भोपळा आणि बदामाचा कप केक


थोड्या दिवसांपूर्वी मी खतखते बनवण्यासाठी भोपळा शोधत होते. कुठेच न मिळाल्यानी शेवटी एका ठिकाणचा डब्ब्यातला भोपळा आणलेला. पण तो उघडला तर लक्षात आले की भोपळ्याची पेस्ट आहे आणि मला तुकडे हवे होते. मग थोड्यावेळ शोधल्यावर कप केक बनवता येतील असे लक्षात आले. इथे माझ्या कप केकची कृती देत आहे. केक भाजताना इतका सुंदर वास सुटलेला की कधी एकदा तयार होतो आणि कधी खाते अस झालेलं.

भोपळा आणि बदामाचा कप केक
साहित्य
२ वाटी भोपळ्याची पेस्ट
३ वाटी मैदा
१ वाटी लोणी
१.५ वाटी ब्राऊन शुगर
१/२ वाटी पिठी साखर
२ चमचा बेकिंग पूड
१/२ चमचा बेकिंग सोडा
१/२ वाटी दुध
१/२ चमचा दालचिनी पूड
१/२ चमचा लवंग पूड
१/२ चमचा जायफळ पूड
१/४ वाटी बदामाचे तुकडे
१/२ चमचा पिस्ता इसेन्स
२ अंडी

कृती
  • मैदा, बेकिंग पूड, बेकिंग सोडा एकत्र ३-४ वेळा चाळून घेणे.
  • त्यात दालचिनी पूड, लवंग पूड आणि जायफळ पूड घालुन एकत्र करणे.
  • एका भांड्यात लोणी, ब्राऊन शुगर, पिठी साखर एकत्र फेटणे.
  • त्यात एकावेळी एक अंडे घालुन चांगले फेटणे.
  • थोडे थोडे मैद्याचे मिश्रण घालुन एकत्र करत सगळे मिश्रण चांगले एकत्र करणे.
  • त्यात दुध घालुन ढवळणे.
  • भोपळ्याची पेस्ट, पिस्ता इसेन्स घालुन ढवळणे.
  • बदामाचे तुकडे थोडे बाजूला ठेवून उरलेले एकत्र करणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
  • कप केकच्या ट्रेला लोण्याचा हात लावून त्यात ३/४ लेव्हल पर्यंत मिश्रण ओतणे व वरून बद्दल लावणे.
  • ओव्हन मध्ये ३५०F/१८०C वर २० मिनिट भाजणे.

टीप
ताजा भोपळा वापरायचा असेल तर त्याला उकडून मिक्सरमध्ये वाटून घेणे.
साधारण १६ मध्यम आकाराचे कप केक बनतील

गाजराचा पराठा


आज काहीतरी सोप्पे पण नवीन रात्रीच्या जेवणात बनवायचे होते. पराठा बनवण्याचे ठरवले पण नेहमीचा न करता काहीतरी वेगळा बनवण्याच्या विचारांनी मी हा पराठा बनवला.

गाजराचा पराठा
साहित्य
१.५ बटाटा
२ वाटी किसलेले गाजर
२.५ वाटी गव्हाचे पीठ
१ चमचा तिखट
३/४ चमचा धने पूड
१/४ चमचा ओवा
१/२ लिंबू
मीठ
तेल
तूप

कृती
  • गव्हाचे पीठ, मीठ आणि २ चमचे तेल घालुन एकत्र करणे.
  • पाणी घालुन पीठ भिजवणे आणि तेलाचा हात लावून अर्धा ते एक तास भिजायला ठेवून देणे.
  • बटाटे उकडून थंड करणे.
  • कुस्करलेले बटाटे आणि किसलेले गाजर एकत्र करणे.
  • त्यात तिखट, मीठ, धने पूड, ओवा आणि लिंबाचा रस घालुन एकत्र करणे.
  • पीठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करणे. गजराच्या मिश्रणाचे सुद्धा त्याच आकाराचे गोळे करणे.
  • पिठाच्या गोळ्याची वाटी करून त्यात गाजराचा गोळा घालुन बंद करणे.
  • भरलेला पराठा अलगद पणे लाटून, मध्यम आचेवर तव्यावर दोन्ही बाजूनी गुलाबी होईपर्यंत तेल सोडून भाजणे.
  • तूप लावून दही आणि लोणच्याबरोबर वाढणे.

टीप
पूर्णपणे तुपावर भाजण्याऎवजी मला पराठा भाजताना तेलावर भाजून मग एकदम शेवटी थोडेसे तूप सोडायला जास्त आवडतो

व्हेरी बेरी केक


इथे सध्या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बेरी मिळतात की मी असा काहीतरी केक बनवण्याचे ठरवले.

व्हेरी बेरी केक
साहित्य
३ वाटी मैदा
४ चमचे बेकिंग पूड
२ अंडी
१ वाटी लोणी
१ वाटी साखर
३/४ वाटी दुध
२ वाटी रासबेरी
२ वाटी ब्लूबेरी
३/४ वाटी ब्लॅकबेरी
६-८ स्ट्रॉबेरी
मीठ

कृती
  • लोणी आणि साखर एकत्र चांगले फेटून घेणे.
  • त्यात अंडी घालुन घट्ट होईपर्यंत फेटणे
  • मैदा आणि बेकिंग पूड एकत्र चाळून घेणे व त्यात मीठ घालणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
  • अंड्याच्या मिश्रणात थोडे थोडे मैद्याचे मिश्रण घालुन फेटणे.
  • मिश्रणात दुध घालुन ढवळणे.
  • सगळ्या बेरी मिश्रणात घालणे. (मी सगळ्या बेरी अख्या वापरल्या, फक्त स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घातले)
  • केक भाजायच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात मिश्रण ओतणे. केक ३५०F/१८०C वर ३५ मिनिट भाजणे.

टीप
मी साखर मिक्सर मध्ये वाटून घेतली त्यामुळे ती पटकन वितळते.
सगळ्या बेरी फ्रीजमधून लगेच वापरल्या त्यामुळे जास्त भाजल्या नाही जात.
फ्रोझन बेरी पण वापरता येतील. मी सुद्धा पुढच्यावेळी बेरी फ्रीजर मध्ये ठेवून तश्याच वापरून बघणार आहे.
मी केक मध्ये सॉलटेड मीठ वापरले आणि वरून मीठ पण घातले त्यामुळे मीठ जरा जास्त लागत होत. जर सॉलटेड मीठ वापरत असेल तर वरून मीठ घालू नये.

कॉर्न सिख कबाब


इथे खूप सारे कणीस मिळतात. नेहमी आम्ही त्याला भाजुल लिंबू आणि तिखट मीठ लावून खातो पण ह्यावेळी मी जरा वेगळे काहीतरी करण्याचे ठरवले.

कॉर्न सिख कबाब
साहित्य
४ कणीस
२ बटाटे
४ चमचे कॉर्न फ्लौर
६ लसूण पाकळ्या
२ हिरव्या मिरच्या
१ कांदा
१/४ वाटी कोथिंबीर
मीठ
लोणी/तूप

कृती
  • कणीस आणि पाणी एकत्र करून साधारण २५ मिनिट उकळवणे. कणीस थंड करणे.
  • बटाटे उकडून थंड करणे.
  • मिक्सर मध्ये लसूण, मिरची आणि कांदा वाटून घेणे.
  • कणीस आणि बटाटे किसून एकत्र करणे.
  • त्यात वाटण, कोथिंबीर, कॉर्न फ्लौर आणि मीठ घालुन मळणे.
  • लांबट आकाराचे कबाब बनवणे.
  • ओव्हन ४००F/२००C वर गरम करणे.
  • बेकिंग ट्रेला लोणी किंवा तुपाचा हात लावून त्यावर कबाब ठेवणे.
  • ओव्हनमध्ये ४००F/२००C वर १५ मिनिट भाजणे.
  • सगळे कबाब परतवून अजून १५ मिनिट भाजणे

टीप
मी मिश्रण बनवताना कमीत कमी मसाले वापरून कणीसाची चव शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला.
कबाब तव्यावर मध्यम आचेवर भाजत येतील पण मी ओव्हन वापरल्यानी त्या वेळात मी दुसरी कामे करू शकले.

अननसाचा मुरंबा


मागच्या महिन्यात आम्ही एक मोठा अननस आणलेला. मला आईचा मुरंबा आठवला. लगेच आईला फोन केला आणि तेंव्हा कळले की बनवायला किती सोप्पा आहे ते. मी त्याच रात्री बनवून टाकला.

अननसाचा मुरंबा
साहित्य
५ वाटी अननस
३ वाटी पाणी
१.५ वाटी साखर

कृती
  • अननस पाण्यात बुडेल इतके पाणी घालुन मध्यम आचेवर झाकण लावून शिजवावा.
  • अननस गाळून पाणी वेगळे करणे.
  • त्याच पाण्यात साखर घालुन उकळी आणणे. मध्यम आचेवर सारखे ढवळत एक तारी पाक बनवणे.
  • त्यात शिजवलेला अननस घालुन अजून एकदा उकळी आणणे.
  • थंड करून फ्रीजमध्ये ठेवणे.

टीप
मुरंबा फ्रीजमध्ये ठेवावा म्हणजे थोडे महिने चांगला राहतो.
चपाती किंवा पराठ्याबरोबर एकदम छान लागतो
मला फार जास्त पाक आवडत नाही त्यामुळे वरच्या प्रमाणात कमी गोड व कमी पाक होतो. त्यात अजून १ वाटी पाणी आणि अर्धा वाटी साखर घालुन जास्त पाक बनवता येईल.

आलू गोबी


अजॉयला फ्लॉवर फार आवडतो मग आज काहीतरी वेगळा प्रकार म्हणून मी हि भाजी बनवली

आलू गोबी
साहित्य
२ बटाटे
१ फ्लॉवर
१/२ चमचा म्हवरी
१ चमचा जीरा
१ चमचा जिरे पूड
१ चमचा धने पूड
१ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
१/४ चमचा पिठी साखर
कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • बटाट्याची साले काढून त्याचे तुकडे करणे.
  • फ्लोवारचे मध्यम आकाराचे तुकडे करणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात जिरे व म्हवरीची फोडणी करणे.
  • त्यात बटाटा आणि फ्लॉवर घालुन मध्यम आचेवर सारखे ढवळत शिजवणे.
  • शिजण्यासाठी ५ मिनिट राहिली असताना त्यात हळद घालणे
  • पूर्ण शिजल्यावर त्यात धने पूड, जिरे पूड, तिखट, गरम मसाला, पिठी साखर आणि मीठ घालुन ढवळणे.
  • वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवणे.

टीप
एकदम साधा आणि सोपा प्रकार चवीला टोमाटोच्या फ्लॉवरपेक्षा एकदम मस्त लागतो. भाजी सुकी असल्यानी फुलके किंवा पराथ्यांबरोबरच चांगली लागते.

कुरकुरीत इंडिअन हॅश ब्राऊन


मी २-३ आठवड्यांपूर्वी हे बनवलेले पण आज पोस्ट करत आहे. एकदम कुरकुरीत आणि चाविस्था पदार्थ

कुरकुरीत इंडिअन हॅश ब्राऊन
साहित्य
२ बटाटे
१ हिरवी मिरची
१/४ वाटी पिकल्ड काकडी
चिमुटभर मिरे पूड
मीठ
तूप

कृती
  • बटाटे किसून पाण्यात चांगले धुवून घेणे.
  • पाणी निथळवून पेपर वर सुकण्यासाठी पसरवणे.
  • सुकवलेला बटाटा कीस, हिरव्या मिरच्या, पिकल्ड काकडी, मिरे पूड आणि मीठ सगळे एकत्र करणे.
  • तवा गरम करून त्यावर तूप सोडणे.
  • बटाटा तव्यावर पातळ पसरवणे.
  • मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी गुलाबी होईपर्यंत भाजणे.

टीप
मी मध्यम किसणीवर बटाटे किसले आणि त्यामुळे एकदम छान कुरकुरीत हॅश ब्राऊन झाले. जर जाड किसले तर कुरकुरीत होणे मुश्कील आहे.
हिरव्या मिरचीमुळे एकदम छान तिखट चव येते.

भेळ


भेळ हा माझा आवडीचा चटपट पदार्थ. खासकरून पिकनिकसाठी. लवकर बनणारा सोपा आणि चविष्ठ पदार्थ.

भेळ
साहित्य
६ वाटी चुरमुरे
२ वाटी फरसाण
१ वाटी शेव
१ वाटी बुंदी
१ वाटी नवरत्न मिश्रण
१.५ वाटी चिंच
२ वाटी गुळ
२ हिरवी मिरची
१ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
४-५ खजूर
२ कांदे
२ टोमाटो
१/२ वाटी कोथिंबीर
मीठ

कृती
  • चिंच आणि खजूर पाण्यात एक तास भिजवणे.
  • भिजलेले चिंच खजूर, गुळ, तिखट, हिरवी मिरची, जिरे पूड आणि मीठ घालुन मिक्सरमध्ये वाटणे.
  • मिश्रण गाळून घेणे.
  • एका भांड्यात चुरमुर, फरसाण, शेव, नवरत्न मिश्रण, चिरलेला कांदा, टोमाटो आणि कोथिंबीर एकत्र करणे.
  • त्यात चिंचेचे मिश्रण घालुन चांगले ढवळणे.
  • वरून बुंदी आणि शेव घालुन खायला देणे.

टीप
कैरीच्या दिवसात बारीक चिरून कैरीपण घालता येईल
मी नेहमी चिंचेचे थोडे पाणी वेगळे ठेवते त्यामुळे प्रत्येकाच्या चवीनुसार ते वरून थोडे घेऊ शकतात
सगळे चिरून ठेवल्यास फक्त एकत्र करण्याचे काम राहते, पार्टी आणि पिकनिकसाठी एकदम उत्तम

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP