Showing posts with label पंजाबी. Show all posts
Showing posts with label पंजाबी. Show all posts

तंदुरी गोबी


आज ऑफिसमध्ये मिटिंगच्या आधी सगळेजण बर्बिक्यूविषयी चर्चा करत होते. तेंव्हापासून मला तंदुरी खाण्याची फार इच्छा होत होती. फ्रीजमध्ये गोबी असल्यानी मी तंदुरी गोबी बनवण्याचे ठरवले. रात्रीचे जेवण त्यामुळे एकदम चविष्ठ होते.

तंदुरी गोबी
साहित्य
१ कॉलीफ़्लॉवर
१ वाटी दही
१.५ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/४ चमचा हळद
१/४ चमचा जिरे पूड
१/२ चमचा गरम मसाला
१/४ चमचा तंदुरी मसाला
१ चमचा चाट मसाला
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे आल्याचे तुकडे
१० लासुणाच्या पाकळ्या
तेल
मीठ चवीपुरते

कृती
  • कॉलीफ़्लॉवरचे मध्यम आकाराचे तुकडे करून मिठाच्या पाण्यात घालावे. ७ मिनिट मायक्रोवेव्ह करणे. पाणी गाळून बाजूला ठेवणे.
  • मिक्सरमध्ये आले, लसूण, हिरव्या मिरच्या आणि २ चमचे दही घालुन बारीक वाटणे.
  • एका बावुलमध्ये वाटलेली पेस्ट, उरलेले दही, तिखट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला, हळद, तंदुरी मसाला आणि मीठ घालुन ढवळणे.
  • त्या मिश्रणात कॉलीफ़्लॉवरचे तुकडे खालून मिसळणे. फ्रीजमध्ये कमीत कमी २ तास ठेवणे.
  • तवा गरम करून त्यात थोडे तेल घालणे. कॉलीफ़्लॉवरचे तुकडे त्यावर पसरवून मध्यम आचेवर पूर्ण पणे होईपर्यंत शिजवणे. कॉलीफ़्लॉवरच्या तुकड्यांना परतवून दुसरी बाजू पूर्ण होईपर्यंत शिजवणे. असे सगळ्या बाजूला भाजून झाल्यावर ताटलीत काढणे.
  • चाट मसाला शिंपडून पुदिना चटणी, कांदा आणि लिंबूबरोबर खायला देणे.

टीप
मी ५ मिनिटच कॉलीफ़्लॉवरचे तुकडे शिजवलेपण माझ्यामते ७ मिनिट बरोबर होईल.
स्क्युवरमध्ये ३-४ तुकडे घालुन कॉलीफ़्लॉवरला बार्बिक्यू पण करू शकता

तंदुरी कोळंबी


मधले २ - ३ दिवस सोडले तर सिअ‍ॅटलमध्ये उन येऊन बरेच दिवस झाले. त्यामुळे बारबीक्यूवगैरे तर भूतकाळातल्या गोष्टी झाल्या. मात्र आज मी तंदुरी कोळंबी बनवून सुंदर संध्याकाळचे वातावरण करण्याचा प्रयत्न केला. ही पाककृती मी मसाले घालता घालता तयार केली पण कोळंबी इतकी सुंदर झालेली की उद्या उरलेले कोळंबी भाजण्याची मी वाटच बघतीये :)

तंदुरी कोळंबी
साहित्य
३/४ किलो कोळंबी
१ चमचा तंदुरी मसाला
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा जिरे पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
१/२ चमचा आलं पेस्ट
१/२ वाटी दही
मीठ
तेल

कृती
  • कोळंबी साफ करून त्याला मीठ लावणे
  • त्यात आलं पेस्ट, तिखट, धने पूड, जिरे पूड, गरम मसाला, हळद घालुन चांगले एकत्र करणे. कमीत कमी अर्धा तास बाजूला ठेवणे.
  • तवा गरम करून त्यात तेल घालणे.
  • कोळंबीमध्ये तंदुरी मसाला आणि दही घालुन एकत्र करणे. ते मिश्रण तव्यावर घालणे.
  • खालाच्याबाजुनी पूर्णपणे शिजेपर्यंत कोळंबी न हलवता व परतता भाजणे. त्यानंतर त्यांना परतून दुसऱ्याबाजूनी पण भाजणे. गरम गरम खायला देणे.

टीप
मध्यम आचेवर, न हलवता भाजल्यानी कोळंबीला तंदुरीची चव आणि रंग येतो.

तंदुरी चिकन


सगळ्यात आवडता स्टारटर. हैद्राबादमध्ये असताना मी एव्हरेस्टचा मसाला वापरून बनवायचे पण आज इथे वेगवेगळे मसाले एकत्र करून बनवले

तंदुरी चिकन
साहित्य
६ कोंबडीचे पाय
३/४ वाटी दही
२ चमचा तिखट
१ चमचा गरम मसाला
२ चमचा आले पेस्ट
२ चमचा लसूण पेस्ट
४ चमचे लिंबू
१/२ चमचा चाट मसाला
२ चमचा तेल
१/२ चमचा लोणी
मीठ

कृती
  • कोंबडीच्या पायांवर धार धार चाकुनी चिरा मारणे.
  • त्याला २ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा तिखट लावून ३० मिनिट बाजूला ठेवणे.
  • एका भांड्यात दही, लसूण पेस्ट, आले पेस्ट, १ चमचा तिखट, २ चमचा लिंबाचा रस, गरम मसाला, तेल आणि मीठ एकत्र करणे.
  • हे मिश्रण कोंबडीला लावून फ्रीजमध्ये ४-५ तास ठेवणे.
  • ओव्हन ३९५F/२००C वर गरम करणे.
  • लोणी वितळवून चिकनवर सोडणे व ओव्हनमध्ये १५ मिनिट भाजणे
  • तुकडे परतवणे व लोणी सोडणे. अजून १५ मिनिट भाजणे.
  • पुन्हा परतवून लोणी सोडणे व १० मिनिट भाजणे.
  • चाट मसाला पसरवून, कांदा आणि लिंबाच्या तुकड्याबरोबर खायला देणे.

टीप
लेगच्याऎवजी ७०० ग्राम कुठलेही तुकडे वापरता येतील
हॉटेलमध्ये लाल रंग येण्यासाठी रंगाचा वापर करतात माझ्याकडे तो नसल्यानी आणि वापरायची इच्छा नसल्यानी मी वापरला नाहीये.
मी भाजण्यासाठी ह्या भांड्याचा वापर केला. त्यामुळे जास्तीचे तेल/लोणी खाली तव्यावर साठते.

पालक पनीर


हा अजून एका अजॉयला पालक खाऊ घालण्याचा पालक पुरीशिवाय अजून एक प्रयत्न.

पालक पनीर
साहित्य
२ पालक
२०० ग्राम पनीर
२ टोमाटो
५ चमचा क्रीम
१/४ चमचा कॉर्न फ्लौर
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा जिरे
१/४ चमचा हळद
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा कसुरी मेथी
मीठ
तेल

कृती
  • ४-५ वाटी पाणी उकळवून त्यात पालकाची पाने दोन मिनिट बुडवणे.
  • पाणी ओतून पाने बारीक वाटणे.
  • तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.
  • त्यात लसूण पेस्ट, आले पेस्ट, हळद व बारीक चिरलेला टोमाटो घालणे.
  • थोडा वेळ परतून त्यात तिखट, धने पूड, जिरे पूड आणि कसुरी मेथी घालणे.
  • मंद आचेवर टोमाटो शिजेपर्यंत परतणे.
  • मिक्सरमध्ये पालकाच्या पेस्ट बरोबर घालुन बारीक वाटणे.
  • कढईत पनीरच्या तुकड्यांबरोबर एकत्र उकळवणे.
  • त्यात क्रीम घालणे.
  • कॉर्न फ्लौर ४ चमचा पाण्याबरोबर एकत्र करून उकळत्या भाजीत घालुन वाढणे.

टीप
क्रीम आणि कॉर्न फ्लौरनी ग्रेव्ही जरा जाड होते. फक्त क्रीम वापरल्यानी ग्रेव्हीतून पालकाची चव जाऊ शकते आणि कॉर्न फ्लौरनी एकदम पाणचट होऊ शकते त्यामुळे मी दोन्ही एकत्र वापरले

बटर चिकन


हॉटेलमधील एक अतिशय आवडती डीश. साधारण महिन्यापूर्वी केलेला पण फोटो काढून पोस्ट करण्याची ताकद उरली नव्हती त्यामुळे आज पुन्हा हि डीश केल्यावर इथे देत आहे

बटर चिकन
साहित्य
३०० ग्राम बोनलेस चिकन
२ टोमाटो
१ कांदा
१.५ चमचा तिखट
२ चमचा धने पूड
१ चमचा कसुरी मेथी
१ चमचा जीरा
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
चिमुटभर लाल रंग
१/२ चमचा साखर
१/४ चमचा टोमाटो सॉस
१ वाटी क्रीम
४ चमचा लोणी
मीठ
तेल

कृती
  • चिकनचे तुकडे करणे व त्यांना मीठ, तिखट, धने पूड, १/४ चमचा लसूण पेस्ट आणि १/४ चमचा आले पेस्ट लावणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात चिकनचे तुकडे ४-५ मिनिट परतणे.
  • त्याच तेलात जीऱ्याची फोडणी करणे व त्यात बारीक चिरलेला कांदा, कसुरी मेथी, उरलेली लसूण पेस्ट, आले पेस्ट, तिखट, धने पूड घालणे.
  • त्यात तेल घालुन उकळवणे.
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालुन ते पूर्ण शिजेपर्यंत उकळवणे व नंतर बारीक वाटणे.
  • कढईत लोणी वितळवणे व त्यात वाटण व मीठ घालणे.
  • त्यात १/२ वाटी पाणी, लाल रंग घालुन उकळवणे.
  • त्यात साखर, सॉस आणि परतलेले चिकनचे तुकडे घालुन उकळवणे.
  • आच मंद करून त्यात क्रीम घालुन अजून ४-५ मिनिट शिजवणे.

टीप
क्रीम घालताना आच धीमी करायला विसरू नये नाही तर मिश्रण व्यवस्थित एकत्र होणार नाही

मेथी मलई मटार


मला मेथी मलई मटार फार आवडते. बरेच दिवस मी माझ्या आवडीची चव आणण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी श्रीन्खलाला विचारले आणि तिच्याकडून हि पंजाबी कृती घेतली

मेथी मलई मटार
साहित्य
२ मेथी
१ वाटी क्रीम
२ वाटी मटार
१/४ चमचा जिरे
चिमुटभर हिंग
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर दालचिनी पूड
चिमुटभर लवंग पूड
१ कांदा
१/२ चमचा खसखस
१.५ चमचा साखर
५-६ चमचे दही
१५-२० काजू
१ हिरवी मिरची
१/४ चमचा आले पेस्ट
मीठ
तूप

कृती
  • ४-५ वाटी पाणी मीठ घालुन उकळवणे व त्यात मेथीची पाने ५ मिनिट भिजवून ठेवणे.
  • पाण्यातून मेथी बाहेर काढून गाळणीवर चांगली दाबून पाणी वेगळे करणे. मिठी बाजूला ठेवणे.
  • मटार उकडून बाजूला ठेवणे.
  • कांदा, खसखस, साखर, दही, काजू, हिरवी मिरची, आले पेस्ट एकत्र वाटणे.
  • क्रीम फेटून घेणे.
  • कढईत तूप गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे व हिंग घालणे.
  • त्यात वाटलेले मिश्रण घालुन मंद आचेवर तूप सुटेपर्यंत परतणे.
  • त्यात फेटलेले क्रीम, मेथी, मटार आणि मीठ घालुन एकत्र करणे व ग्रेव्ही २ मिनिट शिजवणे.

टीप
मेथीतून पाणी एकदम काढून टाकणे नाहीतर भजी हिरवट होते
खसखस आणि काजू आधी थोडावेळ भिजवलेतर वाटायला सोप्पे जाते
ग्रेव्ही एकदम पातळ वाटल्यास त्यात १/४ चमचे कॉर्न फ्लौर थोड्या पाण्यात एकत्र करून घालणे. जर ग्रेव्ही जाड वाटली तर थोडे दुध घालुन ग्रेव्ही पातळ करता येईल

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP