मटार कचोरी


मां हे एकदम मस्त बनवतात आणि नेहमी पुण्याला गेल्यावर मी त्यांना करायला सांगते. बरेच दिवस झाले त्यांच्याकडून हि पाककृती घेऊन, आणि मी एकदा बनवलेली पण. कारण तेंव्हा त्या बनवतात तितकी चांगली नव्हती झाली मी लिहिली नाही. पण आज जेंव्हा ती एकदम मस्त बनली मी लगेच देत आहे.

मटार कचोरी
साहित्य
२ वाटी मैदा
१ वाटी गव्हाचे पीठ
१ बटाटा
३ वाटी मटार
१/४ चमचा जिरे
१/२ चमचा तिखट
तेल
मीठ

कृती
  • मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि १/२ चमचे तेल एकत्र करणे.
  • त्यात पाणी घालुन पीठ मळून घेणे व भिजण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • बटाटे उकडून घेणे.
  • मटार पाण्यात घालुन २ मिनिट मायक्रोवेव्ह करून घेणे.
  • मटार मधून पाणी काढून टाकून मिकसर मध्ये वाटणे.
  • बटाटे थंड झाल्यावर किसून घेणे.
  • कढईत १ चमचा तेल घालुन त्यात जिरे घालुन फोडणी करणे.
  • त्यात किसलेले बटाटे, वाटलेले मटार, तिखट आणि मीठ सुका गोळा होईपर्यंत शिजवणे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • भिजवलेल्या पिठाचा लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन वाटी बनवणे. त्यात निम्या आकाराचा बटाटा-मटारचा गोळा घालुन बंद करणे.
  • पुरीसारखे लाटून गरम गरम तेलात भाजून घेणे.

टीप
भिजवलेले पीठ जास्त घट्ट किंव्हा सैल नसावे अथवा मटार-बटाटा गोळा बंद करण्यास कठीण होऊ शकते.
पुरी लाटताना नेहमीच्या पुरीपेक्षा किंचित जाड असावी.

खजूर अक्रोड चॉकलेट ब्रावनी


थोड्या आठवड्यापूर्वी मी कॉस्टकोमधून अक्रोड आणि चॉकलेट चीप आणलेले. आज जेंव्हा मागच्या आठवड्याचे पायेश संपत आल्यावर मी हि ब्रावनी बनवण्याचे ठरवले. आठवड्यासाठी म्हणून केलेले हे ब्रावनी इतके छान झाले की ते सोमवारपर्यंतसुधा पुरतात की नाही अशी आशंका आहे.

खजूर अक्रोड चॉकलेट ब्रावनी
साहित्य
८०ग्राम डार्क चॉकलेट बार
१.५ वाटी सेमी स्वीट चॉकलेट चीप
३ वाटी पिठी साखर
१.५ वाटी मैदा
१ वाटी लोणी
१ वाटी खजूर
१ वाटी अक्रोड
३ अंडी
१ चमचा व्हॅनिला ईसेन्स
मीठ चवीपुरते

कृती
  • एका काचेच्या भांड्यात डार्क चॉकलेट, १/२ वाटी सेमी स्वीट चॉकलेट चीप आणि लोणी घालुन १ मिनिट मायक्रोवेव्ह करून चांगले एकत्र करणे.
  • अजून २० सेकंद मायक्रोवेव्ह करून ढवळणे.
  • मैदा दोनदा चाळून घेणे.
  • ओव्हन ३७५F/१९०C वर गरम करणे.
  • एका मोठ्या भांड्यात अंडी, पिठी साखर, व्हॅनिला ईसेन्स घालुन ५ मिनिट फेटून घेणे.
  • त्यात आधी बनवलेली चॉकलेट पेस्ट, चाळलेला मैदा आणि मीठ घालुन हलक्या हातानी एकजीव होईपर्यंत एकत्र करणे.
  • केकच्या मिश्रणात उरलेले १ वाटी चॉकलेट चीप, खजूर आणि अक्रोड कापून घालणे व एकत्र करणे.
  • केकच्या भांड्याला लोण्याचा हात लावून त्यात मिश्रण ओतणे व ३७५F/१९०C वर ३५ मिनिट भाजणे.
  • ब्रावनीवर आईस्क्रीम, चॉकलेट सॉस व अक्रोड घालुन खायला देणे.

टीप
मी चॉकलेट वितळवण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करते आणि त्यामुळे किचकट काम एकदम सोपे होऊन जाते पण मायक्रोवेव्ह नसल्यास एका भांड्यात पाणी गरम करून त्यावर चॉकलेटचे भांडे ठेवून पण चॉकलेट वितळवता येईल.

अख्या मसाल्याचा व्हेज पुलाव


मला मिरे फार आवडतात फक्त पूड नाही तर पापडत असतात तसे तुकडे सुद्धा. इथे आल्यापासून आम्ही गार्लिक पापडच खातोय कारण अजॉयला तोच आवडतो आणि मला दोन प्रकारचे पापड खायला द्यायला कंटाळा येतो. म्हणूनच मिरे खाण्यासाठी मी हि पाककृती तयार केली :)

अख्या मसाल्याचा व्हेज पुलाव
साहित्य
२.५ वाटी तांदूळ
२ वाटी फ्लॉवर
२ कच्ची केळी
१ मध्यम आकाराचे वांगे
१ बटाटा
१ वाटी मटार
१/२ चमचा मिरे
१/२ चमचा जीरा
४-५ लवंग
४-५ वेलची
चिमुटभर केशर
मीठ
तेल
तूप

कृती
  • एका भांड्यात पाणी उकळवून त्यात तांदूळ घालुन भात तयार व्हायच्या थोडावेळ आधी शिजवणे.
  • उरलेले पाणी काढून टाकून भात बाजूला ठेऊन देणे.
  • कढईमध्ये तेल तापवून त्यात फ्लॉवर, वांग्याचे तुकडे आणि कच्या केळ्यांचे तुकडे घालुन भाजून घेणे.
  • मटार भाजून त्यांना पण बाजूला ठेवणे.
  • बटाटा किसून थोडा थोडा एकत्र करून भाजून घेणे
  • कढईमध्ये तूप घालुन त्यात लवंग, वेलची, मिरे, जीरा घालुन फोडणी करणे.
  • त्यात भात, फ्लॉवर, वांग्याचे आणि केळ्यांचे तुकडे घालणे. एकत्र करून २-३ मिनिट वाफ काढणे.
  • एक चमचा गरम करून त्यावर केशर चुरून भाजणे. केशर भातात मिसळणे
  • मीठ घालुन भात एकत्र करणे व अजून १ मिनिट वाफ काढणे. वाढताना वरून तळलेले मटार व बटाटे घालुन खायला देणे.

टीप मला भात पांढरा ठेवून त्याला केशराचा वास द्यायचा होता म्हणून मी भात शिजवताना केशन न घालता शेवटी घातले. आधी सांगितल्याप्रमाणे मला मिरे फार आवडत असल्यानी मी खूप घातले आणि लवंग आणि वेलची जास्त वापरले नाही कारण मला ते फार जास्त आवडत नाहीत :) मुळ हे की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाल्यांचा प्रमाण बदलू शकतात.वर दिलेल प्रमाण माझ्या चवीसाठी एकदम बरोबर होते आणि आता मी हा पुलाव दुपारच्या जेवणात खातीये. यमी!

रवा डोसा


मी पहिल्यांदा कॉलेजच्या समोरच्या दुकानात जेंव्हा रवा डोसा खालेला तेंव्हापासूनच तो माझ्या आवडीच्या पदार्थात सामील झाला. डोश्याचा कुरकुरीतपणा आणि काजूची चव दोन्ही गोष्टी त्याला एकदम मजेदार बनवतात. डिसेंबरमध्ये जेंव्हा आईला हा डोसा बनवताना पहिला तेंव्हाच कललेल की एकदम सोपी कृती आहे. आज रविवारच्या दिवशी ब्रंचसाठी मी त्याला बनवण्याचे ठरवले.

रवा डोसा
साहित्य
१ वाटी रवा
१ वाटी तांदुळाचे पीठ
१/४ वाटी मैदा
१/२ चमचा जीरा
१/४ चमचा हिंग
बारीक चिरलेले भाजलेले काजू
२ हिरव्या मिरच्या
मीठ
तूप

कृती
  • रवा, मैदा, बारीक चिरलेल्या मिरच्या, जीरा, हिंग आणि मीठ एकत्र करणे.
  • भरपूर पाणी घालुन डोश्याचे पीठ बनवणे व २० मिनिटासाठी बाजूला ठेवणे.
  • अजून थोडे पाणी घालुन पीठ पातळ करणे.
  • तवा मध्यम आचेवर ठेवून त्याला तूप लावणे.
  • १/२ वाटी डोस्याचे पीठ तव्यावर ओतून पसरवणे व डोश्याची खालची बाजू गुलाबी होईपर्यंत भाजणे.
  • २-३ तुपाचे थेंब टाकून डोसा परतणे व दुसरी बाजुपण गुलाबी होईपर्यंत भाजणे.
  • डोश्यावर काजू पसरवून दुमडून खायला देणे.

टीप
मी पहिल्यांदा जेव्हा हा डोसा बनवलेला तेंव्हा पीठ भिजवून २० मिनिट वाट न बघता डोसे बनवले त्यामुळे ते जाड आणि मऊ झाले त्यामुळे पीठ भिजवणे फार महत्वाचे आहे.
मी डोश्याचे पीठ एकत्र न ओतता, तव्यावर थोडे थोडे वरन शिंपडत गेले. ज्या जागी पीठ नाठीये तिथे थोडे थोडे शिंपडत पूर्ण तव्यावर पीठ शिंपडले त्यामुळे सुंदर जाळी तयार झाली आणि डोसा पण पातळ झाला.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP