मुगाच्या सालीसहीत डाळीचे आप्पे
आईनी मध्यंतरी बरेच वेळा हे आप्पे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवलेले आणि आम्हा सगळ्यांना ते फार आवडलेले. त्यामुळे ह्यावेळी मी तिला त्याची पाककृती दाखवायला सांगितली. आप्पे एकदम सोप्पे, पौष्टिक आणि चविष्ट आहेत.
साहित्य
१.५ वाटी मुगाची सालीसहीत डाळ
२-३ हिरव्या मिरच्या
२ लसुणाच्या पाकळ्या
१/४ चमचा आलं
१/४ कांदा
२ चिमुट गरम मसाला
मुठभर कोथिंबीर
मीठ चवीपुरते
तेल
कृती
- मुगाची डाळ रात्रभर भिजवून ठेवणे.
- सकाळी डाळीचे सगळे पाणी काढून मिक्सरमध्ये घालणे.
- त्यात हिरवी मिरची, लसूण आणि आलं घालुन बारीक वाटणे.
- मिश्रणात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालणे.
- त्यात मीठ आणि गरम मसाला घालुन चांगले फेटणे.
- आप्पे पात्र गरम करून त्याला तेल लावणे. त्यात एक-एक चमचा मिश्रण घालुन वरून तेल सोडणे. झाकण ठेवून २ मिनिट मधम आचेवर गुलाबी रंगावर भाजणे.
- आप्पे परतून झाकण न लावता अजून २-३ मिनिट दुसरी बाजुपण गुलाबी होईपर्यंत भाजणे. गरम गरम वाढणे.
टीप
मुगाची डाळ २-३ तास भिजवली तरी चालते त्यामुळे संध्याकाळी नाष्ट्यासाठी बनवायचे असल्यास फार आधीपासून डाळ भिजवायची गरज नाही.