लिंबू आणि अ‍ॅप्रिकॉटचा केक


मी अजॉयच्या वाढदिवसासाठी पाउंड केक सारखा पण थोडा जास्त रिच असा केक शोधात होते. त्याला प्लेन केक हा प्रकार फार आवडतो त्यामुळे त्याच्यासारखाच पण थोडा भारी :) असा हा केक मी माझ्याकडच्या एका पुस्तकातील कृती बघून आणि थोडा आमच्या चवीनुसार प्रमाण बदलून केला. मला ह्या केक मध्ये लिंबू नाहीतर संत्र वापरायाचच होत, इतके दिवस फूड नेटवर्कवरच्या कार्यक्रमात त्यांच्या सालीचा वापर करताना बघून प्रत्यक्षात कसा लागत हे जरा जाणून घ्यायचं होत त्यामुळे ह्यात मी लिंबाचा वापर केलाय

लिंबू आणि अ‍ॅप्रिकॉटचा केक
साहित्य
३ वाटी मैदा
१७५ ग्राम अ‍ॅप्रिकॉट
१ वाटी बदाम
१.२५ वाटी पिस्ता
२/३ वाटी उभे चिरलेले बदाम
२ वाटी साखर
१ + १/३ वाटी लोणी
१.२५ चमचा बेकिंग पूड
३ अंडी
१/३ चमचा मीठ
१ मोठं लिंबू

कृती
 • ओव्हन १८०C/३५०F वर गरम करणे.
 • एका मोठ्या भांड्यात लोणी आणि १.५ वाटी साखर एकत्र करून घोटणे.
 • मैदा आणि बेकिंग पूड एकत्र ३-४ वेळा चाळून घेणे व लोणी-साखरेच्या मिश्रणात घालणे.
 • त्यात अंडी, मीठ, लिंबाची साल किसून, १/२ वाटी कोमट पाणी घालुन पुन्हा एकत्र फेटणे.
 • त्यात बारीक चिरलेले अ‍ॅप्रिकॉट, १ वाटी बदाम पूड करून आणि १ वाटी पिस्ता बारीक चिरून अलगद एकत्र करणे.
 • लोफच्या किंवा केक बनवायच्या कुठल्याही आकाराच्या भांड्याला लोण्याचा हात लावून पार्चमेंट कागद खाली व बाजूना लावणे. त्यात केकचे मिश्रण चमच्यानी घालुन एकसारखे करणे.
 • उरलेले पिस्ता आणि चिरलेले बदाम वर घालुन ते अलगद मिश्रणात दाबणे
 • केक ७५ मिनिट १८०C/३५०F वर भाजणे. साधारण ५० मिनिट भाजल्यावर त्यावर अल्युमिनियमचा कागद वरून लावणे व उरलेला वेळ भाजणे.
 • ओव्हनमधून केक बाहेर काढून १० मिनिट थंड होण्यासाठी बाहेर ठेवणे.
 • त्यावेळात मध्यम आचेवर लिंबाचा रस आणि उरलेली साखर एकत्र करून ती विरघळेपर्यंत व त्यानंतर थोडे बुडबुडे येईपर्यंत शिजवणे.
 • मिश्रण गरम असताना केकवर ओतणे व केक अलगद बाहेर काढणे व थंड होण्यासाठी ठेवणे.

टीप
केक भाजताना मध्ये अल्युमिनियमचा कागद लावल्यानी वर लावलेले बदाम आणि पिस्ते जास्त भाजून करपत नाहीत.

स्ट्रॉबेरी आईस्क्रीम


मागच्या आठवड्यात मी जॅम बनवण्यासाठी स्ट्रॉबेरी आणलेल्या. पण त्यावर १-२ तास घालवण्यासाठी वेळ न मिळाल्यानी मी शेवटी त्याचे आईस्क्रीम बनवण्याचे ठरवले. प्रथमच बनवून एकदम असे सगळ्यांना खायला द्यायचे असल्यानी थोडी भीती होती पण सगळ्यांना ते आवडले असल्यानी इथे कृती देत आहे.

स्ट्रॉबेरी आईस्क्रीम
साहित्य
५ वाटी दुध
३.५ वाटी क्रीम
१.५ किलो स्ट्रॉबेरी
४ वाटी साखर
१/२ लिंबू

कृती
 • मिक्सरमध्ये १किलो स्ट्रॉबेरी आणि साखर एकत्र वाटून घेणे व मोठ्या भांड्यात ओतणे.
 • त्यात दुध घालुन चांगले एकत्र करणे.
 • त्यात लिंबू आणि क्रीम घालुन पुन्हा एकजीव होईपर्यंत ढवळणे.
 • आईस्क्रीम मेकर मध्ये मिश्रण जितके मावते तितके एका वेळी घालुन ते सेट होण्यासाठी चालू करणे.
 • उरलेली स्ट्रॉबेरी बारीक चिरून आईस्क्रीम सेट होत आल्यावर घालणे व पूर्ण सेट होऊ देणे
 • आईस्क्रीम भांड्यात काढून एक-दोन तास अजून घट्ट होऊ देणे.

टीप
मी थोडी स्ट्रॉबेरी खायला देताना आईस्क्रीम वर घालण्यासाठी बाजूला ठेवलेली.

साबुदाण्याच्या पोह्याचा चिवडा


हा चिवडा इतका सोपा आणि हमखास चांगला होणारा प्रकार. मी जेंव्हा लहान होते तेंव्हा मला हा चिवडा फार आवडायचा. एकदम हलका, तिखट गोड असा हा चिवडा आता मला आणखीनच आवडतो तो त्याच्या बनवायच्या सोप्या कृती मुळे. मी आता हा नियमित करत जाणार आहे.

साबुदाण्याच्या पोह्याचा चिवडा
साहित्य
१०० ग्राम साबुदाणा पोहे
१ वाटी शेंगदाणे
२.५ चमचा तिखट
१ चमचा जिरे पूड
१ चमचा साखर
१ चमचा मीठ
तेल

कृती
 • मिक्सरमध्ये तिखट, जिरे पूड, साखर, मीठ घालुन बारीक पूड होईपर्यंत वाटून घेणे व मोठ्या भांड्यात घालणे
 • कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे गुलाबी रंगावर तळून घेणे. मसाल्यात घालुन हलवून घेणे.
 • त्याच तेलात थोडे थोडे पोहे घालुन तळणे. प्रत्येक वेळी तळल्या तळल्या लगेच मसाल्यात घालुन हलवणे.

टीप
पोहे तळून झाल्यावर गरम गरमच मसाल्यात घालणे फार महत्वाचे आहे नाहीतर मसाला त्यांना नीट लागत नाही.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP