पनीर बिर्यानी


मागच्या आठवड्यात मी हि बियाणी बनवलेली. बऱ्याच दिवसांपूर्वी अनुजानी मला व्हेज बिर्यानी बनव असे सांगितलेले आणि मला असेही आठवतेय की तिला पनीर नव्हत वापरायच. पण मी हि पनीरची बिर्यानी बनवून तिची अर्धी इच्चा पूर्ण केलीये म्हणायला हरकत नाहीये.बनवायला एकदम सोप्पी आणि चविष्ठ. ह्याची कृती मी माझ्या ह्या मसालेदार बिर्याणीच्या कृतीवरून प्रेरित होऊन बनवलीये.

पनीर बिर्यानी
साहित्य
३ वाटी तांदूळ
४०० ग्राम पनीर
४ टोमाटो
३ कांदे
२ बटाटे
१ वाटी काजू
१/२ वाटी बदाम
८ दालचिनी
१५ लवंग
१५ वेलची
१/२ चमचा खसखस
१/२ चमचा मिरे
१ चमचा जिरे
१/२ चमचा बडीशेप
१/२ चमचा हळद
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ वाटी दही
१/२ वाटी दुध
२ चिमुट केशर
८ चमचे तूप
४ चमचा लोणी
मीठ
तेल

कृती
  • एका भांड्यात हळद, तिखट, आले पेस्ट, लसूण पेस्ट, दही आणि मीठ एकत्र करणे व त्यात पनीरचे तुकडे करून घालणे. एक दोन तास बाजूला ठेवून देणे.
  • भात कोमट पाण्यात भिजवून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात लोणी घालणे. पनीरचे तुकडे हलक्या गुलाबी रंग्वर भाजून घेणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच कढईत ४ दालचिनी, ५ लवंग, मिरे, खसखस, बडीशेप, धने पूड, बदाम आणि १/२ वाटी काजू घालुन मंद आचेवर खमंग भाजून घेणे.
  • त्यात एक कांदा बारीक चिरून घालणे व गुलाबी होईपर्यंत भाजणे. मिश्रण थंड करणे व मिक्सर मध्ये एका टोमाटोबरोबर वाटणे.
  • कढईत २ चमचे तूप टाकून गरम करणे व त्यात हा मसाला घालुन भाजणे.
  • उरलेले ३ टोमाटो मिक्सर मध्ये वाटून घेणे व ते आणि मीठ मसाल्यात घालुन भाजी सुकेपर्यंत शिजवणे.
  • त्यात पनीरचे तुकडे घालुन ढवळणे व बाजूला ठेवणे.
  • कुकरमध्ये बटाटे उकातून त्याच्या साली काढून चकत्या करून घेणे.
  • दुध गरम करून त्यात केशर घालुन बाजूला ठेवणे.
  • भांड्यात पाणी गरम करून त्यात भिजवलेले तांदूळ घालुन शिजवणे. थोडेशे कच्चे राहिल्यावर त्यातील पाणी काढून थंड पाण्याखाली धुवून घेणे.
  • छोट्या कढईत ४ चमचे तूप गरम करून त्यात ४ दालचिनी, १० लवंग, १५ वेलची घालणे. हे मिश्रण आणि मीठ भातात मिसळणे व बाजूला ठेवणे.
  • उरलेले २ कांदे बारीक उभे चिरून तेलात मध्यम आचेवर गुलाबी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणे.
  • त्याच तेला उरलेले १/२ वाटी काजू तळून घेणे व बाजूला ठेवणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून बटाट्याच्या चाकात्यांचा थर लावणे.
  • भाताचा १/३ भाग बटाट्यावर पसरवणे. त्यावर तळलेले १/३ काजूचा वाटा, तळलेल्या कांद्याचा १/३ वाटा आणि अर्धे पनीरचे मिश्रण पसरणे.
  • पुन्हा १/३ भाताचा वाटा, १/३ भाग काजू, १/३ भाग कांदा आणि उरलेले पनीर पसरवणे
  • वरून उरलेला भात पसरवणे व त्यावर उरलेले काजू आणि कांदा पसरवणे.
  • परतणीच्या मागच्या बाजूनी पूर्ण थरातून जाईल अशी ५-६ भोके पाडणे व त्यावर केशर दुध ओतणे.
  • मंद आचेवर तवा ठेवून त्यावर हा कुकर बंद करून ठेवणे व २५-३० मिनिट शिजवणे व नंतर गरम गरम रायत्यासोबत खायला देणे.

टीप
मी १ थर भात, अर्धे पनीर मिश्रण आणि मग अजून एक थर भात (२ वाटी तांदुळाचा) वापरला. अर्धेच काजू आणि कांदा पण वापरले. उरलेला पनीर मसाला मी डब्यात घालुन पुढच्या आठवड्यात करण्यासाठी बाजूला ठेवून दिला. नंतर मला फक्त भात बनवावा आणि थोडा कांदा तळवा लागला. काम करून आल्यावर थकलेल्या दिवशी एकदम पटकन आणि चाविस्थ बिर्यानी खाता आली.
मी नेहमीच बिर्याणीच्या खाली बटाट्याचा थर देते त्यामुळे बिर्याणी करपट नाही.
मी पनीर आणि दह्याचे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलेले त्यामुळे पनीर चांगले राहते आणि मिश्रण थोडे सुकते सुद्धा.

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP