Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

साबुदाण्याच्या पोह्याचा चिवडा


हा चिवडा इतका सोपा आणि हमखास चांगला होणारा प्रकार. मी जेंव्हा लहान होते तेंव्हा मला हा चिवडा फार आवडायचा. एकदम हलका, तिखट गोड असा हा चिवडा आता मला आणखीनच आवडतो तो त्याच्या बनवायच्या सोप्या कृती मुळे. मी आता हा नियमित करत जाणार आहे.

साबुदाण्याच्या पोह्याचा चिवडा
साहित्य
१०० ग्राम साबुदाणा पोहे
१ वाटी शेंगदाणे
२.५ चमचा तिखट
१ चमचा जिरे पूड
१ चमचा साखर
१ चमचा मीठ
तेल

कृती
  • मिक्सरमध्ये तिखट, जिरे पूड, साखर, मीठ घालुन बारीक पूड होईपर्यंत वाटून घेणे व मोठ्या भांड्यात घालणे
  • कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे गुलाबी रंगावर तळून घेणे. मसाल्यात घालुन हलवून घेणे.
  • त्याच तेलात थोडे थोडे पोहे घालुन तळणे. प्रत्येक वेळी तळल्या तळल्या लगेच मसाल्यात घालुन हलवणे.

टीप
पोहे तळून झाल्यावर गरम गरमच मसाल्यात घालणे फार महत्वाचे आहे नाहीतर मसाला त्यांना नीट लागत नाही.

शेव बटाटा दही पुरीसाठी(SPDP) पुरी


इथे आल्यापासून शेव बटाटा दही पुरीसाठी(SPDP) पुरी कधी मिळाल्याच नाही. पाणी पुरीच्या पुऱ्या वापरणे योग्य नाही वाटले. अजॉयचा आवडता पदार्थ असल्यानी मी पुऱ्या घरी बनवण्याचे ठरवले. थोड्या प्रयोगानंतर ही कृती एकदम चांगल्या पुऱ्या बनवते. आता मित्रमैत्रिणीनी पण त्यावर संमती दिलीये :)

शेव बटाटा दही पुरीसाठी(SPDP) पुरी
साहित्य
१ वाटी मैदा
२ चमचे रवा
१/४ वाटी लोणी
तेल
मीठ

कृती
  • मैदा, रवा आणि मीठ एकत्र करणे.
  • त्यात वितळवलेले लोणी घालणे.
  • १/४ वाटी पाणी घालुन मऊसर पीठ मळणे.
  • १/४ चमचा तेल घालुन पुन्हा मळणे व भिजवण्यासाठी तासभर ठेवून देणे.
  • पीठाचे गोळे बनवून पातळ लाटणे. वाटी वापरून किंवा कुकीकटर वापरून छोट्या पुऱ्या कापणे.
  • तेल गरम करून मध्यम आचेवर पुऱ्या गुलाबी रंगावर भाजून घेणे. तेल शोषून घेण्यासाठी पुऱ्या टिशूवर काढणे
  • ओव्हन ३५०F/१७५C वर गरम करणे व पुऱ्या १० मिनिट भाजून घेणे.

टीप
पुऱ्या जर पातळ लाटल्या तर जास्त फुगत नाही आणि जश्या पाहिजे तश्या कुरकुरीत बनतात.
मी पुऱ्या ओव्हन मध्ये भाजून घेतल्या त्यामुळे जो काही मऊसर पणा उरलेला तो निघून गेला.

पचडी


आई इथे आल्यावर ती दररोज नवीन नवीन काहीतरी बनवत असते. परवा तिनी हि मस्त पचडी बनवलेली. ती मला इतकी आवडली की मी लगेच कालच पुन्हा मला दाखवायला सांगितलं. काल आमचा बेत पाणी पुरीचा होता पण मला काही झालं तरी हि पचडी बनवायची होती म्हणून मग, पाणी पुरीच्या चटपटीत हा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ खून जेवण संपवायचे ठरले.

पचडी
साहित्य
२ वाटी कोबी
१ वाटी गाजर
१ टोमेटो
३/४ वाटी कांदा
१ चमचा शेंगदाणा पूड
१ चमचा साखर
१ मिरची
मुठभर कोथिंबीर पाने
१ लिंबू
१/४ चमचा मौव्हरी
चिमुटभर हिंग
तेल
मीठ

कृती
  • कोबी बारीक चिरून एका भांड्यात घ्यावा
  • त्यात टोमेटो बारीक चिरून घालणे
  • कांदा, कोथिंबीर, मिरची बारीक चिरून घालणे.
  • गाजर किसून घालणे.
  • त्यात शेंगदाणा पूड, साखर, आणि मीठ घालणे.
  • लिंबू पिळून, मिश्रण चांगले ढवळणे.
  • एका छोट्या कढईत तेल घालुन मौव्हरी आणि हिंग घालुन फोडणी करणे.
  • त्याला मिश्रणात घालुन चांगले ढवळणे.

टीप
जर पार्टीत किंव्हा पाहुण्यांना वाढण्यासाठी आधीपासून तयारी करायची असेल तर फक्त भाज्या चिरून ठेवणे. साखर मीठ आणि फोडणी आयत्यावेळी घालणे. जर पूर्ण पचडी आधी केली तर ती इतकी चांगली लागत नाही, त्यामुळे हा उत्तम उपाय आहे.

वांग्याची भजी


भजी हा प्रकार महाराष्ट्रात फार प्रसिद्ध. लग्न असू वा घरी बोलवलेले पाहुणे, भजी पाहिजेच. आमच्याकडे भजी करून फार दिवस झाले असा लक्षात येत मी सोमवारी भजी बनवण्याचे ठरवले. पण मग वांगे बघून थोडा नवीन प्रयोंग करूया अस ठरवलं. प्रयोग एकदम यशस्वी त्यामुळे इथे पाककृती देतीये.

वांग्याची भजी
साहित्य
२ वाटी चिरलेले वांगे
१ कांदा
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा जिरे पूड
१/२ वाटी बेसन
मुठभर कोथिंबीर
मीठ चवीपुरते
तेल

कृती
  • चिरलेले वांगे, कांदा, तिखट, हळद, धने पूड, जिरे पूड, मीठ, बेसन आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करणे. थोडे पाणी वापरून भजीचे पीठ बनवणे.
  • तेल गरम करणे. त्यातील २ चमचे तेल भजीच्या पिठात घालुन चांगले मिसळणे.
  • छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून तळहातावर दाबणे.
  • तेलात भजी दोन्ही बाजूनी होईल अशी भाजून गरम गरम खायला देणे.

टीप
मी नेहमी भजीच्या पीठाचे सगळे साहित्य एकत्र करून पाणी घालायच्या आधी ५ मिनिटे वाट बघते. त्यामुळे भाज्यांचे पाणी तेवाध्यावेलात सुटते व नंतर पीठ पातळ होण्याचा प्रश्न येत नाही.

जाड पोह्याचा चिवडा


चिवडा हा सगळ्यांची कमजोरी आहे :) ह्या प्रकारचा चिवडा आमच्या घरी फार वेळा करतात, पातळ पोह्यापेक्षासुद्धा जास्त.

जाड पोह्याचा चिवडा
साहित्य
२ वाटी जाड पोहे
२.५ चमचा तिखट
१/४ चमचा तीळ
१/४ चमचा जीरा
१/२ वाटी शेंगदाणे
१/४ वाटी फुटाणे डाळ
१.५ चमचा साखर
७-८ कडीपत्ता पाने
४ चमचे काजू
४ चमचे मनुका
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
मीठ
तेल

कृती
  • जीरा आणि तीळ एकत्र कमी आचेवर तेलाविना साधारण ३-४ मिनिट भाजून घेणे.
  • मिक्सरमध्ये जीरा, तीळ आणि साखर एकत्र पूड करणे.
  • एका मोठ्या भांड्यात ती पूड, २ चमचा तिखट, काजू, मनुका आणि मीठ एकत्र करणे.
  • कढईत मध्यम आचेवर तेल गरम करणे.
  • पोहे एकावेळी थोडे थोडे करून तळून घेणे.
  • तेलातून काढल्या काढल्या लगेच टिशू वर तेल शोषून घेण्यासाठी ठेवावे. २-३ भाग टिशूवर आले की त्यांना मसाल्याच्या मिश्रणात घालुन ढवळणे.
  • सगळे पोहे तळून झाल्यावर एक दोन चमचा तेल गरम करावे व त्यात शेंगदाणे तळून घेणे.
  • त्याच तेलात म्हवारीची फोडणी करणे व त्यात हिंग, कडीपत्ता आणि फुटाणे डाळ घालुन २ मिनिट तळून घेणे.
  • त्यात शेंगदाणे आणि उरलेले १/२ चमचा तिखट घालुन चिवड्यात घालणे व ढवळणे.

टीप
कढईत थोडे थोडे तेल घालूनच पोहे तळावे कारण तेल काळे पडते त्यामुळे जास्त तेल वाया नाही जात
तेलात गाळणी ठेवून त्यात पोहे घातल्यानी ते बाहेर काढायला सोप्पे जाते
मी पोह्याचे तेल शोषून घेण्यासाठी त्यांना टिशूवर काढले पण पोहे गरम असतानाच मसाल्यात घालावे नाहीतर मसाला त्यांना नीट चिकटत नाही.

चकली


ह्या दिवाळीला मी थोडा फराळ करण्याचे ठरवले. त्याची तयारी आईकाढून त्याच्या कृती घेण्यापासून झाली. जेंव्हा मी चकलीची कृती पहिली, मला विश्वास नव्हता की ती बनवणे इतके सोप्पे आहे.

चकली
साहित्य
२ वाटी तांदुळाचे पीठ
१ चमचा मैदा
१/२ चमचा तिखट
१/४ चमचा तील
१/४ चमचा ओवा
१/४ वाटी लोणी
तेल
मीठ

कृती
  • तांदुळाचे पीठ, मैदा, तीळ, ओवा, तिखट आणि मीठ एकत्र करणे.
  • त्यात लोणी घालुन चांगले मळणे.
  • पाणी घालुन मऊ पीठ भिजवणे.
  • त्यातला अर्धा भाग चकलीच्या पत्रात घालणे.
  • तेल उंच आचेवर गरम करणे व लगेच आच मध्यम करून त्यात चकली बनवून तळणे.
  • दोन्ही बाजूनी गुलाबी झाल्यावर चकली तेलातून काढणे. उरलेल्या चकल्या तळताना तेल चांगले गरम असल्याची खात्री करणे.
  • चकल्या थंड झाल्यावर एअर टाईट डब्यात ठेवणे.

टीप
जर घरचे लोणी वापरायचे असेल तर थंड पाण्यानी ते धुवून घ्यावे.
चकली गुलाबी असतानाच बाहेर काढावी कारण नाहीतर ती करपेल.

अननसाचा मुरंबा


मागच्या महिन्यात आम्ही एक मोठा अननस आणलेला. मला आईचा मुरंबा आठवला. लगेच आईला फोन केला आणि तेंव्हा कळले की बनवायला किती सोप्पा आहे ते. मी त्याच रात्री बनवून टाकला.

अननसाचा मुरंबा
साहित्य
५ वाटी अननस
३ वाटी पाणी
१.५ वाटी साखर

कृती
  • अननस पाण्यात बुडेल इतके पाणी घालुन मध्यम आचेवर झाकण लावून शिजवावा.
  • अननस गाळून पाणी वेगळे करणे.
  • त्याच पाण्यात साखर घालुन उकळी आणणे. मध्यम आचेवर सारखे ढवळत एक तारी पाक बनवणे.
  • त्यात शिजवलेला अननस घालुन अजून एकदा उकळी आणणे.
  • थंड करून फ्रीजमध्ये ठेवणे.

टीप
मुरंबा फ्रीजमध्ये ठेवावा म्हणजे थोडे महिने चांगला राहतो.
चपाती किंवा पराठ्याबरोबर एकदम छान लागतो
मला फार जास्त पाक आवडत नाही त्यामुळे वरच्या प्रमाणात कमी गोड व कमी पाक होतो. त्यात अजून १ वाटी पाणी आणि अर्धा वाटी साखर घालुन जास्त पाक बनवता येईल.

कोळंबीचे पॅटिस


भारतात असताना मी एक दोनदा पॅटिस बनवण्याचा प्रयत्न केलेला. पण त्याला कधीच चांगले पापुद्रे आले नाहीत. बरेच किचकट आणि पसारा करणारे काम होते. त्यामुळे इथे मी बाजारातल्या पफ पेस्ट्री शिटचा वापर करण्याचे ठरवले. एकदम छान झालेले पण अजूनही मनातली शिटपण स्वतः बनवण्याची इच्छा गेली नाहीये.

कोळंबीचे पॅटिस
साहित्य
2 पफ पेस्ट्री शिट
१ वाटी कोळंबी
१ टोमाटो
२ कांदा
४ लसूण पाकळ्या
१ चमचा धने पूड
१ चमचा तिखट
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा जिरे पूड
१/२ चमचा मिरे पूड
चिमुटभर हळद
१ अंडे
मीठ
तेल

कृती
  • पफ पेस्ट्री शिट फ्रीजमधून काढून त्यांना नेहमीच्या तापमानावर आणावे.
  • त्या वेळात कढईत तेल गरम करून त्यात कांदा भाजून घेणे
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालणे आणि पूर्ण पणे शिजवणे.
  • त्यात कोळंबी आणि लसूण घालुन अजून २-३ मिनिट शिजवणे.
  • त्यात हळद, तिखट, गरम मसाला, जिरे पूड, मिरे पूड आणि मीठ घालणे व तेल बाजूला निघेपर्यंत भाजणे.
  • त्यात धने पूड घालुन अजून एक-दोन मिनिट शिजवणे व बाजूला ठेवणे.
  • ओव्हन २००C/४००F वर गरम करणे.
  • बेकिंग ट्रेला तुपाचा किंवा लोण्याचा हात लावणे.
  • प्रत्येत पेस्ट्री शिटला ३ उभ्या भागांत आणि २ आडव्या भागात कापून त्याचे १२ तुकडे करणे. प्रत्येक तुकड्यावर कोळंबीचे मिश्रण घालुन दुमडून बेकिंग ट्रेवर ठेवणे.
  • अंडे फेटून घेणे व एक टिशू त्यात बुडवून पफ वर फिरवणे.
  • ओव्हन मध्ये २००C/४००F वर १५ मिनिट भाजणे व गरम गरम खायला देणे.

टीप
मी मध्यम आकाराचे कोळंबी वापरलेली त्यामुळे मला त्याचे तुकडे करावे लागले नाहीत
अंड्याचा वापर केल्यानी वरून एकदम छान गुलाबी होतात.

कांदा भजी


मी ह्या प्रकारची भजी खूप कमी वेळा बनवते कारण मला खेकडा पद्धतीची भजी फार आवडते पण मागच्या आठवड्यात ह्या प्रकारची भजी खावीशी वाटली म्हणून बनवलेली.

कांदा भजी
साहित्य
२ कांदे
१/२ वाटी बेसन
१/४ वाटी कोथिंबीर
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा जिरे पूड
मीठ
तेल

कृती
  • कांदा बारीक चिरून त्यात मीठ घालणे व ५-१० मिनिट बाजूला ठेवणे.
  • त्यात बेसन, कोथिंबीर पाने, तिखट, हळद, धने पूड, जिरे पूड घालुन चांगले एकत्र करणे व पेस्ट बनवणे. लागल्यास थोडेसे पाणी घालणे.
  • कढईत तेल गरम करून त्यातले एक चमचाभर तेल पिठात घालणे व ढवळणे.
  • छोट्या छोट्या आकाराचे भजी तेलात टाकून गुलाबी रंगावर तळणे.

टीप
मी नेहमी कांद्याला मीठ लावून बाजूला ठेवते त्यामुळे त्याला सुटलेले पाणी भजीचे पीठ भिजवायला वापरता येते व पीठ नंतर पातळ होत नाही.
मी पिठात गरम तेल घातल्यानी सोडा वापरावा लागला नाही व तरीसुद्धा चांगली खुसखुशीत झालेली

गरम मसाला


सगळ्यात पहिल्यांदा हा माझा प्रयोग नसून माझ्या आईची खासियत आहे. कोणीही मला गरम मसाल्याविषयी विचारले की मी नेहमी आईचे नाव सांगायचे. आता मी पुण्यात असल्यानी शेवटी मला ह्याची कृती बघण्याला मिळाली आणि म्हणूनच मी इथे ती देत आहे. खूप किचकट आणि मोठे काम असलेतरी मसाला एकदम मस्त बनतो.

गरम मसाला
साहित्य
५०० ग्राम धने
५० ग्राम जिरे
५० ग्राम बडीशेप
४० ग्राम खसखस
२० ग्राम तेज पत्ता
१० ग्राम बादल फुल
१० ग्राम मसाला वेलची
१० ग्राम जायपत्री
१० ग्राम नाक केसर
१० ग्राम दालचिनी
१० ग्राम मिरे
१० ग्राम लवंग
५ ग्राम हळद काडी
१/२ जायफळ
१ कम हिंग तुकडा
२० ग्राम दगड फुल
२० ग्राम शाही जीरा
तेल

कृती
  • कढईत १/२ चमचा तेल गरम करणे. त्यात जायपत्री घालुन मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजणे. मिक्सरच्या भांड्यात घालणे.
  • त्याच कढईत तेलाचे २ थेंब आणि नाक केसर घालुन साधारण ३ मिनिट मंद आचे वर फुलेपर्यंत भाजणे. मिक्सरच्या भांड्यात घालणे.
  • त्याच कढईत अजून २ थेंब तेल घालुन त्यात दगडी फुल घालुन मंद आचेवर ३ मिनिट भाजणे व मिक्सरमध्ये घालणे.
  • २ थेंब तेल घालुन लवंग मंद आचेवर ३-४ मिनिट फुलेपर्यंत भाजणे व मिक्सरमध्ये घालणे
  • कढईत २ थेंब तेल घालुन मिरे मंद आचेवर ४ मिनिट भाजणे. मिक्सरमध्ये घालणे
  • तेलाचे २ थेंब घालुन त्यात दालचिनी मन आचेवर गडद होईपर्यंत भाजणे व मिक्सर मध्ये घालणे.
  • कढईत तेलाचे २ थेंब घालुन त्यात बडीशेप मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजणे व मिक्सरमध्ये घालणे.
  • जायफळाचे तुकडे करून मंद आचेवर १ थेंब तेलाबरोबर २ मिनिट भाजणे व मिक्सरमध्ये घालणे.
  • हिंगाचे तुकडे करून ते १ थेंब तेलाबरोबर मंद आचेवर पांढरे होईपर्यंत भाजणे व मिक्सरमध्ये घालणे
  • हळदीच्या तुकड्याचे बारीक तुकडे करून ते १ थेंब तेलाबरोबर मंद आचेवर लाल होईपर्यंत भाजणे व मिक्सरमध्ये घालणे.
  • त्याच कढईत २ थेंब तेल घालुन तेज पत्ता ३ मिनिट मंद आचेवर भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • २ थेंब तेलाबरोबर बादल फुल मंद आचेवर २ मिनिट भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • २ थेंब तेलाबरोबर मसाला वेलची मंद आचेवर २ मिनिट भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • १ थेंब तेलाबरोबर जीरा गडद होईपर्यंत मंद आचेवर भाजून मिक्सरच्या भांड्यात घालणे.
  • शाही जीरा १ थेंब तेलाबरोबर २ मिनिट मंद आचेवर भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • खसखस १ थेंब तेलाबरोबर १ मिनिट मंद आचेवर भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • मिक्सरमधील सगळे मसाले एकत्र बारीक वाटणे व चाळून घेणे. चाळणीत उरलेली मसाल्याची पूड पुन्हा मिक्सरमध्ये घालणे.
  • पुन्हा बारीक वाटून पूड चालणे व वर राहिलेले मसाले पुन्हा मिक्सरमध्ये घालणे.
  • २ चमचा तेल घालुन निम्मे धने मध्यम आचेवर भाजून घेणे. धने फुटायला लागले की आच मंद करून अजून १ मिनिट भाजणे. निम्मे धने मिक्सरमध्ये घालणे व वाटणे.
  • मसाला पुन्हा चाळणे व वर राहिलेला मसाला पुन्हा मिक्सरमध्ये घालणे. उरलेले भाजलेले धने घालुन वाटणे व चाळून घेणे. चाळणीत राहिलेले मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये घालणे.
  • २ चमचा तेल घालुन उरलेले धने मध्यम आचेवर भाजून घेणे. धने फुटायला लागले की आच मंद करून अजून १ मिनिट भाजणे. निम्मे धने मिक्सरमध्ये घालणे व वाटणे.
  • मसाला पुन्हा चाळणे व वर राहिलेला मसाला पुन्हा मिक्सरमध्ये घालणे. उरलेले भाजलेले धने घालुन वाटणे व चाळून घेणे. चाळणीत राहिलेले मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये घालणे.
  • मिक्सरमध्ये वाटून पुन्हा मसाला चाळणे. सगळा मसाला चांगला एकत्र करणे.

टीप
दिलेल्या प्रमाणातच तेल वापरणे नाहीतर मसाले वाटायला फार त्रास होतो.
दिलेल्या क्रमातच मसाले भाजून वाटणे म्हणजे त्याचा वास चांगला राहतो
सगळ्यात शेवटी चाळणीत उरलेले मसाले मांसाहारी कृतीत किंव्हा कुठल्याही वाटणात वापरता येईल
वरील साहित्यात ३/४ किलो मसाला होतो

पालकाच्या भजीची कढी


आम्ही अगदी लहान होतो तेंव्हापासून बाबा आईला त्यांच्या ऑफिसच्या कढीचे कौतुक सांगत आलेले बघितलंय. आई बिचारी नेहमी तशी (तिनी कधीही न खालेली) कढी बनवण्याचा प्रयत्न करायची पण यश बाबांच्या मते काही आले नाही :) त्यामुळे अर्थातच लहान असताना आम्ही आठवड्यातून दोनदा तरी हि कढी खायाचोच. ताकापेक्षा कढी बरी कारण खोकला नाही होणार त्यामुळे कढी कढी जास्तच वेळा. मी हि कढी बनवताना नेहमीच्या भजीऎवजी पालक वापरायचा ठरवला.

पालकाच्या भजीची कढी
साहित्य
३ वाटी पालक भजी
६ वाटी ताक
चिमुटभर हळद
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
३ चमचा साखर
१ चमचा तूप
मीठ

कृती
  • ताकात साखर आणि मीठ घालुन चांगले विरघळवणे.
  • कढईत तूप गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे
  • त्यात हिंग, हळद टाकून टाकत मिसळणे.
  • वाढताना कढीत भजी घालुन देणे.

टीप
कढीच्या फोडणीत कडीपत्ता पण घालता येईल पण मला तो फारसा आवडत नसल्यानी मी वापरला नाही.

कांदा पोहे


बरेच मित्र मैत्रिणी मला पटकन बनणाऱ्या आणि सोप्या नाश्त्याच्या कृती मागत आहेत. म्हणूनच इथे महाराष्ट्रातील अगदी घराघरात हमखास बनवला जाणारा सोप्पा आणि चविष्ठ पदार्थ देत आहे.

कांदा पोहे
साहित्य
२ वाटी पोहे
१/२ वाटी मटार
१ कांदा
चिमुटभर हळद
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचा जीरा
४ हिरव्या मिरच्या
४ चमचे किसलेले खोबरे
४ चमचा कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • पोहे धुवून त्यातील जास्तीचे पाणी ओतून झाकून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात म्हवरी व जीऱ्याची फोडणी करणे.
  • त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालुन भाजणे.
  • कांदा बारीक चिरून घालणे व पारदर्शक होईपर्यंत भाजणे.
  • त्यात हळद घालुन ढवळणे.
  • धुवून व भिजवून मऊ झालेले पोहे त्यात घालुन चांगले एकत्र करणे.
  • झाकणी ठेवून मंद आचेवर २-३ मिनिट वाफ येऊ देणे.
  • झाकणी काढून त्यात मीठ व मटार मिसळणे व पुन्हा ३-४ मिनिट झाकणी ठेवून मंद आचेवर वाफ काढणे.
  • ताटलीत खायला देताना वरून खोबरे व कोथिंबीर घालुन देणे.

टीप
पोहे धुवून झाकून बाजूला ठेवणे फार महत्वाचे आहे त्यामुळे ते चांगले मऊ होतात. जर पोहे थोडे कडकडीत वाटत असतील तर थोडे पाणी शिंपडणे. तसेच जास्तीचे पाणी काढायला पण विसरू नये नाहीतर पोहे जास्तच मऊ होतील व त्याचा लगदा होईल
मटारच्याऎवजी फोडणी बरोबर भाजलेले शेंगदाणेपण वापरता येतील, अजॉयला फार आवडतात
पोह्यात १/२ वाटी बटाट्याचे तुकडेपण फोडणीत घालता येतील व कांदा बटाटा पोहे बनवता येतील

कटाची आमटी


हि आमटी पुरण पोळीच्या डाळीच्या उरलेल्या पाण्यातून बनवतात. एकदम गोड आणि आंबट अशी हि आमटी पुरण पोळी बरोबर एकदम मस्त लागते.

कटाची आमटी
साहित्य
२ वाटी हरबरा डाळ शिजवलेले पाणी
१/२ वाटी पुरण
१/२ वाटी गुळ
२ चमचा चिंच
१ चमचा धने
१ चमचा जिरे
१/२ चमचा म्हवरी
१ चमचा तिखट
४ चमचा खोबरे
१५ कडीपत्याची पाने
मीठ
तेल

कृती
  • चिंच एक वाटी पाण्यात भिजवणे व बाजूला ठेवणे.
  • चमचाभर तेल गरम करून त्यात धने आणि जिरे फोडणी करणे.
  • किसलेले खोबरे घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • मिक्सरमध्ये खोबऱ्याचे मिश्रण घालुन चिंचेबरोबर बारीक वाटणे.
  • अर्धा चमचा तेल गरम करून त्यात म्हवरी घालुन फोडणी करणे.
  • कडीपत्ता घालुन भाजणे
  • त्यात चिंच खोबऱ्याचे वाटण घालणे व एक मिनिट भाजणे.
  • तिखट घालुन अजून एक मिनिट भाजणे.
  • डाळीचे पाणी, पुरण आणि गुळ घालणे. जाड वाटल्यास थोडे पाणी पण घालणे.
  • मीठ घालुन आमटी उकळवणे.

टीप
डाळीचे पाणी नसेल तर साधे पाणी पण वापरता येईल
पुरण बनवण्यासाठी ह्या पुरण पोळीच्या कृतीचा उपयोग करणे

पुरण पोळी


पुरण पोळी हा असा एक प्रकार आहे जो मला आईनी बनवलेलाच आवडतो. बरेच लोक त्याला पराठ्यासारखा बनवतात पण पोळी आणि पराठा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पोळी हि एकदम मऊसुत असणे एकदम महत्वाचे आहे. आईकाढून आधी मी ह्याची कृती घेतलेली पण मला काही आई सारखी मऊ पोळी बनवायला जमली नाही. आता पुण्यात असताना मी आई कडून चांगली शिकून आले आणि इथे दसर्याच्या निमित्तानी देत आहे. सगळ्यांना दसर्याच्या शुभेच्छा.

पुरण पोळी
साहित्य
४ वाटी हरबरा डाळ
३ वाटी गुळ
२ वाटी पीठ
१ चमचा मैदा
१ वाटी तांदुळाचे पीठ
१/२ वाटी तेल

कृती
  • मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून एकदम मऊ पीठ भिजवणे.
  • पीठ स्टीलच्या भांड्यात टाकून बोटे दाबून खड्डे करणे.
  • सगळी भोके बुडतील इतके तेल ओतणे आणि कमीत कमी २ तास भिजायला ठेवणे.
  • हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घेणे.
  • डाळीतील जास्तीचे पाणी बाजूला काढणे. (जास्तीच्या पाण्याची कटाची आमटी बनवता येईल)
  • त्यात गुळ घालुन कढईत सुकेपर्यंत शिजवणे.
  • पुरण पुरण यंत्रातून फिरवणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • पुरण पोळी करण्यासाठी तवा एकदम मंद आचेवर गरम करणे.
  • पुरणाचा लिंबाच्या दुप्पट आकाराचा गोळा बनवणे.
  • पिठाचा लिंबाच्या आकाराचा गोळा बनवणे व त्याची वाटी बनवणे. त्यात पुरणाचा गोळा घालुन पीठ बंद करणे.
  • गोळे तळव्यावर ठेवून अलगद दाबणे. पीठाचे कव्हर बाजूला गेले तर ओढून पुन्हा आत मध्ये घेणे
  • भरपूर तांदुळाचे पीठ पोलपाटाला लावणे. पुरण पोळीचा गोळा तांदुळाच्या पिठात बुडवून लाटणे.
  • मध्ये मध्ये पोळी हातावर घेवून खाली चिकट नाही ह्याची खात्री करणे व मधून मधून तांदुळाचे पीठ लावत राहणे.
  • एकदम अलगद आणि बाहेरच्या दिशेनी लाटणे महत्वाचे आहे.
  • पोळी गरम तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूनी भाजणे. दुमडून वाढणे.

टीप
पोळीच्या पिठाचा इलॅस्टिकपणा पोळीला पातळ लाटण्यासाठी आणि त्याचा थर पातळ ठेवण्यासाठी उपयोगी पडतो.
पुरण पोळी बनवताना पहिल्यांदा छोटी लाटून बघणे व जसे जमेल तसे मोठे मोठे करणे. भरपूर तांदुळाचे पीठ वापरणे व नंतर पाहिजे तर स्वतःच्या सोयीप्रमाणे कमी करणे.
पोळी पोलपाटाला चिकट नाही हे बघण्यासाठी तळवा पोळीवर ठेवून पोलपाट उलटे करणे.तव्यावर पोळी टाकताना पण तसेच करणे. कधीही बोटांनी पोळी उचलू नये.
पोळीच्या कडांना जास्त पीठ असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की पुरणापेक्षा पीठ जास्त वापरलाय. त्या नंतरच्या पोळीला थोडे कमी पीठ वापरून बघणे
पोळी लाटताना बाहेरच्या बाजूला लाटल्यानी पोळी सगळीकडून चांगली पसरते आणि बाहेरच कव्हर पण तुटत नाही.
शेवटची टीप म्हणजे हि एकदम किचकट कृती आहे त्यामुळे पहिल्यांदा यश नाही आलेतरी दुखी होऊ नये, थोड्या प्रयत्नानंतर यश नक्की येईल. मी आईनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी सांगायचा प्रयत्न केलाय. आशा आहे त्याचा उपयोग होईल

कांद्याची खेकडा भजी


आज खूप जोरात पाऊस पडत होता आणि गरम गरम भजी खाण्याची इच्चा मी आवरू नाही शकले. पण जो पर्यंत भजी तयार झाली तोपर्यंत पाउस बंद झालेला :(

कांद्याची खेकडा भजी
साहित्य
२ कांदे
४ चमचे बेसन
५ चमचे कोथिंबीर
१ चमचा तिखट
१/४ चमचा धने पूड
मीठ
तेल

कृती
  • कांदा बारीक उभा चिरणे व त्याला मीठ लावून थोडा वेळ बाजूला ठेवणे.
  • ५-१० मिनिटांनी त्याला पाणी सुटेल, त्यात बेसन, तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने पूड आणि चमचाभर गरम तेल घालुन एकत्र करणे व भजीचे पीठ भिजवणे. लागल्यास पाणी वापरणे.
  • तेल गरम करून त्यात छोटे छोटे भजी गुलाबी होईपर्यंत तळणे.

टीप
ह्यांना खेकडा भजी म्हणतात ते त्यांच्या आकारामुळे.
मीठ आधी लावून ठेवल्यानी नंतर त्याचे पाणी सुटून पीठ पातळ होत नाही

पियुष


अगदी लहान असल्यापासून बाबा मला एफ सी रोडवरच्या बँकपासून लक्ष्मी रोडपर्यंत चालत घेऊन जायचे. मला ते चालणे फार आवडायचे ते एकमेव कारणाकरता. सगळ्यात शेवटी जनता दुग्ध मंदिरात पियुष प्यायला मिळायचा. जेंव्हा जेव्हा मी पुण्याला जाते तेंव्हा न चुकता खूप सारा पियुष पिऊन येते. २-३ वर्षांपूर्वी आईनी तो घरी बनवायला चालू केला. काल मी स्वतः करून बघितला आणि प्रयोग एकदम यशस्वी होता.

पियुष
साहित्य
५ वाटी दही
१ लिंबू
८ चमचा साखर
चिमुटभर जायफळ पूड
चिमुटभर पिवळा रंग
मीठ

कृती
  • दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करणे.
  • त्यात साधारण २-३ वाटी पाणी घालुन पातळ करणे.
  • मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.

टीप
मी एकदम जाड दुध वापरून दही बनवले व दह्याला आंबट होऊ दिले नाही. लिंबाची एकदम चांगली चव देते
बऱ्याचवेळा लिंबाच्या कडव्यामुळे हे कडू होते म्हणून आज मी १/२ चमचा व्हिनेगर वापरले आणि त्याचा एकदम खूप चांगला उपयोग झाला. कडूपणा नाही आणि चव पण एकदम बरोबर

मसाले भात


हा मराठी पदार्थ लग्नात किंवा कुठल्याही कार्यक्रमात एकदम असायलाच हवा. साधा, सोप्पा आणि चाविस्थ भाताचा प्रकार.

मसाले भात
साहित्य
१ वाटी बासमती तांदूळ
१/४ वाटी दही
१/२ वाटी तोंडली
१/२ बटाटा
१/४ वाटी मटार
१/२ वाटी कोथिंबीर
१/२ वाटी किसलेले खोबरे
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
८-९ काजू
चिमुटभर वेलची पूड
२ लवंग
१ दालचिनी
१ तेजपत्ता
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
१ चमचा तूप
मीठ

कृती
  • तांदूळ धुवून पाणी निथळवणे.
  • त्यात तिखट, गरम मसाला, वेलची पूड, दही घालुन १० मिनिट ठेवणे.
  • कुकरमध्ये तूप घालुन त्यात म्हवरीची फोडणी करणे.
  • त्यात हिंग, तेजपत्ता, दालचिनी आणि काजू घालुन एक दोन मिनिट परतणे.
  • त्यात उभी चिरलेली तोंडली, चौकोनी चुरून बटाटा घालुन अजून दोन मिनिट परतणे.
  • त्यात तांदूळ, मटार आणि मीठ घालुन दोन मिनिट परतणे.
  • भातात २ वाटी पानिओ घालुन कुकरचे झाकण लावून ४ शिट्ट्या काढणे.
  • वाढताना ताटात भातावर खोबरे, कोथिंबीर आणि तूप सोडून देणे.

टीप
ह्यात फ्लावर किंवा वांगेपण वापरता येईल
खोबरे आणि कोथिंबीर घातल्यानी एकदम मस्त आणि वेगळी चव ह्या भाताला येते

श्रीखंड


हा आम्रखंडसारखा आणखीन एक चक्क्याचा पदार्थ.

श्रीखंड
साहित्य
१/२ लिटर दुध
३/४ वाटी साखर
चिमुटभर केशर
१ चमचा दुध पूड
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर दालचिनी पूड
२ चमचे नारिंगी रंग
५-६ बदाम
१० पिस्ता

कृती
  • Warm the milk
  • दुध कोमट करून त्यात दही एकत्र करून ६-८ तास गरम जागी ठेवून दही लावणे.
  • पंचावर दही ओतून ते टांगून ८-१० ठेवणे म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल व चक्का तयार होईल.
  • चक्क्यात साखर घालुन दोन तास ठेवणे.
  • १/४ वाटी पाणी गरम करून त्यात दुधाची पूड, केशर, दालचिनी पूड, वेलची पूड घालुन एकत्र करणे.
  • हे मिश्रण चक्क्यात घालुन पुरण यंत्रातून फिरवणे
  • त्यात बदाम आणि पिस्ते घालुन खायला देणे.

टीप
साखर चक्क्यात एकत्र करून ठेवल्यानी चांगली एकत्र होते नाहीतर दही आंबट होऊन साखर वेगळी राहते.
दुधाच्या पूड मध्ये पाणी घालुन मिश्रण बनवण्याऎवजी १/४ वाटी दुध वापराता येईल पण माझ्याकडचे दुध संपल्यानी मी दुधाची पूड वापरली

दडपे पोहे


जेंव्हा मला पटकन होणारा पण चविष्ठ पदार्थ नाश्त्यासाठी बनवण्याची इच्छा होते तेंव्हा हा पदार्थ मनात येतो

दडपे पोहे
साहित्य
३.५ वाटी पातळ पोहे
१ कांदा
२ टोमाटो
१ चमचा साखर
१.५ लिंबू
१/२ वाटी शेंगदाणे
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचा जिरे
२ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा हळद
१ चमचा तेल
मीठ

कृती
  • पातळ पोह्यात टोमाटो आणि कांदा बारीक चिरून घालणे.
  • त्यात साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालुन चांगले एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात शेंगदाणे तळून घेणे व ते पोह्यात घालणे.
  • त्याच तेलात म्हवरी, जीरा, मिरच्यांचे तुकडे घालुन फोडणी करणे व त्यात हळद घालणे.
  • फोडणी पोह्यात घालुन ढवळणे व खायला देणे.

टीप
ह्यात पोह्यांना धुवायचे नसते कारण ते खूप पातळ असल्यानी लिंबाचा आणि टोमाटोचा रस त्यांना मऊ करण्यासाठी पुरेसा असतो.

भोपळ्याची पुरी


थोड्या दिवसांपूर्वी आई इथे आली असताना तिनी अश्या पुऱ्या बनवलेल्या आणि मला त्या फार आवडलेल्या. आज मी स्वतः बनवल्या आणि इथे कृती देत आहे

भोपळ्याची पुरी
साहित्य
२ वाटी भोपळा
३/४ वाटी गुळ
३ वाटी गव्हाचे पीठ
मीठ
तेल

कृती
  • भोपळ्याचे साल काढून किसून घेणे.
  • २ चमचे तेल गरम करून त्यात भोपळ्याचा कीस घालुन मध्यम आचेवर ५ मिनिट शिजवणे.
  • आचेवरून बाजूला करून त्यात किसलेले गुळ घालुन एकत्र करणे.
  • मिश्रण थंड झाले की त्यात मीठ, गव्हाचे पीठ घालुन घट्ट पीठ मळणे.
  • पुऱ्या लाटून तळणे.

टीप
ह्या पुऱ्या थोडे दिवस ठेवता येतात त्यामुळे प्रवासात खायला चांगला पदार्थ आहे.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP