Showing posts with label ग्रेव्ही. Show all posts
Showing posts with label ग्रेव्ही. Show all posts

फिश तवा फ्राय


आम्ही तिलापिया माशे आणायला चालू केल्यापासून मी नेहमीच त्यांना ग्रील करत आलीये. मला माशे नेहमीच आवडायचे आणि आता इतक्या दिवसात मी माश्याची आमटी बनवलीच नव्हती. जास्त नारळाचा वापर करायचा नाही अस ठरवल्यानी मला नेहमी बनवतात तशी आमटी बनवायची नव्हती. हि आमटी एकदम मस्त झालेली आणि मला साधारण १० वर्षांपूर्वी बऱ्याच वेळी खायचे त्या नंदिनी नावाच्या बंगलोरमधल्या आंध्रा करीची आठवण झाली.


फिश तवा फ्राय
साहित्य
५०० गरम माशे
१ मोठा कांदा
२ टोमाटो
१ चमचा चिंच
१/२ चमचा मिरे
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
४-५ लसूण पाकळ्या
१ चमचा आले
कोथिंबीर पाने

कृती
  • माश्याला १/४ चमचे तिखट, धने पूड आणि मीठ लावून बाजूला ठेवणे.
  • मिक्सरमध्ये चिंच, कांदा आणि ६-७ मिरे बाजूला ठेवून बाकीचे मिरे घालून बारीक वाटणे
  • तवा गरम करून त्यात माश्याचे तुकडे घालणे व एक मिनिट शिजू देणे.
  • माशे परतून त्यांना अजून एक मिनिट शिजू देणे. ताटावर काढून ठेवणे.
  • त्याच तेलात वाटलेली कांद्याची पेस्ट घालून त्यातील कच्चा वास निघे पर्यंत परतणे.
  • बाजूला टोमाटो , लसुन, आले बारीक वाटून घेणे.
  • कांदा शिजल्यावर त्यात टोमाटो पेस्ट, जिरे पूड, गरम मसाला, हळद, उरलेले मिरे आणि मीठ घालून ५ मिनिट सारखे ढवळत शिजवणे.
  • त्यात परतलेले माशे घालून अलगत एकत्र करणे व २-३ मिनिट शिजवणे.
  • वरून बारीक चिरलेली कोथिम्बिर घालून वाढणे.

टीप
मी काटे नसलेले व साफ केलेले तिलापिया माश्याचे तुकडे साधारण ४ भागात चिरलेले वापरले पण कुठलाही बिन काट्याचा मासा वापरता येईल.

कोथिंबीर चिकन


शुक्रवारी अजॉयनी मला चिकन रोल बनवायला सांगितले तेंव्हा त्यात घालायला म्हणून मी हि भाजी बनवलेली. मला नेहमीची लाल मसाला करायचा कंटाळा आलेला. त्यानी चिकन खाऊन सांगितला की हे आता पर्यंतच सगळ्यात चांगला चिकन होता. मला वाटला की खूप दिवसांनी चिकन बनवलंय म्हणून तो असा म्हणतोय. पण रविवारी जेव्हा मित्रमैत्रिणीना बोलावण्याचे ठरवले तेंव्हा तो म्हणाला की हि डीश पुन्हा करायलाच हवी. जेव्हा थोडासा खाल्यावर पुन्हा त्यानी तशीच प्रतिक्रिया दिली मी लगेच फोटो काढून ठेवले. मित्रमैत्रिणीनी पण डीशची खूप तारीफ केली तेंव्हा मला पोस्ट करावाच लागलं :)

कोथिंबीर चिकन
साहित्य
१/२किलोग्राम बोनलेस चिकन
१ चमचा जीरा पूड
१ चमचा धने पूड
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट
१ चमचा मिरे पूड
३-४ लसूण पाकळ्या
१ चमचा आले पेस्ट
१ मोठा टोमाटो
२ वाटी कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • चिकनला मीठ, जीरा पूड, धने पूड, गरम मसाला, मिरे पूड लावून अर्धा तास ठेवून देणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात चिकन गुलाबी होईपर्यंत मध्यम आचेवर परतून घेणे.
  • तोपर्यंत टोमाटो, लसूण आणि आले मिक्सरमध्ये वाटून घेणे.
  • त्यात कोथिंबीर घालुन पुन्हा बारीक वाटणे.
  • चिकन मध्ये टोमाटो-कोथिंबीर मिश्रण, मीठ घालुन सुके पर्यंत शिजवणे.

टीप
चिकन रोल बनवण्यासाठी कांदा आणि हि भाजी घालता येईल. खूप सुंदर लागते. असेच भाताबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाता येईल. कसेही खा चाविष्ठच लागते.

ढोकार दालना


मी बरेचदिवसांपासून हा पदार्थ बनवण्याचा विचार करत होते. मागच्यावर्षी एका नातेवैकांकडे कोलकत्तामध्ये खालेली. त्यावेळी मला फार काही बरे वाटत नसल्यानी फक्त चवीपुरता खालेली पण तेवढ्यातच मला हा प्रकार इतका आवडला की मी तो घरी बनवण्याचा निश्चय केला. शेवटी आज तो बनवण्याचा मुहूर्त आला

ढोकार दालना
साहित्य
२ वाटी हरबरा डाळ
२ टोमेटो
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे आलं
५ लसूणाच्या पाकळ्या
१/२ चमचे जिरे
१/४ चमचे हळद
१/२ चमचे जिरे पूड
१/२ चमचे धने पूड
तेल
तूप
मीठ

कृती
  • रात्रभर डाळ पाण्यात भिजवून ठेवणे.
  • मिक्सरमध्ये डाळ वाटून घेणे.
  • कढई गरम करून त्यात २ चमचे तेल व जिरे टाकून फोडणी करावी
  • आता त्यात किसलेले १ चमचा आलं, हळद, मीठ आणि वाटलेली डाळ घालुन ते मिश्रण शिजवणे. मिश्रण बाजू सोडेपर्यंत शिजवणे.
  • ताटलीला तेलाचा हात लावून त्यावर हे मिश्रण पसरवणे व थंड करणे.
  • थंड झाल्यावर चौकोनी तुकडे कापून तव्यावर तेल टाकून तळून घेणे.
  • मिक्सरमध्ये टोमेटो, हिरव्या मिरच्या, उरलेले एक चमचा आलं, लसुणाच्या पाकळ्या घालुन वाटून घेणे.
  • कढईत एक चमचा तेल घालुन गरम करणे व त्यात वाटलेले मिश्रण घालुन शिजवणे.
  • त्यात जिरे पूड, धने पूड, मीठ आणि ३ वाटी पाणी घालुन उकळवणे.
  • त्यात तळलेले डाळीचे ढोकळे घालुन उकळवणे. ढोकळे ग्रेव्ही शोषून घेईपर्यंत उकळवणे.
  • वरून तूप सोडून वाढावे

टीप
मी ग्रेव्ही जास्त मसालेदार नाही बनवली त्यामुळे ढोकळ्याची चव खुलून आली.

हरियाली मेन्गो पनीर


आज आम्ही कपिल आणि श्रीन्खलाला रात्रीच्या जेवणासाठी भेटणार होतो. पण आयत्यावेळी आम्ही तो बेत रद्दकरून घरीच काहीतरी खाण्याचे ठरवले. माझ्याकडे मागच्या आठवड्यात मयुरीमधून आणलेली कैरी होती त्यामुळे मी त्याचे सलाड बनवण्याचा विचार करत होते पण शेवटच्याक्षणी मी बेत बदलून हरियाली मेन्गो पनीर बनवले. अतिशय उत्तम चव आली.

हरियाली मेन्गो पनीर
साहित्य
३ वाटी कोथिंबीर
१/२ वाटी पुदिना
१ कैरी
१ कांदा
२ वाटी पनीर
१ हिरवी मिरची
१ चमचा लसूण पाकळ्या
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/४ चमचा हळद
१/२ चमचा जिरे पूड
मीठ चवीपुरतं
तेल

कृती
  • मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि १ वाटी पाणी घालुन बारीक पेस्ट बनवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात पनीर गुलाबी रंगावर भाजून घेणे. बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात कांदा, लसूण घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • त्यात कैरीचे तुकडे आणि कोथिंबीर-पुदिना-मिरचीची पेस्ट घालुन आटेपर्यंत शिजवणे.
  • त्यात हळद, गरम मसाला, तिखट, जिरे आणि धने पूड घालुन ढवळणे.
  • पनीरचे तुकडे आणि मीठ घालुन २ मिनिट शिजवणे

टीप
मी जी कैरी वापरली ती फार आंबट नव्हती त्यामुळे त्याच्या हलक्या आंबटपणामध्ये भाजीची चव एकदम खुलून आली. त्यामुळे जर कैरी खूप आंबट असेल तर त्याचे प्रमाण कमी करायला विसरू नये.

दुधीभोपळ्याचा कोफ्ता


अजॉयला भोपळ्याचा कोफ्ता फार आवडतो, इतका की पुण्याला गेल्यावर मां त्यासाठी नेहमी बनवते. मागच्या वर्षापर्यंत आम्ही खूप वेळा पुण्याला जायचो त्यामुळे मी हे कधीच नाही बनवलं पण इथे आल्यापासून आम्ही दोघेसुद्धा कोफ्ता फार मिस करतो. त्यामुळे आता मांकडून ह्याची कृती घेऊन मी आज कोफ्ता बनवला.

दुधीभोपळ्याचा कोफ्ता
साहित्य
३ वाटी दुधीभोपळा
१ वाटी गाजर
१.५ वाटी बेसन
३ चमचा कॉर्न फ्लौर
२ कांदे
२ टोमाटो
२ वाटी दही
४ चमचे साखर
१/२ चमचा चाट मसाला
१/२ चमचा जीरा
१.५ चमचा तिखट
१/२ चमचा हळद
१ चमचा धने पूड
१ चमचा जिरे पूड
१ हिरवी मिरची
१/४ वाटी काजू
१/४ वाटी मनुका
तेल
मीठ

कृती
  • दुधीभोपळा आणि गाजर किसून घेणे.
  • तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.
  • त्यात किसलेला दुधीभोपळा आणि गाजर घालुन सारखे हलवत सुकेपर्यंत शिजवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात कांदा भाजणे व बाजूला ठेवणे
  • मिक्सरमध्ये टोमाटो, तिखट, जीरा पूड, धने पूड आणि मीठ वाटून घेणे
  • त्यात शिजवलेला कांदा घालुन बारीक वाटणे.
  • दुधीभोपळ्याच्या मिश्रणात बेसन घालुन मऊ पीठ भिजवणे.
  • मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून त्यात काजू, मनुका आणि बारीक हिरवी मिरचीचे तुकडे घालणे.
  • कोफ्ता तेलात गुलाबी रंगावर तळून घेणे.
  • कढईत वाटलेली पेस्ट, ३ वाटी पाणी घालुन ५-६ मिनिट उकळवणे.
  • त्यात कोफ्ता घालुन अजून थोडा वेळ उकळवणे.
  • एका भांड्यात दही, साखर आणि चाट मसाला एकत्र करणे.
  • वाढताना वाटीत कोफ्ता आणि त्याची कढी घालणे. त्यावर दही पसरवणे व किसलेले गाजर, काजू, मनुका घालुन देणे.

टीप
गाजराच्याऎवजी कच्चे केळेपण वापरता येईल

व्हेजिटेबल स्टर फ्राय


माझ्याकडे फ्रीजमध्ये बऱ्याच भाज्या होत्या. आज जेवणासाठी काहीतरी पटकन बनणारे आणि तरीसुद्धा चविष्ठ बनवायचा बेत होता. इंडो चाईनीज माझा आवडता पदार्थाचा प्रकार असल्यानी मी हा पदार्थ बनवला.

व्हेजिटेबल स्टर फ्राय
साहित्य
मुठभर भेंडी
मुठभर वांग्याचे तुकडे
मुठभर कोबी
१ वाटी घेवडा
१ कांदा
१ ढोबळी मिरची
२ कांद्याची पात
६ लसूण पाकळ्या
१ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा आले पेस्ट
१/२ लिंबू
५ चमचे सोया सॉस
१ चमचा सॉस
२ चमचे कॉर्न फ्लौर
मीठ
तेल

कृती
  • भेंडी तेलात तळून घेणे.
  • कांदासुद्धा पातळ होईपर्यंत भाजून घेणे.
  • त्यात लसूण पाकळ्या, वांग्याचे तुकडे, घेवडा, ढोबळी मिरची, कोबी घालुन सारखे परतत शिजवणे.
  • त्यात तळलेली भेंडी, लसूण पेस्ट, आले पेर्स्त आणि लिंबू घालुन ढवळणे.
  • त्यात सॉस आणि सोया सॉस घालुन २ मिनिट शिजवणे.
  • कॉर्न फ्लौर ६ वाटी पाण्यात घालुन भाज्यांमध्ये घालणे आणि दाट होईपर्यंत शिजवणे
  • मीठ आणि कण्याची पात घालुन अजून एक मिनिट शिजवणे व गरम गरम भाताबरोबर किंवा नुडल्स बरोबर खायला देणे.

टीप
थोडा आंबटपणा देण्यासाठी मी लिंबू वापरला पण जर आंबटपणा नको असेल तर लिंबू नाही घातला तरी चालू शकेल. लिंबाच्याऎवजी व्हिनेगरपण चालेल.
माझ्याकडे बेबीकॉर्न नव्हते पण ते असतील तर ते पण घालता येतील

चिली कोळंबी


आज मला कोळंबीचे काहीतरी लवकर बनणारे पण नेहमीच्या कोळंबी मसाल्यापेक्षा वेगळे काहीतरी बनवायचे होते. आणि मी हा पदार्थ बनवला.

चिली कोळंबी
साहित्य
३०० ग्राम कोळंबी
१ चमचा लसूण पेस्ट
१ कांदा
४ हिरव्या मिरच्या
४ चमचे सोया सॉस
२ चमचे टोमाटो सॉस
२ चमचे कॉर्न फ्लौर
मीठ
तेल

कृती
  • कोळंबीला लसूण पेस्ट आणि मीठ लावून ठेवणे.
  • तेलात तव्यावर कोळंबी १ मिनिट भाजून घेणे.
  • त्याच तेलात उभ्या कापलेल्या मिरच्या, कांदा घालुन सारखे ढवळत शिजवणे.
  • त्यात सोया सॉस, टोमाटो सॉस घालुन अजून २ मिनिट शिजवणे.
  • कोळंबी घालुन अजून एक मिनिट शिजवणे.
  • एका वाटी कॉर्न फ्लौर आणि २ वाटी पाणी घालणे व एकत्र करणे. कोळंबीमध्ये घालुन ३-४ मिनिट शिजवणे.

टीप
माझ्याकडे कांद्याची पात नव्हती त्यामुळे मी तो घातला नाही पण वरून त्याचे पाने कापून घातले तर अजून चांगले वाटेल.

खिमा अंडी मसाला


आमच्या तात्पुरत्या राहण्याच्या घरातून, भाड्याच्या घरात जायच्या आधी माझ्याकडे बरेच खाण्याचे सामान उरलेले. आणि खूप सारे सामान हलवायचे नसल्यानी काहीतरी बनवण्याच्या प्रयत्नातून हि पाककृती तयार झाली.

खिमा अंडी मसाला
साहित्य
४५० ग्राम खिमा
४ टोमाटो
२ कांदे
३ अंडी
१ चमचा गरम मसाला
१.५ चमचा तिखट
१ चमचा हळद
१/४ चमचा मिरे पूड
२-३ दालचिनी
१/४ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा धने पूड
चिमुटभर जिरे पूड
कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • अंडी उकडून घेणे व बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करणे व त्यात खिमा घुवून घालणे व गुलाबी रंगावर तेल सुटेपर्यंत भाजणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात मिरे पूड, दालचिनी घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण पेस्ट, आले पेस्ट घालुन भाजणे.
  • हळद, १ चमचा तिखट, गरम मसाला, धने पूड आणि जिरे पूड घालुन एकत्र करणे व २-३ मिनिट भाजणे व नंतर थंड करणे.
  • मिश्रण मिक्सरमध्ये घालुन बारीक वाटणे.
  • कढईत चमचाभर तेल घालुन वाटलेले मिश्रण, बारीक चिरलेला टोमाटो घालुन शिजवणे.
  • त्यात १/४ वाटी पाणी, मीठ आणि भाजलेला खिमा घालुन पूर्ण शिजेपर्यंत व सुकेपर्यंत शिजवणे
  • अंडी किसने व त्यात हळद, तिखट आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • खिमा वाढताना त्यावर वरील अंड्याचे मिश्रण व बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन खायला देणे.

टीप
किसलेल्या अंड्यांच्याऎवजी चीज किवा पनीरपण वापरता येईल.

चिली पनीर


मला चायनीज फार आवडते आणि बरेच दिवस झाले मी ते खाऊन. थोड्या दिवसांपूर्वी आम्ही खालेल पण ते इतका छान नव्हता त्यामुळे ते न मोजलेलच बर. त्यामुळे काल मी स्वतःच करून बघायचा ठरवलं. ह्या आधी केलेलं चांगल झालेलं किंतु सगळ्यात चांगला नव्हत. आज एकदम छान झालेलं असल्यानी त्याची कृती देत आहे

चिली पनीर
साहित्य
४०० ग्राम पनीर
१ कांदा
६ मिरच्या
१५ लसूण पाकळ्या
चिमुटभर मिरे पूड
२ चमचा डार्क सोया सॉस
१ चमचा टोमाटो सॉस
१ चमचा कॉर्न फ्लौर
२-३ कांद्याच्या पाती
मीठ
तेल

कृती
  • पनीर चौकोनी कापून त्याला कढईत गरम तेलावर गुलाबी रंगावर भाजून घेणे.
  • त्याच तेलात कांदा भाजणे.
  • त्यात मिरच्या आणि लसूण कापून घालणे व भाजणे.
  • मिरे पूड, सोया सॉस घालुन थोड्यावेळ ढवळणे
  • आता त्यात भाजलेले पनीर आणि टोमाटो सॉस घालुन २-३ मिनिट शिजवणे.
  • कॉर्न फ्लौर एका वाटी पाण्यात एकत्र करून शिजणाऱ्या पनीरमध्ये घालणे
  • लागल्यास अजून थोडे पाणी घालुन झाकणी लावून ३ मिनिट शिजवणे.
  • वरून काड्याची पात चिरून घालणे व वाढणे.

टीप
मी मिरच्या उभ्या चिरून घातल्या त्यामुळे एकदम हॉटेलच्या डीशसारखे दिसते
पनीर भाजताना त्याला हलका गुलाबी रंग आला की लगेच बाहेर काढणे, जास्त भाजल्यानी ते सुकून तडतडीत होण्याची शक्यता असते
स्टारटर सारखे वापरायचे असेल तर थोडे कमी पाणी वापरणे म्हणजे सुके होईल

कोफ्ता करी


जेंव्हा जेंव्हा आम्ही दुधी भोपळा आणतो तेंव्हा अजॉय हा कोफ्ता बनवायला सांगतो. काल मी शेवटी बनवला आणि इथे कृती देत आहे

कोफ्ता करी
साहित्य
४ वाटी किसलेला दुधी भोपळा
१.५ वाटी बेसन
२ टोमाटो
१ कांदा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा जीरा
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा आमचूर पूड
१/४ चमचा धने पूड
कोथिंबीर
मीठ

कृती
  • किसलेल्या दुधी भोपळ्याला मीठ लावणे व बाजूला ठेवणे.
  • पिळून सुटलेले पाणी वेगळे करून त्यात १/२ चमचा जीरा, १/२ चमचा तिखट, गरम मसाला आणि आमचूर पूड घालणे.
  • लिंबाच्या आकाराचे गोळे करून तेलात मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.
  • त्यात बारीक चिरून कांदा, लसूण पेस्ट घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • त्यात हळद, उरलेली तिखट, धने पूड आणि मीठ घालणे.
  • टोमाटो घालुन पूर्णपणे शिजवणे. पाणी घालुन उकळी आणणे.
  • मिश्रण मिक्सरमध्ये मिश्रण घालुन बारीक वाटणे.
  • कढईत वाटण व पाणी घालुन त्यात कोफ्त्याचे गोळे घालुन उकळी आणणे.
  • वरून कोथिंबीर घालुन वाढणे.

टीप
मी कोफ्त्याला मसालेदार बनवले आणि ग्रेव्ही थोडी कमी मसालेदार ठेवली त्यामुळे कोफ्त्याची जास्त मजा येते.

भरलेले पनीर


पनीर बनवण्यासाठी मी थोड्या वेगवेगळ्या कृती शोधत होते आणि हि पनीर पसंदाची कृती मिळाली. मला हि कशी बनवतात हे फार आवडले आणि त्यावर प्रभावित होऊन मी हे बनवलेय.

भरलेले पनीर
साहित्य
४०० ग्राम पनीर
२ चमचे मनुके
१/४ चमचा कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा मैदा
१/२ चमचा कॉर्न फ्लौर
२ टोमाटो
१/२ चमचा जीरा
१/४ चमचा म्हवरी
१/२ चमचा हळद
१ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
१/४ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/२ चमचा कसुरी मेथी
१ चमचा क्रीम
मीठ
तेल

कृती
  • पनीर त्रिकोणी मध्य्रम आकारात कापणे
  • ३ तुकडे किसणे व त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मनुका घालुन एकत्र करणे.
  • बाकीच्या तुकड्यांना चिरा देणे.
  • त्यात आधी बनवलेलं मिश्रण घालुन बाजूला ठेवणे.
  • मैदा, कॉर्न फ्लौर आणि पाणी एका भांड्यात एकत्र करून पातळ पीठ भिजवणे.
  • त्यात पनीरचे भरलेले तुकडे घालुन तेल गरम करून त्यात गुलाबी रंग येईपर्यंत हे तुकडे तळणे.
  • त्याच तेलात म्हवरी आणि जिरे टाकून फोडणी करणे.
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन शिजवणे.
  • तिखट, जिरे पूड, धने पूड, हळद, गरम मसाला घालुन परतणे.
  • मिश्रण थंड करून त्यात कसुरी मेथी घालुन बारीक वाटणे.
  • त्याच कढईत हे वाटण आणि पाणी घालुन उकळवणे. तळलेले पनीरचे तुकडे घालुन उकळी आणणे.
  • त्यात मीठ आणि क्रीम घालुन अजून एक मिनिट उकळवणे.

टीप
कसुरी मेथी मी वाटण भाजायच्या आधी न घालता वाटली त्यामुळे एक विशिष्ठ चव आली.

बटर चिकन


हॉटेलमधील एक अतिशय आवडती डीश. साधारण महिन्यापूर्वी केलेला पण फोटो काढून पोस्ट करण्याची ताकद उरली नव्हती त्यामुळे आज पुन्हा हि डीश केल्यावर इथे देत आहे

बटर चिकन
साहित्य
३०० ग्राम बोनलेस चिकन
२ टोमाटो
१ कांदा
१.५ चमचा तिखट
२ चमचा धने पूड
१ चमचा कसुरी मेथी
१ चमचा जीरा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
चिमुटभर लाल रंग
१/२ चमचा साखर
१/४ चमचा टोमाटो सॉस
१ वाटी क्रीम
४ चमचा लोणी
मीठ
तेल

कृती
  • चिकनचे तुकडे करणे व त्यांना मीठ, तिखट, धने पूड, १/४ चमचा लसूण पेस्ट आणि १/४ चमचा आले पेस्ट लावणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात चिकनचे तुकडे ४-५ मिनिट परतणे.
  • त्याच तेलात जीऱ्याची फोडणी करणे व त्यात बारीक चिरलेला कांदा, कसुरी मेथी, उरलेली लसूण पेस्ट, आले पेस्ट, तिखट, धने पूड घालणे.
  • त्यात तेल घालुन उकळवणे.
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन ते पूर्ण शिजेपर्यंत उकळवणे व नंतर बारीक वाटणे.
  • कढईत लोणी वितळवणे व त्यात वाटण व मीठ घालणे.
  • त्यात १/२ वाटी पाणी, लाल रंग घालुन उकळवणे.
  • त्यात साखर, सॉस आणि परतलेले चिकनचे तुकडे घालुन उकळवणे.
  • आच मंद करून त्यात क्रीम घालुन अजून ४-५ मिनिट शिजवणे.

टीप
क्रीम घालताना आच धीमी करायला विसरू नये नाही तर मिश्रण व्यवस्थित एकत्र होणार नाही

कोळंबी मसाला


कोळंबी हा माझा सगळ्यात जास्त आवडता प्रकार. पण मा जो कोळंबीचा मसाला बनवतात तो तर एकदमच जास्त आवडता, अगदी तळलेल्या कोळंबीपेक्षा सुद्धा.

कोळंबी मसाला
साहित्य
४०० ग्राम कोळंबी
२ कांदे
२ टोमाटो
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१ चमचा तिखट
१ चमचा हळद
किसलेले खोबरे
मीठ
तेल

कृती
  • कढईत तेल गरम करणे.
  • त्यात कोळंबी घालुन १-२ मिनिट भाजून घेणे व बाजूला ठेवून देणे.
  • त्याच तेलात बारीक चिरलेला कांदा भाजणे.
  • कांदा शिजल्यावर त्यात लसूण पेस्ट, आले पेस्ट, तिखट आणि हळद घालुन पुन्हा भाजणे.
  • त्यात बारीक चिरलेले टोमाटो घालुन २-३ मिनिट शिजवणे.
  • त्यात पाणी घालुन झाकणी लावून पूर्णपणे शिजवणे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे.
  • कढईत वाटलेले मिश्रण आणि एक वाटी पाणी घालणे. त्यात कोळंबी घालुन पूर्णपणे शिजवणे.
  • त्यात किसलेले खोबरे आणि मीठ घालुन अजून एक मिनिट शिजवणे.

टीप
मां मिक्सरमध्ये वाटून नाही घेत व त्याऎवजी टोमाटो पूर्ण शिजवून घेते पण मला वाटलेली ग्रेव्ही जास्त बरी वाटते त्यामुळे कांद्याची चवपण त्यात येते.

खिमा मटार


हि अजॉयची आवडती डीश. आम्ही जिथे जातो तिथे त्याला खिमा मटार खायचा असतो. काल सुद्धा त्याला पापलेट आणायला सांगितलेले ते नाही मिळाले तर त्यानी खिमा आणला. आज इथे त्याची कृती देत आहे

खिमा मटार
साहित्य
१/४ किलो खिमा
१.५ वाटी मटार
३ टोमाटो
३ कांदे
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
२ चमचा तिखट
२ चमचा गरम मसाला
१/२ चमचा हळद
१/२ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
२-३ कोथिंबीर पाने
मीठ
तेल

कृती
  • एक वाटी पाणी घालुन खिमा कुकरमध्ये शिजवून घेणे.
  • कढईत २-३ चमचे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालुन परतणे.
  • त्यात लसूण आणि आले पेस्ट घालुन अजून थोडा वेळ शिजवणे.
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन पुराना शिजेपर्यंत परतणे.
  • त्यात हळद, तिखट, गरम मसाला, धने पूड आणि जीरा पूड घालुन ढवळणे व एक दोन मिनिट शिजवणे.
  • मिश्रण थंड करून मिक्सर मध्ये थोडेसे पाणी घालुन बारीक वाटणे.
  • चमचाभर तेल कढईत गरम करून त्यात वाटण घालुन चांगले परतणे
  • त्यात शिजवलेला खिमा, मटार, मीठ आणि वाटीभर पाणी घालुन सारखे ढवळत मिश्रण जाड होईपर्यंत शिजवणे.
  • त्यावर कोथिंबीर घालुन खायला देणे.

टीप
आजकाल मिळणाऱ्या फ्रोझन खिम्या पेक्षा ताजा जास्त चांगला लागतो.
मी मटणाचा खिमा वापरला पण चिकनचा खिमा सुद्धा वापरायला हरकत नाही

पनीर पेशावरी


हा आमचा सी एम एच रोडवरच्या गोकुळ नावाच्या हॉटेलमधला एकदम आवडता पदार्थ. मी हि भाजी आता बऱ्याच वेळापासून बनवत आली आहे पण लग्नानंतर कधीच बनवली नव्हती असे लक्षात आल्यावर काल रात्रीच्या जेवणासाठी बनवली

पनीर पेशावरी
साहित्य
२००ग्राम पनीर
२ कांदे
३ टोमाटो
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा हळद
१ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा जिरे पूड
१ चमचा धने पूड
मीठ
तेल

कृती
  • पनीर किसून घेणे. कांदा आणि टोमाटो बारीक चिरणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात कांदे परतणे.
  • कांदे गुलाबी झाल्यावर त्यात आले आणि लसूण पेस्ट घालुन परतणे.
  • त्यात हळद, तिखट, गरम मसाला, जिरे पूड, धने पूड घालुन परतणे.
  • टोमाटो घालुन ते शिजवणे व मिश्रण थंड करणे.
  • मिश्रण मिक्सरमध्ये वाटून त्यात पाणी घालुन पुन्हा कढईत घालणे.
  • त्यात पनीर आणि मीठ घालुन जाड होई पर्यंत शिजवणे.

टीप
ह्यात थोडी ढोबळी मिरची पण घालता येईल पण आम्हा दोघांना त्याची फारशी आवड नसल्यानी मी नाही वापरली

चिकन बिर्याणी आणि शेंगदाणा ग्रेव्ही


मी ह्या आधी कधी चिकन बिर्याणी बनवली नव्हती त्यामुळे खूप शोधाशोध केली आणि आमच्या कडे येणाऱ्या काम वाल्या बाईना पण विचारले आणि हि बिर्याणी बनवली.

चिकन बिर्याणी

चिकन बिर्याणी
साहित्य
१/२ किलो चिकन
४ वाटी तांदूळ
१ वाटी दुध
१ वाटी दही
२ कांदे
१/२ वाटी टोमाटो प्युरी
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा आले पेस्ट
३ चमचे हळद
३ चमचे तिखट
२ चमचे धने पूड
१ चमचा जिरे पूड
१ चमचा वेलची पूड
चिमुटभर केशर
मीठ
तेल

कृती
  • कढईत तेल गरम करणे व त्यात कांदा परतणे.
  • त्यात टोमाटो प्युरी घालुन शिजवणे.
  • त्यात लसूण पेस्ट, आले पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा हळद, १ चमचा तिखट, १ चमचा धने पूड, १/२ चमचा जिरे पूड घालून परतणे.
  • त्यात दही आणि मीठ घालुन थोडावेळ शिजवणे.
  • त्यात चिकनचे तुकडे घालुन ग्रेव्ही सुकेपर्यंत शिजवणे व बाजूला ठेवणे.
  • ४ वाटी तांदूळ, दुध आणि केशर एकत्र करून शिजवणे.
  • तूप गरम करून त्यात वेलची पूड, हळद, तिखट, गरम मसाला, धने पूड आणि जिरे पूड घालणे
  • त्यात शिजवलेला भात आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • कुकरमध्ये भाताचा एक थर देणे त्यावर शिजवलेले चिकन आणि त्यावर उरलेला भात असे थर लावून कुकर बंद करून एक दोन मिनिट वाफ काढणे.

टीप
मला मसाले शिजवून त्यावर तांदूळ परतून मग भात बनवायला सांगितलेले पण मला शिजवलेल्या भाताला परतणे जास्त चांगले वाटते, मसाल्यांचा वास भातात शिल्लक राहतो.

शेंगदाणा ग्रेव्ही

शेंगदाणा ग्रेव्ही
साहित्य
१/२ वाटी शेंगदाणा कुट
२ टोमाटो
१ चमचा गरम मसाला
१ चमचा हळद
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा जिरे पूड
मीठ
तेल

कृती

  • तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे.
  • टोमाटो शिजले की त्यात तिखट, जीरा पूड, धने पूड आणि गरम मसाला घालुन परतणे.
  • त्यात शेंगदाणा कुट आणि मीठ घालुन पुन्हा परतणे.
  • मिश्रण एकदम सुका गोळा होईल त्याला तसेच १-२ मिनिट परतणे व नंतर पाणी घालुन जाड घेव्ही उकळवणे.

टीप
हि ग्रेव्ही जास्त तिखट नाही केलीये पण रायता भरपूर असेल तर थोडी जास्त मसालेदार आणि तिखट करायला हरकत नाही

मटार पनीर


मला पनीर फार आवडते त्यापैकी हि माझी एक आवडती कृती.

मटार पनीर
साहित्य
२०० ग्राम पनीर
१ वाटी मटार
४ टोमाटो
२ कांदे
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा आलं पेस्ट
१/२ चमचा हळद
१.५ चमचा तिखट
१.५ चमचा जिरे पूड
१ चमचा धने पूड
१/२ चमचा गरम मसाला
कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • कढईत पनीर मध्यम आचेवर तळून घेणे.
  • कांदे पण गुलाबी होईपर्यंत भाजून बाजूला ठेवणे.
  • मटार पाण्यात शिजवून बाजूला ठेवणे.
  • मिक्सरमध्ये टोमाटो, आणि शिजवलेला कांदा घालुन वाटून घेणे.
  • कढईत तेल घालुन त्यात वाटलेले मिश्रण घालणे.
  • त्यात हळद, तिखट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला, आले आणि लसूण पेस्ट घालुन चांगले ढवळणे.
  • मिश्रण ५-६ मिनिट शिजवणे आणि लागल्यास थोडे पाणी घालणे.
  • त्यात पनीरचे तुकडे, मटार आणि मीठ घालुन पुन्हा २-३ मिनिट शिजवणे. चिरलेली कोथिंबीर घालुन खायला देणे.

टीप
पनीर मऊ करण्यासाठी, तळलेले पनीर गरम पाण्यात घालुन पनीर खाली जाऊ देणे आणि मग त्याचा वापर करणे.

डिमेर ढोका


ही बंगाली पाककृती मी इंटरनेटवर सर्फ करत असताना बघितली आणि माझ्या चवीनुसार थोडीफार बदलली. बंगालीमध्ये डीम म्हणजे अंड आणि ढोका म्हणजे ढोकळा. ही अंड्याच्या ढोकळ्याची ग्रेव्ही. पण असे असताना सुद्धा नुसता अंड्याचा ढोकळा पण खूप चविष्ट लागतो आणि नाश्त्याला छान लागतो.

ढोका

डिमेर ढोका
साहित्य
६ अंडी
१ छोटा कांदा
१/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३-४ मिरच्या बारीक चिरून
१ चमचा आलं पेस्ट
३ चमचे दुध
चिमुटभर बेकिंग पावडर
मीठ

कृती
  • एका भांड्यात अंड फेसून घ्या
  • त्यात बारीक चिरून कांदा, मिरची, कोथिंबीर, आलं पेस्ट, बेकिंग पावडर, दुध आणि मीठ घालुन ढवळणे.
  • तेल लावलेल्या भांड्यात हे मिश्रण घालुन कुकर मध्ये शिट्टी न लावता उकडणे
  • पूर्णपणे ढोकळा शिजल्यानंतर कुकरमधून काढून लाडेच ताटात काढणे.
  • चौकोनी तुकडे करून वाढणे किंवा ग्रेव्हीसाठी बाजूला ठेवणे


ग्रेव्ही

डीमेर ढोका ग्रेव्हीमध्ये
साहित्य
२-३ मध्यम आकाराचे कांदे
३-४ टोमेटो
१ चमचा मौव्हरी आणि जीरा
१ चमचा आलं पेस्ट
१ चमचा लसूण पेस्ट
१/२ वाटी दही (इच्छेनुसार)
२ चमचा जीरा पूड
२ चमचा धने पूड
२ वाटी पाणी
१ चमचे साखर
१ चमचा तिखट
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
कोथिंबीर
मीठ
तेल

कृती

  • कांदा आणि टोमेटो वेगळे वेगळे मिक्सरमध्ये वाटून घेणे
  • कढईमध्ये तेल गरम करून मौव्हरी आणि जीरा घालणे
  • फोडणीझाल्यावर त्यात वाटलेला कांदा आणि साखर घालुन सारखे हलवत तेल वेगळे होईपर्यंत शिजवणे.
  • त्यामध्ये वाटलेला टोमेटो, आलं आणि लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या घालणे. टोमेटो शिजेपर्यंत ढवळत शिजवावे
  • तोपर्यंत एका वाटीमध्ये दही, जीरा पूड, धने पूड आणि तिखट एकत्र करणे
  • टोमेटो शिजल्यावर कधी आचेवरून बाजूला काढून त्यात दह्याचे मिश्रण घालणे.
  • व्यवस्तीथ हलवून पुन्हा मंद आचेवर ठेवणे.
  • ग्रेव्ही पूर्णपणे तयार होईपर्यंत सारखे हलवत, जरूर पडल्यास पाणी घालुन शिजवणे.
  • डीमेर ढोका आणि मीठ घालुन एक उकळी काढणे. कोथिंबीर बारीक चिरून घालणे.

टीप
अंड्याच्या ढोकळ्यामध्ये टोमेटो बारीक चिरून घालता येईल पण मला अंड्याबरोबर टोमेटो बिलकुल आवडत नाही त्यामुळे मी नाही घातला.
६ अंड्यापासून अंदाजे २० ढोकळे तयार होतात
पहिल्यांदा जेंव्हा मी ही ग्रेव्ही केली होती तेंव्हा मी दही घालुन केलेली पण काल मी दही न घालता केली आणि मला ती जास्त छान लागली.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP