गरम मसाला


सगळ्यात पहिल्यांदा हा माझा प्रयोग नसून माझ्या आईची खासियत आहे. कोणीही मला गरम मसाल्याविषयी विचारले की मी नेहमी आईचे नाव सांगायचे. आता मी पुण्यात असल्यानी शेवटी मला ह्याची कृती बघण्याला मिळाली आणि म्हणूनच मी इथे ती देत आहे. खूप किचकट आणि मोठे काम असलेतरी मसाला एकदम मस्त बनतो.

गरम मसाला
साहित्य
५०० ग्राम धने
५० ग्राम जिरे
५० ग्राम बडीशेप
४० ग्राम खसखस
२० ग्राम तेज पत्ता
१० ग्राम बादल फुल
१० ग्राम मसाला वेलची
१० ग्राम जायपत्री
१० ग्राम नाक केसर
१० ग्राम दालचिनी
१० ग्राम मिरे
१० ग्राम लवंग
५ ग्राम हळद काडी
१/२ जायफळ
१ कम हिंग तुकडा
२० ग्राम दगड फुल
२० ग्राम शाही जीरा
तेल

कृती
  • कढईत १/२ चमचा तेल गरम करणे. त्यात जायपत्री घालुन मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजणे. मिक्सरच्या भांड्यात घालणे.
  • त्याच कढईत तेलाचे २ थेंब आणि नाक केसर घालुन साधारण ३ मिनिट मंद आचे वर फुलेपर्यंत भाजणे. मिक्सरच्या भांड्यात घालणे.
  • त्याच कढईत अजून २ थेंब तेल घालुन त्यात दगडी फुल घालुन मंद आचेवर ३ मिनिट भाजणे व मिक्सरमध्ये घालणे.
  • २ थेंब तेल घालुन लवंग मंद आचेवर ३-४ मिनिट फुलेपर्यंत भाजणे व मिक्सरमध्ये घालणे
  • कढईत २ थेंब तेल घालुन मिरे मंद आचेवर ४ मिनिट भाजणे. मिक्सरमध्ये घालणे
  • तेलाचे २ थेंब घालुन त्यात दालचिनी मन आचेवर गडद होईपर्यंत भाजणे व मिक्सर मध्ये घालणे.
  • कढईत तेलाचे २ थेंब घालुन त्यात बडीशेप मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजणे व मिक्सरमध्ये घालणे.
  • जायफळाचे तुकडे करून मंद आचेवर १ थेंब तेलाबरोबर २ मिनिट भाजणे व मिक्सरमध्ये घालणे.
  • हिंगाचे तुकडे करून ते १ थेंब तेलाबरोबर मंद आचेवर पांढरे होईपर्यंत भाजणे व मिक्सरमध्ये घालणे
  • हळदीच्या तुकड्याचे बारीक तुकडे करून ते १ थेंब तेलाबरोबर मंद आचेवर लाल होईपर्यंत भाजणे व मिक्सरमध्ये घालणे.
  • त्याच कढईत २ थेंब तेल घालुन तेज पत्ता ३ मिनिट मंद आचेवर भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • २ थेंब तेलाबरोबर बादल फुल मंद आचेवर २ मिनिट भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • २ थेंब तेलाबरोबर मसाला वेलची मंद आचेवर २ मिनिट भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • १ थेंब तेलाबरोबर जीरा गडद होईपर्यंत मंद आचेवर भाजून मिक्सरच्या भांड्यात घालणे.
  • शाही जीरा १ थेंब तेलाबरोबर २ मिनिट मंद आचेवर भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • खसखस १ थेंब तेलाबरोबर १ मिनिट मंद आचेवर भाजून मिक्सरमध्ये घालणे.
  • मिक्सरमधील सगळे मसाले एकत्र बारीक वाटणे व चाळून घेणे. चाळणीत उरलेली मसाल्याची पूड पुन्हा मिक्सरमध्ये घालणे.
  • पुन्हा बारीक वाटून पूड चालणे व वर राहिलेले मसाले पुन्हा मिक्सरमध्ये घालणे.
  • २ चमचा तेल घालुन निम्मे धने मध्यम आचेवर भाजून घेणे. धने फुटायला लागले की आच मंद करून अजून १ मिनिट भाजणे. निम्मे धने मिक्सरमध्ये घालणे व वाटणे.
  • मसाला पुन्हा चाळणे व वर राहिलेला मसाला पुन्हा मिक्सरमध्ये घालणे. उरलेले भाजलेले धने घालुन वाटणे व चाळून घेणे. चाळणीत राहिलेले मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये घालणे.
  • २ चमचा तेल घालुन उरलेले धने मध्यम आचेवर भाजून घेणे. धने फुटायला लागले की आच मंद करून अजून १ मिनिट भाजणे. निम्मे धने मिक्सरमध्ये घालणे व वाटणे.
  • मसाला पुन्हा चाळणे व वर राहिलेला मसाला पुन्हा मिक्सरमध्ये घालणे. उरलेले भाजलेले धने घालुन वाटणे व चाळून घेणे. चाळणीत राहिलेले मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये घालणे.
  • मिक्सरमध्ये वाटून पुन्हा मसाला चाळणे. सगळा मसाला चांगला एकत्र करणे.

टीप
दिलेल्या प्रमाणातच तेल वापरणे नाहीतर मसाले वाटायला फार त्रास होतो.
दिलेल्या क्रमातच मसाले भाजून वाटणे म्हणजे त्याचा वास चांगला राहतो
सगळ्यात शेवटी चाळणीत उरलेले मसाले मांसाहारी कृतीत किंव्हा कुठल्याही वाटणात वापरता येईल
वरील साहित्यात ३/४ किलो मसाला होतो

मेदू वड्यासाठी चटणी


माझ्याकडच्या पुस्तकात वाचून मी हि चटणी केली आणि एकदम मस्त झाली. वड्याबरोबर एकदम उत्तम (अर्थातच मला वडा सांबार जास्त आवडत असल्यानी मी त्याची आठवण काढली).

मेदू वड्यासाठी चटणी
साहित्य
१/२ नारळ
१/४ वाटी फुटाणे डाळ
६ हिरव्या मिरच्या
१ कोथिंबीर
१/२ वाटी दही
१/२ चमचा म्हवरी
१/२ चमचा उडीद डाळ
चिमुटभर हिंग
१ चमचा तेल
मीठ

कृती
  • नारळ खवून घेणे व हिरवी मिरची, कोथिंबीर, फुटाणे डाळ आणि मीठ घालुन मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
  • ह्या मिश्रणात दही घालुन एकत्र करणे.
  • कढईत ते; गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे व त्यात हिंग घालणे.
  • फोडणी चटणीत घालुन एकत्र करणे.

टीप
मी नारळाचे पाणीच नारळ मिश्रण वाटण्यासाठी वापरले त्यामुळे एकदम छान लागले आणि वेगळी साखर घालावी लागली नाही
तेलात लाल मिरची पण घालता येईल पण माझ्याकडे ती नसल्यानी मी नाही वापरली

मेदू वडा


मेदू वडा हा माझा आवडता पदार्थ. घरात संध्याकाळी यायचे पाहुणे दुपारी कळले तर बनवायला एकदम उत्तम.

मेदू वडा
साहित्य
२ वाटी उडीद डाळ
२ हिरव्या मिरच्या
४ खोबऱ्याचे तुकडे
१ कांदा
मीठ

कृती
  • डाळ धुवून ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवणे.
  • जास्तीचे पाणी ओतून डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
  • त्यात मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या, कांदा आणि खोबरे घालुन एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून वडे मंद आचेवर भाजणे.

टीप
डाळ वाटल्याबरोबर लगेच वडे तळणे नाहीतर ते फार तेलकट होतात
वडे तेलात घातल्यावर ते तरंगायला पाहिजेत नाहीतर पिठात थोडे पाणी घालुन हलके करणे.
ह्यात आले पण घालता येते पण मला वाड्यात ते फारसे आवडत नसल्यानी मी वापरले नाही

मटण बिर्याणी


बरेच दिवसांपासून अजॉय ह्याची मागणी करत होता पण मला मटण फारसे आवडत नसल्यानी मी इतके दिवस बनवण्याचे टाळत होते. शेवटी आज मी हि बिर्याणी बनवली आणि एकदम छान पण झालेली

मटण बिर्याणी
साहित्य
३ वाटी तांदूळ
१/२ किलो मटण
७ कांदे
२ टोमाटो
२ बटाटे
१/२ वाटी दही
१/४ वाटी दुध
मुठभर काजू
५ बदाम
१ आले
१०-१५ लसूण पाकळ्या
१ चमचा गरम मसाला
२ चमचा तिखट
चिमुटभर हळद
१ चमचा धने पूड
१ चमचा खसखस
१.५ चमचा मिरे पूड
१/२ चमचा जिरे
१ चमचा बडीशेप
१ चमचा सुके खोबरे
८ लवंग
५ दालचिनी
२ तेजपत्ता
५-६ वेलची
चिमुटभर केशर
१/२ वाटी तूप
मीठ
तेल

कृती
  • आले आणि लसूण एकत्र बारीक वाटून घेणे.
  • मटण धुवून घेणे व त्याला दही, हळद, १ चमचा तिखट, निम्मी आले लसूण पेस्ट लावणे. ८ तास मुरण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • दुसऱ्यादिवशी तांदूळ धुवून घेणे व अर्धा तास कोमट पाण्यात भिजत ठेवणे. जास्तीचे पाणी ओतून देणे व बाजूला ठेवणे.
  • बटाटे उकडून घेणे व चकत्या बनवणे.
  • दुध गरम करणे व त्यात केशर विरघळवणे.
  • ३ कांदे बारीक बारीक चिरणे व बाजूला ठेवणे.
  • कढईत एक चमचा तेल गरम करणे व त्यात कांदा गुलाबी भाजणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात अजून १ चमचा तेल घालुन त्यात जीरा, ३ दालचिनी, ५ लवंग, १ चमचा मिरे, धने, सुके खोबरे, बडीशेप, खसखस आणि उरलेले एक चमचा तिखट घालुन भाजणे.
  • मसाल्यांचा वास सुटला की त्यात भाजलेला कांदा घालणे व गुलाबी रंगावर भाजणे.
  • त्यात उरलेली आले लसूण पेस्ट घालणे व भाजणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
  • बदाम, काजू(८-१०) आणि वर भाजलेला मसाला थोडे पाणी घालुन एकत्र वाटणे.
  • उरलेले ४ कांदे बारीक उभा चिरून तुपात गुलाबी रंगावर तळणे.
  • उरलेले काजू भाजणे व बाजूला ठेवणे.
  • चमचाभर तूप बाजूला ठेवून उरलेले तूप गरम करणे. त्यात मसाला घालुन तूप सुटेपर्यंत भाजणे
  • त्यात मटणाचे तुकडे घालुन तूप सुटेपर्यंत शिजवणे.
  • टोमाटो मिक्सरमध्ये वाटून घेणे व शिजणाऱ्या मटणात घालणे.
  • त्यात १/४ वाटी पाणी आणि मीठ घालुन मिश्रणाला शिट्टी काढणे व नन्तर मंद आचेवर १० मिनिट शिजू देणे.
  • मटण शिजत असताना १० वाटी पाणी उकळवून त्यात मीठ घालणे व तांदूळ घालुन भात शिजवणे.
  • जास्तीचे पाणी ओतून भात थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • कढईत उरलेले तूप गरम करणे व त्यात ३ लवंग, २ दालचिनी, १/२ चमचा मिरे, ताज पत्ता, वेलची भाजणे व भातात मिसळणे.
  • शिजलेले मटण कढईत घालुन सुकेपर्यंत शिजवणे.
  • त्यातील बाजूला सुटलेले तूप वेगळे करणे.
  • कुकरला तुपाचा हात लावणे व खाली बटाट्याच्या चकत्या लावणे.
  • त्यावर भाताचा १/३ भाग पसरवणे. निम्मे मटण पसरवून त्यावर १/३ भाग काजू व कांदा पसरवणे.
  • त्यावर अजून १/३ भाग भात पसरवणे. उरलेले मटण घालुन त्यावर १/३ भाग कांदा व काजू पसरवणे.
  • उरलेला भात वर पसरवून त्यावर उरलेले काजू व कांदा घालणे.
  • परतण्याच्या मागच्या बाजूनी भातात आरपार भोके पाऊन त्यावर वेगळे केलेले तूप व केशराचे दुध घालणे.
  • कुकर बंद करून मंद आचेवर तवा ठेवून त्यावर १५ मिनिट गरम करणे.

टीप
वाढताना अख्खा थर बाहेर काढून वाढणे म्हणजे सगळ्या मसाल्यांची चव चांगली ताटलीत येईल.

पालकाच्या भजीची कढी


आम्ही अगदी लहान होतो तेंव्हापासून बाबा आईला त्यांच्या ऑफिसच्या कढीचे कौतुक सांगत आलेले बघितलंय. आई बिचारी नेहमी तशी (तिनी कधीही न खालेली) कढी बनवण्याचा प्रयत्न करायची पण यश बाबांच्या मते काही आले नाही :) त्यामुळे अर्थातच लहान असताना आम्ही आठवड्यातून दोनदा तरी हि कढी खायाचोच. ताकापेक्षा कढी बरी कारण खोकला नाही होणार त्यामुळे कढी कढी जास्तच वेळा. मी हि कढी बनवताना नेहमीच्या भजीऎवजी पालक वापरायचा ठरवला.

पालकाच्या भजीची कढी
साहित्य
३ वाटी पालक भजी
६ वाटी ताक
चिमुटभर हळद
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
३ चमचा साखर
१ चमचा तूप
मीठ

कृती
  • ताकात साखर आणि मीठ घालुन चांगले विरघळवणे.
  • कढईत तूप गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे
  • त्यात हिंग, हळद टाकून टाकत मिसळणे.
  • वाढताना कढीत भजी घालुन देणे.

टीप
कढीच्या फोडणीत कडीपत्ता पण घालता येईल पण मला तो फारसा आवडत नसल्यानी मी वापरला नाही.

पालकाची भजी


साधारण एक महिना झाला हा पदार्थ बनवून पण हैदराबादमधून निघायच्या घाई गडबडीत पोस्ट करायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे आज जरा वेळ मिळालाय तर इथे ५ नवीन कृती देणार आहे.

पालकाची भजी
साहित्य
१ पालकाची गड्डी
१/२ वाटी बेसन
१/२ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
चिमुटभर जीरा पूड
१/२ चमचा धने पूड
मीठ
तेल

कृती
  • पालक धुवून बाजूला ठेवणे.
  • बेसन, तिखट, हळद, जीरा पूड, धने पूड आणि मीठ एकत्र करून पाणी घालुन भिजवणे
  • कढईत तेल गरम करून त्यातील एक चमचा तेल पिठात घालणे.
  • तेल चांगले गरम झाले की एका वेळी २ पालकाची पाने एकत्र पिठात बुडवून तेलात सोडणे व गुलाबी रंगावर भाजणे

टीप
मी पालकाची छोटी पाने वापरली त्यामुळे एकदम मस्त कुरकुरीत भजी झाली.
पिठात एकावेळी २ पाने भिजवल्यानी त्याची चव भाज्यात चांगली लागत होती.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP