Showing posts with label अंड्याचे पदार्थ. Show all posts
Showing posts with label अंड्याचे पदार्थ. Show all posts

अंड्याचे तुकडे


काल मी उकडलेल्या अंड्यांचा थोडा वेगळा प्रयोग करून पहिला. नेहमीच्या अंड्याच्या भाजीपेक्षा थोडा वेगळा छान वाटला खायला.

अंड्याचे तुकडे
साहित्य
४ अंडी
१ कांदा
२ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा तिखट
१/४ चमचा धने पूड
चिमुट भर मिरे पूड
चिमुटभर दालचिनी पूड
कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • अंडी उलालावून त्याचे कवच काढणे. अंड्याचे तुकडे करणे व बाजूला ठेवणे
  • तव्यावर तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे तळणे.
  • त्यात कांदा घालुन गुलाबी रंगावर परतून घेणे.
  • त्यात मिरे पूड, धने पूड, दालचिनी पूड, अंड्यांचे तुकडे आणि मीठ घालुन ३-४ मिनिट परतणे.
  • वरून कोथिंबीर आणि तिखट घालुन खायला देणे.

टीप
मला ह्यात जास्त मसाले न वापरता थोडी वेगळी चव द्यायची होती त्यामुळे मी दालचिनी वापरली आणि एकदम अचूक निवड होती

अंड्याचा रोल


अंड्याचा रोल बंगाली खाण्यात इतका महत्वाचा आहे ह्याची मला बिलकुल कल्पना नव्हती :) इथे पूजेसाठी आम्ही गेले होतो तेंव्हा बऱ्याच लोकांना ह्यासाठी रांगेत उभे राहिलेले बघितले. अजॉय आधी कधी रोल बनवायला सांगितला की मला वाटायचे ह्याला तर पराठा जास्त आवडतो पण असे म्हणता येईल की तेंव्हा मला रोलचे महत्व कळले नव्हते पण इथली पूजा बघितल्यावर पहिल्यांदा मी रोल बनवले. अजॉय एकदम खुश होता :)

अंड्याचा रोल
साहित्य
३ वाटी मैदा
१ चमचा गव्हाचे पीठ
३ अंडी
१ कांदा
२ हिरव्या मिरच्या
हॉट आणि स्वीट टोमाटो सॉस
मीठ
तेल

कृती
  • मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि चमचाभर तेल एकत्र करून पाणी घालुन पीठ मळणे. भिजण्यासाठी अर्धा तास ठेवणे.
  • कढईत थोडेसे तेल घालुन गरम करणे व त्यात उभा चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालुन शिजवणे.
  • भिजलेल्या पीठाचे ३ गोळे करून पातळ चपाती लाटणे,
  • तवा गरम करून त्यावर चपाती टाकणे व तेल घालुन दोन्ही बाजूनी भाजणे
  • दुसरी बाजू हॉट आली की त्यावर अंडे फोडणे व पसरवणे
  • एक दोन मिनिट शिजू देणे व परतणे. तेल सोडून अंडे शिजेपर्यंत भाजणे व टिश्यूवर काढणे.
  • कांद्याचा १/३ भाग व सॉस उभ्या रेषेत चपातीवर घालणे.
  • चपाती टिश्यू सकट खालच्या बाजूनी थोडीशी दुमडून नंतर त्याचा रोल करणे.

टीप
मी पूर्ण गव्हाचे पीठ न वापरता मैदापन वापरला त्यामुळे चपाती कडक होत नाही आणि अगदी चपाती चपाती सारखी लागत नाही
रोल बनवताना एका बाजूनी मिश्रण झाकले जाईल असे दुमडावे आणि नंतर दुसऱ्या बाजूनी घट्ट बांधावे म्हणजे रोल सुटत नाही व मिश्रण बाहेर येणार नाही

अंड्याची बिर्याणी


बरेच दिवसांपासून घरात अंडी होती आणि मी काहीतरी बनवण्याचा विचार करत होते आणि शेवटी आज हि बिर्याणी बनवली

अंड्याची बिर्याणी
साहित्य
६ अंडी
१.५ वाटी तांदूळ
१ कांदा
२ चमचे काजू
२ टोमाटो
१/४ वाटी पुदिना
१/२ वाटी कोथिंबीर
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा लसूण पेस्ट
२-३ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा दालचिनी पूड
२ चिमुट वेलची पूड
२ चिमुट जायफळ पूड
२ चिमुट लवंग पूड
चिमुटभर हळद
१ चमचा तिखट
५-६ लवंग
५-६ वेलची
१ दालचिनी
मीठ
तेल
तूप

कृती
  • तांदूळ पाण्यात भिजवून ठेवणे.
  • ३ अंडी उकडून त्यांना अर्धे करणे.
  • तेल गरम करून त्यात उभे चिरलेले कांदे घालुन कुरकुरीत भाजणे.
  • त्याच तेला काजू तळून बाजूला ठेवणे.
  • तेलात अर्धे केलेले अंडी तळून बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात उरलेले ३ अंडी फोडून घालणे व तेल सुटेपर्यंत परतणे.
  • त्यात हळद, चिमुटभर वेलची पूड, लवंग पूड, जायफळ पूड, तिखट आणि मीठ घालुन परतणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन शिजवणे.
  • त्यात पुदिना, कोथिंबीर, गरम मसाला, बारीक चिरलेल्या मिरच्या, जिरे पूड, धने पूड, आले पेस्ट, लसूण पेस्ट, चिमुटभर वेलची पूड, चिमुट भर लवंग पूड आणि उरलेली दालचिनी पूड घालुन परतणे.
  • भात शिजवणे व बाजूला ठेवणे
  • तूप गरम करून त्यात दालचिनी, लवंग, वेलची घालुन परतणे व भातात घालणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून अर्धा भात घालणे. त्यावर टोमाटो-मसाला आणि अंड्याचा मसाला पसरवणे व वर उरलेल्या अर्ध्या भाताचा थर देणे.
  • वर कांदा आणि काजू पसरवून भात होई पर्यंत शिजवणे.
  • वाढताना तळलेले अंडी वर पसरवून वाढणे.

टीप
मी भांड्यात बिर्याणी लावून त्याला कुकरमध्ये थोडेसे पाणी घालुन शिट्टीशिवाय शिजवली त्यामुळे बिर्याणी चिकटत नाही.
जर कुकरमध्येच थर लावायचे असतील तर त्याला खाली उकडलेल्या बटाट्याचे थर लावता येतील. त्याची माहिती ह्या चिकन बिर्याणीच्या कृतीत आहे.

व्हेज नर्गीसी कबाब


हा पूर्ण व्हेज नसलातरी जे लोक व्हेज व्ह्यातिरिक्त फक्त अंडी खातात त्याच्यासाठी एकदम मस्त पदार्थ आहे. अर्थातच नॉनव्हेज लोक तर खाऊ शकतीलच. मी पुस्तकात ह्या कबाब विषयी वाचलेले आणि आधी मटणाच्या खिम्याचे बनवलेलेपण आज काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात हे तयार झाले.

व्हेज नर्गीसी कबाब
साहित्य
६ अंडी
५ बटाटे
१ चमचा कॉर्न फ्लौर
१ चमचा गरम मसाला
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
मीठ
तेल

कृती
  • अंडी उकडून त्यांची साले काढून बाजूला ठेवणे.
  • बटाटे उकडून त्यांचा कीस करणे.
  • चमचाभर तेल गरम करून त्यात गरम मसाला, लसूण पेस्ट, तिखट, जिरे पूड आणि धने पूड घालणे.
  • त्यात किसलेला बटाटा घालुन एक मिनिट परतणे.
  • मिश्रण कोमट झाले की त्यात कॉर्न फ्लौर घालुन मळणे.
  • मिश्रण ६ भागात करून प्रत्येकाचा गोळा करून त्याला वाटीचा आकार देणे.
  • प्रत्येक वाटीत एक अंडे घालुन वाटी बंद करणे व तेलात गुलाबी रंगावर तळणे.

टीप
मिश्रण मळताना हाताला तेल लावणे म्हणजे ते चिकटत नाही
किसलेला फ्लावर बटाट्याच्या मिश्रणात घालुन मी थोडा वेगळा चावीचा प्रयोग करून बघणार आहे

भरलेली अंडी पसंदा


मी आज उकडलेल्या अंड्यांचे पॅटिस बनवायचे ठरवलेले पण माझ्याकडे मैदा नव्हता आणि नेहमी ज्या दुकानातून मी मैदा आणते तिथेपण तो संपलेला म्हणून मग मी हा निराळाच प्रयोग केला

भरलेली अंडी पसंदा
साहित्य
१ वाटी गव्हाचे पीठ
३ उकडलेली अंडी
२ हिरव्या मिरच्या
मुठभर कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • गव्हाच्या पीठ मळून नेहमी चपातीला बनवतो तसे भिजवणे.
  • अंडी किसून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ घालणे.
  • चपाती लाटून त्यावर अंड्याचे मिश्रण घालुन बंद करणे. वेगवेगळे आकार बनवता येतील
  • रोलच्या आलारासाठी: चपातीवर मिश्रण पसरून गुंडाळणे व सगळ्याबाजू पाण्याचा हात लावून बंद करणे.
  • करंजीच्या आकारासाठी: चपातीवर मिश्रण पसरवून ती अर्धी दुमडणे व पाण्याचा हात लावून बंद करणे.
  • तेलात तळणे.

टीप
मी जेंव्हा हे बनवले तेंव्हा पीठ थोडे पातळ झालेले म्हणून मी चपाती थोडी तव्यावर गरम करून घेतली त्यामुळे ती चिकटत नाही
अजून वेगवेगळे आकार पण करता येतील जसे सामोसा पण माझ्या पातळ पीठामुळे मला फार उत्साह राहिला नव्हता

अंडी मसाला


हि अंड्याची एकदम चविष्ठ कृती मला मिळाली. हि मी एका पुस्तकात वाचली आणि करून बघण्याचे ठरवले. आधी एकदा केलेले पण ती इतकी सुंदर नव्हती झाली. आज एकदम मस्त झाली तर कृती देत आहे

अंडी मसाला
साहित्य
३ अंडी
१ मोठा कांदा
२ टोमाटो
१ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा आले लसूण पेस्ट
२ चमचे कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • कढईत तेल गरम करून त्यात कांदे परतणे.
  • त्यात लसूण आले पेस्ट, तिखट आणि गरम मसाला घालुन अजून परतणे.
  • त्यात टोमाटो घालुन तेल सुटेपर्यंत शिजवणे.
  • तव्याला तेल लावून त्यावर मसाल्याचे मिश्रण पातळ पसरवणे.
  • अंडी फोडून मसाल्यावर सोडणे.
  • झाकण ठेवून मंद आचेवर अंडी घट्ट होई पर्यंत शिजवणे व वरून कोथिंबीर घालुन खायला देणे.

टीप
मसाला शिजलेला असल्यानी तो सध्या तव्यावर घातला तर करपण्याची शक्यता असते त्यामुळे नॉनस्टिक तवा वापरणे व एकदम मंद आचेवर शिजवणे
हा ब्रेड किंवा पराठे/फुलके बरोबर पण देता येईल

अंड्याचे पॅटिस


मी एक दोन आठवायचा छोटीसी सुट्टी घेतलेली कारण मला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला. पण पुण्याला जाऊन आल्यापासून पुन्हा काहीतरी बनवण्याची इच्छा झाली. मग मी हा नाश्त्याला पदार्थ बनवला. ह्या आधी एकदा अंड्याचे पॅटिस बनवलेले तेंव्हा ते खूप तेलकट झालेले आणि म्हणून आज मला करायच्या वेळी थोडी भीती वाटत होती पण हे पॅटिस एकदम चांगले झाले.

अंड्याचे पॅटिस
साहित्य
१/२ वाटी मैदा
१/२ वाटी गव्हाचे पीठ
२ अंडी
१ कांदा
१/२ चमचा तिखट
मीठ
तेल

कृती
  • मैदा, गव्हाचे पीठ आणि मीठ एकत्र करून पीठ भिजवणे.
  • अंडी, बारीक चिरलेला कांदा, तिखट आणि मीठ एकत्र फेटून घेणे.
  • मळलेल्या पीठाचे गोळे बनवून फुलक्याच्या आकाराची चपाती लाटून घेणे.
  • थोडा मैदा आणि पाणी एकत्र करून त्याचे मिश्रण चिकटवण्यासाठी मिश्रण बनवणे.
  • प्रत्येक चपातीवर २ चमचे अंड्याचे मिश्रण घालणे आणि पटकन चारी बाजू बंद करणे.
  • तेलावर हलक्या आचेवर भाजणे.

टीप
अजॉयनी तिखटच्याऎवजी हिरव्या मिरच्या घालायला सांगितले पण मी कालच खिचडीत खूप सारी मिरची वापरल्यानी मिरची वापरण्याचे तळले. पण माझ्यामते सुद्धा हिरव्या मिरच्या जास्त चांगल्या लागतील.
आधी मी हे पॅटिस तेलात पूर्णपणे तळलेले पण ते खूप जास्त तेलकट झालेले कारण अंड्याचे मिश्रण बाहेर येऊन खूप जास्त तेल शोषून घेता. त्यामुळे ह्यावेळी तव्यावर प्रयत्न केल्यावर पॅटिस चांगले झालेले. पण त्यामुळे पॅटिस जास्त कुरकुरीत नव्हते त्यामुळे नंतर एकदा मी तव्यावर १-२ मिनिट आतले मिश्रण शिजून घट्ट होईपर्यंत तव्यावर आणि मग कढईत तळण्याचा प्रयोग करून बघणार आहे.
तसाच एकदा मी आतल्या मिश्रणाच्याऎवजी त्यात उकडलेल्या अंड्याचा कीस, मीठ, मिरच्या आणि कोथिंबीर घालुन करून बघणार आहे.

व्हेज स्प्रिंग रोल


हि पाककृती मी मला लग्नात मिळालेल्या एका पुस्तकातून घेतली आहे. पुस्तकाच नाव आहे 'हमाखास पाकसिद्धी'

व्हेज स्प्रिंग रोल
साहित्य
५ चमचाभरून मैदा
१ अंडे
३ गाजर
१ कोबी
२ कांदे
१ चमचा सोया सॉस
१/२ चमचा मिरे पूड
मीठ
तेल

कृती
  • मैदा, अंडे, मीठ आणि पाणी एकत्र करून पातळ भिजवणे.
  • नॉनस्टिक तव्यावर पातळ डोसे बनवणे.
  • हे सगळे डोसे एकावर एक कॉर्न फ्लॉवर पसरवून ठेवणे.
  • गाजर, कांदा आणि कोबी बारीक चिरणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात चिरलेले गाजर, कोबी आणि कांदा घालुन सारखे परतत अर्धवट शिजवणे.
  • त्यात सोया सॉस, मिरे पूड आणि मीठ घालुन एकत्र करून ढवळणे.
  • अर्धा चमचा मैदा आणि थोडे पाणी एकत्र करून रोल बंद करण्यासाठी पेस्ट बनवणे.
  • प्रत्येक डोश्यावर आधी बनवलेली भाजी घालुन रोल करणे व मैद्याच्या पेस्टनी बंद करणे.
  • कढईत तेल घालुन रोल भाजणे.

टीप
डोसे एकदम पातळ बनवले पाहिजेत म्हणजे रोल एकदम कुरकुरीत होतील
छोटे छोटे डोसे बनवले तर स्प्रिंग रोल कापावे नाही लागणार व मिश्रण बाहेर येण्याचा संभाव नाही येणार.

डिमेर ढोका


ही बंगाली पाककृती मी इंटरनेटवर सर्फ करत असताना बघितली आणि माझ्या चवीनुसार थोडीफार बदलली. बंगालीमध्ये डीम म्हणजे अंड आणि ढोका म्हणजे ढोकळा. ही अंड्याच्या ढोकळ्याची ग्रेव्ही. पण असे असताना सुद्धा नुसता अंड्याचा ढोकळा पण खूप चविष्ट लागतो आणि नाश्त्याला छान लागतो.

ढोका

डिमेर ढोका
साहित्य
६ अंडी
१ छोटा कांदा
१/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३-४ मिरच्या बारीक चिरून
१ चमचा आलं पेस्ट
३ चमचे दुध
चिमुटभर बेकिंग पावडर
मीठ

कृती
  • एका भांड्यात अंड फेसून घ्या
  • त्यात बारीक चिरून कांदा, मिरची, कोथिंबीर, आलं पेस्ट, बेकिंग पावडर, दुध आणि मीठ घालुन ढवळणे.
  • तेल लावलेल्या भांड्यात हे मिश्रण घालुन कुकर मध्ये शिट्टी न लावता उकडणे
  • पूर्णपणे ढोकळा शिजल्यानंतर कुकरमधून काढून लाडेच ताटात काढणे.
  • चौकोनी तुकडे करून वाढणे किंवा ग्रेव्हीसाठी बाजूला ठेवणे


ग्रेव्ही

डीमेर ढोका ग्रेव्हीमध्ये
साहित्य
२-३ मध्यम आकाराचे कांदे
३-४ टोमेटो
१ चमचा मौव्हरी आणि जीरा
१ चमचा आलं पेस्ट
१ चमचा लसूण पेस्ट
१/२ वाटी दही (इच्छेनुसार)
२ चमचा जीरा पूड
२ चमचा धने पूड
२ वाटी पाणी
१ चमचे साखर
१ चमचा तिखट
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
कोथिंबीर
मीठ
तेल

कृती

  • कांदा आणि टोमेटो वेगळे वेगळे मिक्सरमध्ये वाटून घेणे
  • कढईमध्ये तेल गरम करून मौव्हरी आणि जीरा घालणे
  • फोडणीझाल्यावर त्यात वाटलेला कांदा आणि साखर घालुन सारखे हलवत तेल वेगळे होईपर्यंत शिजवणे.
  • त्यामध्ये वाटलेला टोमेटो, आलं आणि लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या घालणे. टोमेटो शिजेपर्यंत ढवळत शिजवावे
  • तोपर्यंत एका वाटीमध्ये दही, जीरा पूड, धने पूड आणि तिखट एकत्र करणे
  • टोमेटो शिजल्यावर कधी आचेवरून बाजूला काढून त्यात दह्याचे मिश्रण घालणे.
  • व्यवस्तीथ हलवून पुन्हा मंद आचेवर ठेवणे.
  • ग्रेव्ही पूर्णपणे तयार होईपर्यंत सारखे हलवत, जरूर पडल्यास पाणी घालुन शिजवणे.
  • डीमेर ढोका आणि मीठ घालुन एक उकळी काढणे. कोथिंबीर बारीक चिरून घालणे.

टीप
अंड्याच्या ढोकळ्यामध्ये टोमेटो बारीक चिरून घालता येईल पण मला अंड्याबरोबर टोमेटो बिलकुल आवडत नाही त्यामुळे मी नाही घातला.
६ अंड्यापासून अंदाजे २० ढोकळे तयार होतात
पहिल्यांदा जेंव्हा मी ही ग्रेव्ही केली होती तेंव्हा मी दही घालुन केलेली पण काल मी दही न घालता केली आणि मला ती जास्त छान लागली.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP