खोबऱ्याचे नाडू


मी पाटीशाप्ता बनवलेले तेंव्हा त्याचे खोबऱ्याचे मिश्रण जास्त केलेले आणि मी त्याचे मोदक बनवण्याचा विचार करत होते पण अजॉयनी हे छोटे लाडू - नाडू बनवायला सांगितले.

खोबऱ्याचे नाडू
साहित्य
१ वाटी गुळाचे तुकडे
१/२ वाटी गुळ
१/२ वाटी खोबरे

कृती
  • गुळाचे तुकडे १.५ मिनिट मायक्रोवेव्ह करणे.
  • कढईमध्ये तो गरम केलेला गुळ, उरलेला गुळ किसून आणि खोबरे घालणे व सारखे ढवळत शिजवणे.
  • मिश्रण एकसंध गोळा बनून आल्यावर त्याचे छोटे छोटे लाडू बनवणे

टीप
हे लाडू मस्त कॅरॅमेल सारखे कुरकुरीत लागतात. नेहमीचे लाडू मऊ असतात पण मला हे असे कुरकुरीत जास्त आवडतात. ते मायक्रोवेव्ह मध्ये गुळ गरम केल्यानी असे बनतात. मला ते गॅसवर कसे बनवायचे माहित नाही त्यामुळे जर कोणाला माहिती असेल तर सांगणे.

पाटीशाप्ता


मा हे खूपवेळा बनवतात. मी नेहमी हे बनवण्याचा विचार करते पण आज बनवण्याचा मुहूर्त लागला

पाटीशाप्ता
साहित्य
१ वाटी खोबरे
१/२ वाटी गुळ
१ वाटी रवा
१/२ वाटी + थोडासा मैदा
१ चमचा इडली रवा
१ चमचा साखर
दुध
तेल

कृती
  • किसलेले खोबरे आणि गुळ कढईत शिजवून बाजूला ठेवणे.
  • एका भांड्यात रवा, इडली रवा, मैदा, साखर आणि दुध एकत्र करून पातळ पीठ भिजवणे.
  • तवा गरम करून त्यावर एखाद थेंब तेल सोडणे.
  • भिजवलेल्या पीठाचे छोटे घावन काढणे व जेव्हा दोन्ही बाजूनी शिजेल तेंव्हा त्यावर गुळाचे मिश्रण ठेवून गुंडाळणे

टीप
मी पीठ भिजवून ५-१० मिनिट बाजूला ठेवले त्यामुळे रवा पूर्ण भिजतो आणि पीठ जाड होते. १/२ चमचा पाणी मी दर २-३ घावानानंतर घालुन पीठ बरोबर करत होते

कॉर्न पराठा


बरेच दिवस झाले मी नवीन पराठ्याचा प्रकार बनवून. काल मी पुदिना किंवा कॉर्न वापरून पराठा बनवण्याचा विचार करत असताना कॉर्न पराठ्याची कृती मिळाली, मी त्याला थोडी बदलून हा पराठा बनवलाय

कॉर्न पराठा
साहित्य
१ वाटी कॉर्न
१ वाटी गव्हाचे पीठ
१/८ वाटी मैदा
१ बटाटा
४ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा हळद
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा साखर
२ चमचे कॉर्न फ्लौर
१ वाटी कोथिंबीर
१/४ वाटी पुदिना
१ चमचा चाट मसाला
मीठ
तेल

कृती
  • मैदा, गव्हाचे पीठ आणि एक चमचा तेल एकत्र करून पराठ्यासाठी पीठ भिजवणे.
  • कॉर्न बारीक वाटून घेणे.
  • बटाटे कुकरमध्ये उकडून घेणे.
  • कढईत ३-४ चमचे तेल गरम करून त्यात बारीक वाटलेली हिरवी मिरची, हळद आणि आले पेस्ट घालणे व परतणे.
  • त्यात साखर, मीठ आणि कॉर्न फ्लौर घालुन अजून थोडा वेळ शिजवणे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • मिश्रण थंड झाल्यावर त्यात वाटलेले कॉर्न, किसलेला बाटतात, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि चाट मसाला घालणे.
  • पराठ्याच्या पीठाचे २ गोळे घेवून ते वाटीच्या आकाराचे लाटणे.
  • त्यावर कॉर्नच्या मिश्रणाचा गोळा ठेवून दुसरी पोळी ठेवणे व घट्ट बंद करणे.
  • पराठा लाटून तव्यावर तेल लावून गुलाबी रंगावर भाजणे.

टीप
पराठा भाजताना मी पहिल्यांदा दोन्ही बाजू तेलाशिवाय अर्ध्या भाजल्या आणि मग थोडेसे तेल लावून भाजल्या त्यामुळे पराठा एकदम हलका होतो
मी जी कृती वाचलेली त्यात त्यानी १/४ वाटी सुके खोबरे पण वापरलेले पण माझ्याकडे ते नव्हते आणि मला ते फार काही आकर्षक वाटले नसल्यानी मी नाही वापरले.

मुगाची डाळ


सगळ्या डाळीमध्ये हि डाळ आमच्या जेवणात जास्त असते कारण करायला सोप्पी आणि सगळ्यात आवडीची. आधी कधीच हि कृती पोस्ट करण्याचा विचार आला नाही पण माझ्या वाहिनीच्या काकांनी आमच्या कडे आल्यावर ह्या डाळीचे इतके कौतुक केले की मी हि कृती पोस्ट करण्याचा विचार केला. माझ्या आई बाबांना पण ह्या डाळीची चव आणि वास फार आवडतो

मुगाची डाळ
साहित्य
३/४ वाटी मुंग डाळ
१ कांदा
३ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा हळद
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा जिरे
१/२ चमचा म्हवरी
४ चमचा तूप
मीठ

कृती
  • डाळ कुकरमध्ये ४ शिट्ट्या काढून शिजवणे.
  • कढईत तूप गरम करून त्यात जिरे आणि म्हवरीची फोडणी करणे.
  • त्यात कांदा घालुन त्याचा वास जाईपर्यंत शिजवणे.
  • त्यात लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हळद घालुन १-२ मिनिट परतणे
  • शिजवलेली डाळ घालुन ढवळणे व त्यात थोडे पाणी घालुन उकळी आणणे.

टीप
मी कधी कधी ह्यात सुक्या लाल मिरचीचे तुकडे पण फोडणीत घालते. त्यामुळे डाळ दिसायला एकदम आकर्षक होते आणि चव पण छान येते
वरून कोथिंबीर पण घालता येईल

फ्लॉवरचे लॉलीपॉप


अजॉय फ्लॉवर फार वेळा आणतो त्यामुळे त्याचे काहीतरी नवनवीन करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. थोड्या दिवसांपूर्वी मी चिकन लॉलीपॉपची कृती वाचत होते आणि मग मी तसेच फ्लॉवरचे बनवायचे ठरवले.

फ्लॉवरचे लॉलीपॉप
साहित्य
१ छोटा फ्लॉवर
२ चमचे बेसन
१ चमचा कॉर्न फ्लौर
१ चमचा तांदुळाचे पीठ
१ चमचा रवा
१/२ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/२ चमचा गरम मसाला
मीठ
तेल

कृती
  • फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुकडे करणे.
  • बेसन, कॉर्न फ्लौर, तांदुळाचे पीठ, रवा, हळद, तिखट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला एकत्र करणे.
  • त्यात मीठ आणि पाणी घालुन जाड पीठ भिजवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यातील चमचाभर तेल पिठात घालणे.
  • फ्लॉवरचे तुकडे पिठात भिजवून गुलाबी रंगावर तळणे व देठाला अल्युमिनियम फॉइल लावून खायला देणे.

टीप
मी पिठात थोडासा लाल रंग घातला कारण तिखटानी पुरेसा लाल रंग येत नाही

डूबती टायटॅनिक


मागच्या रविवारी मला ब्लॅक फॉरेस्ट केक बनवायचा होता पण माझ्याकडे केक बेक करण्यासाठी चांगले काचेचे भांडे नव्हते. साधारण १२ वाजता मी काचेचे भांडे घेण्यसाठी शोधाशोध चालू केली ती शेवटी रात्रीच्या १० वाजता संपली. आठवड्यातील दिवस फार कामाचे असल्यानी मला वेळ नाही मिळाला पण आज सकाळच्या नाश्त्यानंतर मी पहिल्यांदा केक बनवायला चालू केले. मी दोन्ही केक बनवले पण क्रीम इतके पातळ होते की ते केकवर घालताच खाली पडायला लागेले. अजॉयनी ताटलीत पडलेले क्रीम केकवर घालत राहणे चालू ठेवले आणि त्याचा निर्धार म्हणून हा प्रयोग वेगळाच पण चविष्ठ झाला.

डूबती टायटॅनिक
साहित्य
३/४ वाटी मैदा
२ चमचे कोको पूड
१ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा खाण्याचा सोडा
१/२ वाटी + ४ चमचे पिठी साखर
१/४ वाटी दुध
१ चमचा लोणी
२ अंडी
१/४ चमचा व्हॅनिला इसेन्स
१/२ वाटी फ्रेश क्रीम
१ मध्यम आकाराची कॅडबरी
१/४ वाटी टीनड चेरी
२ चमचे चेरीचा पाक
चिमुटभर मीठ

कृती
  • मैदा, कोको पूड, बेकिंग पूड, खाण्याचा सोडा आणि मीठ एकत्र ८-१० वेळा चाळून घेणे.
  • दुध उकळून त्यात लोणी घालणे.
  • केकच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यावर बटर पेपर लावून तयार करून ठेवणे.
  • ओव्हन २००C वर गरम करणे.
  • अंड्याचे पिवळे आणि पांढरे वेगळे करणे.
  • अंड्याचे पांढरे घट्ट होईपर्यंत फेटणे.
  • अंड्याच्या पिवळ्यात १/२ वाटी पीठ साखर चमचा चमचा एका वेळी घालत एकत्र करणे.
  • त्यात चाललेले मैद्याचे मिश्रण थोडे थोडे घालणे व नंतर व्हॅनिला इसेन्स घालणे.
  • अंड्याचे पांढरे घालुन एकत्र करणे.
  • त्यात दुध आणि लोण्याचे मिश्रण घालुन एकत्र करणे.
  • केकच्या भांड्यात मिश्रण ओतून केक मायक्रोवेव्ह आणि कन्व्हेक्शन मोड मध्ये १८०W १८०C वर १५ मिनिट भाजणे व थंड करण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • क्रीम आणि ४ चमचे साखर एकत्र फेटणे.
  • कॅडबरी किसून बाजूला ठेवणे.
  • केक उभा कापून त्यावर चेरीचा पाक लावणे.
  • अर्धे क्रीम, निम्म्या चेरी आणि निम्मी किसलेली कॅडबरी एका केकच्या भागावर लावणे व त्यावर दुसरा केकचा तुकडा ठेवणे.
  • त्यावर उरलेले क्रीम, चेरी आणि कॅडबरी घालणे. जर क्रीम ताटलीत आले तर ते पुन्हा केकवर ओतणे.

टीप
मी केक ओव्हल आकाराचा बनवलेला त्यामुळे तो दुबत्या बोटीसारखा दिसत होता
दुध आणि अंड्याचे पांढरे एकत्र करताना एकदम हळूहळू एकत्र करणे

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP