Showing posts with label पोहे. Show all posts
Showing posts with label पोहे. Show all posts

साबुदाण्याच्या पोह्याचा चिवडा


हा चिवडा इतका सोपा आणि हमखास चांगला होणारा प्रकार. मी जेंव्हा लहान होते तेंव्हा मला हा चिवडा फार आवडायचा. एकदम हलका, तिखट गोड असा हा चिवडा आता मला आणखीनच आवडतो तो त्याच्या बनवायच्या सोप्या कृती मुळे. मी आता हा नियमित करत जाणार आहे.

साबुदाण्याच्या पोह्याचा चिवडा
साहित्य
१०० ग्राम साबुदाणा पोहे
१ वाटी शेंगदाणे
२.५ चमचा तिखट
१ चमचा जिरे पूड
१ चमचा साखर
१ चमचा मीठ
तेल

कृती
  • मिक्सरमध्ये तिखट, जिरे पूड, साखर, मीठ घालुन बारीक पूड होईपर्यंत वाटून घेणे व मोठ्या भांड्यात घालणे
  • कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे गुलाबी रंगावर तळून घेणे. मसाल्यात घालुन हलवून घेणे.
  • त्याच तेलात थोडे थोडे पोहे घालुन तळणे. प्रत्येक वेळी तळल्या तळल्या लगेच मसाल्यात घालुन हलवणे.

टीप
पोहे तळून झाल्यावर गरम गरमच मसाल्यात घालणे फार महत्वाचे आहे नाहीतर मसाला त्यांना नीट लागत नाही.

जाड पोह्याचा चिवडा


चिवडा हा सगळ्यांची कमजोरी आहे :) ह्या प्रकारचा चिवडा आमच्या घरी फार वेळा करतात, पातळ पोह्यापेक्षासुद्धा जास्त.

जाड पोह्याचा चिवडा
साहित्य
२ वाटी जाड पोहे
२.५ चमचा तिखट
१/४ चमचा तीळ
१/४ चमचा जीरा
१/२ वाटी शेंगदाणे
१/४ वाटी फुटाणे डाळ
१.५ चमचा साखर
७-८ कडीपत्ता पाने
४ चमचे काजू
४ चमचे मनुका
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
मीठ
तेल

कृती
  • जीरा आणि तीळ एकत्र कमी आचेवर तेलाविना साधारण ३-४ मिनिट भाजून घेणे.
  • मिक्सरमध्ये जीरा, तीळ आणि साखर एकत्र पूड करणे.
  • एका मोठ्या भांड्यात ती पूड, २ चमचा तिखट, काजू, मनुका आणि मीठ एकत्र करणे.
  • कढईत मध्यम आचेवर तेल गरम करणे.
  • पोहे एकावेळी थोडे थोडे करून तळून घेणे.
  • तेलातून काढल्या काढल्या लगेच टिशू वर तेल शोषून घेण्यासाठी ठेवावे. २-३ भाग टिशूवर आले की त्यांना मसाल्याच्या मिश्रणात घालुन ढवळणे.
  • सगळे पोहे तळून झाल्यावर एक दोन चमचा तेल गरम करावे व त्यात शेंगदाणे तळून घेणे.
  • त्याच तेलात म्हवारीची फोडणी करणे व त्यात हिंग, कडीपत्ता आणि फुटाणे डाळ घालुन २ मिनिट तळून घेणे.
  • त्यात शेंगदाणे आणि उरलेले १/२ चमचा तिखट घालुन चिवड्यात घालणे व ढवळणे.

टीप
कढईत थोडे थोडे तेल घालूनच पोहे तळावे कारण तेल काळे पडते त्यामुळे जास्त तेल वाया नाही जात
तेलात गाळणी ठेवून त्यात पोहे घातल्यानी ते बाहेर काढायला सोप्पे जाते
मी पोह्याचे तेल शोषून घेण्यासाठी त्यांना टिशूवर काढले पण पोहे गरम असतानाच मसाल्यात घालावे नाहीतर मसाला त्यांना नीट चिकटत नाही.

सेट डोसा


बँगलोरमध्ये पहिल्यांदा खाल्यापासून सेट डोसा हा माझा आवडता झाला. एकदम हलका फुलका आणि ३ मध्यम आकाराचे डोसे एका वेळी वाढला जाणारा हा डोसा फारच चविष्ठ आहे. बऱ्याच वेळ शोधल्यावर अस लक्षात आले की बहुतेकजण त्यात सोड्याचा व पोह्याचा वापर करतात. त्यावरून मी माझ्या सेट डोश्यासाठी थोडे साहित्य बदलून वापरले. एकदमच सुंदर झालेला. इतका की २ आठवड्यांपूर्वी केलेला फोटो काढण्यासाठी सुद्धा शिल्लक राहिला नाही. अजॉयनी पुन्हा बनवण्यासाठी सांगितल्यावर मी लगेच ह्या आठवड्यात बनवला आणि पहिल्यांदा फोटो काढला.

सेट डोसा
साहित्य
२ वाटी तांदूळ
१ वाटी इडली रवा
३/४ वाटी उडीद डाळ
१ वाटी पोहे
१ चमचा मेथी बिया
मीठ
तेल

कृती
  • तांदूळ, इडली रवा, उडीद डाळ आणि मेथी बिया वेगवेगळ्या सकाळी भिजवणे.
  • संध्याकाळी सगळे वाटायच्या आधी १ तास पोहे पाण्यात भिजवणे.
  • तांदूळ बारीक वाटून घेणे.
  • उडीद डाळ आणि मेथी बिया एकत्र करून बारीक वाटणे.
  • इडली रवापण बारीक वाटणे.
  • पोहे बारीक वाटणे.
  • सगळे वाटलेले मिश्रण चांगले एकत्र करून घेणे व रात्रभर आंबवण्यासाठी उबदार जागी ठेवणे.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी पिठात मीठ आणि थोडे पाणी घालुन चांगले पसरेल असेल मिश्रण बनवणे.
  • तवा मध्यम आचेवर गरम करून त्यावर थोडे तेल पसरवणे व एक वाटी पीठ ओतणे.
  • खालची बाजूल गुलाबी झाली की वरून १-२ थेंब तेल टाकून परतणे व दुसरी बाजू होईपर्यंत भाजणे

टीप
हा डोसा नेहमी मिक्स भाजीबरोबर खायला देतात पण मला ती भाजी फार आवडत नाही त्यामुळे मी त्याऎवजी ह्या शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खायला दिला.

कांदा पोहे


बरेच मित्र मैत्रिणी मला पटकन बनणाऱ्या आणि सोप्या नाश्त्याच्या कृती मागत आहेत. म्हणूनच इथे महाराष्ट्रातील अगदी घराघरात हमखास बनवला जाणारा सोप्पा आणि चविष्ठ पदार्थ देत आहे.

कांदा पोहे
साहित्य
२ वाटी पोहे
१/२ वाटी मटार
१ कांदा
चिमुटभर हळद
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचा जीरा
४ हिरव्या मिरच्या
४ चमचे किसलेले खोबरे
४ चमचा कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • पोहे धुवून त्यातील जास्तीचे पाणी ओतून झाकून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात म्हवरी व जीऱ्याची फोडणी करणे.
  • त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालुन भाजणे.
  • कांदा बारीक चिरून घालणे व पारदर्शक होईपर्यंत भाजणे.
  • त्यात हळद घालुन ढवळणे.
  • धुवून व भिजवून मऊ झालेले पोहे त्यात घालुन चांगले एकत्र करणे.
  • झाकणी ठेवून मंद आचेवर २-३ मिनिट वाफ येऊ देणे.
  • झाकणी काढून त्यात मीठ व मटार मिसळणे व पुन्हा ३-४ मिनिट झाकणी ठेवून मंद आचेवर वाफ काढणे.
  • ताटलीत खायला देताना वरून खोबरे व कोथिंबीर घालुन देणे.

टीप
पोहे धुवून झाकून बाजूला ठेवणे फार महत्वाचे आहे त्यामुळे ते चांगले मऊ होतात. जर पोहे थोडे कडकडीत वाटत असतील तर थोडे पाणी शिंपडणे. तसेच जास्तीचे पाणी काढायला पण विसरू नये नाहीतर पोहे जास्तच मऊ होतील व त्याचा लगदा होईल
मटारच्याऎवजी फोडणी बरोबर भाजलेले शेंगदाणेपण वापरता येतील, अजॉयला फार आवडतात
पोह्यात १/२ वाटी बटाट्याचे तुकडेपण फोडणीत घालता येतील व कांदा बटाटा पोहे बनवता येतील

दडपे पोहे


जेंव्हा मला पटकन होणारा पण चविष्ठ पदार्थ नाश्त्यासाठी बनवण्याची इच्छा होते तेंव्हा हा पदार्थ मनात येतो

दडपे पोहे
साहित्य
३.५ वाटी पातळ पोहे
१ कांदा
२ टोमाटो
१ चमचा साखर
१.५ लिंबू
१/२ वाटी शेंगदाणे
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचा जिरे
२ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा हळद
१ चमचा तेल
मीठ

कृती
  • पातळ पोह्यात टोमाटो आणि कांदा बारीक चिरून घालणे.
  • त्यात साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालुन चांगले एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळून घेणे व ते पोह्यात घालणे.
  • त्याच तेलात म्हवरी, जीरा, मिरच्यांचे तुकडे घालुन फोडणी करणे व त्यात हळद घालणे.
  • फोडणी पोह्यात घालुन ढवळणे व खायला देणे.

टीप
ह्यात पोह्यांना धुवायचे नसते कारण ते खूप पातळ असल्यानी लिंबाचा आणि टोमाटोचा रस त्यांना मऊ करण्यासाठी पुरेसा असतो.

पोहे चाट


आई इथे आली होती तेंव्हा तिनी तिच्याबरोबर १-२ पाककृतीची पुस्तके आणलेली त्यातच हा पदार्थ बघितलेला. आज मी हा करून बघितला.

पोहे चाट
साहित्य
२ वाटी पातळ पोहे
२ बटाटा
१/२ चमचा आलं पेस्ट
४-५ मिरच्या
१/२ वाटी दही
१-२ चमचा साखर
मीठ
म्हवरी
चिमुटभर हळद
१ चमचा चिंचेची चटणी
तेल

कृती
  • बटाटे उकडून घेऊन थंड करणे.
  • पोह्यावर थोडेसे पाणी शिंपडून त्यांना मऊ करावं
  • त्यात किसलेला बटाटा, आलं पेस्ट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ एकत्र करणे व पीठ भिजवणे. ह्याचे गोळे करून अलग दाबून टिक्या बनवणे
  • टिक्या तव्यावर भाजून घेणे.
  • दही व साखर एकत्र करणे.
  • तेल गरम करून त्यात म्हवारीची फोडणी करणे. त्यात हळद घालुन ते तेल दह्यात घालुन हलवणे.
  • वाढताना पोह्याच्या टिक्कीवर दही आणि चिंचेची चटणी घालुन देणे.

टीप
पोह्याची टिक्कीवर ब्रेडक्रम लावून पण टाळता येईल.
बारीक शेव वारणा घालण्याचा माझा विचार होता पण माझ्याकडे शेव नसल्यानी घातले नाही पण नंतर एकदा मी करून बघणारे

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP