मिष्टी दोही


ही अजॉयची एकदम आवडती स्वीट. दिसायला एकदम सोपी वाटते पण मला फार कष्ट पडले. इथे दही जमवणे हे फार किचकट काम. खूप वेळा माझा प्रयोग फसला. पण आता मला एक युक्ती कळली की ज्यामुळे दही नेहमी चांगले जमते. लगेच मी पुन्हा मिष्टी दोहीचा प्रयत्न केला आणि तो एकदम यशस्वी ठरला.

मिष्टी दोही
साहित्य
१.५ लिटर दुध
१ वाटी साखर
१/२ वाटी दही

कृती
  • दुध उकळवणे.
  • त्यामध्ये १/४ वाटी साखर घालणे व सारखे ढवळत ते आटवणे. साधारण १ लिटर एवढे दुध राहीपर्यंत आटवणे.
  • आता दुध उकळवणे चालूच ठेवणे पण बाजूला एक पातेल्यात उरलेली ३/४ वाटी साखर आणि १/४ वाटी पाणी टाकून उकळवणे.
  • जेंव्हा साखरेचे पाणी गडद सोनेरी रंगाचे होईल तेंव्हा दुधाची आच कमी करून त्यात हे सोनेरी पाणी घालणे.
  • दुध आणखीन ५ मिनिट उकळवणे आणि नंतर कोमट होईपर्यंत थंड होऊ देणे
  • एका पातेल्यात दही व एक वाटी आधी बनवलेले दुध एकत्र करून फेटणे.
  • त्यात उरलेले दुध घालुन झाकण लाऊन रात्रभर दही जमू देणे
  • फ्रीजमध्ये कमीत कमी २ तास थंड करून मग वाढणे.

टीप
इथे दही जमवण्यासाठी मी दह्याचे भांडे कॅसेरॉलमध्ये (ज्यात पदार्थ गरम राहतात) ठेवून, तो कॅसेरॉल ओव्हनमध्ये ठेवते. ओव्हनचा लाईट चालू ठेवायचा. ओव्हन गरम करावा किंव्हा चालू ठेवायला लागत नाही. कॅसेरॉल दुधाचे तापमान वाचवतो आणि लाईट ओव्हनला कोमट ठेवतो.
सोनेरी साखरेचे पाणी दुधात घालताना हळू हळू घालणे कारण तापमानातील फरकामुळे दुध व साखरेचे पाणी उडून हात भाजण्याची शक्यता असते.
छोट्या छोट्या वाटीमध्ये पण दही जमवून वाटी तशीच्या तशी वाढू शकतात.
जाड दुध वापरले तर खूप चांगले दही जमते व चव पण चांगली येते. इथे हाफ अ‍ॅन्ड हाफ मिळते ते मी दुधाच्याऎवजी एक लिटर वापरले त्यामुळे मला दुध आटवावे लागले नाही.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP