Showing posts with label गोड पकवान. Show all posts
Showing posts with label गोड पकवान. Show all posts

काजू कतली


मी हे बरेच दिवसांपासून बनवण्याचा विचार करत होते. साधारण २ वर्षांपूर्वी दिवाळीला आई बाबा इथे असताना बनवलेले. त्यानंतर मी त्याविषयी विसरूनच गेलेले. २-३ आठवड्यांपूर्वी अजॉयनी काजू कतली बनवायची मागणी केल्यावर मला तर भीती होती कि आधीच मी सगळ विसरूनच गेले असेन पण आईला पाठवलेल्या कच्या नोट्समध्ये माहिती मिळाल्यानंतर ह्यावेळी एकदम छान झालेले. ह्यावेळी फोटो काढायला पण विसरले नाही त्यामुळे हि कृती लिहायला काही कमी नाहिये. माझ्यामते हि सगळ्यात सोपी आणि खूप वाहवा देणारी दमदार कृती आहे.

काजू कतली
साहित्य
६ वाटी काजू
१ वाटी दुध पूड
२ वाटी साखर
चिमुटभर वेलची
चांदीचा वर्ख

कृती
  • काजू मिक्सरमध्ये बारीक वाटून पूड करणे
  • काजू पूड आणि दुध पूड एकत्र करणे
  • तवा चांगला गरम करणे व आचेवरून बाजूला काढणे
  • काजू पूड आणि दुध पूड तव्यावर घालून कोमट होईपर्यंत चांगले एकत्र करणे व नंतर भांड्यात काढणे
  • १.५ वाटी पाणी आणि साखर एकत्र गरम करून २ तारी पाक बनवणे
  • वेलची पूड आणि पाक काजू मिश्रणामध्ये घालून चांगले ढवळणे व नंतर माळून गोळा बनवणे
  • बेकिंग तवा किंवा ताटलीवर बटरपेपर ठेवून त्यावर हे मिश्रण घालून जोरात थापून पसरवणे
  • त्यावर चांदीचा वर्ख लावून २-३ तास थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
  • काजू कतली कापून खायला देणे

टीप
साखरेचा पाक बरोबर बनवणे आणि चांगले मळणे यशस्वी होण्यासाठी महत्वाचे आहे
मिश्रण पसरवताना चांगले जोरात ठोकून पसरवल्यानी काजू कतली एकदम चांगली सेट होते

अंड्याविना चॉकलेट केक


अतुलच्या आईनी साधारण ६ महिन्यापूर्वी अंडी नसलेला केक बनवायला सांगितलेला. प्रत्येकवेळी काहीतरी कारणांनी ते राहूनच जायचं. आज जेंव्हा आम्ही त्यांच्याघरी नाष्ट्याला जाणार आहोत तेंव्हा मला वाटला हा केक घेऊन जाणे उत्तम ठरेल. केक एकदम मस्त मऊ आणि फुलून आला. मला अस वाटतंय की मला अंडे घातलेल्या ह्या चॉकलेट केकपेक्षा किंवा ह्या वाढदिवसाच्या चॉकलेट केकपेक्षा आजचा हा केक फार आवडला.

अंड्याविना चॉकलेट केक
साहित्य
४.५ वाटी मैदा
१ वाटी कोको पूड
३ वाटी साखर
१ वाटी तेल
१ चमचा बेकिंग सोडा
२ चमचा व्हॅनिला ईसेन्स
१ चमचा मीठ

कृती
  • ओव्हन ३५०F/१५०C वर गरम करणे.
  • मैदा आणि कोको पूड एकत्र चाळून एका भांड्यात घेणे.
  • त्यात बेकिंग सोडा आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • दुसऱ्या भांड्यात तेल, ३ वाटी पाणी आणि व्हॅनिला ईसेन्स एकत्र फेटून घेणे.
  • त्यात साखर घालुन पुन्हा फेटणे.
  • मैदा आणि कोको पूडचे मिश्रण चाळत तेलाच्या मिश्रणात घालणे व फेटून घेणे.
  • केक भाजायच्या भांड्याला तेलाचा हात लावून त्यात केकचे मिश्रण ओतणे.
  • केक ३५०F/१७५C वर एकूण ५० मिनिट भाजणे, भाजताना ३५ मिनिट झाल्यावर पुढची बाजू मागे जाईल अस फिरवणे.

टीप
मी केकवर चॉकलेट गनाश ओतून पांढऱ्या चॉकलेट क्रीम चीजच्या आईसिंगनी सजवले.
जर गनाशच्या वर आईसिंगनी सजवायचे असेल तर गनाश साधारण ३-४ तास सेट होऊ देणे म्हणजे आईसिंगची सजावट घसरणार नाही. मी वाट न बघता लगेच आईसिंग करायला घेतले त्यामुळे मला फार त्रास झाला.

पायेश


मी आधी पण हि डीश बनवली होती पण आज मिलिंद आणि अजॉयसाठी पुन्हा बनवल्यावर फोटो काढून रेसिपी लिहायचे ठरवले. अजॉयचा आवडता गोड पदार्थ आणि इतके सोप्पे

पायेश
साहित्य
१ लिटर दुध
३/४ वाटी तांदूळ
१.२५ वाटी गुळ

कृती
  • दुध उकळवून ३/४ होईपर्यंत आटवणे
  • तांदूळ धुवून उकळत्या दुधात घालुन भात शिजेपर्यंत उकळवणे
  • गॅसवरून उतरवून त्यात बारीक चिरलेले गुळ घालणे.
  • गुळ विरघळेपर्यंत ढवळणे. थंड करून खायला देणे.

टीप
दुध आणि भात मध्यम आचेवर सारखे ढवळत शिजवणे म्हणजे पायेश करपणार नाही.

रस मलई


अजॉयनी दसऱ्यासाठी रस मलईची फर्माईश केलेली पण त्यादिवशी घरात जास्त दुध नसल्यानी आणि ते त्यांनी खूप उशिरा आणून दिल्यानी दसऱ्यासाठी काही मी रस मलई नाही बनवू शकले. पण काल मी ती बनवण्याचा घाट घातला. एकदम उत्तम झालेली ही रस मलईची पाककृती इथे देत आहे.

रस मलई
साहित्य
२ लिटर दुध
२ चमचे व्हिनेगर
१ चिमुटभर केशर
१/४ चमचा वेलची पूड
१/४ वाटी बदाम
१/४ वाटी पिस्ता
३ वाटी साखर

कृती
  • १ लिटर दुध उकळवायला ठेवणे
  • अर्ध्यावाटी पाण्यात व्हिनेगर घालुन ते हळूहळू उकळत्या दुधात घालुन ढवळणे.
  • पनीर वेगळे झाले की लगेच पंचावर ओतून पाणी गळून टाकावे. थंडपाण्याखाली हे पनीर ठेवून त्यातली व्हिनेगरची चव निघेपर्यंत नीट धुवून घ्यावे. पंचा घट्ट बांधून पाणी गाळण्यासाठी १-२ तास लटकवून ठेवणे.
  • दुसऱ्या पसरट भांड्यात उरलेले एक लिटर दुध उकलावायला ठेवणे. अर्धे होईपर्यंत सारखे ढवळत उकळवणे.
  • त्यात केशर आणि अर्धी वाटी साखर घालुन अजून २-३ मिनिट उकळवणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • एका मोठ्या पसरट भांड्यात किंव्हा कुकरमध्ये १.५ लिटर पाणी आणि उरलेली २.५ वाटी साखर घालुन उकळवणे.
  • परातीत पाणी गळून गेलेले पनीर घेऊन चांगले एकजीव होईपर्यंत मळणे. ह्या पनीरचे छोटे पसरट चपटे गोळे बनवून ते उकळत्या पाण्यात सोडणे. भांड्यावर झाकण लाऊन (कुकर असेल तर त्याला शिट्टी न लावता) १० मिनिट मोठ्या आचेवर शिजू देणे
  • आच बंद करून ५ मिनिट तसेच थंड होऊ देणे व नंतर झाकण काढून कोमट होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • आता एक एक गोळा तळहातावर घेऊन अलगद दाबून त्यातले साखरेचे पाणी काढून टाकणे. असे सगळे गोळे एका भांड्यात टाकणे.
  • आधी बनवलेल्या दुधात वेलची पूड आणि बारीक चिरलेले पिस्ता आणि बदाम घालणे. ते दुध तयार केलेल्या गोळ्यांच्या भांड्यात टाकून थंड करायला ठेवून देणे.

टीप
मी बदाम अर्ध्या वाटी पाण्यात २ तास भिजवून मग चिरले. चिरणे खूप सोपे होते.
१ लिटर दुध आटवण्याऎवजी अर्धा लिटर हाल्फ अ‍ॅन्ड हाल्फ वापरता येईल.
माझ्याकडे मोठा कुकर किंवा भांडे नसल्यानी मी अर्धे गोळे शिजवून घेतले. मग कुकरमध्ये अजून २ वाटी पाणी घालुन उरलेले अर्धे गोळे शिजवले. गोळे मऊ होण्यासाठी साखरेचे पाणी पातळ असणे महत्वाचे आहे. तसेच भांड्यात गोळ्यांना फुलण्यासाठी जागा असली पाहिजे

सॅन्डविच


हा माझा सगळ्यात आवडता बंगाली गोड पदार्थ. त्यामुळे मी अजॉयसाठी त्याचे आवडते मिष्टी दोही बनवायला घेतले, तेंव्हा बाजूला माझ्यासाठी हे सॅन्डविच बनवायला पण चालू केले. खूप चविष्ट झाला हा प्रयोग

सॅन्डविच
साहित्य
२ लिटर दुध
४ चमचे व्हिनेगर
१ चमचा रवा
२ वाटी खवा
१/२ वाटी आईसिंग शुगर
२.५ वाटी साखर
चांदीचा वर्ख
पिस्त्याची पूड
चिमुटभर बेकिंग पूड
२ चिमुट केशर

कृती
  • १/४ वाटी दुध बाजूला ठेवून बाकीचे दुध उकळवणे व त्यात २ चमचे पाण्यामध्ये व्हिनेगर घालुन एकत्र करणे.
  • दुधापासून पाणी वेगळे होईपर्यंत एकसारखे ढवळणे
  • हे मिश्रण चाळणीत पंचा टाकून त्यावर ओतणे. थंड पाण्याखाली धरणे. नंतर पंच्याला गाठ मारून ५ मिनिट बांधून ठेवणे.
  • कुकर मध्ये ६ वाटी पाणी आणि साखर घालुन उकळी आणणे.
  • बांधून ठेवलेले पनीर एका ताटात काढून चांगले मळून घेणे.
  • त्यात रवा आणि बेकिंग पूड घालुन पुन्हा चांगले मळणे
  • ह्या पनीरच्या पिठापासून पातळ चौकोनी तुकडे बनवणे. ह्यातील अर्धे तुकडे उकळत्या साखरेच्या पाण्यात घालणे.
  • कुकरचे झाकण बंद करून एक शिट्टी काढणे. त्यानंतर आच मंद करून १० मिनिटे अजून शिजवणे. कुकर थंड होऊ देणे
  • शिजलेले पनीर कुकरमधून काढून ठेवणे. कुकरमध्ये अजून २ वाटी पाणी घालुन उरलेले तुकडे त्यात सोडून आधीच्या तुकड्यांसारखे शिजवून थंड करून घेणे.
  • आता हे सगळे पनीरचे तुकडे उरलेल्या साखरेच्या पाण्यासकट फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी रात्रभर ठेवून देणे.
  • दुसऱ्यादिवशी सकाळी खवा किसून त्यात आईसिंग शुगर घालुन मळणे.
  • उरलेले १/४ वाटी दुध गरम करून त्यात केशर घालणे. हे केशरीदुध खव्यामध्ये घालुन चांगले मळून घेणे.
  • फ्रीजमधून शिजवलेले पनीरचे तुकडे बाहेर काढून त्याचे त्रिकोणी तुकडे करणे.
  • प्रत्येक २ तुकड्यांमध्ये थोडे थोडे खव्याचे मिश्रण घालुन सॅन्डविच बनवणे. तसेच पिस्त्याची पूड खव्याच्या मिश्रणावर तसेच सॅन्डविचवर पसरवणे
  • चांदीचा वरखा लावून थंडगार वाढणे

टीप
मी जाड पनीरचे तुकडे करून चिरण्याऎवजी करतानाच पातळ तुकडे बनवले आणि दोन तुकड्यांमध्ये खवा घालुन सॅन्डविच बनवले.

सुकामेव्याचे चॉकलेट


एकेदिवशी फूडनेटवर्कचा चॅनेल बघत असताना मी हि पाककृती बघितली. एकदम सोपी आणि छान दिसणारी हि कृती त्याक्षणीच मला एकदम पसंत पडली. एकदम प्रमाण काही आठवत नसल्याने मी माझ्या अंदाजाने केलेला हा पदार्थ एकदम सुरेख झाला.

सुकामेव्याचे चॉकलेट
साहित्य
३५० ग्राम पांढरे चॉकलेट
१२० ग्राम डार्क चॉकलेट
१ वाटी अक्रोड
१/२ वाटी अ‍ॅप्रीकॉट
१/२ वाटी क्रेझीन

कृती
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करून त्यात अक्रोड १० मिनिटे भाजणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
  • मायक्रोवेव्हमध्ये एका भांड्यात पांढरे चॉकलेट १.५ मिनिट गरम करणे. दर ३० सेकंदानी ढवळणे. पातळ एकसारखे चॉकलेटचे मिश्रण बनेल
  • दुसऱ्या पातेल्यात डार्क चॉकलेट १.५ मिनिट दर ३० सेकंदानी ढवळत मायक्रोवेव्हमध्ये गरम करणे.
  • एका प्लेट किंव्हा ट्रेवर पार्चमेंट कागद घालुन पांढरे चॉकलेट ओतणे. अलगदपणे सर्वत्र सारखे पसरणे
  • चार कोपर्यांमध्ये डार्क चॉकलेट ओतून ते फोर्क वापरून पांढर्या चॉकलेटमध्ये पसरवणे.
  • त्यात अक्रोड आणि अ‍ॅप्रीकॉट तुकडे करून, क्रेझीन्स पसरवणे.
  • मिश्रण थंड झाल्यावर, फ्रीजमध्ये जमण्यासाठी ठेवून देणे

टीप
मी जी पाककृती बघितली होती त्यात फक्त पांढरे चॉकलेट वापरले होते. पण त्यामुळे चॉकलेट खूप गोड लागते म्हणून त्यात डार्क चॉकलेट घातले ज्यांनीकरून गोडपणा कमी होईल. ह्याआधी एकदा मी सेमीस्वीट चॉकलेट पण वापरून बघितले होते पण ते सुद्धा खूप गोड लागले त्यामुळे ह्या वेळी डार्क चॉकलेट वापरले. तुम्ही अर्धे डार्क चॉकलेट आणि अर्धे सेमीस्वीट चॉकलेटपण वापरू शकतात.

मिष्टी दोही


ही अजॉयची एकदम आवडती स्वीट. दिसायला एकदम सोपी वाटते पण मला फार कष्ट पडले. इथे दही जमवणे हे फार किचकट काम. खूप वेळा माझा प्रयोग फसला. पण आता मला एक युक्ती कळली की ज्यामुळे दही नेहमी चांगले जमते. लगेच मी पुन्हा मिष्टी दोहीचा प्रयत्न केला आणि तो एकदम यशस्वी ठरला.

मिष्टी दोही
साहित्य
१.५ लिटर दुध
१ वाटी साखर
१/२ वाटी दही

कृती
  • दुध उकळवणे.
  • त्यामध्ये १/४ वाटी साखर घालणे व सारखे ढवळत ते आटवणे. साधारण १ लिटर एवढे दुध राहीपर्यंत आटवणे.
  • आता दुध उकळवणे चालूच ठेवणे पण बाजूला एक पातेल्यात उरलेली ३/४ वाटी साखर आणि १/४ वाटी पाणी टाकून उकळवणे.
  • जेंव्हा साखरेचे पाणी गडद सोनेरी रंगाचे होईल तेंव्हा दुधाची आच कमी करून त्यात हे सोनेरी पाणी घालणे.
  • दुध आणखीन ५ मिनिट उकळवणे आणि नंतर कोमट होईपर्यंत थंड होऊ देणे
  • एका पातेल्यात दही व एक वाटी आधी बनवलेले दुध एकत्र करून फेटणे.
  • त्यात उरलेले दुध घालुन झाकण लाऊन रात्रभर दही जमू देणे
  • फ्रीजमध्ये कमीत कमी २ तास थंड करून मग वाढणे.

टीप
इथे दही जमवण्यासाठी मी दह्याचे भांडे कॅसेरॉलमध्ये (ज्यात पदार्थ गरम राहतात) ठेवून, तो कॅसेरॉल ओव्हनमध्ये ठेवते. ओव्हनचा लाईट चालू ठेवायचा. ओव्हन गरम करावा किंव्हा चालू ठेवायला लागत नाही. कॅसेरॉल दुधाचे तापमान वाचवतो आणि लाईट ओव्हनला कोमट ठेवतो.
सोनेरी साखरेचे पाणी दुधात घालताना हळू हळू घालणे कारण तापमानातील फरकामुळे दुध व साखरेचे पाणी उडून हात भाजण्याची शक्यता असते.
छोट्या छोट्या वाटीमध्ये पण दही जमवून वाटी तशीच्या तशी वाढू शकतात.
जाड दुध वापरले तर खूप चांगले दही जमते व चव पण चांगली येते. इथे हाफ अ‍ॅन्ड हाफ मिळते ते मी दुधाच्याऎवजी एक लिटर वापरले त्यामुळे मला दुध आटवावे लागले नाही.

लिंबू आणि खजुराचा कपकेक


हल्लीच मी फूड नेटवर्क बघायला चालू केला आणि तिथे काही कार्यक्रम चांगले असतात. त्यातील एक म्हणजे कपकेक वॉर्स. त्यात भाग घेणाऱ्या लोकांच्या कल्पनाशक्ती आणि त्यातून निर्माण होणारे कपकेक्स हे एकदम बघण्यासारखे असतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन मी हा पदार्थ केला.

लिंबू आणि खजुराचा कपकेक
साहित्य
४ वाटी मैदा
३ वाटी खजूर
२ वाटी दुध
१ वाटी लोणी
२ वाटी क्रीम
१ वाटी आईसिंग शुगर
१.५ वाटी साखर
२ अंडी
२ लिंबू
१ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा बेकिंग सोडा
मीठ

कृती
  • १ वाटी खजूर आणि दुध मिक्सरमध्ये वाटून बाजूला ठेवावेत
  • लोणी आणि साखर हॅन्ड मिक्सर वापरुन फेटणे.
  • त्यात अंडी घालुन पुन्हा एकजीव होईपर्यंत फेटणे
  • मैदा, बेकिंग पूड, बेकिंग सोडा आणि मीठ चाळून घेणे
  • लोणी-साखर-अंडी ह्याच्या मिश्रणामध्ये ते आणि दुध-खजूर मिश्रण थोडे थोडे घालुन फेटणे.
  • आता त्यात उरलेले खजूर बारीक चिरून, एका लिंबूच साल किसून आणि त्याच लिंबूचा रस घालुन अलगद ढवळणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे
  • कपकेकच्या भांड्यांमध्ये कागदाचे केककव्हर घालून त्यात केकचे मिश्रण २/३ पर्यंत भरणे
  • केक ओव्हनमध्ये ३५०F/१८०C वर २५ मिनिटं भाजणे व नंतर पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे
  • एका भांड्यात क्रीम आणि आईसिंग शुगर एकत्र करणे.
  • हॅन्ड मिक्सर वापरुन घट्ट होईपर्यंत फेटणे
  • प्रत्येक केकवरती थोडे थोडे क्रीम चमच्याने घालणे किंवा पाईपिंग पिशवीत घालून सजवणे. त्यावर उरलेल्या लिंबूच साल किसून घालणे.

टीप
मी बटर पेपरचा कोन बनवून त्यांनी केक वर आईसिंग केला कारण माझ्याकडे पाईपिंग पिशवी नव्हती. चांगला मार्ग होता तो. थोड्या केक वर मी चमच्यानी पण आईसिंग लावलं.
क्रीम फेताण्यासाठी हॅन्ड मिक्सर फार उपयोगी पडतो. एकदम सोप, लवकर आणि खात्रीदायक आईसिंग बनत

मोल्टन लाव्हा केक


बरेच दिवसांपूर्वी मी ह्या केक विषयी वाचले होते आणि त्याचा कॉन्सेप्ट मला फार आवडला. मग मी ह्याची पाककृती शोधल्यावर कळले की हि सगळ्यात सोप्पी आणि पटकन तयार होणारी पाककृती आहे. पण माझ्याकडे ते बनवण्यासाठी रामेकिंस किंव्हा पेपर कप नसल्यानी बरेच दिवस केक बनवण्याचे मनातच राहून गेले. पण आज मी रामेकिंस विकत आणले आणि केक बनविले. एकदम हीट ठरलाय हा केक.

मोल्टन लाव्हा केक
साहित्य
१ वाटी मैदा
१.२५ वाटी सेमीस्वीट चॉकोचिप्स
१ वाटी लोणी
५ चमचे कोको पूड
३ अंडे
३ अंड्यांचे पिवळे
२ वाटी साखर

कृती
  • रामेकिंसना लोण्याचा हात लावून बाजूला ठेवणे.
  • ओव्हन ४५०F/२३०C वर गरम करणे.
  • मायक्रोवेव्हमध्ये लोणी आणि चॉकोचिप्स एकत्र करून १ मिनिट गरम करणे.
  • लोणी आणि चॉकोचिप्स नीट ढवळणे आणि एकजीव करणे आणि बाजूला ठेवणे.
  • अंडी आणि अंड्याचे पिवळे एकत्र फेसून घेणे.
  • त्यात साखर घालुन पांढरे होईपर्यंत पुन्हा फेटणे.
  • त्यात वितळवलेले चॉकलेट - लोणी मिश्रण घालुन पुन्हा फेटणे
  • मैदा आणि कोको पूड चाळून घेणे व वर बनवलेल्या मिश्रणात डाव घालुन हलकेच ढवळून घेणे.
  • बनवलेले मिश्रण ६ रामेकिंसमध्ये घालणे,
  • रामेकिंसना बेकिंग ट्रेमध्ये ठेवून ते ओव्हन मध्ये ४५०F/२३०C वर १३ मिनिट भाजणे.
  • ओव्हन मधून लगेच काढून बशीत उलटे करून खायला देणे

टीप
रामेकिंसऎवजी पेपर कप मफीन पॅनमध्ये ठेवून पण भाजू शकतो पण त्यासाठी थोडे उंच पेपर कप वापरणे म्हणजे त्याला धरून केक ला उचलून उलटे करणे सोपे जाईल
केकला उलटे करण्यासाठी रामेकीन एका बशीत ठेवणे व रामेकिंवर एक बशी ठेवणे व दोन्ही बश्याना धरून उलटे करणे. रामेकिंस खूप गरम असल्यानी बश्यांची फार मदत होते.

पेटीट पाल्मिअर्स


आम्ही हा पदार्थ सुशीलच्या घरी पहिल्यांदा बघितला आणि खाला. तेजल त्यादिवशी ऑफीसला गेलेली आणि आम्ही बाकी तिघेही खाण्यासाठी काहीतरी शोधात होतो. अजॉयला तर एकदम खातचक्षणी पदार्थ आवडला. मला वाटलेला की पफ पेस्ट्री शीट वापरून ते बनवणा खूप सोपा असेल. इथे परत आल्यावर आम्ही costcoमध्ये मिळते का बघितले तर ते इथे बनवत नसल्याने आणखीनच मोठं कारण मिळाल घरी बनवण्यासाठी. घरीयेऊन पटकन थोडा रिसर्च केला आणि माझा अंदाज खरा ठरला.

पेटीट पाल्मिअर्स
साहित्य
१ पफ पेस्ट्री शीट
१ वाटी साखर
लोणी

कृती
  • ओट्यावर थोडी साखर शिंपडून त्यावर पफ पेस्ट्री शीट उलघडून घालावी
  • शीटवर साखर शिंपडून, साखर शीटना चिकटेल असे हलके लाटून घेणे.
  • दोन्ही कडा मध्ये एकत्र येतील अश्या दुमडाव्यात व नंतर एक मध्ये घडी घालणे. पेस्ट्री शीटचे ४ थर बनतील.
  • ३० - ४० मिनिट फ्रीजमध्ये ठेवणे.
  • ओव्हन ४००F/२००C तापमानावर गरम करणे.
  • पेस्ट्री शीटचे घडीला परपेन्डीक्युलर असे आयताकृती तुकडे करणे.
  • प्रत्येक तुकड्याचे कापलेली जागा साखरेत घोळवून, त्यातली एक बाजू खाली असेल असे बेकिंग तव्यावर ठेवणे
  • ओव्हनमध्ये ४००F/२००C तापमानावर १८ मिनिट भाजणे.

टीप
पेस्ट्री शीट जास्तीत जास्त ३५ ते ४० मिनिट अगोदरच फ्रीजमधून काढून ठेवणे अथवा त्यावर काम करणे कठीण होऊ शकते.
मी पार्चमेंट पेपर तव्यावर घालण्याचा विचार केलेला पण माझ्याकडे तो तेंव्हा संपलेला पण पार्चमेंट पेपर वापरला तर तव्याच्या दृष्टीनी तो जास्त फायदेमंद ठरेल.

मालपुआ


प्रत्येक आठवड्याला अजॉय डोक्यात तेल घालुन देण्यासाठी विचारतो. (तो माझ्या डोक्यात तेल घालुन देतो) माझा उत्तर ठरलेलं असत : मी कोणताही पदार्थ बनवून देऊ शकते पण तेल मालिश ते सुद्धा दर आठवड्याला तुझ्या इतक्या छोट्या केसांसाठी फार जास्त कष्ट दायक आहे. एखाद दुसऱ्या महिन्यातून एकदा मी करू शकते. मागच्या शनिवारी जेंव्हा मी हे उत्तर पुन्हा दिले तेंव्हा त्यांनी मालपुआची फर्माईश केली. मी पटकन थोडा फार पाकक्रिया शोधायला चालू केला पण प्रत्येकजण वेगवेगळ सांगत होते. शेवटी हि पाककृती मी स्वतःच बनवली.

मालपुआ
साहित्य
१ वाटी मैदा
१/२ वाटी रवा
२.५ वाटी दुध
१ चमचा बडीशेप
१.५ वाटी साखर
चिमुटभर केशर
बदाम आणि पिस्ता वरून घालण्यासाठी

कृती
  • मैदा, रवा, बडीशेप आणि दुध एकत्र मिसळून ४ तास भिजवत ठेवणे.
  • साखर १.५ वाटी पाण्यात घालुन एकतारी पाक बनवणे.
  • त्यात केशर घालुन बाजूला ठेवणे.
  • कढई गरम करून त्यात १/४ वाटी आधी बनवलेले रवा-मैद्याचे पीठ गोलाकार ओतणे
  • गुलाबी रंगावर दोन्ही बाजूनी भाजून झाल्यावर त्याला साखरेच्या पाकात दोन मिनिट बुडवणे.
  • पाकातून बाहेर काढून त्यावर बदाम पिस्ताचे तुकडे पसरवून खायला देणे.

टीप
बऱ्याच व्हिडीओ मध्ये मालपुआ फ्राय करायला सांगितलेला पण पुढच्यावेळी मी शॅलो फ्राय करणार आहे.
तसेच मी १ वाटी साखरेचा पाक बनवला असल्यानी शेवटच्या थोड्या मालपुआना पाक पुरला नाही
मी ह्याच्याआधी हैदराबादमध्ये बडी मा आल्या होत्या तेंव्हा फक्त एकदाच मालपुआ खाल्ले आहेत त्यामुळे त्याची चव नक्की कशी असते ह्याचा फार काही अंदाज मला नाहीये. त्यामुळे पुढच्या वेळी मी मांना विचारून किती फरक आहे ते बघणार आहे.

आलुबुखारचा केक


आम्ही ह्यावेळी बरेच आलुबुखार आणलेले पण ते पिकलेले नव्हते. त्यामुळे मी हा केक बनवण्याचे बऱ्याच दिवसांपासून ठरवत होते पण आज वेळ मिळाला

आलुबुखारचा केक
साहित्य
१ वाटी लोणी
१.५ वाटी साखर
३/४ वाटी मैदा
१ वाटी हेझलनट
१ वाटी अक्रोड
१ वाटी शेंगदाणा
३ अंडी
१/२ चमचा बेकिंग पूड
६ आलूबुखार
२ चमचे लिंबाचा रस
४ चमचा पिठीसाखर
२ चमचा बदाम

कृती
  • हेझलनटची पूड करणे.
  • एका भांड्यात साखर आणि लोणी एकत्र फेटणे.
  • त्यात अंडे घालुन फेटणे.
  • त्यात हेझलनटचा १/३ वाटा घालणे आणि फेटणे.
  • एक अंडे आणि १/३ हेझलनटचा वाटा घालत फेटत राहणे.
  • मैदा आणि बेकिंग पूड एकत्र चाळून घेणे व मिश्रणात घालुन फेटणे.
  • केकच्या भांड्याला लोण्याचा हात लावणे व केकचे मिश्रण त्यात ओतणे.
  • ओव्हन ३५०F/१८०C वर गरम करणे.
  • केक ३५०F/१८०C वर ४५ मिनिट भाजून घेणे.
  • ओव्हनमधून बाहेर काढून त्यावर आलुबुखारची बी काढून अर्धे करून पसरवणे.
  • ओव्हनमध्ये ३५०F/१८०C वर अजून १० मिनिट भाजणे व थंड करणे.
  • एका भांड्यात लिंबाचा रस आणि पिठी साखर एकत्र करणे व मिश्रण घट्ट होईपर्यंत उकळवणे.
  • पाक केकवर ओतून त्यावर बारीक चिरलेले बदाम घालणे.

टीप
लिंबाच्या मिश्रणाऎवजी मारमालेड जॅमपण वापरता येईल पण माझ्याकडे तो नसल्यानी मी लिंबाच्या रसाचे मिश्रण वापरले.

गुळाचा संदेश


सरस्वती पूजेच्या दिवशी मी हि मिठाई करून बघण्याचे ठरवले. अजॉयची आवडती मिठाई. खूपच चांगला झालेला आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे कलाकंद सारखी किचकटपण नाहीये करायला. त्यामुळे त्यांनी पुन्हा काहीतरी बनवण्यास सांगितल्यास कमी कष्टाची पण खूप तारीफ देणारी हि मिठाई कधीही बनवू शकते.

गुळाचा संदेश
साहित्य
१ लिटर दुध
३/४ वाटी गुळ
२ चमचा व्हिनेगर
१/४ चमचा पिस्ता पूड

कृती
  • भांड्यात दुध उकळवणे व त्यात २ चमचा पाण्यात मिसळलेले व्हिनेगर घालणे.
  • पनीर तयार झाल्यावर लगेच गाळून थंड पाण्याखाली धुवून घेणे.
  • पंचात टांगून ५-१० मिनिट पाणी जाण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • परातीत पनीर काढून चांगले मळून घेणे. एकम मऊसर आणि एकसारखे झाले पाहिजे.
  • त्यात गुळ किसून घालणे व एकत्र करणे.
  • कढईत मिश्रण घालुन मध्यम आचेवर शिजवणे. भांड्यापासून मिश्रण सुटायला लागले व एकत्र गोळा व्हायला लागले की खाली काढणे.
  • छोटे छोटे गोळे करून त्यांना साच्यात घालुन आकार देणे. साचे नसल्यास नुसतेच पण गोळे करून ठेवता येतील.
  • पिस्ता पूड शिंपडणे व पूर्ण पणे थंड होऊ देणे.

टीप
मी नेहमीच्या गुळाऎवजी कलकत्याचे पाताली गुळ वापरले. पण नेहमीचे गुळ वापरताना मी त्यात थोडासा खजूर वाटून घालण्याचा विचार करत आहे. कारण त्या गुळाची चव खजूर आणि गुळ एकत्र केल्यासारखी लागते.
पनीर बनवताना ते दुधापासून वेगळे झाले की लगेच धुवून घेणे, जर जास्त शिजवले तर मिठाई कडक होते.
संदेशला आकार देण्यासाठी मिश्रण गरमच असायला हवे. जर ते थंड व्हायला लागले तर पुन्हा थोडेसे कोमट करून घेणे.

कलाकंद


आज सकाळी काहीतरी गोड बनवण्याचा विचार करताना मेहुलनी त्याच्या कार पूजेच्यावेळी दिलेला कलाकंद आठवला. थोडा फार शोधल्यावर लक्षात आला की करायला एकदम सोप्पा आहे. पण जेंव्हा बनवला तेंव्हा लक्षात आला की सोप्पा असला तरी खूप किचकट आणि वेळ लागणार काम आहे.

कलाकंद
साहित्य
२ लिटर दुध
१ वाटी साखर
३ चमचे व्हिनेगर
१ चमचा पिस्ता
१ थेंब केवडा इसेन्स
चांदीचा वर्ख

कृती
  • निम्मे दुध उकळून घेणे
  • ३ चमचे पाणी आणि व्हिनेगर एकत्र करून उकळत्या दुधात घालणे.
  • दुधातून पनीरवेगळे झाले की लगेच गाळून घेवून थंड पाण्याखाली धुवून घेणे.
  • पंचात पनीर घालुन पाणी जाऊ देण्यासाठी टांगून ठेवणे.
  • उरलेले दुध उकळून घेणे व त्यात बनवलेले पनीर घालुन मिश्रण आटेपर्यंत मध्यम आचेवर शिजवणे.
  • त्यात साखर आणि केवड्याचा इसेन्स घालुन पुन्हा मुश्रन घट्ट होईपर्यंत शिजवणे.
  • ताटलीत मिश्रण टाकून पसरवणे व त्यावर चांदीचा वर्ख आणि पिस्ते लावणे.
  • थंड झाल्यावर कापून तुकडे करणे व खायला देणे.

टीप
मी मिश्रण नॉनस्टिक भांड्यात उकळायला ठेवलेले पण त्यात ते चांगले होत नसल्यानी अ‍ॅलुमिनियम भांड्यात केले. अ‍ॅलुमिनियम भांडेच मला गोड पकवान बनवायला बरे वाटते.
दुध उकळवताना सारखे ढवळणे महत्वाचे आहे नाहीतर भांड्याला दुध लागून त्यात करपट वास जातो.
५ नोव्हेंबर: मी आज २ लिटरऎवजी २ गॅलन दुधाची मिठाई बनवण्याचे ठरवले पण पनीर घातल्यावर दुध आटवण्यासाठी खूप जास्त वेळ लागला. त्यामुळे जर खूप सारे मिठाई बनवण्याचा बेत असेल तर तसा अंदाज आधी पासूनच बांधावा. साधारणपणे २ लिटर दुधाच्या १६ बर्फ्या होतात

मनगणे


लहानपणी मला हा पदार्थ खूप आवडायचा, इतका की आई दर शनिवारी दुपारच्या जेवणात बनवायची आणि मी त्याची वाट बघायचे. आईची हि पाककृती मी थोडीशी बदलून वापरली आहे.

मनगणे
साहित्य
१ वाटी हरबरा डाळ
३/४ वाटी गुळ
१/२ वाटी काजू
१/२ वाटी मनुका
३ वाटी दुध
चिमुटभर वेलची पूड
मीठ

कृती
  • हरबरा डाळ १.५ वाटी पाणी घालुन ४-५ शिट्ट्या येईपर्यंत कुकरमध्ये शिजवून घेणे.
  • त्यात गुळ, काजू, मनुका, वेलची पूड आणि मीठ घालुन मध्यम आचेवर ५ मिनिट उकळवणे व नंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणे.
  • त्यात दुध घालुन वाढणे.

टीप
सगळ्यात सोप्पी डीश आहे नाही :) चव गुळ, डाळ आणि सुक्यामेव्यानी येते.
नेहमीच्या दुधाऎवजी नारळाचे दुध वापरता येईल पण आई दुध वापरते म्हणून मी पण तेच वापरले.

रसकदम


बरेच दिवस झाले रसकदम खाऊन. माझा आवडता गोड पदार्थ त्यामुळे आज मी बनवण्याचे ठरवले. कृती रुचिरा नावाच्या पुस्तकातल्या कृतीवरून प्रभावित आहे.

रसकदम
साहित्य
३.५ वाटी दुध
१ चमचा व्हिनेगर
१.५ वाटी साखर
१.५ वाटी पिठी साखर
४ वाटी खवा
चिमुटभर केशर
१ वाटी किसलेले पनीर

कृती
  • २ चमचे दुध गरम करून त्यात केशर घालणे
  • उरलेले दुध उकळवणे व त्यात एक चमचा पाण्यात व्हिनेगर मिसळून घालणे.
  • पनीर वरच्या बाजूला जमा होईल आणि पाणी वेगळे होईल. पाणी ओतून देवून पनीर थंड पाण्यात स्वच्छ धुवून घेणे.
  • पनीर पंच्यात गुंडाळून पाणी पिळून टाकणे.
  • पनीर चांगले मळून घेणे व त्याचे २५ छोट्या आकाराचे गोळे बनवणे.
  • ६ वाटी पाण्यात साखर घालुन कुकरमध्ये उकळवणे.
  • त्यात पनीरचे गोळे सोडून ५ मिनिट उकळवणे.
  • कुकरचे झाकड लावून अजून ५ मिनिट उकळवणे. (शिट्टी न लावता)
  • कुकर उघडून त्यात अर्धा वाटी पाणी घालुन अजून ५ मिनिट उकळवणे व गोळे थंड होऊ देणे. गोळे पाकातून बाजूला काढून ताटलीत पसरवणे.
  • नॉनस्टिक तव्यावर मध्यम आचेवर पनीर गुलाबीरंगावर परतून घेणे.
  • खवा, पिठी साखर, केशर दुध एकत्र करून मळणे.
  • पनीर थंड झाले असेल त्याला मिक्सर मध्ये वाटून पूड करणे व एका ताटलीत पसरवणे.
  • शिजवलेले गोळे खव्याच्या मिश्रणात घालुन बंद करणे व नंतर पनीरच्या पूड मध्ये घोळवणे.

टीप
पनीर भाजताना ते करपणार नाही ह्याची काळजी घेणे व सारखे हलवत भाजणे. पनीरचा कच्चा वास गेला पाहिजे
शिजवलेले गोळे रसगुल्यासाराखेच असतात फक्त आकारणी छोटे आणि पाकचे प्रमाण वेगळे असते.
खव्याच्या मिश्रणात नारिंगी किंवा गुलाबी रंग घालता येईल पण माझ्याकडे नसल्यानी मी वापरला नाही.

वाढदिवसाचा चॉकलेट केक


मला अगदी पहिल्यापासून चॉकलेटच आईसिंग फार आवडायचं. प्रत्येक वेळी वाटायचं की आईसिंग एकदम बेकरीवाल्यांसारख कधीतरी बनवता यायला पाहिजे. प्रत्येक वेळी वाटायचं की त्यात काहीतरी कला आहे जी जमण जरा मुश्कील असेल. पण हा केक करताना कळला की जर थोडासा सय्यम आणि त्याची छोटीशी युक्ती माहिती असेल तर खूप सोप्पं आहे.

वाढदिवसाचा चॉकलेट केक
साहित्य
७ चमचे लोणी
१ वाटी पिठी साखर
३ अंडी
मीठ चवीपुरते
१/२ वाटी मैदा
३००ग्राम चॉकलेट
८ चमचे कोको पूड

कृती
  • एका भांड्यात पाणी उकळवून त्यावर दुसरे भांडे ठेवीन १००ग्राम चॉकलेट वितळवणे. त्यात ४ चमचे कोको पूड घालुन ढवळून बाजूला ठेवणे.
  • दुसऱ्या भांड्यात ६ चमचे लोणी आणि १/२ वाटी पिठी साखर घालुन फेटून घेणे.
  • त्यात वितळवलेले चॉकलेट घालुन पुन्हा फेटणे.
  • दोन भांड्यात अंड्याचे पांढरे आणि पिवळे वेगवेगळे करणे.
  • लोणी आणि चॉकलेट मिश्रणात एकावेळी एक एक अंड्याचे पिवळे घालत फेटून घेणे.
  • मैदा चाळून बाजूला ठेवणे.
  • दुसऱ्या भांड्यात अंड्याचे पांढरे आणि मीठ एकत्र करून चांगले फेटून घेणे.
  • चॉकलेटच्या मिश्रणात एका वेळी एक चमचा अंड्याचे पांढरे आणि एक चमचा मैदा असे घालत अलगद एकत्र करणे.
  • ओव्हन १८०C/३५०F वर गरम करणे.
  • केकच्या भांड्याला तेलाचा हात लावून त्यात केकचे मिश्रण ओतणे.
  • केक १८०C/३५०F वर ४५ मिनिट भाजणे व रात्रभर थंड होण्यासाठी बाहेर ठेवणे.
  • दुसऱ्यादिवशी एका भांड्यात पाणी गरम करून त्यावर काचेचे भांडे ठेवणे. त्यात उरलेले लोणी आणि चॉकलेट घालुन एकत्र वितळवणे
  • दुसऱ्या भांड्यात उरलेली साखर आणि अर्धा वाटी पाणी घालुन उकळवणे.
  • आच एकदम मंद करून त्यात वितळवलेले चॉकलेट-लोणी आणि उरलेली कोको पूड घालुन शिजवणे.
  • थोडेसे हातावर घेवून मिश्रण सेट होतंय का ते बघणे. झालेतर आईसिंग तयार आहे.
  • गरम गरम आईसिंग केकच्या मध्यभागावर ओतून पूर्ण केकवर पसरवणे.
  • बटर आईसिंग आणि चॉकलेटच्या तुकड्यांनी सजवणे.

टीप
एकदम बरोबर वाचलंय! :) केकमध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पूड लागत नाही. :)
मी हे आई बाजूला असताना बनवला त्यामुळे तिच्या मार्गदर्शन आणि सय्यम वापरून मी ४ चमचे कोको पूड २००ग्राम चॉकलेटसाठी वापरून हे आईसिंग बनवले. पण जर आईसिंग पातळ असेल तर त्यात अजून कोको पूड घालता येईल. आणि जर आईसिंग घट्ट असेल तर थोडे गरम पाणी घालता येईल. आईसिंग थंड झाल्यावर आईसिंग सारखे पाहिजे, पातळ किंवा जास्त घट्ट नको.

नारळाचा रस


आमच्या ह्या रसाशिवाय पुरण पोळी होऊच शकत नाही. इथे त्याची कृती देत आहे.

नारळाचा रस
साहित्य
४ वाटी खोबरे
१.५ वाटी गुळ
मीठ

कृती
  • मिक्सरमध्ये किसलेले खोबरे आणि पाणी घालुन वाटणे व पिळून दुध काढणे. तोच कीस सारखा पाणी घालुन ३ वेळा रस काढणे.
  • त्यात गुळ आणि मीठ घालुन ढवळणे.

टीप
हा रस ताजा ताजाच चांगला लागतो. वर दिलेल्या प्रमाणात ह्या पुरण पोळीच्या कृतीत दिलेल्या पोळ्यांना पुरेसा होतो.

पुरण पोळी


पुरण पोळी हा असा एक प्रकार आहे जो मला आईनी बनवलेलाच आवडतो. बरेच लोक त्याला पराठ्यासारखा बनवतात पण पोळी आणि पराठा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पोळी हि एकदम मऊसुत असणे एकदम महत्वाचे आहे. आईकाढून आधी मी ह्याची कृती घेतलेली पण मला काही आई सारखी मऊ पोळी बनवायला जमली नाही. आता पुण्यात असताना मी आई कडून चांगली शिकून आले आणि इथे दसर्याच्या निमित्तानी देत आहे. सगळ्यांना दसर्याच्या शुभेच्छा.

पुरण पोळी
साहित्य
४ वाटी हरबरा डाळ
३ वाटी गुळ
२ वाटी पीठ
१ चमचा मैदा
१ वाटी तांदुळाचे पीठ
१/२ वाटी तेल

कृती
  • मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून एकदम मऊ पीठ भिजवणे.
  • पीठ स्टीलच्या भांड्यात टाकून बोटे दाबून खड्डे करणे.
  • सगळी भोके बुडतील इतके तेल ओतणे आणि कमीत कमी २ तास भिजायला ठेवणे.
  • हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घेणे.
  • डाळीतील जास्तीचे पाणी बाजूला काढणे. (जास्तीच्या पाण्याची कटाची आमटी बनवता येईल)
  • त्यात गुळ घालुन कढईत सुकेपर्यंत शिजवणे.
  • पुरण पुरण यंत्रातून फिरवणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • पुरण पोळी करण्यासाठी तवा एकदम मंद आचेवर गरम करणे.
  • पुरणाचा लिंबाच्या दुप्पट आकाराचा गोळा बनवणे.
  • पिठाचा लिंबाच्या आकाराचा गोळा बनवणे व त्याची वाटी बनवणे. त्यात पुरणाचा गोळा घालुन पीठ बंद करणे.
  • गोळे तळव्यावर ठेवून अलगद दाबणे. पीठाचे कव्हर बाजूला गेले तर ओढून पुन्हा आत मध्ये घेणे
  • भरपूर तांदुळाचे पीठ पोलपाटाला लावणे. पुरण पोळीचा गोळा तांदुळाच्या पिठात बुडवून लाटणे.
  • मध्ये मध्ये पोळी हातावर घेवून खाली चिकट नाही ह्याची खात्री करणे व मधून मधून तांदुळाचे पीठ लावत राहणे.
  • एकदम अलगद आणि बाहेरच्या दिशेनी लाटणे महत्वाचे आहे.
  • पोळी गरम तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूनी भाजणे. दुमडून वाढणे.

टीप
पोळीच्या पिठाचा इलॅस्टिकपणा पोळीला पातळ लाटण्यासाठी आणि त्याचा थर पातळ ठेवण्यासाठी उपयोगी पडतो.
पुरण पोळी बनवताना पहिल्यांदा छोटी लाटून बघणे व जसे जमेल तसे मोठे मोठे करणे. भरपूर तांदुळाचे पीठ वापरणे व नंतर पाहिजे तर स्वतःच्या सोयीप्रमाणे कमी करणे.
पोळी पोलपाटाला चिकट नाही हे बघण्यासाठी तळवा पोळीवर ठेवून पोलपाट उलटे करणे.तव्यावर पोळी टाकताना पण तसेच करणे. कधीही बोटांनी पोळी उचलू नये.
पोळीच्या कडांना जास्त पीठ असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की पुरणापेक्षा पीठ जास्त वापरलाय. त्या नंतरच्या पोळीला थोडे कमी पीठ वापरून बघणे
पोळी लाटताना बाहेरच्या बाजूला लाटल्यानी पोळी सगळीकडून चांगली पसरते आणि बाहेरच कव्हर पण तुटत नाही.
शेवटची टीप म्हणजे हि एकदम किचकट कृती आहे त्यामुळे पहिल्यांदा यश नाही आलेतरी दुखी होऊ नये, थोड्या प्रयत्नानंतर यश नक्की येईल. मी आईनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी सांगायचा प्रयत्न केलाय. आशा आहे त्याचा उपयोग होईल

खजुराचे लाडू


काल असेच इंटरनेटवर हि पाककृती दिसली आणि घरात असलेल्या सगळ्या साहित्यातून हि डीश बनत असल्यानी लगेच बनवली

खजुराचे लाडू
साहित्य
२ वाटी बियाविना खजूर
१ वाटी काजू
१ वाटी बदाम
१ वाटी सुके खोबरे
१ वाटी खसखस
१ चमचा तूप

कृती
  • कढईट तूप गरम करून त्यात खजूर घालणे.
  • खजूर शिजेपर्यंत परतणे व नंतर थंड करण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • काजू आणि बदाम वेगवेगळे बारीक वाटणे.
  • शिजवलेले बारीक खजूर बारीक वाटणे
  • खजुराची पेस्ट, बदाम पूड, काजू पूड, सुके खोबरे आणि खसखस एकत्र करणे.
  • लिंबाच्या आकाराचे लाडू वळणे.

टीप
एकदम सोप्पी आणि पटकन बनणारी हि कृती एकदम छान आहे आणि प्रसादासाठी एकदम चांगला आहे

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP