बदाम पिस्ता क्रेझीन बिस्कॉटी
मी हल्लीच इकडल्या लायब्ररीची जादू आणि ताकद बघितली. लायब्ररीत पाय टाकताच मला कळलेले कि मी इथून भरपूर पुस्तके घेणार आहे. त्या आठवड्यात मी ५ पेक्षाही जास्त वेळ घालून वेगवेगळ्या विषयावर ४० पुस्तके घरी आणली :) एका डेझर्टच्या पुस्तकात हि कृती होती आणि पहिल्यांदा मी ती साधारण तशीच्या तशी वापरून हे बिस्कॉटी बनवलेले. पण त्यानंतर मी बनवताना मैदा, लोणी वगैरे बरच काही वेगळ्या प्रमाणात वापरले आणि ते एकदम मस्त कुरकुरीत शलेले. आता कमीत कमी एका आठवड्याचे ४ वाजता खाण्याचा खाऊ तयार आहे :)
साहित्य
३/४ वाटी लोणी
२.२५ वाटी साखर
६.२५ वाटी मैदा
२ चमचे बेकिंग पूड
२ लिंबाची साल किसून
४ अंडी
१ वाटी बदाम
१ वाटी पिस्ता
१ वाटी क्रेझीन
२ चमचे बडीशेप
१ चमचा मीठ
कृती
- ओव्हन ३५०F/१७५C वर गरम करणे.
- एका भांड्यात लोणी आणि साखर एकत्र एकजीव होईपर्यंत फेटणे, साधारण एक मिनिट.
- मैदा, बेकिंग पूड, मीठ आणि लिंबाची किसलेली साल त्यात घालून एकत्र घालून फेटणे.
- त्यात एकावेळी एक अंडे घालत फेटणे
- त्यात बदामाचे, पिस्त्याचे तुकडे, क्रेझीन आणि बडीशेप घालून पुन्हा फेटणे
- ओट्यावर थोडा मैदा शिंपडून मिश्रण टाकणे. नीट मळून त्याचे १२ इंचाचे व साधारण १ इंचापेक्षा थोडेसे जास्त उंचीचे २ लांब गोळे बनवणे.
- बेकिंग तव्यावर बटर पेपर घालून त्यावर हे गोळे ठेवणे
- ओव्हनमध्ये ३५०F/१७५C वर ३० मिनिट भाजणे. नंतर १० मिनिट बाहेर थंड होऊ देणे
- धारधार सुरीने त्याचे १/२ इंच रुंदीचे तुकडे करणे
- बेकिंग तव्यावर चिरलेली बाजू वरती ठेवून तुकडे पसरणे व ओव्हनमध्ये ३५०F/१७५C वर २५ मिनिट भाजणे
- बिस्कॉटी थंड होऊ देणे व त्यानंतर डब्यात भरणे
टीप
मी बदाम, पिस्ते आणि क्रेझीन वापरले पण त्याऐवजी कुठलेही नट्स वापरता येतील. ह्यावेळी मी बडीशेप घालायला विसरलेले पण ह्या आही मी ती घातलेली आणि त्यांनी मस्त चव आणि वास आलेला आणि सगळ्यांना खूप आवडलेले
मी फेटण्यासाठी किचनएडचा स्टँडिंग मिक्सर वापरला पण हातातला मिक्सरपण वापरता येईल