भरलेला पालक पराठा
अजॉयला पालक तोंड वाकड न करता खायला लावायचा हा अजून एक प्रयत्न ;-) खर सांगायचं तर तो तोंड वाकड तर नाही करत, मी आहे जी तोंड वाकड करते. पराठा बनवण्यासाठी थोडा वेगळेपणा म्हणून मी आतमध्ये घालायला मिश्रण बनवले.
साहित्य
३ वाटी गव्हाचे पीठ
६ वाटी पालक
२ बटाटे
१/२ चमचा जीरा
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
१ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
मीठ
तेल
तूप
कृती
- परातीत गव्हाचे पीठ, चमचाभर तेल, मीठ घालुन मऊसर भिजवणे. ३०-४० मिनिट भिजण्यासाठी ठेवून देणे.
- बटाटे कुकरमध्ये उकडून घेणे
- कढईत चमचाभर तेल गरम करून त्यात जीरा व म्हवरीची फोडणी करणे व हिंग टाकणे.
- त्यात पालक घालुन शिजवणे.
- पालकाला पाणी सुटले की त्यात तिखट, गरम मसाला आणि मीठ घालणे व सारखे ढवळत पूर्ण सुकेपर्यंत शिजवणे.
- मिक्सरमध्ये पालकाचे मिश्रण वाटून घेणे व कुस्करलेल्या बटाट्यात घालणे व लिंबाच्या आकाराचे गोळे करणे.
- पीठाचे सुद्धा गोळे करून त्यांना वाटीचा आकार देणे व त्यात बटाटा-पालक मिश्रणाचा गोळा घालुन बंद करणे.
- पराठा लाटणे व मध्यम आचेवर तव्यावर दोन्ही बाजूनी गुलाबी होईपर्यंत तेल सोडून भाजून घेणे
- पूर्ण शिजल्यावर तूप पसरवून दही आणि/किंवा लोणच्या बरोबर खायला देणे
टीप
मला मसाला किंवा कोथिंबीर वापरायची नव्हती त्यामुळे मी बटाटा वापरला. त्यानी पालकाची तीव्रता कमी झाली
0 comments:
Post a Comment