Showing posts with label आमटी. Show all posts
Showing posts with label आमटी. Show all posts

फिश तवा फ्राय


आम्ही तिलापिया माशे आणायला चालू केल्यापासून मी नेहमीच त्यांना ग्रील करत आलीये. मला माशे नेहमीच आवडायचे आणि आता इतक्या दिवसात मी माश्याची आमटी बनवलीच नव्हती. जास्त नारळाचा वापर करायचा नाही अस ठरवल्यानी मला नेहमी बनवतात तशी आमटी बनवायची नव्हती. हि आमटी एकदम मस्त झालेली आणि मला साधारण १० वर्षांपूर्वी बऱ्याच वेळी खायचे त्या नंदिनी नावाच्या बंगलोरमधल्या आंध्रा करीची आठवण झाली.


फिश तवा फ्राय
साहित्य
५०० गरम माशे
१ मोठा कांदा
२ टोमाटो
१ चमचा चिंच
१/२ चमचा मिरे
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
४-५ लसूण पाकळ्या
१ चमचा आले
कोथिंबीर पाने

कृती
  • माश्याला १/४ चमचे तिखट, धने पूड आणि मीठ लावून बाजूला ठेवणे.
  • मिक्सरमध्ये चिंच, कांदा आणि ६-७ मिरे बाजूला ठेवून बाकीचे मिरे घालून बारीक वाटणे
  • तवा गरम करून त्यात माश्याचे तुकडे घालणे व एक मिनिट शिजू देणे.
  • माशे परतून त्यांना अजून एक मिनिट शिजू देणे. ताटावर काढून ठेवणे.
  • त्याच तेलात वाटलेली कांद्याची पेस्ट घालून त्यातील कच्चा वास निघे पर्यंत परतणे.
  • बाजूला टोमाटो , लसुन, आले बारीक वाटून घेणे.
  • कांदा शिजल्यावर त्यात टोमाटो पेस्ट, जिरे पूड, गरम मसाला, हळद, उरलेले मिरे आणि मीठ घालून ५ मिनिट सारखे ढवळत शिजवणे.
  • त्यात परतलेले माशे घालून अलगत एकत्र करणे व २-३ मिनिट शिजवणे.
  • वरून बारीक चिरलेली कोथिम्बिर घालून वाढणे.

टीप
मी काटे नसलेले व साफ केलेले तिलापिया माश्याचे तुकडे साधारण ४ भागात चिरलेले वापरले पण कुठलाही बिन काट्याचा मासा वापरता येईल.

मसाला डाळ


हि डाळ मी पुण्यात असताना असाच प्रयोग करताना बनवलेली. छान झाली आणि आई बाबांना एकदम आवडल्यामुळे इथे कृती देत आहे.

मसाला डाळ
साहित्य
३ वाटी तूर डाळ
१ कांदा
१ टोमाटो
६-७ लसूण पाकळ्या
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचा जिरे
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
कोथिंबीर
लोणी
मीठ
तूप

कृती
  • १ वाटी पाणी घालुन डाळ कुकरमध्ये उकडून घेणे.
  • तेल गरम करून त्यात म्हवरी आणि जिरे घालुन फोडणी करणे.
  • त्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या घालुन भाजणे.
  • त्यात हळद, तिखट, जिरे पूड, धने पूड आणि गरम मसाला घालुन ढवळणे.
  • त्यात टोमाटो घालुन पूर्ण शिजवणे.
  • त्यात शिजवलेली तूर डाळ, मीठ घालुन चांगले ढवळणे व दोन-तीन मिनिट शिजवणे
  • त्यात बरोबर पातळ होईल इतके पाणी घालुन उकळवणे.
  • वरून कोथिंबीर घालणे व वाटीत वाढल्यावर लोणी घालणे.

टीप
डाळ शिजवताना मी जास्त पाणी घालत नाही त्यामुळे नंतर मसाल्यासकट शिजवताना त्याची चव डाळीत जाते.

कटाची आमटी


हि आमटी पुरण पोळीच्या डाळीच्या उरलेल्या पाण्यातून बनवतात. एकदम गोड आणि आंबट अशी हि आमटी पुरण पोळी बरोबर एकदम मस्त लागते.

कटाची आमटी
साहित्य
२ वाटी हरबरा डाळ शिजवलेले पाणी
१/२ वाटी पुरण
१/२ वाटी गुळ
२ चमचा चिंच
१ चमचा धने
१ चमचा जिरे
१/२ चमचा म्हवरी
१ चमचा तिखट
४ चमचा खोबरे
१५ कडीपत्याची पाने
मीठ
तेल

कृती
  • चिंच एक वाटी पाण्यात भिजवणे व बाजूला ठेवणे.
  • चमचाभर तेल गरम करून त्यात धने आणि जिरे फोडणी करणे.
  • किसलेले खोबरे घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • मिक्सरमध्ये खोबऱ्याचे मिश्रण घालुन चिंचेबरोबर बारीक वाटणे.
  • अर्धा चमचा तेल गरम करून त्यात म्हवरी घालुन फोडणी करणे.
  • कडीपत्ता घालुन भाजणे
  • त्यात चिंच खोबऱ्याचे वाटण घालणे व एक मिनिट भाजणे.
  • तिखट घालुन अजून एक मिनिट भाजणे.
  • डाळीचे पाणी, पुरण आणि गुळ घालणे. जाड वाटल्यास थोडे पाणी पण घालणे.
  • मीठ घालुन आमटी उकळवणे.

टीप
डाळीचे पाणी नसेल तर साधे पाणी पण वापरता येईल
पुरण बनवण्यासाठी ह्या पुरण पोळीच्या कृतीचा उपयोग करणे

वरयाचा भात आणि शेंगदाणा आमटी


लहान असताना आई हा भात आणि आमटी उपवासाच्या दिवशी बनवायची. मला हे इतके आवडते की मी उपवासाच्या दिवसाची वाट बघायचे. आज बरेच लोकांकडून कळले की शिवरात्री आहे मग मी लगेच हा भात आणि आमटी बनवली

वरयाचा भात

वरयाचा भात
साहित्य
१ वाटी वरया
२ वाटी पाणी
१/२ चमचा जीरा
२ चमचे तूप
मीठ

कृती
  • भांड्यात तूप गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे
  • वरया त्यात घालुन गुलाबी होई पर्यंत भाजणे.
  • पाणी आणि मीठ घालुन मध्यम आचेवर भात होईपर्यंत शिजवणे.

टीप
भात परतताना त्यात शेंगदाणा कुट पण घालता येईल थोडी वेगळी आणि छान चव येते आणि मग शेंगदाणा आमटीची गरज नाही पडणार पण मला ती आमटी आवडत असल्यानी मी शेंगदाणा कुट वापरला नाही

शेंगदाणा आमटी

शेंगदाणा आमटी
साहित्य
१ वाटी खोबरे
३ वाटी पाणी
२ चमचा गुळ
३-४ हिरव्या मिरच्या
३-४ कोकम
१/२ चमचा जिरे
मीठ
१ चमचा तूप

कृती

  • शेंगदाणे भाजून त्याची साले काढणे व मिक्सर मध्ये पाणी घालुन वाटणे
  • कढईत हे मिश्रण घालुन गरम करणे.
  • त्यात गुळ, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोकम आणि मीठ घालुन उकळी आणणे.
  • छोट्या कढईत तूप गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे व उकळत्या आमटीत टाकणे.

टीप
शेंगदाणे एकदम बारीक वाटले पाहिजेत नाहीतर आमटी बरोबर होत नाही व सगळे शेंगदाणे खाली राहतील.

मुगाची डाळ


सगळ्या डाळीमध्ये हि डाळ आमच्या जेवणात जास्त असते कारण करायला सोप्पी आणि सगळ्यात आवडीची. आधी कधीच हि कृती पोस्ट करण्याचा विचार आला नाही पण माझ्या वाहिनीच्या काकांनी आमच्या कडे आल्यावर ह्या डाळीचे इतके कौतुक केले की मी हि कृती पोस्ट करण्याचा विचार केला. माझ्या आई बाबांना पण ह्या डाळीची चव आणि वास फार आवडतो

मुगाची डाळ
साहित्य
३/४ वाटी मुंग डाळ
१ कांदा
३ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा हळद
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा जिरे
१/२ चमचा म्हवरी
४ चमचा तूप
मीठ

कृती
  • डाळ कुकरमध्ये ४ शिट्ट्या काढून शिजवणे.
  • कढईत तूप गरम करून त्यात जिरे आणि म्हवरीची फोडणी करणे.
  • त्यात कांदा घालुन त्याचा वास जाईपर्यंत शिजवणे.
  • त्यात लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हळद घालुन १-२ मिनिट परतणे
  • शिजवलेली डाळ घालुन ढवळणे व त्यात थोडे पाणी घालुन उकळी आणणे.

टीप
मी कधी कधी ह्यात सुक्या लाल मिरचीचे तुकडे पण फोडणीत घालते. त्यामुळे डाळ दिसायला एकदम आकर्षक होते आणि चव पण छान येते
वरून कोथिंबीर पण घालता येईल

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP