SPDP - शेव बटाटा दही पुरी


वैशाली - फर्ग्युसन रोडवरचे एक अत्यंत प्रसिद्ध हॉटेल. तिकडची हि डीश सगळ्यांची एकदम आवडीची. अजॉय तिथे नेहमी हे खात असल्यानी एकदम तशीच बनवण्याचा मी फार प्रयत्न केला. बऱ्यापैकी यशस्वीपण झाले.

SPDP - शेव बटाटा दही पुरी
साहित्य
७ पापडी सारख्या पुऱ्या
१ चमचा चिंचेची चटणी
३/४ चमचा हिरवी चटणी
१ मध्यम बटाटा
१/२ वाटी दही
४ चमचे शेव
१/२ चमचा कोथिंबीर
१/२ चमचा धने पूड
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा चाट मसाला
२ चमचे साखर
मीठ

कृती
 • बटाटे कुकरमध्ये उकडून घेणे.
 • दह्यात साखर आणि चिमुटभर मीठ घालुन ढवळणे व बाजूला ठेवणे.
 • बटाट्याची साले काढून बारीक चिरणे. त्यात मीठ, धने पूड, जिरे पूड, चाट मसाला घालणे.
 • पुऱ्या ताटलीत ठेवणे व त्यावर बटाट्याचे मिश्रण पसरवणे.
 • हिरवी चटणी घालणे. मग दही घालणे व त्यावर चिंचेची चटणी घालणे.
 • शेव व कोथिंबीर पसरवून खायला देणे.

टीप
पार्टीसाठी एकदम उत्तम पदार्थ. सगळी तयारी करून ठेवून आयत्यावेळी सगळे एकत्र केले की झाले काम.

हिरवी तिखट चटणी


मी हि चटणी मुद्दामून चाटसाठी बनवते. पण पराठ्याबरोबर सुद्धा हि एकदम मस्त लागेल.

हिरवी तिखट चटणी
साहित्य
१/४ वाटी पुदिना
१.५ वाटी कोथिंबीर
४-५ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा साखर
मीठ

कृती
 • मिक्सरमध्ये पुदिन्याची पाने, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि चमचाभर पाणी घालुन वाटणे.
 • साखर घालुन पुन्हा एकम बारीक वाटणे.

टीप
ह्या चटणीत थोडा चाट मसाला आणि आमचूर पूड पण घालता येईल. पराठ्याबरोबर अशी चटणी एकदम मस्त जाईल.

माश्याचे रवा फ्राय


हा गोवा आणि कर्नाटकातील एकदम प्रसिद्ध प्रकार. खायला चविष्ठ करायला सोप्पा असा हा सगळ्यांनाच आवडेल.

माश्याचे रवा फ्राय
साहित्य
४-५ माश्याचे तुकडे
२ चमचा तिखट
१ चमचा हळद
२ चमचे रवा
मीठ
तेल

कृती
 • माश्याला मीठ लावून ५-१० मिनिट ठेवणे.
 • त्यांना तिखट आणि हळद लावून अजून ५-१० मिनिट ठेवणे.
 • तव्यावर थोडेसे तेल घालुन तवा गरम करणे.
 • मासा रव्यात घोळवून तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी लालसर होईपर्यंत भाजणे

टीप
हा प्रकार कुठल्याही माश्याचा बनवता येईल अगदी कोळंबीचा सुद्धा. चव माश्यापारमाणे बदलते

केळ्याची पुरी


मी फ्रुट सॅलेडसाठी केळी आणली होती तेंव्हा ह्या पुऱ्या करून बघायच्या ठरवल्या. आईनी दिलेल्या एका पुस्तकात हि कृती होती आणि जर जेवणात नाविन्य आणण्याची हौस असेल तर हि पुरी नक्की करून बघणे.

केळ्याची पुरी
साहित्य
३ छोटी केळी
१/२ वाटी पिठी साखर
गव्हाचे पीठ
तेल

कृती
 • केळी कुस्करून त्यात साखर घालुन ती विरघळेपर्यंत एकत्र करणे.
 • त्यात गव्हाचे पीठ घालुन तेल लावणे
 • पुऱ्या लाटणे आणि मध्यम आचेवर तळणे.

टीप
पुऱ्या लाटताना मला असे वाटले की मी केळे आणि साखर ब्लेंडरमध्ये वाटायला पाहिजे होते, तो माझा ह्या नंतरचा प्रयोग असेल
पीठ बाहेर जास्त वेळ ठेवू नये नाही तर काळे होते

जेलीसहित फ्रुट सॅलेड


अगदी लहान होते तेंव्हापासून मला फ्रुट सॅलेड फार आवडायचे. आज बाजारात भरपूर फळे बघून मी फ्रुट सॅलेड बनवायचा विचार केला.

जेलीसहित फ्रुट सॅलेड
साहित्य
१ सफरचंद
१ चिक्कू
२ मोसंबी
२ संत्री
१/२ वाटी द्राक्षा
२ केळी
१/२ डाळिंब
५-६ स्ट्रॉबेरी
१ पाकीट कस्टर्ड पूड
२ पाकीट जेली मिक्स
१/२ लिटर दुध
२ चमचे साखर

कृती
 • ९००मिलीलीटर पाणी उकळवून त्यात जेली मिक्स घालणे व जेली भांड्यात लावणे.
 • कस्टर्ड पूड थोड्याश्या दुधात घालुन पेस्ट बनवणे.
 • उरलेल्या दुधात साखर घालुन उकळवणे.
 • त्यात कस्टर्ड पेस्ट घालुन ३-४ मिनिट उकळवणे व बाजूला ठेवणे.
 • जेली आणि कस्टर्ड फ्रीजमध्ये थंड करणे.
 • सफरचंद, चिक्कू, केळी, मोसंबी, संत्री बिया आणि साले काढून बारीक चिरणे.
 • त्यात द्राक्षा एकत्र करणे.
 • फ्रुट सॅलेड देताना त्यात सगळ्यात खाली फळांचा थर देणे व त्यावर जेलीचे तुकडे, कस्टर्ड घालणे.
 • वरून स्ट्रॉबेरी आणि डाळिंब घालुन खायला देणे.

टीप
मी विकीफिल्ड जेली मिक्स आणि कस्टर्ड पूड वापरले.
मी रासबेरी, केळी आणि लिंबाची चव असलेले जेली वापरले पण त्यात कुठलीही जेली घालता येईल
पाहिजे असल्यास कस्टर्डच्या वर आईसक्रीम पण घालुन देता येईल
ह्यात अननस घालता येईल, तसेच न मिळालेली फळेपण घालता येतील हे अगदी लीचीसारख्या फक्त एका फळाबरोबरपण मस्त लागते

भरलेली अंडी पसंदा


मी आज उकडलेल्या अंड्यांचे पॅटिस बनवायचे ठरवलेले पण माझ्याकडे मैदा नव्हता आणि नेहमी ज्या दुकानातून मी मैदा आणते तिथेपण तो संपलेला म्हणून मग मी हा निराळाच प्रयोग केला

भरलेली अंडी पसंदा
साहित्य
१ वाटी गव्हाचे पीठ
३ उकडलेली अंडी
२ हिरव्या मिरच्या
मुठभर कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
 • गव्हाच्या पीठ मळून नेहमी चपातीला बनवतो तसे भिजवणे.
 • अंडी किसून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ घालणे.
 • चपाती लाटून त्यावर अंड्याचे मिश्रण घालुन बंद करणे. वेगवेगळे आकार बनवता येतील
 • रोलच्या आलारासाठी: चपातीवर मिश्रण पसरून गुंडाळणे व सगळ्याबाजू पाण्याचा हात लावून बंद करणे.
 • करंजीच्या आकारासाठी: चपातीवर मिश्रण पसरवून ती अर्धी दुमडणे व पाण्याचा हात लावून बंद करणे.
 • तेलात तळणे.

टीप
मी जेंव्हा हे बनवले तेंव्हा पीठ थोडे पातळ झालेले म्हणून मी चपाती थोडी तव्यावर गरम करून घेतली त्यामुळे ती चिकटत नाही
अजून वेगवेगळे आकार पण करता येतील जसे सामोसा पण माझ्या पातळ पीठामुळे मला फार उत्साह राहिला नव्हता

झटपट भरीत


ह्या प्रकारचे वांग्याचे भरीत माझे फार आवडीचे. करायला एकदम सोप्पे आणि चवीला उत्कृष्ठ.

झटपट भरीत
साहित्य
१ मोठे वांगे
१/२ कांदा
४ चमचे दही
२ हिरव्या मिरच्या
मुठभर कोथिंबीर
मीठ

कृती
 • वांगे भाजून घेणे व त्याची साल काढणे.
 • वांगे कुस्करून त्यात बारीक चिरलेला कांदा, दही, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि मीठ एकत्र करणे.
 • वरून कोथिंबीर बारीक चिरून घालणे व एकत्र करून खायला देणे.

टीप
बारीक चिरलेला कांदा पण ह्यात घालता येईल.

आप्पे आणि खोबऱ्याची चटणी


अगदी लहान असल्यापासून घरात सगळ्यांना आप्पे फार आवडायचे. माहिती नाही मी आधी का नाही बनवलेत पण आज पहिल्यांदा करून बघितले आणि एकदम मस्त झालेत. आईला खूप वेळा फोन करून विचारावे लागले पण सगळे सार्थक झाले

आप्पे

आप्पे
साहित्य
१/२ वाटी उडीद डाळ
१/२ चमचा हरभरा डाळ
३ वाटी इडली रवा
मीठ

कृती
 • हरभरा डाळ आणि उडीद डाळ एकत्र १२ तास पाण्यात भिजवणे.
 • इडली रवा सुद्धा १२ तास भिजवणे.
 • १२ तासांनी डाळीतील पाणी काढून बारीक वाटणे.
 • त्यात इडली रवा बारीक वाटून घालणे व चांगले एकत्र करणे. १२ तास आंबावण्यासाठी ठेवणे.
 • सकाळी आप्पे पात्र गरम करून त्यात हे मिश्रण घालणे. दोन्ही बाजूनी गुलाबी होई पर्यंत मध्यम आचेवर भाजणे.

टीप
थंडीच्या दिवसात पीठ आंबवण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे भांड्याखाली पाणी गरम करून ठेवणे.
आप्पे बनवण्यासाठी आज काल नॉनस्टिक पात्र मिळते ते जास्त बरे पडते आणि त्यात एकदमच तेल लागत नाही.

खोबऱ्याची चटणी

खोबऱ्याची चटणी
साहित्य
१/२ खोबरे
मुठभर कोथिंबीर
४ चमचे चणा डाळ
१ हिरवी मिरची
१ चमचा साखर
मीठ

कृती

 • खोबरे किसून घेणे.
 • मिक्सरमध्ये किसलेले खोबरे, कोथिंबीर, चणा डाळ, हिरव्या मिरच्या, साखर आणि मीठ घालुन एकत्र वाटणे. लागल्यास थोडे पाणी घालणे.

टीप
ह्या चटणीत चणा डाळ असल्यास घालणे पण वापरल्यास एकदम सुंदर चव येते

कोळंबी मसाला


कोळंबी हा माझा सगळ्यात जास्त आवडता प्रकार. पण मा जो कोळंबीचा मसाला बनवतात तो तर एकदमच जास्त आवडता, अगदी तळलेल्या कोळंबीपेक्षा सुद्धा.

कोळंबी मसाला
साहित्य
४०० ग्राम कोळंबी
२ कांदे
२ टोमाटो
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१ चमचा तिखट
१ चमचा हळद
किसलेले खोबरे
मीठ
तेल

कृती
 • कढईत तेल गरम करणे.
 • त्यात कोळंबी घालुन १-२ मिनिट भाजून घेणे व बाजूला ठेवून देणे.
 • त्याच तेलात बारीक चिरलेला कांदा भाजणे.
 • कांदा शिजल्यावर त्यात लसूण पेस्ट, आले पेस्ट, तिखट आणि हळद घालुन पुन्हा भाजणे.
 • त्यात बारीक चिरलेले टोमाटो घालुन २-३ मिनिट शिजवणे.
 • त्यात पाणी घालुन झाकणी लावून पूर्णपणे शिजवणे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
 • मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे.
 • कढईत वाटलेले मिश्रण आणि एक वाटी पाणी घालणे. त्यात कोळंबी घालुन पूर्णपणे शिजवणे.
 • त्यात किसलेले खोबरे आणि मीठ घालुन अजून एक मिनिट शिजवणे.

टीप
मां मिक्सरमध्ये वाटून नाही घेत व त्याऎवजी टोमाटो पूर्ण शिजवून घेते पण मला वाटलेली ग्रेव्ही जास्त बरी वाटते त्यामुळे कांद्याची चवपण त्यात येते.

डाळिंब रिफ्रेशर


खूप दिवसांपासून आम्ही भरपूर डाळिंब आणतोय. सध्या सारखी सर्दी होत असल्यानी आंबट फळे खाऊ नाही शकत आहे. काल डाळींबाचा रस करायचा ठरवला पण त्यात थोडा आंबटपणा आणायचा होता की ज्याने करून आम्हाला थोडे व्हिटॅमिन सी मिळेल आणि थोडी चटपट चव पण येईल आणि त्यातूनच हे रिफ्रेशर तयार झाले

डाळिंब रिफ्रेशर
साहित्य
२ डाळिंब
२ लिंबू
१/२ हिरवी मिरची
३ चमचा साखर
१.५ ग्लास पाणी
चिमुटभर आले पेस्ट

कृती
 • डाळींबाची साल काढून त्यातील दाणे बाजूला काढणे.
 • मिक्सरमध्ये डाळिंबाचे दाणे, साखर, आले पेस्ट हिरवी मिरची घालून बारीक वाटणे.
 • त्यात पाणी आणि लिंबाचा रस घालुन पुन्हा वाटणे.
 • गाळून थंडगार प्यायला देणे.

टीप
हे बर्फाबरोबरपण देता येईल पण आम्हाला सर्दी असल्यानी आम्ही साधे पाणी वापरून विनाबर्फ प्यायले आणि तरी सुद्धा छान लागले

खिमा मटार


हि अजॉयची आवडती डीश. आम्ही जिथे जातो तिथे त्याला खिमा मटार खायचा असतो. काल सुद्धा त्याला पापलेट आणायला सांगितलेले ते नाही मिळाले तर त्यानी खिमा आणला. आज इथे त्याची कृती देत आहे

खिमा मटार
साहित्य
१/४ किलो खिमा
१.५ वाटी मटार
३ टोमाटो
३ कांदे
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
२ चमचा तिखट
२ चमचा गरम मसाला
१/२ चमचा हळद
१/२ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
२-३ कोथिंबीर पाने
मीठ
तेल

कृती
 • एक वाटी पाणी घालुन खिमा कुकरमध्ये शिजवून घेणे.
 • कढईत २-३ चमचे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालुन परतणे.
 • त्यात लसूण आणि आले पेस्ट घालुन अजून थोडा वेळ शिजवणे.
 • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन पुराना शिजेपर्यंत परतणे.
 • त्यात हळद, तिखट, गरम मसाला, धने पूड आणि जीरा पूड घालुन ढवळणे व एक दोन मिनिट शिजवणे.
 • मिश्रण थंड करून मिक्सर मध्ये थोडेसे पाणी घालुन बारीक वाटणे.
 • चमचाभर तेल कढईत गरम करून त्यात वाटण घालुन चांगले परतणे
 • त्यात शिजवलेला खिमा, मटार, मीठ आणि वाटीभर पाणी घालुन सारखे ढवळत मिश्रण जाड होईपर्यंत शिजवणे.
 • त्यावर कोथिंबीर घालुन खायला देणे.

टीप
आजकाल मिळणाऱ्या फ्रोझन खिम्या पेक्षा ताजा जास्त चांगला लागतो.
मी मटणाचा खिमा वापरला पण चिकनचा खिमा सुद्धा वापरायला हरकत नाही

आंब्याचा शिरा


आज गोव्यावरून आल्यावर मला काहीतरी सोप्पे आणि चविष्ठ बनवायचे मनात होते. बऱ्याच वेळा हॉटेलचे खाणे खाऊन कंटाळा आल्यावर काहीतरी साधे खायचे मनात असल्यानी मी हि डीश बनवली

आंब्याचा शिरा
साहित्य
१ वाटी रवा
१.५ वाटी आंब्याचा रस
१ वाटी दुध
१.५ वाटी पाणी
१/२ वाटी साखर
४-५ बदाम
चिमुटभर केशर
तूप

कृती
 • कढईत तूप गरम करून त्यात रवा मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजणे.
 • दुसऱ्या भांड्यात पाणी आणि दुध एकत्र करून उकळवणे व रव्यात घालणे.
 • रवा शिजून जाड झाल्यावर त्यात साखर आणि आंबा रस घालणे व अजून थोडा वेळ शिजवणे.
 • वरून केशर आणि बदाम घालुन खायला देणे.

टीप
मी फक्त अर्धा वाटी साखर वापरली कारण आंब्याचा रसात सुद्धा साखर होती
मी आजकाल आंब्याच्या छोट्या तुकाद्यासकट मिळणारा रस वापरला त्यामुळे अजून छान चव आली

पपईची टिक्की


पराठा बनवल्यानंतर हा अजून एक प्रकार की ज्यांनी फ्रीजमध्ये उरलेली पपई संपेल

पपईची टिक्की
साहित्य
१ कच्ची पपई
१ चमचा आले पेस्ट
१ चमचा तिखट
१ चमचा साखर
४ चमचे बेसन
४ चमचे कॉर्न फ्लौर
मीठ
तेल

कृती
 • पपई किसून कढईत पाणी घालुन मध्यम आचेवर शिजवणे.
 • साखर घालुन पूर्ण सुके पर्यंत शिजवणे.
 • दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात आले पेस्ट, तिखट घालुन परतणे.
 • त्यात शिजवलेली पपई, मीठ घालुन परतणे.
 • मिश्रण थंड करून त्यात बेसन आणि कॉर्न फ्लौर मिसळणे व रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणे.
 • सकाळी मिश्रणाच्या टिक्की बनवून तव्यावर भाजणे.

टीप
मिश्रण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यानी चांगले घट्ट होते व टिक्की बनवायला सोप्पे जाते
टिक्कीला रव्यामध्ये अथवा ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून पण भाजत येईल व थोडी वेगळी चव देता येईल

फ्लॉवर चटपटा


मी लहान असता डीडी मराठीवर एकदा फ्लॉवर तुरे नावाचा प्रकार बघितलेला. आता मला ते कसे बनवायचे काही आठवत नाही पण बहुदा ते असेच काहीसे असावेत.

फ्लॉवर चटपटा
साहित्य
४ वाटी फ्लॉवर तुकडे
१/२ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१/२ लिंबू
मीठ
तेल

कृती
 • फ्लॉवरचे दोन वाटी तुकडे, तिखट, मीठ, हळद आणि लिंबाचा रस एकत्र मिसळणे
 • उरलेल्या फ्लॉवरच्या तुकड्यांना मीठ लावणे
 • कढईत तेल गरम करून मीठ लावलेले फ्लॉवर तुकडे आधी तळणे आणि नंतर मसाले लावलेले तुकडे तळणे.
 • सर्व तुकडे एकत्र करून खायला देणे.

टीप
वरून चाट मसाला घालुन देता येईल
आधी मिठाचे तुकडे तळल्यामुळे फ्लॉवरचा रंग खराब होत नाही व त्यात मसाल्याची चव मिसळली जात नाही

पपई पराठा


अजॉयनी २ पपई आणलेल्या. त्या थोड्या कच्च्या होत्या आणि ५-६ दिवसांनंतर सुद्धा त्या पिकण्याची चिन्हे दिसत नव्हती म्हणून मग मी त्याचा वापर करून वेगवेगळे प्रयोग केले त्यातील हा पहिला.

पपई पराठा
साहित्य
१ कच्ची पपई
२ चमचे साखर
१ चमचा तिखट
१० चमचे गव्हाचे पीठ
मुठभर कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
 • पपईची साले काढून किसून कढईत ६-७ मिनिट शिजवणे.
 • त्यात साखर आणि तिखट घालुन शिजेपर्यंत परतणे.
 • मिश्रण थंड झाले की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, पीठ घालुन पराठ्यासाठी पीठ मळणे व अर्धा तास भिजवणे
 • पराठे लाटून तव्यावर तेल किंवा तूप घालुन भाजणे.

टीप
हे पराठे गोड आहेत आणि तिखट थोडीशी चव देण्यापुरतीच वापरले आहे

पनीर पेशावरी


हा आमचा सी एम एच रोडवरच्या गोकुळ नावाच्या हॉटेलमधला एकदम आवडता पदार्थ. मी हि भाजी आता बऱ्याच वेळापासून बनवत आली आहे पण लग्नानंतर कधीच बनवली नव्हती असे लक्षात आल्यावर काल रात्रीच्या जेवणासाठी बनवली

पनीर पेशावरी
साहित्य
२००ग्राम पनीर
२ कांदे
३ टोमाटो
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा हळद
१ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा जिरे पूड
१ चमचा धने पूड
मीठ
तेल

कृती
 • पनीर किसून घेणे. कांदा आणि टोमाटो बारीक चिरणे.
 • कढईत तेल गरम करून त्यात कांदे परतणे.
 • कांदे गुलाबी झाल्यावर त्यात आले आणि लसूण पेस्ट घालुन परतणे.
 • त्यात हळद, तिखट, गरम मसाला, जिरे पूड, धने पूड घालुन परतणे.
 • टोमाटो घालुन ते शिजवणे व मिश्रण थंड करणे.
 • मिश्रण मिक्सरमध्ये वाटून त्यात पाणी घालुन पुन्हा कढईत घालणे.
 • त्यात पनीर आणि मीठ घालुन जाड होई पर्यंत शिजवणे.

टीप
ह्यात थोडी ढोबळी मिरची पण घालता येईल पण आम्हा दोघांना त्याची फारशी आवड नसल्यानी मी नाही वापरली

चिकन बिर्याणी आणि शेंगदाणा ग्रेव्ही


मी ह्या आधी कधी चिकन बिर्याणी बनवली नव्हती त्यामुळे खूप शोधाशोध केली आणि आमच्या कडे येणाऱ्या काम वाल्या बाईना पण विचारले आणि हि बिर्याणी बनवली.

चिकन बिर्याणी

चिकन बिर्याणी
साहित्य
१/२ किलो चिकन
४ वाटी तांदूळ
१ वाटी दुध
१ वाटी दही
२ कांदे
१/२ वाटी टोमाटो प्युरी
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा आले पेस्ट
३ चमचे हळद
३ चमचे तिखट
२ चमचे धने पूड
१ चमचा जिरे पूड
१ चमचा वेलची पूड
चिमुटभर केशर
मीठ
तेल

कृती
 • कढईत तेल गरम करणे व त्यात कांदा परतणे.
 • त्यात टोमाटो प्युरी घालुन शिजवणे.
 • त्यात लसूण पेस्ट, आले पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा हळद, १ चमचा तिखट, १ चमचा धने पूड, १/२ चमचा जिरे पूड घालून परतणे.
 • त्यात दही आणि मीठ घालुन थोडावेळ शिजवणे.
 • त्यात चिकनचे तुकडे घालुन ग्रेव्ही सुकेपर्यंत शिजवणे व बाजूला ठेवणे.
 • ४ वाटी तांदूळ, दुध आणि केशर एकत्र करून शिजवणे.
 • तूप गरम करून त्यात वेलची पूड, हळद, तिखट, गरम मसाला, धने पूड आणि जिरे पूड घालणे
 • त्यात शिजवलेला भात आणि मीठ घालुन एकत्र करणे.
 • कुकरमध्ये भाताचा एक थर देणे त्यावर शिजवलेले चिकन आणि त्यावर उरलेला भात असे थर लावून कुकर बंद करून एक दोन मिनिट वाफ काढणे.

टीप
मला मसाले शिजवून त्यावर तांदूळ परतून मग भात बनवायला सांगितलेले पण मला शिजवलेल्या भाताला परतणे जास्त चांगले वाटते, मसाल्यांचा वास भातात शिल्लक राहतो.

शेंगदाणा ग्रेव्ही

शेंगदाणा ग्रेव्ही
साहित्य
१/२ वाटी शेंगदाणा कुट
२ टोमाटो
१ चमचा गरम मसाला
१ चमचा हळद
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा जिरे पूड
मीठ
तेल

कृती

 • तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे.
 • टोमाटो शिजले की त्यात तिखट, जीरा पूड, धने पूड आणि गरम मसाला घालुन परतणे.
 • त्यात शेंगदाणा कुट आणि मीठ घालुन पुन्हा परतणे.
 • मिश्रण एकदम सुका गोळा होईल त्याला तसेच १-२ मिनिट परतणे व नंतर पाणी घालुन जाड घेव्ही उकळवणे.

टीप
हि ग्रेव्ही जास्त तिखट नाही केलीये पण रायता भरपूर असेल तर थोडी जास्त मसालेदार आणि तिखट करायला हरकत नाही

अंडी मसाला


हि अंड्याची एकदम चविष्ठ कृती मला मिळाली. हि मी एका पुस्तकात वाचली आणि करून बघण्याचे ठरवले. आधी एकदा केलेले पण ती इतकी सुंदर नव्हती झाली. आज एकदम मस्त झाली तर कृती देत आहे

अंडी मसाला
साहित्य
३ अंडी
१ मोठा कांदा
२ टोमाटो
१ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा आले लसूण पेस्ट
२ चमचे कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
 • कढईत तेल गरम करून त्यात कांदे परतणे.
 • त्यात लसूण आले पेस्ट, तिखट आणि गरम मसाला घालुन अजून परतणे.
 • त्यात टोमाटो घालुन तेल सुटेपर्यंत शिजवणे.
 • तव्याला तेल लावून त्यावर मसाल्याचे मिश्रण पातळ पसरवणे.
 • अंडी फोडून मसाल्यावर सोडणे.
 • झाकण ठेवून मंद आचेवर अंडी घट्ट होई पर्यंत शिजवणे व वरून कोथिंबीर घालुन खायला देणे.

टीप
मसाला शिजलेला असल्यानी तो सध्या तव्यावर घातला तर करपण्याची शक्यता असते त्यामुळे नॉनस्टिक तवा वापरणे व एकदम मंद आचेवर शिजवणे
हा ब्रेड किंवा पराठे/फुलके बरोबर पण देता येईल

मटार पराठा


ह्यावेळी पुण्याला गेलेले असताना मांनी एकदम मस्त मटार कचोरी - मटार भरून पुरी बनवलेली. मी इथे ती करून बघायची ठरवली पण कामाच्या दिवशी करण्यासाठी ते थोडे किचकट काम असल्यानी मी पराठे बनवण्याचे ठरवले. कचोरी नंतर कधीतरी बनवेन

मटार पराठा
साहित्य
२ वाटी मटार
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
५ हिरव्या मिरच्या
६ चमचे गव्हाचे पीठ
मीठ
तेल/तूप

कृती
 • मटार पाणी न घालता बारीक वाटून घेणे.
 • कढईत तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्या, आले लसूण पेस्ट घालुन परतणे.
 • त्यात वाटलेले मटारचे मिश्रण घालुन सुकेपर्यंत शिजवणे.
 • पिठात तेल घालून मळणे व अर्धा तास भिजवणे.
 • पिठाचा गोळा बावून त्याला दाबून वाटी बनवणे व त्यात मटारचे मिश्रण घालुन पीठ बंद करणे.
 • त्या गोळ्याचा पराठा लाटून तव्यावर मध्यम आचेवर तेल किंवा तूप घालुन भाजणे.

टीप
ह्यात पाहिजे असल्यास थोडा मैदा घालता येईल

पोहे चाट


आई इथे आली होती तेंव्हा तिनी तिच्याबरोबर १-२ पाककृतीची पुस्तके आणलेली त्यातच हा पदार्थ बघितलेला. आज मी हा करून बघितला.

पोहे चाट
साहित्य
२ वाटी पातळ पोहे
२ बटाटा
१/२ चमचा आलं पेस्ट
४-५ मिरच्या
१/२ वाटी दही
१-२ चमचा साखर
मीठ
म्हवरी
चिमुटभर हळद
१ चमचा चिंचेची चटणी
तेल

कृती
 • बटाटे उकडून घेऊन थंड करणे.
 • पोह्यावर थोडेसे पाणी शिंपडून त्यांना मऊ करावं
 • त्यात किसलेला बटाटा, आलं पेस्ट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ एकत्र करणे व पीठ भिजवणे. ह्याचे गोळे करून अलग दाबून टिक्या बनवणे
 • टिक्या तव्यावर भाजून घेणे.
 • दही व साखर एकत्र करणे.
 • तेल गरम करून त्यात म्हवारीची फोडणी करणे. त्यात हळद घालुन ते तेल दह्यात घालुन हलवणे.
 • वाढताना पोह्याच्या टिक्कीवर दही आणि चिंचेची चटणी घालुन देणे.

टीप
पोह्याची टिक्कीवर ब्रेडक्रम लावून पण टाळता येईल.
बारीक शेव वारणा घालण्याचा माझा विचार होता पण माझ्याकडे शेव नसल्यानी घातले नाही पण नंतर एकदा मी करून बघणारे

चिंचेची चटणी


चिंचेची चटणी बनवून २-३ आठवडे बनवून ठेवता येईल.

चिंचेची चटणी
साहित्य
३ चमचे चिंच
८ चमचे पाणी
४ चमचे गुळ
१ चमचा तिखट
मीठ

कृती
 • चिंच पाण्यात भिजवून १-२ तास ठेवणे.
 • चिंच मिक्सरमध्ये गुळ, तिखट, मीठ घालुन चटणी वाटून घेणे.

टीप
मी कधी कधी चिंच वाटताना त्यात एखाद खजूर घालते त्यामुळे चव आणखीन खुलून येते.

दुधीभोपळा आणि कोथिंबीर पराठे


हा अजून एक पदार्थ आमच्याकडे असलेल्या भोपळ्याचा बनवला. एकदम सुंदर झालेला.

दुधीभोपळा आणि कोथिंबीर पराठे
साहित्य
२ वाटी किसलेला दुधीभोपळा
६-७ चमचाभरून पीठ
१ वाटी कोथिंबीर
२ चमचा क्रीम
१ चमचा आलं लसूण पेस्ट
१ चमचा हळद
२ चमचा तिखट
मीठ
तेल

कृती
 • किसलेला दुधीभोपळा कुकरमध्ये पाणी न घालता उकडून घेणे.
 • शिजलेल्या भोपळ्यात आलं लसूण पेस्ट, हळद, कोथिंबीर, तिखट, मीठ, क्रीम आणि चमचाभर तेल घालणे
 • त्यात गव्हाचे पीठ घालुन पीठ मळून घेणे. अर्धा तास भिजायला ठेवणे.
 • पराठे लाटून घेणे व मध्यम आचेवर तव्यावर भाजून घेणे

टीप
ह्या अर्धा वाटी चिरलेली मेथी पण घालता येईल.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP