Showing posts with label फळं. Show all posts
Showing posts with label फळं. Show all posts

पेर बार


मी काल काहीतरी नवीन आणि १-२ तासात तयार होईल असे काहीतरी बेक करायला शोधत होते.शोध लेमन बार, जे मी एका महिन्यापूर्वी बनवलेले त्याच्या वेगळ्या प्रकारावर संपला. लेमन बारमध्ये मला जरा अंड्याची चव आणि वास जास्त वाटलेला त्यामुळे मी कमी अंडे वापरून काहीतरी बनवण्याचे ठरवले. तेंव्हाच मला चीजकेक आणि बार चे फ्युजन बनवण्याचे सुचले. हा माझा सगळ्यात जास्त साहशी प्रयत्न होता कारण मी तो घरी येणाऱ्या मित्रांसाठी केलेला पण नशिबानी हि दिश जमून गेली.

पेर बार
साहित्य
१ वाटी लोणी
२.२५ वाटी साखर
१.५ अंडे
१.५ वाटी मैदा
२.५ वाटी व्हॅनिला इसेन्स
२.७५ वाटी पीकॅन
१२ आउन्स क्रीम चीज
२ पेर
१/२ चमचा जायफळ पूड

कृती
  • ओव्हन ३५०F/१७५C वर गरम करणे.
  • हातातला मिक्सर वापरून लोणी चांगले फेटून घेणे.
  • त्यात २/३ वाटी साखर घालून आणखीन फेटणे.
  • त्यात एक चमचा व्हॅनिला इसेन्स, मैदा चाळून घालणे व फेटणे.
  • त्यात पीकॅन तुकडे करून मिसळणे.
  • ६ इंचाच्या २ बेकिंगच्या भांड्यांना लोण्याचा हात लावणे व त्यात बनवलेले मिश्रण अर्धे अर्धे वाटून पसरवणे.
  • ओव्हनमध्ये ३५०F/१७५C वर २२ मिनिट भाजणे.
  • भांडी ओव्हनमधून बाहेर काढून ३० मिनिट थंड होऊ देणे
  • एका भांड्यात हातातला मिक्सर वापरून क्रीम चीज फेटणे
  • त्यात १.५ वाटी साखर, अंडे आणि उरलेला १.५ चमचा व्हॅनिला इसेन्स घालून एकजीव होईपर्यंत फेटणे
  • पेरचा मधला भाग कापून टाकून उरलेल्या भागाचे उभे तुकडे करणे व त्यात १ चमचा साखर घालून बाजूला ठेवणे
  • ओव्हन ३७५F/१९०C वर गरम करणे.
  • बेकिंगच्या भांड्यात क्रीम चीजचे मिश्रण दोन्ही भांड्यात निम्मे निम्मे पसरवणे
  • त्यावर पेरचे तुकडे पसरवणे
  • पेरच्या तुकड्यांवर जायफळ आणि उरलेली (साधारण एक चमचा) साखर शिंपडणे
  • ओव्हनमध्ये ३७५F/१९०C वर ३५ मिनिट भाजणे.
  • ओव्हनमधून बाहेर काढून साधारण ३० मिनिट थंड होऊ देणे. त्यानंतर कमीत कमी १ तास फ्रीजमध्ये थंड करून मग चौकोनी तुकडे करून वाढणे

टीप
१.५ अंडे मोजणे जरा अवघड आहे :) पण मी पहिल्यांदा १ अंडे आणि १ चीजचे पाकीट वापरून मिश्रण बनवण्याचा प्रयत्न करत होते पण ते मिश्रण पुरेसे नाही पडले म्हणून मी अजून एक अंडे फेटले आणि त्याचा निम्मा भाग वापरला. त्यामुळे जर दोन भांड्यांच्याऐवजी एक ८-९ इंचाचे भांडे वापरायचे असेल तर एका अंड्याचे मिश्रण कदाचित पुरेसे असेल. त्यासाठी १ अंडे, १ क्रीम चीजचे पाकीट, १ वाटी साखर आणि १ चमचा व्हॅनिला इसेन्स वापरायचा.
मी पीकॅन वापरले कारण माझ्याकडे ते घरीच होते पण कुठलेही नट्स वापरता येईल
मी थोडे जास्त पिकलेले पर वापरले त्यामुळे ते चांगले मऊ होते आणि त्यामुळे शेवटी तुकडे कापताना निघून येत नाहीत.
ओव्हनमधून शेवटी जेंव्हा डेझर्ट बाहेर काढतो तेंव्हा कदाचित थोडे पाणी वरती दिसेल पण काळजी करू नये, ते थंड झाल्यावर सेट होते

स्ट्रॉबेरी आईस्क्रीम


मागच्या आठवड्यात मी जॅम बनवण्यासाठी स्ट्रॉबेरी आणलेल्या. पण त्यावर १-२ तास घालवण्यासाठी वेळ न मिळाल्यानी मी शेवटी त्याचे आईस्क्रीम बनवण्याचे ठरवले. प्रथमच बनवून एकदम असे सगळ्यांना खायला द्यायचे असल्यानी थोडी भीती होती पण सगळ्यांना ते आवडले असल्यानी इथे कृती देत आहे.

स्ट्रॉबेरी आईस्क्रीम
साहित्य
५ वाटी दुध
३.५ वाटी क्रीम
१.५ किलो स्ट्रॉबेरी
४ वाटी साखर
१/२ लिंबू

कृती
  • मिक्सरमध्ये १किलो स्ट्रॉबेरी आणि साखर एकत्र वाटून घेणे व मोठ्या भांड्यात ओतणे.
  • त्यात दुध घालुन चांगले एकत्र करणे.
  • त्यात लिंबू आणि क्रीम घालुन पुन्हा एकजीव होईपर्यंत ढवळणे.
  • आईस्क्रीम मेकर मध्ये मिश्रण जितके मावते तितके एका वेळी घालुन ते सेट होण्यासाठी चालू करणे.
  • उरलेली स्ट्रॉबेरी बारीक चिरून आईस्क्रीम सेट होत आल्यावर घालणे व पूर्ण सेट होऊ देणे
  • आईस्क्रीम भांड्यात काढून एक-दोन तास अजून घट्ट होऊ देणे.

टीप
मी थोडी स्ट्रॉबेरी खायला देताना आईस्क्रीम वर घालण्यासाठी बाजूला ठेवलेली.

आंबा मुज केक


हार्दिक आणि श्वेनीच्या फेरवेल पार्टीमध्ये एक आंबा मुज केक आणलेला. मला तो फार आवडलेला आणि त्याचा पहिला घास खातच मला तो स्वतः बनवण्याची फार इच्छा झालेली. केके इतका छान होता की बरेच जण त्यासाठी सिअ‍ॅटल सोडून जाव म्हणजे फेरवेल पार्टीमध्ये हा केक खाता येईल असा पण विनोद करायला लागलेले. मी बराच वेळ गप्पा होते तेंव्हा कोणीतरी म्हणाले की शीतलला त्याची गरज नाही कारण ती तर हा केक घरीच बनवेल. मी तेंव्हा काही बोलले नाही कारण माझ्या लक्षात आला की माझ्याकडून जरा जास्तच अपेक्षित केलं जातंय, पण माझा विचार एकदम पक्का झाला की हा केक वीकएंडलाच करून बघायचा. आणलेल्या केकमध्ये आंबा इसेन्स वापरला होता, मी आमरस वापरायचा ठरवला. चव खूपच छान आलीये. आता सगळ्यांना घरी बोलावून एकदा हमी भरून घ्यायला पाहिजे.

आंबा मुज केक
साहित्य
१ वाटी मैदा
३ अंडी
२०० ग्राम क्रीम चीज
३ वाटी क्रीम
५ वाटी आमरस
१ चमचा कॉर्न फ्लौर
२ चमचे दुधाची पूड
१/४ चमचा बेकिंग पूड
१.७५ वाटी साखर
४ चमचे जिलेटीन
४ चमचे लिंबाचा रस
२ चमचा तेल
१.२५ चमचा व्हॅनिला ईसेन्स
१/४ चमचे मीठ

कृती
  • ३५०F/१७५C वर ओव्हन गरम करणे
  • मैदा, कॉर्न फ्लौर ५ वेळा एकत्र चाळून घेणे. त्यात दुधाची पूड, बेकिंग पूड घालुन पुन्हा २ वेळा एकत्र चाळून घेणे.
  • मिक्सरमध्ये अंड्याचे पांढरे आणि मीठ चाळून फोम येईपर्यंत फेटून घेणे.
  • त्यात १/४ वाटी साखर घालुन घट्ट होईपर्यंत फेटून घेणे.
  • दुसऱ्या भांड्यात अंड्याचे पिवळे, १/२ चमचे व्हॅनिला ईसेन्स आणि १/४ वाटी साखर घालुन साखर विरघळेपर्यंत फेटणे.
  • त्यात तेल आणि अजून अर्धा चमचा व्हॅनिला ईसेन्स घालुन ३० सेकंद फेटणे.
  • अंड्याचे पाढरे त्यात घालुन अलगद एकत्र करून घेणे.
  • मैद्याचे मिश्रण १/३ वाटा एकावेळी घालत अलगद एकत्र करणे. जास्त ढवळू नये.
  • ९ इन्च स्प्रिंगफॉर्म भांड किंवा कुठलेही ९ इन्च गोलाकार भांडे घेऊन त्याला खाली पार्चमेंट कागद घालुन लोणी लावणे. त्यावर केकचे मिश्रण ओतणे.
  • केक ३५०F/१७५C वर ओव्हनमध्ये २० मिनिट भाजून घेणे.
  • लगेच थंड होण्यासाठी जाळीच्या रॅकवर उलटवून ठेवणे.
  • तेवढ्या वेळात एका भांड्यात १/४ वाटी साखर आणि १/४ वाटी पाणी घालुन ढवळत उकळवणे. अजून २-३ मिनिट उकळू देणे. भांडे खाली घेऊन त्यात १/४ चमचा व्हॅनिला ईसेन्स घालुन ढवळणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • साखरेचे पाणी थंड होईपर्यंत एका भांड्यात क्रीम चीज, १ वाटी साखर आणि २ चमचे लिंबाचा रस घालुन एकत्र फेटणे.
  • मायक्रोवेव्हमध्ये १/४ वाटी पाणी १ मिनिट गरम करणे. त्यात २ चमचे जिलेटीन घालुन पूर्ण विरघळेपर्यंत ढवळणे. क्रीम चीजच्या मिश्रणात घालुन फेटून घेणे.
  • दुसऱ्या भांड्यात क्रीम घट्ट होईपर्यंत फेटून घेणे. अलगद पणे क्रीम चीजच्या मिश्रणात ढवळणे.
  • त्यात ३ वाटी आंबा रस घालुन एकजीव होईपर्यंत ढवळणे.
  • केकला आडवे कापून २ थर बनवणे. खालचा थर ९ इंच स्प्रिंगफॉर्म भाण्यात घालणे. त्यावर अर्धे साखरेचे पाणी ब्रशनी लावणे. आंब्याचे अर्धे मिश्रण त्यावर ओतून सपाट करून घेणे. त्यावर दुसरा केकचा थर ठेवणे. उरलेले अर्धे साखरेचे पाणी ब्रशनी लावून घेणे. उरलेले आंब्याचे मिश्रण ओतून सपाट करणे. फ्रीजमध्ये १ तास थंड करणे.
  • केक थंड होऊन ४५ मिनिट झाल्यावर एका भांड्यात उरलेला २ वाटी आमरस, २ चमचे लिंबाचा रस घालुन गरम मध्यम आचेवर गरम करणे. उकळू देऊ नये अथवा चव बिघडेल. मिश्रण बाजूला काढणे.
  • मायक्रोवेव्हमध्ये १/४ वाटी पाणी १ मिनिट गरम करणे. त्यात २ चमचा जिलेटीन घालुन विरघळवणे.हे मिश्रण आंब्याच्या गरम मिश्रणात घालुन चांगले ढवळणे. थोडे थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे व पुन्हा ढवळून घेणे.
  • फ्रीजमधून केक बाहेर काढून त्यावर हे मिश्रण एकसारखे ओतून थर देणे.
  • केक फ्रीजमध्ये कमीत कमी ८ तास जमवण्यासाठी ठेवणे. भांड्याची रिंग काढून वरून फळे घालुन तुकडे खायला देणे.

टीप
केकचा दुसरा थर थोडा छोटा असावा. माझा केक फुलल्यामुळे कापल्यावर आपोआपच थोडा छोटा झाला. तसा नसेल तर बाजूनी थोडा कापून घेणे म्हणजे मग केक कापल्यावर तो थर बाहेरून दिसणार नाही.
केक जर भांड्यातच थंड झाला तर चिकटून बसेल त्यामुळे लगेच थंड करण्यासाठी जाळीच्या रॅकवर काढणे महत्वाचे आहे.
मी ह्यात देसाई बंधूंचा गोड आमरस वापरलाय त्यामुळे आंब्याचा स्वतः रस काढल्यास त्यात साखर घालायला विसरू नये.
जरी कृती थोडी लांब असली तरी एकदा बनवल्यावर लक्षात येईल की इतकी किचकट नाहीये. आणि शेवटी बनणारा केक फारच सुंदर होईल त्यामुळे कष्ट व्यर्थ नाही जाणार. :)

लीची आईसक्रिम


इथे बहुतेक सगळ्या दुकानात कॅनमेध्ये लीची मिळते पण ताजी लीची मी कधीच दिसली नाही. शेवटी मागच्या महिन्यात मी तो डब्बा वापरून बघण्याचे ठरवले. डब्यातले पाणी पण वापरले तर बर्यापैकी चांगली चव येते.

लीची आईसक्रिम
साहित्य
१ सीडलेस लीचीचा डब्बा
१/२ वाटी साखर
१/२ वाटी दुध
३.५ वाटी क्रीम
१ लिंबू

कृती
  • लीची पाकातून बाजूला काढून तो पाक मिक्सर मध्ये घालणे.
  • त्यात साखर आणि दुख घालुन साखर विरघळेपर्यंत वाटणे
  • त्यात क्रीम आणि लिंबाचा रस घालुन फेटणे.
  • आईस्क्रीममेकर मध्ये हे मिश्रण घालुन सेट होण्यासाठी ठेवणे.
  • लीची बारीक चिरून आईस्क्रीममध्ये ते सेट होण्याच्या ३-४ मिनिटाच्या आधी घालणे.

टीप
जर ताजे लीची वापरायचे असेल तर साधारण ३० लीची वापरणे. अंदाजे १५ लीची २ वाटी पाणी घालुन वाटणे आणि पाकच्या ऎवजी वापरणे. उरलेल्या १५ लीचीना बारीक चिरून वापरणे. तसेच साखरपण अंदाजे २/३ वाटी लागेल.
लिंबू वापराल्यानी लीचीची चव निखरून येते

अंजीर जिलॅटो


लहानपणापासून अंजीर हे माझा सगळ्यात आवडता फळ. मला माहिती आहे की माझ आंबाप्रेम बघून ह्यावर विश्वास बसने थोडे कठीण आहे पण ते खरय की अंजीर हेच माझं सगळ्यात आवडता फळ. तसे बघितला तर खेळताना जर फळ निवडायचा असेल तर मी नेहमीच अंजीर निवडायचे. मग जशी मी मोठी झाले तसं मला सुजाताच्या (पुण्यातल प्रसिद्ध आईस्क्रीमच दुकान) अंजीर आईस्क्रीमशी माझा परिचय झाला. अजूनही मी जेंव्हा जेंव्हा पुण्याला जाते तेंव्हा एक दाबा अंजीर आईस्क्रीम नक्की खाते. मग हे आईस्क्रीम बनवायला इतका उशीर का हा प्रश्न पडणा साहजिक आहे पण इथे सुके अंजीर मिळण फार कठीण गेलं त्यामुळे मी ह्यावेळी भारतातून सुके अंजीर मागवले आणि आज हे जिलॅटो बनवलं.

अंजीर जिलॅटो
साहित्य
१ लिटर दुध
२५० ग्राम सुके अंजीर
३/४ वाटी मध
१ चमचा लिंबाचा रस

कृती
  • अंजीर २ वाटी दुधात साधारण २ तास भिजवून ठेवणे.
  • मिक्सरमध्ये भिजवलेले ४-५ अंजीर सोडून बाकीचे वाटून घेणे.
  • त्यात मध आणि लिंबाचा रस घालुन पुन्हा वाटणे.
  • हे मिश्रण उरलेल्या दुधात घालुन चांगले ढवळणे.
  • आईस्क्रीम मेकरच्या सूचनेनुसार आईस्क्रीम जमवण्यासाठी ठेवणे.
  • उरलेले अन्जीरचे तुकडे बारीक चिरून आईस्क्रीम मध्ये मिसळणे

टीप
मला एकदा आईस्क्रीम करायला घेतले की पुन्हा वाट बघायला बिलकुल आवडत नाही त्यामुळे मी नेहमी थंड गार दुध वापरते. तसेच अंजीर भिजवून मी फ्रीजमध्येच ठेवून दिलेले त्यामुळे आईस्क्रीम मेकर मध्ये घालायच्या आधी मला मिश्रण थंड होण्याची वाट बघावी नाही लागली.

स्ट्रॉबेरी क्रेप


मी हे क्रेप्स एकंदर एक महिन्यापूर्वी बनवलेले पण त्यांच्याविषयी पूर्णतः विसरून गेलेले. काल एकदम लक्षात आल्यावर मी त्याचे फोटो शोधायला चालू केले. आणि मग लक्षात आले की तेंव्हा माझा कॉम्प्युटर बिघडला असल्यानी ते मी अजॉयच्या कॉम्प्युटरवर ठेवले आणि विसरून गेले. आज हि सोपी, सहज अशी चविष्ठ पाककृती इथे देत आहे.

स्ट्रॉबेरी क्रेप
साहित्य
३ वाटी स्ट्रॉबेरी
१/२ वाटी मैदा
१.५ वाटी दुध
१/२ वाटी वितळवलेले लोणी
२ अंडी
१/२ व्हॅनिला ईसेन्स
२ चमचा साखर
मीठ चवीपुरते

कृती
  • एका भांड्यात स्ट्रॉबेरी बारीक चिरून त्यात एक चमचा साखर घालुन बाजूला ठेवणे.
  • दुसऱ्या भांड्यात मैदा, दुध, उरलेली एक चमचा साखर, लोणी, व्हॅनिला ईसेन्स, अंडी आणि मीठ घालुन हॅन्ड मिक्सर वापरून फेसणे
  • तवा गरम करून त्यावर डावभर मिश्रण घालुन तवा तिरका करून पातळ पसरवणे
  • मध्यम आचेवर क्रेप दोन्ही बाजूनी गुलाबी होईपर्यंत भाजणे व एका ताटात काढणे
  • आता ह्या क्रेपवर २ चमचा स्ट्रॉबेरीचे सारण पसरवून रोल बनवणे. पाहिजे असल्यास थोडी पिठीसाखर शिंपडून खायला देणे.

टीप
मी क्रेप भाजण्यासाठी नॉनस्टिक तव्याचा वापर केला त्यामुळे मला तेल बिलकुल वापरावे लागले नाही.

कलिंगड स्प्लॅश


आजच्या जेवणानंतर मला कलिंगडाच काहीतरी नवीन बनवण्याचं मन केल आणि त्यातूनच ही ज्यूसची पाककृती आली.

कलिंगड स्प्लॅश
साहित्य
१/२ कलिंगड
२ मोठे लिंबू
४ चमचे साखर
६-७ पुदिना पानं
१/४ चमचे चाट मसाला
१/४ चमचे जिरे पूड
चिमुटभर मिरे पूड
मीठ चवीनुसार

कृती
  • कलिंगड चिरून मिक्सरच्या भांड्यात घालणे
  • त्यात लिंबू रस, साखर, पुदिना पानं, मीठ, जीरा पूड, चाट मसाला घालणे
  • मिक्सरमध्ये ज्यूस चांगला वाटून घेणे
  • ज्यूस ग्लासमध्ये ओतून त्यावर मिरे पूड शिंपडणे. ज्यूस थंड होण्यासाठी ठेवून देणे.
  • वरून पुदिना पानं आणि कलिंगडाचे गोळे घालुन प्यायला देणे.

टीप
ज्यूस लवकर थंड होण्यासाठी मी १० मिनिट त्याला फ्रीजरमध्ये ठेवून दिला. त्याऎवजी थंड कलिंगड वापरल तर १० मिनिटपण वाट बघावी लागणार नाही :)
मी बीनबियांचे कलिंगड वापले त्यामुळे मला बिया वेगळे काढण्याचे कष्ट घ्यावे नाही लागले.

स्ट्रॉबेरी सॉरबे


जेंव्हा मी आईसक्रीममेकर विकत आणला तेंव्हा मला दुविधा झालेली की पहिल्यांदा आंबा आईसक्रीम बनवायचे की सॉरबे.. दोन्ही माझे खूप आवडते पदार्थ पण आंबा आईसक्रीमनी बाजी मारली. पण आज कॉस्कोमध्ये गेल्यावर मी भरपूर स्ट्रॉबेरी आणले आणि सॉरबे बनवले. गरमीच्या या दिवसात उत्तम ठरतंय ते.

स्ट्रॉबेरी सॉरबे
साहित्य
६०० ग्राम स्ट्रॉबेरी
२ वाटी साखर
१/२ वाटी लिंबू रस
१/२ वाटी कॉर्न सिरप

कृती
  • स्ट्रॉबेरी ४ तुकडे करून काचेच्या भांड्यात घालणे..
  • त्यात साखर आणि लिंबू रस घालुन नीट ढवळणे
  • रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून देणे.
  • सकाळी उठून ह्या मिश्रणात कॉर्न सिरप घालुन मिक्सर मध्ये वाटून घेणे.
  • हे मिश्रण आईसक्रीममेकरमध्ये घालुन मशीन चालू करणे.
  • साधारण ३० मिनिटांनी सॉरबे तयार होईल. ते डब्यात घालुन २-३ तास फ्रीजरमध्ये ठेवून देणे. नंतर पुदिन्याच्या पान लावून खायला देणे

टीप
मी मिक्सर मध्ये मिश्रण बनवताना ते पल्स केले त्यामुळे सॉरबेमध्ये स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे तुकडे राहिले आणि चव आणखीन खुलून आली.
मिश्रण रात्रभर थंड करण्याऎवजी २-३ तास थंड केले तरी चालते.

हरियाली मेन्गो पनीर


आज आम्ही कपिल आणि श्रीन्खलाला रात्रीच्या जेवणासाठी भेटणार होतो. पण आयत्यावेळी आम्ही तो बेत रद्दकरून घरीच काहीतरी खाण्याचे ठरवले. माझ्याकडे मागच्या आठवड्यात मयुरीमधून आणलेली कैरी होती त्यामुळे मी त्याचे सलाड बनवण्याचा विचार करत होते पण शेवटच्याक्षणी मी बेत बदलून हरियाली मेन्गो पनीर बनवले. अतिशय उत्तम चव आली.

हरियाली मेन्गो पनीर
साहित्य
३ वाटी कोथिंबीर
१/२ वाटी पुदिना
१ कैरी
१ कांदा
२ वाटी पनीर
१ हिरवी मिरची
१ चमचा लसूण पाकळ्या
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/४ चमचा हळद
१/२ चमचा जिरे पूड
मीठ चवीपुरतं
तेल

कृती
  • मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची आणि १ वाटी पाणी घालुन बारीक पेस्ट बनवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात पनीर गुलाबी रंगावर भाजून घेणे. बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात कांदा, लसूण घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • त्यात कैरीचे तुकडे आणि कोथिंबीर-पुदिना-मिरचीची पेस्ट घालुन आटेपर्यंत शिजवणे.
  • त्यात हळद, गरम मसाला, तिखट, जिरे आणि धने पूड घालुन ढवळणे.
  • पनीरचे तुकडे आणि मीठ घालुन २ मिनिट शिजवणे

टीप
मी जी कैरी वापरली ती फार आंबट नव्हती त्यामुळे त्याच्या हलक्या आंबटपणामध्ये भाजीची चव एकदम खुलून आली. त्यामुळे जर कैरी खूप आंबट असेल तर त्याचे प्रमाण कमी करायला विसरू नये.

अननस फ्राईड भात


आज काल बाहेर खायचा म्हटलं म्हणजे त्यात थाई पदार्थ माझे फार आवडीचे. फ्राईड भात तर पाहिजेच पण जर त्यात अननस वाला भात मिळाला तर सोने पे सुहागा :) पण बरेच दिवस झाले मी थाई पदार्थ घरी बनवून त्यामुळे आज मी नेहमीच्या भाताऎवजी अननस फ्राईड भात बनवण्याचा ठरवलं

अननस फ्राईड भात
साहित्य
३ वाटी तांदूळ
३ वाटी ब्रोकोली
२ वाटी अननस
१ वाटी गाजर
१ वाटी सेलरी
१ वाटी लाल ढोबळी मिरची
१ कांदा
२ हिरव्या मिरच्या
१/४ वाटी सोया सॉस
मीठ चवीपुरते
तेल

कृती
  • तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवणे
  • दुसऱ्या भांड्यात पाणी उकळवून त्यात तांदूळ घालणे. भात शिजत आलं की त्यातील पाणी गाळून भात बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात कांदे, हिरव्या मिरच्या, गाजर, सेलरी, ब्रोकोली, ढोबळी मिरची घालुन परतवणे.
  • भांज्याचा कच्चा वास निघून गेला आणि अर्धवट शिजल्यावर त्यात अननस, सोया सॉस आणि मीठ घालुन अजून परतवणे.
  • त्यात भात घालुन २-३ मिनिट परतवणे.

टीप
सोया सॉस थोडा खारट असतो त्यामुळे मीठ एकदम बेतानीच घालणे.

झटपट आंबा आईस्क्रीम


अगदी लहान होतो तेंव्हा पासून आई आईस्क्रीम घरी बनवायची. मला तिला मदत करायला किंव्हा पूर्णपणे स्वतः आईस्क्रीम बनवायला फार आवडायचे (अर्थात दुध आतावाण्यासाठी गॅसजवळ थांबण्याचे काम सोडून). तेंव्हा आमच्याकडे आईस्क्रीम मेकर पण नव्हत त्यामुळे आईस्क्रीम फ्रीजमध्ये जमवायचा मग मिक्सरमध्ये फिरवायचा पुन्हा जमवायचा असा ३-४ वेळा करून ते सॉफ्ट बनवायला लागायचं. त्यामुळे इथे आल्यवर मला नेहमी वाटायचा की आईस्क्रीम मेकर घ्यावा आणि इतकी झंजट कमी करावी. ह्या रविवारी घगाळ आणि पावूस बघून मी खरेदीला जायचा ठवला आणि तेंव्हा मला कॉस्टकोमध्ये चांगल्या दरात आईस्क्रीम मेकर मिळालं. लगेच मी आईला मेल केल की मला पाककृती दे म्हणून, पण जेंव्हा पाककृती बघितली तेंव्हा लक्षात आलं की माझ्याकडे सगळे पदार्थ लगेच नाहीयेत. मला बाकीचे पदार्थ कुठून कसे घ्यायचे ह्याचा शोध लावण्याचा धीर नव्हता त्यामुळे मी थोडा फार वाचून शेवटी हि पाककृती बनवली. इतकी सोपी क्रिया आहे की मी सारख बनवून घरी आलेल्या पाहुण्यांना खायला देणार आहे. घरी बनवलेल्या हापूस आंब्याच्या आईस्क्रीम सारख दुसर सुख नाही :)

झटपट आंबा आईस्क्रीम
साहित्य
१ लिटर हाफ अ‍ॅन्ड हाफ
५ वाटी हापूस आंब्याचा रस
२ वाटी क्रीम
१/२ वाटी कॉर्न सिरप
१ वाटी साखर

कृती
  • एका पातेल्यात आंबा रस आणि साखर मिसळून साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळणे.
  • त्यात कॉर्न सिरप आणि हाफ अ‍ॅन्ड हाफ घालुन ढवळणे
  • त्यात क्रीम घालुन मिश्रण एकजीव करणे.
  • हे मिश्रण आईस्क्रीम मेकर मध्ये घालुन मशीन चालू करणे.
  • २५-३० मिनिटामध्ये आईस्क्रीम तयार होईल. स्कूप करून खायला देणे.

टीप
मी कॉर्न सिरप आणि साखर सोडून सगळे पदार्थ थंड गार वापरले. त्यामुळे मला मिश्रण आईस्क्रीम मेकर मध्ये घालण्याच्या आधी थंड करायची वाट बघावी नाही लागली. मिश्रण बनवून मग १-२ तास थंड करण्यास काही हरकत नाही. हे मिश्रण ग्लासच्या भांड्यात भरून नंतर वापरण्यासाठी पण ठेवता येईल(मी अर्ध्या मिश्रणाच तेच केलाय)
मी हाफ अ‍ॅन्ड हाफ चा वापर केला त्यामुळे दुध आटवून थंड करण्याचे कष्ट घ्यावे नाही लागले. त्यामुळे जर हाफ अ‍ॅन्ड हाफ नसेल तर दुध निम्मे होईपर्यंत आटवून थंड करून वापण्यास काही हरकत नाही.
आईस्क्रीम मेकरच्या सूचनेनुसार त्याचे भांडे आदल्या दिवशी फ्रीजर मध्ये ठेवून थंड करावे लागले.

आलुबुखारचा केक


आम्ही ह्यावेळी बरेच आलुबुखार आणलेले पण ते पिकलेले नव्हते. त्यामुळे मी हा केक बनवण्याचे बऱ्याच दिवसांपासून ठरवत होते पण आज वेळ मिळाला

आलुबुखारचा केक
साहित्य
१ वाटी लोणी
१.५ वाटी साखर
३/४ वाटी मैदा
१ वाटी हेझलनट
१ वाटी अक्रोड
१ वाटी शेंगदाणा
३ अंडी
१/२ चमचा बेकिंग पूड
६ आलूबुखार
२ चमचे लिंबाचा रस
४ चमचा पिठीसाखर
२ चमचा बदाम

कृती
  • हेझलनटची पूड करणे.
  • एका भांड्यात साखर आणि लोणी एकत्र फेटणे.
  • त्यात अंडे घालुन फेटणे.
  • त्यात हेझलनटचा १/३ वाटा घालणे आणि फेटणे.
  • एक अंडे आणि १/३ हेझलनटचा वाटा घालत फेटत राहणे.
  • मैदा आणि बेकिंग पूड एकत्र चाळून घेणे व मिश्रणात घालुन फेटणे.
  • केकच्या भांड्याला लोण्याचा हात लावणे व केकचे मिश्रण त्यात ओतणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
  • केक ३५०F/१८०C वर ४५ मिनिट भाजून घेणे.
  • ओव्हनमधून बाहेर काढून त्यावर आलुबुखारची बी काढून अर्धे करून पसरवणे.
  • ओव्हनमध्ये ३५०F/१८०C वर अजून १० मिनिट भाजणे व थंड करणे.
  • एका भांड्यात लिंबाचा रस आणि पिठी साखर एकत्र करणे व मिश्रण घट्ट होईपर्यंत उकळवणे.
  • पाक केकवर ओतून त्यावर बारीक चिरलेले बदाम घालणे.

टीप
लिंबाच्या मिश्रणाऎवजी मारमालेड जॅमपण वापरता येईल पण माझ्याकडे तो नसल्यानी मी लिंबाच्या रसाचे मिश्रण वापरले.

बेरी नटी चॉकोचीप केक


ह्या आठवड्याच्या सामानाबरोबर क्रॅन्बेरी आणली कारण मला त्याचा ज्यूस आवडतो. एक घास खाल्यावारच लक्षात आले की ह्या बेरी अशाच खाण अशक्य आहे. मग मी बराच वेळ बघत होते काय करता येईल ते पण काहीच पसंत पडत नव्हते. शेवटी मी माझ्या मनानीच काहीतरी बनवण्याचे ठरवले.

बेरी नटी चॉकोचीप केक
साहित्य
२ वाटी मैदा
१ वाटी साखर
१ वाटी क्रॅन्बेरी
१ वाटी चॉकोचिप्स
१ वाटी सुकामेवा
१ वाटी द्राक्ष
१/२ वाटी लोणी
१.५ चमचा बेकिंग पूड
१/२ चमचा बेकिंग सोडा
१ अंडे
४ चमचा चॉकोलेट सॉस
मीठ

कृती
  • सुकामेवा, क्रॅन्बेरी बारीक कापणे आणि चॉकोचिप्स बरोबर एकत्र करणे.
  • मैदा, बेकिंग पूड, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र चाळून घेणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
  • केकच्या भांड्याला लोण्याचा हात लावणे.
  • मोठ्या भांड्यात चाळलेले मिश्रण आणि साखर एकत्र करणे.
  • त्यात वितळवलेले लोणी घालुन हातानी एकत्र करणे.
  • द्राक्षांचा मिक्सर मध्ये रस काढून मिश्रणात घालणे.
  • त्यात अंडे आणि सुकामेवा-चॉकोचिप्स चे मिश्रण घालणे व फेटणे.
  • केकचे मिश्रण लोणी लावलेल्या भांड्यात ओतणे व ओव्हनमध्ये ३५०F/१८०C वर ४५ मिनिट भाजणे.
  • केक थंड झाल्यावर त्यावर चॉकोलेट सॉस घालुन खायला देणे.

टीप
मिश्रण पातळ नसले तरी घाबरू नये ह्या केकचे मिश्रण असेच असते.
माझ्याकडे सुकामेव्याचे मिश्रण होते म्हणून मी ते वापरले पण कुठलेही ड्रायफ्रुट्स एकत्र करून वापरता येईल.

खतखते


मला एकदम लहान असल्यापासून हा पदार्थ खूप आवडतो. बेळगावला काकीकडे गेल्यावर तिथे खायचो. आतापर्यंत मला लक्षात नव्हता आला की हा एकदम तब्येतीसाठी उत्कृष्ठ पदार्थ आहे :) नावाप्रमाणेच फ्रीजमधले सगळे संपवण्यासाठी एकदम उत्तम

खतखते
साहित्य
१ वाटी घेवडा
१/२ वाटी मटार
२ शेवग्याच्या शेंगा
२ कणीस
१ बटाटा
१ रताळे
१ कच्चे केळे
१.५ चमचा चिंच
१/४ वाटी गुळ
१/२ वाटी खोबरे
१/४ चमचा धने
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
चिमुटभर हिंग
२ चमचा तूप
मीठ

कृती
  • अर्धा वाटी पाण्यात चिंच भिजवणे.
  • मोठ्या भांड्यात घेवडा आणि ४ वाटी पाणी घालुन मोठ्या आचेवर ५ मिनिट शिजवणे.
  • कणीस ३ तुकडे करून त्यात घालणे. २ वाटी पाणी घालुन अजून ५ मिनिट शिजवणे.
  • त्यात शेवग्याच्या शेंगा, बटाटे, रताळे, कच्चे केळे आणि २ वाटी पाणी घालुन अर्धवट शिजवणे.
  • त्यात खोबरे, चिंच आणि घने अर्धा वाटी पाणी घालुन वाटून घालणे.
  • भाज्या शिजत आल्याकी त्यात मटार घालणे.
  • हळद, गुळ, तिखट आणि मीठ घालुन उकळवणे.
  • छोट्या कढईत तूप आणि म्हवरी घालुन फोडणी करणे व हिंग घालणे. फोडणी भाजीत घालणे.

टीप
ह्यात १ वाटी भोपळ्याचे तुकडे पण घालता येतील पण इथे मला न मिळाल्यानी वापरले नाहीये.

व्हेरी बेरी केक


इथे सध्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बेरी मिळतात की मी असा काहीतरी केक बनवण्याचे ठरवले.

व्हेरी बेरी केक
साहित्य
३ वाटी मैदा
४ चमचे बेकिंग पूड
२ अंडी
१ वाटी लोणी
१ वाटी साखर
३/४ वाटी दुध
२ वाटी रासबेरी
२ वाटी ब्लूबेरी
३/४ वाटी ब्लॅकबेरी
६-८ स्ट्रॉबेरी
मीठ

कृती
  • लोणी आणि साखर एकत्र चांगले फेटून घेणे.
  • त्यात अंडी घालुन घट्ट होईपर्यंत फेटणे
  • मैदा आणि बेकिंग पूड एकत्र चाळून घेणे व त्यात मीठ घालणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
  • अंड्याच्या मिश्रणात थोडे थोडे मैद्याचे मिश्रण घालुन फेटणे.
  • मिश्रणात दुध घालुन ढवळणे.
  • सगळ्या बेरी मिश्रणात घालणे. (मी सगळ्या बेरी अख्या वापरल्या, फक्त स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घातले)
  • केक भाजायच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात मिश्रण ओतणे. केक ३५०F/१८०C वर ३५ मिनिट भाजणे.

टीप
मी साखर मिक्सर मध्ये वाटून घेतली त्यामुळे ती पटकन वितळते.
सगळ्या बेरी फ्रीजमधून लगेच वापरल्या त्यामुळे जास्त भाजल्या नाही जात.
फ्रोझन बेरी पण वापरता येतील. मी सुद्धा पुढच्यावेळी बेरी फ्रीजर मध्ये ठेवून तश्याच वापरून बघणार आहे.
मी केक मध्ये सॉलटेड मीठ वापरले आणि वरून मीठ पण घातले त्यामुळे मीठ जरा जास्त लागत होत. जर सॉलटेड मीठ वापरत असेल तर वरून मीठ घालू नये.

अननसाचा मुरंबा


मागच्या महिन्यात आम्ही एक मोठा अननस आणलेला. मला आईचा मुरंबा आठवला. लगेच आईला फोन केला आणि तेंव्हा कळले की बनवायला किती सोप्पा आहे ते. मी त्याच रात्री बनवून टाकला.

अननसाचा मुरंबा
साहित्य
५ वाटी अननस
३ वाटी पाणी
१.५ वाटी साखर

कृती
  • अननस पाण्यात बुडेल इतके पाणी घालुन मध्यम आचेवर झाकण लावून शिजवावा.
  • अननस गाळून पाणी वेगळे करणे.
  • त्याच पाण्यात साखर घालुन उकळी आणणे. मध्यम आचेवर सारखे ढवळत एक तारी पाक बनवणे.
  • त्यात शिजवलेला अननस घालुन अजून एकदा उकळी आणणे.
  • थंड करून फ्रीजमध्ये ठेवणे.

टीप
मुरंबा फ्रीजमध्ये ठेवावा म्हणजे थोडे महिने चांगला राहतो.
चपाती किंवा पराठ्याबरोबर एकदम छान लागतो
मला फार जास्त पाक आवडत नाही त्यामुळे वरच्या प्रमाणात कमी गोड व कमी पाक होतो. त्यात अजून १ वाटी पाणी आणि अर्धा वाटी साखर घालुन जास्त पाक बनवता येईल.

खरबूजाची लस्सी


२ आठवड्यांपूर्वी मी एकदम वेगळा प्रयोग करून पहिला. फ्रीजमध्ये एक जुने खरबूज होते आणि दही होते त्यातून निर्माण झालेली हि कृती

खरबूजाची लस्सी
साहित्य
१ खरबूज
६ वाटी दही
५ चमचे साखर
एक थेंब व्हॅनिला इसेन्स
मीठ

कृती
  • खरबूज बारीक कापून घेणे
  • थोडे तुकडे वरून वापरण्यासाठी बाजूला ठेवणे व बाकीचे मिक्सरमध्ये वाटून घेणे.
  • ज्यूस गाळून घेणे आणि दह्यात मिसळणे.
  • त्यात साखर, मीठ, व्हॅनिला इसेन्स घालुन पुन्हा चांगले ढवळणे.
  • प्यायला देताना ग्लासमध्ये वरून खरबुजाचे तुकडे घालुन थंड करून देणे.

टीप
मी एकदम घट्ट दही वापरलेले आणि पाण्याचा बिलकुल वापर नाही केला कारण खाराबुजाचेच पाणी वापरल्यानी चव चांगली आली.

गार्डन सॅलेड


हे सॅलेड मी एकदम अचानकच बनवण्याचे ठरवले आणि एकदम चांगले पण झाले त्यामुळे इथे कृती देत आहे

गार्डन सॅलेड
साहित्य
१ वाटी लेट्युस
१/२ वाटी अननस
१/२ वाटी आंबा
१ उकडलेला बटाटा
१ टोमाटो
१ लाल मिरची
१/२ चमचा ओरेगनो
१/४ वाटी पिकल्ड काकडी
२ चमचा व्हिनेगर
मीठ

कृती
  • भांड्यात चिरलेले लेट्युस घालणे
  • त्यात अननस आणि आंब्याचे तुकडे घालणे
  • त्यात टोमाटो चिरून घालणे
  • उकडलेल्या बटाट्याची साल काढून तुकडे करणे आणि मिसळणे
  • त्यात बारीक चिरलेली लाल मिरची, पिकल्ड काकडी घालणे
  • मीठ, ओरेगनो आणि व्हिनेगर घालुन एकत्र करणे. व वाढणे.

टीप
मी सगळे पदार्थ वेग वेगळे कापून ठेवलेले आणि जेवणाच्या अर्धा तास आधी एकत्र केले त्यामुळे त्यांची चव शाबूत राहिली आणि खाण्यास चांगले लागले.

हिरवे सॅलेड


इथे आल्यापासून वेग वेगळे समान खूप पटकन मिळते म्हणून मी थोडा वेगळा प्रयोग करायचा ठरवला. इथे माझा पहिला सॅलेड बनवायचा प्रयोग देत आहे.

हिरवे सॅलेड
साहित्य
१० हिरव्या लेट्युसची पाने
१/२ वाटी ग्रेप टोमाटो
१/२ अननस
१/४ वाटी कॉर्न
१० पिकल्ड काकडी
५ पिकल्ड मिरची
१/२ चमचा ओरिगानो
२.५ चमचा रांच ड्रेसिंग
मीठ

कृती
  • कॉर्न उकळत्या पाण्यात किंवा मायक्रोवेव्हमध्ये ५ मिनिट शिजवून घेणे. त्यातील पाणी ओतून बाजूला ठेवणे.
  • लेट्युस बारीक चिरणे.
  • ग्रेप टोमाटो अर्धे चिरून लेयुसमध्ये घालणे.
  • त्यात अननस बारीक चिरून, पिकल्ड काकडीचे तुकडे अर्धे करून घालणे.
  • त्यात बारीक चिरलेली पिकल्ड मिरची आणि कॉर्न घालुन एकत्र करणे.
  • त्यात रांच ड्रेसिंग, ओरिगानो आणि मीठ घालुन एकत्र करणे.

टीप
एकदम सोप्पा, पौष्टिक आणि चविष्ठ पदार्थ आहे. रांच ड्रेसिंग आणि ओरिगानो एकदम चांगला लागत होता. अजून वेगवेगळ्या भाज्या, फळे आणि ड्रेसिंग वापरायचा बेत आहे.

चेरी आणि काजूचा कप केक


मफीन बनवल्यापासून मी बरेच दिवस कप केक बनवण्याचा विचार करत होते. आज शेवटी मुहूर्त लागला :) :)

चेरी आणि काजूचा कप केक
साहित्य
२ वाटी टीन मधली चेरी
१ वाटी चेरीचे सिरप
१ वाटी पिठी साखर
२ अंडी
१/२ वाटी लोणी
२ वाटी मैदा
२.२५ चमचा बेकिंग पूड
१/२ वाटी दुध
१/२ वाटी काजू

कृती
  • लोणी, पीठ साखर आणि अंडी एकत्र फेटणे.
  • मैदा आणि बेकिंग पूड एकत्र चाळून घेणे
  • एकावेळी थोडा थोडा मैदा लोण्यात घालत एकत्र करणे.
  • चेरीच्या बिया काढून त्या, त्यांचे सिरप, काजू आणि दुध पिठात घालुन हलके एकत्र करणे.
  • ओव्हन २००C वर गरम करणे.
  • कप केपच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात २/३ काटापर्यंत मिश्रण भरणे
  • ओव्हनमध्ये २००C वर २० मिनिट केक भाजणे.

टीप
चेरी सिरप आणि थोडेसे वाटले गेलेले चेरी एकत्र मिळून एकदम चांगली चव देतात.
ह्यात बदाम आणि अक्रोडपण वापरता येतील पण माझ्याकडे ते नसल्यामुळे मी नाही वापरले
मी खारट मीठ वापराल्यानी वेगळे मीठ मैद्यात घातले नाही पण जर मीथाविना लोणी वापरले तर मैद्यात मीठ घालायला विसरू नये.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP