भोपळा आणि बदामाचा कप केक
थोड्या दिवसांपूर्वी मी खतखते बनवण्यासाठी भोपळा शोधत होते. कुठेच न मिळाल्यानी शेवटी एका ठिकाणचा डब्ब्यातला भोपळा आणलेला. पण तो उघडला तर लक्षात आले की भोपळ्याची पेस्ट आहे आणि मला तुकडे हवे होते. मग थोड्यावेळ शोधल्यावर कप केक बनवता येतील असे लक्षात आले. इथे माझ्या कप केकची कृती देत आहे. केक भाजताना इतका सुंदर वास सुटलेला की कधी एकदा तयार होतो आणि कधी खाते अस झालेलं.
साहित्य
२ वाटी भोपळ्याची पेस्ट
३ वाटी मैदा
१ वाटी लोणी
१.५ वाटी ब्राऊन शुगर
१/२ वाटी पिठी साखर
२ चमचा बेकिंग पूड
१/२ चमचा बेकिंग सोडा
१/२ वाटी दुध
१/२ चमचा दालचिनी पूड
१/२ चमचा लवंग पूड
१/२ चमचा जायफळ पूड
१/४ वाटी बदामाचे तुकडे
१/२ चमचा पिस्ता इसेन्स
२ अंडी
कृती
- मैदा, बेकिंग पूड, बेकिंग सोडा एकत्र ३-४ वेळा चाळून घेणे.
- त्यात दालचिनी पूड, लवंग पूड आणि जायफळ पूड घालुन एकत्र करणे.
- एका भांड्यात लोणी, ब्राऊन शुगर, पिठी साखर एकत्र फेटणे.
- त्यात एकावेळी एक अंडे घालुन चांगले फेटणे.
- थोडे थोडे मैद्याचे मिश्रण घालुन एकत्र करत सगळे मिश्रण चांगले एकत्र करणे.
- त्यात दुध घालुन ढवळणे.
- भोपळ्याची पेस्ट, पिस्ता इसेन्स घालुन ढवळणे.
- बदामाचे तुकडे थोडे बाजूला ठेवून उरलेले एकत्र करणे.
- ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
- कप केकच्या ट्रेला लोण्याचा हात लावून त्यात ३/४ लेव्हल पर्यंत मिश्रण ओतणे व वरून बद्दल लावणे.
- ओव्हन मध्ये ३५०F/१८०C वर २० मिनिट भाजणे.
टीप
ताजा भोपळा वापरायचा असेल तर त्याला उकडून मिक्सरमध्ये वाटून घेणे.
साधारण १६ मध्यम आकाराचे कप केक बनतील