Showing posts with label गुळ. Show all posts
Showing posts with label गुळ. Show all posts

पायेश


मी आधी पण हि डीश बनवली होती पण आज मिलिंद आणि अजॉयसाठी पुन्हा बनवल्यावर फोटो काढून रेसिपी लिहायचे ठरवले. अजॉयचा आवडता गोड पदार्थ आणि इतके सोप्पे

पायेश
साहित्य
१ लिटर दुध
३/४ वाटी तांदूळ
१.२५ वाटी गुळ

कृती
  • दुध उकळवून ३/४ होईपर्यंत आटवणे
  • तांदूळ धुवून उकळत्या दुधात घालुन भात शिजेपर्यंत उकळवणे
  • गॅसवरून उतरवून त्यात बारीक चिरलेले गुळ घालणे.
  • गुळ विरघळेपर्यंत ढवळणे. थंड करून खायला देणे.

टीप
दुध आणि भात मध्यम आचेवर सारखे ढवळत शिजवणे म्हणजे पायेश करपणार नाही.

गुळाचा संदेश


सरस्वती पूजेच्या दिवशी मी हि मिठाई करून बघण्याचे ठरवले. अजॉयची आवडती मिठाई. खूपच चांगला झालेला आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे कलाकंद सारखी किचकटपण नाहीये करायला. त्यामुळे त्यांनी पुन्हा काहीतरी बनवण्यास सांगितल्यास कमी कष्टाची पण खूप तारीफ देणारी हि मिठाई कधीही बनवू शकते.

गुळाचा संदेश
साहित्य
१ लिटर दुध
३/४ वाटी गुळ
२ चमचा व्हिनेगर
१/४ चमचा पिस्ता पूड

कृती
  • भांड्यात दुध उकळवणे व त्यात २ चमचा पाण्यात मिसळलेले व्हिनेगर घालणे.
  • पनीर तयार झाल्यावर लगेच गाळून थंड पाण्याखाली धुवून घेणे.
  • पंचात टांगून ५-१० मिनिट पाणी जाण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • परातीत पनीर काढून चांगले मळून घेणे. एकम मऊसर आणि एकसारखे झाले पाहिजे.
  • त्यात गुळ किसून घालणे व एकत्र करणे.
  • कढईत मिश्रण घालुन मध्यम आचेवर शिजवणे. भांड्यापासून मिश्रण सुटायला लागले व एकत्र गोळा व्हायला लागले की खाली काढणे.
  • छोटे छोटे गोळे करून त्यांना साच्यात घालुन आकार देणे. साचे नसल्यास नुसतेच पण गोळे करून ठेवता येतील.
  • पिस्ता पूड शिंपडणे व पूर्ण पणे थंड होऊ देणे.

टीप
मी नेहमीच्या गुळाऎवजी कलकत्याचे पाताली गुळ वापरले. पण नेहमीचे गुळ वापरताना मी त्यात थोडासा खजूर वाटून घालण्याचा विचार करत आहे. कारण त्या गुळाची चव खजूर आणि गुळ एकत्र केल्यासारखी लागते.
पनीर बनवताना ते दुधापासून वेगळे झाले की लगेच धुवून घेणे, जर जास्त शिजवले तर मिठाई कडक होते.
संदेशला आकार देण्यासाठी मिश्रण गरमच असायला हवे. जर ते थंड व्हायला लागले तर पुन्हा थोडेसे कोमट करून घेणे.

खतखते


मला एकदम लहान असल्यापासून हा पदार्थ खूप आवडतो. बेळगावला काकीकडे गेल्यावर तिथे खायचो. आतापर्यंत मला लक्षात नव्हता आला की हा एकदम तब्येतीसाठी उत्कृष्ठ पदार्थ आहे :) नावाप्रमाणेच फ्रीजमधले सगळे संपवण्यासाठी एकदम उत्तम

खतखते
साहित्य
१ वाटी घेवडा
१/२ वाटी मटार
२ शेवग्याच्या शेंगा
२ कणीस
१ बटाटा
१ रताळे
१ कच्चे केळे
१.५ चमचा चिंच
१/४ वाटी गुळ
१/२ वाटी खोबरे
१/४ चमचा धने
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
चिमुटभर हिंग
२ चमचा तूप
मीठ

कृती
  • अर्धा वाटी पाण्यात चिंच भिजवणे.
  • मोठ्या भांड्यात घेवडा आणि ४ वाटी पाणी घालुन मोठ्या आचेवर ५ मिनिट शिजवणे.
  • कणीस ३ तुकडे करून त्यात घालणे. २ वाटी पाणी घालुन अजून ५ मिनिट शिजवणे.
  • त्यात शेवग्याच्या शेंगा, बटाटे, रताळे, कच्चे केळे आणि २ वाटी पाणी घालुन अर्धवट शिजवणे.
  • त्यात खोबरे, चिंच आणि घने अर्धा वाटी पाणी घालुन वाटून घालणे.
  • भाज्या शिजत आल्याकी त्यात मटार घालणे.
  • हळद, गुळ, तिखट आणि मीठ घालुन उकळवणे.
  • छोट्या कढईत तूप आणि म्हवरी घालुन फोडणी करणे व हिंग घालणे. फोडणी भाजीत घालणे.

टीप
ह्यात १ वाटी भोपळ्याचे तुकडे पण घालता येतील पण इथे मला न मिळाल्यानी वापरले नाहीये.

मनगणे


लहानपणी मला हा पदार्थ खूप आवडायचा, इतका की आई दर शनिवारी दुपारच्या जेवणात बनवायची आणि मी त्याची वाट बघायचे. आईची हि पाककृती मी थोडीशी बदलून वापरली आहे.

मनगणे
साहित्य
१ वाटी हरबरा डाळ
३/४ वाटी गुळ
१/२ वाटी काजू
१/२ वाटी मनुका
३ वाटी दुध
चिमुटभर वेलची पूड
मीठ

कृती
  • हरबरा डाळ १.५ वाटी पाणी घालुन ४-५ शिट्ट्या येईपर्यंत कुकरमध्ये शिजवून घेणे.
  • त्यात गुळ, काजू, मनुका, वेलची पूड आणि मीठ घालुन मध्यम आचेवर ५ मिनिट उकळवणे व नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणे.
  • त्यात दुध घालुन वाढणे.

टीप
सगळ्यात सोप्पी डीश आहे नाही :) चव गुळ, डाळ आणि सुक्यामेव्यानी येते.
नेहमीच्या दुधाऎवजी नारळाचे दुध वापरता येईल पण आई दुध वापरते म्हणून मी पण तेच वापरले.

भेळ


भेळ हा माझा आवडीचा चटपट पदार्थ. खासकरून पिकनिकसाठी. लवकर बनणारा सोपा आणि चविष्ठ पदार्थ.

भेळ
साहित्य
६ वाटी चुरमुरे
२ वाटी फरसाण
१ वाटी शेव
१ वाटी बुंदी
१ वाटी नवरत्न मिश्रण
१.५ वाटी चिंच
२ वाटी गुळ
२ हिरवी मिरची
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
४-५ खजूर
२ कांदे
२ टोमाटो
१/२ वाटी कोथिंबीर
मीठ

कृती
  • चिंच आणि खजूर पाण्यात एक तास भिजवणे.
  • भिजलेले चिंच खजूर, गुळ, तिखट, हिरवी मिरची, जिरे पूड आणि मीठ घालुन मिक्सरमध्ये वाटणे.
  • मिश्रण गाळून घेणे.
  • एका भांड्यात चुरमुर, फरसाण, शेव, नवरत्न मिश्रण, चिरलेला कांदा, टोमाटो आणि कोथिंबीर एकत्र करणे.
  • त्यात चिंचेचे मिश्रण घालुन चांगले ढवळणे.
  • वरून बुंदी आणि शेव घालुन खायला देणे.

टीप
कैरीच्या दिवसात बारीक चिरून कैरीपण घालता येईल
मी नेहमी चिंचेचे थोडे पाणी वेगळे ठेवते त्यामुळे प्रत्येकाच्या चवीनुसार ते वरून थोडे घेऊ शकतात
सगळे चिरून ठेवल्यास फक्त एकत्र करण्याचे काम राहते, पार्टी आणि पिकनिकसाठी एकदम उत्तम

कटाची आमटी


हि आमटी पुरण पोळीच्या डाळीच्या उरलेल्या पाण्यातून बनवतात. एकदम गोड आणि आंबट अशी हि आमटी पुरण पोळी बरोबर एकदम मस्त लागते.

कटाची आमटी
साहित्य
२ वाटी हरबरा डाळ शिजवलेले पाणी
१/२ वाटी पुरण
१/२ वाटी गुळ
२ चमचा चिंच
१ चमचा धने
१ चमचा जिरे
१/२ चमचा म्हवरी
१ चमचा तिखट
४ चमचा खोबरे
१५ कडीपत्याची पाने
मीठ
तेल

कृती
  • चिंच एक वाटी पाण्यात भिजवणे व बाजूला ठेवणे.
  • चमचाभर तेल गरम करून त्यात धने आणि जिरे फोडणी करणे.
  • किसलेले खोबरे घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • मिक्सरमध्ये खोबऱ्याचे मिश्रण घालुन चिंचेबरोबर बारीक वाटणे.
  • अर्धा चमचा तेल गरम करून त्यात म्हवरी घालुन फोडणी करणे.
  • कडीपत्ता घालुन भाजणे
  • त्यात चिंच खोबऱ्याचे वाटण घालणे व एक मिनिट भाजणे.
  • तिखट घालुन अजून एक मिनिट भाजणे.
  • डाळीचे पाणी, पुरण आणि गुळ घालणे. जाड वाटल्यास थोडे पाणी पण घालणे.
  • मीठ घालुन आमटी उकळवणे.

टीप
डाळीचे पाणी नसेल तर साधे पाणी पण वापरता येईल
पुरण बनवण्यासाठी ह्या पुरण पोळीच्या कृतीचा उपयोग करणे

नारळाचा रस


आमच्या ह्या रसाशिवाय पुरण पोळी होऊच शकत नाही. इथे त्याची कृती देत आहे.

नारळाचा रस
साहित्य
४ वाटी खोबरे
१.५ वाटी गुळ
मीठ

कृती
  • मिक्सरमध्ये किसलेले खोबरे आणि पाणी घालुन वाटणे व पिळून दुध काढणे. तोच कीस सारखा पाणी घालुन ३ वेळा रस काढणे.
  • त्यात गुळ आणि मीठ घालुन ढवळणे.

टीप
हा रस ताजा ताजाच चांगला लागतो. वर दिलेल्या प्रमाणात ह्या पुरण पोळीच्या कृतीत दिलेल्या पोळ्यांना पुरेसा होतो.

पुरण पोळी


पुरण पोळी हा असा एक प्रकार आहे जो मला आईनी बनवलेलाच आवडतो. बरेच लोक त्याला पराठ्यासारखा बनवतात पण पोळी आणि पराठा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पोळी हि एकदम मऊसुत असणे एकदम महत्वाचे आहे. आईकाढून आधी मी ह्याची कृती घेतलेली पण मला काही आई सारखी मऊ पोळी बनवायला जमली नाही. आता पुण्यात असताना मी आई कडून चांगली शिकून आले आणि इथे दसर्याच्या निमित्तानी देत आहे. सगळ्यांना दसर्याच्या शुभेच्छा.

पुरण पोळी
साहित्य
४ वाटी हरबरा डाळ
३ वाटी गुळ
२ वाटी पीठ
१ चमचा मैदा
१ वाटी तांदुळाचे पीठ
१/२ वाटी तेल

कृती
  • मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून एकदम मऊ पीठ भिजवणे.
  • पीठ स्टीलच्या भांड्यात टाकून बोटे दाबून खड्डे करणे.
  • सगळी भोके बुडतील इतके तेल ओतणे आणि कमीत कमी २ तास भिजायला ठेवणे.
  • हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घेणे.
  • डाळीतील जास्तीचे पाणी बाजूला काढणे. (जास्तीच्या पाण्याची कटाची आमटी बनवता येईल)
  • त्यात गुळ घालुन कढईत सुकेपर्यंत शिजवणे.
  • पुरण पुरण यंत्रातून फिरवणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • पुरण पोळी करण्यासाठी तवा एकदम मंद आचेवर गरम करणे.
  • पुरणाचा लिंबाच्या दुप्पट आकाराचा गोळा बनवणे.
  • पिठाचा लिंबाच्या आकाराचा गोळा बनवणे व त्याची वाटी बनवणे. त्यात पुरणाचा गोळा घालुन पीठ बंद करणे.
  • गोळे तळव्यावर ठेवून अलगद दाबणे. पीठाचे कव्हर बाजूला गेले तर ओढून पुन्हा आत मध्ये घेणे
  • भरपूर तांदुळाचे पीठ पोलपाटाला लावणे. पुरण पोळीचा गोळा तांदुळाच्या पिठात बुडवून लाटणे.
  • मध्ये मध्ये पोळी हातावर घेवून खाली चिकट नाही ह्याची खात्री करणे व मधून मधून तांदुळाचे पीठ लावत राहणे.
  • एकदम अलगद आणि बाहेरच्या दिशेनी लाटणे महत्वाचे आहे.
  • पोळी गरम तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूनी भाजणे. दुमडून वाढणे.

टीप
पोळीच्या पिठाचा इलॅस्टिकपणा पोळीला पातळ लाटण्यासाठी आणि त्याचा थर पातळ ठेवण्यासाठी उपयोगी पडतो.
पुरण पोळी बनवताना पहिल्यांदा छोटी लाटून बघणे व जसे जमेल तसे मोठे मोठे करणे. भरपूर तांदुळाचे पीठ वापरणे व नंतर पाहिजे तर स्वतःच्या सोयीप्रमाणे कमी करणे.
पोळी पोलपाटाला चिकट नाही हे बघण्यासाठी तळवा पोळीवर ठेवून पोलपाट उलटे करणे.तव्यावर पोळी टाकताना पण तसेच करणे. कधीही बोटांनी पोळी उचलू नये.
पोळीच्या कडांना जास्त पीठ असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की पुरणापेक्षा पीठ जास्त वापरलाय. त्या नंतरच्या पोळीला थोडे कमी पीठ वापरून बघणे
पोळी लाटताना बाहेरच्या बाजूला लाटल्यानी पोळी सगळीकडून चांगली पसरते आणि बाहेरच कव्हर पण तुटत नाही.
शेवटची टीप म्हणजे हि एकदम किचकट कृती आहे त्यामुळे पहिल्यांदा यश नाही आलेतरी दुखी होऊ नये, थोड्या प्रयत्नानंतर यश नक्की येईल. मी आईनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी सांगायचा प्रयत्न केलाय. आशा आहे त्याचा उपयोग होईल

केळफुलाची भाजी


मी पहिल्यांदा हि भाजी गुरुकाकांच्या घरी खालेली आणि मला ती एकदमच आवडलेली. त्यानंतर मी आईला खूप वेळा सांगायचे बनवायला पण तिला ती जमायची नाही. मी बँगलोरमध्ये राहायला लागल्यानंतर संगीताताई कडे असताना त्यानी एका बनवलेली हि भाजी. तेंव्हाच मी केळफूल साफ कसे करायचे शिकून घेतलेले.

केळफुलाची भाजी
साहित्य
१ केळफुल
१ चमचा तिखट
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा गुळ
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचे धने पूड
१/४ चमचा जिरे पूड
चिमुटभर हिंग
मीठ
तेल

कृती
  • केळफुल साफ करणे व बारीक चिरणे.
  • कुकरमध्ये २-३ शिट्ट्या काढून शिजवणे. पाणी काढून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे.
  • त्यात हिंग घालुन नंतर शिजलेले केळफुल घालुन ढवळणे.
  • त्यात तिखट, गरम मसाला, धने पूड, जिरे पूड, गुळ आणि मीठ घालुन अजून २ मिनिट शिजवणे.

टीप
ह्या भाजीचा सगळ्यात महत्वाचे म्हणजे केळफुल साफ करणे. प्रत्येक फुल उघडून त्यातले काही भाग काढून टाकावे लागतात. मी ह्या फोटोमध्ये कुठला भाग काढायचा आणि कुठला भाग ठेवायचा ते दाखवलय. जेंव्हा फुल उघडण्यासाठी खूप छोटे असेल तेंव्हा ते तसेच वापरणे. पाण्यामध्ये असे साफ केलेले फुल भिजवून ठेवणे म्हणजे काळे पडत नाही

भोपळ्याची पुरी


थोड्या दिवसांपूर्वी आई इथे आली असताना तिनी अश्या पुऱ्या बनवलेल्या आणि मला त्या फार आवडलेल्या. आज मी स्वतः बनवल्या आणि इथे कृती देत आहे

भोपळ्याची पुरी
साहित्य
२ वाटी भोपळा
३/४ वाटी गुळ
३ वाटी गव्हाचे पीठ
मीठ
तेल

कृती
  • भोपळ्याचे साल काढून किसून घेणे.
  • २ चमचे तेल गरम करून त्यात भोपळ्याचा कीस घालुन मध्यम आचेवर ५ मिनिट शिजवणे.
  • आचेवरून बाजूला करून त्यात किसलेले गुळ घालुन एकत्र करणे.
  • मिश्रण थंड झाले की त्यात मीठ, गव्हाचे पीठ घालुन घट्ट पीठ मळणे.
  • पुऱ्या लाटून तळणे.

टीप
ह्या पुऱ्या थोडे दिवस ठेवता येतात त्यामुळे प्रवासात खायला चांगला पदार्थ आहे.

पन्ह


हे एकदम ताजे तवाने करणारे पैय्या मी ह्या वर्षीच्या पहिल्या कैरींचे बनवले.

पन्ह
साहित्य
३ कैऱ्या
२.५ वाटी गुळ
मीठ

कृती
  • कैरीची साल काढून त्याचे तुकडे करणे.
  • कुकरमध्ये पाणी घालुन उकडणे.
  • कैरी थंड झाली की मिक्सरमध्ये वाटून मिश्रण गाळून घेणे.
  • त्यात गुळ आणि मीठ घालुन विरघळेपर्यंत ढवळणे.
  • अजून थोडे थंड पाणी घालुन पातळ पन्ह बनवणे.

टीप
गुळाचे प्रमाण कैरीच्या आंबटपणाप्रमाणे बदलावे लागते

फणसाची भाजी


ह्या वेळी बाजारात कच्चा फणस मिळाला त्यामुळे मी त्याची भाजी करून बघितली

फणसाची भाजी
साहित्य
१ कच्चा फणस
४ चमचे शेंगदाणा कुट
१/२ नारळ
२ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा हळद
१ चमचा गुळ
१ चमचा म्हवरी
मीठ
तेल

कृती
  • फणसाची साल आणि आतील कडक जाड गर कापून टाकणे.
  • उरलेले गरे बियांसकट बारीक चिरणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे
  • त्यात हळद, हिरव्या मिरच्या, चिरलेला फणस घालणे व ३-४ मिनिट परतणे.
  • साधारण २ वाटी पाणी घालुन फणस झाकण लावून शिजवणे. लागल्यास अजून थोडे थोडे पाणी घालत राहणे
  • भाजी शिजल्यावर त्यात गुळ, तिखट, मीठ, किसलेले खोबरे, शेंगदाणा कुट घालुन ढवळणे.

टीप
फणस कापताना हाताला आणि सुरीला तेल लावणे म्हणजे तो चिकटत नाही

वरयाचा भात आणि शेंगदाणा आमटी


लहान असताना आई हा भात आणि आमटी उपवासाच्या दिवशी बनवायची. मला हे इतके आवडते की मी उपवासाच्या दिवसाची वाट बघायचे. आज बरेच लोकांकडून कळले की शिवरात्री आहे मग मी लगेच हा भात आणि आमटी बनवली

वरयाचा भात

वरयाचा भात
साहित्य
१ वाटी वरया
२ वाटी पाणी
१/२ चमचा जीरा
२ चमचे तूप
मीठ

कृती
  • भांड्यात तूप गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे
  • वरया त्यात घालुन गुलाबी होई पर्यंत भाजणे.
  • पाणी आणि मीठ घालुन मध्यम आचेवर भात होईपर्यंत शिजवणे.

टीप
भात परतताना त्यात शेंगदाणा कुट पण घालता येईल थोडी वेगळी आणि छान चव येते आणि मग शेंगदाणा आमटीची गरज नाही पडणार पण मला ती आमटी आवडत असल्यानी मी शेंगदाणा कुट वापरला नाही

शेंगदाणा आमटी

शेंगदाणा आमटी
साहित्य
१ वाटी खोबरे
३ वाटी पाणी
२ चमचा गुळ
३-४ हिरव्या मिरच्या
३-४ कोकम
१/२ चमचा जिरे
मीठ
१ चमचा तूप

कृती

  • शेंगदाणे भाजून त्याची साले काढणे व मिक्सर मध्ये पाणी घालुन वाटणे
  • कढईत हे मिश्रण घालुन गरम करणे.
  • त्यात गुळ, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोकम आणि मीठ घालुन उकळी आणणे.
  • छोट्या कढईत तूप गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे व उकळत्या आमटीत टाकणे.

टीप
शेंगदाणे एकदम बारीक वाटले पाहिजेत नाहीतर आमटी बरोबर होत नाही व सगळे शेंगदाणे खाली राहतील.

खोबऱ्याचे नाडू


मी पाटीशाप्ता बनवलेले तेंव्हा त्याचे खोबऱ्याचे मिश्रण जास्त केलेले आणि मी त्याचे मोदक बनवण्याचा विचार करत होते पण अजॉयनी हे छोटे लाडू - नाडू बनवायला सांगितले.

खोबऱ्याचे नाडू
साहित्य
१ वाटी गुळाचे तुकडे
१/२ वाटी गुळ
१/२ वाटी खोबरे

कृती
  • गुळाचे तुकडे १.५ मिनिट मायक्रोवेव्ह करणे.
  • कढईमध्ये तो गरम केलेला गुळ, उरलेला गुळ किसून आणि खोबरे घालणे व सारखे ढवळत शिजवणे.
  • मिश्रण एकसंध गोळा बनून आल्यावर त्याचे छोटे छोटे लाडू बनवणे

टीप
हे लाडू मस्त कॅरॅमेल सारखे कुरकुरीत लागतात. नेहमीचे लाडू मऊ असतात पण मला हे असे कुरकुरीत जास्त आवडतात. ते मायक्रोवेव्ह मध्ये गुळ गरम केल्यानी असे बनतात. मला ते गॅसवर कसे बनवायचे माहित नाही त्यामुळे जर कोणाला माहिती असेल तर सांगणे.

पाटीशाप्ता


मा हे खूपवेळा बनवतात. मी नेहमी हे बनवण्याचा विचार करते पण आज बनवण्याचा मुहूर्त लागला

पाटीशाप्ता
साहित्य
१ वाटी खोबरे
१/२ वाटी गुळ
१ वाटी रवा
१/२ वाटी + थोडासा मैदा
१ चमचा इडली रवा
१ चमचा साखर
दुध
तेल

कृती
  • किसलेले खोबरे आणि गुळ कढईत शिजवून बाजूला ठेवणे.
  • एका भांड्यात रवा, इडली रवा, मैदा, साखर आणि दुध एकत्र करून पातळ पीठ भिजवणे.
  • तवा गरम करून त्यावर एखाद थेंब तेल सोडणे.
  • भिजवलेल्या पीठाचे छोटे घावन काढणे व जेव्हा दोन्ही बाजूनी शिजेल तेंव्हा त्यावर गुळाचे मिश्रण ठेवून गुंडाळणे

टीप
मी पीठ भिजवून ५-१० मिनिट बाजूला ठेवले त्यामुळे रवा पूर्ण भिजतो आणि पीठ जाड होते. १/२ चमचा पाणी मी दर २-३ घावानानंतर घालुन पीठ बरोबर करत होते

चिंचेची चटणी


चिंचेची चटणी बनवून २-३ आठवडे बनवून ठेवता येईल.

चिंचेची चटणी
साहित्य
३ चमचे चिंच
८ चमचे पाणी
४ चमचे गुळ
१ चमचा तिखट
मीठ

कृती
  • चिंच पाण्यात भिजवून १-२ तास ठेवणे.
  • चिंच मिक्सरमध्ये गुळ, तिखट, मीठ घालुन चटणी वाटून घेणे.

टीप
मी कधी कधी चिंच वाटताना त्यात एखाद खजूर घालते त्यामुळे चव आणखीन खुलून येते.

तळलेले मोदक


आज मी पुरण पोळी बनवण्याचे ठरवले पण पोळीच्या कडांना पुरण पोचले नाही. २-३ वेळा प्रयत्न केल्यावर शेवटी मी पुरण पोळीच्याऎवजी मोदक केले.

तळलेले मोदक
साहित्य
१ वाटी हरबरा डाळ
१/२ वाटी गुळ
४ चमचेभरून गव्हाचे पीठ
२ चमचाभरून मैदा
मीठ
तेल

कृती
  • डाळ कुकरमध्ये शिजवून घेणे व त्यातले पाणी काढून टाकणे.
  • एका कढईत शिजलेली डाळ आणि गुळ घालुन ५-६ मिनिट शिजवणे.
  • गव्हाचे पीठ, मैदा आणि एक चमचा गरम तेल एकत्र करून पीठ भिजवणे. अर्धा तास बाजूला ठेवून देणे.
  • पीठ्चे छोटे गोळे पुरीच्या आकाराचे लाटणे.
  • प्रत्येक पुरीवर पुरण पसरवून निऱ्या काढून मोदक बंद करणे.
  • तेलात मध्यम आचेवर मोदक तळून घेणे.

टीप
हे मोदक पुराणाचे असल्यानी ते २-३ दिवस चांगले राहतात.
मोदक जिथे बंद करतो ती बाजू पण चांगली भाजणे अथवा तिथे कच्चे राहण्याची संभावना जास्त आहे.

उकडीचे मोदक


गणेश चतुर्थी असल्यानी मी मागच्या आठवड्यात मोदक बनवण्याचे ठरवलेले पण पुण्याला सरप्राईज देण्यासाठी गेल्यानी ते राहून गेले. पण म्हणून मी आज वेळ मिळताच लगेच मोदक बनवायला घेतले.

उकडीचे मोदक
साहित्य
१ वाटी किसलेला नारळ
३/४ वाटी गुळ
१.५ वाटी पाणी
१ वाटी तांदुळाचे पीठ
मीठ
तेल

कृती
  • कढई गरम करून त्यात किसलेले खोबरे आणि गुळ घालणे.
  • साधारण ५-७ मिनिटांनी गुळ विरघळून खोबर्याचे मिश्रण तयार होईल.
  • एका भांड्यात पाणी उकळवून त्यात तेल आणि मीठ घालणे.
  • त्यात तांदुळाचे पीठ घालुन चांगले ढवळून घेणे.
  • मिश्रण आचेवरून काढून मळणे.
  • लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून ते पातळ लाटणे
  • त्यावर चमचाभर मिश्रण घालुन निऱ्या काढून मोदक बंद करणे.
  • भांड्यात पाणी उकळवणे व त्यावर दुसरे भांडे ठेवणे. भांड्यावर पंचा पसरवून त्यावर सगळे मोदक ठेवणे. मोदकांना पंच्यानी झाकून ७-१० मिनिट शिजवणे.

टीप
खोबर्याचा हा पदार्थ जास्त टिकत नाही त्यामुळं एक - दोन दिवसात संपवणे.

शेंगदाणा लाडू


लाडूमध्ये मला फार कमी प्रकार आहेत जे आवडतात पण हा सगळ्यात जास्त आवडीचा लाडू. आईला विचारून मी हा लाडू बनवला आणि सगळ्यात सोपा हा लाडू इथे देत आहे.

शेंगदाणा लाडू
साहित्य
३ वाटी शेंगदाणा
१/२ वाटी गुळ

कृती
  • कढईत शेंगदाणे भाजून घेणे.
  • शेंगदाण्याची साल काढून मिक्सर मध्ये बारीक पूड करणे.
  • त्यात चिरलेला गुळ घालुन पुन्हा वाटणे.
  • लिंबाच्या आकाराचे लाडू वळणे.

टीप
शेंगण्याची साल काढण्याचा मला फार कंटाळा येतो त्यामुळे मी सालासकटच शेंगदाणे वाटते, चव फार काही बदलत नाही

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP