ब्रेडचे दही वडे


अजॉय जेंव्हा घरी ब्रेड घेऊन आला तेंव्हा मी माझ्या ठरलेल्या नवीन वर्षाच्या नवीन उपक्रमानुसार तो तसाच न खाता काहीतरी नवीन बनवण्याचे ठरवले. हा चविष्ठ वडा करायला एकदम सोपा आहे.

ब्रेडचे दही वडे
साहित्य
८ ब्रेडचे स्लाईसेस
२.५ वाटी दही
२ हिरव्या मिरच्या
४ लसूण पाकळ्या
३ चमचे साखर
१/४ चमचा मिरे
चिमुटभर तिखट
चिमुटभर चाट मसाला
मुठभर कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • ब्रेड पाण्यात भिजवून लगेच हातावर ठेवून दाबून त्यातील पाणी काढून टाकावे.
  • परातीत ब्रेड, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि लसूण, मिरे पूड आणि मीठ घालुन मळून घ्यावे.
  • लिंबाच्या आकाराचे गोळे करून ते गरम तेलात भाजून घ्यावे.
  • एका भांड्यात दही, साखर, तिखट, चाट मसाला आणि मीठ घालुन ढवळून घ्यावे.
  • प्लेटमध्ये वडे घालुन त्यावर दही पसरवावे व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन खायला देणे

टीप
सगळे वडे लगेच खायचे नसतील तर ब्रेडचे मळलेले मिश्रण ठेवून खायच्या आधी तळावे नाहीतर तळलेले वडे ठेवल्यास ते रबरी होतात.

कोबीचे पॅटिस


सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आई बाबांची इथली ट्रीप, नंतर आमची भारताची ट्रीप ह्या सगळ्यामुळे गेल्या बऱ्याच महिन्यांमध्ये मला खूपच कमी वेळा सकाळचा नाश्ता बनवण्याची संधी होती. त्यातच आताचा जेटलॅग त्यामुळे सकाळचा नाश्ता हि प्रयोगाची उत्तम वेळ ठरते. इथे आहे माझी पहिली कृती.


साहित्य
२ वाटी कोबी
२ बटाटे
२ चमचे कॉर्नफ्लोर
१/४ वाटी रवा
१/२ चमचा जीरा
२-३ लसुणाच्या पाकळ्या
मीठ चवीपुरते
तेल

कृती
  • बटाटे कुकरमध्ये शिजवून थंड होण्यासाठी ठेवून देणे.
  • तव्यावर तेल गरम करून जीऱ्याची फोडणी करणे.
  • त्यात बारीक चिरलेले लसूण आणि कोबी घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • एका ताटलीत बटाटा किसून त्यात कॉर्नफ्लौर आणि मीठ घालुन मळणे.
  • २-३ थेंब तेल शिंपडून पुन्हा मळणे व त्याचे लिंबाच्या आकाराचे गोळे करणे.
  • प्रत्येक गोळा दाबून वाटी बनवणे व आधी बनवलेले कोबीचे मिश्रण अर्धा चमचा प्रत्येक वाटीत घालुन गोळे बंद करणे. थोडे दाबून पॅटिस बनवणे
  • प्रत्येक पॅटिस रव्यात घोळवून तव्यावर थोडे थोडे तेल घालुन दोन्ही बाजूनी भाजणे.

टीप
मला कोबीचे मिश्रण फार मसालेदार न बनवता त्याला लसूण आणि जीऱ्याची चव द्यायची होती. पण तुम्ही तुमच्याचवीनुसार मसाले घालुन प्रत्येक वेळी वेगवेगळ्या चवीचे पॅटिसपण बनवू शकतात.

चॉकलेट गनाश


मी हे गनाश ह्या एकदम चविष्ठ अंड्याविना चॉकलेट केकसाठी बनवले. बनवण्यासाठी एकदम सोप्पे आणि एकदम सुंदर आणि बाहेर हॉटेलमध्ये मिळते तसे हे आईसिंग माझे आवडते आहे.

चॉकलेट गनाश
साहित्य
२ वाटी सेमीस्वीट चॉकोचिप्स
१ वाटी क्रीम
१ चमचा लोणी

कृती
  • एका भांड्यात १ चॉकोचिप्स आणि लोणी घालुन १ मिनिट मायक्रोवेव्ह करणे.
  • त्यात अर्धा वाटी क्रीम आणि उरलेले १ वाटी चॉकोचिप्सघालुन फेटणे.
  • मिश्रण अजून ३० सेकंद मायक्रोवेव्ह करणे.
  • त्यात उरलेले अर्धा वाटी क्रीम घालुन मिश्रण एकजीव होऊन चमकेपर्यंत ढवळत राहणे.

टीप
मायक्रोवेव्हच्याऎवजी डबलबॉईलर (उकळत्या पाण्याच्या भांड्यावर दुसरे भांडे ठेवून) वापरून पण चॉकलेट वितळवता येईल पण मायक्रोवेव्हमुळे एकदम सोप्पे आणि स्वत्च्छ काम होते.

अंड्याविना चॉकलेट केक


अतुलच्या आईनी साधारण ६ महिन्यापूर्वी अंडी नसलेला केक बनवायला सांगितलेला. प्रत्येकवेळी काहीतरी कारणांनी ते राहूनच जायचं. आज जेंव्हा आम्ही त्यांच्याघरी नाष्ट्याला जाणार आहोत तेंव्हा मला वाटला हा केक घेऊन जाणे उत्तम ठरेल. केक एकदम मस्त मऊ आणि फुलून आला. मला अस वाटतंय की मला अंडे घातलेल्या ह्या चॉकलेट केकपेक्षा किंवा ह्या वाढदिवसाच्या चॉकलेट केकपेक्षा आजचा हा केक फार आवडला.

अंड्याविना चॉकलेट केक
साहित्य
४.५ वाटी मैदा
१ वाटी कोको पूड
३ वाटी साखर
१ वाटी तेल
१ चमचा बेकिंग सोडा
२ चमचा व्हॅनिला ईसेन्स
१ चमचा मीठ

कृती
  • ओव्हन ३५०F/१५०C वर गरम करणे.
  • मैदा आणि कोको पूड एकत्र चाळून एका भांड्यात घेणे.
  • त्यात बेकिंग सोडा आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • दुसऱ्या भांड्यात तेल, ३ वाटी पाणी आणि व्हॅनिला ईसेन्स एकत्र फेटून घेणे.
  • त्यात साखर घालुन पुन्हा फेटणे.
  • मैदा आणि कोको पूडचे मिश्रण चाळत तेलाच्या मिश्रणात घालणे व फेटून घेणे.
  • केक भाजायच्या भांड्याला तेलाचा हात लावून त्यात केकचे मिश्रण ओतणे.
  • केक ३५०F/१७५C वर एकूण ५० मिनिट भाजणे, भाजताना ३५ मिनिट झाल्यावर पुढची बाजू मागे जाईल अस फिरवणे.

टीप
मी केकवर चॉकलेट गनाश ओतून पांढऱ्या चॉकलेट क्रीम चीजच्या आईसिंगनी सजवले.
जर गनाशच्या वर आईसिंगनी सजवायचे असेल तर गनाश साधारण ३-४ तास सेट होऊ देणे म्हणजे आईसिंगची सजावट घसरणार नाही. मी वाट न बघता लगेच आईसिंग करायला घेतले त्यामुळे मला फार त्रास झाला.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP