Showing posts with label केशर. Show all posts
Showing posts with label केशर. Show all posts

केशर मलई पेढा


मागच्या वर्षी आमच्या घराच्या भूमीपुजेला काहीतरी सोप्पे आणि पटकन होणारी मिठाई बनवताना मी हे पेढे बनवलेले. आता इतक्या दिवसांनी नवीन पोस्ट करायला ह्याच्याहून चांगल मला आणखीन काही वाटत नाही.

केशर मलई पेढा
साहित्य
१२ औंस खवा
१.५ वाटी साखर
२.५ वाटी दुधाची पावडर
१/२ वाटी दुध
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर केशर
२ चमचे पिस्ता
तूप

कृती
  • खवा किसून त्यात साखर, दुधाची पावडर आणि वेलची पूड ढवळणे.
  • दुध आणि केशर एकत्र करून त्यात २० सेकंद मायक्रोवेव्ह करणे.
  • जाड कढईत मंद आचेवर तूप आणि खवा मिश्रण घालून ढवळत शिजवणे.
  • त्यात एक-दोन मिनिटांनी केशर दुध घालणे.
  • मिश्रण ढवळत थोडे जाडसर होईपर्यंत शिजवणे व ५ मिनिट थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • पिस्ता बारीक चिरणे
  • छोटे छोटे गोळे करून तळव्यावर पिस्ता ठेवून दाबणे.


टीप
पेढा मिश्रण कोमट असताना बनवणे नाही तर शेप देणे कठीण होऊशकते
खव्याचे मिश्रण सारखे ढवळणे नाहीतर कढईला लागू शकते.
मी अनोडाईज कढई वापरली

केशर पिस्ता आईस्क्रीम


बाबांचं एकदम आवडते आईस्क्रीम. मी लहान असताना मला फार काही आवडायचा नाही. तेंव्हा मला अंजीर आईस्क्रीमसाठी फार वेडी होते आणि बहुतेक वेळा तेच खायचे. पण ह्या थोड्या वर्षात मला केशराची फार आवड निर्माण झालीये. त्यानी जो रंग येतो, त्याची चव सगळेच एकदम मस्त. आई बाबा इकडे आलेले तेंव्हा मी हे आईस्क्रीम बनवलेले. तेंव्हा फोटो काढायला नव्हता जमला पण आज पहिल्यांदा फोटो काढला.

केशर पिस्ता आईस्क्रीम
साहित्य
१ लिटर दुध
३.५ वाटी क्रीम
१ वाटी पिस्ता
२ वाटी साखर
१/४ चमचा केशर

कृती
  • अर्धा लिटर दुध साखर घालुन मिक्सर मध्ये घुसळून घेणे.
  • एका भांड्यात एक कप दुध घेवून उकळवणे. त्यात केशर घालुन चांगले पिवळे होईपर्यंत हलवणे.
  • उरलेले दुध व केशर घातलेले दुध गोड केलेल्या दुधात घालुन चांगले एकत्र करणे.
  • मिक्सरमध्ये पिस्ता पूड करून घेणे व दुधात घालणे.
  • दुधात क्रीम घालुन चांगले एकत्र करणे. मिश्रण फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी एक तास भर ठेवणे.
  • मिश्रण आईस्क्रीममेकरमध्ये घालुन सेट करणे.

टीप
दुध उकळवून त्यात केशर घालणे एकदम महत्वाचे आहे नाहीतर केशरची चव आणि रंग येणार नाही.
तसेच मिश्रण आईस्क्रीममेकरमध्ये घालण्या आधी थंड नाही केलेतर सेट होणार नाही

रस मलई


अजॉयनी दसऱ्यासाठी रस मलईची फर्माईश केलेली पण त्यादिवशी घरात जास्त दुध नसल्यानी आणि ते त्यांनी खूप उशिरा आणून दिल्यानी दसऱ्यासाठी काही मी रस मलई नाही बनवू शकले. पण काल मी ती बनवण्याचा घाट घातला. एकदम उत्तम झालेली ही रस मलईची पाककृती इथे देत आहे.

रस मलई
साहित्य
२ लिटर दुध
२ चमचे व्हिनेगर
१ चिमुटभर केशर
१/४ चमचा वेलची पूड
१/४ वाटी बदाम
१/४ वाटी पिस्ता
३ वाटी साखर

कृती
  • १ लिटर दुध उकळवायला ठेवणे
  • अर्ध्यावाटी पाण्यात व्हिनेगर घालुन ते हळूहळू उकळत्या दुधात घालुन ढवळणे.
  • पनीर वेगळे झाले की लगेच पंचावर ओतून पाणी गळून टाकावे. थंडपाण्याखाली हे पनीर ठेवून त्यातली व्हिनेगरची चव निघेपर्यंत नीट धुवून घ्यावे. पंचा घट्ट बांधून पाणी गाळण्यासाठी १-२ तास लटकवून ठेवणे.
  • दुसऱ्या पसरट भांड्यात उरलेले एक लिटर दुध उकलावायला ठेवणे. अर्धे होईपर्यंत सारखे ढवळत उकळवणे.
  • त्यात केशर आणि अर्धी वाटी साखर घालुन अजून २-३ मिनिट उकळवणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • एका मोठ्या पसरट भांड्यात किंव्हा कुकरमध्ये १.५ लिटर पाणी आणि उरलेली २.५ वाटी साखर घालुन उकळवणे.
  • परातीत पाणी गळून गेलेले पनीर घेऊन चांगले एकजीव होईपर्यंत मळणे. ह्या पनीरचे छोटे पसरट चपटे गोळे बनवून ते उकळत्या पाण्यात सोडणे. भांड्यावर झाकण लाऊन (कुकर असेल तर त्याला शिट्टी न लावता) १० मिनिट मोठ्या आचेवर शिजू देणे
  • आच बंद करून ५ मिनिट तसेच थंड होऊ देणे व नंतर झाकण काढून कोमट होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • आता एक एक गोळा तळहातावर घेऊन अलगद दाबून त्यातले साखरेचे पाणी काढून टाकणे. असे सगळे गोळे एका भांड्यात टाकणे.
  • आधी बनवलेल्या दुधात वेलची पूड आणि बारीक चिरलेले पिस्ता आणि बदाम घालणे. ते दुध तयार केलेल्या गोळ्यांच्या भांड्यात टाकून थंड करायला ठेवून देणे.

टीप
मी बदाम अर्ध्या वाटी पाण्यात २ तास भिजवून मग चिरले. चिरणे खूप सोपे होते.
१ लिटर दुध आटवण्याऎवजी अर्धा लिटर हाल्फ अ‍ॅन्ड हाल्फ वापरता येईल.
माझ्याकडे मोठा कुकर किंवा भांडे नसल्यानी मी अर्धे गोळे शिजवून घेतले. मग कुकरमध्ये अजून २ वाटी पाणी घालुन उरलेले अर्धे गोळे शिजवले. गोळे मऊ होण्यासाठी साखरेचे पाणी पातळ असणे महत्वाचे आहे. तसेच भांड्यात गोळ्यांना फुलण्यासाठी जागा असली पाहिजे

सॅन्डविच


हा माझा सगळ्यात आवडता बंगाली गोड पदार्थ. त्यामुळे मी अजॉयसाठी त्याचे आवडते मिष्टी दोही बनवायला घेतले, तेंव्हा बाजूला माझ्यासाठी हे सॅन्डविच बनवायला पण चालू केले. खूप चविष्ट झाला हा प्रयोग

सॅन्डविच
साहित्य
२ लिटर दुध
४ चमचे व्हिनेगर
१ चमचा रवा
२ वाटी खवा
१/२ वाटी आईसिंग शुगर
२.५ वाटी साखर
चांदीचा वर्ख
पिस्त्याची पूड
चिमुटभर बेकिंग पूड
२ चिमुट केशर

कृती
  • १/४ वाटी दुध बाजूला ठेवून बाकीचे दुध उकळवणे व त्यात २ चमचे पाण्यामध्ये व्हिनेगर घालुन एकत्र करणे.
  • दुधापासून पाणी वेगळे होईपर्यंत एकसारखे ढवळणे
  • हे मिश्रण चाळणीत पंचा टाकून त्यावर ओतणे. थंड पाण्याखाली धरणे. नंतर पंच्याला गाठ मारून ५ मिनिट बांधून ठेवणे.
  • कुकर मध्ये ६ वाटी पाणी आणि साखर घालुन उकळी आणणे.
  • बांधून ठेवलेले पनीर एका ताटात काढून चांगले मळून घेणे.
  • त्यात रवा आणि बेकिंग पूड घालुन पुन्हा चांगले मळणे
  • ह्या पनीरच्या पिठापासून पातळ चौकोनी तुकडे बनवणे. ह्यातील अर्धे तुकडे उकळत्या साखरेच्या पाण्यात घालणे.
  • कुकरचे झाकण बंद करून एक शिट्टी काढणे. त्यानंतर आच मंद करून १० मिनिटे अजून शिजवणे. कुकर थंड होऊ देणे
  • शिजलेले पनीर कुकरमधून काढून ठेवणे. कुकरमध्ये अजून २ वाटी पाणी घालुन उरलेले तुकडे त्यात सोडून आधीच्या तुकड्यांसारखे शिजवून थंड करून घेणे.
  • आता हे सगळे पनीरचे तुकडे उरलेल्या साखरेच्या पाण्यासकट फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी रात्रभर ठेवून देणे.
  • दुसऱ्यादिवशी सकाळी खवा किसून त्यात आईसिंग शुगर घालुन मळणे.
  • उरलेले १/४ वाटी दुध गरम करून त्यात केशर घालणे. हे केशरीदुध खव्यामध्ये घालुन चांगले मळून घेणे.
  • फ्रीजमधून शिजवलेले पनीरचे तुकडे बाहेर काढून त्याचे त्रिकोणी तुकडे करणे.
  • प्रत्येक २ तुकड्यांमध्ये थोडे थोडे खव्याचे मिश्रण घालुन सॅन्डविच बनवणे. तसेच पिस्त्याची पूड खव्याच्या मिश्रणावर तसेच सॅन्डविचवर पसरवणे
  • चांदीचा वरखा लावून थंडगार वाढणे

टीप
मी जाड पनीरचे तुकडे करून चिरण्याऎवजी करतानाच पातळ तुकडे बनवले आणि दोन तुकड्यांमध्ये खवा घालुन सॅन्डविच बनवले.

व्हेज बिर्यानी


मी ही बिर्यानी बरेच वेळा बनवलीये पण शेवटी काल फोटो काढण्याचा अवसर मिळाला. त्यामुळे खास माझ्या व्हेजीटेरीअन दोस्तांसाठी ही पाककृती.

व्हेज बिर्यानी
साहित्य
३ वाटी तांदूळ
३५०ग्राम भेंडी
२५० ग्राम छोटी वांगी
२५० ग्राम गाजर
२ कच्ची केळी
४ बटाटे
४ कांदे
३ टोमेटो
२ चमचे पुदिना पानं
१० लसूण पाकळ्या
२ चमचे किसलेला आलं
१/२ वाटी काजू
१/४ वाटी बदाम
१ चमचा किसलेले सुके खोबरे
१/२ चमचा खसखस
२ सुक्या मिरच्या
१/४ चमचे बडीशेप
१/४ चमचा मिरे
१ चमचा जिरे
१ चमचा धने
३/४ चमचे तिखट
१ चमचा गरम मसाला
२ वेलची
२ लवंग
३ दालचिनी काड्या
१/४ वाटी दुध
चिमुटभर केशर
मीठ चवीपुरता
तूप
तेल

कृती
  • कुकरमध्ये दोन बटाटे शिजवून घेणे
  • तांदूळ गरम पाण्यात अर्धा तास भिजवणे
  • खसखस पाण्यात भिजवून ठेवणे
  • वांगी, भेंडी, सालं काढून आणि चिरून कच्ची केळी, २ बटाटे आणि गाजर तळून घेणे.
  • एका भांड्यात पाणी गरम करून त्यात भिजवलेले तांदूळ घालणे. भात बोटचेपा शिजेपर्यंत शिजवून घेणे. जास्तीचे पाणी गळून टाकणे.
  • एक चमचा तूप गरम करून त्यात वेलची, लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा टाकणे. हे मिश्रण भातात घालुन एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात २ कांदे बारीक चिरून शिजवणे. तेलातून बाजूला काढून ठेवणे.
  • त्याच कढईत अजून एक चमचा तेल घालुन, जिरे, मिरे, सुकी मिरची, धने, बडीशेप, सुके खोबरे, दालचिनी, १/४ वाटी काजू आणि बदाम घालुन तळणे
  • त्यात गरम मसाला, तिखट, खसखस, पुदिना पानं आणि आधी भाजलेला कांदा घालुन ढवळणे. मसाले सुगंध सोदेपार्यानता भाजून घेणे.
  • मिश्रण थंड करून त्यात टोमेटो घालुन मिक्सरमध्ये वाटणे.
  • कढईत तूप गरम करून त्यात वरचे वाटलेले मिश्रण घालणे. तेल सोडेपर्यंत भाजून घेणे.
  • आता त्यात तळलेल्या भाज्या आणि मीठ घालुन २ मिनिट शिजवणे.
  • दुध आणि केशर एकत्र करून गरम करून घेणे.
  • उरलेले २ कांदे बारीक उभे चिरून आणि काजू कुरकुरीत आणि गुलाबी होईपर्यंत तळून घेणे.
  • कुकरला तूप लावून त्यात उकडलेल्या बटाट्याचा, १/३ भाग भात, १/२ भाग भाजी, अजून १/३ भाग भात, बाकी उरलेली १/२ भाग भाजी आणि उरलेला १/३ भाग भात असे थर लावणे.
  • ह्या थरांच्या आर पार भोकं पाडून त्यावर केशर-दुधाचे मिश्रण शिंपडणे.
  • कुकर मंद आचेवर ठेवून, एक शिट्टी होईपर्यंत शिजवणे. बिर्यानीवर आधी तळलेला कांदा आणि काजू पसरवून वाढणे.

टीप
मी भाज्या ग्रेव्हीमध्ये शिजवण्याऎवजी त्यांना तळून ग्रेव्हीमध्ये घातले. त्यामुळे कुठलीच भाजी अर्धी कच्ची किंव्हा जास्त शिजली नाही आणि चव एकदम छान आली.
भाज्यातळताना छोटे बटाटे असतेतर जास्त चांगले झाले असते तर अख्खे तळता आले असते असे राहून राहून वाटले.

मालपुआ


प्रत्येक आठवड्याला अजॉय डोक्यात तेल घालुन देण्यासाठी विचारतो. (तो माझ्या डोक्यात तेल घालुन देतो) माझा उत्तर ठरलेलं असत : मी कोणताही पदार्थ बनवून देऊ शकते पण तेल मालिश ते सुद्धा दर आठवड्याला तुझ्या इतक्या छोट्या केसांसाठी फार जास्त कष्ट दायक आहे. एखाद दुसऱ्या महिन्यातून एकदा मी करू शकते. मागच्या शनिवारी जेंव्हा मी हे उत्तर पुन्हा दिले तेंव्हा त्यांनी मालपुआची फर्माईश केली. मी पटकन थोडा फार पाकक्रिया शोधायला चालू केला पण प्रत्येकजण वेगवेगळ सांगत होते. शेवटी हि पाककृती मी स्वतःच बनवली.

मालपुआ
साहित्य
१ वाटी मैदा
१/२ वाटी रवा
२.५ वाटी दुध
१ चमचा बडीशेप
१.५ वाटी साखर
चिमुटभर केशर
बदाम आणि पिस्ता वरून घालण्यासाठी

कृती
  • मैदा, रवा, बडीशेप आणि दुध एकत्र मिसळून ४ तास भिजवत ठेवणे.
  • साखर १.५ वाटी पाण्यात घालुन एकतारी पाक बनवणे.
  • त्यात केशर घालुन बाजूला ठेवणे.
  • कढई गरम करून त्यात १/४ वाटी आधी बनवलेले रवा-मैद्याचे पीठ गोलाकार ओतणे
  • गुलाबी रंगावर दोन्ही बाजूनी भाजून झाल्यावर त्याला साखरेच्या पाकात दोन मिनिट बुडवणे.
  • पाकातून बाहेर काढून त्यावर बदाम पिस्ताचे तुकडे पसरवून खायला देणे.

टीप
बऱ्याच व्हिडीओ मध्ये मालपुआ फ्राय करायला सांगितलेला पण पुढच्यावेळी मी शॅलो फ्राय करणार आहे.
तसेच मी १ वाटी साखरेचा पाक बनवला असल्यानी शेवटच्या थोड्या मालपुआना पाक पुरला नाही
मी ह्याच्याआधी हैदराबादमध्ये बडी मा आल्या होत्या तेंव्हा फक्त एकदाच मालपुआ खाल्ले आहेत त्यामुळे त्याची चव नक्की कशी असते ह्याचा फार काही अंदाज मला नाहीये. त्यामुळे पुढच्या वेळी मी मांना विचारून किती फरक आहे ते बघणार आहे.

अख्या मसाल्याचा व्हेज पुलाव


मला मिरे फार आवडतात फक्त पूड नाही तर पापडत असतात तसे तुकडे सुद्धा. इथे आल्यापासून आम्ही गार्लिक पापडच खातोय कारण अजॉयला तोच आवडतो आणि मला दोन प्रकारचे पापड खायला द्यायला कंटाळा येतो. म्हणूनच मिरे खाण्यासाठी मी हि पाककृती तयार केली :)

अख्या मसाल्याचा व्हेज पुलाव
साहित्य
२.५ वाटी तांदूळ
२ वाटी फ्लॉवर
२ कच्ची केळी
१ मध्यम आकाराचे वांगे
१ बटाटा
१ वाटी मटार
१/२ चमचा मिरे
१/२ चमचा जीरा
४-५ लवंग
४-५ वेलची
चिमुटभर केशर
मीठ
तेल
तूप

कृती
  • एका भांड्यात पाणी उकळवून त्यात तांदूळ घालुन भात तयार व्हायच्या थोडावेळ आधी शिजवणे.
  • उरलेले पाणी काढून टाकून भात बाजूला ठेऊन देणे.
  • कढईमध्ये तेल तापवून त्यात फ्लॉवर, वांग्याचे तुकडे आणि कच्या केळ्यांचे तुकडे घालुन भाजून घेणे.
  • मटार भाजून त्यांना पण बाजूला ठेवणे.
  • बटाटा किसून थोडा थोडा एकत्र करून भाजून घेणे
  • कढईमध्ये तूप घालुन त्यात लवंग, वेलची, मिरे, जीरा घालुन फोडणी करणे.
  • त्यात भात, फ्लॉवर, वांग्याचे आणि केळ्यांचे तुकडे घालणे. एकत्र करून २-३ मिनिट वाफ काढणे.
  • एक चमचा गरम करून त्यावर केशर चुरून भाजणे. केशर भातात मिसळणे
  • मीठ घालुन भात एकत्र करणे व अजून १ मिनिट वाफ काढणे. वाढताना वरून तळलेले मटार व बटाटे घालुन खायला देणे.

टीप मला भात पांढरा ठेवून त्याला केशराचा वास द्यायचा होता म्हणून मी भात शिजवताना केशन न घालता शेवटी घातले. आधी सांगितल्याप्रमाणे मला मिरे फार आवडत असल्यानी मी खूप घातले आणि लवंग आणि वेलची जास्त वापरले नाही कारण मला ते फार जास्त आवडत नाहीत :) मुळ हे की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाल्यांचा प्रमाण बदलू शकतात.वर दिलेल प्रमाण माझ्या चवीसाठी एकदम बरोबर होते आणि आता मी हा पुलाव दुपारच्या जेवणात खातीये. यमी!

पनीर बिर्यानी


मागच्या आठवड्यात मी हि बियाणी बनवलेली. बऱ्याच दिवसांपूर्वी अनुजानी मला व्हेज बिर्यानी बनव असे सांगितलेले आणि मला असेही आठवतेय की तिला पनीर नव्हत वापरायच. पण मी हि पनीरची बिर्यानी बनवून तिची अर्धी इच्चा पूर्ण केलीये म्हणायला हरकत नाहीये.बनवायला एकदम सोप्पी आणि चविष्ठ. ह्याची कृती मी माझ्या ह्या मसालेदार बिर्याणीच्या कृतीवरून प्रेरित होऊन बनवलीये.

पनीर बिर्यानी
साहित्य
३ वाटी तांदूळ
४०० ग्राम पनीर
४ टोमाटो
३ कांदे
२ बटाटे
१ वाटी काजू
१/२ वाटी बदाम
८ दालचिनी
१५ लवंग
१५ वेलची
१/२ चमचा खसखस
१/२ चमचा मिरे
१ चमचा जिरे
१/२ चमचा बडीशेप
१/२ चमचा हळद
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ वाटी दही
१/२ वाटी दुध
२ चिमुट केशर
८ चमचे तूप
४ चमचा लोणी
मीठ
तेल

कृती
  • एका भांड्यात हळद, तिखट, आले पेस्ट, लसूण पेस्ट, दही आणि मीठ एकत्र करणे व त्यात पनीरचे तुकडे करून घालणे. एक दोन तास बाजूला ठेवून देणे.
  • भात कोमट पाण्यात भिजवून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात लोणी घालणे. पनीरचे तुकडे हलक्या गुलाबी रंग्वर भाजून घेणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच कढईत ४ दालचिनी, ५ लवंग, मिरे, खसखस, बडीशेप, धने पूड, बदाम आणि १/२ वाटी काजू घालुन मंद आचेवर खमंग भाजून घेणे.
  • त्यात एक कांदा बारीक चिरून घालणे व गुलाबी होईपर्यंत भाजणे. मिश्रण थंड करणे व मिक्सर मध्ये एका टोमाटोबरोबर वाटणे.
  • कढईत २ चमचे तूप टाकून गरम करणे व त्यात हा मसाला घालुन भाजणे.
  • उरलेले ३ टोमाटो मिक्सर मध्ये वाटून घेणे व ते आणि मीठ मसाल्यात घालुन भाजी सुकेपर्यंत शिजवणे.
  • त्यात पनीरचे तुकडे घालुन ढवळणे व बाजूला ठेवणे.
  • कुकरमध्ये बटाटे उकातून त्याच्या साली काढून चकत्या करून घेणे.
  • दुध गरम करून त्यात केशर घालुन बाजूला ठेवणे.
  • भांड्यात पाणी गरम करून त्यात भिजवलेले तांदूळ घालुन शिजवणे. थोडेशे कच्चे राहिल्यावर त्यातील पाणी काढून थंड पाण्याखाली धुवून घेणे.
  • छोट्या कढईत ४ चमचे तूप गरम करून त्यात ४ दालचिनी, १० लवंग, १५ वेलची घालणे. हे मिश्रण आणि मीठ भातात मिसळणे व बाजूला ठेवणे.
  • उरलेले २ कांदे बारीक उभे चिरून तेलात मध्यम आचेवर गुलाबी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणे.
  • त्याच तेला उरलेले १/२ वाटी काजू तळून घेणे व बाजूला ठेवणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून बटाट्याच्या चाकात्यांचा थर लावणे.
  • भाताचा १/३ भाग बटाट्यावर पसरवणे. त्यावर तळलेले १/३ काजूचा वाटा, तळलेल्या कांद्याचा १/३ वाटा आणि अर्धे पनीरचे मिश्रण पसरणे.
  • पुन्हा १/३ भाताचा वाटा, १/३ भाग काजू, १/३ भाग कांदा आणि उरलेले पनीर पसरवणे
  • वरून उरलेला भात पसरवणे व त्यावर उरलेले काजू आणि कांदा पसरवणे.
  • परतणीच्या मागच्या बाजूनी पूर्ण थरातून जाईल अशी ५-६ भोके पाडणे व त्यावर केशर दुध ओतणे.
  • मंद आचेवर तवा ठेवून त्यावर हा कुकर बंद करून ठेवणे व २५-३० मिनिट शिजवणे व नंतर गरम गरम रायत्यासोबत खायला देणे.

टीप
मी १ थर भात, अर्धे पनीर मिश्रण आणि मग अजून एक थर भात (२ वाटी तांदुळाचा) वापरला. अर्धेच काजू आणि कांदा पण वापरले. उरलेला पनीर मसाला मी डब्यात घालुन पुढच्या आठवड्यात करण्यासाठी बाजूला ठेवून दिला. नंतर मला फक्त भात बनवावा आणि थोडा कांदा तळवा लागला. काम करून आल्यावर थकलेल्या दिवशी एकदम पटकन आणि चाविस्थ बिर्यानी खाता आली.
मी नेहमीच बिर्याणीच्या खाली बटाट्याचा थर देते त्यामुळे बिर्याणी करपट नाही.
मी पनीर आणि दह्याचे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलेले त्यामुळे पनीर चांगले राहते आणि मिश्रण थोडे सुकते सुद्धा.

रसकदम


बरेच दिवस झाले रसकदम खाऊन. माझा आवडता गोड पदार्थ त्यामुळे आज मी बनवण्याचे ठरवले. कृती रुचिरा नावाच्या पुस्तकातल्या कृतीवरून प्रभावित आहे.

रसकदम
साहित्य
३.५ वाटी दुध
१ चमचा व्हिनेगर
१.५ वाटी साखर
१.५ वाटी पिठी साखर
४ वाटी खवा
चिमुटभर केशर
१ वाटी किसलेले पनीर

कृती
  • २ चमचे दुध गरम करून त्यात केशर घालणे
  • उरलेले दुध उकळवणे व त्यात एक चमचा पाण्यात व्हिनेगर मिसळून घालणे.
  • पनीर वरच्या बाजूला जमा होईल आणि पाणी वेगळे होईल. पाणी ओतून देवून पनीर थंड पाण्यात स्वच्छ धुवून घेणे.
  • पनीर पंच्यात गुंडाळून पाणी पिळून टाकणे.
  • पनीर चांगले मळून घेणे व त्याचे २५ छोट्या आकाराचे गोळे बनवणे.
  • ६ वाटी पाण्यात साखर घालुन कुकरमध्ये उकळवणे.
  • त्यात पनीरचे गोळे सोडून ५ मिनिट उकळवणे.
  • कुकरचे झाकड लावून अजून ५ मिनिट उकळवणे. (शिट्टी न लावता)
  • कुकर उघडून त्यात अर्धा वाटी पाणी घालुन अजून ५ मिनिट उकळवणे व गोळे थंड होऊ देणे. गोळे पाकातून बाजूला काढून ताटलीत पसरवणे.
  • नॉनस्टिक तव्यावर मध्यम आचेवर पनीर गुलाबीरंगावर परतून घेणे.
  • खवा, पिठी साखर, केशर दुध एकत्र करून मळणे.
  • पनीर थंड झाले असेल त्याला मिक्सर मध्ये वाटून पूड करणे व एका ताटलीत पसरवणे.
  • शिजवलेले गोळे खव्याच्या मिश्रणात घालुन बंद करणे व नंतर पनीरच्या पूड मध्ये घोळवणे.

टीप
पनीर भाजताना ते करपणार नाही ह्याची काळजी घेणे व सारखे हलवत भाजणे. पनीरचा कच्चा वास गेला पाहिजे
शिजवलेले गोळे रसगुल्यासाराखेच असतात फक्त आकारणी छोटे आणि पाकचे प्रमाण वेगळे असते.
खव्याच्या मिश्रणात नारिंगी किंवा गुलाबी रंग घालता येईल पण माझ्याकडे नसल्यानी मी वापरला नाही.

मटण बिर्याणी


बरेच दिवसांपासून अजॉय ह्याची मागणी करत होता पण मला मटण फारसे आवडत नसल्यानी मी इतके दिवस बनवण्याचे टाळत होते. शेवटी आज मी हि बिर्याणी बनवली आणि एकदम छान पण झालेली

मटण बिर्याणी
साहित्य
३ वाटी तांदूळ
१/२ किलो मटण
७ कांदे
२ टोमाटो
२ बटाटे
१/२ वाटी दही
१/४ वाटी दुध
मुठभर काजू
५ बदाम
१ आले
१०-१५ लसूण पाकळ्या
१ चमचा गरम मसाला
२ चमचा तिखट
चिमुटभर हळद
१ चमचा धने पूड
१ चमचा खसखस
१.५ चमचा मिरे पूड
१/२ चमचा जिरे
१ चमचा बडीशेप
१ चमचा सुके खोबरे
८ लवंग
५ दालचिनी
२ तेजपत्ता
५-६ वेलची
चिमुटभर केशर
१/२ वाटी तूप
मीठ
तेल

कृती
  • आले आणि लसूण एकत्र बारीक वाटून घेणे.
  • मटण धुवून घेणे व त्याला दही, हळद, १ चमचा तिखट, निम्मी आले लसूण पेस्ट लावणे. ८ तास मुरण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • दुसऱ्यादिवशी तांदूळ धुवून घेणे व अर्धा तास कोमट पाण्यात भिजत ठेवणे. जास्तीचे पाणी ओतून देणे व बाजूला ठेवणे.
  • बटाटे उकडून घेणे व चकत्या बनवणे.
  • दुध गरम करणे व त्यात केशर विरघळवणे.
  • ३ कांदे बारीक बारीक चिरणे व बाजूला ठेवणे.
  • कढईत एक चमचा तेल गरम करणे व त्यात कांदा गुलाबी भाजणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात अजून १ चमचा तेल घालुन त्यात जीरा, ३ दालचिनी, ५ लवंग, १ चमचा मिरे, धने, सुके खोबरे, बडीशेप, खसखस आणि उरलेले एक चमचा तिखट घालुन भाजणे.
  • मसाल्यांचा वास सुटला की त्यात भाजलेला कांदा घालणे व गुलाबी रंगावर भाजणे.
  • त्यात उरलेली आले लसूण पेस्ट घालणे व भाजणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
  • बदाम, काजू(८-१०) आणि वर भाजलेला मसाला थोडे पाणी घालुन एकत्र वाटणे.
  • उरलेले ४ कांदे बारीक उभा चिरून तुपात गुलाबी रंगावर तळणे.
  • उरलेले काजू भाजणे व बाजूला ठेवणे.
  • चमचाभर तूप बाजूला ठेवून उरलेले तूप गरम करणे. त्यात मसाला घालुन तूप सुटेपर्यंत भाजणे
  • त्यात मटणाचे तुकडे घालुन तूप सुटेपर्यंत शिजवणे.
  • टोमाटो मिक्सरमध्ये वाटून घेणे व शिजणाऱ्या मटणात घालणे.
  • त्यात १/४ वाटी पाणी आणि मीठ घालुन मिश्रणाला शिट्टी काढणे व नन्तर मंद आचेवर १० मिनिट शिजू देणे.
  • मटण शिजत असताना १० वाटी पाणी उकळवून त्यात मीठ घालणे व तांदूळ घालुन भात शिजवणे.
  • जास्तीचे पाणी ओतून भात थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • कढईत उरलेले तूप गरम करणे व त्यात ३ लवंग, २ दालचिनी, १/२ चमचा मिरे, ताज पत्ता, वेलची भाजणे व भातात मिसळणे.
  • शिजलेले मटण कढईत घालुन सुकेपर्यंत शिजवणे.
  • त्यातील बाजूला सुटलेले तूप वेगळे करणे.
  • कुकरला तुपाचा हात लावणे व खाली बटाट्याच्या चकत्या लावणे.
  • त्यावर भाताचा १/३ भाग पसरवणे. निम्मे मटण पसरवून त्यावर १/३ भाग काजू व कांदा पसरवणे.
  • त्यावर अजून १/३ भाग भात पसरवणे. उरलेले मटण घालुन त्यावर १/३ भाग कांदा व काजू पसरवणे.
  • उरलेला भात वर पसरवून त्यावर उरलेले काजू व कांदा घालणे.
  • परतण्याच्या मागच्या बाजूनी भातात आरपार भोके पाऊन त्यावर वेगळे केलेले तूप व केशराचे दुध घालणे.
  • कुकर बंद करून मंद आचेवर तवा ठेवून त्यावर १५ मिनिट गरम करणे.

टीप
वाढताना अख्खा थर बाहेर काढून वाढणे म्हणजे सगळ्या मसाल्यांची चव चांगली ताटलीत येईल.

अननसाचा शिरा


हा पदार्थ मी पहिल्यांदा बँगलोरमध्ये खालेला. तिथे हा एकदम सगळीकडे मिळतो. पण मी तेंव्हा फार जास्त वेळा खाल्ला नाही कारण तो अतिशय गोड असायचा आणि अननसाची चव फार काही यायची नाही. ह्यावेळी मी घरी बनवताना त्या गोष्टी ठीक करून बनवला आणि तो एकदम मस्त झालेला

अननसाचा शिरा
साहित्य
१.५ वाटी अननस
१ वाटी रवा
८ चमचे साखर
२ चमचे तूप
२ चमचे काजू
२ चमचे मनुका
२ चिमुट केशर
२ चमचे दुध

कृती
  • दुध गरम करून त्यात केशर घालणे व बाजूला ठेवणे.
  • ४ वाटी पाणी भांड्यात गरम करून त्यात अननस कापून घालणे. मध्यम आचेवर पूर्णपणे शिजवणे.
  • अननस शिजत असताना कढईत तूप गरम करून त्यात काजू भाजणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच तुपात रवा घालुन सारखा परतत गुलाबी होईपर्यंत भाजणे.
  • अननस शिजला की फक्त अननसाच्या फोडी रव्यात घालुन पुन्हा परतणे.
  • अननसाच्या उरलेल्या पाण्यात २ चमचा साखर घालुन उकळवणे.
  • त्यात रवा आणि अननसाचे मिश्रण घालुन सारखे ढवळत शिजवणे.
  • शिरा सुकायला लागला की त्यात साखर, केशर दुध, मनुका आणि काजू घालणे व पूर्णपणे शिजवणे

टीप
रवा आणि काजू एकदम मंद आचेवर भाजायचे म्हणजे ते करपणार नाहीत
साखर तुमच्या चवीप्रमाणे वापरता येईल मला हे प्रमाण एकदम छान वाटले

खोबऱ्याची लस्सी


मी जेंव्हा हि कृती वाचलेली तेंव्हा मला बिलकुल वाटले नव्हते की ती इतकी सुंदर होईल.

खोबऱ्याची लस्सी
साहित्य
१/२ खोबरे
१ वाटी चक्का
८ चमचे साखर
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर केशर
मीठ

कृती
  • खोबरे किसून त्यात पाणी घालुन मिक्सरमध्ये वाटून खोबऱ्याचे दुध काढणे.
  • चक्का, केशर, वेलची पूड, साखर आणि मीठ मिक्सरमध्ये एकत्र वाटणे.
  • त्यात खोबऱ्याचे दुध घालुन पुन्हा वाटणे
  • मिश्रणात बर्फ घालुन पुन्हा थोडे वाटणे
  • प्यायला देताना त्यात केशर घालुन देणे.

टीप
चक्का दुकानातून खरेदी करता येईल किंवा घरी बनवता येईल. मी जेंव्हा श्रीखंड बनवले तेंव्हा त्यातील एक वाटी चक्क बाजूला ठेवून हि लस्सी बनवली. चक्का बनवण्याची कृती श्रीखंडआम्रखंड ह्या दोन्हींच्या कृतीत दिलेली आहे.
मी नेहमी घरी बनवलेले नारळाचे दुध वापरते जे एकदम जाड नसते त्यामुळे मी बर्फ न वापरता लस्सी बनवून मग थंड केली. जर विकतचे खोबऱ्याचे दुध वापरायचे असेल तर त्यात बर्फ किंवा पाणी वापरणे महत्वाचे आहे. १ वाटी चक्क्यात १ वाटी पाणी किंवा बर्फ आणि ३ वाटी नारळाचे दुध बरोबर होईल

श्रीखंड


हा आम्रखंडसारखा आणखीन एक चक्क्याचा पदार्थ.

श्रीखंड
साहित्य
१/२ लिटर दुध
३/४ वाटी साखर
चिमुटभर केशर
१ चमचा दुध पूड
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर दालचिनी पूड
२ चमचे नारिंगी रंग
५-६ बदाम
१० पिस्ता

कृती
  • Warm the milk
  • दुध कोमट करून त्यात दही एकत्र करून ६-८ तास गरम जागी ठेवून दही लावणे.
  • पंचावर दही ओतून ते टांगून ८-१० ठेवणे म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल व चक्का तयार होईल.
  • चक्क्यात साखर घालुन दोन तास ठेवणे.
  • १/४ वाटी पाणी गरम करून त्यात दुधाची पूड, केशर, दालचिनी पूड, वेलची पूड घालुन एकत्र करणे.
  • हे मिश्रण चक्क्यात घालुन पुरण यंत्रातून फिरवणे
  • त्यात बदाम आणि पिस्ते घालुन खायला देणे.

टीप
साखर चक्क्यात एकत्र करून ठेवल्यानी चांगली एकत्र होते नाहीतर दही आंबट होऊन साखर वेगळी राहते.
दुधाच्या पूड मध्ये पाणी घालुन मिश्रण बनवण्याऎवजी १/४ वाटी दुध वापराता येईल पण माझ्याकडचे दुध संपल्यानी मी दुधाची पूड वापरली

मसालेदार बिर्यानी


मागच्यावेळी केलेली बियाणी आमच्या कडे काम करणाऱ्या बाईंच्या सांगण्याप्रमाणे केलेली. पण आज मी एका पुस्तकात वाचून हि केलेली बिर्यानी अजूनही सुंदर आणि चविष्ठ आहे.

मसालेदार बिर्यानी
साहित्य
४ चिकनचे लेग
२ वाटी तांदूळ
१ वाटी दही
४ कांदे
२ टोमाटो
१/४ वाटी दुध
१ बटाटा
मुठभर काजू
५-६ बदाम
२ चमचे तेल
१ चमचा पुदिना पाने
१ चमचा सुके खोबरे
२ वेलची
२ लवंग
३ दालचिनी
१ चमचा जीरा
१ चमचा धने
१ चमचा तिखट
१/४ चमचा मिरे पूड
१/२ चमचा खसखस
१/४ चमचा बडीशेप
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा आले
१ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
चिमुटभर केशर
मीठ

कृती
  • एका भांड्यात दही, हळद, गरम मसाला, १/२ चमचा लसूण पेस्ट, १/४ चमचा आले पेस्ट आणि मीठ एकत्र करणे.
  • चिकनचे तुकडे त्यात घालुन चांगले एकत्र करणे. फ्रीजमध्ये कमीत कमी ८ तास ठेवून देणे.
  • तांदूळ कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घेणे.
  • ३-४ चमचे पाण्यात खसखस भिजवणे.
  • कोमट दुधात केशर घालुन बाजूला ठेवणे.
  • बटाटे उकडून थंड करून त्याच्या साली काढून चकत्या करणे व बाजूला ठेवणे.
  • २ कांदे पातळ उभे चिरून तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळणे.
  • त्याच तेलात ५-६ काजू बाजूला ठेवून बाकीचे तळून घेणे.
  • उरलेले कांदे बारीक कापून तेलात गुलाबी रंगावर भाजणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात २ दालचिनी, धने, जिरे, सुके खोबरे, बडीशेप, काजू आणि बदाम घालुन तळणे.
  • त्यात तिखट, मिरे पूड, खसखस, पुदिना पाने आणि आधी भाजलेला बारीक कांदा घालणे व भाजणे. मिश्रण थंड करणे.
  • मिश्रण मिक्सरमध्ये अर्धा टोमाटो सहित वाटणे.
  • २ चमचा तूप बाजूला ठेवून उरलेले गरम करणे व त्यात हा वाटलेला मसाला खमंग भाजून घेणे.
  • त्यात उरलेली आले पेस्ट, लसूण पेस्ट, बारीक चिरलेले टोमाटो आणि मीठ घालुन भाजणे.
  • त्यात चिकन त्याच्या मासाल्यासाहित घालुन पूर्ण सुकेपर्यंत भाजणे.
  • ग्रेव्हीतून बरेच तूप बाजूला सुटेल ते गाळून वेगळे करणे.
  • चिकन शिजत असताना ७ वाटी पाणी उकळून त्यात तांदूळ घालुन त्यावर झाकणी ठेवून अर्धवट शिजवून घेणे. उरलेले पाणी गाळून टाकणे व थंड पाण्याखाली भात धुवून घेणे व बाजूला ठेवणे.
  • १/२ चमचा तूप गरम करून त्यात उरलेले दालचिनी, लवंग, वेलची घालुन तळणे व भातावर सोडणे. त्यात मीठ घालुन चांगले एकत्र करणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून बटाट्याच्या चाकात्यांचा थर लावणे.
  • भाताचा १/३ भाग बटाट्यावर पसरवणे. त्यावर तळलेले १/३ काजूचा वाटा, तळलेल्या कांद्याचा १/३ वाटा आणि अर्धे चिकन पसरणे.
  • पुन्हा १/३ भाताचा वाटा, १/३ भाग काजू, १/३ भाग कांदा आणि उरलेले चिकन पसरवणे
  • वरून उरलेला भात पसरवणे व त्यावर उरलेले काजू आणि कांदा पसरवणे.
  • परतणीच्या मागच्या बाजूनी पूर्ण थरातून जाईल अशी ५-६ भोके पाडणे.
  • चिकनमधून वेगळे केलेले तूप, केशर दुध वरून ओतणे.
  • मंद आचेवर तवा ठेवून त्यावर हा कुकर बंद करून ठेवणे व १५ मिनिट शिजवणे व नंतर गरम गरम रायत्यासोबत खायला देणे.

टीप
थोडी मोठी कृती आहे पण इतकी चविष्ठ बिर्यानी बनते की कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल
बटाटे कुकर मध्ये खाली लावल्यानी भात खालून करपणार नाही.
सगळे पदार्थ आधीच शिजवून मग त्याचे थर लावल्यानी चिकन किंवा भात अर्धवट कच्चे राहण्याची चूक होऊ शकत नाही.

आंब्याचा शिरा


आज गोव्यावरून आल्यावर मला काहीतरी सोप्पे आणि चविष्ठ बनवायचे मनात होते. बऱ्याच वेळा हॉटेलचे खाणे खाऊन कंटाळा आल्यावर काहीतरी साधे खायचे मनात असल्यानी मी हि डीश बनवली

आंब्याचा शिरा
साहित्य
१ वाटी रवा
१.५ वाटी आंब्याचा रस
१ वाटी दुध
१.५ वाटी पाणी
१/२ वाटी साखर
४-५ बदाम
चिमुटभर केशर
तूप

कृती
  • कढईत तूप गरम करून त्यात रवा मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजणे.
  • दुसऱ्या भांड्यात पाणी आणि दुध एकत्र करून उकळवणे व रव्यात घालणे.
  • रवा शिजून जाड झाल्यावर त्यात साखर आणि आंबा रस घालणे व अजून थोडा वेळ शिजवणे.
  • वरून केशर आणि बदाम घालुन खायला देणे.

टीप
मी फक्त अर्धा वाटी साखर वापरली कारण आंब्याचा रसात सुद्धा साखर होती
मी आजकाल आंब्याच्या छोट्या तुकाद्यासकट मिळणारा रस वापरला त्यामुळे अजून छान चव आली

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP