स्ट्रॉबेरी क्रेप
मी हे क्रेप्स एकंदर एक महिन्यापूर्वी बनवलेले पण त्यांच्याविषयी पूर्णतः विसरून गेलेले. काल एकदम लक्षात आल्यावर मी त्याचे फोटो शोधायला चालू केले. आणि मग लक्षात आले की तेंव्हा माझा कॉम्प्युटर बिघडला असल्यानी ते मी अजॉयच्या कॉम्प्युटरवर ठेवले आणि विसरून गेले. आज हि सोपी, सहज अशी चविष्ठ पाककृती इथे देत आहे.
साहित्य
३ वाटी स्ट्रॉबेरी
१/२ वाटी मैदा
१.५ वाटी दुध
१/२ वाटी वितळवलेले लोणी
२ अंडी
१/२ व्हॅनिला ईसेन्स
२ चमचा साखर
मीठ चवीपुरते
कृती
- एका भांड्यात स्ट्रॉबेरी बारीक चिरून त्यात एक चमचा साखर घालुन बाजूला ठेवणे.
- दुसऱ्या भांड्यात मैदा, दुध, उरलेली एक चमचा साखर, लोणी, व्हॅनिला ईसेन्स, अंडी आणि मीठ घालुन हॅन्ड मिक्सर वापरून फेसणे
- तवा गरम करून त्यावर डावभर मिश्रण घालुन तवा तिरका करून पातळ पसरवणे
- मध्यम आचेवर क्रेप दोन्ही बाजूनी गुलाबी होईपर्यंत भाजणे व एका ताटात काढणे
- आता ह्या क्रेपवर २ चमचा स्ट्रॉबेरीचे सारण पसरवून रोल बनवणे. पाहिजे असल्यास थोडी पिठीसाखर शिंपडून खायला देणे.
टीप
मी क्रेप भाजण्यासाठी नॉनस्टिक तव्याचा वापर केला त्यामुळे मला तेल बिलकुल वापरावे लागले नाही.
0 comments:
Post a Comment