नटी बटरस्कॉच चॉकलेट केक
काल मी माझ्या केक डेकोरेशनच्या क्लासमध्ये घेऊन जायला केकसाठी पाककृती शोधत होते. प्रथम मला वाटले की कुठला तरी सोपा आणि सरळ असा केक बनवून काम संपवावे पण जशी मी स्वयंपाकगृहात गेले तसे मला वाटले की काहीतरी नवीन माझ्याकडच्या पुस्तकातून प्रयत्न करावे. त्या पुस्तकातील मला पीनटबटर केकची रेसिपी मला खूप आवडली पण पीनट बटर माझ्याकडे नव्हत म्हणून मग मी ही रेसिपी तयार केली. केक फारच सुरेख आणि चविष्ट झाला आणि त्याचा सुगंध इतका सुरेख होता की क्लासमध्ये सगळे लोक मला विचारात होते या केकविषयी.
साहित्य
४ वाटी मैदा
२.५ वाटी लोणी
१ वाटी हेजलनट
१ वाटी बदाम
१.५ वाटी साखर
३ अंडी
१ वाटी दुध
२ वाटी बटरस्कॉच चॉकोचीपस
२ चमचे बेकिंग पूड
मीठ चवीपुरतं
कृती
- ओव्हन ३५०F/१८०C वरती गरम करणे.
- हेजलनटस आणि बदाम मिक्सरमध्ये वाटून पूड करणे.
- लोणी आणि साखर एकत्र करून फेटून घेणे.
- त्यात हेजलनट आणि बदामची पूड टाकून पुन्हा फेटणे.
- आता एक एक अंडे टाकून प्रत्येक वेळा चांगले फेटणे.
- मैदा आणि बेकिंग पूड एकत्र २ वेळा चाळून घेणे. त्यात मीठ घालणे..
- लोणी-साखर-अंध्याच्या मिश्रणात मैदा-बेकिंग पूड मिश्रण आणि दुध असे थोडे थोडे घालुन अलगद एकत्र करणे.
- बटरस्कॉच चॉकोचिप्स मायक्रोवेव्हमध्ये १ मिनिट गरम करून ढवळणे. केकच्या मिश्रणात अलगद घालुन मिसळणे.
- केकच्या भांड्याला तेल किंवा लोणी लावून त्यात पारचमेंट कागद घालुन त्यालापण तेल किंवा लोणी लावणे. केकचे मिश्रण त्यात अर्ध्या पातळीपर्यंत भरणे
- केक ओव्हनमध्ये ३५०F/१८०C वरती ४० मिनिट भाजणे.
- आईसिंगनी सजवणे किंवा तसाच खायला देणे.
टीप
मी दोन ८ इंचाची गोल भांडी केक भाजण्यासाठी वापरली पण मला वाटते की हा केक एका ८ इंचाच्या आणि एका ६ इंचाच्या भांड्यात जास्त छान झाला असता.
मी एका केकला माझ्या केक डेकोरेशनच्या क्लासमध्ये बटर आईसिंग केल आणि एक केक तसाच खाला. दोन्ही खूप चविष्ट होते पण मी नंतर कधी आईसिंगवाला केक बनवणार असेल तर ह्यात डार्क चॉकलेट किंवा कमी साखर वापरेन
हल्लीच मला कळले की ओव्हन कमीत कमी १५ मिनिट आधी गरम करून ठेवला तर तो सगळीकडे एकसारखा गरम होतो आणि केक सगळ्या बाजूनी चांगला फुलतो. माझा केक फक्त मध्ये न फुलता सगळीकडे एकसारखा फुलाला आणि मला तो केक डेकोरेशनच्या वेळी थोडा पण कापावा नाही लागला.
0 comments:
Post a Comment