अंड्याचा रोल


अंड्याचा रोल बंगाली खाण्यात इतका महत्वाचा आहे ह्याची मला बिलकुल कल्पना नव्हती :) इथे पूजेसाठी आम्ही गेले होतो तेंव्हा बऱ्याच लोकांना ह्यासाठी रांगेत उभे राहिलेले बघितले. अजॉय आधी कधी रोल बनवायला सांगितला की मला वाटायचे ह्याला तर पराठा जास्त आवडतो पण असे म्हणता येईल की तेंव्हा मला रोलचे महत्व कळले नव्हते पण इथली पूजा बघितल्यावर पहिल्यांदा मी रोल बनवले. अजॉय एकदम खुश होता :)

अंड्याचा रोल
साहित्य
३ वाटी मैदा
१ चमचा गव्हाचे पीठ
३ अंडी
१ कांदा
२ हिरव्या मिरच्या
हॉट आणि स्वीट टोमाटो सॉस
मीठ
तेल

कृती
 • मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि चमचाभर तेल एकत्र करून पाणी घालुन पीठ मळणे. भिजण्यासाठी अर्धा तास ठेवणे.
 • कढईत थोडेसे तेल घालुन गरम करणे व त्यात उभा चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालुन शिजवणे.
 • भिजलेल्या पीठाचे ३ गोळे करून पातळ चपाती लाटणे,
 • तवा गरम करून त्यावर चपाती टाकणे व तेल घालुन दोन्ही बाजूनी भाजणे
 • दुसरी बाजू हॉट आली की त्यावर अंडे फोडणे व पसरवणे
 • एक दोन मिनिट शिजू देणे व परतणे. तेल सोडून अंडे शिजेपर्यंत भाजणे व टिश्यूवर काढणे.
 • कांद्याचा १/३ भाग व सॉस उभ्या रेषेत चपातीवर घालणे.
 • चपाती टिश्यू सकट खालच्या बाजूनी थोडीशी दुमडून नंतर त्याचा रोल करणे.

टीप
मी पूर्ण गव्हाचे पीठ न वापरता मैदापन वापरला त्यामुळे चपाती कडक होत नाही आणि अगदी चपाती चपाती सारखी लागत नाही
रोल बनवताना एका बाजूनी मिश्रण झाकले जाईल असे दुमडावे आणि नंतर दुसऱ्या बाजूनी घट्ट बांधावे म्हणजे रोल सुटत नाही व मिश्रण बाहेर येणार नाही

कांदा पोहे


बरेच मित्र मैत्रिणी मला पटकन बनणाऱ्या आणि सोप्या नाश्त्याच्या कृती मागत आहेत. म्हणूनच इथे महाराष्ट्रातील अगदी घराघरात हमखास बनवला जाणारा सोप्पा आणि चविष्ठ पदार्थ देत आहे.

कांदा पोहे
साहित्य
२ वाटी पोहे
१/२ वाटी मटार
१ कांदा
चिमुटभर हळद
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचा जीरा
४ हिरव्या मिरच्या
४ चमचे किसलेले खोबरे
४ चमचा कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
 • पोहे धुवून त्यातील जास्तीचे पाणी ओतून झाकून बाजूला ठेवणे.
 • कढईत तेल गरम करून त्यात म्हवरी व जीऱ्याची फोडणी करणे.
 • त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालुन भाजणे.
 • कांदा बारीक चिरून घालणे व पारदर्शक होईपर्यंत भाजणे.
 • त्यात हळद घालुन ढवळणे.
 • धुवून व भिजवून मऊ झालेले पोहे त्यात घालुन चांगले एकत्र करणे.
 • झाकणी ठेवून मंद आचेवर २-३ मिनिट वाफ येऊ देणे.
 • झाकणी काढून त्यात मीठ व मटार मिसळणे व पुन्हा ३-४ मिनिट झाकणी ठेवून मंद आचेवर वाफ काढणे.
 • ताटलीत खायला देताना वरून खोबरे व कोथिंबीर घालुन देणे.

टीप
पोहे धुवून झाकून बाजूला ठेवणे फार महत्वाचे आहे त्यामुळे ते चांगले मऊ होतात. जर पोहे थोडे कडकडीत वाटत असतील तर थोडे पाणी शिंपडणे. तसेच जास्तीचे पाणी काढायला पण विसरू नये नाहीतर पोहे जास्तच मऊ होतील व त्याचा लगदा होईल
मटारच्याऎवजी फोडणी बरोबर भाजलेले शेंगदाणेपण वापरता येतील, अजॉयला फार आवडतात
पोह्यात १/२ वाटी बटाट्याचे तुकडेपण फोडणीत घालता येतील व कांदा बटाटा पोहे बनवता येतील

चेरी आणि काजूचा कप केक


मफीन बनवल्यापासून मी बरेच दिवस कप केक बनवण्याचा विचार करत होते. आज शेवटी मुहूर्त लागला :) :)

चेरी आणि काजूचा कप केक
साहित्य
२ वाटी टीन मधली चेरी
१ वाटी चेरीचे सिरप
१ वाटी पिठी साखर
२ अंडी
१/२ वाटी लोणी
२ वाटी मैदा
२.२५ चमचा बेकिंग पूड
१/२ वाटी दुध
१/२ वाटी काजू

कृती
 • लोणी, पीठ साखर आणि अंडी एकत्र फेटणे.
 • मैदा आणि बेकिंग पूड एकत्र चाळून घेणे
 • एकावेळी थोडा थोडा मैदा लोण्यात घालत एकत्र करणे.
 • चेरीच्या बिया काढून त्या, त्यांचे सिरप, काजू आणि दुध पिठात घालुन हलके एकत्र करणे.
 • ओव्हन २००C वर गरम करणे.
 • कप केपच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात २/३ काटापर्यंत मिश्रण भरणे
 • ओव्हनमध्ये २००C वर २० मिनिट केक भाजणे.

टीप
चेरी सिरप आणि थोडेसे वाटले गेलेले चेरी एकत्र मिळून एकदम चांगली चव देतात.
ह्यात बदाम आणि अक्रोडपण वापरता येतील पण माझ्याकडे ते नसल्यामुळे मी नाही वापरले
मी खारट मीठ वापराल्यानी वेगळे मीठ मैद्यात घातले नाही पण जर मीथाविना लोणी वापरले तर मैद्यात मीठ घालायला विसरू नये.

चिली पनीर


मला चायनीज फार आवडते आणि बरेच दिवस झाले मी ते खाऊन. थोड्या दिवसांपूर्वी आम्ही खालेल पण ते इतका छान नव्हता त्यामुळे ते न मोजलेलच बर. त्यामुळे काल मी स्वतःच करून बघायचा ठरवलं. ह्या आधी केलेलं चांगल झालेलं किंतु सगळ्यात चांगला नव्हत. आज एकदम छान झालेलं असल्यानी त्याची कृती देत आहे

चिली पनीर
साहित्य
४०० ग्राम पनीर
१ कांदा
६ मिरच्या
१५ लसूण पाकळ्या
चिमुटभर मिरे पूड
२ चमचा डार्क सोया सॉस
१ चमचा टोमाटो सॉस
१ चमचा कॉर्न फ्लौर
२-३ कांद्याच्या पाती
मीठ
तेल

कृती
 • पनीर चौकोनी कापून त्याला कढईत गरम तेलावर गुलाबी रंगावर भाजून घेणे.
 • त्याच तेलात कांदा भाजणे.
 • त्यात मिरच्या आणि लसूण कापून घालणे व भाजणे.
 • मिरे पूड, सोया सॉस घालुन थोड्यावेळ ढवळणे
 • आता त्यात भाजलेले पनीर आणि टोमाटो सॉस घालुन २-३ मिनिट शिजवणे.
 • कॉर्न फ्लौर एका वाटी पाण्यात एकत्र करून शिजणाऱ्या पनीरमध्ये घालणे
 • लागल्यास अजून थोडे पाणी घालुन झाकणी लावून ३ मिनिट शिजवणे.
 • वरून काड्याची पात चिरून घालणे व वाढणे.

टीप
मी मिरच्या उभ्या चिरून घातल्या त्यामुळे एकदम हॉटेलच्या डीशसारखे दिसते
पनीर भाजताना त्याला हलका गुलाबी रंग आला की लगेच बाहेर काढणे, जास्त भाजल्यानी ते सुकून तडतडीत होण्याची शक्यता असते
स्टारटर सारखे वापरायचे असेल तर थोडे कमी पाणी वापरणे म्हणजे सुके होईल

व्हेज फ्राईड राइस


मला हक्क नूडल्स आवडतात पण मला अजून हॉटेलसारख्या बनवायला जमल नाहीये त्यामुळे मी बऱ्याच वेळा फ्राईड राइस बनवते

व्हेज फ्राईड राइस
साहित्य
२ वाटी तांदूळ
१ कांदा
१ वाटी कोबी
१/२ वाटी गाजर
१/२ वाटी मटार
चिमुटभर मिरे पूड
मीठ
तेल

कृती
 • भात शिजवून बाजूला ठेवणे.
 • कढईत तेल गरम करून त्यात कांदा, उभे चिरलेले गाजर घालुन परतणे.
 • त्यात चिरलेला कोबी घालुन परतणे.
 • त्यात मटार, मिरे पूड आणि मीठ घालुन अजून एक मिनिट शिजवणे.
 • शिजवलेला भात घालुन परतणे व २-३ मिनिट शिजवणे.

टीप
सगळ्यात पहिल्यांदा गाजर घालणे म्हणजे ते शिजायला वेळ मिळतो.

कोफ्ता करी


जेंव्हा जेंव्हा आम्ही दुधी भोपळा आणतो तेंव्हा अजॉय हा कोफ्ता बनवायला सांगतो. काल मी शेवटी बनवला आणि इथे कृती देत आहे

कोफ्ता करी
साहित्य
४ वाटी किसलेला दुधी भोपळा
१.५ वाटी बेसन
२ टोमाटो
१ कांदा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा जीरा
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा आमचूर पूड
१/४ चमचा धने पूड
कोथिंबीर
मीठ

कृती
 • किसलेल्या दुधी भोपळ्याला मीठ लावणे व बाजूला ठेवणे.
 • पिळून सुटलेले पाणी वेगळे करून त्यात १/२ चमचा जीरा, १/२ चमचा तिखट, गरम मसाला आणि आमचूर पूड घालणे.
 • लिंबाच्या आकाराचे गोळे करून तेलात मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजणे.
 • कढईत तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.
 • त्यात बारीक चिरून कांदा, लसूण पेस्ट घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
 • त्यात हळद, उरलेली तिखट, धने पूड आणि मीठ घालणे.
 • टोमाटो घालुन पूर्णपणे शिजवणे. पाणी घालुन उकळी आणणे.
 • मिश्रण मिक्सरमध्ये मिश्रण घालुन बारीक वाटणे.
 • कढईत वाटण व पाणी घालुन त्यात कोफ्त्याचे गोळे घालुन उकळी आणणे.
 • वरून कोथिंबीर घालुन वाढणे.

टीप
मी कोफ्त्याला मसालेदार बनवले आणि ग्रेव्ही थोडी कमी मसालेदार ठेवली त्यामुळे कोफ्त्याची जास्त मजा येते.

भरलेली भेंडी फ्राय


बरेच दिवसांपासून भेंडी फ्राय करायला सांगत होता. त्यानी कडीपत्त्याऎवजी आज भेंडी आणली. लगेच मला कळले की त्याला भेंडी फ्राय किती जास्त खावास वाटतंय. मी लगेच काहीतरी बनवण्याचे ठरवले.

भरलेली भेंडी फ्राय
साहित्य
१/४ किलो भेंडी
१ टोमाटो
१ कांदा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे
१/४ चमचा धने पूड
मीठ
तेल

कृती
 • भेंडी धुवून पुसून घेणे.
 • देठ कापून प्रत्येक भेंडीला एक चीर देणे व मीठ लावून बाजूला ठेवणे.
 • कढईत तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.
 • त्यात कांदा घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
 • त्यात लसूण पेस्ट, हळद, तिखट, धने पूड घालुन एकत्र ढवळणे.
 • त्यात टोमाटो किसून घालणे व ४-५ मिनिट एकत्र भाजणे व बाजूला ठेवणे.
 • थोडे थोडे मिश्रण प्रत्येक भेंडीत भरणे.
 • कढईत तेल गरम करून त्यात भेंडी सोडून तळणे.

टीप
प्रत्येक भेंडीला पूर्ण चीर देण्याऎवजी दोन्ही बाजूनी थोडा भाग न चिरता सोडणे म्हणजे तळताना पूर्ण भेंडी उघडणार नाही.
तळताना भेंडी पहिल्यांदा स्टफिंग नसलेल्या बाजूला खाली सोडणे व पूर्णपणे भाजणे, भेंडीला उलटे करून एक मिनिट तळणे व लगेच बाहेर काढणे.

कटाची आमटी


हि आमटी पुरण पोळीच्या डाळीच्या उरलेल्या पाण्यातून बनवतात. एकदम गोड आणि आंबट अशी हि आमटी पुरण पोळी बरोबर एकदम मस्त लागते.

कटाची आमटी
साहित्य
२ वाटी हरबरा डाळ शिजवलेले पाणी
१/२ वाटी पुरण
१/२ वाटी गुळ
२ चमचा चिंच
१ चमचा धने
१ चमचा जिरे
१/२ चमचा म्हवरी
१ चमचा तिखट
४ चमचा खोबरे
१५ कडीपत्याची पाने
मीठ
तेल

कृती
 • चिंच एक वाटी पाण्यात भिजवणे व बाजूला ठेवणे.
 • चमचाभर तेल गरम करून त्यात धने आणि जिरे फोडणी करणे.
 • किसलेले खोबरे घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
 • मिक्सरमध्ये खोबऱ्याचे मिश्रण घालुन चिंचेबरोबर बारीक वाटणे.
 • अर्धा चमचा तेल गरम करून त्यात म्हवरी घालुन फोडणी करणे.
 • कडीपत्ता घालुन भाजणे
 • त्यात चिंच खोबऱ्याचे वाटण घालणे व एक मिनिट भाजणे.
 • तिखट घालुन अजून एक मिनिट भाजणे.
 • डाळीचे पाणी, पुरण आणि गुळ घालणे. जाड वाटल्यास थोडे पाणी पण घालणे.
 • मीठ घालुन आमटी उकळवणे.

टीप
डाळीचे पाणी नसेल तर साधे पाणी पण वापरता येईल
पुरण बनवण्यासाठी ह्या पुरण पोळीच्या कृतीचा उपयोग करणे

नारळाचा रस


आमच्या ह्या रसाशिवाय पुरण पोळी होऊच शकत नाही. इथे त्याची कृती देत आहे.

नारळाचा रस
साहित्य
४ वाटी खोबरे
१.५ वाटी गुळ
मीठ

कृती
 • मिक्सरमध्ये किसलेले खोबरे आणि पाणी घालुन वाटणे व पिळून दुध काढणे. तोच कीस सारखा पाणी घालुन ३ वेळा रस काढणे.
 • त्यात गुळ आणि मीठ घालुन ढवळणे.

टीप
हा रस ताजा ताजाच चांगला लागतो. वर दिलेल्या प्रमाणात ह्या पुरण पोळीच्या कृतीत दिलेल्या पोळ्यांना पुरेसा होतो.

पुरण पोळी


पुरण पोळी हा असा एक प्रकार आहे जो मला आईनी बनवलेलाच आवडतो. बरेच लोक त्याला पराठ्यासारखा बनवतात पण पोळी आणि पराठा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पोळी हि एकदम मऊसुत असणे एकदम महत्वाचे आहे. आईकाढून आधी मी ह्याची कृती घेतलेली पण मला काही आई सारखी मऊ पोळी बनवायला जमली नाही. आता पुण्यात असताना मी आई कडून चांगली शिकून आले आणि इथे दसर्याच्या निमित्तानी देत आहे. सगळ्यांना दसर्याच्या शुभेच्छा.

पुरण पोळी
साहित्य
४ वाटी हरबरा डाळ
३ वाटी गुळ
२ वाटी पीठ
१ चमचा मैदा
१ वाटी तांदुळाचे पीठ
१/२ वाटी तेल

कृती
 • मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून एकदम मऊ पीठ भिजवणे.
 • पीठ स्टीलच्या भांड्यात टाकून बोटे दाबून खड्डे करणे.
 • सगळी भोके बुडतील इतके तेल ओतणे आणि कमीत कमी २ तास भिजायला ठेवणे.
 • हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घेणे.
 • डाळीतील जास्तीचे पाणी बाजूला काढणे. (जास्तीच्या पाण्याची कटाची आमटी बनवता येईल)
 • त्यात गुळ घालुन कढईत सुकेपर्यंत शिजवणे.
 • पुरण पुरण यंत्रातून फिरवणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
 • पुरण पोळी करण्यासाठी तवा एकदम मंद आचेवर गरम करणे.
 • पुरणाचा लिंबाच्या दुप्पट आकाराचा गोळा बनवणे.
 • पिठाचा लिंबाच्या आकाराचा गोळा बनवणे व त्याची वाटी बनवणे. त्यात पुरणाचा गोळा घालुन पीठ बंद करणे.
 • गोळे तळव्यावर ठेवून अलगद दाबणे. पीठाचे कव्हर बाजूला गेले तर ओढून पुन्हा आत मध्ये घेणे
 • भरपूर तांदुळाचे पीठ पोलपाटाला लावणे. पुरण पोळीचा गोळा तांदुळाच्या पिठात बुडवून लाटणे.
 • मध्ये मध्ये पोळी हातावर घेवून खाली चिकट नाही ह्याची खात्री करणे व मधून मधून तांदुळाचे पीठ लावत राहणे.
 • एकदम अलगद आणि बाहेरच्या दिशेनी लाटणे महत्वाचे आहे.
 • पोळी गरम तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूनी भाजणे. दुमडून वाढणे.

टीप
पोळीच्या पिठाचा इलॅस्टिकपणा पोळीला पातळ लाटण्यासाठी आणि त्याचा थर पातळ ठेवण्यासाठी उपयोगी पडतो.
पुरण पोळी बनवताना पहिल्यांदा छोटी लाटून बघणे व जसे जमेल तसे मोठे मोठे करणे. भरपूर तांदुळाचे पीठ वापरणे व नंतर पाहिजे तर स्वतःच्या सोयीप्रमाणे कमी करणे.
पोळी पोलपाटाला चिकट नाही हे बघण्यासाठी तळवा पोळीवर ठेवून पोलपाट उलटे करणे.तव्यावर पोळी टाकताना पण तसेच करणे. कधीही बोटांनी पोळी उचलू नये.
पोळीच्या कडांना जास्त पीठ असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की पुरणापेक्षा पीठ जास्त वापरलाय. त्या नंतरच्या पोळीला थोडे कमी पीठ वापरून बघणे
पोळी लाटताना बाहेरच्या बाजूला लाटल्यानी पोळी सगळीकडून चांगली पसरते आणि बाहेरच कव्हर पण तुटत नाही.
शेवटची टीप म्हणजे हि एकदम किचकट कृती आहे त्यामुळे पहिल्यांदा यश नाही आलेतरी दुखी होऊ नये, थोड्या प्रयत्नानंतर यश नक्की येईल. मी आईनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी सांगायचा प्रयत्न केलाय. आशा आहे त्याचा उपयोग होईल

शेंगण्याचे चॉकोचीप मफीन


ह्या वेळी अजॉयनी युस वरून मफीनचे भांडे आंडले आहे. घरात पीनट बटर असल्यानी त्याचा वापर करण्याचे मी ठरवले आणि हे मफीन बनवले.

शेंगण्याचे चॉकोचीप मफीन
साहित्य
१ वाटी पीनट बटर
१ वाटी चॉकोचीप
२ वाटी मैदा
१ चमचा व्हॅनिला इसेन्स
१.५ वाटी साखर
२ अंडी
१.५ चमचा बेकिंग पूड
१/२ चमचा खाण्याचा सोडा
१/२ वाटी दुध

कृती
 • पीनट बटर, अंडी, साखर आणि व्हॅनिला इसेन्स एका भांड्यात एकत्र फेटणे.
 • मैदा, बेकिंग पूड, खाण्याचा सोडा एकत्र ३-४ वेळा चाळून घेणे.
 • एका वेळी थोडा थोडा मैदा लोण्यात घालुन फेटणे.
 • त्यात चॉकोचिप्स घालुन हलकेच ढवळणे.
 • ओव्हन २००C वर गरम करणे.
 • मफीनच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात प्रत्येक भांड्यात २/३ काटापर्यंत मिश्रण घालणे.
 • ओव्हनमध्ये २००C वर १५ मिनिट मफीन भाजणे.

टीप
इथे चॉकोचिप्स मिळत नसल्यानी मी कॅडबरीचे तुकडे करून वापरले.
तसेच मला असे लक्षात आले की मी जर अर्धे साधे लोणी आणि अर्धे पीनट बटर वापरले असते तर जास्त चांगली चव आली असती.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP