कलिंगड स्प्लॅश


आजच्या जेवणानंतर मला कलिंगडाच काहीतरी नवीन बनवण्याचं मन केल आणि त्यातूनच ही ज्यूसची पाककृती आली.

कलिंगड स्प्लॅश
साहित्य
१/२ कलिंगड
२ मोठे लिंबू
४ चमचे साखर
६-७ पुदिना पानं
१/४ चमचे चाट मसाला
१/४ चमचे जिरे पूड
चिमुटभर मिरे पूड
मीठ चवीनुसार

कृती
  • कलिंगड चिरून मिक्सरच्या भांड्यात घालणे
  • त्यात लिंबू रस, साखर, पुदिना पानं, मीठ, जीरा पूड, चाट मसाला घालणे
  • मिक्सरमध्ये ज्यूस चांगला वाटून घेणे
  • ज्यूस ग्लासमध्ये ओतून त्यावर मिरे पूड शिंपडणे. ज्यूस थंड होण्यासाठी ठेवून देणे.
  • वरून पुदिना पानं आणि कलिंगडाचे गोळे घालुन प्यायला देणे.

टीप
ज्यूस लवकर थंड होण्यासाठी मी १० मिनिट त्याला फ्रीजरमध्ये ठेवून दिला. त्याऎवजी थंड कलिंगड वापरल तर १० मिनिटपण वाट बघावी लागणार नाही :)
मी बीनबियांचे कलिंगड वापले त्यामुळे मला बिया वेगळे काढण्याचे कष्ट घ्यावे नाही लागले.

चॉकलेट केक


ह्या आठवड्यात मला २ केक बनवायचे होते. एक फॉनडन्टच्या क्लाससाठी आणि एक फुलांच्या क्लाससाठी. हा केक मी फुलांनी सजवण्यासाठी बनवला. मला तो पांढऱ्या फुलांनी सजवायचा होता पण माझा आईसिंग जरा खराब झाल, मग मी हा केक महिनाभर क्लासमध्ये शिकताना बनवलेल्या फुलांनी सजवला. इथे हि सोपी केकची पाककृती देत आहे.

चॉकलेट केक
साहित्य
१.५ वाटी मैदा
१ वाटी लोणी
१ वाटी साखर
१ चमचा कोको पूड
१ स्पून बेकिंग पूड
३ अंडी

कृती
  • ओव्हन ३२५F/१६०C वर गरम करणे
  • मैदा, कोको पूड आणि बेकिंग पूड चाळून एका भांड्यात घेणे
  • त्यात लोणी वितळवून, साखर आणि अंडी घालुन चांगले फेटून घेणे.
  • केकच्या भांड्याला तेल किंवा लोणी लावून त्यात केकचे मिश्रण घालणे
  • केक ३२५F/१६०C वर भाजणे
  • ओव्हनमधून केक बाहेर काढून ५ मिनिट थंड करणे. त्यानंतर केक तटावर काढून पूर्णपणे थंड करणे

टीप

मी हा केक दोनवेळा आयताकृती भांड्यात बनवला. दोन केकच्यामध्ये चॉकलेट वितळवून घालुन तो जोडला व उंच बनवला. त्यावर चॉकलेटचे बटर आईसिंग आणि रॉयल आईसिंगची फुलं लावून सजवला.

प्लेन केक


मी हा सोपा केक माझ्या फॉनडन्ट केक डेकोरेशन कलाससाठी बनवलेला. चवीला उत्तम अगदी आईसिंग बरोबर किंवा तसाच

प्लेन केक
साहित्य
५ वाटी मैदा
२.५ वाटी लोणी
२.५ वाटी साखर
२ चमचे बेकिंग पूड
१.५ चमचे लिंबू रस
४ अंडी

कृती
  • ओव्हन ३२५F/१६०C वर गरम करणे
  • मैदा आणि बेकिंग पूड चाळून एका भांड्यात घेणे
  • त्यात साखर, लोणी वितळवून, लिंबू रस, आणि अंडी घालुन फेटणे.
  • केकच्या भांड्याला तेल किंवा लोणी लावून त्यात केकचे मिश्रण घालणे
  • केक ३२५F/१६०C वर भाजणे
  • ओव्हनमधून केक बाहेर काढून ५ मिनिट थंड करणे. त्यानंतर केक तटावर काढून पूर्णपणे थंड करणे. असाच किंवा आईसिंग करून वाढणे

टीप
केक असाच खाताना बरोबर लागत होता पण आईसिंग केलेला थोडा जास्त गोड लागत होता. त्या मुळे पुढच्यावेळी मी जर आईसिंग करणार असेल तर थोडी साखर कमी वापरेन

भरली भेंडी


ही पाककृती मी एकंदर ८ महिन्यांपूर्वी आईकडून मागून घेतलेली पण आज ही भाजी बनवण्याचा मुहूर्त आला. हा माझा भेंडीचा सगळ्यात आवडता भाजी प्रकार म्हणूनच इथे पाककृती देत आहे.

भरली भेंडी
साहित्य
१/२ किलो भेंडी
१.५ वाटी किसलेले खोबरे
१/२ चमचा बडीशेप
१/४ चमचा मौव्हरी
१/४ चमचा गरम मसाला
३/४ चमचा तिखट
१ वाटी दही
चिमुटभर हिंग
चिमुटभर साखर
मीठ चवीपुरतं
तेल

कृती
  • भेंडी धुवून त्याचे उभे तुकडे करणे
  • एका भांड्यात दही, खोबरे, तिखट, गरम मसाला आणि १/४ चमचा बडीशेप एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून मौव्हरी, उरलेली १/४ चमचा बडीशेप घालुन फोडणी करणे
  • त्यात हिंग, चिरलेली भेंडी आणि दही-खोबरे-मसाला मिश्रण घालुन नीट एकत्र करणे.
  • कढईवर ताट झाकून ताटावर थोडे पाणी घालणे. असेच बेताचे शिजेपर्यंत धीम्या आचेवर ठेवणे. अधून मधून हलवणे ज्यानीकरून भजी करपणार नाही
  • त्यात साखर आणि मीठ घालुन भाजी पूर्णपणे शिजवणे.

टीप
ही भाजी ताज्या कवळ्या भेंडीची केली तर उत्तम होते. जर भेंडी जून असेल तर भाजीची चव जमून येत नाही

रस मलई


अजॉयनी दसऱ्यासाठी रस मलईची फर्माईश केलेली पण त्यादिवशी घरात जास्त दुध नसल्यानी आणि ते त्यांनी खूप उशिरा आणून दिल्यानी दसऱ्यासाठी काही मी रस मलई नाही बनवू शकले. पण काल मी ती बनवण्याचा घाट घातला. एकदम उत्तम झालेली ही रस मलईची पाककृती इथे देत आहे.

रस मलई
साहित्य
२ लिटर दुध
२ चमचे व्हिनेगर
१ चिमुटभर केशर
१/४ चमचा वेलची पूड
१/४ वाटी बदाम
१/४ वाटी पिस्ता
३ वाटी साखर

कृती
  • १ लिटर दुध उकळवायला ठेवणे
  • अर्ध्यावाटी पाण्यात व्हिनेगर घालुन ते हळूहळू उकळत्या दुधात घालुन ढवळणे.
  • पनीर वेगळे झाले की लगेच पंचावर ओतून पाणी गळून टाकावे. थंडपाण्याखाली हे पनीर ठेवून त्यातली व्हिनेगरची चव निघेपर्यंत नीट धुवून घ्यावे. पंचा घट्ट बांधून पाणी गाळण्यासाठी १-२ तास लटकवून ठेवणे.
  • दुसऱ्या पसरट भांड्यात उरलेले एक लिटर दुध उकलावायला ठेवणे. अर्धे होईपर्यंत सारखे ढवळत उकळवणे.
  • त्यात केशर आणि अर्धी वाटी साखर घालुन अजून २-३ मिनिट उकळवणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • एका मोठ्या पसरट भांड्यात किंव्हा कुकरमध्ये १.५ लिटर पाणी आणि उरलेली २.५ वाटी साखर घालुन उकळवणे.
  • परातीत पाणी गळून गेलेले पनीर घेऊन चांगले एकजीव होईपर्यंत मळणे. ह्या पनीरचे छोटे पसरट चपटे गोळे बनवून ते उकळत्या पाण्यात सोडणे. भांड्यावर झाकण लाऊन (कुकर असेल तर त्याला शिट्टी न लावता) १० मिनिट मोठ्या आचेवर शिजू देणे
  • आच बंद करून ५ मिनिट तसेच थंड होऊ देणे व नंतर झाकण काढून कोमट होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • आता एक एक गोळा तळहातावर घेऊन अलगद दाबून त्यातले साखरेचे पाणी काढून टाकणे. असे सगळे गोळे एका भांड्यात टाकणे.
  • आधी बनवलेल्या दुधात वेलची पूड आणि बारीक चिरलेले पिस्ता आणि बदाम घालणे. ते दुध तयार केलेल्या गोळ्यांच्या भांड्यात टाकून थंड करायला ठेवून देणे.

टीप
मी बदाम अर्ध्या वाटी पाण्यात २ तास भिजवून मग चिरले. चिरणे खूप सोपे होते.
१ लिटर दुध आटवण्याऎवजी अर्धा लिटर हाल्फ अ‍ॅन्ड हाल्फ वापरता येईल.
माझ्याकडे मोठा कुकर किंवा भांडे नसल्यानी मी अर्धे गोळे शिजवून घेतले. मग कुकरमध्ये अजून २ वाटी पाणी घालुन उरलेले अर्धे गोळे शिजवले. गोळे मऊ होण्यासाठी साखरेचे पाणी पातळ असणे महत्वाचे आहे. तसेच भांड्यात गोळ्यांना फुलण्यासाठी जागा असली पाहिजे

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP