कोथिंबीर वडी


आज अजॉय परत आला आणि त्याच्यासाठी काहीतरी कोथिंबीरचा पदार्थ बनवण्याचा माझा प्लॅन होता. आईच्या पद्धतीची हि कोथिंबीर वडी मी नाश्त्यासाठी बनवलेली. स्टारटर म्हणूनसुद्धा एकदम चांगला पदार्थ ठरू शकतो.

कोथिंबीर वडी
साहित्य
२ वाटी कोथिंबीर
१/२ वाटी बेसन
१/४ वाटी तांदुळाचे पीठ
१ चमचा तिखट
तेल
मीठ

कृती
 • कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेणे.
 • त्यात बेसन, तांदुळाचे पीठ, तिखट, मीठ आणि चमचाभर तेल घालुन एकत्र मळणे.
 • जरुरीनुसार पाणी घालुन गोळा बनवणे व तेल लावलेल्या भाण्यात घालुन शिट्टी न लावता कुकरमध्ये १५-२० मिनिट शिजवणे.
 • शिजलेला गोळा थंड झाल्यावर वाड्या कापून तेलावर भाजून घेणे

टीप
जर गोळा मळताना पाणी चुकून जास्त झाले टर त्यात थोडे बेसन घालुन ठीक करता येईल.
मिश्रणात मीठ सांबाळून घालणे कारण थोड्याश्या मीठानी पण लगेच खारटपणा येतो.

गाजर हलवा


एकदम सोपी आणि चविष्ठ अशी हि कृती माझी एकदम आवडती आहे. ह्यात खूप दुध आणि गाजर आहेत त्यामुळे तब्येतीसाठीसुद्धा एकम उत्तम. मी खूप सारे मायक्रोवेव्ह आणि गॅसवर असलेल्या पाककृती करून बघितले पण माझ्यामते हि सगळ्यात उत्तम कृती आहे.

गाजर हलवा
साहित्य
५ वाटी किसलेले गाजर
४ वाटी दुध
१ वाटी साखर
५ चमचे सुकामेवा
४ चमचे तूप

कृती
 • कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून त्यात किसलेले गाजर घालुन २ मिनिट मंद आचेवर शिजवणे.
 • त्यात एक वाटी दुध घालुन मध्यम आचेवर सारखे ढवळत शिजवणे.
 • मिश्रण आटायला लागले की त्यात अजून एक वाटी दुध घालुन शिजवत ठेवणे. असे करत करत सगळे दुध घालुन गाजर पूर्णपणे शिजवणे.
 • मिश्रण पूर्ण सुकले की त्यात साखर घालुन पुन्हा ढवळणे व सुकू देणे.
 • उरलेले २ चमचे तूप सोडून पुन्हा ढवळून घेणे.
 • एका तव्यावर १ चमचा तेल घालुन त्यात सुकामेवा भाजून घेणे व हलव्यावर घालुन ढवळणे.

टीप
हलवा पूर्ण शिजल्यावर तूप घालुन भाजल्यानी एकदम खमंग होतो.
हलव्यामध्ये दुधाचा मसाला घालता येईल.

सोल कढी


खूप प्रसिद्ध आणि चविष्ठ कोकणी पदार्थ... सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे कढी एकम पाचक आहे आणि पित्तावरती एकदम रामबाण उपाय आहे. अशीच पिता येईल किंव्हा भातावर घेऊन खाता येईल.

सोल कढी
साहित्य
८ कोकम
१ नारळ
१-२ लसूण पाकळ्या
मीठ
कोथिंबीर

कृती
 • कोकम १/४ वाटी पाण्यात भिजवून ठेवणे.
 • खवलेला नारळ वाटताना त्यात लसूण घालुन वाटावे व दुध काढणे.
 • नारळाचे दुध भिजवलेल्या कोकम पाण्यात घालणे.
 • त्यात मीठ आणि कोथिंबीर घालुन वाढणे.

टीप
लसुणाची चव आवडत नसेल तर नारळाचे दुध काढताना त्यात लसूण नाही घातले तरी चालते पण लसुणाची एकदम चांगली चव येते.
गोव्यात एकदम चांगले कोकम मिळतात, त्यांना चांगला रंगपण असतो आणि आंबटपणा पण चांगला येतो.
आंबटपणानुसार सोले कमी जास्त करणे. माझ्याकडची सोले जरा जुनी असल्यानी त्यांना आंबटपणा आणि रंग दोन्ही कमी आहे. पण जर नवीन कोकम असतील तर १-२ कमी कोकम पण चालू शकतील.

भरलेला टोमाटो


जेंव्हा मी हे बनवायला घेतले तेंव्हा मला माहित नव्हत की कस बनेल. पनीर बरोबर काहीतरी नवीन करण्यासाठी म्हणून झालेली हि माझी पाककृती निर्मिती लहानपणी बघितलेल्या एका कुकरच्या झाहीरातीतीवरून प्रेरित आहे.

भरलेला टोमाटो
साहित्य
४ मध्यम आकाराचे टोमाटो
१ कांदा
१.५ वाटी किसलेले पनीर
मुठभरून कोथिंबीर
१ चमचा जीरा
१/४ चमचा मिरे
२ चमचे लोणी
मीठ चवीपुरते

कृती
 • टोमाटोचे देठ काढून बाजूला ठेवणे. देठ नंतर वापरायचे आहेत त्यामुळे जपून ठेवणे.
 • टोमाटोचा आतला गर काढून भांड्यात ठेवणे.
 • कढई गरम करून त्यात लोणी घालणे. कांदे घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
 • टोमाटोचा गर घालुन सुकेपर्यंत शिजवणे.
 • एका ताटलीत शिजलेला टोमाटो, किसलेले पनीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, मिरे आणि मीठ घालुन एकत्र करणे.
 • पोकळ टोमाटोमध्ये हे मिश्रण भरून त्याचे देठ लावून बंद करणे.
 • टोमाटोला तेल लावून बेक करणे किंवा कुकर मध्ये वाफवणे

टीप
कांद्याबरोबर मश्रूमपण घालता येतील, थोडी वेगळी चव.
बेक केलेले टोमाटो चांगले लागतात पण कुकर मध्ये केलेले जास्त छान रंग देतात आणि चविष्ठपण होतात.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP