झीब्रा केक
साधारण एका वर्षापूर्वी ऑफिसमध्ये एकानी चेक बॉक्स केक बनवलाय असा मेल आलेलं. मेल मध्ये कसे बनवलंय वगैरे बरच काही लिहिलेलं पण मला इतके भांडे किंवा कार्डबोर्ड नव्हता वापरायचा त्यामुळे मग मी हा एकदम प्रसिद्ध झीब्रा केक बनवला.
साहित्य
३ वाटी मैदा
२ वाटी साखर
४ अंडी
२ वाटी दुध
२ वाटी तेल
१ चमचा व्हॅनिला ईसेन्स
८ चमचा कोको पूड
४ चमचे बेकिंग पूड
कृती
- एका भांड्यात अंडी आणि साखर घालुन फेटून घेणे.
- त्यात दुध आणि तेल २ चमचे प्रत्येकातून बाजूला ठेवून उरलेले घालुन फेटणे.
- मैदा चाळून मिश्रणात थोडा थोडा घालत फेटणे.
- त्यात व्हॅनिला ईसेन्स आणि बेकिंग पूड घालुन फेटणे
- दुसऱ्या भांड्यात ४.५ वाटी मिश्रण काढून घेणे व त्यात कोको पूड घालुन फेटणे.
- कोको पूड घातलेल्या मिश्रणात उरलेले दुध अंड तेल (२ चमचा प्रत्येकी) घालुन फेटून घेणे.
- ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
- भांड्याला लोणी लावून घेणे.
- १/४ वाटी पांढरे पीठ भांड्याच्या मध्ये ओतणे. मग १/४ वाटी कोकोचे मिश्रण मध्ये ओतावे. असे एकदा पांढरे व एकदा कोको मिश्रण घालत भांडे अर्धे भरेपर्यंत करणे. दुसऱ्या भांड्यात पुन्हा तसेच करणे.
- ओव्हनमध्ये ३५०F/१८०C वर ४० मिनिट भाजणे.
टीप
जर दोन भांड्याच्याऎवजी एका भांड्यात केक बनवायचा असेल तर १/२ वाटी एकावेळी पीठ ओतणे म्हणजे पट्टे एकदम चांगल्या आकाराचे येतील.