Showing posts with label चिकनचे पदार्थ. Show all posts
Showing posts with label चिकनचे पदार्थ. Show all posts

कोथिंबीर चिकन


शुक्रवारी अजॉयनी मला चिकन रोल बनवायला सांगितले तेंव्हा त्यात घालायला म्हणून मी हि भाजी बनवलेली. मला नेहमीची लाल मसाला करायचा कंटाळा आलेला. त्यानी चिकन खाऊन सांगितला की हे आता पर्यंतच सगळ्यात चांगला चिकन होता. मला वाटला की खूप दिवसांनी चिकन बनवलंय म्हणून तो असा म्हणतोय. पण रविवारी जेव्हा मित्रमैत्रिणीना बोलावण्याचे ठरवले तेंव्हा तो म्हणाला की हि डीश पुन्हा करायलाच हवी. जेव्हा थोडासा खाल्यावर पुन्हा त्यानी तशीच प्रतिक्रिया दिली मी लगेच फोटो काढून ठेवले. मित्रमैत्रिणीनी पण डीशची खूप तारीफ केली तेंव्हा मला पोस्ट करावाच लागलं :)

कोथिंबीर चिकन
साहित्य
१/२किलोग्राम बोनलेस चिकन
१ चमचा जीरा पूड
१ चमचा धने पूड
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा तिखट
१ चमचा मिरे पूड
३-४ लसूण पाकळ्या
१ चमचा आले पेस्ट
१ मोठा टोमाटो
२ वाटी कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • चिकनला मीठ, जीरा पूड, धने पूड, गरम मसाला, मिरे पूड लावून अर्धा तास ठेवून देणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात चिकन गुलाबी होईपर्यंत मध्यम आचेवर परतून घेणे.
  • तोपर्यंत टोमाटो, लसूण आणि आले मिक्सरमध्ये वाटून घेणे.
  • त्यात कोथिंबीर घालुन पुन्हा बारीक वाटणे.
  • चिकन मध्ये टोमाटो-कोथिंबीर मिश्रण, मीठ घालुन सुके पर्यंत शिजवणे.

टीप
चिकन रोल बनवण्यासाठी कांदा आणि हि भाजी घालता येईल. खूप सुंदर लागते. असेच भाताबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाता येईल. कसेही खा चाविष्ठच लागते.

चिकन रोल


बरेच दिवस झाले मी कुठलाही चिकनचा पदार्थ बनवून. मागच्या बरेच वेळा अजॉयच चिकन किंव्हा मटन बनवत होता, अर्थात प्रत्येक वेळा एकाच टाईपचा रस्सा आणि फक्त चिकन किंव्हा मटन घालुन. त्यामुळे मी आज विचार केला की चिकनचे काहीतरी वेगळे बनवून त्याला थोडा आश्चर्यचकित करूया. त्यावेळी मला त्याच्या आवडत्या रोलची आठवण झाली आणि मी हा पदार्थ बनवला.

चिकन रोल
साहित्य
५०० ग्राम बोनलेस चिकन
२ वाटी मैदा
१/२ वाटी गव्हाचे पीठ
१ मोठा कांदा
१ वाटी ब्रोकोली
१ वाटी टोमेटो
१/२ वाटी टोमेटो केचप
१/४ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/२ चमचा मिरे पूड
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा आलं किसून
८ लसूणाच्या पाकळ्या
मीठ
तेल

कृती
  • मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि २ चमचे तेल घालुन पीठ नीट मळून भिजायला बाजूला ठेवणे.
  • चिकनचे छोटे छोटे तुकडे चिरून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात चिकन घालुन ढवळणे.
  • चिकन पांढरे झाल्यावर, त्यात किसलेले आलं, हळद, तिखट, जिरे पूड, धने पूड, मिरे पूड आणि गरम मसाला घालुन ढवळणे.
  • चिकन मधून मसाल्याचा वास सुटल्यावर, त्यात केचप घालुन ५ मिनिटे शिजवणे
  • त्यात बारीक चिरलेला टोमेटो आणि मीठ घालुन चिकन पूर्णपणे शिजवून बाजूला ठेवणे.
  • तव्यामध्ये तेल गरम करून त्यावर बारीक चुरून लसूण, उभा चिरलेला कांदा आणि ब्रोकोली घालुन पूर्णपणे शिजेपर्यंत सारखे हलवत शिजवणे. त्यात मीठ आणि चिमुटभर मिरे पूड घून ढवळणे आणि बाजूला ठेवणे
  • एक अंडे नीट फेटून रुंद पातेल्यात ओतणे.
  • पीठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून पातळ चपाती लाटणे.
  • चपाती अंड्यामध्ये एका बाजूने भिजवून, न भिजलेली भाजू खाली असे गरम तव्यावर टाकणे
  • थोडे तेल शिंपडून दोन्हीबाजूने नीट भाजणे व ताटात टाकणे
  • चपातीवर मध्ये बारीक रेषेत दोन चमचे चिकन घालणे. त्यावर अर्धा चमचा ब्रोकोली आणि कांदा मिश्रण घालणे.
  • चपातीची खालची बाजू आणि डावी बाजू मिश्रणावर दुमडणे आणि मग घट्ट रोल करणे.

टीप
मला रोल थोडे हलके करायचे होते म्हणून मी एक अख्खे अंडे एका चपातीवर घालण्याऎवजी चपातीला हलका अंड्याचा वॉश दिला. त्यामुळे चपाती एकदम हलकी झाली आणि चिकनची चव चांगली खुलून आली.

फ्राईड चिकन


आम्ही बँगलोरमध्ये असताना केफसी मध्ये बऱ्याचवेळी जायचो, खूप साऱ्या आठवणीसुद्धा आहेत. पण इथे आल्यापासून आम्ही एकदासुद्धा केफसीमध्ये नाही गेलोय. त्यामुळे फ्राईड चिकन खाऊन बरेच दिवस झालेत. त्यामुळे आज मी ते बनवण्याचे ठरवले.

फ्राईड चिकन
साहित्य
५ चिकनचे लेग तुकडे
१ अंडे
३/४ वाटी मैदा
५ चमचे ब्रेडक्रम्स
१ चमचा तिखट
१/४ चमचा ओरिगानो
१/४ चमचा मिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा लसूण पेस्ट
मीठ
तेल

कृती
  • धार धार सुरीनी चिकनच्या तुकड्यांना चिरा पडणे.
  • गरम पाण्यात १/२ चमचा तिखट, ओरिगानो, मिरे पूड आणि मीठ घालणे.
  • त्यात चिकनचे तुकडे घालुन एक तास भिजवणे
  • एका भांड्यात अंडे, लसूण पेस्ट, उरलेले अर्धा चमचा तिखट, धने पूड आणि मीठ घालणे.
  • ताटलीत मैदा, ब्रेडक्रम्स आणि मीठ एकत्र करणे.
  • चिकनच्या तुकड्यातून पाणी निथळून टाकणे. प्रत्येक चिकनचा तुकडा अंड्याच्या मिश्रणात दुबवाने व नंतर मैद्याच्या मिश्रणात घोळवणे.
  • तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर गुलाबी रंगावर चिकनचे तुकडे तळणे.

टीप
चिकनचे तुकडे पाण्यात भिजवाल्यानी ते थोडे मऊसर होते. मी त्यात थोडे मसाले घातले त्यामुळे थोडी चव चिकनला लागते.
चिकन मध्यम आचेवर भाजल्यानी ते एकदम चांगले शिजले व ते बाहेरून करपलेपण नाही.
मी ब्रेडक्रम्स पनीरभरा कबाब बनवताना जास्त बनवून ठेवलेले.

चिकन साते


चिकन साते हि माझी थाई प्रकारची एकदम आवडती डीश. ह्या आधी जेव्हा बनवलेला तेंव्हा फोटो काढायच्या आधीच संपून गेलेले. त्यामुळे ह्यावेळी पहिल्यांदाच फोटो काढून घेतला.

चिकन साते
साहित्य
४०० ग्राम बोनलेस चिकन ब्रेस्ट
१ चमचा ब्रावून शुगर
२ लसुणाच्या पाकळ्या
१ चमचा धने पूड
१ चमचा जिरे पूड
१/४ चमचा हळद
१ चमचा मिरे पूड
२ चमचे तेल
२ चमचे सोया सॉस
२ चमचे लिंबाचा रस
१/२ वाटी दुध
मीठ

कृती
  • चिकन ब्रेस्टचे पातळ आयताकृती तुकडे करणे.
  • त्याला ब्रावून शुगर, लसुणाच्या पाकळ्या, धने पूड, जिरे पूड, हळद, मिरे पूड, तेल, सोया सॉस, लिंबाचा रस आणि मीठ लावून घेणे.फ्रीजमध्ये ४ तास ठेवणे.
  • प्रत्येक चिकनची पट्टीमध्ये काडी घालणे. प्रत्येक काडीला २ चिकनच्या पट्ट्या लावणे.
  • चिकनला थोड्या दुधामध्ये भिजवून घेणे.
  • नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर चिकन मध्यम आचेवर, प्रत्येक २-३ मिनिटांनी परतून, पूर्ण शिजेपर्यंत भाजणे

टीप
मी बऱ्याच पाककृतीमध्ये फिश सॉस घालावे असे वाचले पण थोडे फार वाचल्यावर कळले की ते खारट पाण्यासारखे असते आणि बऱ्याच वेळी मीठाऐवजी वापरले जाते. त्यामुळे फिश सॉसच्याऎवजी नेहमीचे मीठ वापरले.

तंदुरी चिकन


सगळ्यात आवडता स्टारटर. हैद्राबादमध्ये असताना मी एव्हरेस्टचा मसाला वापरून बनवायचे पण आज इथे वेगवेगळे मसाले एकत्र करून बनवले

तंदुरी चिकन
साहित्य
६ कोंबडीचे पाय
३/४ वाटी दही
२ चमचा तिखट
१ चमचा गरम मसाला
२ चमचा आले पेस्ट
२ चमचा लसूण पेस्ट
४ चमचे लिंबू
१/२ चमचा चाट मसाला
२ चमचा तेल
१/२ चमचा लोणी
मीठ

कृती
  • कोंबडीच्या पायांवर धार धार चाकुनी चिरा मारणे.
  • त्याला २ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा तिखट लावून ३० मिनिट बाजूला ठेवणे.
  • एका भांड्यात दही, लसूण पेस्ट, आले पेस्ट, १ चमचा तिखट, २ चमचा लिंबाचा रस, गरम मसाला, तेल आणि मीठ एकत्र करणे.
  • हे मिश्रण कोंबडीला लावून फ्रीजमध्ये ४-५ तास ठेवणे.
  • ओव्हन ३९५F/२००C वर गरम करणे.
  • लोणी वितळवून चिकनवर सोडणे व ओव्हनमध्ये १५ मिनिट भाजणे
  • तुकडे परतवणे व लोणी सोडणे. अजून १५ मिनिट भाजणे.
  • पुन्हा परतवून लोणी सोडणे व १० मिनिट भाजणे.
  • चाट मसाला पसरवून, कांदा आणि लिंबाच्या तुकड्याबरोबर खायला देणे.

टीप
लेगच्याऎवजी ७०० ग्राम कुठलेही तुकडे वापरता येतील
हॉटेलमध्ये लाल रंग येण्यासाठी रंगाचा वापर करतात माझ्याकडे तो नसल्यानी आणि वापरायची इच्छा नसल्यानी मी वापरला नाहीये.
मी भाजण्यासाठी ह्या भांड्याचा वापर केला. त्यामुळे जास्तीचे तेल/लोणी खाली तव्यावर साठते.

हरियाली चिकन बिर्याणी


मला काहीतरी चटपट खावसं वाटत होता म्हणून मी पाणी पुरी बनवलेली. तेंव्हापासून असलेला खूप सारा पुदिना राहिला होता. फ्रीजमध्ये चिकन पण होत आणि अजॉयला बिर्याणी खायची होती. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हि बिर्याणी तयार झाली. :)

हरियाली चिकन बिर्याणी
साहित्य
६ चिकनचे लेग
२ वाटी बासमती तांदूळ
१/२ पुदिना गड्डी
१/२ कोथिंबीर गड्डी
२ हिरव्या मिरच्या
२ दालचिनी
१/४ चमचा मिरे पूड
४ लवंग
४ वेलची
१/४ वाटी तूप
३ कांदा
१ टोमाटो
१/२ चमचा लसूण पेस्ट
४ चमचा दही
१ चमचा तिखट
चिमुटभर हळद
मीठ

कृती
  • चिकनला तिखट, हळद. लसूण पेस्ट आणि दही लावणे व २ तास बाजूला ठेवणे.
  • ६ वाटी पाणी गरम करणे त्यात तांदूळ अर्धा तास भिजवणे.
  • मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर, टोमाटो आणि हिरव्या मिरच्या बारीक वाटणे.
  • २ चमचा तूप बाजूला ठेवून उरलेले तूप कढईत गरम करणे.
  • १ कांदा बारीक उभा चिरणे व गुलाबी रंगावर कुरकुरीत तळणे व बाजूला ठेवणे.
  • उरलेल्या तुपात दालचिनी, मिरे पूड आणि उरलेला कांदा बारीक चिरून गुलाबी होईपर्यंत भाजणे.
  • कांद्याचे मिश्रण हिरव्या वाटणात घालुन सगळे बारीक वाटणे.
  • त्याच कढईत वाटलेले मिश्रण, १.५ वाटी पाणी आणि चिकन घालुन एकत्र करणे. मीठ घालुन मिश्रण सुकेपर्यंत शिजवणे.
  • चिकन शिजत असताना तांदुळातील पाणी ओतून त्यात अजून २ वाटी पाणी आणि मीठ घालुन भात शिजवणे. भात शिजत आला की त्यातील उरलेले पाणी ओतून थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • अर्धा चमचा तूप गरम करून त्यात लवंग, वेलची घालुन हलक्या आचेवर तळून घेणे. हे तुपाचे मिश्रण भातात ओतून एकत्र करणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून त्यावर भाताचा थर लावणे. त्यावर चिकनचे मिश्रण व नंतर उरलेला भाताचा थर देणे. वरून तळलेले निम्मा कांदा घालुन कुकर बंद करणे.
  • कुकर १५ मिनिट मंद आचेवर गरम करणे व वाढत्ना वरून कुरकुरीत कांदा घालुन खायला देणे.

टीप
माझ्याकडे चिकनचे लेग होते म्हणून मी ते वापरले पण त्याऎवजी दुसरे तुकडेपण वापरता येतील.
इथल्या स्टोव्हला ८ स्वीच आहेत, मी त्यातील २ वर बिर्याणीचा कुकर ठेवला. नेहमीच्या स्टोव्हवर कुकर तसाच न ठेवता तवा ठेवून त्यावर ठेवावा म्हणजे बिर्याणी करपणार नाही. तसेच कुकरमध्ये सगळ्यात खाली उकडलेल्या बटाट्याच्या चकत्या लावल्यानीपण मदत मिळते.

बटर चिकन


हॉटेलमधील एक अतिशय आवडती डीश. साधारण महिन्यापूर्वी केलेला पण फोटो काढून पोस्ट करण्याची ताकद उरली नव्हती त्यामुळे आज पुन्हा हि डीश केल्यावर इथे देत आहे

बटर चिकन
साहित्य
३०० ग्राम बोनलेस चिकन
२ टोमाटो
१ कांदा
१.५ चमचा तिखट
२ चमचा धने पूड
१ चमचा कसुरी मेथी
१ चमचा जीरा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
चिमुटभर लाल रंग
१/२ चमचा साखर
१/४ चमचा टोमाटो सॉस
१ वाटी क्रीम
४ चमचा लोणी
मीठ
तेल

कृती
  • चिकनचे तुकडे करणे व त्यांना मीठ, तिखट, धने पूड, १/४ चमचा लसूण पेस्ट आणि १/४ चमचा आले पेस्ट लावणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात चिकनचे तुकडे ४-५ मिनिट परतणे.
  • त्याच तेलात जीऱ्याची फोडणी करणे व त्यात बारीक चिरलेला कांदा, कसुरी मेथी, उरलेली लसूण पेस्ट, आले पेस्ट, तिखट, धने पूड घालणे.
  • त्यात तेल घालुन उकळवणे.
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन ते पूर्ण शिजेपर्यंत उकळवणे व नंतर बारीक वाटणे.
  • कढईत लोणी वितळवणे व त्यात वाटण व मीठ घालणे.
  • त्यात १/२ वाटी पाणी, लाल रंग घालुन उकळवणे.
  • त्यात साखर, सॉस आणि परतलेले चिकनचे तुकडे घालुन उकळवणे.
  • आच मंद करून त्यात क्रीम घालुन अजून ४-५ मिनिट शिजवणे.

टीप
क्रीम घालताना आच धीमी करायला विसरू नये नाही तर मिश्रण व्यवस्थित एकत्र होणार नाही

चिकन लॉलीपॉप


मी हे खूप दिवसांआधी बनवलेले पण कामामध्ये विसरून गेले पोस्ट करायला. एकदम सोप्पी आणि चविष्ठ चिकनची डीश

चिकन लॉलीपॉप
साहित्य
८ चिकनचे लॉलीपॉप
१/२ वाटी मैदा
१/४ वाटी कॉर्न फ्लौर
१/२ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ वाटी कोथिंबीर
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/४ चमचा गरम मसाला
१ अंडे
चिमुटभर खाण्याचा लाल रंग
मीठ
तेल

कृती
  • लॉलीपॉपला मीठ, लसूण पेस्ट, आले पेस्ट लावून ५ मिनिट बाजूला ठेवणे.
  • त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, हळद, गरम मसाला, लाल रंग, मैदा आणि कॉर्न फ्लौर घालुन चांगले एकत्र करणे
  • त्यात अंडे घालुन एकत्र करणे व १ तास मुरण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर लॉलीपॉप तळणे

टीप
ह्यात कडीपत्तापण घालुन वेगळी चव आणता येईल
हाडाची बाजू अल्युमिनियमच्या फॉइल लावून देता येईल पण माझ्याकडची फॉइल संपल्यामुळे मी वापरली नाही

मसालेदार बिर्यानी


मागच्यावेळी केलेली बियाणी आमच्या कडे काम करणाऱ्या बाईंच्या सांगण्याप्रमाणे केलेली. पण आज मी एका पुस्तकात वाचून हि केलेली बिर्यानी अजूनही सुंदर आणि चविष्ठ आहे.

मसालेदार बिर्यानी
साहित्य
४ चिकनचे लेग
२ वाटी तांदूळ
१ वाटी दही
४ कांदे
२ टोमाटो
१/४ वाटी दुध
१ बटाटा
मुठभर काजू
५-६ बदाम
२ चमचे तेल
१ चमचा पुदिना पाने
१ चमचा सुके खोबरे
२ वेलची
२ लवंग
३ दालचिनी
१ चमचा जीरा
१ चमचा धने
१ चमचा तिखट
१/४ चमचा मिरे पूड
१/२ चमचा खसखस
१/४ चमचा बडीशेप
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा आले
१ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
चिमुटभर केशर
मीठ

कृती
  • एका भांड्यात दही, हळद, गरम मसाला, १/२ चमचा लसूण पेस्ट, १/४ चमचा आले पेस्ट आणि मीठ एकत्र करणे.
  • चिकनचे तुकडे त्यात घालुन चांगले एकत्र करणे. फ्रीजमध्ये कमीत कमी ८ तास ठेवून देणे.
  • तांदूळ कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घेणे.
  • ३-४ चमचे पाण्यात खसखस भिजवणे.
  • कोमट दुधात केशर घालुन बाजूला ठेवणे.
  • बटाटे उकडून थंड करून त्याच्या साली काढून चकत्या करणे व बाजूला ठेवणे.
  • २ कांदे पातळ उभे चिरून तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळणे.
  • त्याच तेलात ५-६ काजू बाजूला ठेवून बाकीचे तळून घेणे.
  • उरलेले कांदे बारीक कापून तेलात गुलाबी रंगावर भाजणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात २ दालचिनी, धने, जिरे, सुके खोबरे, बडीशेप, काजू आणि बदाम घालुन तळणे.
  • त्यात तिखट, मिरे पूड, खसखस, पुदिना पाने आणि आधी भाजलेला बारीक कांदा घालणे व भाजणे. मिश्रण थंड करणे.
  • मिश्रण मिक्सरमध्ये अर्धा टोमाटो सहित वाटणे.
  • २ चमचा तूप बाजूला ठेवून उरलेले गरम करणे व त्यात हा वाटलेला मसाला खमंग भाजून घेणे.
  • त्यात उरलेली आले पेस्ट, लसूण पेस्ट, बारीक चिरलेले टोमाटो आणि मीठ घालुन भाजणे.
  • त्यात चिकन त्याच्या मासाल्यासाहित घालुन पूर्ण सुकेपर्यंत भाजणे.
  • ग्रेव्हीतून बरेच तूप बाजूला सुटेल ते गाळून वेगळे करणे.
  • चिकन शिजत असताना ७ वाटी पाणी उकळून त्यात तांदूळ घालुन त्यावर झाकणी ठेवून अर्धवट शिजवून घेणे. उरलेले पाणी गाळून टाकणे व थंड पाण्याखाली भात धुवून घेणे व बाजूला ठेवणे.
  • १/२ चमचा तूप गरम करून त्यात उरलेले दालचिनी, लवंग, वेलची घालुन तळणे व भातावर सोडणे. त्यात मीठ घालुन चांगले एकत्र करणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून बटाट्याच्या चाकात्यांचा थर लावणे.
  • भाताचा १/३ भाग बटाट्यावर पसरवणे. त्यावर तळलेले १/३ काजूचा वाटा, तळलेल्या कांद्याचा १/३ वाटा आणि अर्धे चिकन पसरणे.
  • पुन्हा १/३ भाताचा वाटा, १/३ भाग काजू, १/३ भाग कांदा आणि उरलेले चिकन पसरवणे
  • वरून उरलेला भात पसरवणे व त्यावर उरलेले काजू आणि कांदा पसरवणे.
  • परतणीच्या मागच्या बाजूनी पूर्ण थरातून जाईल अशी ५-६ भोके पाडणे.
  • चिकनमधून वेगळे केलेले तूप, केशर दुध वरून ओतणे.
  • मंद आचेवर तवा ठेवून त्यावर हा कुकर बंद करून ठेवणे व १५ मिनिट शिजवणे व नंतर गरम गरम रायत्यासोबत खायला देणे.

टीप
थोडी मोठी कृती आहे पण इतकी चविष्ठ बिर्यानी बनते की कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल
बटाटे कुकर मध्ये खाली लावल्यानी भात खालून करपणार नाही.
सगळे पदार्थ आधीच शिजवून मग त्याचे थर लावल्यानी चिकन किंवा भात अर्धवट कच्चे राहण्याची चूक होऊ शकत नाही.

खिमा मटार


हि अजॉयची आवडती डीश. आम्ही जिथे जातो तिथे त्याला खिमा मटार खायचा असतो. काल सुद्धा त्याला पापलेट आणायला सांगितलेले ते नाही मिळाले तर त्यानी खिमा आणला. आज इथे त्याची कृती देत आहे

खिमा मटार
साहित्य
१/४ किलो खिमा
१.५ वाटी मटार
३ टोमाटो
३ कांदे
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
२ चमचा तिखट
२ चमचा गरम मसाला
१/२ चमचा हळद
१/२ चमचा जिरे पूड
१/४ चमचा धने पूड
२-३ कोथिंबीर पाने
मीठ
तेल

कृती
  • एक वाटी पाणी घालुन खिमा कुकरमध्ये शिजवून घेणे.
  • कढईत २-३ चमचे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालुन परतणे.
  • त्यात लसूण आणि आले पेस्ट घालुन अजून थोडा वेळ शिजवणे.
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन पुराना शिजेपर्यंत परतणे.
  • त्यात हळद, तिखट, गरम मसाला, धने पूड आणि जीरा पूड घालुन ढवळणे व एक दोन मिनिट शिजवणे.
  • मिश्रण थंड करून मिक्सर मध्ये थोडेसे पाणी घालुन बारीक वाटणे.
  • चमचाभर तेल कढईत गरम करून त्यात वाटण घालुन चांगले परतणे
  • त्यात शिजवलेला खिमा, मटार, मीठ आणि वाटीभर पाणी घालुन सारखे ढवळत मिश्रण जाड होईपर्यंत शिजवणे.
  • त्यावर कोथिंबीर घालुन खायला देणे.

टीप
आजकाल मिळणाऱ्या फ्रोझन खिम्या पेक्षा ताजा जास्त चांगला लागतो.
मी मटणाचा खिमा वापरला पण चिकनचा खिमा सुद्धा वापरायला हरकत नाही

चिकन बिर्याणी आणि शेंगदाणा ग्रेव्ही


मी ह्या आधी कधी चिकन बिर्याणी बनवली नव्हती त्यामुळे खूप शोधाशोध केली आणि आमच्या कडे येणाऱ्या काम वाल्या बाईना पण विचारले आणि हि बिर्याणी बनवली.

चिकन बिर्याणी

चिकन बिर्याणी
साहित्य
१/२ किलो चिकन
४ वाटी तांदूळ
१ वाटी दुध
१ वाटी दही
२ कांदे
१/२ वाटी टोमाटो प्युरी
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा आले पेस्ट
३ चमचे हळद
३ चमचे तिखट
२ चमचे धने पूड
१ चमचा जिरे पूड
१ चमचा वेलची पूड
चिमुटभर केशर
मीठ
तेल

कृती
  • कढईत तेल गरम करणे व त्यात कांदा परतणे.
  • त्यात टोमाटो प्युरी घालुन शिजवणे.
  • त्यात लसूण पेस्ट, आले पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा हळद, १ चमचा तिखट, १ चमचा धने पूड, १/२ चमचा जिरे पूड घालून परतणे.
  • त्यात दही आणि मीठ घालुन थोडावेळ शिजवणे.
  • त्यात चिकनचे तुकडे घालुन ग्रेव्ही सुकेपर्यंत शिजवणे व बाजूला ठेवणे.
  • ४ वाटी तांदूळ, दुध आणि केशर एकत्र करून शिजवणे.
  • तूप गरम करून त्यात वेलची पूड, हळद, तिखट, गरम मसाला, धने पूड आणि जिरे पूड घालणे
  • त्यात शिजवलेला भात आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • कुकरमध्ये भाताचा एक थर देणे त्यावर शिजवलेले चिकन आणि त्यावर उरलेला भात असे थर लावून कुकर बंद करून एक दोन मिनिट वाफ काढणे.

टीप
मला मसाले शिजवून त्यावर तांदूळ परतून मग भात बनवायला सांगितलेले पण मला शिजवलेल्या भाताला परतणे जास्त चांगले वाटते, मसाल्यांचा वास भातात शिल्लक राहतो.

शेंगदाणा ग्रेव्ही

शेंगदाणा ग्रेव्ही
साहित्य
१/२ वाटी शेंगदाणा कुट
२ टोमाटो
१ चमचा गरम मसाला
१ चमचा हळद
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा जिरे पूड
मीठ
तेल

कृती

  • तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे.
  • टोमाटो शिजले की त्यात तिखट, जीरा पूड, धने पूड आणि गरम मसाला घालुन परतणे.
  • त्यात शेंगदाणा कुट आणि मीठ घालुन पुन्हा परतणे.
  • मिश्रण एकदम सुका गोळा होईल त्याला तसेच १-२ मिनिट परतणे व नंतर पाणी घालुन जाड घेव्ही उकळवणे.

टीप
हि ग्रेव्ही जास्त तिखट नाही केलीये पण रायता भरपूर असेल तर थोडी जास्त मसालेदार आणि तिखट करायला हरकत नाही

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP