पनीर पॅटिस


आज सकाळी अजॉयनी काहीतरी नवीन आणि चमचमीत बनवायची फर्माईश केली. थोडावेळ विचार केल्यावर मी हा पदार्थ करण्याचे ठरवले. एकदम चविष्ठ आणि आम्ही तो ब्रंच म्हणूनपण खाला. :)

पनीर पॅटिस
साहित्य
४ वाटी बारीक चिरलेले पनीर
४ बटाटे
३ चमचे कॉर्न फ्लौर
१ चमचा आलं
३ हिरव्या मिरच्या
५ लसूणाच्या पाकळ्या
१/४ चमचे हळद
मीठ
तेल

कृती
  • बटाटे कुकरमध्ये उकडून घेणे.
  • मिक्सरमध्ये आलं, लसूण आणि मिरच्या १/४ वाटी पाणी घालुन वाटून घेणे
  • कढईत तेल गरम करून त्यात हळद आणि वरील वाटण घालुन २ मिनिट शिजवणे
  • त्यात पनीर आणि मीठ घालुन पूर्णपणे शिजवणे.
  • बटाट्याची सालं काढून ते कुस्करून घेणे.
  • त्यात कॉर्न फ्लौर आणि मीठ घालुन मळून घेणे.
  • त्याचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून त्यांच्या दाबून वाटी बनवावी
  • ह्या वाट्यांमध्ये चमचाभर पनीर घालुन ते बंद करणे. ते गोळे हलक्या हातानी दाबून पॅटिस बनवणे
  • कढईत तेल गरम करून त्यात पॅटिस गुलाबी रंग येईपर्यंत भाजणे

टीप
पॅटिस भाजताना तेल एकदम गरम पाहिजे नाहीतर बटाट्याचे कव्हर कढईला चिकटू शकते.

चिकन रोल


बरेच दिवस झाले मी कुठलाही चिकनचा पदार्थ बनवून. मागच्या बरेच वेळा अजॉयच चिकन किंव्हा मटन बनवत होता, अर्थात प्रत्येक वेळा एकाच टाईपचा रस्सा आणि फक्त चिकन किंव्हा मटन घालुन. त्यामुळे मी आज विचार केला की चिकनचे काहीतरी वेगळे बनवून त्याला थोडा आश्चर्यचकित करूया. त्यावेळी मला त्याच्या आवडत्या रोलची आठवण झाली आणि मी हा पदार्थ बनवला.

चिकन रोल
साहित्य
५०० ग्राम बोनलेस चिकन
२ वाटी मैदा
१/२ वाटी गव्हाचे पीठ
१ मोठा कांदा
१ वाटी ब्रोकोली
१ वाटी टोमेटो
१/२ वाटी टोमेटो केचप
१/४ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/२ चमचा मिरे पूड
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा आलं किसून
८ लसूणाच्या पाकळ्या
मीठ
तेल

कृती
  • मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि २ चमचे तेल घालुन पीठ नीट मळून भिजायला बाजूला ठेवणे.
  • चिकनचे छोटे छोटे तुकडे चिरून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात चिकन घालुन ढवळणे.
  • चिकन पांढरे झाल्यावर, त्यात किसलेले आलं, हळद, तिखट, जिरे पूड, धने पूड, मिरे पूड आणि गरम मसाला घालुन ढवळणे.
  • चिकन मधून मसाल्याचा वास सुटल्यावर, त्यात केचप घालुन ५ मिनिटे शिजवणे
  • त्यात बारीक चिरलेला टोमेटो आणि मीठ घालुन चिकन पूर्णपणे शिजवून बाजूला ठेवणे.
  • तव्यामध्ये तेल गरम करून त्यावर बारीक चुरून लसूण, उभा चिरलेला कांदा आणि ब्रोकोली घालुन पूर्णपणे शिजेपर्यंत सारखे हलवत शिजवणे. त्यात मीठ आणि चिमुटभर मिरे पूड घून ढवळणे आणि बाजूला ठेवणे
  • एक अंडे नीट फेटून रुंद पातेल्यात ओतणे.
  • पीठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून पातळ चपाती लाटणे.
  • चपाती अंड्यामध्ये एका बाजूने भिजवून, न भिजलेली भाजू खाली असे गरम तव्यावर टाकणे
  • थोडे तेल शिंपडून दोन्हीबाजूने नीट भाजणे व ताटात टाकणे
  • चपातीवर मध्ये बारीक रेषेत दोन चमचे चिकन घालणे. त्यावर अर्धा चमचा ब्रोकोली आणि कांदा मिश्रण घालणे.
  • चपातीची खालची बाजू आणि डावी बाजू मिश्रणावर दुमडणे आणि मग घट्ट रोल करणे.

टीप
मला रोल थोडे हलके करायचे होते म्हणून मी एक अख्खे अंडे एका चपातीवर घालण्याऎवजी चपातीला हलका अंड्याचा वॉश दिला. त्यामुळे चपाती एकदम हलकी झाली आणि चिकनची चव चांगली खुलून आली.

लिंबू आणि खजुराचा कपकेक


हल्लीच मी फूड नेटवर्क बघायला चालू केला आणि तिथे काही कार्यक्रम चांगले असतात. त्यातील एक म्हणजे कपकेक वॉर्स. त्यात भाग घेणाऱ्या लोकांच्या कल्पनाशक्ती आणि त्यातून निर्माण होणारे कपकेक्स हे एकदम बघण्यासारखे असतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन मी हा पदार्थ केला.

लिंबू आणि खजुराचा कपकेक
साहित्य
४ वाटी मैदा
३ वाटी खजूर
२ वाटी दुध
१ वाटी लोणी
२ वाटी क्रीम
१ वाटी आईसिंग शुगर
१.५ वाटी साखर
२ अंडी
२ लिंबू
१ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा बेकिंग सोडा
मीठ

कृती
  • १ वाटी खजूर आणि दुध मिक्सरमध्ये वाटून बाजूला ठेवावेत
  • लोणी आणि साखर हॅन्ड मिक्सर वापरुन फेटणे.
  • त्यात अंडी घालुन पुन्हा एकजीव होईपर्यंत फेटणे
  • मैदा, बेकिंग पूड, बेकिंग सोडा आणि मीठ चाळून घेणे
  • लोणी-साखर-अंडी ह्याच्या मिश्रणामध्ये ते आणि दुध-खजूर मिश्रण थोडे थोडे घालुन फेटणे.
  • आता त्यात उरलेले खजूर बारीक चिरून, एका लिंबूच साल किसून आणि त्याच लिंबूचा रस घालुन अलगद ढवळणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे
  • कपकेकच्या भांड्यांमध्ये कागदाचे केककव्हर घालून त्यात केकचे मिश्रण २/३ पर्यंत भरणे
  • केक ओव्हनमध्ये ३५०F/१८०C वर २५ मिनिटं भाजणे व नंतर पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
  • एका भांड्यात क्रीम आणि आईसिंग शुगर एकत्र करणे.
  • हॅन्ड मिक्सर वापरुन घट्ट होईपर्यंत फेटणे
  • प्रत्येक केकवरती थोडे थोडे क्रीम चमच्याने घालणे किंवा पाईपिंग पिशवीत घालून सजवणे. त्यावर उरलेल्या लिंबूच साल किसून घालणे.

टीप
मी बटर पेपरचा कोन बनवून त्यांनी केक वर आईसिंग केला कारण माझ्याकडे पाईपिंग पिशवी नव्हती. चांगला मार्ग होता तो. थोड्या केक वर मी चमच्यानी पण आईसिंग लावलं.
क्रीम फेताण्यासाठी हॅन्ड मिक्सर फार उपयोगी पडतो. एकदम सोप, लवकर आणि खात्रीदायक आईसिंग बनत

भेंडी फ्राय


इथे इंचीन बांबू नावाच्या हॉटेलमध्ये मी पहिल्यांदा हा पदार्थ खाल्ला. अजॉयची एकदम आवडीची डीश. मिलिंदच्या भेंडीप्रेमाला लक्षात घेता हे ओळखणं कठीण नाही की आम्हाला ह्या डीशची परिचय त्यानी करून दिला. तो इथे आमच्याकडे राहत असताना करून बघण्याचा बेत होता पण तो राहूनच गेला. आज शेवटी एकदा मुहूर्त आला एकंदर. पदार्थाची चव एकदम मस्त आली आणि बरेचदा करण्यासाठी उत्तम पाककृती मिळाली आहे.

भेंडी फ्राय
साहित्य
५ वाटी भेंडी
४ चमचे मैदा
४ चमचे कॉर्न फ्लौर
१ कांदा
१ हिरवी मिरची
३ सुक्या मिरच्या
२ पाकळ्या लसूण
२.५ चमचे सोया सॉस
१/२ चमचे तिखट
१/४ चमचे लसुणाची पेस्ट
तेल
मीठ

कृती
  • मैदा, कॉर्न फ्लौर, तिखट, लसुणाची पेस्ट आणि मीठ एकत्र करणे.
  • त्यामध्ये पाणी घालुन भजीच्या पिठासारखे पीठ बनवणे.
  • मुठभरून भेंडीचे तुकडे त्या पिठात घोळवून गरम तेलात टाकणे.
  • सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम-मोठ्या आचेवर भाजणे. बाजूला एका टिश्यूवरती काढून ठेवणे. उरलेले भेंडीचे तुकडे पण असेच भाजून घेणे.
  • कढईत दोन चमचे तेल गरम कडून त्यात बारीक उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लासुनाचे तुकडे टाकून गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेणे.
  • त्यामध्ये सुक्या मिरच्या कुस्करून, सोया सॉस टाकून ढवळणे.
  • फ्राय केलेले भेंडीचे तुकडे टाकून ढवळणे. लगेच खायला देणे.

टीप
जर पाहुण्यांसाठी हा पदार्थ करण्याचे ठरवले तर भेंडी फ्राय करून ठेवणे पण ऐनवेळीस सॉसमध्ये घोळवणे. भेंडीचा कुस्कुशीत आणि कुरकुरीतपणा टिकवण्यासाठी उपयोग होईल.

खेकडा पुलाव


हल्ली आम्ही कोस्टकोमधून खेकडे आणायला चालू केले. सगळ्यात प्रथम जेंव्हा खेकडे घेऊन आलो तेंव्हा मी हा सगळे साहित्य अंदाजाने घालत घालत हा पुलाव बनवण्याचा प्रयत्न केला. एकदम मस्त झाला पदार्थ आणि इतका आवडीचा ठरला की आता आमच्या जेवणात तो बरेचदा दिसतो.

खेकडा पुलाव
साहित्य
१.५ वाटी तांदूळ
३०० ग्राम खेकड्याचा गर
१ वाटी दही
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा मिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा जिरे पूड
चिमुटभर दालचिनी पूड
चिमुटभर लवंग पूड
मीठ
तूप

कृती
  • दह्यामध्ये तिखट, मिरे पूड, धने पूड, जिरे पूड, दालचिनी पूड, लवंग पूड आणि मीठ घालणे.
  • दह्यामध्ये खेकड्याचा गर घालुन नीट हलवून २ तास बाजूला ठेवणे.
  • तांदूळ पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवणे
  • पाणी गरम करून त्यात भिजलेले तांदूळ घालुन शिजवणे. भात होत आलं की आचेवरून काढून बाजूला ठेवणे.
  • कधी मध्ये तूप गरम करून त्यात दही लावलेले खेकडे दह्यासकट घालुन मध्यम आचेवर ब्रावून रंग येईपर्यंत शिजवणे. खेकडे शिजतील आणि तूप बाजूला सुटेल.
  • त्यामध्ये शिजवलेला भात आणि चावीपुरात मीठ घालुन हलक्या हाताने ढवळणे.
  • १-२ मिनिट वाफ काढून रायत्याबरोबर वाढणे

टीप
इथे खूप मोठे खेकडे मिळतात. आम्ही एकंदर ४ पाय = १.५ पाउंड = ०.७ किलो होते. त्याचे कवच काढून त्यातून ३०० ग्राम गर आला. जर छोटे खेकडे असतील तर कावचासहित वापरता येतील.
खेकड्याचा गर काढण्यासाठी ते धुवून घेतल्यावर धार धार सुरीनी कवच कापले आणि अलगद पणे गर बाहेर काढला.

क्रेझिन पॅन केक


मी असे पॅन केक बरेचवेळा बनवतीये, प्रत्येक वेळा वेगळे फळ. पण आज जेंव्हा मी सुके क्रॅनबेरी घालुन ते बनवले तेंव्हा असे वाटले की हे पॅन केक मिश्रण फक्त त्याच्यासाठीच बनले आहे. त्यामुळे इथे मी आज ते पोस्ट करतीये.


साहित्य
२ वाटी मैदा
१ चमचा साखर
१.५ चमचे बेकिंग पूड
१/२ वाटी लोणी वितळवून
२.५ वाटी दुध
१ अंडे
२ चमचे व्हॅनिला ईसेन्स
१ वाटी क्रेझींस
मीठ
तेल

कृती
  • अंडे आणि साखर चांगले फेटून घ्यावे
  • त्यात दुध आणि वितळवलेले लोणी घालुन फेटावे
  • आता त्यात व्हॅनिला ईसेन्स, चाळून घेतलेला मैदा, बेकिंग पूड आणि मीठ घालुन फेटावे
  • तवा गरम करणे
  • त्यावर २-३ थेंब तेल टाकणे आणि नंतर अर्धी वाटी केकचे मिश्रण घालणे.
  • त्यावर थोडे क्रेझींस टाकणे व खालची बाजू गुलाबी रंग होईपर्यंत भाजणे
  • २ थेंब तेल शिंपडून केक उलटवणे दुसरी बाजूसुद्धा गुलाबी होईपर्यंत भाजणे. बाकीचे सगळे केक पण असेच बनवणे.
  • एकावर एक ठेवून, मॅपल सिरप घालुन वाढणे.

टीप
मी क्रेझीनसच्या ऐवजी अ‍ॅप्रिकॉट्स, ब्लू बेरीज, मनुके आणि असेच बरेच वेगळी वेगळी फळ घालुन हे पॅन केकस बनवले आहेत पण मी आधी म्हटल्याप्रमाणे क्रेझीनचे केक सगळ्यात छान लागले.

गार्लिक बटर कोळंबी सॅलेड


मला आज काल सॅलेड हा प्रकार खूप आवडायला लागलाय. इथे एक एकदम सोपा पण चविष्ठ अशी पाककृती देत आहे

गार्लिक बटर कोळंबी सॅलेड

साहित्य
८ मोठे कोळंबी
२ वाटी ब्रोकोली
२ वाटी घेवडा
१ वाटी मक्याचे दाणे
१ अ‍ॅव्होकाडो
३ वाटी आईसबर्ग लेट्युस
१ कांदा
१ वाटी ढोबळी मिरची
१/४ वाटी चेरी टोमेटो
६ लसुणाच्या पाकळ्या
१/४ चमचा ऑरीगॅनो
१/२ चमचा मिरे पूड
१ लिंबू
मोझारीला चीझ
मीठ चवीनुसार
लोणी

कृती
  • तवा गरम करून त्यात ब्रोकोली आणि घेवडा लोण्याबरोबर भाजणे. मीठ घालुन बाजूला ठेवणे.
  • त्याच तव्यावर आता ढोबळी मिरची उभी चिरून आणि थोडे लोणी घालुन भाजणे.
  • ढोबळी मिरची शिजत आल्यावर उभा चिरलेला कांदा आणि मीठ घालुन गुलाबी रंग येईपर्यंत भाजणे.
  • घेवडा आणि ब्रोकोलीच्या भांड्यात हे भाजलेले कांदा आणि मिरची मिश्रण घालणे
  • आता त्याच तव्यावर थोडे लोणी घालुन त्यात कोळंबी आणि बारीक चिरून लसूण घालुन मध्यम आचेवर कोळंबी पूर्णपणे शिजेपर्यंत भाजणे. मीठ घालुन बाजूला ठेवणे.
  • मायक्रोवेव्हमध्ये मक्याचे दाणे २ मिनिट शिजवून घेणे व बाजूला ठेवणे
  • लेट्युस चिरून दोन भांड्यात घालणे.
  • घेवडा, कांदा, ढोबळी मिरची आणि ब्रोकोलीचे मिश्रण अर्धे अर्धे दोन्ही भांड्यात घालणे
  • अ‍ॅव्होकाडो चिरून अर्धा अर्धा दोन्ही भांड्यात घालणे.
  • आता दोन्ही भांड्यात निम्मे निम्मे कोळंबी-लसूण मिश्रण घालणे.
  • टोमेटो आणि मक्याचे दाणेपण अर्धे अर्धे दोन्ही भांड्यात घालणे
  • मिरे पूड, ऑरीगॅनो आणि लिंबू रस दोन्ही भांड्यात घालणे.
  • मोझारीला चीझ घालुन वाढणे

टीप
मी फक्त लिंबू रस सॅलेड ड्रेसिंगम्हणून वापरलं. रॅन्च किंव्हा दुसरा काही वापरावा लागला नाही पण तुम्ही तुमच्या चवीनुसार दुसरा ड्रेसिंगपण वापरू शकतात. माझ्यामते लिंबूमुळे सॅलेडची चव एकदम खुलून आली.
कोळंबी सोडून मी बाकी सगळ्या भाज्या मोठ्या आचेवर भाजल्या त्यामुळे त्या कुसकुशीत लागत होत्या. कोळंबी मी तव्यावर टाकताना तवा मोठ्या आचेवर होता पण तव्यावर घालताच आच मंद केली त्यामुळे ते नीट शिजले पण तरीही त्यांना एक ग्रील केल्यासारखी चव आली.

गाऊकामोले


मी पहिल्यांदा चीपोटलेमध्ये हा पदार्थ खाल्ला. खाताक्षणी मला खूपच आवडला आणि मग मी त्याची पाककृती शोधली. अत्यंत चविष्ठ आणि "२ min"वाला पदार्थ

गाऊकामोले
साहित्य
3 अ‍ॅव्होकाडो
२ कांदे बारीक चिरून
१ चमचा बारीक चिरून टोमेटो
१/४ चमचा हिरवी मिरची बारीक चिरून
१ लसूण
मुठभर कोथिंबीर
१ मोठे लिंबू
मीठ चवीनुसार

कृती
  • अ‍ॅव्होकाडो चिरून भांड्यात घालणे
  • त्यात कांदा, टोमेटो, हिरवी मिरची घालणे
  • लसूण आणि कोथिंबीर बारीक चिरून त्यात मिसळणे.
  • मीठ आणि लिंबू रस घालणे
  • नीट एकजीव करून वाढणे

टीप
मी मिश्रण बनवताना अ‍ॅव्होकाडो थोडे थोडे मुरडून एकजीव बनवले पण तरीही त्याचे थोडे थोडे तुकडे लागतील असे ठेवले.
हे लगेच खाणे महत्वाचे आहे कारण अ‍ॅव्होकाडो त्यातल्या लोहाच्या प्रमाणामुळे काळे पडतात.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP