साबुदाणा थालीपीठ


हा अजून एक साबुदाण्याचा पदार्थ जो सगळ्यांना फार आवडतो. बरीच मुल ह्यासाठी उपवास पण करून टाकतात. (त्यात मी पण आहे :) )

साबुदाणा थालीपीठ
साहित्य
१ वाटी साबुदाणा
१/२ वाटी शेंगदाणा कुट
३-४ हिरवी मिरची
१/२ चमचा जीरा
४ चमचे कोथिंबीर
२ मध्यम आकाराचे बटाटे
१/२ चमचा साखर
मीठ
तेल/तूप/लोणी

कृती
 • साबुदाण्यात १/४ वाटी पाणी घालुन कमीत कमी २-३ तास भिजवणे.
 • बटाटा उकडून व किसून घेणे.
 • जीरा, मीठ, साखर, शेंगदाणा कुट, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कोथिंबीर साबुदाण्यात घालुन एकत्र करणे
 • त्यात किसलेला बटाटा घालुन पीठ मळणे
 • पिठाचा मोठा गोळा घेऊन तव्यावर थालीपीठ थापणे.
  (ज्यांना थालीपीठ कसे थापायचे माहित नाही त्यांच्या करता - तव्यावर मध्ये तेल/तूप/लोणी घालणे. त्यावर गोळा ठेवून त्याला तळहातानी थापत पसरवणे.)
 • मध्यम आचेवर थालीपिठावर झाकणी ठेवून खालची बाजू पूर्ण शिजेपर्यंत भाजणे.
 • थालीपीठ परतून झाकणी न ठेवता हि बाजुपण शिजेपर्यंत भाजणे.
 • थालीपीठाचे ४ तुकडे करून दह्याच्या चटणीबरोबर खायला देणे.

टीप
हिरव्या मिरचीऎवजी तिखटपण वापरता येईल. चव थोडीशी वेगळी होईल.
आधी साबुदाण्याच्या वड्याच्या पाककृतीत सांगितल्याप्रमाणे साबुदाणा भिजवण्यासाठी पाण्याचे प्रमाण महत्वाचे आहे.
मी ह्यात कोथिंबीरच्याऎवजी अर्धा चमचा धने पूड पण वापरलेली कारण माझ्याकडे कोथिंबीर शिल्लक नव्हती पण कोथिबीरमुळे थालीपीठ एकदम सुंदर दिसते व जास्त चविष्ठ होते.

वांग्याचे काप


आज काल हैदराबादमध्ये मोठी वांगी मिळणे फार मुश्कील झाले आहे. मी जेंव्हा मी पुण्याला गेलेले तेंव्हा तिथून दोन घेऊन आले. मी बंगाली पद्धतीची काप आधीच इथे दिली आहेत आता सरस्वत पद्धतीची हि पाककृती देत आहे. ह्यामध्ये फरक असा आहे की बंगाली काप एकदम मऊ असते पण हे काप बाहेरून कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ असते. सगळ्या कापांमध्ये मला वांग्याची काप सगळ्यात जास्त आवडतात.

वांग्याचे काप
साहित्य
१ मोठे वांग
तिखट
हळद
मीठ
रवा
तेल

कृती
 • वांग्याचे मध्यम आकाराचे चकती करणे.
 • कापांना मीठ लावून ५-१० मिनिट बाजूला ठेवणे.
 • त्याला हळद आणि तिखट लावणे.
 • तव्यावर तेल घालुन गरम करणे.
 • एका ताटलीत रवा घेणे. प्रत्येक काप रव्यात घोळवणे.
 • तव्यावर काप कमी आचेवर गुलाबी रंगावर भाजून घेणे.

टीप
नेहमी काप एकदम मंद आचेवर भाजावी म्हणजे वांगी चांगली शिजतील आणि बाहेरून कुरकुरीत होईल
बारीक रवा वापरल्यास जास्त चांगला लागतात.
अश्या पद्धतीनी बटाटा, कच्ची केळी यांचीपण काप बनवता येतील

खजुराचा केक


जेंव्हा पासून मायक्रोवेव्ह घरी आणलाय तेंव्हा पासून मी केक बेक करण्याचा प्रयत्न करतीये. बऱ्याच वेळा केकच्याऎवजी कडक कुकीज झाल्या आणि बिचार्या अजॉयला खावे लागले. आज आई बाबा इथे येणार असल्यानी त्यांच्यावर प्रयोग करण्याचे ठरवले. :) ह्यावेळी केक एकदम चांगला झाला

खजुराचा केक
साहित्य
१ वाटी मैदा
३/४ वाटी दुध
१/२ वाटी साखर
१/२ वाटी तेल
२० खजूर बिया काढून
१ चमचा बेकिंग पूड
सुकामेवा

कृती
 • दुध, खजूर आणि साखर मिक्सरमध्ये वाटून पेस्ट बनवणे.
 • ह्या पेस्टमध्ये तेल घालुन ढवळणे.
 • मैदा आणि बेकिंद पूड २-३ वेळा चाळून घेणे.
 • आधी बनवलेल्या पेस्टमध्ये मैद्याचे मिश्रण एकावेळी अंदाजे डावभर घालुन एकत्र करणे.
 • केकच्या भांड्याला खाली तेल लावून त्यावर बटर पेपर घालणे.
 • केकचे मिश्रण भांड्यात ओतून त्यावर सुकामेवा घालणे
 • मायक्रोवेव्ह २००C वर गरम करणे
 • केक खालच्या बाजूला ठेवून कन्व्हेक्शन मोड मध्ये २००C, १८०W वर २० मिनिट भाजणे

टीप
मैदा व बेकिंद पूड एकत्र करून चालणे फार महत्वाचे आहे अथवा केक खूप टणक होईल
खजूर व दुध एकत्र करून रात्रभर ठेवल्यास ते वाटण्यास सोपे जाते
माझ्याकडे Samsung 108STF हा मायक्रोवेव्ह आहे. केक भाजण्याचे तापमान, वेळ सगळे मायक्रोवेव्हवर अवलंबून असते त्यामुळे निराश न होता थोडे प्रयोग करावेत.

गोबी मन्चुरिअन


हि एकदम छान चायनीज पाककृती. आज मी बनवली आणि मस्त झालेली. घरी असलेल्या भाज्या वापरून केलेला हा पदार्थ एकदम चविष्ठ झालेला.

गोबी मन्चुरिअन
साहित्य
१ मध्यम आकाराचा फ्लॉवर
५ चमचे कॉर्न फ्लॉवर
४ चमचे मैदा
२ चमचे तिखट
३ चमचे आलं लसूण पेस्ट
३ चमचे टोमेटो केचप
१ श्रावणी घेवडा
२ बारीक चिरलेल्या मिरच्या
२ चमचे हॉट आणि स्वीट टोमेटो केचप
मीठ चवीपुरते
तेल

कृती
 • फ्लॉवर कापून त्याचे खाण्याइतक्या आकाराचे तुकडे करणे.
 • ४ चमचे कॉर्न फ्लॉवर, मैदा, तिखट, २ चमचे आलं लसूण पेस्ट आणि मीठ पाणी घालुन जाडसर भिजवणे.
 • तेल कढईत घालुन गरम करणे.
 • फ्लॉवरचे तुकडे भिजवलेल्या पिठात घोळवून मध्यम आचेवर तेलात गुलाबी रंगावर भाजून घेणे.
 • उरलेले तेल एकदम छोट्या आचेवर ठेवून त्यात आलं लसूण पेस्ट घालणे.
 • त्यात कापलेला कांदा, मिरच्या घालुन भाजणे.
 • कांदा गुलाबी होऊ लागल्यावर दोन्ही सॉस घालुन ढवळणे.
 • उरलेले कॉर्न फ्लॉवर अर्धा वाटी पाण्यात घालुन ढवळून मचुरिअन मध्ये घालणे.
 • वरून श्रावणी घेवडा आणि हिरव्या मिरच्या घालणे.

टीप
ह्यात थोडा सोया सॉस घालता येईल पण माझ्याकडे तो नसल्यानी मी नाही घातला.
जर ग्रेव्ही सारखे बनवायचे असेल तर अजून थोडे कॉर्न फ्लॉवर पाण्यात घालुन ते सॉस घालताना घालावे.

साबुदाणा खिचडी


साबुदाणा खिचडी हा एक चविष्ठ मराठी पदार्थ. मी खूप वेळा बनवते, नाश्ता जेवण कुठल्याही वेळी एकदम उत्तम.

साबुदाणा खिचडी
साहित्य
१ वाटी साबुदाणा
१ वाटी शेंगाना कुट
१ चमचा साखर
३-४ हिरव्या मिरच्या
३-४ चमचे कोथिंबीर
१ चमचा जीरा
५ चमचे किसलेले खोबरे (इच्छेप्रमाणे)
मीठ चवीनुसार
तूप

कृती
 • साबुदाणा साधारण ३-४ तास १/४ वाटी पाणी घालुन भिजवणे.
 • भिजवलेल्या साबुदाण्यात शेंगदाणा कुट, साखर, मीठ, बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर घालणे.
 • कढईत तूप गरम करणे.
 • त्यात जीरा घालुन फोडणी करणे व त्यात साबुदाण्याचे मिश्रण घालणे.
 • कढईवर झाकणी ठेवून हलक्या आचेवर शिजवणे. मधून मधून ढवळत राहणे.
 • साधारण ५ मिनिटांनी खिचडी तयार होईल, त्यावर खोबरे घालुन वाढणे.

टीप
खिचडी नेहमी हलक्या आचेवर शिजवणे म्हणजे कडक नाही होणार.
खिचडी नेहमी जाड कढईत करणे, जर नसेल तर कढई तव्यावर ठेवूनपण शिजवू शकते.
आधीच्या साबुदाणा वडा पाककृतीमध्ये लिहिल्याप्रमाणे साबुदाण्यात पाण्याचे प्रमाण महत्वाचे आहे.

काकडीचा रायता


हि पाक्कृतीसुधा बंगलारूच्या ट्रीट नावाच्या ८० फीट रोडवरच्या हॉटेलमधल्या रायात्यावरून प्रभावित होऊन केलेली आहे. हा रायता कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ शकतो आणि इतका सोपा आणि चविष्ठ आहे की मी कधी कधी स्वीट डीशसारख जेवणानंतर पण खाते.

काकडीचा रायता
साहित्य
१ वाटी घट्ट दही
१ काकडी
१/२ चमचा जिरे पूड
मीठ चवीनुसार

कृती
 • काकडी किसून घेणे.
 • त्यात मीठ व जिरे पूड घालणे.
 • दही घालुन चांगले ढवळणे.

टीप
मी नेहमी घट्ट दही वापरते कारण मग काकडीला सुटलेले पाणी टाकून द्यावे नाही लागत. जर दही घट्ट नसेल तर काकडीला मीठ वळून त्याला सुटलेले पाणी काढून टाकणे.

पुलाव


मी जेंव्हा बंगलारूमध्ये होते तेंव्हा मी माझे प्रयोग रेडी मेड मसाल्यापासून सुरु केलेले. आता मी साधारणतः स्वतःचेह मसाले वापरते पण ही एक अशी पाककृती आहे ज्यात मला अजूनही MTRचा पुलाव मसाला वापरायला आवडतो. अर्थातच त्यांनी दिलेल्या कृती ऎवजी मी स्वताची एक कृती बनवली आहे. ती इथे देत आहे.

पुलाव
साहित्य
६ वाटी भात
१ कांदा
२ चमचे MTR पुलाव मसाला
१ चमचा आले लसूण पेस्ट
१/४ वाटी उकडलेले मटार
४-५ चमचे शेंगदाणे
४-५ काजू
४ चमचे तूप
मीठ चवीपुरते

कृती
 • ३ चमचे तूप कढईत गरम करणे.
 • त्यात बारीक चिरलेला कांदा आणि शेंगदाणे घालुन भाजणे.
 • शेंगदाणे अर्धवट शिजल्यावर त्यात काजू आणि आले लसूण पेस्ट घालणे.
 • काजू गुलाबी झाल्यावर त्यात पुलाव मसाला घालुन १ मिनिट शिजवणे.
 • भात आणि मटार घालुन चांगले ढवळणे.
 • उरलेले एक चमच तूप सोडून झाकण लावून २ मिनिट वाफ काढणे.
 • मीठ घालुन पुलाव ढवळणे व अजून २-३ मीन शिजवणे.

टीप
काजू शेंग्दाण्यानंतर घालणे म्हणजे ते करपणार नाहीत
बासमती तांदुळाचा भात वापरला तर सुंदर वास येतो व पुलाव अजूनही चविष्ठ लागतो.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP