काजू कतली
मी हे बरेच दिवसांपासून बनवण्याचा विचार करत होते. साधारण २ वर्षांपूर्वी दिवाळीला आई बाबा इथे असताना बनवलेले. त्यानंतर मी त्याविषयी विसरूनच गेलेले. २-३ आठवड्यांपूर्वी अजॉयनी काजू कतली बनवायची मागणी केल्यावर मला तर भीती होती कि आधीच मी सगळ विसरूनच गेले असेन पण आईला पाठवलेल्या कच्या नोट्समध्ये माहिती मिळाल्यानंतर ह्यावेळी एकदम छान झालेले. ह्यावेळी फोटो काढायला पण विसरले नाही त्यामुळे हि कृती लिहायला काही कमी नाहिये. माझ्यामते हि सगळ्यात सोपी आणि खूप वाहवा देणारी दमदार कृती आहे.
साहित्य
६ वाटी काजू
१ वाटी दुध पूड
२ वाटी साखर
चिमुटभर वेलची
चांदीचा वर्ख
कृती
- काजू मिक्सरमध्ये बारीक वाटून पूड करणे
- काजू पूड आणि दुध पूड एकत्र करणे
- तवा चांगला गरम करणे व आचेवरून बाजूला काढणे
- काजू पूड आणि दुध पूड तव्यावर घालून कोमट होईपर्यंत चांगले एकत्र करणे व नंतर भांड्यात काढणे
- १.५ वाटी पाणी आणि साखर एकत्र गरम करून २ तारी पाक बनवणे
- वेलची पूड आणि पाक काजू मिश्रणामध्ये घालून चांगले ढवळणे व नंतर माळून गोळा बनवणे
- बेकिंग तवा किंवा ताटलीवर बटरपेपर ठेवून त्यावर हे मिश्रण घालून जोरात थापून पसरवणे
- त्यावर चांदीचा वर्ख लावून २-३ तास थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
- काजू कतली कापून खायला देणे
टीप
साखरेचा पाक बरोबर बनवणे आणि चांगले मळणे यशस्वी होण्यासाठी महत्वाचे आहे
मिश्रण पसरवताना चांगले जोरात ठोकून पसरवल्यानी काजू कतली एकदम चांगली सेट होते