडसारखा आणखीन एक चक्क्याचा पदार्थ.

श्रीखंड
साहित्य
१/२ लिटर दुध
३/४ वाटी साखर
चिमुटभर केशर
१ चमचा दुध पूड
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर दालचिनी पूड
२ चमचे नारिंगी रंग
५-६ बदाम
१० पिस्ता

कृती
  • Warm the milk
  • दुध कोमट करून त्यात दही एकत्र करून ६-८ तास गरम जागी ठेवून दही लावणे.
  • पंचावर दही ओतून ते टांगून ८-१० ठेवणे म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल व चक्का तयार होईल.
  • चक्क्यात साखर घालुन दोन तास ठेवणे.
  • १/४ वाटी पाणी गरम करून त्यात दुधाची पूड, केशर, दालचिनी पूड, वेलची पूड घालुन एकत्र करणे.
  • हे मिश्रण चक्क्यात घालुन पुरण यंत्रातून फिरवणे
  • त्यात बदाम आणि पिस्ते घालुन खायला देणे.

टीप
साखर चक्क्यात एकत्र करून ठेवल्यानी चांगली एकत्र होते नाहीतर दही आंबट होऊन साखर वेगळी राहते.
दुधाच्या पूड मध्ये पाणी घालुन मिश्रण बनवण्याऎवजी १/४ वाटी दुध वापराता येईल पण माझ्याकडचे दुध संपल्यानी मी दुधाची पूड वापरली

दडपे पोहे


जेंव्हा मला पटकन होणारा पण चविष्ठ पदार्थ नाश्त्यासाठी बनवण्याची इच्छा होते तेंव्हा हा पदार्थ मनात येतो

दडपे पोहे
साहित्य
३.५ वाटी पातळ पोहे
१ कांदा
२ टोमाटो
१ चमचा साखर
१.५ लिंबू
१/२ वाटी शेंगदाणे
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचा जिरे
२ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा हळद
१ चमचा तेल
मीठ

कृती
  • पातळ पोह्यात टोमाटो आणि कांदा बारीक चिरून घालणे.
  • त्यात साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालुन चांगले एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळून घेणे व ते पोह्यात घालणे.
  • त्याच तेलात म्हवरी, जीरा, मिरच्यांचे तुकडे घालुन फोडणी करणे व त्यात हळद घालणे.
  • फोडणी पोह्यात घालुन ढवळणे व खायला देणे.

टीप
ह्यात पोह्यांना धुवायचे नसते कारण ते खूप पातळ असल्यानी लिंबाचा आणि टोमाटोचा रस त्यांना मऊ करण्यासाठी पुरेसा असतो.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP