दही वडा
जवळ जवळ ५ वर्षांपूर्वी मी एकदम पहिल्यांदाच घरापासून दूर बँगलोरमध्ये राहत होते. मी अमिता, विनया आणि अनुमेहा ह्यांच्या बरोबर राहत होते आणि साधारण २ महिन्यानंतर आम्ही ठरवले चला आज दही वडा बनवूया. आम्हाला काहीच स्वयंपाकाचा अनुभव नव्हता ना आमच्याकडे पुरेशी भांडी होती. आम्ही एम टी आरच्या वडा मिश्रणाचा वापर करून भांड्यातच वडे तळले. हे चालले असताना मी त्यांना खूप वेळा सांगितले की मला दही वडे चांगले कसे बनवायचे माहितीयेत :) अगदी लहान असतानापासून माझा एकदम आवडता पदार्थ असल्यानी आई कशी आणि काय काय करायची मी एकदम मन लावून बघायचे. इथे मी त्या शिकलेल्या सगळ्या माहितीसकट कृती देत आहे अर्थातच आता एम टी आरचे पाकीट वापरण्याचे दिवस गेले :)
साहित्य
१ वाटी उडीद डाळ
१ हिरवी मिरची
१/४ चमचा आले पेस्ट
१/२ लिटर दही
२-३ चमचा साखर
मीठ
तेल
कृती
- उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजवणे.
- सकाळी पाण्यातून उपसून त्यात हिरवी मिरची, लसूण पेस्ट घालुन बारीक वाटणे.
- मिश्रण भांड्यात काढून त्यात मीठ घालुन चांगले घोटणे.
- कढईत तेल गरम करून त्यात छोटे छोटे वडे गुलाबी रंगावर तळणे.
- वडे तळत असताना पाणी आणि मीठ एकत्र करून बाजूला ठेवणे/
- एका खोलगट ताटात २-३ चमचे दही आणि वाटीभर पाणी एकत्र करून बाजूला ठेवणे.
- वडा गुलाबी झाला की लगेच मिठाच्या पाण्यात घालणे व अजून वडे तळायला चालू करणे.
- ते वडे तयार होत आले की मिठाच्या पाण्यातले वडे हातावर दाबून त्यातले पाणी काढून दह्याच्या ताटात ठेवणे.
- असे करत सगळे वडे तळणे. मधून मधून ताटातले वडे उलटे करणे म्हणजे ते सर्व बाजूनी भिजतील.
- दह्यात साखर, मीठ घालुन ढवळणे.
- वडे खायला देताना वाटीत वडा घालुन त्यावर दही सोडणे.
टीप
वडा तळायला तेलात घातल्यावर तो तरंगायला पाहिजे, नाहीतर पीठ अजून घोटायला पाहिजे
वडा मिठाच्या पाण्यात घातल्यावर तिथे सुद्धा तो तरंगायला पाहिजे नाहीतर तो अर्धवट कच्छ असेल
वड्यावर आवडत असल्यास थोडे तिखट आणि चिंचेची चटणी पण घालता येईल
0 comments:
Post a Comment