हा माझा सगळ्यात आवडता बंगाली गोड पदार्थ. त्यामुळे मी अजॉयसाठी त्याचे आवडते
मिष्टी दोही बनवायला घेतले, तेंव्हा बाजूला माझ्यासाठी हे सॅन्डविच बनवायला पण चालू केले. खूप चविष्ट झाला हा प्रयोग
साहित्य
२ लिटर दुध
४ चमचे व्हिनेगर
१ चमचा रवा
२ वाटी खवा
१/२ वाटी आईसिंग शुगर
२.५ वाटी साखर
चांदीचा वर्ख
पिस्त्याची पूड
चिमुटभर बेकिंग पूड
२ चिमुट केशर
कृती - १/४ वाटी दुध बाजूला ठेवून बाकीचे दुध उकळवणे व त्यात २ चमचे पाण्यामध्ये व्हिनेगर घालुन एकत्र करणे.
- दुधापासून पाणी वेगळे होईपर्यंत एकसारखे ढवळणे
- हे मिश्रण चाळणीत पंचा टाकून त्यावर ओतणे. थंड पाण्याखाली धरणे. नंतर पंच्याला गाठ मारून ५ मिनिट बांधून ठेवणे.
- कुकर मध्ये ६ वाटी पाणी आणि साखर घालुन उकळी आणणे.
- बांधून ठेवलेले पनीर एका ताटात काढून चांगले मळून घेणे.
- त्यात रवा आणि बेकिंग पूड घालुन पुन्हा चांगले मळणे
- ह्या पनीरच्या पिठापासून पातळ चौकोनी तुकडे बनवणे. ह्यातील अर्धे तुकडे उकळत्या साखरेच्या पाण्यात घालणे.
- कुकरचे झाकण बंद करून एक शिट्टी काढणे. त्यानंतर आच मंद करून १० मिनिटे अजून शिजवणे. कुकर थंड होऊ देणे
- शिजलेले पनीर कुकरमधून काढून ठेवणे. कुकरमध्ये अजून २ वाटी पाणी घालुन उरलेले तुकडे त्यात सोडून आधीच्या तुकड्यांसारखे शिजवून थंड करून घेणे.
- आता हे सगळे पनीरचे तुकडे उरलेल्या साखरेच्या पाण्यासकट फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी रात्रभर ठेवून देणे.
- दुसऱ्यादिवशी सकाळी खवा किसून त्यात आईसिंग शुगर घालुन मळणे.
- उरलेले १/४ वाटी दुध गरम करून त्यात केशर घालणे. हे केशरीदुध खव्यामध्ये घालुन चांगले मळून घेणे.
- फ्रीजमधून शिजवलेले पनीरचे तुकडे बाहेर काढून त्याचे त्रिकोणी तुकडे करणे.
- प्रत्येक २ तुकड्यांमध्ये थोडे थोडे खव्याचे मिश्रण घालुन सॅन्डविच बनवणे. तसेच पिस्त्याची पूड खव्याच्या मिश्रणावर तसेच सॅन्डविचवर पसरवणे
- चांदीचा वरखा लावून थंडगार वाढणे
टीप
मी जाड पनीरचे तुकडे करून चिरण्याऎवजी करतानाच पातळ तुकडे बनवले आणि दोन तुकड्यांमध्ये खवा घालुन सॅन्डविच बनवले.