Showing posts with label खोबरे. Show all posts
Showing posts with label खोबरे. Show all posts

भरली भेंडी


ही पाककृती मी एकंदर ८ महिन्यांपूर्वी आईकडून मागून घेतलेली पण आज ही भाजी बनवण्याचा मुहूर्त आला. हा माझा भेंडीचा सगळ्यात आवडता भाजी प्रकार म्हणूनच इथे पाककृती देत आहे.

भरली भेंडी
साहित्य
१/२ किलो भेंडी
१.५ वाटी किसलेले खोबरे
१/२ चमचा बडीशेप
१/४ चमचा मौव्हरी
१/४ चमचा गरम मसाला
३/४ चमचा तिखट
१ वाटी दही
चिमुटभर हिंग
चिमुटभर साखर
मीठ चवीपुरतं
तेल

कृती
  • भेंडी धुवून त्याचे उभे तुकडे करणे
  • एका भांड्यात दही, खोबरे, तिखट, गरम मसाला आणि १/४ चमचा बडीशेप एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून मौव्हरी, उरलेली १/४ चमचा बडीशेप घालुन फोडणी करणे
  • त्यात हिंग, चिरलेली भेंडी आणि दही-खोबरे-मसाला मिश्रण घालुन नीट एकत्र करणे.
  • कढईवर ताट झाकून ताटावर थोडे पाणी घालणे. असेच बेताचे शिजेपर्यंत धीम्या आचेवर ठेवणे. अधून मधून हलवणे ज्यानीकरून भजी करपणार नाही
  • त्यात साखर आणि मीठ घालुन भाजी पूर्णपणे शिजवणे.

टीप
ही भाजी ताज्या कवळ्या भेंडीची केली तर उत्तम होते. जर भेंडी जून असेल तर भाजीची चव जमून येत नाही

व्हेज बिर्यानी


मी ही बिर्यानी बरेच वेळा बनवलीये पण शेवटी काल फोटो काढण्याचा अवसर मिळाला. त्यामुळे खास माझ्या व्हेजीटेरीअन दोस्तांसाठी ही पाककृती.

व्हेज बिर्यानी
साहित्य
३ वाटी तांदूळ
३५०ग्राम भेंडी
२५० ग्राम छोटी वांगी
२५० ग्राम गाजर
२ कच्ची केळी
४ बटाटे
४ कांदे
३ टोमेटो
२ चमचे पुदिना पानं
१० लसूण पाकळ्या
२ चमचे किसलेला आलं
१/२ वाटी काजू
१/४ वाटी बदाम
१ चमचा किसलेले सुके खोबरे
१/२ चमचा खसखस
२ सुक्या मिरच्या
१/४ चमचे बडीशेप
१/४ चमचा मिरे
१ चमचा जिरे
१ चमचा धने
३/४ चमचे तिखट
१ चमचा गरम मसाला
२ वेलची
२ लवंग
३ दालचिनी काड्या
१/४ वाटी दुध
चिमुटभर केशर
मीठ चवीपुरता
तूप
तेल

कृती
  • कुकरमध्ये दोन बटाटे शिजवून घेणे
  • तांदूळ गरम पाण्यात अर्धा तास भिजवणे
  • खसखस पाण्यात भिजवून ठेवणे
  • वांगी, भेंडी, सालं काढून आणि चिरून कच्ची केळी, २ बटाटे आणि गाजर तळून घेणे.
  • एका भांड्यात पाणी गरम करून त्यात भिजवलेले तांदूळ घालणे. भात बोटचेपा शिजेपर्यंत शिजवून घेणे. जास्तीचे पाणी गळून टाकणे.
  • एक चमचा तूप गरम करून त्यात वेलची, लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा टाकणे. हे मिश्रण भातात घालुन एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात २ कांदे बारीक चिरून शिजवणे. तेलातून बाजूला काढून ठेवणे.
  • त्याच कढईत अजून एक चमचा तेल घालुन, जिरे, मिरे, सुकी मिरची, धने, बडीशेप, सुके खोबरे, दालचिनी, १/४ वाटी काजू आणि बदाम घालुन तळणे
  • त्यात गरम मसाला, तिखट, खसखस, पुदिना पानं आणि आधी भाजलेला कांदा घालुन ढवळणे. मसाले सुगंध सोदेपार्यानता भाजून घेणे.
  • मिश्रण थंड करून त्यात टोमेटो घालुन मिक्सरमध्ये वाटणे.
  • कढईत तूप गरम करून त्यात वरचे वाटलेले मिश्रण घालणे. तेल सोडेपर्यंत भाजून घेणे.
  • आता त्यात तळलेल्या भाज्या आणि मीठ घालुन २ मिनिट शिजवणे.
  • दुध आणि केशर एकत्र करून गरम करून घेणे.
  • उरलेले २ कांदे बारीक उभे चिरून आणि काजू कुरकुरीत आणि गुलाबी होईपर्यंत तळून घेणे.
  • कुकरला तूप लावून त्यात उकडलेल्या बटाट्याचा, १/३ भाग भात, १/२ भाग भाजी, अजून १/३ भाग भात, बाकी उरलेली १/२ भाग भाजी आणि उरलेला १/३ भाग भात असे थर लावणे.
  • ह्या थरांच्या आर पार भोकं पाडून त्यावर केशर-दुधाचे मिश्रण शिंपडणे.
  • कुकर मंद आचेवर ठेवून, एक शिट्टी होईपर्यंत शिजवणे. बिर्यानीवर आधी तळलेला कांदा आणि काजू पसरवून वाढणे.

टीप
मी भाज्या ग्रेव्हीमध्ये शिजवण्याऎवजी त्यांना तळून ग्रेव्हीमध्ये घातले. त्यामुळे कुठलीच भाजी अर्धी कच्ची किंव्हा जास्त शिजली नाही आणि चव एकदम छान आली.
भाज्यातळताना छोटे बटाटे असतेतर जास्त चांगले झाले असते तर अख्खे तळता आले असते असे राहून राहून वाटले.

खतखते


मला एकदम लहान असल्यापासून हा पदार्थ खूप आवडतो. बेळगावला काकीकडे गेल्यावर तिथे खायचो. आतापर्यंत मला लक्षात नव्हता आला की हा एकदम तब्येतीसाठी उत्कृष्ठ पदार्थ आहे :) नावाप्रमाणेच फ्रीजमधले सगळे संपवण्यासाठी एकदम उत्तम

खतखते
साहित्य
१ वाटी घेवडा
१/२ वाटी मटार
२ शेवग्याच्या शेंगा
२ कणीस
१ बटाटा
१ रताळे
१ कच्चे केळे
१.५ चमचा चिंच
१/४ वाटी गुळ
१/२ वाटी खोबरे
१/४ चमचा धने
१ चमचा तिखट
१/४ चमचा हळद
चिमुटभर हिंग
२ चमचा तूप
मीठ

कृती
  • अर्धा वाटी पाण्यात चिंच भिजवणे.
  • मोठ्या भांड्यात घेवडा आणि ४ वाटी पाणी घालुन मोठ्या आचेवर ५ मिनिट शिजवणे.
  • कणीस ३ तुकडे करून त्यात घालणे. २ वाटी पाणी घालुन अजून ५ मिनिट शिजवणे.
  • त्यात शेवग्याच्या शेंगा, बटाटे, रताळे, कच्चे केळे आणि २ वाटी पाणी घालुन अर्धवट शिजवणे.
  • त्यात खोबरे, चिंच आणि घने अर्धा वाटी पाणी घालुन वाटून घालणे.
  • भाज्या शिजत आल्याकी त्यात मटार घालणे.
  • हळद, गुळ, तिखट आणि मीठ घालुन उकळवणे.
  • छोट्या कढईत तूप आणि म्हवरी घालुन फोडणी करणे व हिंग घालणे. फोडणी भाजीत घालणे.

टीप
ह्यात १ वाटी भोपळ्याचे तुकडे पण घालता येतील पण इथे मला न मिळाल्यानी वापरले नाहीये.

मेदू वड्यासाठी चटणी


माझ्याकडच्या पुस्तकात वाचून मी हि चटणी केली आणि एकदम मस्त झाली. वड्याबरोबर एकदम उत्तम (अर्थातच मला वडा सांबार जास्त आवडत असल्यानी मी त्याची आठवण काढली).

मेदू वड्यासाठी चटणी
साहित्य
१/२ नारळ
१/४ वाटी फुटाणे डाळ
६ हिरव्या मिरच्या
१ कोथिंबीर
१/२ वाटी दही
१/२ चमचा म्हवरी
१/२ चमचा उडीद डाळ
चिमुटभर हिंग
१ चमचा तेल
मीठ

कृती
  • नारळ खवून घेणे व हिरवी मिरची, कोथिंबीर, फुटाणे डाळ आणि मीठ घालुन मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
  • ह्या मिश्रणात दही घालुन एकत्र करणे.
  • कढईत ते; गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे व त्यात हिंग घालणे.
  • फोडणी चटणीत घालुन एकत्र करणे.

टीप
मी नारळाचे पाणीच नारळ मिश्रण वाटण्यासाठी वापरले त्यामुळे एकदम छान लागले आणि वेगळी साखर घालावी लागली नाही
तेलात लाल मिरची पण घालता येईल पण माझ्याकडे ती नसल्यानी मी नाही वापरली

मेदू वडा


मेदू वडा हा माझा आवडता पदार्थ. घरात संध्याकाळी यायचे पाहुणे दुपारी कळले तर बनवायला एकदम उत्तम.

मेदू वडा
साहित्य
२ वाटी उडीद डाळ
२ हिरव्या मिरच्या
४ खोबऱ्याचे तुकडे
१ कांदा
मीठ

कृती
  • डाळ धुवून ५-६ तास पाण्यात भिजवून ठेवणे.
  • जास्तीचे पाणी ओतून डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
  • त्यात मीठ, बारीक चिरलेल्या मिरच्या, कांदा आणि खोबरे घालुन एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून वडे मंद आचेवर भाजणे.

टीप
डाळ वाटल्याबरोबर लगेच वडे तळणे नाहीतर ते फार तेलकट होतात
वडे तेलात घातल्यावर ते तरंगायला पाहिजेत नाहीतर पिठात थोडे पाणी घालुन हलके करणे.
ह्यात आले पण घालता येते पण मला वाड्यात ते फारसे आवडत नसल्यानी मी वापरले नाही

कांदा पोहे


बरेच मित्र मैत्रिणी मला पटकन बनणाऱ्या आणि सोप्या नाश्त्याच्या कृती मागत आहेत. म्हणूनच इथे महाराष्ट्रातील अगदी घराघरात हमखास बनवला जाणारा सोप्पा आणि चविष्ठ पदार्थ देत आहे.

कांदा पोहे
साहित्य
२ वाटी पोहे
१/२ वाटी मटार
१ कांदा
चिमुटभर हळद
१/४ चमचा म्हवरी
१/४ चमचा जीरा
४ हिरव्या मिरच्या
४ चमचे किसलेले खोबरे
४ चमचा कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • पोहे धुवून त्यातील जास्तीचे पाणी ओतून झाकून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात म्हवरी व जीऱ्याची फोडणी करणे.
  • त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालुन भाजणे.
  • कांदा बारीक चिरून घालणे व पारदर्शक होईपर्यंत भाजणे.
  • त्यात हळद घालुन ढवळणे.
  • धुवून व भिजवून मऊ झालेले पोहे त्यात घालुन चांगले एकत्र करणे.
  • झाकणी ठेवून मंद आचेवर २-३ मिनिट वाफ येऊ देणे.
  • झाकणी काढून त्यात मीठ व मटार मिसळणे व पुन्हा ३-४ मिनिट झाकणी ठेवून मंद आचेवर वाफ काढणे.
  • ताटलीत खायला देताना वरून खोबरे व कोथिंबीर घालुन देणे.

टीप
पोहे धुवून झाकून बाजूला ठेवणे फार महत्वाचे आहे त्यामुळे ते चांगले मऊ होतात. जर पोहे थोडे कडकडीत वाटत असतील तर थोडे पाणी शिंपडणे. तसेच जास्तीचे पाणी काढायला पण विसरू नये नाहीतर पोहे जास्तच मऊ होतील व त्याचा लगदा होईल
मटारच्याऎवजी फोडणी बरोबर भाजलेले शेंगदाणेपण वापरता येतील, अजॉयला फार आवडतात
पोह्यात १/२ वाटी बटाट्याचे तुकडेपण फोडणीत घालता येतील व कांदा बटाटा पोहे बनवता येतील

कटाची आमटी


हि आमटी पुरण पोळीच्या डाळीच्या उरलेल्या पाण्यातून बनवतात. एकदम गोड आणि आंबट अशी हि आमटी पुरण पोळी बरोबर एकदम मस्त लागते.

कटाची आमटी
साहित्य
२ वाटी हरबरा डाळ शिजवलेले पाणी
१/२ वाटी पुरण
१/२ वाटी गुळ
२ चमचा चिंच
१ चमचा धने
१ चमचा जिरे
१/२ चमचा म्हवरी
१ चमचा तिखट
४ चमचा खोबरे
१५ कडीपत्याची पाने
मीठ
तेल

कृती
  • चिंच एक वाटी पाण्यात भिजवणे व बाजूला ठेवणे.
  • चमचाभर तेल गरम करून त्यात धने आणि जिरे फोडणी करणे.
  • किसलेले खोबरे घालुन गुलाबी रंगावर भाजणे.
  • मिक्सरमध्ये खोबऱ्याचे मिश्रण घालुन चिंचेबरोबर बारीक वाटणे.
  • अर्धा चमचा तेल गरम करून त्यात म्हवरी घालुन फोडणी करणे.
  • कडीपत्ता घालुन भाजणे
  • त्यात चिंच खोबऱ्याचे वाटण घालणे व एक मिनिट भाजणे.
  • तिखट घालुन अजून एक मिनिट भाजणे.
  • डाळीचे पाणी, पुरण आणि गुळ घालणे. जाड वाटल्यास थोडे पाणी पण घालणे.
  • मीठ घालुन आमटी उकळवणे.

टीप
डाळीचे पाणी नसेल तर साधे पाणी पण वापरता येईल
पुरण बनवण्यासाठी ह्या पुरण पोळीच्या कृतीचा उपयोग करणे

नारळाचा रस


आमच्या ह्या रसाशिवाय पुरण पोळी होऊच शकत नाही. इथे त्याची कृती देत आहे.

नारळाचा रस
साहित्य
४ वाटी खोबरे
१.५ वाटी गुळ
मीठ

कृती
  • मिक्सरमध्ये किसलेले खोबरे आणि पाणी घालुन वाटणे व पिळून दुध काढणे. तोच कीस सारखा पाणी घालुन ३ वेळा रस काढणे.
  • त्यात गुळ आणि मीठ घालुन ढवळणे.

टीप
हा रस ताजा ताजाच चांगला लागतो. वर दिलेल्या प्रमाणात ह्या पुरण पोळीच्या कृतीत दिलेल्या पोळ्यांना पुरेसा होतो.

खजुराचे लाडू


काल असेच इंटरनेटवर हि पाककृती दिसली आणि घरात असलेल्या सगळ्या साहित्यातून हि डीश बनत असल्यानी लगेच बनवली

खजुराचे लाडू
साहित्य
२ वाटी बियाविना खजूर
१ वाटी काजू
१ वाटी बदाम
१ वाटी सुके खोबरे
१ वाटी खसखस
१ चमचा तूप

कृती
  • कढईट तूप गरम करून त्यात खजूर घालणे.
  • खजूर शिजेपर्यंत परतणे व नंतर थंड करण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • काजू आणि बदाम वेगवेगळे बारीक वाटणे.
  • शिजवलेले बारीक खजूर बारीक वाटणे
  • खजुराची पेस्ट, बदाम पूड, काजू पूड, सुके खोबरे आणि खसखस एकत्र करणे.
  • लिंबाच्या आकाराचे लाडू वळणे.

टीप
एकदम सोप्पी आणि पटकन बनणारी हि कृती एकदम छान आहे आणि प्रसादासाठी एकदम चांगला आहे

खोबऱ्याची गोड चटणी


हैदराबादमध्ये चटणीज नावाचे एक हॉटेल आहे. तिथे खूप वेगवेगळ्या चटण्या मुख्य खाण्याबरोबर देतात. तिथल्याच एका चटणीला बघून मी हि चटणी बनवली

खोबऱ्याची गोड चटणी
साहित्य
१/२ नारळ
१.५ चमचा साखर
मीठ

कृती
  • खोबरे किसणे
  • त्यात साखर, मीठ आणि थोडे पाणी घालुन बारीक चटणी वाटणे.

टीप
नारळ पूर्ण न किसता त्याची खालची बाजू तशीच ठेवणे नाहीतर चटणी काळी होऊ शकते.

मसाले भात


हा मराठी पदार्थ लग्नात किंवा कुठल्याही कार्यक्रमात एकदम असायलाच हवा. साधा, सोप्पा आणि चाविस्थ भाताचा प्रकार.

मसाले भात
साहित्य
१ वाटी बासमती तांदूळ
१/४ वाटी दही
१/२ वाटी तोंडली
१/२ बटाटा
१/४ वाटी मटार
१/२ वाटी कोथिंबीर
१/२ वाटी किसलेले खोबरे
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
८-९ काजू
चिमुटभर वेलची पूड
२ लवंग
१ दालचिनी
१ तेजपत्ता
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
१ चमचा तूप
मीठ

कृती
  • तांदूळ धुवून पाणी निथळवणे.
  • त्यात तिखट, गरम मसाला, वेलची पूड, दही घालुन १० मिनिट ठेवणे.
  • कुकरमध्ये तूप घालुन त्यात म्हवरीची फोडणी करणे.
  • त्यात हिंग, तेजपत्ता, दालचिनी आणि काजू घालुन एक दोन मिनिट परतणे.
  • त्यात उभी चिरलेली तोंडली, चौकोनी चुरून बटाटा घालुन अजून दोन मिनिट परतणे.
  • त्यात तांदूळ, मटार आणि मीठ घालुन दोन मिनिट परतणे.
  • भातात २ वाटी पानिओ घालुन कुकरचे झाकण लावून ४ शिट्ट्या काढणे.
  • वाढताना ताटात भातावर खोबरे, कोथिंबीर आणि तूप सोडून देणे.

टीप
ह्यात फ्लावर किंवा वांगेपण वापरता येईल
खोबरे आणि कोथिंबीर घातल्यानी एकदम मस्त आणि वेगळी चव ह्या भाताला येते

खोबऱ्याची लस्सी


मी जेंव्हा हि कृती वाचलेली तेंव्हा मला बिलकुल वाटले नव्हते की ती इतकी सुंदर होईल.

खोबऱ्याची लस्सी
साहित्य
१/२ खोबरे
१ वाटी चक्का
८ चमचे साखर
चिमुटभर वेलची पूड
चिमुटभर केशर
मीठ

कृती
  • खोबरे किसून त्यात पाणी घालुन मिक्सरमध्ये वाटून खोबऱ्याचे दुध काढणे.
  • चक्का, केशर, वेलची पूड, साखर आणि मीठ मिक्सरमध्ये एकत्र वाटणे.
  • त्यात खोबऱ्याचे दुध घालुन पुन्हा वाटणे
  • मिश्रणात बर्फ घालुन पुन्हा थोडे वाटणे
  • प्यायला देताना त्यात केशर घालुन देणे.

टीप
चक्का दुकानातून खरेदी करता येईल किंवा घरी बनवता येईल. मी जेंव्हा श्रीखंड बनवले तेंव्हा त्यातील एक वाटी चक्क बाजूला ठेवून हि लस्सी बनवली. चक्का बनवण्याची कृती श्रीखंडआम्रखंड ह्या दोन्हींच्या कृतीत दिलेली आहे.
मी नेहमी घरी बनवलेले नारळाचे दुध वापरते जे एकदम जाड नसते त्यामुळे मी बर्फ न वापरता लस्सी बनवून मग थंड केली. जर विकतचे खोबऱ्याचे दुध वापरायचे असेल तर त्यात बर्फ किंवा पाणी वापरणे महत्वाचे आहे. १ वाटी चक्क्यात १ वाटी पाणी किंवा बर्फ आणि ३ वाटी नारळाचे दुध बरोबर होईल

मसालेदार बिर्यानी


मागच्यावेळी केलेली बियाणी आमच्या कडे काम करणाऱ्या बाईंच्या सांगण्याप्रमाणे केलेली. पण आज मी एका पुस्तकात वाचून हि केलेली बिर्यानी अजूनही सुंदर आणि चविष्ठ आहे.

मसालेदार बिर्यानी
साहित्य
४ चिकनचे लेग
२ वाटी तांदूळ
१ वाटी दही
४ कांदे
२ टोमाटो
१/४ वाटी दुध
१ बटाटा
मुठभर काजू
५-६ बदाम
२ चमचे तेल
१ चमचा पुदिना पाने
१ चमचा सुके खोबरे
२ वेलची
२ लवंग
३ दालचिनी
१ चमचा जीरा
१ चमचा धने
१ चमचा तिखट
१/४ चमचा मिरे पूड
१/२ चमचा खसखस
१/४ चमचा बडीशेप
१/२ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा आले
१ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
चिमुटभर केशर
मीठ

कृती
  • एका भांड्यात दही, हळद, गरम मसाला, १/२ चमचा लसूण पेस्ट, १/४ चमचा आले पेस्ट आणि मीठ एकत्र करणे.
  • चिकनचे तुकडे त्यात घालुन चांगले एकत्र करणे. फ्रीजमध्ये कमीत कमी ८ तास ठेवून देणे.
  • तांदूळ कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून घेणे.
  • ३-४ चमचे पाण्यात खसखस भिजवणे.
  • कोमट दुधात केशर घालुन बाजूला ठेवणे.
  • बटाटे उकडून थंड करून त्याच्या साली काढून चकत्या करणे व बाजूला ठेवणे.
  • २ कांदे पातळ उभे चिरून तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळणे.
  • त्याच तेलात ५-६ काजू बाजूला ठेवून बाकीचे तळून घेणे.
  • उरलेले कांदे बारीक कापून तेलात गुलाबी रंगावर भाजणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच तेलात २ दालचिनी, धने, जिरे, सुके खोबरे, बडीशेप, काजू आणि बदाम घालुन तळणे.
  • त्यात तिखट, मिरे पूड, खसखस, पुदिना पाने आणि आधी भाजलेला बारीक कांदा घालणे व भाजणे. मिश्रण थंड करणे.
  • मिश्रण मिक्सरमध्ये अर्धा टोमाटो सहित वाटणे.
  • २ चमचा तूप बाजूला ठेवून उरलेले गरम करणे व त्यात हा वाटलेला मसाला खमंग भाजून घेणे.
  • त्यात उरलेली आले पेस्ट, लसूण पेस्ट, बारीक चिरलेले टोमाटो आणि मीठ घालुन भाजणे.
  • त्यात चिकन त्याच्या मासाल्यासाहित घालुन पूर्ण सुकेपर्यंत भाजणे.
  • ग्रेव्हीतून बरेच तूप बाजूला सुटेल ते गाळून वेगळे करणे.
  • चिकन शिजत असताना ७ वाटी पाणी उकळून त्यात तांदूळ घालुन त्यावर झाकणी ठेवून अर्धवट शिजवून घेणे. उरलेले पाणी गाळून टाकणे व थंड पाण्याखाली भात धुवून घेणे व बाजूला ठेवणे.
  • १/२ चमचा तूप गरम करून त्यात उरलेले दालचिनी, लवंग, वेलची घालुन तळणे व भातावर सोडणे. त्यात मीठ घालुन चांगले एकत्र करणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून बटाट्याच्या चाकात्यांचा थर लावणे.
  • भाताचा १/३ भाग बटाट्यावर पसरवणे. त्यावर तळलेले १/३ काजूचा वाटा, तळलेल्या कांद्याचा १/३ वाटा आणि अर्धे चिकन पसरणे.
  • पुन्हा १/३ भाताचा वाटा, १/३ भाग काजू, १/३ भाग कांदा आणि उरलेले चिकन पसरवणे
  • वरून उरलेला भात पसरवणे व त्यावर उरलेले काजू आणि कांदा पसरवणे.
  • परतणीच्या मागच्या बाजूनी पूर्ण थरातून जाईल अशी ५-६ भोके पाडणे.
  • चिकनमधून वेगळे केलेले तूप, केशर दुध वरून ओतणे.
  • मंद आचेवर तवा ठेवून त्यावर हा कुकर बंद करून ठेवणे व १५ मिनिट शिजवणे व नंतर गरम गरम रायत्यासोबत खायला देणे.

टीप
थोडी मोठी कृती आहे पण इतकी चविष्ठ बिर्यानी बनते की कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल
बटाटे कुकर मध्ये खाली लावल्यानी भात खालून करपणार नाही.
सगळे पदार्थ आधीच शिजवून मग त्याचे थर लावल्यानी चिकन किंवा भात अर्धवट कच्चे राहण्याची चूक होऊ शकत नाही.

वडा पाव आणि लसुणाची चटणी


अजॉय खूप दिवसांपासून मला वडा पाव किंवा बटाटे वडा बनवायला सांगत होता. त्यामुळे त्याच्या वाढदिवसाला मी तो बनवायचे ठरवले.

वडा पाव

वडा पाव
साहित्य
२ बटाटे
६ पाव
१/२ वाटी बेसन
१/२ लिंबू
४ हिरव्या मिरच्या
१/४ चमचा लसूण पेस्ट
१/४ चमचा आले पेस्ट
चिमुटभर सोडा
१/४ चमचा म्हवरी
१/२ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
मीठ
तेल

कृती
  • बटाटे उकडून घेणे.
  • मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, आले पेस्ट, लसूण पेस्ट एकत्र बारीक वाटणे.
  • बटाटे बारीक कापणे व त्यात वाटण आणि लिंबाचा रस घालुन एकत्र करणे.
  • कढईत थोडेसे तेल गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे व अर्धी हळद घालणे.
  • फोडणी बटाट्यात घालुन एकत्र करणे व ६ गोळे बनवणे.
  • एका भांड्यात बेसन, तिखट, उरलेली हळद, खाण्याचा सोडा घालुन पातळ पीठ बनवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यातील २ चमचा तेल बेसनच्या पिठात घालणे.
  • बटाट्याचा गोळा बेसनात बुडवून तेलात तळणे.
  • पाव मध्ये चीर्तून त्यावर लसुणाची चटणी आणि वडा घालुन गरम गरम खायला देणे

टीप
बटाटे वड्याला भिजवायचे बेसनाचे पीठ जाड झाले तर वड्याला चव येत नाही त्यामुळे पीठ पातळ बनवणे.
पिठात तेल घातल्यानी वडे तेलकट होत नाहीत
बटाटा वडा पावाशिवाय पण देता येईल

लसुणाची चटणी

लसुणाची चटणी
साहित्य
१/२ सुके खोबऱ्याची वाटी
१०-१२ लसुणाच्या पाकळ्या
४ चमचे तिखट
१-२ चिंचेचे तुकडे
१/२ चमचा साखर
मीठ

कृती

  • सुके खोबरे किसून घेणे व कढईत गुलाबी होईपर्यंत भाजून घेणे.
  • मिक्सरमध्ये लसुणाच्या पाकळ्या, तिखट, साखर आणि मीठ एकत्र बारीक वाटणे.
  • त्यात चिंच घालुन अजून वाटणे
  • भाजलेले खोबरे घालुन बारीक पूड होईपर्यंत वाटणे.

टीप
हि चटणी थोडे दिवस ठेवता येईल आणि भाकरीबरोबर पण हि चटणी छान लागते

फणसाची भाजी


ह्या वेळी बाजारात कच्चा फणस मिळाला त्यामुळे मी त्याची भाजी करून बघितली

फणसाची भाजी
साहित्य
१ कच्चा फणस
४ चमचे शेंगदाणा कुट
१/२ नारळ
२ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा हळद
१ चमचा गुळ
१ चमचा म्हवरी
मीठ
तेल

कृती
  • फणसाची साल आणि आतील कडक जाड गर कापून टाकणे.
  • उरलेले गरे बियांसकट बारीक चिरणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे
  • त्यात हळद, हिरव्या मिरच्या, चिरलेला फणस घालणे व ३-४ मिनिट परतणे.
  • साधारण २ वाटी पाणी घालुन फणस झाकण लावून शिजवणे. लागल्यास अजून थोडे थोडे पाणी घालत राहणे
  • भाजी शिजल्यावर त्यात गुळ, तिखट, मीठ, किसलेले खोबरे, शेंगदाणा कुट घालुन ढवळणे.

टीप
फणस कापताना हाताला आणि सुरीला तेल लावणे म्हणजे तो चिकटत नाही

सुरळीची वडी


मला सुरळीची वडी फार आवडते आणि मला नेहमी वाटायचे की ती करायला फार किचकट आणि अवघड आहे परंतु आता असे लक्षात आलेय की हि एकदम सोप्पी आणि पटकन होणारी कृती आहे


सुरळीची वडी
साहित्य
१ वाटी बेसन
१ चमचा मैदा
१ वाटी कोथिंबीर
१/२ नलर
१/२ चमचा आले पेस्ट
२-३ हिरव्या मिरच्या
१ चमचा हळद
१ चमचा म्हवरी
३/४ वाटी आंबट ताक
२ वाटी पाणी
मीठ
तेल

कृती
  • आले पेस्तम मिरच्या आणि मीठ थोडेसे पाणी घालुन बारीक वाटणे.
  • त्यात बेसन, मैदा, १/२ चमचा हळद, ताक आणि पाणी घालुन एकत्र करणे.
  • मिश्रण गाळून घेणे व कढईत सारखे ढवळत जाड होईपर्यंत शिजवणे.
  • ३ ताटल्याना तेलाचा हात लावून त्यावर ह्या मिश्रणाचा बारीक थर देणे.
  • कढईत २-३ चमचे तेल गरम करून त्यात म्हवरी घालुन फोडणी करणे व उरलेली हळद घालणे.
  • नारळ किसणे व कोथिंबीर बारीक चिरणे.
  • तिन्ही ताटांवर म्हवरी-हळद फोडणी, खोबरे आणि कोथिंबीर पसरवणे.
  • मिश्रणाच्या ५ उभ्या पट्ट्या कापणे व प्रत्येक पट्टी गुंडाळून वडी बनवणे. वरून उरलेले खोबरे, कोथिंबीर आणि फोडणी घालणे,

टीप
मिश्रण गाळल्यामुळे ते एकदम एकसंध होते आणि मिरची किंवा आल्याचे मोठे तुकडे त्यात येत नाहीत
आईनी मला कुकरमध्ये एक शिट्टी काढून मिश्रण शिजवता येईल असे सांगितलंय. मी ते जरूर पुढच्यावेळी करून बघणार आहे
मिश्रण ताटावर एकदम पटकन पसरवायला पाहिजे व एकदम पातळ पसरवायला पाहिजे. मी ह्यावेळी दोन ताटांवर पसरवलेले पण नन्तर ३ ताटांचा प्रयोग करणारे. सुरुवातीला थोडा जाड झाल्यास हरकत नाही हळू हळू पातळ बनवता येईल

खोबऱ्याचे नाडू


मी पाटीशाप्ता बनवलेले तेंव्हा त्याचे खोबऱ्याचे मिश्रण जास्त केलेले आणि मी त्याचे मोदक बनवण्याचा विचार करत होते पण अजॉयनी हे छोटे लाडू - नाडू बनवायला सांगितले.

खोबऱ्याचे नाडू
साहित्य
१ वाटी गुळाचे तुकडे
१/२ वाटी गुळ
१/२ वाटी खोबरे

कृती
  • गुळाचे तुकडे १.५ मिनिट मायक्रोवेव्ह करणे.
  • कढईमध्ये तो गरम केलेला गुळ, उरलेला गुळ किसून आणि खोबरे घालणे व सारखे ढवळत शिजवणे.
  • मिश्रण एकसंध गोळा बनून आल्यावर त्याचे छोटे छोटे लाडू बनवणे

टीप
हे लाडू मस्त कॅरॅमेल सारखे कुरकुरीत लागतात. नेहमीचे लाडू मऊ असतात पण मला हे असे कुरकुरीत जास्त आवडतात. ते मायक्रोवेव्ह मध्ये गुळ गरम केल्यानी असे बनतात. मला ते गॅसवर कसे बनवायचे माहित नाही त्यामुळे जर कोणाला माहिती असेल तर सांगणे.

पाटीशाप्ता


मा हे खूपवेळा बनवतात. मी नेहमी हे बनवण्याचा विचार करते पण आज बनवण्याचा मुहूर्त लागला

पाटीशाप्ता
साहित्य
१ वाटी खोबरे
१/२ वाटी गुळ
१ वाटी रवा
१/२ वाटी + थोडासा मैदा
१ चमचा इडली रवा
१ चमचा साखर
दुध
तेल

कृती
  • किसलेले खोबरे आणि गुळ कढईत शिजवून बाजूला ठेवणे.
  • एका भांड्यात रवा, इडली रवा, मैदा, साखर आणि दुध एकत्र करून पातळ पीठ भिजवणे.
  • तवा गरम करून त्यावर एखाद थेंब तेल सोडणे.
  • भिजवलेल्या पीठाचे छोटे घावन काढणे व जेव्हा दोन्ही बाजूनी शिजेल तेंव्हा त्यावर गुळाचे मिश्रण ठेवून गुंडाळणे

टीप
मी पीठ भिजवून ५-१० मिनिट बाजूला ठेवले त्यामुळे रवा पूर्ण भिजतो आणि पीठ जाड होते. १/२ चमचा पाणी मी दर २-३ घावानानंतर घालुन पीठ बरोबर करत होते

आप्पे आणि खोबऱ्याची चटणी


अगदी लहान असल्यापासून घरात सगळ्यांना आप्पे फार आवडायचे. माहिती नाही मी आधी का नाही बनवलेत पण आज पहिल्यांदा करून बघितले आणि एकदम मस्त झालेत. आईला खूप वेळा फोन करून विचारावे लागले पण सगळे सार्थक झाले

आप्पे

आप्पे
साहित्य
१/२ वाटी उडीद डाळ
१/२ चमचा हरभरा डाळ
३ वाटी इडली रवा
मीठ

कृती
  • हरभरा डाळ आणि उडीद डाळ एकत्र १२ तास पाण्यात भिजवणे.
  • इडली रवा सुद्धा १२ तास भिजवणे.
  • १२ तासांनी डाळीतील पाणी काढून बारीक वाटणे.
  • त्यात इडली रवा बारीक वाटून घालणे व चांगले एकत्र करणे. १२ तास आंबावण्यासाठी ठेवणे.
  • सकाळी आप्पे पात्र गरम करून त्यात हे मिश्रण घालणे. दोन्ही बाजूनी गुलाबी होई पर्यंत मध्यम आचेवर भाजणे.

टीप
थंडीच्या दिवसात पीठ आंबवण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे भांड्याखाली पाणी गरम करून ठेवणे.
आप्पे बनवण्यासाठी आज काल नॉनस्टिक पात्र मिळते ते जास्त बरे पडते आणि त्यात एकदमच तेल लागत नाही.

खोबऱ्याची चटणी

खोबऱ्याची चटणी
साहित्य
१/२ खोबरे
मुठभर कोथिंबीर
४ चमचे चणा डाळ
१ हिरवी मिरची
१ चमचा साखर
मीठ

कृती

  • खोबरे किसून घेणे.
  • मिक्सरमध्ये किसलेले खोबरे, कोथिंबीर, चणा डाळ, हिरव्या मिरच्या, साखर आणि मीठ घालुन एकत्र वाटणे. लागल्यास थोडे पाणी घालणे.

टीप
ह्या चटणीत चणा डाळ असल्यास घालणे पण वापरल्यास एकदम सुंदर चव येते

कोळंबी मसाला


कोळंबी हा माझा सगळ्यात जास्त आवडता प्रकार. पण मा जो कोळंबीचा मसाला बनवतात तो तर एकदमच जास्त आवडता, अगदी तळलेल्या कोळंबीपेक्षा सुद्धा.

कोळंबी मसाला
साहित्य
४०० ग्राम कोळंबी
२ कांदे
२ टोमाटो
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१ चमचा तिखट
१ चमचा हळद
किसलेले खोबरे
मीठ
तेल

कृती
  • कढईत तेल गरम करणे.
  • त्यात कोळंबी घालुन १-२ मिनिट भाजून घेणे व बाजूला ठेवून देणे.
  • त्याच तेलात बारीक चिरलेला कांदा भाजणे.
  • कांदा शिजल्यावर त्यात लसूण पेस्ट, आले पेस्ट, तिखट आणि हळद घालुन पुन्हा भाजणे.
  • त्यात बारीक चिरलेले टोमाटो घालुन २-३ मिनिट शिजवणे.
  • त्यात पाणी घालुन झाकणी लावून पूर्णपणे शिजवणे व थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे.
  • कढईत वाटलेले मिश्रण आणि एक वाटी पाणी घालणे. त्यात कोळंबी घालुन पूर्णपणे शिजवणे.
  • त्यात किसलेले खोबरे आणि मीठ घालुन अजून एक मिनिट शिजवणे.

टीप
मां मिक्सरमध्ये वाटून नाही घेत व त्याऎवजी टोमाटो पूर्ण शिजवून घेते पण मला वाटलेली ग्रेव्ही जास्त बरी वाटते त्यामुळे कांद्याची चवपण त्यात येते.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP