हार्दिक आणि श्वेनीच्या फेरवेल पार्टीमध्ये एक आंबा मुज केक आणलेला. मला तो फार आवडलेला आणि त्याचा पहिला घास खातच मला तो स्वतः बनवण्याची फार इच्छा झालेली. केके इतका छान होता की बरेच जण त्यासाठी सिअॅटल सोडून जाव म्हणजे फेरवेल पार्टीमध्ये हा केक खाता येईल असा पण विनोद करायला लागलेले. मी बराच वेळ गप्पा होते तेंव्हा कोणीतरी म्हणाले की शीतलला त्याची गरज नाही कारण ती तर हा केक घरीच बनवेल. मी तेंव्हा काही बोलले नाही कारण माझ्या लक्षात आला की माझ्याकडून जरा जास्तच अपेक्षित केलं जातंय, पण माझा विचार एकदम पक्का झाला की हा केक वीकएंडलाच करून बघायचा. आणलेल्या केकमध्ये आंबा इसेन्स वापरला होता, मी आमरस वापरायचा ठरवला. चव खूपच छान आलीये. आता सगळ्यांना घरी बोलावून एकदा हमी भरून घ्यायला पाहिजे.
साहित्य
१ वाटी मैदा
३ अंडी
२०० ग्राम क्रीम चीज
३ वाटी क्रीम
५ वाटी आमरस
१ चमचा कॉर्न फ्लौर
२ चमचे दुधाची पूड
१/४ चमचा बेकिंग पूड
१.७५ वाटी साखर
४ चमचे जिलेटीन
४ चमचे लिंबाचा रस
२ चमचा तेल
१.२५ चमचा व्हॅनिला ईसेन्स
१/४ चमचे मीठ
कृती - ३५०F/१७५C वर ओव्हन गरम करणे
- मैदा, कॉर्न फ्लौर ५ वेळा एकत्र चाळून घेणे. त्यात दुधाची पूड, बेकिंग पूड घालुन पुन्हा २ वेळा एकत्र चाळून घेणे.
- मिक्सरमध्ये अंड्याचे पांढरे आणि मीठ चाळून फोम येईपर्यंत फेटून घेणे.
- त्यात १/४ वाटी साखर घालुन घट्ट होईपर्यंत फेटून घेणे.
- दुसऱ्या भांड्यात अंड्याचे पिवळे, १/२ चमचे व्हॅनिला ईसेन्स आणि १/४ वाटी साखर घालुन साखर विरघळेपर्यंत फेटणे.
- त्यात तेल आणि अजून अर्धा चमचा व्हॅनिला ईसेन्स घालुन ३० सेकंद फेटणे.
- अंड्याचे पाढरे त्यात घालुन अलगद एकत्र करून घेणे.
- मैद्याचे मिश्रण १/३ वाटा एकावेळी घालत अलगद एकत्र करणे. जास्त ढवळू नये.
- ९ इन्च स्प्रिंगफॉर्म भांड किंवा कुठलेही ९ इन्च गोलाकार भांडे घेऊन त्याला खाली पार्चमेंट कागद घालुन लोणी लावणे. त्यावर केकचे मिश्रण ओतणे.
- केक ३५०F/१७५C वर ओव्हनमध्ये २० मिनिट भाजून घेणे.
- लगेच थंड होण्यासाठी जाळीच्या रॅकवर उलटवून ठेवणे.
- तेवढ्या वेळात एका भांड्यात १/४ वाटी साखर आणि १/४ वाटी पाणी घालुन ढवळत उकळवणे. अजून २-३ मिनिट उकळू देणे. भांडे खाली घेऊन त्यात १/४ चमचा व्हॅनिला ईसेन्स घालुन ढवळणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
- साखरेचे पाणी थंड होईपर्यंत एका भांड्यात क्रीम चीज, १ वाटी साखर आणि २ चमचे लिंबाचा रस घालुन एकत्र फेटणे.
- मायक्रोवेव्हमध्ये १/४ वाटी पाणी १ मिनिट गरम करणे. त्यात २ चमचे जिलेटीन घालुन पूर्ण विरघळेपर्यंत ढवळणे. क्रीम चीजच्या मिश्रणात घालुन फेटून घेणे.
- दुसऱ्या भांड्यात क्रीम घट्ट होईपर्यंत फेटून घेणे. अलगद पणे क्रीम चीजच्या मिश्रणात ढवळणे.
- त्यात ३ वाटी आंबा रस घालुन एकजीव होईपर्यंत ढवळणे.
- केकला आडवे कापून २ थर बनवणे. खालचा थर ९ इंच स्प्रिंगफॉर्म भाण्यात घालणे. त्यावर अर्धे साखरेचे पाणी ब्रशनी लावणे. आंब्याचे अर्धे मिश्रण त्यावर ओतून सपाट करून घेणे. त्यावर दुसरा केकचा थर ठेवणे. उरलेले अर्धे साखरेचे पाणी ब्रशनी लावून घेणे. उरलेले आंब्याचे मिश्रण ओतून सपाट करणे. फ्रीजमध्ये १ तास थंड करणे.
- केक थंड होऊन ४५ मिनिट झाल्यावर एका भांड्यात उरलेला २ वाटी आमरस, २ चमचे लिंबाचा रस घालुन गरम मध्यम आचेवर गरम करणे. उकळू देऊ नये अथवा चव बिघडेल. मिश्रण बाजूला काढणे.
- मायक्रोवेव्हमध्ये १/४ वाटी पाणी १ मिनिट गरम करणे. त्यात २ चमचा जिलेटीन घालुन विरघळवणे.हे मिश्रण आंब्याच्या गरम मिश्रणात घालुन चांगले ढवळणे. थोडे थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे व पुन्हा ढवळून घेणे.
- फ्रीजमधून केक बाहेर काढून त्यावर हे मिश्रण एकसारखे ओतून थर देणे.
- केक फ्रीजमध्ये कमीत कमी ८ तास जमवण्यासाठी ठेवणे. भांड्याची रिंग काढून वरून फळे घालुन तुकडे खायला देणे.
टीप
केकचा दुसरा थर थोडा छोटा असावा. माझा केक फुलल्यामुळे कापल्यावर आपोआपच थोडा छोटा झाला. तसा नसेल तर बाजूनी थोडा कापून घेणे म्हणजे मग केक कापल्यावर तो थर बाहेरून दिसणार नाही.
केक जर भांड्यातच थंड झाला तर चिकटून बसेल त्यामुळे लगेच थंड करण्यासाठी जाळीच्या रॅकवर काढणे महत्वाचे आहे.
मी ह्यात देसाई बंधूंचा गोड आमरस वापरलाय त्यामुळे आंब्याचा स्वतः रस काढल्यास त्यात साखर घालायला विसरू नये.
जरी कृती थोडी लांब असली तरी एकदा बनवल्यावर लक्षात येईल की इतकी किचकट नाहीये. आणि शेवटी बनणारा केक फारच सुंदर होईल त्यामुळे कष्ट व्यर्थ नाही जाणार. :)