Showing posts with label चाट. Show all posts
Showing posts with label चाट. Show all posts

शेव बटाटा दही पुरीसाठी(SPDP) पुरी


इथे आल्यापासून शेव बटाटा दही पुरीसाठी(SPDP) पुरी कधी मिळाल्याच नाही. पाणी पुरीच्या पुऱ्या वापरणे योग्य नाही वाटले. अजॉयचा आवडता पदार्थ असल्यानी मी पुऱ्या घरी बनवण्याचे ठरवले. थोड्या प्रयोगानंतर ही कृती एकदम चांगल्या पुऱ्या बनवते. आता मित्रमैत्रिणीनी पण त्यावर संमती दिलीये :)

शेव बटाटा दही पुरीसाठी(SPDP) पुरी
साहित्य
१ वाटी मैदा
२ चमचे रवा
१/४ वाटी लोणी
तेल
मीठ

कृती
  • मैदा, रवा आणि मीठ एकत्र करणे.
  • त्यात वितळवलेले लोणी घालणे.
  • १/४ वाटी पाणी घालुन मऊसर पीठ मळणे.
  • १/४ चमचा तेल घालुन पुन्हा मळणे व भिजवण्यासाठी तासभर ठेवून देणे.
  • पीठाचे गोळे बनवून पातळ लाटणे. वाटी वापरून किंवा कुकीकटर वापरून छोट्या पुऱ्या कापणे.
  • तेल गरम करून मध्यम आचेवर पुऱ्या गुलाबी रंगावर भाजून घेणे. तेल शोषून घेण्यासाठी पुऱ्या टिशूवर काढणे
  • ओव्हन ३५०F/१७५C वर गरम करणे व पुऱ्या १० मिनिट भाजून घेणे.

टीप
पुऱ्या जर पातळ लाटल्या तर जास्त फुगत नाही आणि जश्या पाहिजे तश्या कुरकुरीत बनतात.
मी पुऱ्या ओव्हन मध्ये भाजून घेतल्या त्यामुळे जो काही मऊसर पणा उरलेला तो निघून गेला.

भेळ


भेळ हा माझा आवडीचा चटपट पदार्थ. खासकरून पिकनिकसाठी. लवकर बनणारा सोपा आणि चविष्ठ पदार्थ.

भेळ
साहित्य
६ वाटी चुरमुरे
२ वाटी फरसाण
१ वाटी शेव
१ वाटी बुंदी
१ वाटी नवरत्न मिश्रण
१.५ वाटी चिंच
२ वाटी गुळ
२ हिरवी मिरची
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
४-५ खजूर
२ कांदे
२ टोमाटो
१/२ वाटी कोथिंबीर
मीठ

कृती
  • चिंच आणि खजूर पाण्यात एक तास भिजवणे.
  • भिजलेले चिंच खजूर, गुळ, तिखट, हिरवी मिरची, जिरे पूड आणि मीठ घालुन मिक्सरमध्ये वाटणे.
  • मिश्रण गाळून घेणे.
  • एका भांड्यात चुरमुर, फरसाण, शेव, नवरत्न मिश्रण, चिरलेला कांदा, टोमाटो आणि कोथिंबीर एकत्र करणे.
  • त्यात चिंचेचे मिश्रण घालुन चांगले ढवळणे.
  • वरून बुंदी आणि शेव घालुन खायला देणे.

टीप
कैरीच्या दिवसात बारीक चिरून कैरीपण घालता येईल
मी नेहमी चिंचेचे थोडे पाणी वेगळे ठेवते त्यामुळे प्रत्येकाच्या चवीनुसार ते वरून थोडे घेऊ शकतात
सगळे चिरून ठेवल्यास फक्त एकत्र करण्याचे काम राहते, पार्टी आणि पिकनिकसाठी एकदम उत्तम

मटार पॅटिस


सकाळच्या नाष्ट्यासाठी झटपट आणि चटपट पदार्थ बनवण्यासाठी मी हे पॅटिस बनवले.

मटार पॅटिस
साहित्य
१ वाटी मटार
४ बटाटे
२ चमचा कॉर्न फ्लौर
१/४ चमचा लसूण पेस्ट
चिमुटभर आले पेस्ट
चिमुटभर हळद
१/४ चमचा तिखट
१/२ लिंबू
मीठ
तेल

कृती
  • बटाटे उकडून थंड झाल्यावर किसून घेणे.
  • त्यात कॉर्न फ्लौर घालुन मळणे. त्याला थोडे तेल लावणे व बाजूला ठेवणे.
  • मटार उकळवून त्यातले पाणी काढून टाकणे.
  • त्यात हळद, आले पेस्ट, लसूण पेस्ट, तिखट, लिंबाचा रस आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • लिंबाच्या आकाराचा बटाट्याचा गोळा करून त्याची वाटी करणे व त्यात चमचाभर मटारचे मिश्रण घालुन बंद करणे. अलगद दाबून पसरट पॅटिस बनवणे
  • तेलात मध्यम आचेवर तव्यावर भाजणे.

टीप
मटार पॅटिस तळताना तेल एकदम गरम असले पाहिजे नाहीतर बटाट्याचे मिश्रण तव्याला चिकटते
तव्याच्या ऎवजी कढईत पण टाळता येईल

कॉर्न चाट


हा पदार्थ मी थोड्या वेगवेगळ्या कृती एका पुस्तकात वाचून बनवला

कॉर्न चाट
साहित्य
१/४ वाटी मैदा
१/४ वाटी रवा
१/२ चमचा दही
चिमुटभर बेकिंग पूड
२ वाटी कॉर्न
२ टोमाटो
२ कांदे
१ लिंबू
१ चमचा आले लसूण पेस्ट
चिमुटभर गरम मसाला
कोथिंबीर
शेव
मीठ
तेल

कृती
  • रवा, मैदा, बेकिंग पूड आणि मीठ एकत्र करणे.
  • दही आणि चमचाभर तेल कोमट करणे.
  • ते मिश्रण रव्यात घालुन त्याचे पीठ भिजवणे.
  • बारीक व पातळ पुऱ्या लाटून तेलात तळणे.
  • तेल गरम करून त्यात १/२ टोमाटो किसून, १/२ कांदा किसून घालणे व शिजवणे.
  • त्यात आले लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट आणि मीठ घालुन ढवळणे.
  • त्यात कॉर्न घालुन शिजवणे.
  • कांदा आणि टोमाटो बारीक चिरणे.
  • मध्यम आकाराच्या ताटलीत पुऱ्या पसरवणे, त्यावर कॉर्नचे मिश्रण, बारीक चिरलेला कांदा, टोमाटो पसरवणे.
  • लिंबू पिळणे व त्यावर कोथिंबीर व शेव पसरवून वाढणे.

टीप
ह्यात १/२ चमचा कच्ची कैरी किसून घालता येईल आणि जर घालत असल्यास लिंबाचा रस थोडा कमी वापरणे.
थोडा चाट मसाला पण घालता येईल
रवा-मैद्याचे पीठ भिजवल्यावर मिश्रण मिक्सरमध्ये फिरवता येईल त्यामुळे व गरम दह्यामुळे पुऱ्या एकदम कुरकुरीत बनतील

वाटली डाळ


उन्हाळा चालू झाला की कैरी जेवणात वापरणे चालू होते. असाच हा एक पदार्थ हळदी कुंकूमध्ये एकदम प्रसिद्ध

वाटली डाळ
साहित्य
१ कैरी
१ वाटी हरबरा डाळ
२ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा साखर
१/४ चमचा हळद
१/४ चमचा म्हवरी
मीठ
तेल

कृती
  • हरबरा डाळ ५-६ तास पाण्यात भिजवणे.
  • डाळ पाण्यातून उपसून त्यात मिरची घालुन बारीक वाटणे.
  • त्यात किसलेली कीर घालुन एकत्र करणे.
  • मीठ आणि साखर घालुन एकत्र करणे.
  • तेल गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे.
  • त्यात हळद घालुन फोडणी डाळीत घालुन एकत्र करणे.

टीप
फोडणीत सुकलेली लाल मिरची पण घालता येईल

दही वडा


जवळ जवळ ५ वर्षांपूर्वी मी एकदम पहिल्यांदाच घरापासून दूर बँगलोरमध्ये राहत होते. मी अमिता, विनया आणि अनुमेहा ह्यांच्या बरोबर राहत होते आणि साधारण २ महिन्यानंतर आम्ही ठरवले चला आज दही वडा बनवूया. आम्हाला काहीच स्वयंपाकाचा अनुभव नव्हता ना आमच्याकडे पुरेशी भांडी होती. आम्ही एम टी आरच्या वडा मिश्रणाचा वापर करून भांड्यातच वडे तळले. हे चालले असताना मी त्यांना खूप वेळा सांगितले की मला दही वडे चांगले कसे बनवायचे माहितीयेत :) अगदी लहान असतानापासून माझा एकदम आवडता पदार्थ असल्यानी आई कशी आणि काय काय करायची मी एकदम मन लावून बघायचे. इथे मी त्या शिकलेल्या सगळ्या माहितीसकट कृती देत आहे अर्थातच आता एम टी आरचे पाकीट वापरण्याचे दिवस गेले :)

दही वडा
साहित्य
१ वाटी उडीद डाळ
१ हिरवी मिरची
१/४ चमचा आले पेस्ट
१/२ लिटर दही
२-३ चमचा साखर
मीठ
तेल

कृती
  • उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजवणे.
  • सकाळी पाण्यातून उपसून त्यात हिरवी मिरची, लसूण पेस्ट घालुन बारीक वाटणे.
  • मिश्रण भांड्यात काढून त्यात मीठ घालुन चांगले घोटणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात छोटे छोटे वडे गुलाबी रंगावर तळणे.
  • वडे तळत असताना पाणी आणि मीठ एकत्र करून बाजूला ठेवणे/
  • एका खोलगट ताटात २-३ चमचे दही आणि वाटीभर पाणी एकत्र करून बाजूला ठेवणे.
  • वडा गुलाबी झाला की लगेच मिठाच्या पाण्यात घालणे व अजून वडे तळायला चालू करणे.
  • ते वडे तयार होत आले की मिठाच्या पाण्यातले वडे हातावर दाबून त्यातले पाणी काढून दह्याच्या ताटात ठेवणे.
  • असे करत सगळे वडे तळणे. मधून मधून ताटातले वडे उलटे करणे म्हणजे ते सर्व बाजूनी भिजतील.
  • दह्यात साखर, मीठ घालुन ढवळणे.
  • वडे खायला देताना वाटीत वडा घालुन त्यावर दही सोडणे.

टीप
वडा तळायला तेलात घातल्यावर तो तरंगायला पाहिजे, नाहीतर पीठ अजून घोटायला पाहिजे
वडा मिठाच्या पाण्यात घातल्यावर तिथे सुद्धा तो तरंगायला पाहिजे नाहीतर तो अर्धवट कच्छ असेल
वड्यावर आवडत असल्यास थोडे तिखट आणि चिंचेची चटणी पण घालता येईल

पाणी पुरी आणि सुकी पुरी


बंगलोरमध्ये राहत असताना सी एम एच रोडवर एम के अहेमदच्या जवळ एक पाणी पुरीवाला बसायचा त्याची पुरी सगळ्यात भारी होती. नेहमी मला त्याच्या सारखी पाणी पुरी बनवायची इच्छा होती. मागच्या आठवड्यात मी करून बघितली आणि एकदम तशीच झालेली. तो शेवटी एक सुकी पुरी पण खायला द्यायचा त्याची पण कृती इथे देत आहे

पाणी पुरी

पाणी पुरी
साहित्य
२५ पुऱ्या
३ बटाटे
२.५ चमचा चाट मसाला
२.५ चमचा आमचूर पूड
१/२ चमचा + चिमुटभर जिरे पूड
१/२ चमचा + चिमुटभर धने पूड
चिमुटभर हिंग
१ चमचा कोथिंबीर
२ चमचा पुदिना
२ हिरव्या मिरच्या
१ लिंबू
६ वाटी पाणी
मीठ

कृती
  • बटाटे उकडून घेणे.
  • कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, २ चमचे चाट मसाला, २ चमचे आमचूर पूड, १/२ चमचा जिरे पूड, १/२ चमचा धने पूड आणि हिंग पाण्याबरोबर वाटून घेणे.
  • मिश्रण गाळून त्यात लिंबाचा रस आणि मीठ घालणे.
  • बटाटे कुस्करून घेणे व त्यात उरलेली जिरे पूड, धने पूड, चाट मसाला आणि आमचूर पूड घालुन मळणे.
  • ३-४ पुऱ्या कुस्करून आणि ४ चमचे पुदिना पाणी मिश्रणात घालणे व एकत्र मळणे.
  • थोडे थोडे मिश्रण पुरीत घालुन त्यात बनवलेले पाणी घालुन खायला देणे.

टीप
ह्यात थोडीशी चिंचेची चटणी घालुन थोडी गोडसर चव पण आणता येईल

सुकी पुरी

Suka Puri
साहित्य
६ पुरी
२ टोमाटो
१/२ चमचा तिखट
१/२ लिंबू
चिमुटभर जिरे पूड
चिमुटभर धने पूड
चिमुटभर आमचूर पूड
मीठ

कृती

  • बटाटे उकडून कुस्करून घेणे
  • त्यात तिखट, जिरे पूड, धने पूड, आमचूर पूड आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • पुरीमध्ये हे मिश्रण घालुन त्यावर २ थेंब लिंबाचा रस पिळणे व खायला देणे

टीप
फक्त सुकी पुरी खायची असेल तर थोडा चाट मसाला पण घालता येईल पण आम्ही नेहमी पाणी पुरी नंतर खात असल्यानी थोड्या वेगळ्या चवीसाठी मी चाट मसाला वापरत नाही

SPDP - शेव बटाटा दही पुरी


वैशाली - फर्ग्युसन रोडवरचे एक अत्यंत प्रसिद्ध हॉटेल. तिकडची हि डीश सगळ्यांची एकदम आवडीची. अजॉय तिथे नेहमी हे खात असल्यानी एकदम तशीच बनवण्याचा मी फार प्रयत्न केला. बऱ्यापैकी यशस्वीपण झाले.

SPDP - शेव बटाटा दही पुरी
साहित्य
७ पापडी सारख्या पुऱ्या
१ चमचा चिंचेची चटणी
३/४ चमचा हिरवी चटणी
१ मध्यम बटाटा
१/२ वाटी दही
४ चमचे शेव
१/२ चमचा कोथिंबीर
१/२ चमचा धने पूड
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा चाट मसाला
२ चमचे साखर
मीठ

कृती
  • बटाटे कुकरमध्ये उकडून घेणे.
  • दह्यात साखर आणि चिमुटभर मीठ घालुन ढवळणे व बाजूला ठेवणे.
  • बटाट्याची साले काढून बारीक चिरणे. त्यात मीठ, धने पूड, जिरे पूड, चाट मसाला घालणे.
  • पुऱ्या ताटलीत ठेवणे व त्यावर बटाट्याचे मिश्रण पसरवणे.
  • हिरवी चटणी घालणे. मग दही घालणे व त्यावर चिंचेची चटणी घालणे.
  • शेव व कोथिंबीर पसरवून खायला देणे.

टीप
पार्टीसाठी एकदम उत्तम पदार्थ. सगळी तयारी करून ठेवून आयत्यावेळी सगळे एकत्र केले की झाले काम.

पोहे चाट


आई इथे आली होती तेंव्हा तिनी तिच्याबरोबर १-२ पाककृतीची पुस्तके आणलेली त्यातच हा पदार्थ बघितलेला. आज मी हा करून बघितला.

पोहे चाट
साहित्य
२ वाटी पातळ पोहे
२ बटाटा
१/२ चमचा आलं पेस्ट
४-५ मिरच्या
१/२ वाटी दही
१-२ चमचा साखर
मीठ
म्हवरी
चिमुटभर हळद
१ चमचा चिंचेची चटणी
तेल

कृती
  • बटाटे उकडून घेऊन थंड करणे.
  • पोह्यावर थोडेसे पाणी शिंपडून त्यांना मऊ करावं
  • त्यात किसलेला बटाटा, आलं पेस्ट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ एकत्र करणे व पीठ भिजवणे. ह्याचे गोळे करून अलग दाबून टिक्या बनवणे
  • टिक्या तव्यावर भाजून घेणे.
  • दही व साखर एकत्र करणे.
  • तेल गरम करून त्यात म्हवारीची फोडणी करणे. त्यात हळद घालुन ते तेल दह्यात घालुन हलवणे.
  • वाढताना पोह्याच्या टिक्कीवर दही आणि चिंचेची चटणी घालुन देणे.

टीप
पोह्याची टिक्कीवर ब्रेडक्रम लावून पण टाळता येईल.
बारीक शेव वारणा घालण्याचा माझा विचार होता पण माझ्याकडे शेव नसल्यानी घातले नाही पण नंतर एकदा मी करून बघणारे

कॉर्न आणि कैरी चाट


ही पाककृती मी स्वतः बनवली आहे. :) कैरीला तिखट मीठ लावून हा माझा आवडता पदार्थ. तसाच कॉर्नवरती तिखट, मीठ आणि लिंबू हा पण. त्यामुळे ह्या दोन्ही पदार्थांची प्रेरणा घेऊन मी ही पाककृती बनवली. चविष्ठ.

कॉर्न आणि कैरी चाट
साहित्य
३-४ वाटी ताजे किंव्हा फ्रोझन कॉर्न
१ कैरी
१ चमचा लोणी
तिखट चवीनुसार
मीठ
२ चमचे कोथिंबीरीची पानं (इच्छेनुसार)

कृती
  • कॉर्न कुकरमध्ये उकडून घ्यावेत
  • कैरी किसावी
  • कढईत लोणी विरघळावे
  • त्यात उकडलेले कॉर्न, कैरी, तिखट, मीठ घालुन हलक्या हातानी ढवळणे
  • थोडे कोमट होईपर्यंत आचेवर ठेवावे.
  • कोथिंबीरीची पानं घालुन सजवणे

टीप
हा पदार्थ थोडा मसालेदारच छान लागतो त्यामुळे कंजूसी न करता तिखट घालणे. :)

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP