काकडीचे ऑमलेट


बरेच दिवसांनी मी इथे पोस्ट करत आहे. मागच्या आठवड्यात बनवलेले पदार्थ मला फोटो काढून पोस्ट करण्याची ताकद नसल्यानी राहून गेले पण आज उठायला उशीर झाल्यानी काहीतरी पटकन बनणारे बनवण्यासाठी म्हणून हा प्रयोग केलाय

काकडीचे ऑमलेट
साहित्य
१ काकडी
१ वाटी तांदुळाचे पीठ
३-४ हिरव्या मिरच्या
१ चमचा जिरे
मीठ
तेल

कृती
  • काकडी किसून घेणे.
  • त्यात तांदुळाचे पीठ, हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ घालुन एकत्र करणे.
  • पाणी घालुन पातळ पीठ बनवणे.
  • तवा गरम करून त्यावर तेल लावणे. पीठ ओतून मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी शिजेपर्यंत शिजवणे.

टीप
ह्यासाठी नॉनस्टिक तवा वापरल्यानी तव्याला चिकटत नाही
मी कधी कधी ह्यात एक-दोन चमचा रवा घालते त्यामुळे थोडे कमी चिकट होते.
हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर जास्त चांगले लागते पण वेळ नसल्यानी मी लोणच्याबरोबर खायला दिले

पियुष


अगदी लहान असल्यापासून बाबा मला एफ सी रोडवरच्या बँकपासून लक्ष्मी रोडपर्यंत चालत घेऊन जायचे. मला ते चालणे फार आवडायचे ते एकमेव कारणाकरता. सगळ्यात शेवटी जनता दुग्ध मंदिरात पियुष प्यायला मिळायचा. जेंव्हा जेव्हा मी पुण्याला जाते तेंव्हा न चुकता खूप सारा पियुष पिऊन येते. २-३ वर्षांपूर्वी आईनी तो घरी बनवायला चालू केला. काल मी स्वतः करून बघितला आणि प्रयोग एकदम यशस्वी होता.

पियुष
साहित्य
५ वाटी दही
१ लिंबू
८ चमचा साखर
चिमुटभर जायफळ पूड
चिमुटभर पिवळा रंग
मीठ

कृती
  • दही, साखर, जायफळ पूड, मीठ, लिंबाचा रस आणि पिवळा रंग एकत्र करणे.
  • त्यात साधारण २-३ वाटी पाणी घालुन पातळ करणे.
  • मिश्रण साखर विरघळेपर्यंत चांगले घुसळणे व थंड करून प्यायला देणे.

टीप
मी एकदम जाड दुध वापरून दही बनवले व दह्याला आंबट होऊ दिले नाही. लिंबाची एकदम चांगली चव देते
बऱ्याचवेळा लिंबाच्या कडव्यामुळे हे कडू होते म्हणून आज मी १/२ चमचा व्हिनेगर वापरले आणि त्याचा एकदम खूप चांगला उपयोग झाला. कडूपणा नाही आणि चव पण एकदम बरोबर

कुरकुरीत मुंगडाळ


मला हि डाळ आवडते आणि आज दुकानात त्याचे पाकीट बघितल्यावर घरी करून बघायचे ठरवले. एकदम सोप्पे आणि पटकन होणारा हा पदार्थ तुम्हीसुद्धा करून बघा.

कुरकुरीत मुंगडाळ
साहित्य
१ वाटी मुंग डाळ
चिमुटभर खाण्याचा सोडा
मीठ
तेल

कृती
  • मुंग डाळ ४-५ वाटी पाण्यात सोडा घालुन रात्रभर भिजवणे.
  • सकाळी मुंग डाळ धुवून कापडावर पसरवणे.
  • कढईत तेल गरम करून त्यात मध्यम आचेवर डाळ तळणे व टिश्यूवर तेल निथळण्यासाठी ठेवणे.
  • मीठ शिंपडून थंड झाल्यावर खायला देणे.

टीप
मी मुंगडाळ तळताना त्यात एक मोठी स्टीलची चाळणी ठेवून त्यात तळली त्यामुळे डाळ तेलातून बाहेर काढणे सोप्पे होते
मुंग डाळ तेलात टाकल्यावर खूप बुडबुडे आले पाहिजेत. हळू हळू ते कमी होऊन एकदम नाहीशे झाले की डाळ तयार असेल.

मसाले भात


हा मराठी पदार्थ लग्नात किंवा कुठल्याही कार्यक्रमात एकदम असायलाच हवा. साधा, सोप्पा आणि चाविस्थ भाताचा प्रकार.

मसाले भात
साहित्य
१ वाटी बासमती तांदूळ
१/४ वाटी दही
१/२ वाटी तोंडली
१/२ बटाटा
१/४ वाटी मटार
१/२ वाटी कोथिंबीर
१/२ वाटी किसलेले खोबरे
१/२ चमचा तिखट
१/२ चमचा गरम मसाला
८-९ काजू
चिमुटभर वेलची पूड
२ लवंग
१ दालचिनी
१ तेजपत्ता
१/४ चमचा म्हवरी
चिमुटभर हिंग
१ चमचा तूप
मीठ

कृती
  • तांदूळ धुवून पाणी निथळवणे.
  • त्यात तिखट, गरम मसाला, वेलची पूड, दही घालुन १० मिनिट ठेवणे.
  • कुकरमध्ये तूप घालुन त्यात म्हवरीची फोडणी करणे.
  • त्यात हिंग, तेजपत्ता, दालचिनी आणि काजू घालुन एक दोन मिनिट परतणे.
  • त्यात उभी चिरलेली तोंडली, चौकोनी चुरून बटाटा घालुन अजून दोन मिनिट परतणे.
  • त्यात तांदूळ, मटार आणि मीठ घालुन दोन मिनिट परतणे.
  • भातात २ वाटी पानिओ घालुन कुकरचे झाकण लावून ४ शिट्ट्या काढणे.
  • वाढताना ताटात भातावर खोबरे, कोथिंबीर आणि तूप सोडून देणे.

टीप
ह्यात फ्लावर किंवा वांगेपण वापरता येईल
खोबरे आणि कोथिंबीर घातल्यानी एकदम मस्त आणि वेगळी चव ह्या भाताला येते

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

  © माझे स्वयंपाक प्रयोग | Template Recipes by Emporium Digital

TOP