मुगाच्या सालीसहीत डाळीचे आप्पे


आईनी मध्यंतरी बरेच वेळा हे आप्पे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवलेले आणि आम्हा सगळ्यांना ते फार आवडलेले. त्यामुळे ह्यावेळी मी तिला त्याची पाककृती दाखवायला सांगितली. आप्पे एकदम सोप्पे, पौष्टिक आणि चविष्ट आहेत.

मुगाच्या सालीसहीत डाळीचे आप्पे
साहित्य
१.५ वाटी मुगाची सालीसहीत डाळ
२-३ हिरव्या मिरच्या
२ लसुणाच्या पाकळ्या
१/४ चमचा आलं
१/४ कांदा
२ चिमुट गरम मसाला
मुठभर कोथिंबीर
मीठ चवीपुरते
तेल

कृती
 • मुगाची डाळ रात्रभर भिजवून ठेवणे.
 • सकाळी डाळीचे सगळे पाणी काढून मिक्सरमध्ये घालणे.
 • त्यात हिरवी मिरची, लसूण आणि आलं घालुन बारीक वाटणे.
 • मिश्रणात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालणे.
 • त्यात मीठ आणि गरम मसाला घालुन चांगले फेटणे.
 • आप्पे पात्र गरम करून त्याला तेल लावणे. त्यात एक-एक चमचा मिश्रण घालुन वरून तेल सोडणे. झाकण ठेवून २ मिनिट मधम आचेवर गुलाबी रंगावर भाजणे.
 • आप्पे परतून झाकण न लावता अजून २-३ मिनिट दुसरी बाजुपण गुलाबी होईपर्यंत भाजणे. गरम गरम वाढणे.

टीप
मुगाची डाळ २-३ तास भिजवली तरी चालते त्यामुळे संध्याकाळी नाष्ट्यासाठी बनवायचे असल्यास फार आधीपासून डाळ भिजवायची गरज नाही.

व्हेज मन्चुरिअन


मला इंडिअन चायनीज फार आवडते त्यामुळे आमच्या जेवणात ते बऱ्याच वेळा असते. पण आई बाबा आल्यापासून किचनचा ताबा माझ्याकडे नसल्याने बरेच दिवस चायनीज मेनू झाला नाही. शेवटी शुक्रवारी मी किचनचा ताबा घेऊन स्वतःच जेवण बनवण्याचे ठरवले. व्हेज मन्चुरिअन तसे बऱ्याच वेळा बनवलेय पण फोटो कधीच चांगला आला नसल्यानी आधी कधी पोस्ट नाही करता आले. आज पाककृती देत आहे.

व्हेज मन्चुरिअन
साहित्य
२ वाटी कोबी
२ वाटी गाजर
२ वाटी श्रावणी घेवडा
२ वाटी ढोबळी मिरची
१ हिरवी मिरची
३ चमचे कॉर्न फ्लॉवर
५ चमचे मैदा
१ चमचा लसूण पेस्ट
२ लसूण पाकळ्या
३ देठ कांद्याची पात
१/४ वाटी स्वीट चिली सॉस
१/४ वाटी सोया सॉस
२ चमचे हॉट चिली सॉस
मीठ चवीपुरते
तेल

कृती
 • कोबी, गाजर, ढोबळी मिरची, श्रावणी घेवडा आणि हिरवी मिरची बारीक चिरणे व मीठ घालुन बाजूला ठेवणे.
 • त्यात लसुणाची पेस्ट, ४ चमचे मैदा आणि २ चमचे कॉर्न फ्लॉवर घालुन मळणे.
 • ह्या पीठाचे छोटे छोटे गोळे बनवून, उरलेल्या मैद्यात घोळवून तेलात मध्यम आचेवर भाजणे
 • कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेले लसूण, आणि कांद्याच्या पतीमधील कांदा घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
 • त्यात स्वीट चिली सॉस, हॉट चिली सॉस आणि सोय सॉस घालुन ढवळणे.
 • ३ वाटी पाण्यात १ चमचा कॉर्न फ्लॉवर घालुन धवलने व ते मिश्रण वरच्या उकळत्या मिश्रणात घालुन ढवळणे.
 • त्यात आधी तळलेले मन्चुरिअनचे गोळे टाकून २-३ मिनिटे उकळी काढणे. काड्याची पात बारीक चिरून घालुन वाढणे.

टीप
मी नेहमी चिरलेल्या भाजीत मीठ घालुन ५ मिनिट बाजूला ठेवते त्यामुळे त्याला सुटलेल्या पाण्यातच पीठ मालत येते व नंतर पीठ सैल होत नाही
स्वीट सॉस आणि हॉट सॉसच्या ऎवजी मी ३ चमचे चिली फ्लेक्स, १/४ वाटी व्हिनेगर आणि २ चमचे साखर पण वापरली आहे.

पचडी


आई इथे आल्यावर ती दररोज नवीन नवीन काहीतरी बनवत असते. परवा तिनी हि मस्त पचडी बनवलेली. ती मला इतकी आवडली की मी लगेच कालच पुन्हा मला दाखवायला सांगितलं. काल आमचा बेत पाणी पुरीचा होता पण मला काही झालं तरी हि पचडी बनवायची होती म्हणून मग, पाणी पुरीच्या चटपटीत हा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ खून जेवण संपवायचे ठरले.

पचडी
साहित्य
२ वाटी कोबी
१ वाटी गाजर
१ टोमेटो
३/४ वाटी कांदा
१ चमचा शेंगदाणा पूड
१ चमचा साखर
१ मिरची
मुठभर कोथिंबीर पाने
१ लिंबू
१/४ चमचा मौव्हरी
चिमुटभर हिंग
तेल
मीठ

कृती
 • कोबी बारीक चिरून एका भांड्यात घ्यावा
 • त्यात टोमेटो बारीक चिरून घालणे
 • कांदा, कोथिंबीर, मिरची बारीक चिरून घालणे.
 • गाजर किसून घालणे.
 • त्यात शेंगदाणा पूड, साखर, आणि मीठ घालणे.
 • लिंबू पिळून, मिश्रण चांगले ढवळणे.
 • एका छोट्या कढईत तेल घालुन मौव्हरी आणि हिंग घालुन फोडणी करणे.
 • त्याला मिश्रणात घालुन चांगले ढवळणे.

टीप
जर पार्टीत किंव्हा पाहुण्यांना वाढण्यासाठी आधीपासून तयारी करायची असेल तर फक्त भाज्या चिरून ठेवणे. साखर मीठ आणि फोडणी आयत्यावेळी घालणे. जर पूर्ण पचडी आधी केली तर ती इतकी चांगली लागत नाही, त्यामुळे हा उत्तम उपाय आहे.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP