अगदी लहान होतो तेंव्हा पासून आई आईस्क्रीम घरी बनवायची. मला तिला मदत करायला किंव्हा पूर्णपणे स्वतः आईस्क्रीम बनवायला फार आवडायचे (अर्थात दुध आतावाण्यासाठी गॅसजवळ थांबण्याचे काम सोडून). तेंव्हा आमच्याकडे आईस्क्रीम मेकर पण नव्हत त्यामुळे आईस्क्रीम फ्रीजमध्ये जमवायचा मग मिक्सरमध्ये फिरवायचा पुन्हा जमवायचा असा ३-४ वेळा करून ते सॉफ्ट बनवायला लागायचं. त्यामुळे इथे आल्यवर मला नेहमी वाटायचा की आईस्क्रीम मेकर घ्यावा आणि इतकी झंजट कमी करावी. ह्या रविवारी घगाळ आणि पावूस बघून मी खरेदीला जायचा ठवला आणि तेंव्हा मला कॉस्टकोमध्ये चांगल्या दरात आईस्क्रीम मेकर मिळालं. लगेच मी आईला मेल केल की मला पाककृती दे म्हणून, पण जेंव्हा पाककृती बघितली तेंव्हा लक्षात आलं की माझ्याकडे सगळे पदार्थ लगेच नाहीयेत. मला बाकीचे पदार्थ कुठून कसे घ्यायचे ह्याचा शोध लावण्याचा धीर नव्हता त्यामुळे मी थोडा फार वाचून शेवटी हि पाककृती बनवली. इतकी सोपी क्रिया आहे की मी सारख बनवून घरी आलेल्या पाहुण्यांना खायला देणार आहे. घरी बनवलेल्या हापूस आंब्याच्या आईस्क्रीम सारख दुसर सुख नाही :)
साहित्य
१ लिटर हाफ अॅन्ड हाफ
५ वाटी हापूस आंब्याचा रस
२ वाटी क्रीम
१/२ वाटी कॉर्न सिरप
१ वाटी साखर
कृती - एका पातेल्यात आंबा रस आणि साखर मिसळून साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळणे.
- त्यात कॉर्न सिरप आणि हाफ अॅन्ड हाफ घालुन ढवळणे
- त्यात क्रीम घालुन मिश्रण एकजीव करणे.
- हे मिश्रण आईस्क्रीम मेकर मध्ये घालुन मशीन चालू करणे.
- २५-३० मिनिटामध्ये आईस्क्रीम तयार होईल. स्कूप करून खायला देणे.
टीप
मी कॉर्न सिरप आणि साखर सोडून सगळे पदार्थ थंड गार वापरले. त्यामुळे मला मिश्रण आईस्क्रीम मेकर मध्ये घालण्याच्या आधी थंड करायची वाट बघावी नाही लागली. मिश्रण बनवून मग १-२ तास थंड करण्यास काही हरकत नाही. हे मिश्रण ग्लासच्या भांड्यात भरून नंतर वापरण्यासाठी पण ठेवता येईल(मी अर्ध्या मिश्रणाच तेच केलाय)
मी हाफ अॅन्ड हाफ चा वापर केला त्यामुळे दुध आटवून थंड करण्याचे कष्ट घ्यावे नाही लागले. त्यामुळे जर हाफ अॅन्ड हाफ नसेल तर दुध निम्मे होईपर्यंत आटवून थंड करून वापण्यास काही हरकत नाही.
आईस्क्रीम मेकरच्या सूचनेनुसार त्याचे भांडे आदल्या दिवशी फ्रीजर मध्ये ठेवून थंड करावे लागले.