Showing posts with label कोळंबी. Show all posts
Showing posts with label कोळंबी. Show all posts

तंदुरी कोळंबी


मधले २ - ३ दिवस सोडले तर सिअ‍ॅटलमध्ये उन येऊन बरेच दिवस झाले. त्यामुळे बारबीक्यूवगैरे तर भूतकाळातल्या गोष्टी झाल्या. मात्र आज मी तंदुरी कोळंबी बनवून सुंदर संध्याकाळचे वातावरण करण्याचा प्रयत्न केला. ही पाककृती मी मसाले घालता घालता तयार केली पण कोळंबी इतकी सुंदर झालेली की उद्या उरलेले कोळंबी भाजण्याची मी वाटच बघतीये :)

तंदुरी कोळंबी
साहित्य
३/४ किलो कोळंबी
१ चमचा तंदुरी मसाला
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा जिरे पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
१/२ चमचा आलं पेस्ट
१/२ वाटी दही
मीठ
तेल

कृती
  • कोळंबी साफ करून त्याला मीठ लावणे
  • त्यात आलं पेस्ट, तिखट, धने पूड, जिरे पूड, गरम मसाला, हळद घालुन चांगले एकत्र करणे. कमीत कमी अर्धा तास बाजूला ठेवणे.
  • तवा गरम करून त्यात तेल घालणे.
  • कोळंबीमध्ये तंदुरी मसाला आणि दही घालुन एकत्र करणे. ते मिश्रण तव्यावर घालणे.
  • खालाच्याबाजुनी पूर्णपणे शिजेपर्यंत कोळंबी न हलवता व परतता भाजणे. त्यानंतर त्यांना परतून दुसऱ्याबाजूनी पण भाजणे. गरम गरम खायला देणे.

टीप
मध्यम आचेवर, न हलवता भाजल्यानी कोळंबीला तंदुरीची चव आणि रंग येतो.

गार्लिक बटर कोळंबी सॅलेड


मला आज काल सॅलेड हा प्रकार खूप आवडायला लागलाय. इथे एक एकदम सोपा पण चविष्ठ अशी पाककृती देत आहे

गार्लिक बटर कोळंबी सॅलेड

साहित्य
८ मोठे कोळंबी
२ वाटी ब्रोकोली
२ वाटी घेवडा
१ वाटी मक्याचे दाणे
१ अ‍ॅव्होकाडो
३ वाटी आईसबर्ग लेट्युस
१ कांदा
१ वाटी ढोबळी मिरची
१/४ वाटी चेरी टोमेटो
६ लसुणाच्या पाकळ्या
१/४ चमचा ऑरीगॅनो
१/२ चमचा मिरे पूड
१ लिंबू
मोझारीला चीझ
मीठ चवीनुसार
लोणी

कृती
  • तवा गरम करून त्यात ब्रोकोली आणि घेवडा लोण्याबरोबर भाजणे. मीठ घालुन बाजूला ठेवणे.
  • त्याच तव्यावर आता ढोबळी मिरची उभी चिरून आणि थोडे लोणी घालुन भाजणे.
  • ढोबळी मिरची शिजत आल्यावर उभा चिरलेला कांदा आणि मीठ घालुन गुलाबी रंग येईपर्यंत भाजणे.
  • घेवडा आणि ब्रोकोलीच्या भांड्यात हे भाजलेले कांदा आणि मिरची मिश्रण घालणे
  • आता त्याच तव्यावर थोडे लोणी घालुन त्यात कोळंबी आणि बारीक चिरून लसूण घालुन मध्यम आचेवर कोळंबी पूर्णपणे शिजेपर्यंत भाजणे. मीठ घालुन बाजूला ठेवणे.
  • मायक्रोवेव्हमध्ये मक्याचे दाणे २ मिनिट शिजवून घेणे व बाजूला ठेवणे
  • लेट्युस चिरून दोन भांड्यात घालणे.
  • घेवडा, कांदा, ढोबळी मिरची आणि ब्रोकोलीचे मिश्रण अर्धे अर्धे दोन्ही भांड्यात घालणे
  • अ‍ॅव्होकाडो चिरून अर्धा अर्धा दोन्ही भांड्यात घालणे.
  • आता दोन्ही भांड्यात निम्मे निम्मे कोळंबी-लसूण मिश्रण घालणे.
  • टोमेटो आणि मक्याचे दाणेपण अर्धे अर्धे दोन्ही भांड्यात घालणे
  • मिरे पूड, ऑरीगॅनो आणि लिंबू रस दोन्ही भांड्यात घालणे.
  • मोझारीला चीझ घालुन वाढणे

टीप
मी फक्त लिंबू रस सॅलेड ड्रेसिंगम्हणून वापरलं. रॅन्च किंव्हा दुसरा काही वापरावा लागला नाही पण तुम्ही तुमच्या चवीनुसार दुसरा ड्रेसिंगपण वापरू शकतात. माझ्यामते लिंबूमुळे सॅलेडची चव एकदम खुलून आली.
कोळंबी सोडून मी बाकी सगळ्या भाज्या मोठ्या आचेवर भाजल्या त्यामुळे त्या कुसकुशीत लागत होत्या. कोळंबी मी तव्यावर टाकताना तवा मोठ्या आचेवर होता पण तव्यावर घालताच आच मंद केली त्यामुळे ते नीट शिजले पण तरीही त्यांना एक ग्रील केल्यासारखी चव आली.

कोळंबी बरिटो बोल


चिपोटले हि अजॉयची आवडती फूडचेन आणि बऱ्याच वेळा तिथे जाण्यासाठी मागे लागतो. आम्ही तिथे नेहमी चिकन बरिटो बोल खातो. आज मी स्वतः घरी बनवण्याचे ठरवले पण माझ्याकडे बोनलेस चिकन नसल्यानी मी कोळंबी वापरली. फार छान झालेले

कोळंबी बरिटो बोल
साहित्य
४०० ग्राम कोळंबी
१.५ वाटी तांदूळ
५ टोमाटो
१ लिंबू
३ वाटी स्वीटकॉर्न
३ चमचे दही
३ चमचे तिखट
१/२ चमचा ओरिगानो
१/२ चमचा मिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/२ वाटी किसलेले चीज
१/४ वाटी रेंच ड्रेसिंग
१/२ वाटी कोथिंबीर
४ चमचे लोणी
लेट्युस
मीठ
ओलिव्ह तेल

कृती
  • दह्यात एक चमचा तिखट, धने पूड, गरम मसाला घालुन एकत्र करणे. त्यात कोळंबी घालुन एकत्र करणे व बाजूला ठेवणे.
  • कुकरमध्ये तांदुळात २.५ वाटी पाणी घालुन भात बनवणे.
  • कढईत १/४ चमचा तेल घालुन त्यात कोथिंबीर थोडी शिजवून घेणे व भातात घालणे.
  • भातात लिंबाचा रस आणि मीठ घालुन एकत्र करणे व बाजूला ठेवणे
  • कढईत चमचाभर तेल घालुन त्यात टोमाटो वाटून घालणे. त्यात २ चमचा तिखट, मिरे पूड, ओरिगानो आणि मीठ घालुन चांगले शिजवणे. मिश्रण सुकले की बाजूला ठेवून देणे.
  • कढईत लोणी गरम करणे व त्यात कोळंबी मिश्रण सुकेपर्यंत भाजून घेणे
  • ३ मोठ्या भांड्यात बरिटो बनवण्यासाठी भाताचा थर देणे.
  • त्यावर कोळंबी, बर्रिक चिरलेले उरलेले २ टोमाटो आणि चीज घालणे.
  • स्वीटकॉर्न ३ मिनिट मायक्रोवेव्ह करून बोलमध्ये घालणे.
  • त्यावर टोमाटोचा तिखट सॉस, रेंच ड्रेसिंग आणि लेट्युस घालणे

टीप
मी कॉर्नला लवकर शिजवण्यासाठी मायक्रोवेव्ह केले. पण त्याऎवजी पाणी घालुन उकलावता पण येईल.
टोमाटोचा तिखट सॉस जास्त तिखट बनतो. मी अजून एक चमचा तिखट वापरलेले पण खूप मला ते जरा जास्तच तिखट वाटले.
जर घरी सार क्रीम असेल तर ते रेंच ड्रेसिंगच्याऎवजी वापरता येईल, माझ्याकडे नव्हते म्हणून मी ड्रेसिंग वापरले.
माझ्याकडची कोळंबी फार मोठी होती म्हणून तळल्यावर मी प्रत्येकाचे २-३ तुकडे केले.

चिली कोळंबी


आज मला कोळंबीचे काहीतरी लवकर बनणारे पण नेहमीच्या कोळंबी मसाल्यापेक्षा वेगळे काहीतरी बनवायचे होते. आणि मी हा पदार्थ बनवला.

चिली कोळंबी
साहित्य
३०० ग्राम कोळंबी
१ चमचा लसूण पेस्ट
१ कांदा
४ हिरव्या मिरच्या
४ चमचे सोया सॉस
२ चमचे टोमाटो सॉस
२ चमचे कॉर्न फ्लौर
मीठ
तेल

कृती
  • कोळंबीला लसूण पेस्ट आणि मीठ लावून ठेवणे.
  • तेलात तव्यावर कोळंबी १ मिनिट भाजून घेणे.
  • त्याच तेलात उभ्या कापलेल्या मिरच्या, कांदा घालुन सारखे ढवळत शिजवणे.
  • त्यात सोया सॉस, टोमाटो सॉस घालुन अजून २ मिनिट शिजवणे.
  • कोळंबी घालुन अजून एक मिनिट शिजवणे.
  • एका वाटी कॉर्न फ्लौर आणि २ वाटी पाणी घालणे व एकत्र करणे. कोळंबीमध्ये घालुन ३-४ मिनिट शिजवणे.

टीप
माझ्याकडे कांद्याची पात नव्हती त्यामुळे मी तो घातला नाही पण वरून त्याचे पाने कापून घातले तर अजून चांगले वाटेल.

कोळंबीचे सॅन्डविच


सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्या. माझे नवीन वर्ष एकदम शांत होते, खूप जास्त जेट लॅगमुळे ९ वाजेपर्यंत जागणेपण मुश्कील झालेय. हि पाककृती खास आहे कारण ह्याची तयारी आदल्यावर्षी कायला चालू केली आणि पदार्थ ह्या वर्षी तयार झाला. हा मी अजॉयच्या खास मागणीवर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवला.

कोळंबीचे सॅन्डविच
साहित्य
१४-१६ ब्रेडचे तुकडे
४०० ग्राम कोळंबी
१/२ वाटी आम्बवलेली काकडी
४ चमचे दही
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा मिरे पूड
१/४ चमचा चाट मसाला
१/४ चमचा जीरा पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
१/२ वाटी लोणी
मीठ

कृती
  • दही, तिखट, हळद, धने पूड, मिरे पूड, जीरा पूड, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ एकत्र करणे.
  • कोळंबीचे बारीक तुकडे करून ते दह्याच्या मिश्रणात घालुन एकत्र करणे व फ्रीजमध्ये ४-५ तास ठेवून देणे.
  • तवा गरम करून त्यात १/४ वाटी लोणी आणि कोळंबीचे मिश्रण घालणे.
  • तेज आचेवर सारखे परतत मिश्रण सुकेपर्यंत शिजवणे.
  • सॅन्डविच बनवण्यासाठी ब्रेंडच्या तुकड्यांवर आम्बवलेली काकडी आणि शिजवलेले कोळंबीचे मिश्रण घालुन लोणी लावून ग्रील करणे.

टीप
कोळंबीचे बारीक तुकडे केल्यानी एका घासातच पूर्ण कोळंबी निघून येणार नाही.

कोळंबीचे पॅटिस


भारतात असताना मी एक दोनदा पॅटिस बनवण्याचा प्रयत्न केलेला. पण त्याला कधीच चांगले पापुद्रे आले नाहीत. बरेच किचकट आणि पसारा करणारे काम होते. त्यामुळे इथे मी बाजारातल्या पफ पेस्ट्री शिटचा वापर करण्याचे ठरवले. एकदम छान झालेले पण अजूनही मनातली शिटपण स्वतः बनवण्याची इच्छा गेली नाहीये.

कोळंबीचे पॅटिस
साहित्य
2 पफ पेस्ट्री शिट
१ वाटी कोळंबी
१ टोमाटो
२ कांदा
४ लसूण पाकळ्या
१ चमचा धने पूड
१ चमचा तिखट
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा जिरे पूड
१/२ चमचा मिरे पूड
चिमुटभर हळद
१ अंडे
मीठ
तेल

कृती
  • पफ पेस्ट्री शिट फ्रीजमधून काढून त्यांना नेहमीच्या तापमानावर आणावे.
  • त्या वेळात कढईत तेल गरम करून त्यात कांदा भाजून घेणे
  • त्यात बारीक चिरलेला टोमाटो घालणे आणि पूर्ण पणे शिजवणे.
  • त्यात कोळंबी आणि लसूण घालुन अजून २-३ मिनिट शिजवणे.
  • त्यात हळद, तिखट, गरम मसाला, जिरे पूड, मिरे पूड आणि मीठ घालणे व तेल बाजूला निघेपर्यंत भाजणे.
  • त्यात धने पूड घालुन अजून एक-दोन मिनिट शिजवणे व बाजूला ठेवणे.
  • ओव्हन २००C/४००F वर गरम करणे.
  • बेकिंग ट्रेला तुपाचा किंवा लोण्याचा हात लावणे.
  • प्रत्येत पेस्ट्री शिटला ३ उभ्या भागांत आणि २ आडव्या भागात कापून त्याचे १२ तुकडे करणे. प्रत्येक तुकड्यावर कोळंबीचे मिश्रण घालुन दुमडून बेकिंग ट्रेवर ठेवणे.
  • अंडे फेटून घेणे व एक टिशू त्यात बुडवून पफ वर फिरवणे.
  • ओव्हन मध्ये २००C/४००F वर १५ मिनिट भाजणे व गरम गरम खायला देणे.

टीप
मी मध्यम आकाराचे कोळंबी वापरलेली त्यामुळे मला त्याचे तुकडे करावे लागले नाहीत
अंड्याचा वापर केल्यानी वरून एकदम छान गुलाबी होतात.

कोळंबीचा पुलाव


हा एकदम सोप्पा आणि चविष्ठ पुलाव मी शनिवारी भाज्या संपल्यानी हा पुलाव बनवला.

कोळंबीचा पुलाव
साहित्य
२ वाटी कोळंबी
२ वाटी तांदूळ
२ कांदे
२ चमचा काजू
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
१/२ चमचा गरम मसाला
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा दालचिनी पूड
१/४ चमचा लवंग पूड
१/२ चमचा लसूण पेस्ट
मीठ
तूप
तेल

कृती
  • कोळंबीला तिखट आणि मीठ लावून अर्धा तास बाजूला ठेवणे.
  • भात शिजवून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात कोळंबी परतणे.
  • त्याच तेलात कांदा आणि काजू परतून घेणे.
  • लसूण पेस्ट आणि परतलेली कोळंबी घालुन परतणे.
  • त्यात हळद, गरम मसाला, धने पूड, दालचिनी पूड, लवंग पूड आणि मीठ खालून परतणे. कोळंबी शिजेपर्यंत परतणे.
  • त्यात शिजलेला भात आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • वरून तूप सोडून एकत्र करणे व अजून २ मिनिट शिजवणे.

टीप
मी कांदा आणि कोळंबी भाजण्यासाठी चमचाभर तेलाचा वापर आणि वरून २ चमचा तूप सोडले त्यामुळे एकदम चांगली चव आलेली

कोळंबी मसाला


कोळंबी हा माझा सगळ्यात जास्त आवडता प्रकार. पण मा जो कोळंबीचा मसाला बनवतात तो तर एकदमच जास्त आवडता, अगदी तळलेल्या कोळंबीपेक्षा सुद्धा.

कोळंबी मसाला
साहित्य
४०० ग्राम कोळंबी
२ कांदे
२ टोमाटो
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१ चमचा तिखट
१ चमचा हळद
किसलेले खोबरे
मीठ
तेल

कृती
  • कढईत तेल गरम करणे.
  • त्यात कोळंबी घालुन १-२ मिनिट भाजून घेणे व बाजूला ठेवून देणे.
  • त्याच तेलात बारीक चिरलेला कांदा भाजणे.
  • कांदा शिजल्यावर त्यात लसूण पेस्ट, आले पेस्ट, तिखट आणि हळद घालुन पुन्हा भाजणे.
  • त्यात बारीक चिरलेले टोमाटो घालुन २-३ मिनिट शिजवणे.
  • त्यात पाणी घालुन झाकणी लावून पूर्णपणे शिजवणे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे.
  • कढईत वाटलेले मिश्रण आणि एक वाटी पाणी घालणे. त्यात कोळंबी घालुन पूर्णपणे शिजवणे.
  • त्यात किसलेले खोबरे आणि मीठ घालुन अजून एक मिनिट शिजवणे.

टीप
मां मिक्सरमध्ये वाटून नाही घेत व त्याऎवजी टोमाटो पूर्ण शिजवून घेते पण मला वाटलेली ग्रेव्ही जास्त बरी वाटते त्यामुळे कांद्याची चवपण त्यात येते.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP