Showing posts with label मिठाई. Show all posts
Showing posts with label मिठाई. Show all posts

केशर मलई पेढा


मागच्या वर्षी आमच्या घराच्या भूमीपुजेला काहीतरी सोप्पे आणि पटकन होणारी मिठाई बनवताना मी हे पेढे बनवलेले. आता इतक्या दिवसांनी नवीन पोस्ट करायला ह्याच्याहून चांगल मला आणखीन काही वाटत नाही.

केशर मलई पेढा
साहित्य
१२ औंस खवा
१.५ वाटी साखर
२.५ वाटी दुधाची पावडर
१/२ वाटी दुध
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर केशर
२ चमचे पिस्ता
तूप

कृती
  • खवा किसून त्यात साखर, दुधाची पावडर आणि वेलची पूड ढवळणे.
  • दुध आणि केशर एकत्र करून त्यात २० सेकंद मायक्रोवेव्ह करणे.
  • जाड कढईत मंद आचेवर तूप आणि खवा मिश्रण घालून ढवळत शिजवणे.
  • त्यात एक-दोन मिनिटांनी केशर दुध घालणे.
  • मिश्रण ढवळत थोडे जाडसर होईपर्यंत शिजवणे व ५ मिनिट थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • पिस्ता बारीक चिरणे
  • छोटे छोटे गोळे करून तळव्यावर पिस्ता ठेवून दाबणे.


टीप
पेढा मिश्रण कोमट असताना बनवणे नाही तर शेप देणे कठीण होऊशकते
खव्याचे मिश्रण सारखे ढवळणे नाहीतर कढईला लागू शकते.
मी अनोडाईज कढई वापरली

काजू कतली


मी हे बरेच दिवसांपासून बनवण्याचा विचार करत होते. साधारण २ वर्षांपूर्वी दिवाळीला आई बाबा इथे असताना बनवलेले. त्यानंतर मी त्याविषयी विसरूनच गेलेले. २-३ आठवड्यांपूर्वी अजॉयनी काजू कतली बनवायची मागणी केल्यावर मला तर भीती होती कि आधीच मी सगळ विसरूनच गेले असेन पण आईला पाठवलेल्या कच्या नोट्समध्ये माहिती मिळाल्यानंतर ह्यावेळी एकदम छान झालेले. ह्यावेळी फोटो काढायला पण विसरले नाही त्यामुळे हि कृती लिहायला काही कमी नाहिये. माझ्यामते हि सगळ्यात सोपी आणि खूप वाहवा देणारी दमदार कृती आहे.

काजू कतली
साहित्य
६ वाटी काजू
१ वाटी दुध पूड
२ वाटी साखर
चिमुटभर वेलची
चांदीचा वर्ख

कृती
  • काजू मिक्सरमध्ये बारीक वाटून पूड करणे
  • काजू पूड आणि दुध पूड एकत्र करणे
  • तवा चांगला गरम करणे व आचेवरून बाजूला काढणे
  • काजू पूड आणि दुध पूड तव्यावर घालून कोमट होईपर्यंत चांगले एकत्र करणे व नंतर भांड्यात काढणे
  • १.५ वाटी पाणी आणि साखर एकत्र गरम करून २ तारी पाक बनवणे
  • वेलची पूड आणि पाक काजू मिश्रणामध्ये घालून चांगले ढवळणे व नंतर माळून गोळा बनवणे
  • बेकिंग तवा किंवा ताटलीवर बटरपेपर ठेवून त्यावर हे मिश्रण घालून जोरात थापून पसरवणे
  • त्यावर चांदीचा वर्ख लावून २-३ तास थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
  • काजू कतली कापून खायला देणे

टीप
साखरेचा पाक बरोबर बनवणे आणि चांगले मळणे यशस्वी होण्यासाठी महत्वाचे आहे
मिश्रण पसरवताना चांगले जोरात ठोकून पसरवल्यानी काजू कतली एकदम चांगली सेट होते

रस मलई


अजॉयनी दसऱ्यासाठी रस मलईची फर्माईश केलेली पण त्यादिवशी घरात जास्त दुध नसल्यानी आणि ते त्यांनी खूप उशिरा आणून दिल्यानी दसऱ्यासाठी काही मी रस मलई नाही बनवू शकले. पण काल मी ती बनवण्याचा घाट घातला. एकदम उत्तम झालेली ही रस मलईची पाककृती इथे देत आहे.

रस मलई
साहित्य
२ लिटर दुध
२ चमचे व्हिनेगर
१ चिमुटभर केशर
१/४ चमचा वेलची पूड
१/४ वाटी बदाम
१/४ वाटी पिस्ता
३ वाटी साखर

कृती
  • १ लिटर दुध उकळवायला ठेवणे
  • अर्ध्यावाटी पाण्यात व्हिनेगर घालुन ते हळूहळू उकळत्या दुधात घालुन ढवळणे.
  • पनीर वेगळे झाले की लगेच पंचावर ओतून पाणी गळून टाकावे. थंडपाण्याखाली हे पनीर ठेवून त्यातली व्हिनेगरची चव निघेपर्यंत नीट धुवून घ्यावे. पंचा घट्ट बांधून पाणी गाळण्यासाठी १-२ तास लटकवून ठेवणे.
  • दुसऱ्या पसरट भांड्यात उरलेले एक लिटर दुध उकलावायला ठेवणे. अर्धे होईपर्यंत सारखे ढवळत उकळवणे.
  • त्यात केशर आणि अर्धी वाटी साखर घालुन अजून २-३ मिनिट उकळवणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • एका मोठ्या पसरट भांड्यात किंव्हा कुकरमध्ये १.५ लिटर पाणी आणि उरलेली २.५ वाटी साखर घालुन उकळवणे.
  • परातीत पाणी गळून गेलेले पनीर घेऊन चांगले एकजीव होईपर्यंत मळणे. ह्या पनीरचे छोटे पसरट चपटे गोळे बनवून ते उकळत्या पाण्यात सोडणे. भांड्यावर झाकण लाऊन (कुकर असेल तर त्याला शिट्टी न लावता) १० मिनिट मोठ्या आचेवर शिजू देणे
  • आच बंद करून ५ मिनिट तसेच थंड होऊ देणे व नंतर झाकण काढून कोमट होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • आता एक एक गोळा तळहातावर घेऊन अलगद दाबून त्यातले साखरेचे पाणी काढून टाकणे. असे सगळे गोळे एका भांड्यात टाकणे.
  • आधी बनवलेल्या दुधात वेलची पूड आणि बारीक चिरलेले पिस्ता आणि बदाम घालणे. ते दुध तयार केलेल्या गोळ्यांच्या भांड्यात टाकून थंड करायला ठेवून देणे.

टीप
मी बदाम अर्ध्या वाटी पाण्यात २ तास भिजवून मग चिरले. चिरणे खूप सोपे होते.
१ लिटर दुध आटवण्याऎवजी अर्धा लिटर हाल्फ अ‍ॅन्ड हाल्फ वापरता येईल.
माझ्याकडे मोठा कुकर किंवा भांडे नसल्यानी मी अर्धे गोळे शिजवून घेतले. मग कुकरमध्ये अजून २ वाटी पाणी घालुन उरलेले अर्धे गोळे शिजवले. गोळे मऊ होण्यासाठी साखरेचे पाणी पातळ असणे महत्वाचे आहे. तसेच भांड्यात गोळ्यांना फुलण्यासाठी जागा असली पाहिजे

सॅन्डविच


हा माझा सगळ्यात आवडता बंगाली गोड पदार्थ. त्यामुळे मी अजॉयसाठी त्याचे आवडते मिष्टी दोही बनवायला घेतले, तेंव्हा बाजूला माझ्यासाठी हे सॅन्डविच बनवायला पण चालू केले. खूप चविष्ट झाला हा प्रयोग

सॅन्डविच
साहित्य
२ लिटर दुध
४ चमचे व्हिनेगर
१ चमचा रवा
२ वाटी खवा
१/२ वाटी आईसिंग शुगर
२.५ वाटी साखर
चांदीचा वर्ख
पिस्त्याची पूड
चिमुटभर बेकिंग पूड
२ चिमुट केशर

कृती
  • १/४ वाटी दुध बाजूला ठेवून बाकीचे दुध उकळवणे व त्यात २ चमचे पाण्यामध्ये व्हिनेगर घालुन एकत्र करणे.
  • दुधापासून पाणी वेगळे होईपर्यंत एकसारखे ढवळणे
  • हे मिश्रण चाळणीत पंचा टाकून त्यावर ओतणे. थंड पाण्याखाली धरणे. नंतर पंच्याला गाठ मारून ५ मिनिट बांधून ठेवणे.
  • कुकर मध्ये ६ वाटी पाणी आणि साखर घालुन उकळी आणणे.
  • बांधून ठेवलेले पनीर एका ताटात काढून चांगले मळून घेणे.
  • त्यात रवा आणि बेकिंग पूड घालुन पुन्हा चांगले मळणे
  • ह्या पनीरच्या पिठापासून पातळ चौकोनी तुकडे बनवणे. ह्यातील अर्धे तुकडे उकळत्या साखरेच्या पाण्यात घालणे.
  • कुकरचे झाकण बंद करून एक शिट्टी काढणे. त्यानंतर आच मंद करून १० मिनिटे अजून शिजवणे. कुकर थंड होऊ देणे
  • शिजलेले पनीर कुकरमधून काढून ठेवणे. कुकरमध्ये अजून २ वाटी पाणी घालुन उरलेले तुकडे त्यात सोडून आधीच्या तुकड्यांसारखे शिजवून थंड करून घेणे.
  • आता हे सगळे पनीरचे तुकडे उरलेल्या साखरेच्या पाण्यासकट फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी रात्रभर ठेवून देणे.
  • दुसऱ्यादिवशी सकाळी खवा किसून त्यात आईसिंग शुगर घालुन मळणे.
  • उरलेले १/४ वाटी दुध गरम करून त्यात केशर घालणे. हे केशरीदुध खव्यामध्ये घालुन चांगले मळून घेणे.
  • फ्रीजमधून शिजवलेले पनीरचे तुकडे बाहेर काढून त्याचे त्रिकोणी तुकडे करणे.
  • प्रत्येक २ तुकड्यांमध्ये थोडे थोडे खव्याचे मिश्रण घालुन सॅन्डविच बनवणे. तसेच पिस्त्याची पूड खव्याच्या मिश्रणावर तसेच सॅन्डविचवर पसरवणे
  • चांदीचा वरखा लावून थंडगार वाढणे

टीप
मी जाड पनीरचे तुकडे करून चिरण्याऎवजी करतानाच पातळ तुकडे बनवले आणि दोन तुकड्यांमध्ये खवा घालुन सॅन्डविच बनवले.

गुळाचा संदेश


सरस्वती पूजेच्या दिवशी मी हि मिठाई करून बघण्याचे ठरवले. अजॉयची आवडती मिठाई. खूपच चांगला झालेला आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे कलाकंद सारखी किचकटपण नाहीये करायला. त्यामुळे त्यांनी पुन्हा काहीतरी बनवण्यास सांगितल्यास कमी कष्टाची पण खूप तारीफ देणारी हि मिठाई कधीही बनवू शकते.

गुळाचा संदेश
साहित्य
१ लिटर दुध
३/४ वाटी गुळ
२ चमचा व्हिनेगर
१/४ चमचा पिस्ता पूड

कृती
  • भांड्यात दुध उकळवणे व त्यात २ चमचा पाण्यात मिसळलेले व्हिनेगर घालणे.
  • पनीर तयार झाल्यावर लगेच गाळून थंड पाण्याखाली धुवून घेणे.
  • पंचात टांगून ५-१० मिनिट पाणी जाण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • परातीत पनीर काढून चांगले मळून घेणे. एकम मऊसर आणि एकसारखे झाले पाहिजे.
  • त्यात गुळ किसून घालणे व एकत्र करणे.
  • कढईत मिश्रण घालुन मध्यम आचेवर शिजवणे. भांड्यापासून मिश्रण सुटायला लागले व एकत्र गोळा व्हायला लागले की खाली काढणे.
  • छोटे छोटे गोळे करून त्यांना साच्यात घालुन आकार देणे. साचे नसल्यास नुसतेच पण गोळे करून ठेवता येतील.
  • पिस्ता पूड शिंपडणे व पूर्ण पणे थंड होऊ देणे.

टीप
मी नेहमीच्या गुळाऎवजी कलकत्याचे पाताली गुळ वापरले. पण नेहमीचे गुळ वापरताना मी त्यात थोडासा खजूर वाटून घालण्याचा विचार करत आहे. कारण त्या गुळाची चव खजूर आणि गुळ एकत्र केल्यासारखी लागते.
पनीर बनवताना ते दुधापासून वेगळे झाले की लगेच धुवून घेणे, जर जास्त शिजवले तर मिठाई कडक होते.
संदेशला आकार देण्यासाठी मिश्रण गरमच असायला हवे. जर ते थंड व्हायला लागले तर पुन्हा थोडेसे कोमट करून घेणे.

कलाकंद


आज सकाळी काहीतरी गोड बनवण्याचा विचार करताना मेहुलनी त्याच्या कार पूजेच्यावेळी दिलेला कलाकंद आठवला. थोडा फार शोधल्यावर लक्षात आला की करायला एकदम सोप्पा आहे. पण जेंव्हा बनवला तेंव्हा लक्षात आला की सोप्पा असला तरी खूप किचकट आणि वेळ लागणार काम आहे.

कलाकंद
साहित्य
२ लिटर दुध
१ वाटी साखर
३ चमचे व्हिनेगर
१ चमचा पिस्ता
१ थेंब केवडा इसेन्स
चांदीचा वर्ख

कृती
  • निम्मे दुध उकळून घेणे
  • ३ चमचे पाणी आणि व्हिनेगर एकत्र करून उकळत्या दुधात घालणे.
  • दुधातून पनीरवेगळे झाले की लगेच गाळून घेवून थंड पाण्याखाली धुवून घेणे.
  • पंचात पनीर घालुन पाणी जाऊ देण्यासाठी टांगून ठेवणे.
  • उरलेले दुध उकळून घेणे व त्यात बनवलेले पनीर घालुन मिश्रण आटेपर्यंत मध्यम आचेवर शिजवणे.
  • त्यात साखर आणि केवड्याचा इसेन्स घालुन पुन्हा मुश्रन घट्ट होईपर्यंत शिजवणे.
  • ताटलीत मिश्रण टाकून पसरवणे व त्यावर चांदीचा वर्ख आणि पिस्ते लावणे.
  • थंड झाल्यावर कापून तुकडे करणे व खायला देणे.

टीप
मी मिश्रण नॉनस्टिक भांड्यात उकळायला ठेवलेले पण त्यात ते चांगले होत नसल्यानी अ‍ॅलुमिनियम भांड्यात केले. अ‍ॅलुमिनियम भांडेच मला गोड पकवान बनवायला बरे वाटते.
दुध उकळवताना सारखे ढवळणे महत्वाचे आहे नाहीतर भांड्याला दुध लागून त्यात करपट वास जातो.
५ नोव्हेंबर: मी आज २ लिटरऎवजी २ गॅलन दुधाची मिठाई बनवण्याचे ठरवले पण पनीर घातल्यावर दुध आटवण्यासाठी खूप जास्त वेळ लागला. त्यामुळे जर खूप सारे मिठाई बनवण्याचा बेत असेल तर तसा अंदाज आधी पासूनच बांधावा. साधारणपणे २ लिटर दुधाच्या १६ बर्फ्या होतात

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP