Showing posts with label लोणी. Show all posts
Showing posts with label लोणी. Show all posts

बदाम पिस्ता क्रेझीन बिस्कॉटी


मी हल्लीच इकडल्या लायब्ररीची जादू आणि ताकद बघितली. लायब्ररीत पाय टाकताच मला कळलेले कि मी इथून भरपूर पुस्तके घेणार आहे. त्या आठवड्यात मी ५ पेक्षाही जास्त वेळ घालून वेगवेगळ्या विषयावर ४० पुस्तके घरी आणली :) एका डेझर्टच्या पुस्तकात हि कृती होती आणि पहिल्यांदा मी ती साधारण तशीच्या तशी वापरून हे बिस्कॉटी बनवलेले. पण त्यानंतर मी बनवताना मैदा, लोणी वगैरे बरच काही वेगळ्या प्रमाणात वापरले आणि ते एकदम मस्त कुरकुरीत शलेले. आता कमीत कमी एका आठवड्याचे ४ वाजता खाण्याचा खाऊ तयार आहे :)


बदाम पिस्ता क्रेझीन बिस्कॉटी
साहित्य
३/४ वाटी लोणी
२.२५ वाटी साखर
६.२५ वाटी मैदा
२ चमचे बेकिंग पूड
२ लिंबाची साल किसून
४ अंडी
१ वाटी बदाम
१ वाटी पिस्ता
१ वाटी क्रेझीन
२ चमचे बडीशेप
१ चमचा मीठ

कृती
  • ओव्हन ३५०F/१७५C वर गरम करणे.
  • एका भांड्यात लोणी आणि साखर एकत्र एकजीव होईपर्यंत फेटणे, साधारण एक मिनिट.
  • मैदा, बेकिंग पूड, मीठ आणि लिंबाची किसलेली साल त्यात घालून एकत्र घालून फेटणे.
  • त्यात एकावेळी एक अंडे घालत फेटणे
  • त्यात बदामाचे, पिस्त्याचे तुकडे, क्रेझीन आणि बडीशेप घालून पुन्हा फेटणे
  • ओट्यावर थोडा मैदा शिंपडून मिश्रण टाकणे. नीट मळून त्याचे १२ इंचाचे व साधारण १ इंचापेक्षा थोडेसे जास्त उंचीचे २ लांब गोळे बनवणे.
  • बेकिंग तव्यावर बटर पेपर घालून त्यावर हे गोळे ठेवणे
  • ओव्हनमध्ये ३५०F/१७५C वर ३० मिनिट भाजणे. नंतर १० मिनिट बाहेर थंड होऊ देणे
  • धारधार सुरीने त्याचे १/२ इंच रुंदीचे तुकडे करणे
  • बेकिंग तव्यावर चिरलेली बाजू वरती ठेवून तुकडे पसरणे व ओव्हनमध्ये ३५०F/१७५C वर २५ मिनिट भाजणे
  • बिस्कॉटी थंड होऊ देणे व त्यानंतर डब्यात भरणे

टीप
मी बदाम, पिस्ते आणि क्रेझीन वापरले पण त्याऐवजी कुठलेही नट्स वापरता येतील. ह्यावेळी मी बडीशेप घालायला विसरलेले पण ह्या आही मी ती घातलेली आणि त्यांनी मस्त चव आणि वास आलेला आणि सगळ्यांना खूप आवडलेले
मी फेटण्यासाठी किचनएडचा स्टँडिंग मिक्सर वापरला पण हातातला मिक्सरपण वापरता येईल

पेर बार


मी काल काहीतरी नवीन आणि १-२ तासात तयार होईल असे काहीतरी बेक करायला शोधत होते.शोध लेमन बार, जे मी एका महिन्यापूर्वी बनवलेले त्याच्या वेगळ्या प्रकारावर संपला. लेमन बारमध्ये मला जरा अंड्याची चव आणि वास जास्त वाटलेला त्यामुळे मी कमी अंडे वापरून काहीतरी बनवण्याचे ठरवले. तेंव्हाच मला चीजकेक आणि बार चे फ्युजन बनवण्याचे सुचले. हा माझा सगळ्यात जास्त साहशी प्रयत्न होता कारण मी तो घरी येणाऱ्या मित्रांसाठी केलेला पण नशिबानी हि दिश जमून गेली.

पेर बार
साहित्य
१ वाटी लोणी
२.२५ वाटी साखर
१.५ अंडे
१.५ वाटी मैदा
२.५ वाटी व्हॅनिला इसेन्स
२.७५ वाटी पीकॅन
१२ आउन्स क्रीम चीज
२ पेर
१/२ चमचा जायफळ पूड

कृती
  • ओव्हन ३५०F/१७५C वर गरम करणे.
  • हातातला मिक्सर वापरून लोणी चांगले फेटून घेणे.
  • त्यात २/३ वाटी साखर घालून आणखीन फेटणे.
  • त्यात एक चमचा व्हॅनिला इसेन्स, मैदा चाळून घालणे व फेटणे.
  • त्यात पीकॅन तुकडे करून मिसळणे.
  • ६ इंचाच्या २ बेकिंगच्या भांड्यांना लोण्याचा हात लावणे व त्यात बनवलेले मिश्रण अर्धे अर्धे वाटून पसरवणे.
  • ओव्हनमध्ये ३५०F/१७५C वर २२ मिनिट भाजणे.
  • भांडी ओव्हनमधून बाहेर काढून ३० मिनिट थंड होऊ देणे
  • एका भांड्यात हातातला मिक्सर वापरून क्रीम चीज फेटणे
  • त्यात १.५ वाटी साखर, अंडे आणि उरलेला १.५ चमचा व्हॅनिला इसेन्स घालून एकजीव होईपर्यंत फेटणे
  • पेरचा मधला भाग कापून टाकून उरलेल्या भागाचे उभे तुकडे करणे व त्यात १ चमचा साखर घालून बाजूला ठेवणे
  • ओव्हन ३७५F/१९०C वर गरम करणे.
  • बेकिंगच्या भांड्यात क्रीम चीजचे मिश्रण दोन्ही भांड्यात निम्मे निम्मे पसरवणे
  • त्यावर पेरचे तुकडे पसरवणे
  • पेरच्या तुकड्यांवर जायफळ आणि उरलेली (साधारण एक चमचा) साखर शिंपडणे
  • ओव्हनमध्ये ३७५F/१९०C वर ३५ मिनिट भाजणे.
  • ओव्हनमधून बाहेर काढून साधारण ३० मिनिट थंड होऊ देणे. त्यानंतर कमीत कमी १ तास फ्रीजमध्ये थंड करून मग चौकोनी तुकडे करून वाढणे

टीप
१.५ अंडे मोजणे जरा अवघड आहे :) पण मी पहिल्यांदा १ अंडे आणि १ चीजचे पाकीट वापरून मिश्रण बनवण्याचा प्रयत्न करत होते पण ते मिश्रण पुरेसे नाही पडले म्हणून मी अजून एक अंडे फेटले आणि त्याचा निम्मा भाग वापरला. त्यामुळे जर दोन भांड्यांच्याऐवजी एक ८-९ इंचाचे भांडे वापरायचे असेल तर एका अंड्याचे मिश्रण कदाचित पुरेसे असेल. त्यासाठी १ अंडे, १ क्रीम चीजचे पाकीट, १ वाटी साखर आणि १ चमचा व्हॅनिला इसेन्स वापरायचा.
मी पीकॅन वापरले कारण माझ्याकडे ते घरीच होते पण कुठलेही नट्स वापरता येईल
मी थोडे जास्त पिकलेले पर वापरले त्यामुळे ते चांगले मऊ होते आणि त्यामुळे शेवटी तुकडे कापताना निघून येत नाहीत.
ओव्हनमधून शेवटी जेंव्हा डेझर्ट बाहेर काढतो तेंव्हा कदाचित थोडे पाणी वरती दिसेल पण काळजी करू नये, ते थंड झाल्यावर सेट होते

लिंबू आणि अ‍ॅप्रिकॉटचा केक


मी अजॉयच्या वाढदिवसासाठी पाउंड केक सारखा पण थोडा जास्त रिच असा केक शोधात होते. त्याला प्लेन केक हा प्रकार फार आवडतो त्यामुळे त्याच्यासारखाच पण थोडा भारी :) असा हा केक मी माझ्याकडच्या एका पुस्तकातील कृती बघून आणि थोडा आमच्या चवीनुसार प्रमाण बदलून केला. मला ह्या केक मध्ये लिंबू नाहीतर संत्र वापरायाचच होत, इतके दिवस फूड नेटवर्कवरच्या कार्यक्रमात त्यांच्या सालीचा वापर करताना बघून प्रत्यक्षात कसा लागत हे जरा जाणून घ्यायचं होत त्यामुळे ह्यात मी लिंबाचा वापर केलाय

लिंबू आणि अ‍ॅप्रिकॉटचा केक
साहित्य
३ वाटी मैदा
१७५ ग्राम अ‍ॅप्रिकॉट
१ वाटी बदाम
१.२५ वाटी पिस्ता
२/३ वाटी उभे चिरलेले बदाम
२ वाटी साखर
१ + १/३ वाटी लोणी
१.२५ चमचा बेकिंग पूड
३ अंडी
१/३ चमचा मीठ
१ मोठं लिंबू

कृती
  • ओव्हन १८०C/३५०F वर गरम करणे.
  • एका मोठ्या भांड्यात लोणी आणि १.५ वाटी साखर एकत्र करून घोटणे.
  • मैदा आणि बेकिंग पूड एकत्र ३-४ वेळा चाळून घेणे व लोणी-साखरेच्या मिश्रणात घालणे.
  • त्यात अंडी, मीठ, लिंबाची साल किसून, १/२ वाटी कोमट पाणी घालुन पुन्हा एकत्र फेटणे.
  • त्यात बारीक चिरलेले अ‍ॅप्रिकॉट, १ वाटी बदाम पूड करून आणि १ वाटी पिस्ता बारीक चिरून अलगद एकत्र करणे.
  • लोफच्या किंवा केक बनवायच्या कुठल्याही आकाराच्या भांड्याला लोण्याचा हात लावून पार्चमेंट कागद खाली व बाजूना लावणे. त्यात केकचे मिश्रण चमच्यानी घालुन एकसारखे करणे.
  • उरलेले पिस्ता आणि चिरलेले बदाम वर घालुन ते अलगद मिश्रणात दाबणे
  • केक ७५ मिनिट १८०C/३५०F वर भाजणे. साधारण ५० मिनिट भाजल्यावर त्यावर अल्युमिनियमचा कागद वरून लावणे व उरलेला वेळ भाजणे.
  • ओव्हनमधून केक बाहेर काढून १० मिनिट थंड होण्यासाठी बाहेर ठेवणे.
  • त्यावेळात मध्यम आचेवर लिंबाचा रस आणि उरलेली साखर एकत्र करून ती विरघळेपर्यंत व त्यानंतर थोडे बुडबुडे येईपर्यंत शिजवणे.
  • मिश्रण गरम असताना केकवर ओतणे व केक अलगद बाहेर काढणे व थंड होण्यासाठी ठेवणे.

टीप
केक भाजताना मध्ये अल्युमिनियमचा कागद लावल्यानी वर लावलेले बदाम आणि पिस्ते जास्त भाजून करपत नाहीत.

शेव बटाटा दही पुरीसाठी(SPDP) पुरी


इथे आल्यापासून शेव बटाटा दही पुरीसाठी(SPDP) पुरी कधी मिळाल्याच नाही. पाणी पुरीच्या पुऱ्या वापरणे योग्य नाही वाटले. अजॉयचा आवडता पदार्थ असल्यानी मी पुऱ्या घरी बनवण्याचे ठरवले. थोड्या प्रयोगानंतर ही कृती एकदम चांगल्या पुऱ्या बनवते. आता मित्रमैत्रिणीनी पण त्यावर संमती दिलीये :)

शेव बटाटा दही पुरीसाठी(SPDP) पुरी
साहित्य
१ वाटी मैदा
२ चमचे रवा
१/४ वाटी लोणी
तेल
मीठ

कृती
  • मैदा, रवा आणि मीठ एकत्र करणे.
  • त्यात वितळवलेले लोणी घालणे.
  • १/४ वाटी पाणी घालुन मऊसर पीठ मळणे.
  • १/४ चमचा तेल घालुन पुन्हा मळणे व भिजवण्यासाठी तासभर ठेवून देणे.
  • पीठाचे गोळे बनवून पातळ लाटणे. वाटी वापरून किंवा कुकीकटर वापरून छोट्या पुऱ्या कापणे.
  • तेल गरम करून मध्यम आचेवर पुऱ्या गुलाबी रंगावर भाजून घेणे. तेल शोषून घेण्यासाठी पुऱ्या टिशूवर काढणे
  • ओव्हन ३५०F/१७५C वर गरम करणे व पुऱ्या १० मिनिट भाजून घेणे.

टीप
पुऱ्या जर पातळ लाटल्या तर जास्त फुगत नाही आणि जश्या पाहिजे तश्या कुरकुरीत बनतात.
मी पुऱ्या ओव्हन मध्ये भाजून घेतल्या त्यामुळे जो काही मऊसर पणा उरलेला तो निघून गेला.

चॉकलेट गनाश


मी हे गनाश ह्या एकदम चविष्ठ अंड्याविना चॉकलेट केकसाठी बनवले. बनवण्यासाठी एकदम सोप्पे आणि एकदम सुंदर आणि बाहेर हॉटेलमध्ये मिळते तसे हे आईसिंग माझे आवडते आहे.

चॉकलेट गनाश
साहित्य
२ वाटी सेमीस्वीट चॉकोचिप्स
१ वाटी क्रीम
१ चमचा लोणी

कृती
  • एका भांड्यात १ चॉकोचिप्स आणि लोणी घालुन १ मिनिट मायक्रोवेव्ह करणे.
  • त्यात अर्धा वाटी क्रीम आणि उरलेले १ वाटी चॉकोचिप्सघालुन फेटणे.
  • मिश्रण अजून ३० सेकंद मायक्रोवेव्ह करणे.
  • त्यात उरलेले अर्धा वाटी क्रीम घालुन मिश्रण एकजीव होऊन चमकेपर्यंत ढवळत राहणे.

टीप
मायक्रोवेव्हच्याऎवजी डबलबॉईलर (उकळत्या पाण्याच्या भांड्यावर दुसरे भांडे ठेवून) वापरून पण चॉकलेट वितळवता येईल पण मायक्रोवेव्हमुळे एकदम सोप्पे आणि स्वत्च्छ काम होते.

पांढरे चॉकलेट क्रीम चीजचे आईसिंग


आज काल मला क्रीम चीजची चव आवडायला लागलीये. मी ह्या आधी ते गजराच्या केकवर पण वापरलाय. प्रत्येतवेळी मी इंडिअन मसाले घालुन फुलाच्या चवीचे आईसिंग बनवलंय. पण आज मी चॉकलेटच्या चवीचे आईसिंग रेड वेल्वेट कपकेकसाठी बनवले. केक मधल्या कोको पुड्च्या चवीला साजेसे हे क्रीम मस्त झालेले.

पांढरे चॉकलेट क्रीम चीजचे आईसिंग
साहित्य
२२५ ग्राम क्रीम चीज
२२५ ग्राम पांढरे चॉकलेट
१ वाटी लोणी
२ वाटी आईसिंग शुगर

कृती
  • एका भांड्यात निम्मे पांढरे चॉकलेट घालुन १ मिनिट मायक्रोवेव्ह करणे.
  • त्यात उरलेले पांढरे चॉकलेट घालुन चांगले ढवळणे. पुन्हा १५ सेकंद मायक्रोवेव्ह करणे.
  • चॉकलेट चांगले एकजीव होऊन वितळेपर्यंत ढवळणे व बाजूला ठेवून देणे.
  • दुसऱ्या भांड्यात क्रीम चीज मऊ होईपर्यंत फेटून घेणे.
  • त्यात वितळवलेले चॉकलेट घालुन पुन्हा फेटणे.
  • लोणी घालुन पुन्हा एकजीव होईपर्यंत फेटणे.
  • आईसिंग शुगर टाकून आईसिंग चांगले मऊसुत आणि एकजीव होईपर्यंत फेटणे.

टीप
चॉकलेट घालताना एकदम थंड झालेले असावे, व जर कोमट असेल तर थंड होईपर्यंत थांबावे. गरम चॉकलेट कधीही चीजमध्ये घालू नये.

चॉकलेटमध्ये बुडवलेली काजू पिस्ता कुकी


मी उद्याच्या ट्रीपसाठी ह्या कुकीज बनवल्या. प्रवासात एकदम उत्तम नाश्ता. ह्या कुकीजची प्रेरणा मी अजॉयनी कॉसकोतून आणलेल्या शॉर्ट ब्रेडवरून घेतलीये.

चॉकलेटमध्ये बुडवलेली काजू पिस्ता कुकी
साहित्य
३ वाटी मैदा
२ वाटी लोणी
१.२५ वाटी साखर
१ अंड्याचे पिवळे
२ चमचा व्हॅनिला ईसेन्स
१/२ वाटी काजू
१/२ वाटी पिस्ता
१ वाटी सेमी स्वीट चॉकोचिप्स
१/४ वाटी पांढर्या चॉकोचिप्स
५ चमचा शॉर्टनिन्ग

कृती
  • एका भांड्यात लोणी आणि साखर घालुन फेटणे.
  • त्यात अंड्याचे पिवळे आणि व्हॅनिला ईसेन्स घालुन पुन्हा फेटणे.
  • काजू मिक्सर मध्ये वाटून बारीक पूड करणे. वर बनवलेल्या मिश्रणात ही पूड घालणे.
  • मैदा चाळून वरच्या मिश्रणात घालणे. घट्ट एकजीव होईपर्यंत मिश्रण चांगले ढवळणे
  • लिंबाच्या आकाराचे लाडू बनवून फ्रीजमध्ये १ तास थंडे होण्यासाठी ठेवणे.
  • ३७५F/१९०C वर ओव्हन गरम करणे.
  • पिस्त्यांचे बारीक तुकडे करणे.
  • प्रत्येक लाडू तळव्यावर घेऊन हलका दाबून जाड चकत्या बनवणे. बारीक चिरलेले पिस्त्यांचे तुकडे अर्ध्या कुकीवर पसरवणे. हलके दाबून पिस्ते कुकीमध्ये ढकलणे.
  • पार्चमेंट पेपर बेकिंग तव्यावर घालुन कुकी ठेवणे. प्रत्येक कुकीत साधारण १ इंच जागा सोडणे.
  • ३७५F/१९०C वर ओव्हनमध्ये १२ मिनिट भाजणे.
  • अंदाजे ५-१० मिनिट कुकी थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • एका भांड्यात सेमीस्वीट चॉकोचिप्स आणि ४ चमचे शॉर्टनिन्ग घालुन १ मिनिट मायक्रोवेव्ह करणे. मध्ये ३० सेकंद झाल्यावर एकदा ढवळणे. मिश्रण चकचकीत आणि एकजीव होईपर्यंत चांगले ढवळणे.
  • बेकिंग तव्यावर पार्चमेंट पेपर पसरवणे. प्रत्येक कुकीचा पिस्ते नसलेला भाग चॉकोलेटमध्ये बुडवून बेकिंग तव्यावर ठेवणे.
  • एका भांडयामध्ये पांढर्या चोकोचिप्स आणि उरलेले १ चमचा शॉर्टनिन्ग घालुन ३० सेकंद मायक्रोवेव्ह करणे. मिश्रण चांगले एकजीव आणि चकचकीत होईपर्यंत ढवळणे. एका पायपिंग बॅगमध्ये हे चोकोलेट घालुन आधीच्या चोकोलेटवर झिग झॅग रेषा काढणे. चोकोलेट साधारण एक तास सेट होण्यासाठी ठेवणे.

टीप
जर मायक्रोवेव्ह नसेल तर एका भांड्यात उकळत्या पाण्यावर चोकोलेट आणि शॉर्टनिन्ग घातलेले भांडे ठेवून ढवळणे. मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळणे. मायक्रोवेव्ह करणे खूप सोपे असलेल्याने मी तेच जास्त प्रेफर करते.

कडबोळी


दिवाळी होऊन बरेच महिने झाले तर मग आज कडबोळी? पण वेफर्सपेक्षा कडबोळी खाता खाता वर्डकप बघायला मजा येईल असा वाटल्यावर रविवारी रात्री उशिरा मी त्यांना बनवायला घेतलं. लवकरच असा लक्षात आला की एक एक कडबोळी बनवायला खूप वेळ लागत होता मग मी त्यावर एक उपाय शोधला. चकलीच्या पात्रात एक मध्ये छोटी भोक असलेली ही चकती घालुन छोटे छोटे तुकडे तळले आणि ते सिनेमा किंवा खेळ बघताना खाण्यासाठी एकदम छान जमून आले.

कडबोळी
साहित्य
४ वाटी तांदुळाचे पीठ
३ वाटी दुध
१ वाटी लोणी
मीठ चवीपुरते
तेल

कृती
  • तांदुळाच्या पिठात लोणी घालुन चांगले एकत्र करणे.
  • त्यात दुध घालुन पिठाचा गोळा बनवणे.
  • छोट्या लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन पोलपाटावर वळवत लांबट दोरीचा आकार देणे व नंतर गोल वळवून तेलात गुलाबी रंगावर तळणे.
  • किंवा चकलीच्या पात्रात ते पीठ घालुन छोटे छोटे तुकडे तेलात घालुन भाजणे.

टीप
कडबोळी भाजताना गुलाबी झाल्या झाल्या लगेच काढावी नाहीतर करपून जातील कारण तेलातून काढल्यानंतर त्यांना थोड्यावेळानी अजून थोडा रंग चढतो.

स्ट्रॉबेरी क्रेप


मी हे क्रेप्स एकंदर एक महिन्यापूर्वी बनवलेले पण त्यांच्याविषयी पूर्णतः विसरून गेलेले. काल एकदम लक्षात आल्यावर मी त्याचे फोटो शोधायला चालू केले. आणि मग लक्षात आले की तेंव्हा माझा कॉम्प्युटर बिघडला असल्यानी ते मी अजॉयच्या कॉम्प्युटरवर ठेवले आणि विसरून गेले. आज हि सोपी, सहज अशी चविष्ठ पाककृती इथे देत आहे.

स्ट्रॉबेरी क्रेप
साहित्य
३ वाटी स्ट्रॉबेरी
१/२ वाटी मैदा
१.५ वाटी दुध
१/२ वाटी वितळवलेले लोणी
२ अंडी
१/२ व्हॅनिला ईसेन्स
२ चमचा साखर
मीठ चवीपुरते

कृती
  • एका भांड्यात स्ट्रॉबेरी बारीक चिरून त्यात एक चमचा साखर घालुन बाजूला ठेवणे.
  • दुसऱ्या भांड्यात मैदा, दुध, उरलेली एक चमचा साखर, लोणी, व्हॅनिला ईसेन्स, अंडी आणि मीठ घालुन हॅन्ड मिक्सर वापरून फेसणे
  • तवा गरम करून त्यावर डावभर मिश्रण घालुन तवा तिरका करून पातळ पसरवणे
  • मध्यम आचेवर क्रेप दोन्ही बाजूनी गुलाबी होईपर्यंत भाजणे व एका ताटात काढणे
  • आता ह्या क्रेपवर २ चमचा स्ट्रॉबेरीचे सारण पसरवून रोल बनवणे. पाहिजे असल्यास थोडी पिठीसाखर शिंपडून खायला देणे.

टीप
मी क्रेप भाजण्यासाठी नॉनस्टिक तव्याचा वापर केला त्यामुळे मला तेल बिलकुल वापरावे लागले नाही.

चॉकलेट केक


ह्या आठवड्यात मला २ केक बनवायचे होते. एक फॉनडन्टच्या क्लाससाठी आणि एक फुलांच्या क्लाससाठी. हा केक मी फुलांनी सजवण्यासाठी बनवला. मला तो पांढऱ्या फुलांनी सजवायचा होता पण माझा आईसिंग जरा खराब झाल, मग मी हा केक महिनाभर क्लासमध्ये शिकताना बनवलेल्या फुलांनी सजवला. इथे हि सोपी केकची पाककृती देत आहे.

चॉकलेट केक
साहित्य
१.५ वाटी मैदा
१ वाटी लोणी
१ वाटी साखर
१ चमचा कोको पूड
१ स्पून बेकिंग पूड
३ अंडी

कृती
  • ओव्हन ३२५F/१६०C वर गरम करणे
  • मैदा, कोको पूड आणि बेकिंग पूड चाळून एका भांड्यात घेणे
  • त्यात लोणी वितळवून, साखर आणि अंडी घालुन चांगले फेटून घेणे.
  • केकच्या भांड्याला तेल किंवा लोणी लावून त्यात केकचे मिश्रण घालणे
  • केक ३२५F/१६०C वर भाजणे
  • ओव्हनमधून केक बाहेर काढून ५ मिनिट थंड करणे. त्यानंतर केक तटावर काढून पूर्णपणे थंड करणे

टीप

मी हा केक दोनवेळा आयताकृती भांड्यात बनवला. दोन केकच्यामध्ये चॉकलेट वितळवून घालुन तो जोडला व उंच बनवला. त्यावर चॉकलेटचे बटर आईसिंग आणि रॉयल आईसिंगची फुलं लावून सजवला.

प्लेन केक


मी हा सोपा केक माझ्या फॉनडन्ट केक डेकोरेशन कलाससाठी बनवलेला. चवीला उत्तम अगदी आईसिंग बरोबर किंवा तसाच

प्लेन केक
साहित्य
५ वाटी मैदा
२.५ वाटी लोणी
२.५ वाटी साखर
२ चमचे बेकिंग पूड
१.५ चमचे लिंबू रस
४ अंडी

कृती
  • ओव्हन ३२५F/१६०C वर गरम करणे
  • मैदा आणि बेकिंग पूड चाळून एका भांड्यात घेणे
  • त्यात साखर, लोणी वितळवून, लिंबू रस, आणि अंडी घालुन फेटणे.
  • केकच्या भांड्याला तेल किंवा लोणी लावून त्यात केकचे मिश्रण घालणे
  • केक ३२५F/१६०C वर भाजणे
  • ओव्हनमधून केक बाहेर काढून ५ मिनिट थंड करणे. त्यानंतर केक तटावर काढून पूर्णपणे थंड करणे. असाच किंवा आईसिंग करून वाढणे

टीप
केक असाच खाताना बरोबर लागत होता पण आईसिंग केलेला थोडा जास्त गोड लागत होता. त्या मुळे पुढच्यावेळी मी जर आईसिंग करणार असेल तर थोडी साखर कमी वापरेन

नटी बटरस्कॉच चॉकलेट केक


काल मी माझ्या केक डेकोरेशनच्या क्लासमध्ये घेऊन जायला केकसाठी पाककृती शोधत होते. प्रथम मला वाटले की कुठला तरी सोपा आणि सरळ असा केक बनवून काम संपवावे पण जशी मी स्वयंपाकगृहात गेले तसे मला वाटले की काहीतरी नवीन माझ्याकडच्या पुस्तकातून प्रयत्न करावे. त्या पुस्तकातील मला पीनटबटर केकची रेसिपी मला खूप आवडली पण पीनट बटर माझ्याकडे नव्हत म्हणून मग मी ही रेसिपी तयार केली. केक फारच सुरेख आणि चविष्ट झाला आणि त्याचा सुगंध इतका सुरेख होता की क्लासमध्ये सगळे लोक मला विचारात होते या केकविषयी.

नटी बटरस्कॉच चॉकलेट केक
साहित्य
४ वाटी मैदा
२.५ वाटी लोणी
१ वाटी हेजलनट
१ वाटी बदाम
१.५ वाटी साखर
३ अंडी
१ वाटी दुध
२ वाटी बटरस्कॉच चॉकोचीपस
२ चमचे बेकिंग पूड
मीठ चवीपुरतं

कृती
  • ओव्हन ३५०F/१८०C वरती गरम करणे.
  • हेजलनटस आणि बदाम मिक्सरमध्ये वाटून पूड करणे.
  • लोणी आणि साखर एकत्र करून फेटून घेणे.
  • त्यात हेजलनट आणि बदामची पूड टाकून पुन्हा फेटणे.
  • आता एक एक अंडे टाकून प्रत्येक वेळा चांगले फेटणे.
  • मैदा आणि बेकिंग पूड एकत्र २ वेळा चाळून घेणे. त्यात मीठ घालणे..
  • लोणी-साखर-अंध्याच्या मिश्रणात मैदा-बेकिंग पूड मिश्रण आणि दुध असे थोडे थोडे घालुन अलगद एकत्र करणे.
  • बटरस्कॉच चॉकोचिप्स मायक्रोवेव्हमध्ये १ मिनिट गरम करून ढवळणे. केकच्या मिश्रणात अलगद घालुन मिसळणे.
  • केकच्या भांड्याला तेल किंवा लोणी लावून त्यात पारचमेंट कागद घालुन त्यालापण तेल किंवा लोणी लावणे. केकचे मिश्रण त्यात अर्ध्या पातळीपर्यंत भरणे
  • केक ओव्हनमध्ये ३५०F/१८०C वरती ४० मिनिट भाजणे.
  • आईसिंगनी सजवणे किंवा तसाच खायला देणे.

टीप
मी दोन ८ इंचाची गोल भांडी केक भाजण्यासाठी वापरली पण मला वाटते की हा केक एका ८ इंचाच्या आणि एका ६ इंचाच्या भांड्यात जास्त छान झाला असता.
मी एका केकला माझ्या केक डेकोरेशनच्या क्लासमध्ये बटर आईसिंग केल आणि एक केक तसाच खाला. दोन्ही खूप चविष्ट होते पण मी नंतर कधी आईसिंगवाला केक बनवणार असेल तर ह्यात डार्क चॉकलेट किंवा कमी साखर वापरेन
हल्लीच मला कळले की ओव्हन कमीत कमी १५ मिनिट आधी गरम करून ठेवला तर तो सगळीकडे एकसारखा गरम होतो आणि केक सगळ्या बाजूनी चांगला फुलतो. माझा केक फक्त मध्ये न फुलता सगळीकडे एकसारखा फुलाला आणि मला तो केक डेकोरेशनच्या वेळी थोडा पण कापावा नाही लागला.

लिंबू आणि खजुराचा कपकेक


हल्लीच मी फूड नेटवर्क बघायला चालू केला आणि तिथे काही कार्यक्रम चांगले असतात. त्यातील एक म्हणजे कपकेक वॉर्स. त्यात भाग घेणाऱ्या लोकांच्या कल्पनाशक्ती आणि त्यातून निर्माण होणारे कपकेक्स हे एकदम बघण्यासारखे असतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन मी हा पदार्थ केला.

लिंबू आणि खजुराचा कपकेक
साहित्य
४ वाटी मैदा
३ वाटी खजूर
२ वाटी दुध
१ वाटी लोणी
२ वाटी क्रीम
१ वाटी आईसिंग शुगर
१.५ वाटी साखर
२ अंडी
२ लिंबू
१ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा बेकिंग सोडा
मीठ

कृती
  • १ वाटी खजूर आणि दुध मिक्सरमध्ये वाटून बाजूला ठेवावेत
  • लोणी आणि साखर हॅन्ड मिक्सर वापरुन फेटणे.
  • त्यात अंडी घालुन पुन्हा एकजीव होईपर्यंत फेटणे
  • मैदा, बेकिंग पूड, बेकिंग सोडा आणि मीठ चाळून घेणे
  • लोणी-साखर-अंडी ह्याच्या मिश्रणामध्ये ते आणि दुध-खजूर मिश्रण थोडे थोडे घालुन फेटणे.
  • आता त्यात उरलेले खजूर बारीक चिरून, एका लिंबूच साल किसून आणि त्याच लिंबूचा रस घालुन अलगद ढवळणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे
  • कपकेकच्या भांड्यांमध्ये कागदाचे केककव्हर घालून त्यात केकचे मिश्रण २/३ पर्यंत भरणे
  • केक ओव्हनमध्ये ३५०F/१८०C वर २५ मिनिटं भाजणे व नंतर पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
  • एका भांड्यात क्रीम आणि आईसिंग शुगर एकत्र करणे.
  • हॅन्ड मिक्सर वापरुन घट्ट होईपर्यंत फेटणे
  • प्रत्येक केकवरती थोडे थोडे क्रीम चमच्याने घालणे किंवा पाईपिंग पिशवीत घालून सजवणे. त्यावर उरलेल्या लिंबूच साल किसून घालणे.

टीप
मी बटर पेपरचा कोन बनवून त्यांनी केक वर आईसिंग केला कारण माझ्याकडे पाईपिंग पिशवी नव्हती. चांगला मार्ग होता तो. थोड्या केक वर मी चमच्यानी पण आईसिंग लावलं.
क्रीम फेताण्यासाठी हॅन्ड मिक्सर फार उपयोगी पडतो. एकदम सोप, लवकर आणि खात्रीदायक आईसिंग बनत

क्रेझिन पॅन केक


मी असे पॅन केक बरेचवेळा बनवतीये, प्रत्येक वेळा वेगळे फळ. पण आज जेंव्हा मी सुके क्रॅनबेरी घालुन ते बनवले तेंव्हा असे वाटले की हे पॅन केक मिश्रण फक्त त्याच्यासाठीच बनले आहे. त्यामुळे इथे मी आज ते पोस्ट करतीये.


साहित्य
२ वाटी मैदा
१ चमचा साखर
१.५ चमचे बेकिंग पूड
१/२ वाटी लोणी वितळवून
२.५ वाटी दुध
१ अंडे
२ चमचे व्हॅनिला ईसेन्स
१ वाटी क्रेझींस
मीठ
तेल

कृती
  • अंडे आणि साखर चांगले फेटून घ्यावे
  • त्यात दुध आणि वितळवलेले लोणी घालुन फेटावे
  • आता त्यात व्हॅनिला ईसेन्स, चाळून घेतलेला मैदा, बेकिंग पूड आणि मीठ घालुन फेटावे
  • तवा गरम करणे
  • त्यावर २-३ थेंब तेल टाकणे आणि नंतर अर्धी वाटी केकचे मिश्रण घालणे.
  • त्यावर थोडे क्रेझींस टाकणे व खालची बाजू गुलाबी रंग होईपर्यंत भाजणे
  • २ थेंब तेल शिंपडून केक उलटवणे दुसरी बाजूसुद्धा गुलाबी होईपर्यंत भाजणे. बाकीचे सगळे केक पण असेच बनवणे.
  • एकावर एक ठेवून, मॅपल सिरप घालुन वाढणे.

टीप
मी क्रेझीनसच्या ऐवजी अ‍ॅप्रिकॉट्स, ब्लू बेरीज, मनुके आणि असेच बरेच वेगळी वेगळी फळ घालुन हे पॅन केकस बनवले आहेत पण मी आधी म्हटल्याप्रमाणे क्रेझीनचे केक सगळ्यात छान लागले.

गार्लिक बटर कोळंबी सॅलेड


मला आज काल सॅलेड हा प्रकार खूप आवडायला लागलाय. इथे एक एकदम सोपा पण चविष्ठ अशी पाककृती देत आहे

गार्लिक बटर कोळंबी सॅलेड

साहित्य
८ मोठे कोळंबी
२ वाटी ब्रोकोली
२ वाटी घेवडा
१ वाटी मक्याचे दाणे
१ अ‍ॅव्होकाडो
३ वाटी आईसबर्ग लेट्युस
१ कांदा
१ वाटी ढोबळी मिरची
१/४ वाटी चेरी टोमेटो
६ लसुणाच्या पाकळ्या
१/४ चमचा ऑरीगॅनो
१/२ चमचा मिरे पूड
१ लिंबू
मोझारीला चीझ
मीठ चवीनुसार
लोणी

कृती
  • तवा गरम करून त्यात ब्रोकोली आणि घेवडा लोण्याबरोबर भाजणे. मीठ घालुन बाजूला ठेवणे.
  • त्याच तव्यावर आता ढोबळी मिरची उभी चिरून आणि थोडे लोणी घालुन भाजणे.
  • ढोबळी मिरची शिजत आल्यावर उभा चिरलेला कांदा आणि मीठ घालुन गुलाबी रंग येईपर्यंत भाजणे.
  • घेवडा आणि ब्रोकोलीच्या भांड्यात हे भाजलेले कांदा आणि मिरची मिश्रण घालणे
  • आता त्याच तव्यावर थोडे लोणी घालुन त्यात कोळंबी आणि बारीक चिरून लसूण घालुन मध्यम आचेवर कोळंबी पूर्णपणे शिजेपर्यंत भाजणे. मीठ घालुन बाजूला ठेवणे.
  • मायक्रोवेव्हमध्ये मक्याचे दाणे २ मिनिट शिजवून घेणे व बाजूला ठेवणे
  • लेट्युस चिरून दोन भांड्यात घालणे.
  • घेवडा, कांदा, ढोबळी मिरची आणि ब्रोकोलीचे मिश्रण अर्धे अर्धे दोन्ही भांड्यात घालणे
  • अ‍ॅव्होकाडो चिरून अर्धा अर्धा दोन्ही भांड्यात घालणे.
  • आता दोन्ही भांड्यात निम्मे निम्मे कोळंबी-लसूण मिश्रण घालणे.
  • टोमेटो आणि मक्याचे दाणेपण अर्धे अर्धे दोन्ही भांड्यात घालणे
  • मिरे पूड, ऑरीगॅनो आणि लिंबू रस दोन्ही भांड्यात घालणे.
  • मोझारीला चीझ घालुन वाढणे

टीप
मी फक्त लिंबू रस सॅलेड ड्रेसिंगम्हणून वापरलं. रॅन्च किंव्हा दुसरा काही वापरावा लागला नाही पण तुम्ही तुमच्या चवीनुसार दुसरा ड्रेसिंगपण वापरू शकतात. माझ्यामते लिंबूमुळे सॅलेडची चव एकदम खुलून आली.
कोळंबी सोडून मी बाकी सगळ्या भाज्या मोठ्या आचेवर भाजल्या त्यामुळे त्या कुसकुशीत लागत होत्या. कोळंबी मी तव्यावर टाकताना तवा मोठ्या आचेवर होता पण तव्यावर घालताच आच मंद केली त्यामुळे ते नीट शिजले पण तरीही त्यांना एक ग्रील केल्यासारखी चव आली.

मोल्टन लाव्हा केक


बरेच दिवसांपूर्वी मी ह्या केक विषयी वाचले होते आणि त्याचा कॉन्सेप्ट मला फार आवडला. मग मी ह्याची पाककृती शोधल्यावर कळले की हि सगळ्यात सोप्पी आणि पटकन तयार होणारी पाककृती आहे. पण माझ्याकडे ते बनवण्यासाठी रामेकिंस किंव्हा पेपर कप नसल्यानी बरेच दिवस केक बनवण्याचे मनातच राहून गेले. पण आज मी रामेकिंस विकत आणले आणि केक बनविले. एकदम हीट ठरलाय हा केक.

मोल्टन लाव्हा केक
साहित्य
१ वाटी मैदा
१.२५ वाटी सेमीस्वीट चॉकोचिप्स
१ वाटी लोणी
५ चमचे कोको पूड
३ अंडे
३ अंड्यांचे पिवळे
२ वाटी साखर

कृती
  • रामेकिंसना लोण्याचा हात लावून बाजूला ठेवणे.
  • ओव्हन ४५०F/२३०C वर गरम करणे.
  • मायक्रोवेव्हमध्ये लोणी आणि चॉकोचिप्स एकत्र करून १ मिनिट गरम करणे.
  • लोणी आणि चॉकोचिप्स नीट ढवळणे आणि एकजीव करणे आणि बाजूला ठेवणे.
  • अंडी आणि अंड्याचे पिवळे एकत्र फेसून घेणे.
  • त्यात साखर घालुन पांढरे होईपर्यंत पुन्हा फेटणे.
  • त्यात वितळवलेले चॉकलेट - लोणी मिश्रण घालुन पुन्हा फेटणे
  • मैदा आणि कोको पूड चाळून घेणे व वर बनवलेल्या मिश्रणात डाव घालुन हलकेच ढवळून घेणे.
  • बनवलेले मिश्रण ६ रामेकिंसमध्ये घालणे,
  • रामेकिंसना बेकिंग ट्रेमध्ये ठेवून ते ओव्हन मध्ये ४५०F/२३०C वर १३ मिनिट भाजणे.
  • ओव्हन मधून लगेच काढून बशीत उलटे करून खायला देणे

टीप
रामेकिंसऎवजी पेपर कप मफीन पॅनमध्ये ठेवून पण भाजू शकतो पण त्यासाठी थोडे उंच पेपर कप वापरणे म्हणजे त्याला धरून केक ला उचलून उलटे करणे सोपे जाईल
केकला उलटे करण्यासाठी रामेकीन एका बशीत ठेवणे व रामेकिंवर एक बशी ठेवणे व दोन्ही बश्याना धरून उलटे करणे. रामेकिंस खूप गरम असल्यानी बश्यांची फार मदत होते.

पेटीट पाल्मिअर्स


आम्ही हा पदार्थ सुशीलच्या घरी पहिल्यांदा बघितला आणि खाला. तेजल त्यादिवशी ऑफीसला गेलेली आणि आम्ही बाकी तिघेही खाण्यासाठी काहीतरी शोधात होतो. अजॉयला तर एकदम खातचक्षणी पदार्थ आवडला. मला वाटलेला की पफ पेस्ट्री शीट वापरून ते बनवणा खूप सोपा असेल. इथे परत आल्यावर आम्ही costcoमध्ये मिळते का बघितले तर ते इथे बनवत नसल्याने आणखीनच मोठं कारण मिळाल घरी बनवण्यासाठी. घरीयेऊन पटकन थोडा रिसर्च केला आणि माझा अंदाज खरा ठरला.

पेटीट पाल्मिअर्स
साहित्य
१ पफ पेस्ट्री शीट
१ वाटी साखर
लोणी

कृती
  • ओट्यावर थोडी साखर शिंपडून त्यावर पफ पेस्ट्री शीट उलघडून घालावी
  • शीटवर साखर शिंपडून, साखर शीटना चिकटेल असे हलके लाटून घेणे.
  • दोन्ही कडा मध्ये एकत्र येतील अश्या दुमडाव्यात व नंतर एक मध्ये घडी घालणे. पेस्ट्री शीटचे ४ थर बनतील.
  • ३० - ४० मिनिट फ्रीजमध्ये ठेवणे.
  • ओव्हन ४००F/२००C तापमानावर गरम करणे.
  • पेस्ट्री शीटचे घडीला परपेन्डीक्युलर असे आयताकृती तुकडे करणे.
  • प्रत्येक तुकड्याचे कापलेली जागा साखरेत घोळवून, त्यातली एक बाजू खाली असेल असे बेकिंग तव्यावर ठेवणे
  • ओव्हनमध्ये ४००F/२००C तापमानावर १८ मिनिट भाजणे.

टीप
पेस्ट्री शीट जास्तीत जास्त ३५ ते ४० मिनिट अगोदरच फ्रीजमधून काढून ठेवणे अथवा त्यावर काम करणे कठीण होऊ शकते.
मी पार्चमेंट पेपर तव्यावर घालण्याचा विचार केलेला पण माझ्याकडे तो तेंव्हा संपलेला पण पार्चमेंट पेपर वापरला तर तव्याच्या दृष्टीनी तो जास्त फायदेमंद ठरेल.

बदाम चॉकोचीप मफीन्स


आजकाल खूप पाउस पडत असल्यानी मला दररोज ऑफिसला गाडीनी जाव वागतंय. बरेचवेळा मी ट्राफिकजॅममध्ये फसते. त्यामुळे घरी आलं की नवीन काही प्रयोग करायची ताकद उरत नाही. काल मी ट्राफिकला चुकवण्यासाठी लवकर घरी येऊन काम करण्याचे ठरवले. ५ मिनिटाचे ट्राफिक सोडले तर प्रयोग यशस्वी झालं असे म्हणू शकते. घरी आल्यावर लक्षात आले की माझा कॉम्पुटर बंद पडलेला. त्यामुळे जोपर्यंत मी कॉम्पुटरवर win7 घालत होते त्यावेळेत हे बदाम घातलेले केक बनवले. आज काल जरा जास्तच विसरभोळी झालीये मी आणि असा म्हणतात की बदाम स्मरणशक्ती वाढवण्यास उपयोगी पडतात. कॉम्पुटर तर नवीन पेक्षाही चांगला चालू लागलाय win7चा प्रताप, आता बघुयात की बदाम उपयोगी पडतात का.

बदाम चॉकोचीप मफीन्स
साहित्य
१ वाटी लोणी
२ वाटी साखर
४ वाटी मैदा
२ वाटी चॉकोचीप
३/४ वाटी बदाम
१ वाटी दुध
४ चमचे ब्रावून शुगर
२ चमचे व्हॅनिला इसेन्स
१ चमचा बेकिंग सोडा
१/२ चमचा बेकिंग पूड
२ अंडी
मीठ चवीपुरते

कृती
  • एका भांड्यात साखर आणि लोणी फेटणे.
  • त्यात अंडी घालुन पुन्हा फेटणे.
  • त्यात व्हॅनिला इसेन्स, दुध घालुन पुन्हा फेटणे.
  • मैदा, बेकिंग पूड, बेकिंग सोडा आणि मीठ घालुन हलक्या हातानी सगळे मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळणे.
  • त्यात १.५ वाटी चॉकोचीप घालुन हलकेच एकत्र करणे व बाजूला ठेवणे.
  • बदामाचे तुकडे करून त्यात ब्रावून शुगर आणि उरलेले चॉकोचीप घालुन एकत्र करणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
  • मफीनच्या भांड्यांना लोण्याचा हात लावून घेणे. प्रत्येक भांड्यात साधारण २/३ पर्यंत केकचे मिश्रण घालणे.
  • वर बदाम-चॉकोचीप-साखर मिश्रण पसरवणे.
  • मफीन ३५०F/१८०C वर २५ मिनिट भाजणे.

टीप
मी कच्चे बदाम वापरून त्यांना केकच्या वर पसरवले त्यामुळे केक भाजताना ते एकदम मस्त भाजले गेले.
तसेच मी बदमाबरोबर साखर आणि चॉकोचीप मिसळले त्यामुळे प्रत्येक घासात मस्त गोडपणा आला.

खजूर अक्रोड चॉकलेट ब्रावनी


थोड्या आठवड्यापूर्वी मी कॉस्टकोमधून अक्रोड आणि चॉकलेट चीप आणलेले. आज जेंव्हा मागच्या आठवड्याचे पायेश संपत आल्यावर मी हि ब्रावनी बनवण्याचे ठरवले. आठवड्यासाठी म्हणून केलेले हे ब्रावनी इतके छान झाले की ते सोमवारपर्यंतसुधा पुरतात की नाही अशी आशंका आहे.

खजूर अक्रोड चॉकलेट ब्रावनी
साहित्य
८०ग्राम डार्क चॉकलेट बार
१.५ वाटी सेमी स्वीट चॉकलेट चीप
३ वाटी पिठी साखर
१.५ वाटी मैदा
१ वाटी लोणी
१ वाटी खजूर
१ वाटी अक्रोड
३ अंडी
१ चमचा व्हॅनिला ईसेन्स
मीठ चवीपुरते

कृती
  • एका काचेच्या भांड्यात डार्क चॉकलेट, १/२ वाटी सेमी स्वीट चॉकलेट चीप आणि लोणी घालुन १ मिनिट मायक्रोवेव्ह करून चांगले एकत्र करणे.
  • अजून २० सेकंद मायक्रोवेव्ह करून ढवळणे.
  • मैदा दोनदा चाळून घेणे.
  • ओव्हन ३७५F/१९०C वर गरम करणे.
  • एका मोठ्या भांड्यात अंडी, पिठी साखर, व्हॅनिला ईसेन्स घालुन ५ मिनिट फेटून घेणे.
  • त्यात आधी बनवलेली चॉकलेट पेस्ट, चाळलेला मैदा आणि मीठ घालुन हलक्या हातानी एकजीव होईपर्यंत एकत्र करणे.
  • केकच्या मिश्रणात उरलेले १ वाटी चॉकलेट चीप, खजूर आणि अक्रोड कापून घालणे व एकत्र करणे.
  • केकच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात मिश्रण ओतणे व ३७५F/१९०C वर ३५ मिनिट भाजणे.
  • ब्रावनीवर आईस्क्रीम, चॉकलेट सॉस व अक्रोड घालुन खायला देणे.

टीप
मी चॉकलेट वितळवण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करते आणि त्यामुळे किचकट काम एकदम सोपे होऊन जाते पण मायक्रोवेव्ह नसल्यास एका भांड्यात पाणी गरम करून त्यावर चॉकलेटचे भांडे ठेवून पण चॉकलेट वितळवता येईल.

खजूर चॉकोचीप पॅन केक


मी बरेचवेळा पॅन केक बनवले आहेत कारण ते एकदम सोपा आणि चविष्ठ नाश्ता होतात. मी क्रॅनबेरी, आंबा,ब्लूबेरी असे वेग वेगळी फळे घालुन बनवलंय पण आज फळे नसल्यानी मी त्यात खजूर आणि चॉकोचीप घालुन बनवला. केक एकदम सुंदर झाला आणि नाश्ता एकदम मस्त होता.

खजूर चॉकोचीप पॅन केक
साहित्य
१/२ कप खजूर
१/४ वाटी चॉकोचीप
१/२ कप गव्हाचे पीठ
१/२ कप मैदा
३/४ वाटी दही
१ अंड
३/४ चमचा साखर
१/२ चमचा व्हॅनिला ईसेन्स
१/२ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा बेकिंग सोडा
२.५ चमचा वितळवळेल लोणी
मीठ
तेल

कृती
  • खजुरातून बिया काढून बारीक चिरावे.
  • मैदा आणि पीठ एकत्र चाळून घेणे.
  • त्यात साखर, मीठ, बेकिंग सोडा आणि बेकिंग पूड घालुन एकत्र करणे.
  • त्यात अंडे, दही, वितळवलेले लोणी आणि व्हॅनिला ईसेन्स घालुन एकत्र करणे.
  • त्यात १/२ वाटी कोमट पाणी घालुन फेटणे.
  • नॉनस्टिक तवा गरम करणे.
  • त्यावर एकावेळी अर्धा कप पीठ ओतणे व त्यावर चॉकोचीप आणि खजूर पसरवणे.
  • मध्यम आचेवर गुलाबी रंगावर दोन्ही बाजू परतून घेणे. देताना मध किव्हा मॅपल सिरप वरून ओतून खायला देणे.

टीप
पिठातच लोणी असल्यानी तव्याला तेल लावावं लागत नाही.
अजॉयला खजुराचा गोडपणा जरा जास्त वाटला त्यामुळे मला वाटतंय की डार्क चॉकोचीप वापरले तर गोड बरोबर होईल.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP