Showing posts with label पोळी. Show all posts
Showing posts with label पोळी. Show all posts

चिकन रोल


बरेच दिवस झाले मी कुठलाही चिकनचा पदार्थ बनवून. मागच्या बरेच वेळा अजॉयच चिकन किंव्हा मटन बनवत होता, अर्थात प्रत्येक वेळा एकाच टाईपचा रस्सा आणि फक्त चिकन किंव्हा मटन घालुन. त्यामुळे मी आज विचार केला की चिकनचे काहीतरी वेगळे बनवून त्याला थोडा आश्चर्यचकित करूया. त्यावेळी मला त्याच्या आवडत्या रोलची आठवण झाली आणि मी हा पदार्थ बनवला.

चिकन रोल
साहित्य
५०० ग्राम बोनलेस चिकन
२ वाटी मैदा
१/२ वाटी गव्हाचे पीठ
१ मोठा कांदा
१ वाटी ब्रोकोली
१ वाटी टोमेटो
१/२ वाटी टोमेटो केचप
१/४ चमचा हळद
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धने पूड
१/२ चमचा मिरे पूड
१/२ चमचा गरम मसाला
१ चमचा आलं किसून
८ लसूणाच्या पाकळ्या
मीठ
तेल

कृती
  • मैदा, गव्हाचे पीठ, मीठ आणि २ चमचे तेल घालुन पीठ नीट मळून भिजायला बाजूला ठेवणे.
  • चिकनचे छोटे छोटे तुकडे चिरून बाजूला ठेवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात चिकन घालुन ढवळणे.
  • चिकन पांढरे झाल्यावर, त्यात किसलेले आलं, हळद, तिखट, जिरे पूड, धने पूड, मिरे पूड आणि गरम मसाला घालुन ढवळणे.
  • चिकन मधून मसाल्याचा वास सुटल्यावर, त्यात केचप घालुन ५ मिनिटे शिजवणे
  • त्यात बारीक चिरलेला टोमेटो आणि मीठ घालुन चिकन पूर्णपणे शिजवून बाजूला ठेवणे.
  • तव्यामध्ये तेल गरम करून त्यावर बारीक चुरून लसूण, उभा चिरलेला कांदा आणि ब्रोकोली घालुन पूर्णपणे शिजेपर्यंत सारखे हलवत शिजवणे. त्यात मीठ आणि चिमुटभर मिरे पूड घून ढवळणे आणि बाजूला ठेवणे
  • एक अंडे नीट फेटून रुंद पातेल्यात ओतणे.
  • पीठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून पातळ चपाती लाटणे.
  • चपाती अंड्यामध्ये एका बाजूने भिजवून, न भिजलेली भाजू खाली असे गरम तव्यावर टाकणे
  • थोडे तेल शिंपडून दोन्हीबाजूने नीट भाजणे व ताटात टाकणे
  • चपातीवर मध्ये बारीक रेषेत दोन चमचे चिकन घालणे. त्यावर अर्धा चमचा ब्रोकोली आणि कांदा मिश्रण घालणे.
  • चपातीची खालची बाजू आणि डावी बाजू मिश्रणावर दुमडणे आणि मग घट्ट रोल करणे.

टीप
मला रोल थोडे हलके करायचे होते म्हणून मी एक अख्खे अंडे एका चपातीवर घालण्याऎवजी चपातीला हलका अंड्याचा वॉश दिला. त्यामुळे चपाती एकदम हलकी झाली आणि चिकनची चव चांगली खुलून आली.

पुरण पोळी


पुरण पोळी हा असा एक प्रकार आहे जो मला आईनी बनवलेलाच आवडतो. बरेच लोक त्याला पराठ्यासारखा बनवतात पण पोळी आणि पराठा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पोळी हि एकदम मऊसुत असणे एकदम महत्वाचे आहे. आईकाढून आधी मी ह्याची कृती घेतलेली पण मला काही आई सारखी मऊ पोळी बनवायला जमली नाही. आता पुण्यात असताना मी आई कडून चांगली शिकून आले आणि इथे दसर्याच्या निमित्तानी देत आहे. सगळ्यांना दसर्याच्या शुभेच्छा.

पुरण पोळी
साहित्य
४ वाटी हरबरा डाळ
३ वाटी गुळ
२ वाटी पीठ
१ चमचा मैदा
१ वाटी तांदुळाचे पीठ
१/२ वाटी तेल

कृती
  • मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून एकदम मऊ पीठ भिजवणे.
  • पीठ स्टीलच्या भांड्यात टाकून बोटे दाबून खड्डे करणे.
  • सगळी भोके बुडतील इतके तेल ओतणे आणि कमीत कमी २ तास भिजायला ठेवणे.
  • हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घेणे.
  • डाळीतील जास्तीचे पाणी बाजूला काढणे. (जास्तीच्या पाण्याची कटाची आमटी बनवता येईल)
  • त्यात गुळ घालुन कढईत सुकेपर्यंत शिजवणे.
  • पुरण पुरण यंत्रातून फिरवणे. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.
  • पुरण पोळी करण्यासाठी तवा एकदम मंद आचेवर गरम करणे.
  • पुरणाचा लिंबाच्या दुप्पट आकाराचा गोळा बनवणे.
  • पिठाचा लिंबाच्या आकाराचा गोळा बनवणे व त्याची वाटी बनवणे. त्यात पुरणाचा गोळा घालुन पीठ बंद करणे.
  • गोळे तळव्यावर ठेवून अलगद दाबणे. पीठाचे कव्हर बाजूला गेले तर ओढून पुन्हा आत मध्ये घेणे
  • भरपूर तांदुळाचे पीठ पोलपाटाला लावणे. पुरण पोळीचा गोळा तांदुळाच्या पिठात बुडवून लाटणे.
  • मध्ये मध्ये पोळी हातावर घेवून खाली चिकट नाही ह्याची खात्री करणे व मधून मधून तांदुळाचे पीठ लावत राहणे.
  • एकदम अलगद आणि बाहेरच्या दिशेनी लाटणे महत्वाचे आहे.
  • पोळी गरम तव्यावर मंद आचेवर दोन्ही बाजूनी भाजणे. दुमडून वाढणे.

टीप
पोळीच्या पिठाचा इलॅस्टिकपणा पोळीला पातळ लाटण्यासाठी आणि त्याचा थर पातळ ठेवण्यासाठी उपयोगी पडतो.
पुरण पोळी बनवताना पहिल्यांदा छोटी लाटून बघणे व जसे जमेल तसे मोठे मोठे करणे. भरपूर तांदुळाचे पीठ वापरणे व नंतर पाहिजे तर स्वतःच्या सोयीप्रमाणे कमी करणे.
पोळी पोलपाटाला चिकट नाही हे बघण्यासाठी तळवा पोळीवर ठेवून पोलपाट उलटे करणे.तव्यावर पोळी टाकताना पण तसेच करणे. कधीही बोटांनी पोळी उचलू नये.
पोळीच्या कडांना जास्त पीठ असेल तर ह्याचा अर्थ असा आहे की पुरणापेक्षा पीठ जास्त वापरलाय. त्या नंतरच्या पोळीला थोडे कमी पीठ वापरून बघणे
पोळी लाटताना बाहेरच्या बाजूला लाटल्यानी पोळी सगळीकडून चांगली पसरते आणि बाहेरच कव्हर पण तुटत नाही.
शेवटची टीप म्हणजे हि एकदम किचकट कृती आहे त्यामुळे पहिल्यांदा यश नाही आलेतरी दुखी होऊ नये, थोड्या प्रयत्नानंतर यश नक्की येईल. मी आईनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी सांगायचा प्रयत्न केलाय. आशा आहे त्याचा उपयोग होईल

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP