झीब्रा केक


साधारण एका वर्षापूर्वी ऑफिसमध्ये एकानी चेक बॉक्स केक बनवलाय असा मेल आलेलं. मेल मध्ये कसे बनवलंय वगैरे बरच काही लिहिलेलं पण मला इतके भांडे किंवा कार्डबोर्ड नव्हता वापरायचा त्यामुळे मग मी हा एकदम प्रसिद्ध झीब्रा केक बनवला.

झीब्रा केक
साहित्य
३ वाटी मैदा
२ वाटी साखर
४ अंडी
२ वाटी दुध
२ वाटी तेल
१ चमचा व्हॅनिला ईसेन्स
८ चमचा कोको पूड
४ चमचे बेकिंग पूड

कृती
  • एका भांड्यात अंडी आणि साखर घालुन फेटून घेणे.
  • त्यात दुध आणि तेल २ चमचे प्रत्येकातून बाजूला ठेवून उरलेले घालुन फेटणे.
  • मैदा चाळून मिश्रणात थोडा थोडा घालत फेटणे.
  • त्यात व्हॅनिला ईसेन्स आणि बेकिंग पूड घालुन फेटणे
  • दुसऱ्या भांड्यात ४.५ वाटी मिश्रण काढून घेणे व त्यात कोको पूड घालुन फेटणे.
  • कोको पूड घातलेल्या मिश्रणात उरलेले दुध अंड तेल (२ चमचा प्रत्येकी) घालुन फेटून घेणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
  • भांड्याला लोणी लावून घेणे.
  • १/४ वाटी पांढरे पीठ भांड्याच्या मध्ये ओतणे. मग १/४ वाटी कोकोचे मिश्रण मध्ये ओतावे. असे एकदा पांढरे व एकदा कोको मिश्रण घालत भांडे अर्धे भरेपर्यंत करणे. दुसऱ्या भांड्यात पुन्हा तसेच करणे.
  • ओव्हनमध्ये ३५०F/१८०C वर ४० मिनिट भाजणे.

टीप
जर दोन भांड्याच्याऎवजी एका भांड्यात केक बनवायचा असेल तर १/२ वाटी एकावेळी पीठ ओतणे म्हणजे पट्टे एकदम चांगल्या आकाराचे येतील.

पीनट सॉस


चिकन सातेबरोबर एकदम महत्वाचा डीप. मला हा बनवायलाच लागला कारण अजॉयला तो इतका आवडतो की तो कधी कधी चाईनीज हॉटेलमध्येपण हा सॉस मागतो.

पीनट सॉस
साहित्य
१ वाटी शेंगदाणे
२ चमचा ब्रावून शुगर
१/४ चमचा तिखट
२ चमचा सोया सॉस
१ चमचा तेल
१ लसूण पाकळी
२ चमचे लिंबाचा रस
मीठ

कृती
  • शेंगदाणे भाजून घेणे व थंड करणे.
  • शेंगदाणे, ब्रावून शुगर, तिखट, सोया सॉस, तेल, लसूण, लिंबाचा रस आणि मीठ घालुन मिक्सर मह्ये बारीक वाटणे.
  • त्यात अर्धा वाटी पाणी घालुन सॉस बारीक वाटून घेणे.

टीप
मी दुप्पट तिखट वापरलेले पण त्यामुळे खूप जास्त तिखट झालेले म्हणून मी १/४ चमचा तिखट दिले आहे. तुमच्या चवीनुसार जास्त तिखट वापरता येईल

चिकन साते


चिकन साते हि माझी थाई प्रकारची एकदम आवडती डीश. ह्या आधी जेव्हा बनवलेला तेंव्हा फोटो काढायच्या आधीच संपून गेलेले. त्यामुळे ह्यावेळी पहिल्यांदाच फोटो काढून घेतला.

चिकन साते
साहित्य
४०० ग्राम बोनलेस चिकन ब्रेस्ट
१ चमचा ब्रावून शुगर
२ लसुणाच्या पाकळ्या
१ चमचा धने पूड
१ चमचा जिरे पूड
१/४ चमचा हळद
१ चमचा मिरे पूड
२ चमचे तेल
२ चमचे सोया सॉस
२ चमचे लिंबाचा रस
१/२ वाटी दुध
मीठ

कृती
  • चिकन ब्रेस्टचे पातळ आयताकृती तुकडे करणे.
  • त्याला ब्रावून शुगर, लसुणाच्या पाकळ्या, धने पूड, जिरे पूड, हळद, मिरे पूड, तेल, सोया सॉस, लिंबाचा रस आणि मीठ लावून घेणे.फ्रीजमध्ये ४ तास ठेवणे.
  • प्रत्येक चिकनची पट्टीमध्ये काडी घालणे. प्रत्येक काडीला २ चिकनच्या पट्ट्या लावणे.
  • चिकनला थोड्या दुधामध्ये भिजवून घेणे.
  • नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर चिकन मध्यम आचेवर, प्रत्येक २-३ मिनिटांनी परतून, पूर्ण शिजेपर्यंत भाजणे

टीप
मी बऱ्याच पाककृतीमध्ये फिश सॉस घालावे असे वाचले पण थोडे फार वाचल्यावर कळले की ते खारट पाण्यासारखे असते आणि बऱ्याच वेळी मीठाऐवजी वापरले जाते. त्यामुळे फिश सॉसच्याऎवजी नेहमीचे मीठ वापरले.

चिली कोळंबी


आज मला कोळंबीचे काहीतरी लवकर बनणारे पण नेहमीच्या कोळंबी मसाल्यापेक्षा वेगळे काहीतरी बनवायचे होते. आणि मी हा पदार्थ बनवला.

चिली कोळंबी
साहित्य
३०० ग्राम कोळंबी
१ चमचा लसूण पेस्ट
१ कांदा
४ हिरव्या मिरच्या
४ चमचे सोया सॉस
२ चमचे टोमाटो सॉस
२ चमचे कॉर्न फ्लौर
मीठ
तेल

कृती
  • कोळंबीला लसूण पेस्ट आणि मीठ लावून ठेवणे.
  • तेलात तव्यावर कोळंबी १ मिनिट भाजून घेणे.
  • त्याच तेलात उभ्या कापलेल्या मिरच्या, कांदा घालुन सारखे ढवळत शिजवणे.
  • त्यात सोया सॉस, टोमाटो सॉस घालुन अजून २ मिनिट शिजवणे.
  • कोळंबी घालुन अजून एक मिनिट शिजवणे.
  • एका वाटी कॉर्न फ्लौर आणि २ वाटी पाणी घालणे व एकत्र करणे. कोळंबीमध्ये घालुन ३-४ मिनिट शिजवणे.

टीप
माझ्याकडे कांद्याची पात नव्हती त्यामुळे मी तो घातला नाही पण वरून त्याचे पाने कापून घातले तर अजून चांगले वाटेल.

गुळाचा संदेश


सरस्वती पूजेच्या दिवशी मी हि मिठाई करून बघण्याचे ठरवले. अजॉयची आवडती मिठाई. खूपच चांगला झालेला आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे कलाकंद सारखी किचकटपण नाहीये करायला. त्यामुळे त्यांनी पुन्हा काहीतरी बनवण्यास सांगितल्यास कमी कष्टाची पण खूप तारीफ देणारी हि मिठाई कधीही बनवू शकते.

गुळाचा संदेश
साहित्य
१ लिटर दुध
३/४ वाटी गुळ
२ चमचा व्हिनेगर
१/४ चमचा पिस्ता पूड

कृती
  • भांड्यात दुध उकळवणे व त्यात २ चमचा पाण्यात मिसळलेले व्हिनेगर घालणे.
  • पनीर तयार झाल्यावर लगेच गाळून थंड पाण्याखाली धुवून घेणे.
  • पंचात टांगून ५-१० मिनिट पाणी जाण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • परातीत पनीर काढून चांगले मळून घेणे. एकम मऊसर आणि एकसारखे झाले पाहिजे.
  • त्यात गुळ किसून घालणे व एकत्र करणे.
  • कढईत मिश्रण घालुन मध्यम आचेवर शिजवणे. भांड्यापासून मिश्रण सुटायला लागले व एकत्र गोळा व्हायला लागले की खाली काढणे.
  • छोटे छोटे गोळे करून त्यांना साच्यात घालुन आकार देणे. साचे नसल्यास नुसतेच पण गोळे करून ठेवता येतील.
  • पिस्ता पूड शिंपडणे व पूर्ण पणे थंड होऊ देणे.

टीप
मी नेहमीच्या गुळाऎवजी कलकत्याचे पाताली गुळ वापरले. पण नेहमीचे गुळ वापरताना मी त्यात थोडासा खजूर वाटून घालण्याचा विचार करत आहे. कारण त्या गुळाची चव खजूर आणि गुळ एकत्र केल्यासारखी लागते.
पनीर बनवताना ते दुधापासून वेगळे झाले की लगेच धुवून घेणे, जर जास्त शिजवले तर मिठाई कडक होते.
संदेशला आकार देण्यासाठी मिश्रण गरमच असायला हवे. जर ते थंड व्हायला लागले तर पुन्हा थोडेसे कोमट करून घेणे.

भरलेला पालक पराठा


अजॉयला पालक तोंड वाकड न करता खायला लावायचा हा अजून एक प्रयत्न ;-) खर सांगायचं तर तो तोंड वाकड तर नाही करत, मी आहे जी तोंड वाकड करते. पराठा बनवण्यासाठी थोडा वेगळेपणा म्हणून मी आतमध्ये घालायला मिश्रण बनवले.

भरलेला पालक पराठा
साहित्य
३ वाटी गव्हाचे पीठ
६ वाटी पालक
२ बटाटे
१/२ चमचा जीरा
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
१ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
मीठ
तेल
तूप

कृती
  • परातीत गव्हाचे पीठ, चमचाभर तेल, मीठ घालुन मऊसर भिजवणे. ३०-४० मिनिट भिजण्यासाठी ठेवून देणे.
  • बटाटे कुकरमध्ये उकडून घेणे
  • कढईत चमचाभर तेल गरम करून त्यात जीरा व म्हवरीची फोडणी करणे व हिंग टाकणे.
  • त्यात पालक घालुन शिजवणे.
  • पालकाला पाणी सुटले की त्यात तिखट, गरम मसाला आणि मीठ घालणे व सारखे ढवळत पूर्ण सुकेपर्यंत शिजवणे.
  • मिक्सरमध्ये पालकाचे मिश्रण वाटून घेणे व कुस्करलेल्या बटाट्यात घालणे व लिंबाच्या आकाराचे गोळे करणे.
  • पीठाचे सुद्धा गोळे करून त्यांना वाटीचा आकार देणे व त्यात बटाटा-पालक मिश्रणाचा गोळा घालुन बंद करणे.
  • पराठा लाटणे व मध्यम आचेवर तव्यावर दोन्ही बाजूनी गुलाबी होईपर्यंत तेल सोडून भाजून घेणे
  • पूर्ण शिजल्यावर तूप पसरवून दही आणि/किंवा लोणच्या बरोबर खायला देणे

टीप
मला मसाला किंवा कोथिंबीर वापरायची नव्हती त्यामुळे मी बटाटा वापरला. त्यानी पालकाची तीव्रता कमी झाली

कोल्ड कॉफी


सगळ्यात पहिल्यांदा मी इंस्टंट पूड वापरून कोल्ड कॉफी बनवायला चालू केलेला. माझ्या बहिणीला टी खूप आवडायची त्यामुळे कधीही कोल्ड कॉफी म्हटले की मला तिचीच आठवण येते. कोल्ड कॉफी आणि बहिण असे एक समीकरणच झालेय. आवडीबरोबरच बरेच काही प्रसंग आणि आठवणीपण आहेत. इथे आल्यापासून कॉस्कोचे डीलचे कुपन वापरून आम्ही भरपूर बाटल्या ह्या स्टारबक्स बनवते त्या पिल्या. पण थोडे दिवसांनी मला फ्रेश थंड कॉफीची फारच कमी वाटायला लागली आणि मी हि घरीच बनवायला चालू केली. मला भारतात सीमासाठी हि बनवण्याची फार इच्छा होती पण सर्दी खोकला यामुळे नाही करता आली. इथे मी पाककृती देतीये आणि अशी आशा करते की ती हि बनवेल आणि आमचे सोनेरी दिवस जेंव्हा आम्ही वेड्यासारखे कॉफीच्या मागे होतो ते आठवेल

कोल्ड कॉफी
साहित्य
४ वाटी दुध
२ वाटी व्हॅनिला आईसक्रीम
१.५ चमचा कॉफी पूड
५ चमचे साखर

कृती
  • एक वाटीभर पाणी उकळवून त्यात साखर विरघळवणे
  • त्यात कॉफी घालुन विरघळवणे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • मिक्सरमध्ये आईस्क्रीम, कॉफी आणि दुध घालुन फिरवणे.
  • चांगले फेस येई पर्यंत फिरवणे आणि थंड खायला देणे.

टीप
आईस्क्रीम वापरल्यानी कॉफी लगेच प्यायला देता येते व नंतर थंड करावी लागत नाही.

व्हेज पिझ्झा


बरेच दिवस झाले मला हा पिझ्झा बनवायचा होता. घरी बनवला की इंडिअन चव करता येते. बऱ्याच भाज्या मी माझ्या मनानी घातल्या पण चव एकदम उत्कृष्ठ होती.

व्हेज पिझ्झा
साहित्य
४ वाटी गव्हाचे पीठ
२ वाटी मैदा
२ वाटी दुध
१/४ वाटी ओलिव्ह तेल
१/४ वाटी लोणी
१/२ चमचा साखर
२.२५ चमचा यीस्ट
३ टोमाटो
२ चमचा लसूण पेस्ट
२ चमचा बेसिल
१/२ चमचा मिरे पूड
२ चमचा तिखट
३ चमचा सॉस
१ वाटी पार्मेसन चीज
२ वाटी मोझ्झारेल्ला चीज
१ वाटी पनीर
१.५ वाटी वांगे
८ भेंडी
१ वाटी स्वीटकॉर्न
मीठ
तेल

कृती
  • साखर आणि यीस्ट एक वाटी कोमट पाण्यात घालुन झाकून १० मिनिट ठेवणे. पाण्यात बुडबुडे आले पाहिजेत.
  • परातीत गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, ओलिव्ह तेल आणि वितळवलेले लोणी एकत्र करणे.
  • त्यात यीस्टचे पाणी आणि दुध घालुन मऊसर पीठ भिजवणे. काचेच्या भांड्यात झाकण किंवा प्लास्टिक लावून २ तास ठेवणे.
  • तेल गरम करून त्यात लसूण पेस्ट घालुन छान वास सुटेपर्यंत भाजणे.
  • त्यात बेसिल, मिरे पूड, तिखट, मीठ घालुन २ मिनिट शिजवणे.
  • टोमाटो वाटून त्यात घालणे. सॉसपण घालणे व पूर्ण सुकेपर्यंत शिजवणे व बाजूला ठेवणे.
  • तेलात भेंडी, पनीर, वांग्याचे तुकडे तळून घेणे. भेंडीचे देठ काढून त्याला उभी चिरावी. भाज्यांवर मीठ टाकून बाजूला ठेवणे.
  • पीठ दुप्पट झाले की त्याचे २ भाग करून पिझ्झाच्या तव्यावर पसरवणे.
  • टोमाटोचा मसाला पिझ्झावरती पसरवणे.
  • त्यावर पार्मेसन चीज, तळलेल्या भाज्या आणि स्वीटकॉर्न पसरवणे.
  • मोझ्झारेल्ला चीज पसरवणे.
  • ओव्हन ४००F/२००C वर गरम करणे.
  • पिझ्झा २५ मिनिट ४००F/२००C वर भाजणे.

टीप
भेंडी तळताना मी अख्खी देठासकट तळली त्यामुळे त्यातल्या बिया बाहेर येत नाहीत
सगळ्या भांज्याना हलका गुलाबी रंग येईपर्यंतच भाजले त्यामुळे छान लागते. जास्त भाजू नये कारण ओव्हनमध्ये भाज्या अजून शिजतात.

कोळंबीचे सॅन्डविच


सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्या. माझे नवीन वर्ष एकदम शांत होते, खूप जास्त जेट लॅगमुळे ९ वाजेपर्यंत जागणेपण मुश्कील झालेय. हि पाककृती खास आहे कारण ह्याची तयारी आदल्यावर्षी कायला चालू केली आणि पदार्थ ह्या वर्षी तयार झाला. हा मी अजॉयच्या खास मागणीवर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवला.

कोळंबीचे सॅन्डविच
साहित्य
१४-१६ ब्रेडचे तुकडे
४०० ग्राम कोळंबी
१/२ वाटी आम्बवलेली काकडी
४ चमचे दही
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा मिरे पूड
१/४ चमचा चाट मसाला
१/४ चमचा जीरा पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
१/२ वाटी लोणी
मीठ

कृती
  • दही, तिखट, हळद, धने पूड, मिरे पूड, जीरा पूड, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ एकत्र करणे.
  • कोळंबीचे बारीक तुकडे करून ते दह्याच्या मिश्रणात घालुन एकत्र करणे व फ्रीजमध्ये ४-५ तास ठेवून देणे.
  • तवा गरम करून त्यात १/४ वाटी लोणी आणि कोळंबीचे मिश्रण घालणे.
  • तेज आचेवर सारखे परतत मिश्रण सुकेपर्यंत शिजवणे.
  • सॅन्डविच बनवण्यासाठी ब्रेंडच्या तुकड्यांवर आम्बवलेली काकडी आणि शिजवलेले कोळंबीचे मिश्रण घालुन लोणी लावून ग्रील करणे.

टीप
कोळंबीचे बारीक तुकडे केल्यानी एका घासातच पूर्ण कोळंबी निघून येणार नाही.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP