पनीर


आज काल इथे मिळणाऱ्या पनीरची क्वालिटी फारच बेकार झालीये, इतकी की पनीर हा नावडता पदार्थ बनू लागला आहे. पण ते बिलकुल चांगले नाहीये कारण अजॉय आणि मला दोघानाही पनीरचे पदार्थ फार आवडतात. असे नाहीये की मी कधी पनीर बनवले नाहीये. गोड पक्वान्नांसाठी मी नेहमीच पनीर घरी ताजे बनवत आलेत पण आता मी भाजीसाठी पण पनीर घरी करायला चालू केलेय. आणि तेंव्हा पासून मला असं लक्षात आलय की मी मागचे २-३ वर्ष बराच काही मिस केलय

पनीर
साहित्य
२ लिटर दुध
३ चमचे व्हिनेगर

कृती
  • दुध उकळवणे.
  • व्हिनेगर एक कपभर पाण्यामध्ये मिसळून दुधात घालणे. दुध भरपूर ढवळणे.
  • दुधापासून पनीर बाजूला होईल आणि पातळ पाणी दिसू लागेल.
  • हे मिश्रण चाळणीमध्ये पंचा पसरवून त्यावर ओतणे.
  • थंड पाणी सोडून तयार पनीर चांगले धुवून घेणे.
  • पंचा घट्ट बांधून त्यावर पाणी भरलेला कुकर रात्रभर ठेवणे. सकाळी पंचा उघडल्यावर पनीरचा घट्ट तुकडा जमा झालेला असेल.

टीप
बरेच लोक व्हिनेगरच्याऎवजी लिंबाच्या रसाचा वापर करतात पण मला व्हिनेगर वापरायला आवडत कारण त्याचा वास आणि चव पाण्यानी धुतलं की लगेच निघून जाते.
पनीर बनवण्यासाठी हाफ अ‍ॅन्ड हाफ वापरू नये अथवा पनीर खूप जास्त क्रिमी होईल. दुध किंवा रेड्युस्ड फ़ॅट दुध वापरणे एकदम उत्तम

अंजीर जिलॅटो


लहानपणापासून अंजीर हे माझा सगळ्यात आवडता फळ. मला माहिती आहे की माझ आंबाप्रेम बघून ह्यावर विश्वास बसने थोडे कठीण आहे पण ते खरय की अंजीर हेच माझं सगळ्यात आवडता फळ. तसे बघितला तर खेळताना जर फळ निवडायचा असेल तर मी नेहमीच अंजीर निवडायचे. मग जशी मी मोठी झाले तसं मला सुजाताच्या (पुण्यातल प्रसिद्ध आईस्क्रीमच दुकान) अंजीर आईस्क्रीमशी माझा परिचय झाला. अजूनही मी जेंव्हा जेंव्हा पुण्याला जाते तेंव्हा एक दाबा अंजीर आईस्क्रीम नक्की खाते. मग हे आईस्क्रीम बनवायला इतका उशीर का हा प्रश्न पडणा साहजिक आहे पण इथे सुके अंजीर मिळण फार कठीण गेलं त्यामुळे मी ह्यावेळी भारतातून सुके अंजीर मागवले आणि आज हे जिलॅटो बनवलं.

अंजीर जिलॅटो
साहित्य
१ लिटर दुध
२५० ग्राम सुके अंजीर
३/४ वाटी मध
१ चमचा लिंबाचा रस

कृती
  • अंजीर २ वाटी दुधात साधारण २ तास भिजवून ठेवणे.
  • मिक्सरमध्ये भिजवलेले ४-५ अंजीर सोडून बाकीचे वाटून घेणे.
  • त्यात मध आणि लिंबाचा रस घालुन पुन्हा वाटणे.
  • हे मिश्रण उरलेल्या दुधात घालुन चांगले ढवळणे.
  • आईस्क्रीम मेकरच्या सूचनेनुसार आईस्क्रीम जमवण्यासाठी ठेवणे.
  • उरलेले अन्जीरचे तुकडे बारीक चिरून आईस्क्रीम मध्ये मिसळणे

टीप
मला एकदा आईस्क्रीम करायला घेतले की पुन्हा वाट बघायला बिलकुल आवडत नाही त्यामुळे मी नेहमी थंड गार दुध वापरते. तसेच अंजीर भिजवून मी फ्रीजमध्येच ठेवून दिलेले त्यामुळे आईस्क्रीम मेकर मध्ये घालायच्या आधी मला मिश्रण थंड होण्याची वाट बघावी नाही लागली.

तंदुरी कोळंबी


मधले २ - ३ दिवस सोडले तर सिअ‍ॅटलमध्ये उन येऊन बरेच दिवस झाले. त्यामुळे बारबीक्यूवगैरे तर भूतकाळातल्या गोष्टी झाल्या. मात्र आज मी तंदुरी कोळंबी बनवून सुंदर संध्याकाळचे वातावरण करण्याचा प्रयत्न केला. ही पाककृती मी मसाले घालता घालता तयार केली पण कोळंबी इतकी सुंदर झालेली की उद्या उरलेले कोळंबी भाजण्याची मी वाटच बघतीये :)

तंदुरी कोळंबी
साहित्य
३/४ किलो कोळंबी
१ चमचा तंदुरी मसाला
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा जिरे पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
१/२ चमचा आलं पेस्ट
१/२ वाटी दही
मीठ
तेल

कृती
  • कोळंबी साफ करून त्याला मीठ लावणे
  • त्यात आलं पेस्ट, तिखट, धने पूड, जिरे पूड, गरम मसाला, हळद घालुन चांगले एकत्र करणे. कमीत कमी अर्धा तास बाजूला ठेवणे.
  • तवा गरम करून त्यात तेल घालणे.
  • कोळंबीमध्ये तंदुरी मसाला आणि दही घालुन एकत्र करणे. ते मिश्रण तव्यावर घालणे.
  • खालाच्याबाजुनी पूर्णपणे शिजेपर्यंत कोळंबी न हलवता व परतता भाजणे. त्यानंतर त्यांना परतून दुसऱ्याबाजूनी पण भाजणे. गरम गरम खायला देणे.

टीप
मध्यम आचेवर, न हलवता भाजल्यानी कोळंबीला तंदुरीची चव आणि रंग येतो.

कडबोळी


दिवाळी होऊन बरेच महिने झाले तर मग आज कडबोळी? पण वेफर्सपेक्षा कडबोळी खाता खाता वर्डकप बघायला मजा येईल असा वाटल्यावर रविवारी रात्री उशिरा मी त्यांना बनवायला घेतलं. लवकरच असा लक्षात आला की एक एक कडबोळी बनवायला खूप वेळ लागत होता मग मी त्यावर एक उपाय शोधला. चकलीच्या पात्रात एक मध्ये छोटी भोक असलेली ही चकती घालुन छोटे छोटे तुकडे तळले आणि ते सिनेमा किंवा खेळ बघताना खाण्यासाठी एकदम छान जमून आले.

कडबोळी
साहित्य
४ वाटी तांदुळाचे पीठ
३ वाटी दुध
१ वाटी लोणी
मीठ चवीपुरते
तेल

कृती
  • तांदुळाच्या पिठात लोणी घालुन चांगले एकत्र करणे.
  • त्यात दुध घालुन पिठाचा गोळा बनवणे.
  • छोट्या लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन पोलपाटावर वळवत लांबट दोरीचा आकार देणे व नंतर गोल वळवून तेलात गुलाबी रंगावर तळणे.
  • किंवा चकलीच्या पात्रात ते पीठ घालुन छोटे छोटे तुकडे तेलात घालुन भाजणे.

टीप
कडबोळी भाजताना गुलाबी झाल्या झाल्या लगेच काढावी नाहीतर करपून जातील कारण तेलातून काढल्यानंतर त्यांना थोड्यावेळानी अजून थोडा रंग चढतो.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP