Showing posts with label दही. Show all posts
Showing posts with label दही. Show all posts

ब्रेडचे दही वडे


अजॉय जेंव्हा घरी ब्रेड घेऊन आला तेंव्हा मी माझ्या ठरलेल्या नवीन वर्षाच्या नवीन उपक्रमानुसार तो तसाच न खाता काहीतरी नवीन बनवण्याचे ठरवले. हा चविष्ठ वडा करायला एकदम सोपा आहे.

ब्रेडचे दही वडे
साहित्य
८ ब्रेडचे स्लाईसेस
२.५ वाटी दही
२ हिरव्या मिरच्या
४ लसूण पाकळ्या
३ चमचे साखर
१/४ चमचा मिरे
चिमुटभर तिखट
चिमुटभर चाट मसाला
मुठभर कोथिंबीर
मीठ
तेल

कृती
  • ब्रेड पाण्यात भिजवून लगेच हातावर ठेवून दाबून त्यातील पाणी काढून टाकावे.
  • परातीत ब्रेड, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि लसूण, मिरे पूड आणि मीठ घालुन मळून घ्यावे.
  • लिंबाच्या आकाराचे गोळे करून ते गरम तेलात भाजून घ्यावे.
  • एका भांड्यात दही, साखर, तिखट, चाट मसाला आणि मीठ घालुन ढवळून घ्यावे.
  • प्लेटमध्ये वडे घालुन त्यावर दही पसरवावे व वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन खायला देणे

टीप
सगळे वडे लगेच खायचे नसतील तर ब्रेडचे मळलेले मिश्रण ठेवून खायच्या आधी तळावे नाहीतर तळलेले वडे ठेवल्यास ते रबरी होतात.

रेड वेल्वेट कपकेक


आई बाबा इथे होते तेंव्हाच मी हे बनवलेले पण तेंव्हा जरा सुके झालेले आणि रंग पण बरोबर आलं नव्हता. आज बनवताना मी थोडा प्रमाण बदललं आणि आता ते एकदम सुंदर झालेत. मी त्यांना पांढरे चॉकलेट क्रीम चीजचे आईसिंग केलं

रेड वेल्वेट कपकेक
साहित्य
२.५ वाटी मैदा
१/४ चमचा कोको पूड
१/४ चमचा बेकिंग सोडा
१/४ चमचा मीठ
१.५ वाटी साखर
१ अंड
१.५ वाटी तेल
२ चमचे दही
१ चमचा पातळ लाल खाण्याचा रंग
१/४ चमचा व्हिनेगर
१/४ चमचा व्हॅनिला ईसेन्स

कृती
  • ३५०F/१७५C वर ओव्हन गरम करणे
  • मैदा व कोको पूड चाळून भांड्यात घेणे.
  • त्यात बेकिंग सोडा, मीठ आणि साखर घालुन एकत्र करणे.
  • दुसऱ्या भांड्यात अंड, तेल, लाल रंग, व्हॅनिला ईसेन्स आणि व्हिनेगर घालणे.
  • एका वाटीत दही घेऊन त्यात उरलेल्या मापाचे पाणी घालणे. चमच्यानी ढवळून अंड, तेल मिश्रणात घालणे
  • मिश्रण कमी वेगावर एकजीव होईपर्यंत फेटून घेणे.
  • त्यात मैदा-कोको पूडचे सर्व मिश्रण प्रत्येक वेळी एक वाटी भर घालुन एकजीव होई पर्यंत फेटून घेणे.
  • कपकेकच्या भांड्यात कागदी कप घालुन १२ कप मध्ये मिश्रण घालणे.
  • केक ३५०F/१७५C वर ओव्हनमध्ये २२ मिनिट भाजणे.

टीप
मी नेहमी साधारणतः ७०% केकचा भाजण्याचा वेळ झाला की त्याला वळवून ठेवते (ह्या केक साठी साधारणतः १५ मिनिट) त्यामुळे केके सगळ्याबाजुनी एकदम मस्त भाजला जातो.

भरली भेंडी


ही पाककृती मी एकंदर ८ महिन्यांपूर्वी आईकडून मागून घेतलेली पण आज ही भाजी बनवण्याचा मुहूर्त आला. हा माझा भेंडीचा सगळ्यात आवडता भाजी प्रकार म्हणूनच इथे पाककृती देत आहे.

भरली भेंडी
साहित्य
१/२ किलो भेंडी
१.५ वाटी किसलेले खोबरे
१/२ चमचा बडीशेप
१/४ चमचा मौव्हरी
१/४ चमचा गरम मसाला
३/४ चमचा तिखट
१ वाटी दही
चिमुटभर हिंग
चिमुटभर साखर
मीठ चवीपुरतं
तेल

कृती
  • भेंडी धुवून त्याचे उभे तुकडे करणे
  • एका भांड्यात दही, खोबरे, तिखट, गरम मसाला आणि १/४ चमचा बडीशेप एकत्र करणे.
  • कढईत तेल गरम करून मौव्हरी, उरलेली १/४ चमचा बडीशेप घालुन फोडणी करणे
  • त्यात हिंग, चिरलेली भेंडी आणि दही-खोबरे-मसाला मिश्रण घालुन नीट एकत्र करणे.
  • कढईवर ताट झाकून ताटावर थोडे पाणी घालणे. असेच बेताचे शिजेपर्यंत धीम्या आचेवर ठेवणे. अधून मधून हलवणे ज्यानीकरून भजी करपणार नाही
  • त्यात साखर आणि मीठ घालुन भाजी पूर्णपणे शिजवणे.

टीप
ही भाजी ताज्या कवळ्या भेंडीची केली तर उत्तम होते. जर भेंडी जून असेल तर भाजीची चव जमून येत नाही

मिष्टी दोही


ही अजॉयची एकदम आवडती स्वीट. दिसायला एकदम सोपी वाटते पण मला फार कष्ट पडले. इथे दही जमवणे हे फार किचकट काम. खूप वेळा माझा प्रयोग फसला. पण आता मला एक युक्ती कळली की ज्यामुळे दही नेहमी चांगले जमते. लगेच मी पुन्हा मिष्टी दोहीचा प्रयत्न केला आणि तो एकदम यशस्वी ठरला.

मिष्टी दोही
साहित्य
१.५ लिटर दुध
१ वाटी साखर
१/२ वाटी दही

कृती
  • दुध उकळवणे.
  • त्यामध्ये १/४ वाटी साखर घालणे व सारखे ढवळत ते आटवणे. साधारण १ लिटर एवढे दुध राहीपर्यंत आटवणे.
  • आता दुध उकळवणे चालूच ठेवणे पण बाजूला एक पातेल्यात उरलेली ३/४ वाटी साखर आणि १/४ वाटी पाणी टाकून उकळवणे.
  • जेंव्हा साखरेचे पाणी गडद सोनेरी रंगाचे होईल तेंव्हा दुधाची आच कमी करून त्यात हे सोनेरी पाणी घालणे.
  • दुध आणखीन ५ मिनिट उकळवणे आणि नंतर कोमट होईपर्यंत थंड होऊ देणे
  • एका पातेल्यात दही व एक वाटी आधी बनवलेले दुध एकत्र करून फेटणे.
  • त्यात उरलेले दुध घालुन झाकण लाऊन रात्रभर दही जमू देणे
  • फ्रीजमध्ये कमीत कमी २ तास थंड करून मग वाढणे.

टीप
इथे दही जमवण्यासाठी मी दह्याचे भांडे कॅसेरॉलमध्ये (ज्यात पदार्थ गरम राहतात) ठेवून, तो कॅसेरॉल ओव्हनमध्ये ठेवते. ओव्हनचा लाईट चालू ठेवायचा. ओव्हन गरम करावा किंव्हा चालू ठेवायला लागत नाही. कॅसेरॉल दुधाचे तापमान वाचवतो आणि लाईट ओव्हनला कोमट ठेवतो.
सोनेरी साखरेचे पाणी दुधात घालताना हळू हळू घालणे कारण तापमानातील फरकामुळे दुध व साखरेचे पाणी उडून हात भाजण्याची शक्यता असते.
छोट्या छोट्या वाटीमध्ये पण दही जमवून वाटी तशीच्या तशी वाढू शकतात.
जाड दुध वापरले तर खूप चांगले दही जमते व चव पण चांगली येते. इथे हाफ अ‍ॅन्ड हाफ मिळते ते मी दुधाच्याऎवजी एक लिटर वापरले त्यामुळे मला दुध आटवावे लागले नाही.

खेकडा पुलाव


हल्ली आम्ही कोस्टकोमधून खेकडे आणायला चालू केले. सगळ्यात प्रथम जेंव्हा खेकडे घेऊन आलो तेंव्हा मी हा सगळे साहित्य अंदाजाने घालत घालत हा पुलाव बनवण्याचा प्रयत्न केला. एकदम मस्त झाला पदार्थ आणि इतका आवडीचा ठरला की आता आमच्या जेवणात तो बरेचदा दिसतो.

खेकडा पुलाव
साहित्य
१.५ वाटी तांदूळ
३०० ग्राम खेकड्याचा गर
१ वाटी दही
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा मिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा जिरे पूड
चिमुटभर दालचिनी पूड
चिमुटभर लवंग पूड
मीठ
तूप

कृती
  • दह्यामध्ये तिखट, मिरे पूड, धने पूड, जिरे पूड, दालचिनी पूड, लवंग पूड आणि मीठ घालणे.
  • दह्यामध्ये खेकड्याचा गर घालुन नीट हलवून २ तास बाजूला ठेवणे.
  • तांदूळ पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवणे
  • पाणी गरम करून त्यात भिजलेले तांदूळ घालुन शिजवणे. भात होत आलं की आचेवरून काढून बाजूला ठेवणे.
  • कधी मध्ये तूप गरम करून त्यात दही लावलेले खेकडे दह्यासकट घालुन मध्यम आचेवर ब्रावून रंग येईपर्यंत शिजवणे. खेकडे शिजतील आणि तूप बाजूला सुटेल.
  • त्यामध्ये शिजवलेला भात आणि चावीपुरात मीठ घालुन हलक्या हाताने ढवळणे.
  • १-२ मिनिट वाफ काढून रायत्याबरोबर वाढणे

टीप
इथे खूप मोठे खेकडे मिळतात. आम्ही एकंदर ४ पाय = १.५ पाउंड = ०.७ किलो होते. त्याचे कवच काढून त्यातून ३०० ग्राम गर आला. जर छोटे खेकडे असतील तर कावचासहित वापरता येतील.
खेकड्याचा गर काढण्यासाठी ते धुवून घेतल्यावर धार धार सुरीनी कवच कापले आणि अलगद पणे गर बाहेर काढला.

खजूर चॉकोचीप पॅन केक


मी बरेचवेळा पॅन केक बनवले आहेत कारण ते एकदम सोपा आणि चविष्ठ नाश्ता होतात. मी क्रॅनबेरी, आंबा,ब्लूबेरी असे वेग वेगळी फळे घालुन बनवलंय पण आज फळे नसल्यानी मी त्यात खजूर आणि चॉकोचीप घालुन बनवला. केक एकदम सुंदर झाला आणि नाश्ता एकदम मस्त होता.

खजूर चॉकोचीप पॅन केक
साहित्य
१/२ कप खजूर
१/४ वाटी चॉकोचीप
१/२ कप गव्हाचे पीठ
१/२ कप मैदा
३/४ वाटी दही
१ अंड
३/४ चमचा साखर
१/२ चमचा व्हॅनिला ईसेन्स
१/२ चमचा बेकिंग पूड
१/४ चमचा बेकिंग सोडा
२.५ चमचा वितळवळेल लोणी
मीठ
तेल

कृती
  • खजुरातून बिया काढून बारीक चिरावे.
  • मैदा आणि पीठ एकत्र चाळून घेणे.
  • त्यात साखर, मीठ, बेकिंग सोडा आणि बेकिंग पूड घालुन एकत्र करणे.
  • त्यात अंडे, दही, वितळवलेले लोणी आणि व्हॅनिला ईसेन्स घालुन एकत्र करणे.
  • त्यात १/२ वाटी कोमट पाणी घालुन फेटणे.
  • नॉनस्टिक तवा गरम करणे.
  • त्यावर एकावेळी अर्धा कप पीठ ओतणे व त्यावर चॉकोचीप आणि खजूर पसरवणे.
  • मध्यम आचेवर गुलाबी रंगावर दोन्ही बाजू परतून घेणे. देताना मध किव्हा मॅपल सिरप वरून ओतून खायला देणे.

टीप
पिठातच लोणी असल्यानी तव्याला तेल लावावं लागत नाही.
अजॉयला खजुराचा गोडपणा जरा जास्त वाटला त्यामुळे मला वाटतंय की डार्क चॉकोचीप वापरले तर गोड बरोबर होईल.

कोळंबी बरिटो बोल


चिपोटले हि अजॉयची आवडती फूडचेन आणि बऱ्याच वेळा तिथे जाण्यासाठी मागे लागतो. आम्ही तिथे नेहमी चिकन बरिटो बोल खातो. आज मी स्वतः घरी बनवण्याचे ठरवले पण माझ्याकडे बोनलेस चिकन नसल्यानी मी कोळंबी वापरली. फार छान झालेले

कोळंबी बरिटो बोल
साहित्य
४०० ग्राम कोळंबी
१.५ वाटी तांदूळ
५ टोमाटो
१ लिंबू
३ वाटी स्वीटकॉर्न
३ चमचे दही
३ चमचे तिखट
१/२ चमचा ओरिगानो
१/२ चमचा मिरे पूड
१/४ चमचा धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/२ वाटी किसलेले चीज
१/४ वाटी रेंच ड्रेसिंग
१/२ वाटी कोथिंबीर
४ चमचे लोणी
लेट्युस
मीठ
ओलिव्ह तेल

कृती
  • दह्यात एक चमचा तिखट, धने पूड, गरम मसाला घालुन एकत्र करणे. त्यात कोळंबी घालुन एकत्र करणे व बाजूला ठेवणे.
  • कुकरमध्ये तांदुळात २.५ वाटी पाणी घालुन भात बनवणे.
  • कढईत १/४ चमचा तेल घालुन त्यात कोथिंबीर थोडी शिजवून घेणे व भातात घालणे.
  • भातात लिंबाचा रस आणि मीठ घालुन एकत्र करणे व बाजूला ठेवणे
  • कढईत चमचाभर तेल घालुन त्यात टोमाटो वाटून घालणे. त्यात २ चमचा तिखट, मिरे पूड, ओरिगानो आणि मीठ घालुन चांगले शिजवणे. मिश्रण सुकले की बाजूला ठेवून देणे.
  • कढईत लोणी गरम करणे व त्यात कोळंबी मिश्रण सुकेपर्यंत भाजून घेणे
  • ३ मोठ्या भांड्यात बरिटो बनवण्यासाठी भाताचा थर देणे.
  • त्यावर कोळंबी, बर्रिक चिरलेले उरलेले २ टोमाटो आणि चीज घालणे.
  • स्वीटकॉर्न ३ मिनिट मायक्रोवेव्ह करून बोलमध्ये घालणे.
  • त्यावर टोमाटोचा तिखट सॉस, रेंच ड्रेसिंग आणि लेट्युस घालणे

टीप
मी कॉर्नला लवकर शिजवण्यासाठी मायक्रोवेव्ह केले. पण त्याऎवजी पाणी घालुन उकलावता पण येईल.
टोमाटोचा तिखट सॉस जास्त तिखट बनतो. मी अजून एक चमचा तिखट वापरलेले पण खूप मला ते जरा जास्तच तिखट वाटले.
जर घरी सार क्रीम असेल तर ते रेंच ड्रेसिंगच्याऎवजी वापरता येईल, माझ्याकडे नव्हते म्हणून मी ड्रेसिंग वापरले.
माझ्याकडची कोळंबी फार मोठी होती म्हणून तळल्यावर मी प्रत्येकाचे २-३ तुकडे केले.

दुधीभोपळ्याचा कोफ्ता


अजॉयला भोपळ्याचा कोफ्ता फार आवडतो, इतका की पुण्याला गेल्यावर मां त्यासाठी नेहमी बनवते. मागच्या वर्षापर्यंत आम्ही खूप वेळा पुण्याला जायचो त्यामुळे मी हे कधीच नाही बनवलं पण इथे आल्यापासून आम्ही दोघेसुद्धा कोफ्ता फार मिस करतो. त्यामुळे आता मांकडून ह्याची कृती घेऊन मी आज कोफ्ता बनवला.

दुधीभोपळ्याचा कोफ्ता
साहित्य
३ वाटी दुधीभोपळा
१ वाटी गाजर
१.५ वाटी बेसन
३ चमचा कॉर्न फ्लौर
२ कांदे
२ टोमाटो
२ वाटी दही
४ चमचे साखर
१/२ चमचा चाट मसाला
१/२ चमचा जीरा
१.५ चमचा तिखट
१/२ चमचा हळद
१ चमचा धने पूड
१ चमचा जिरे पूड
१ हिरवी मिरची
१/४ वाटी काजू
१/४ वाटी मनुका
तेल
मीठ

कृती
  • दुधीभोपळा आणि गाजर किसून घेणे.
  • तेल गरम करून त्यात जीऱ्याची फोडणी करणे.
  • त्यात किसलेला दुधीभोपळा आणि गाजर घालुन सारखे हलवत सुकेपर्यंत शिजवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात कांदा भाजणे व बाजूला ठेवणे
  • मिक्सरमध्ये टोमाटो, तिखट, जीरा पूड, धने पूड आणि मीठ वाटून घेणे
  • त्यात शिजवलेला कांदा घालुन बारीक वाटणे.
  • दुधीभोपळ्याच्या मिश्रणात बेसन घालुन मऊ पीठ भिजवणे.
  • मिश्रणाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून त्यात काजू, मनुका आणि बारीक हिरवी मिरचीचे तुकडे घालणे.
  • कोफ्ता तेलात गुलाबी रंगावर तळून घेणे.
  • कढईत वाटलेली पेस्ट, ३ वाटी पाणी घालुन ५-६ मिनिट उकळवणे.
  • त्यात कोफ्ता घालुन अजून थोडा वेळ उकळवणे.
  • एका भांड्यात दही, साखर आणि चाट मसाला एकत्र करणे.
  • वाढताना वाटीत कोफ्ता आणि त्याची कढी घालणे. त्यावर दही पसरवणे व किसलेले गाजर, काजू, मनुका घालुन देणे.

टीप
गाजराच्याऎवजी कच्चे केळेपण वापरता येईल

कोळंबीचे सॅन्डविच


सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्या. माझे नवीन वर्ष एकदम शांत होते, खूप जास्त जेट लॅगमुळे ९ वाजेपर्यंत जागणेपण मुश्कील झालेय. हि पाककृती खास आहे कारण ह्याची तयारी आदल्यावर्षी कायला चालू केली आणि पदार्थ ह्या वर्षी तयार झाला. हा मी अजॉयच्या खास मागणीवर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवला.

कोळंबीचे सॅन्डविच
साहित्य
१४-१६ ब्रेडचे तुकडे
४०० ग्राम कोळंबी
१/२ वाटी आम्बवलेली काकडी
४ चमचे दही
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा मिरे पूड
१/४ चमचा चाट मसाला
१/४ चमचा जीरा पूड
१/४ चमचा गरम मसाला
१/४ चमचा हळद
१/२ वाटी लोणी
मीठ

कृती
  • दही, तिखट, हळद, धने पूड, मिरे पूड, जीरा पूड, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ एकत्र करणे.
  • कोळंबीचे बारीक तुकडे करून ते दह्याच्या मिश्रणात घालुन एकत्र करणे व फ्रीजमध्ये ४-५ तास ठेवून देणे.
  • तवा गरम करून त्यात १/४ वाटी लोणी आणि कोळंबीचे मिश्रण घालणे.
  • तेज आचेवर सारखे परतत मिश्रण सुकेपर्यंत शिजवणे.
  • सॅन्डविच बनवण्यासाठी ब्रेंडच्या तुकड्यांवर आम्बवलेली काकडी आणि शिजवलेले कोळंबीचे मिश्रण घालुन लोणी लावून ग्रील करणे.

टीप
कोळंबीचे बारीक तुकडे केल्यानी एका घासातच पूर्ण कोळंबी निघून येणार नाही.

तंदुरी चिकन


सगळ्यात आवडता स्टारटर. हैद्राबादमध्ये असताना मी एव्हरेस्टचा मसाला वापरून बनवायचे पण आज इथे वेगवेगळे मसाले एकत्र करून बनवले

तंदुरी चिकन
साहित्य
६ कोंबडीचे पाय
३/४ वाटी दही
२ चमचा तिखट
१ चमचा गरम मसाला
२ चमचा आले पेस्ट
२ चमचा लसूण पेस्ट
४ चमचे लिंबू
१/२ चमचा चाट मसाला
२ चमचा तेल
१/२ चमचा लोणी
मीठ

कृती
  • कोंबडीच्या पायांवर धार धार चाकुनी चिरा मारणे.
  • त्याला २ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा तिखट लावून ३० मिनिट बाजूला ठेवणे.
  • एका भांड्यात दही, लसूण पेस्ट, आले पेस्ट, १ चमचा तिखट, २ चमचा लिंबाचा रस, गरम मसाला, तेल आणि मीठ एकत्र करणे.
  • हे मिश्रण कोंबडीला लावून फ्रीजमध्ये ४-५ तास ठेवणे.
  • ओव्हन ३९५F/२००C वर गरम करणे.
  • लोणी वितळवून चिकनवर सोडणे व ओव्हनमध्ये १५ मिनिट भाजणे
  • तुकडे परतवणे व लोणी सोडणे. अजून १५ मिनिट भाजणे.
  • पुन्हा परतवून लोणी सोडणे व १० मिनिट भाजणे.
  • चाट मसाला पसरवून, कांदा आणि लिंबाच्या तुकड्याबरोबर खायला देणे.

टीप
लेगच्याऎवजी ७०० ग्राम कुठलेही तुकडे वापरता येतील
हॉटेलमध्ये लाल रंग येण्यासाठी रंगाचा वापर करतात माझ्याकडे तो नसल्यानी आणि वापरायची इच्छा नसल्यानी मी वापरला नाहीये.
मी भाजण्यासाठी ह्या भांड्याचा वापर केला. त्यामुळे जास्तीचे तेल/लोणी खाली तव्यावर साठते.

पनीर बिर्यानी


मागच्या आठवड्यात मी हि बियाणी बनवलेली. बऱ्याच दिवसांपूर्वी अनुजानी मला व्हेज बिर्यानी बनव असे सांगितलेले आणि मला असेही आठवतेय की तिला पनीर नव्हत वापरायच. पण मी हि पनीरची बिर्यानी बनवून तिची अर्धी इच्चा पूर्ण केलीये म्हणायला हरकत नाहीये.बनवायला एकदम सोप्पी आणि चविष्ठ. ह्याची कृती मी माझ्या ह्या मसालेदार बिर्याणीच्या कृतीवरून प्रेरित होऊन बनवलीये.

पनीर बिर्यानी
साहित्य
३ वाटी तांदूळ
४०० ग्राम पनीर
४ टोमाटो
३ कांदे
२ बटाटे
१ वाटी काजू
१/२ वाटी बदाम
८ दालचिनी
१५ लवंग
१५ वेलची
१/२ चमचा खसखस
१/२ चमचा मिरे
१ चमचा जिरे
१/२ चमचा बडीशेप
१/२ चमचा हळद
१ चमचा तिखट
१ चमचा धने पूड
१/२ चमचा आले पेस्ट
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/४ वाटी दही
१/२ वाटी दुध
२ चिमुट केशर
८ चमचे तूप
४ चमचा लोणी
मीठ
तेल

कृती
  • एका भांड्यात हळद, तिखट, आले पेस्ट, लसूण पेस्ट, दही आणि मीठ एकत्र करणे व त्यात पनीरचे तुकडे करून घालणे. एक दोन तास बाजूला ठेवून देणे.
  • भात कोमट पाण्यात भिजवून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात लोणी घालणे. पनीरचे तुकडे हलक्या गुलाबी रंग्वर भाजून घेणे व बाजूला ठेवणे.
  • त्याच कढईत ४ दालचिनी, ५ लवंग, मिरे, खसखस, बडीशेप, धने पूड, बदाम आणि १/२ वाटी काजू घालुन मंद आचेवर खमंग भाजून घेणे.
  • त्यात एक कांदा बारीक चिरून घालणे व गुलाबी होईपर्यंत भाजणे. मिश्रण थंड करणे व मिक्सर मध्ये एका टोमाटोबरोबर वाटणे.
  • कढईत २ चमचे तूप टाकून गरम करणे व त्यात हा मसाला घालुन भाजणे.
  • उरलेले ३ टोमाटो मिक्सर मध्ये वाटून घेणे व ते आणि मीठ मसाल्यात घालुन भाजी सुकेपर्यंत शिजवणे.
  • त्यात पनीरचे तुकडे घालुन ढवळणे व बाजूला ठेवणे.
  • कुकरमध्ये बटाटे उकातून त्याच्या साली काढून चकत्या करून घेणे.
  • दुध गरम करून त्यात केशर घालुन बाजूला ठेवणे.
  • भांड्यात पाणी गरम करून त्यात भिजवलेले तांदूळ घालुन शिजवणे. थोडेशे कच्चे राहिल्यावर त्यातील पाणी काढून थंड पाण्याखाली धुवून घेणे.
  • छोट्या कढईत ४ चमचे तूप गरम करून त्यात ४ दालचिनी, १० लवंग, १५ वेलची घालणे. हे मिश्रण आणि मीठ भातात मिसळणे व बाजूला ठेवणे.
  • उरलेले २ कांदे बारीक उभे चिरून तेलात मध्यम आचेवर गुलाबी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणे.
  • त्याच तेला उरलेले १/२ वाटी काजू तळून घेणे व बाजूला ठेवणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून बटाट्याच्या चाकात्यांचा थर लावणे.
  • भाताचा १/३ भाग बटाट्यावर पसरवणे. त्यावर तळलेले १/३ काजूचा वाटा, तळलेल्या कांद्याचा १/३ वाटा आणि अर्धे पनीरचे मिश्रण पसरणे.
  • पुन्हा १/३ भाताचा वाटा, १/३ भाग काजू, १/३ भाग कांदा आणि उरलेले पनीर पसरवणे
  • वरून उरलेला भात पसरवणे व त्यावर उरलेले काजू आणि कांदा पसरवणे.
  • परतणीच्या मागच्या बाजूनी पूर्ण थरातून जाईल अशी ५-६ भोके पाडणे व त्यावर केशर दुध ओतणे.
  • मंद आचेवर तवा ठेवून त्यावर हा कुकर बंद करून ठेवणे व २५-३० मिनिट शिजवणे व नंतर गरम गरम रायत्यासोबत खायला देणे.

टीप
मी १ थर भात, अर्धे पनीर मिश्रण आणि मग अजून एक थर भात (२ वाटी तांदुळाचा) वापरला. अर्धेच काजू आणि कांदा पण वापरले. उरलेला पनीर मसाला मी डब्यात घालुन पुढच्या आठवड्यात करण्यासाठी बाजूला ठेवून दिला. नंतर मला फक्त भात बनवावा आणि थोडा कांदा तळवा लागला. काम करून आल्यावर थकलेल्या दिवशी एकदम पटकन आणि चाविस्थ बिर्यानी खाता आली.
मी नेहमीच बिर्याणीच्या खाली बटाट्याचा थर देते त्यामुळे बिर्याणी करपट नाही.
मी पनीर आणि दह्याचे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलेले त्यामुळे पनीर चांगले राहते आणि मिश्रण थोडे सुकते सुद्धा.

तंदुरी पनीर पिझ्झा


माझा आवडता पिझ्झा :) इथे एका ठिकाणी मिळतो पण मला त्यांची चव नाही आवडत. त्यामुळे मी हा पिझ्झा बनवण्याचा बरेच दिवस विचार करत होते आज शेवटी बनवलाच.

तंदुरी पनीर पिझ्झा
साहित्य
४ वाटी गव्हाचे पीठ
२ वाटी मैदा
४०० ग्राम पनीर
२.५ वाटी मोझारेल्ला चीज
१ वाटी पार्मेसान चीज
१.५ वाटी दुध
५ चमचा दही
२.२५ चमचा यीस्ट
१/२ कांदा
१/४ वाटी सुकवलेले टोमाटो
४ ढोबळ्या मिरच्या
१/४ वाटी ओलिव्ह तेल
२ चमचा लोणी
१/२ चमचा साखर
२ चमचे तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/४ चमचा गरम मसाला
२ चमचा तंदुरी मसाला
१/२ चमचा लसूण पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१ चमचा बेसिल पाने
मीठ

कृती
  • एक वाटी कोमट पाण्यात साखर आणि यीस्ट घालुन ढवळणे. भांड्याला प्लास्टिकचे झाकण लावून १० मिनिट बाजूला ठेवणे.
  • परातीत गव्हाचे पीठ, मैदा, ओलिव्ह तेल, वितळवलेले लोणी, यीस्टचे पाणी आणि मीठ एकत्र करणे.
  • दुध घालुन मऊसर पीठ मळणे. मोठ्या भांड्यात तेलाचा हात लावून व झाकण लावून २ तास ठेवून देणे.
  • एका भांड्यात दही, आले पेस्ट, लसूण पेस्ट, जिरे पूड, धने पूड, गरम मसाला, तंदुरी मसाला आणि मीठ एकत्र करणे.
  • पनीरचे तुकडे मिश्रणात घालुन चांगले ढवळणे व फ्रीजमध्ये ठेवणे.
  • पीठ दुप्पट झाल्यावर त्याचे दोन भाग करून दोन तव्यांवर पसरवणे.
  • त्यावर पार्मेसान चीज, मोझारेल्ला चीज पसरवणे.
  • पनीर चे तुकडे, ढोबळी मिरची, कांदा, सुकलेला टोमाटो, बेसिल पाने पण पसरवणे.
  • ओव्हन ४००F/२००C वर गरम करून त्यात २५ मिनिट पिझ्झा भाजणे.

टीप
यीस्ट वापरताना पाणी कोमट असले पाहिजे, जास्त गरम पाण्यामुळे यीस्ट जळण्याची शक्यता असते आणि पाणी थंड असेल टर यीस्ट नीट फुलणार नाही. सगळे बरोबर झाले टर यीस्टच्या पाण्यात १० मिनिटांनी बुडबुडे आले असतात.
माझा एक पिझ्झा बरोबर झाला आणि दुसरा चांगला फुलाला नाही. थोडे शोधल्यावर कळले की ओव्हनच्या सगळ्यात वरच्या रकान्यात पिझ्झा बनवायला पाहिजे. मध्ये चांगला गरम न झाल्यानी पिझ्झा फुगत नाही.

खरबूजाची लस्सी


२ आठवड्यांपूर्वी मी एकदम वेगळा प्रयोग करून पहिला. फ्रीजमध्ये एक जुने खरबूज होते आणि दही होते त्यातून निर्माण झालेली हि कृती

खरबूजाची लस्सी
साहित्य
१ खरबूज
६ वाटी दही
५ चमचे साखर
एक थेंब व्हॅनिला इसेन्स
मीठ

कृती
  • खरबूज बारीक कापून घेणे
  • थोडे तुकडे वरून वापरण्यासाठी बाजूला ठेवणे व बाकीचे मिक्सरमध्ये वाटून घेणे.
  • ज्यूस गाळून घेणे आणि दह्यात मिसळणे.
  • त्यात साखर, मीठ, व्हॅनिला इसेन्स घालुन पुन्हा चांगले ढवळणे.
  • प्यायला देताना ग्लासमध्ये वरून खरबुजाचे तुकडे घालुन थंड करून देणे.

टीप
मी एकदम घट्ट दही वापरलेले आणि पाण्याचा बिलकुल वापर नाही केला कारण खाराबुजाचेच पाणी वापरल्यानी चव चांगली आली.

हरियाली चिकन बिर्याणी


मला काहीतरी चटपट खावसं वाटत होता म्हणून मी पाणी पुरी बनवलेली. तेंव्हापासून असलेला खूप सारा पुदिना राहिला होता. फ्रीजमध्ये चिकन पण होत आणि अजॉयला बिर्याणी खायची होती. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हि बिर्याणी तयार झाली. :)

हरियाली चिकन बिर्याणी
साहित्य
६ चिकनचे लेग
२ वाटी बासमती तांदूळ
१/२ पुदिना गड्डी
१/२ कोथिंबीर गड्डी
२ हिरव्या मिरच्या
२ दालचिनी
१/४ चमचा मिरे पूड
४ लवंग
४ वेलची
१/४ वाटी तूप
३ कांदा
१ टोमाटो
१/२ चमचा लसूण पेस्ट
४ चमचा दही
१ चमचा तिखट
चिमुटभर हळद
मीठ

कृती
  • चिकनला तिखट, हळद. लसूण पेस्ट आणि दही लावणे व २ तास बाजूला ठेवणे.
  • ६ वाटी पाणी गरम करणे त्यात तांदूळ अर्धा तास भिजवणे.
  • मिक्सरमध्ये पुदिना, कोथिंबीर, टोमाटो आणि हिरव्या मिरच्या बारीक वाटणे.
  • २ चमचा तूप बाजूला ठेवून उरलेले तूप कढईत गरम करणे.
  • १ कांदा बारीक उभा चिरणे व गुलाबी रंगावर कुरकुरीत तळणे व बाजूला ठेवणे.
  • उरलेल्या तुपात दालचिनी, मिरे पूड आणि उरलेला कांदा बारीक चिरून गुलाबी होईपर्यंत भाजणे.
  • कांद्याचे मिश्रण हिरव्या वाटणात घालुन सगळे बारीक वाटणे.
  • त्याच कढईत वाटलेले मिश्रण, १.५ वाटी पाणी आणि चिकन घालुन एकत्र करणे. मीठ घालुन मिश्रण सुकेपर्यंत शिजवणे.
  • चिकन शिजत असताना तांदुळातील पाणी ओतून त्यात अजून २ वाटी पाणी आणि मीठ घालुन भात शिजवणे. भात शिजत आला की त्यातील उरलेले पाणी ओतून थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • अर्धा चमचा तूप गरम करून त्यात लवंग, वेलची घालुन हलक्या आचेवर तळून घेणे. हे तुपाचे मिश्रण भातात ओतून एकत्र करणे.
  • कुकरला तुपाचा हात लावून त्यावर भाताचा थर लावणे. त्यावर चिकनचे मिश्रण व नंतर उरलेला भाताचा थर देणे. वरून तळलेले निम्मा कांदा घालुन कुकर बंद करणे.
  • कुकर १५ मिनिट मंद आचेवर गरम करणे व वाढत्ना वरून कुरकुरीत कांदा घालुन खायला देणे.

टीप
माझ्याकडे चिकनचे लेग होते म्हणून मी ते वापरले पण त्याऎवजी दुसरे तुकडेपण वापरता येतील.
इथल्या स्टोव्हला ८ स्वीच आहेत, मी त्यातील २ वर बिर्याणीचा कुकर ठेवला. नेहमीच्या स्टोव्हवर कुकर तसाच न ठेवता तवा ठेवून त्यावर ठेवावा म्हणजे बिर्याणी करपणार नाही. तसेच कुकरमध्ये सगळ्यात खाली उकडलेल्या बटाट्याच्या चकत्या लावल्यानीपण मदत मिळते.

मेदू वड्यासाठी चटणी


माझ्याकडच्या पुस्तकात वाचून मी हि चटणी केली आणि एकदम मस्त झाली. वड्याबरोबर एकदम उत्तम (अर्थातच मला वडा सांबार जास्त आवडत असल्यानी मी त्याची आठवण काढली).

मेदू वड्यासाठी चटणी
साहित्य
१/२ नारळ
१/४ वाटी फुटाणे डाळ
६ हिरव्या मिरच्या
१ कोथिंबीर
१/२ वाटी दही
१/२ चमचा म्हवरी
१/२ चमचा उडीद डाळ
चिमुटभर हिंग
१ चमचा तेल
मीठ

कृती
  • नारळ खवून घेणे व हिरवी मिरची, कोथिंबीर, फुटाणे डाळ आणि मीठ घालुन मिक्सरमध्ये बारीक वाटणे.
  • ह्या मिश्रणात दही घालुन एकत्र करणे.
  • कढईत ते; गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे व त्यात हिंग घालणे.
  • फोडणी चटणीत घालुन एकत्र करणे.

टीप
मी नारळाचे पाणीच नारळ मिश्रण वाटण्यासाठी वापरले त्यामुळे एकदम छान लागले आणि वेगळी साखर घालावी लागली नाही
तेलात लाल मिरची पण घालता येईल पण माझ्याकडे ती नसल्यानी मी नाही वापरली

पालकाच्या भजीची कढी


आम्ही अगदी लहान होतो तेंव्हापासून बाबा आईला त्यांच्या ऑफिसच्या कढीचे कौतुक सांगत आलेले बघितलंय. आई बिचारी नेहमी तशी (तिनी कधीही न खालेली) कढी बनवण्याचा प्रयत्न करायची पण यश बाबांच्या मते काही आले नाही :) त्यामुळे अर्थातच लहान असताना आम्ही आठवड्यातून दोनदा तरी हि कढी खायाचोच. ताकापेक्षा कढी बरी कारण खोकला नाही होणार त्यामुळे कढी कढी जास्तच वेळा. मी हि कढी बनवताना नेहमीच्या भजीऎवजी पालक वापरायचा ठरवला.

पालकाच्या भजीची कढी
साहित्य
३ वाटी पालक भजी
६ वाटी ताक
चिमुटभर हळद
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
३ चमचा साखर
१ चमचा तूप
मीठ

कृती
  • ताकात साखर आणि मीठ घालुन चांगले विरघळवणे.
  • कढईत तूप गरम करून त्यात म्हवरीची फोडणी करणे
  • त्यात हिंग, हळद टाकून टाकत मिसळणे.
  • वाढताना कढीत भजी घालुन देणे.

टीप
कढीच्या फोडणीत कडीपत्ता पण घालता येईल पण मला तो फारसा आवडत नसल्यानी मी वापरला नाही.

पनीर पुदिना टिक्का


हा अजून एक सोप्पा आणि चावैस्था पदार्थ मी शुक्रवारच्या जेवणात बनवला.

पनीर पुदिना टिक्का
साहित्य
२०० ग्राम पनीर
१/४ वाटी दही
१/२ वाटी पुदिना
१/४ वाटी कोथिंबीर
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा लसूण पेस्ट
४ हिरव्या मिरच्या
लोणी
मीठ

कृती
  • पनीरचे चौकोनी तुकडे करणे.
  • पुदिना, कोथिंबीर, आले, लसूण आणि मिरच्या एकत्र मीठाबरोबर वाटणे.
  • त्यात दही घालणे व ते पनीरच्या तुकड्यांना लावणे. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणे
  • ओव्हन २५०C वर गरम करणे.
  • बेकिंग ट्रेला लोणी लावणे व त्यावर पनीरचे तुकडे पसरणे.
  • पनीर २००C वर ५ मिनिट भाजणे.
  • पनीर उलटे करून अजून ५ मिनिट भाजणे.

टीप
पनीरचे तुकडे रात्रीच्या जेवणात एकदम छान लागत होते पण नाश्त्याला इतके नाही त्यामुळे जर जास्तीचे तुकडे असतील तर ते तसेच फ्रीजमध्ये ठेवून आयत्यावेळी भाजणे.

पनीर टिक्का


ह्या आठवयात मी अन्घेठीमध्ये गेलेले तेंव्हा तिथे कबाब बनवताना पहिले. ते बघून मला पण कबाब बनवण्याची फार इच्छा झाली त्यामुळे बाजारात जाऊन पनीर घेऊन आले आणि कबाब बनवले.

पनीर टिक्का
साहित्य
२०० ग्राम पनीर
२ टोमाटो
१ ढोबळी मिरची
१/२ वाटी दही
१/४ चमचा आले पेस्ट
१/४ चमचा लसूण पेस्ट
१ चमचा तिखट
१ चमचा जीरा पूड
१ चमचा चाट मसाला
२ चमचा तंदुरी मसाला
मीठ
लोणी

कृती
  • पनीर चौकोनी चिरणे.
  • दही, आले पेस्ट, लसूण पेस्ट, तिखट, जीरा पूड, चाट मसाला, तंदुरी मसाला आणि मीठ एकत्र करून पनीर बरोबर एकत्र करणे व २ तास फ्रीजमध्ये ठेवणे.
  • टोमाटो आणि ढोबळी मिरचीचे चकत्या करणे त्यावर मीठ आणि थोडा चाट मसाला एकत्र करणे.
  • टिक्का बनवण्याच्या दांडीवर टोमाटो, ढोबळी मिरची आणि पनीर लावणे.
  • लोणी वितळवून टिक्यावर ओतणे व त्याला ३० मिनिट गुलाबी रंगावर ग्रील करणे.

टीप
ग्रील केलेले पनीर चांगले लागते पण मी कुठेतरी पनीर तळून काठीला लावलेले वाचणे. ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल त्यांना हा पर्याय आहे.
आमच्या खालच्या काकू मातीच्या भांड्यात कोळसा घालुन त्यावर कबाब भाजतात.

पियुष


अगदी लहान असल्यापासून बाबा मला एफ सी रोडवरच्या बँकपासून लक्ष्मी रोडपर्यंत चालत घेऊन जायचे. मला ते चालणे फार आवडायचे ते एकमेव कारणाकरता. सगळ्यात शेवटी जनता दुग्ध मंदिरात पियुष प्यायला मिळायचा. जेंव्हा जेव्हा मी पुण्याला जाते तेंव्हा न चुकता खूप सारा पियुष पिऊन येते. २-३ वर्षांपूर्वी आईनी तो घरी बनवायला चालू केला. काल मी स्वतः करून बघितला आणि प्रयोग एकदम यशस्वी होता.

पियुष
साहित्य
५ वाटी दही
१ लिंबू
८ चमचा साखर
चिमुटभर जायफळ पूड
चिमुटभर पिवळा रंग
मीठ

कृती
  • दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करणे.
  • त्यात साधारण २-३ वाटी पाणी घालुन पातळ करणे.
  • मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.

टीप
मी एकदम जाड दुध वापरून दही बनवले व दह्याला आंबट होऊ दिले नाही. लिंबाची एकदम चांगली चव देते
बऱ्याचवेळा लिंबाच्या कडव्यामुळे हे कडू होते म्हणून आज मी १/२ चमचा व्हिनेगर वापरले आणि त्याचा एकदम खूप चांगला उपयोग झाला. कडूपणा नाही आणि चव पण एकदम बरोबर

मसाले भात


हा मराठी पदार्थ लग्नात किंवा कुठल्याही कार्यक्रमात एकदम असायलाच हवा. साधा, सोप्पा आणि चाविस्थ भाताचा प्रकार.

मसाले भात
साहित्य
१ वाटी बासमती तांदूळ
१/४ वाटी दही
१/२ वाटी तोंडली
१/२ बटाटा
१/४ वाटी मटार
१/२ वाटी कोथिंबीर
१/२ वाटी किसलेले खोबरे
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
८-९ काजू
चिमुटभर वेलची पूड
२ लवंग
१ दालचिनी
१ तेजपत्ता
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
१ चमचा तूप
मीठ

कृती
  • तांदूळ धुवून पाणी निथळवणे.
  • त्यात तिखट, गरम मसाला, वेलची पूड, दही घालुन १० मिनिट ठेवणे.
  • कुकरमध्ये तूप घालुन त्यात म्हवरीची फोडणी करणे.
  • त्यात हिंग, तेजपत्ता, दालचिनी आणि काजू घालुन एक दोन मिनिट परतणे.
  • त्यात उभी चिरलेली तोंडली, चौकोनी चुरून बटाटा घालुन अजून दोन मिनिट परतणे.
  • त्यात तांदूळ, मटार आणि मीठ घालुन दोन मिनिट परतणे.
  • भातात २ वाटी पानिओ घालुन कुकरचे झाकण लावून ४ शिट्ट्या काढणे.
  • वाढताना ताटात भातावर खोबरे, कोथिंबीर आणि तूप सोडून देणे.

टीप
ह्यात फ्लावर किंवा वांगेपण वापरता येईल
खोबरे आणि कोथिंबीर घातल्यानी एकदम मस्त आणि वेगळी चव ह्या भाताला येते

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP