कोबी ब्रोकोली कबाब
नीट बघितले तर लक्षात येईल की आधीची पाककृतीपण कोबीचा वापर करत होती. मी हा पदार्थ मागच्या आठवड्यातील उरलेला कोबी आणि ब्रोकोली वापरून केलाय. काल संध्याकाळी जेंव्हा बनवण्यास सुरुवात केली तेंव्हा आधी भाजी बनवण्याचे ठरवलेले पण ते करताना लक्षात आले की ह्याची भाजीपेक्षा कबाब सुंदर होतील. करायला एकदम सोपे आणि पटकन होतात, मी हे फक्त अर्ध्या तासात आधी काहीही तयारी न करता बनवलेत.
साहित्य
२ वाटी कोबी
३ वाटी ब्रोकोली
१ टोमाटो
१ चमचा ऑरीगॅनो
१ चमचा जिरे
१ चमचा म्हवरी
१ चमचा चाट मसाला
१/२ चमचा तिखट
१/२ लिंबू
१ चमचा कोथिंबीर
१ चमचा पुदिना
२ चमचे मैदा
१ चमचा तांदुळाचे पीठ
चिमुटभर हिंग
१/४ वाटी काजू
मीठ
तेल
कृती
- अर्धा चमचा तेल गरम करून त्यात टोमाटो वाटून घालणे.
- त्यात ऑरीगॅनो आणि तिखट घालुन पूर्णपणे शिजवून ठेवून देणे.
- एका कढईत चमचाभर तेल गरम करून त्यात म्हवरी, जीरा व हिंग घालुन फोडणी करणे.
- त्यात बारीक चिरलेले ब्रोकोलीचे तुकडे घालुन ढवळत शिजवणे.
- ब्रोकोली शिजत आल्यावर त्यात बारीक चिरलेला कोबी, पुदिना आणि कोथिंबीर घालुन कोबी गुलाबी होईपर्यंत शिजवून घेणे.
- त्यात आधी बनवलेले टोमाटोचे मिश्रण, लिंबाचा रस आणि मीठ घालुन एक मिनिट शिजवणे व नंतर थंड करणे.
- मिश्रणात मैदा, तांदुळाचे पीठ आणि चाट मसाला घालुन मिश्रण घट्ट भिजवणे. त्याचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्याला काजू लावून दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये दाबून कबाब बनवणे.
- तव्यावर दोन चमचे तेल गरम करून, कबाब दोन्ही बाजूनी गुलाबी होईपर्यंत भाजून घेणे.
टीप
मी मागच्या आठवड्यात राईस बोव्ल बनवण्यासाठी टोमाटोचे मिश्रण बनवलेले. ते इथे दिलेल्या प्रमाणाच्या दुप्पट बनवून त्यातील निम्मे वापरून उरलेले ठेवून दिलेले. फ्रीज मध्ये एकम उत्तम राहते व भाजीत वगैरे वेगळी चव देण्यासाठी खूप चांगले आहे.
0 comments:
Post a Comment